स्वयंसेवी संस्था: काही निरीक्षणे, काही अनुमाने

गेली काही वर्षे मी स्वयंसेवी संस्थांना जवळून पाहतो आहे. त्यांच्यासोबत काम करतो आहे. त्यांच्यासोबत काम करत असताना काही गोष्टी पाहण्यात आल्या, काही कानावर पडत गेल्या, काही वाचनात आल्या. अशा कामाच्या जवळ जाण्यापूर्वी स्वयंसेवी संस्थांबद्दल मराठी बुद्धिजीवींमध्ये कोणते प्रवाद आहेत; या संस्थांची जनमानसात, विचारवंतांत, कोणती प्रतिमा आहे, याची मला सुतराम कल्पना नव्हती. किंबहुना, मेधा पाटकर, सुरेखा दळवी, आदींची कामे जवळून पाहिल्यानंतरही ‘एनजीओ’ ही संज्ञा मला माहीत झालेली नव्हती. म्हणजे, अगोदर तपशील माझ्यासमोर आले ; नंतर इतिहास, ऐतिहासिक प्रवाह माहीत झाले आणि त्याहीनंतर फॉरिन फंडिंग व त्याला जोडून येणारे प्रवाद, आक्षेप, वगैरे कळले. एका दृष्टीने हा प्रवास उलट्या दिशेने आहे. प्रश्नांअगोदर मला उत्तरांची सामग्री माहीत झाली. अर्थात, प्रश्न कळल्यावर अगोदर माहीत असलेल्या तपशिलांचे आशय, अन्वय बदलले, हे खरे; प्रश्नांच्या अनुषंगाने विचार करून आणि मग इथे तिथे चौकश्या करून, चौकस प्रश्न विचारून मी मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. याला शिस्तशीर अभ्यास म्हणता येणार नाही, ही जाणीव मला असल्यामुळेच माझ्या प्रतिपादनाच्या मर्यादा स्पष्ट करणे मला गरजेचे वाटते. माझी मांडणी स्वत:च्या अनुभवा-निरीक्षणांवर आणि स्वत: विचारलेल्या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरांवर आधारलेली असल्याने यात बोगस एनजीओ आणि समाजकार्याच्या नावाने होणारा परदेशी पैशाचा अपहार, हा संदर्भ येणार नाही. समाजातल्या नाडलेल्या वर्गासाठी काम करणाऱ्या, किमान त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा धरून सुरुवात करणाऱ्या माणसांनाच धरून ही मांडणी आहे. म्हणून आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो: मी जरी एनजीओची प्रतिमा का बिघडते, यावरच लिहीत असलो; तरी कृपया माझे लिखाण म्हणजे माझ्या माहितीतल्या संस्थांवरील भाष्य समजू नये, कारण माझ्या पाहण्यातल्या बहुतेक संस्था खरोखरच समाजाला उपकारक काम करत आहेत.
माझ्या वडिलांना समाजकार्याची आवड होती. आम्ही कामगारवस्तीत राहत होतो. वडिलांच्या ‘कार्या’चा एक भाग म्हणून आमच्याकडे बेडपॅन, थर्मामीटर, गरम पाण्याची पिशवी, वगैरे साहित्य होते आणि आजारपणाचा पुरावा दाखवत कोणी मागायला आले, की आम्ही त्याचे नाव-पत्ता लिहून घेऊन नाममात्र भाड्यावर सामान देत असू. वडिलांनी लेटरहेड छापले ; तरी संस्थेचे कार्यालय असावे, त्यासाठी जागा असावी, असले काही त्यांना सुचले नसावे. तेव्हा समाजकार्य म्हणजे लष्करच्या भाकऱ्या, अशी समजूत होती. समाजकार्य करणारा स्वत:च्या पदराला खार लावून ते करत असे. त्यापायी घरच्यांचे बोल ऐकत असे (हे वाक्प्रचार मी घरीच ऐकलेले आहेत). गोपाळ गणेश आगरकरांनी पदवी घेतल्यावर आईला लिहिलेले पत्र प्रसिद्धच आहे. ‘माझ्या ज्ञानाचा उपयोग मी स्वत:च्या भल्याकरिता न करता समाजासाठी करायचे ठरवले आहे,’ असे आईला सांगून त्यांनी स्वार्थाचा होम केला आणि जन्मभराची गरिबी पत्करली.
वेगाने वाढू लागलेल्या अर्थव्यवस्थेत भ्रष्टाचार बोकाळतो, असा इतिहास आहे आणि या नियमाला अनुसरूनच भारतात राजकारणाने करियरचे रूप घेतले. पण त्याअगोदर काही वर्षे समाजकारण त्या रस्त्याला लागले होते. ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ अशी पदवी घेऊन सामाजिक संस्थांमध्ये नोकरी करणारे करियर म्हणून समाजकार्य करतात आणि समाजकार्याला स्वत:साठी उत्पन्नाचा स्रोत बनवतात. एका परीने, यात आगरकरांसमोरचा पेचच नाहीसा होतो. स्वार्थ आणि परमार्थ, यात विरोधच उरत नाही.
परंतु यात भ्रष्टाचार आहे, किंवा हे अनैतिक आहे, असे समजायचे कारण नाही. समाजकार्यासाठी खास प्रशिक्षण मिळण्याची संकल्पना मुळीच वावगी नाही. तसेच, एकट्याने समाजकार्य करणाऱ्याला उत्तेजन द्यायला जर कोणी उभे राहिले आणि त्या पैशांच्या पाठबळावर कोणी आपल्या कार्याचा व्याप वाढवला आणि तो वाढता व्याप सांभाळण्याचा अधिक कार्यक्षम मार्ग म्हणून संस्था स्थापन केली, तर त्यात काहीच वावगे नाही. किंबहुना, एका ठिकाणी बसून थोडक्यात समाधान मानण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतेची कमाल पातळी गाठण्याचा प्रयत्न करण्याला चक्क नैतिकसुद्धा म्हणता येईल.
पण हे असे विशाल पटावर समाजकार्य करणाऱ्याला अपरिहार्यपणे कचेरी, टेलिफोन, टेबल-खुर्ध्या, स्टेशनरी, (नवीन भर: कॉम्प्युटर) वगैरे लागते. संस्थेचा नोकरवर्ग असतो. त्यांचे पगारपाणी, जागेचे भाडे, कामासाठी होणारा प्रवासखर्च, छपाईखर्च, असे खर्च असतात. संस्था स्थापन करणाऱ्याला समाजासाठी काम जरूर करायचे असते; पण एवढा खर्च सोसायची त्याची ऐपत नसते. म्हणून ‘फंडिंग’ लागते. ते मिळते; पण ते संस्थेने हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी असते; त्याचा विनियोग संस्थेच्या स्वत:च्या गरजांसाठी करता येत नाही. पैसा मिळतो, तो प्रकल्पाला, संस्थेला नाही. मग प्रकल्पाला मिळणाऱ्या निधीतूनच काही रक्कम बाजूला काढली जाते. कशी, तर प्रत्यक्ष खर्चापेक्षा जास्त खर्च दाखवून. संस्थेच्या ताळेबंदात असल्या मालमत्तेसमोर विश्वस्तांकडून घेतलेले कर्ज वा मिळालेल्या देणग्या असले काही मांडले जाते. या नोंदी अर्थातच नियमपूर्तीपुरत्या असतात. खऱ्या नसतात. म्हणजे, स्वत:ची तुंबडी न भरता समाजासाठी काम करतानासुद्धा असा ‘तांत्रिक भ्रष्टाचार’ हातून होतच असतो. याचे स्वत:शी आणि इतरांसमोर कितीही समर्थन केले, तरी ‘खोटे हिशेब दाखवणे समर्थनीय असू शकते,’ असे एक अपमूल्य रुजतेच.
स्वयंसेवी संस्थेत काम करणाऱ्यांना नोकर’ म्हणत नाहीत, ‘कार्यकर्ते’ म्हणतात. त्यातले काही पगारदारही असतात. मात्र, निव्वळ पोटापाण्यासाठी नोकरी करणाऱ्यांपेक्षा या कार्यकर्त्यांनी जास्त सामाजिक जाणीव दाखवावी, अशी अपेक्षा असते. स्पष्ट म्हणायचे, तर त्यांचा मेहनताना माफक असतो. परंतु फंडिंग एजन्सीच्या बैठका मोठ्या शहरात, उंची हॉटेलात भरतात. राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम असते. तशा ठिकाणी राहण्याचा विचारदेखील संस्थाचालक एरवी करणार नाही, त्याला (वा तिला) ते परवडणारच नाही. म्हणजे, संस्थाचालक आणि फंडिंग एजन्सीला भेटायला जाणारे इतर पदाधिकारी, यांचे ‘मानधन’ जरी कार्यकर्त्यांप्रमाणे (इतर संस्थांमधल्या त्यांच्या तोलामोलाच्या पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत) कमी असले, तरी त्यांचा वावर आणि वर्षातून अनेक वेळा प्रवास व मुक्काम चांगल्यापैकी उंची असतो.
आता आपण याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करू.
समाजकार्य करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते फील्ड वर्कर्स केवळ समाजात वावरत असतात, असे नाही; तर ते समाजातल्या नाडलेल्या, निम्न स्तरावरच्या वर्गात वावरतात. बऱ्याच वेळा हे कायकर्ते त्या वर्गातूनच आलेले असतात आणि म्हणून त्यांना त्या वर्गाविषयी बांधिलकीची भावना असते. अशा वेळी, सेवाभावी कार्यकर्ता आणि त्या सेवेचा लाभ घेणारी समाजातील व्यक्ती; यांच्यात सामाजिक, सांस्कृतिक, (आणि त्याबरोबर आर्थिकही) दरी असून चालणार नाही. तशी दरी असेल, तर त्या कामाला दानधर्माचे स्वरूप येईल. देवळाबाहेर भिकाऱ्यांना जेवण देणारा जे उपकार करत असतो; ते उपकार आणि समाजसेवी संस्थेचे कार्य ह्यांत मूल्यात्मक फरक हवा असेल, तर कार्यकर्ता लोकांना ‘आपला’ वाटला पाहिजे. म्हणून त्या कार्यकर्त्याची राहणी सामान्य लोकांच्या जवळची पाहिजे. म्हणजेच त्याची मिळकत फार वरची असू नये! आता पलीकडची बाजू. फंडिंग एजन्सी बहुधा परदेशी असते. ती तशी असो वा नसो, अविकसित समाजघटकांसाठी पैसे देणाऱ्यांना आपला पैसा सत्पात्री पोहोचतो आहे, याची खातरजमा करावीशी वाटण्यात काहीच वावगे नाही. आणि ज्या प्रकारच्या राहणीची त्यांना सवय असते, ती अपेक्षा त्यांनी कार्यरत संस्थांना भेटताना ठेवली, तरी चूक नाही. म्हणजेच दात्यांना भेटताना त्यांच्या पातळीवर जाणे आपोआप आवश्यक ठरते. समाजसेवी संस्थाचालकाला ते भागच असते!
सामाजिक संस्थेतले वरिष्ठ पदाधिकारी आणि कनिष्ठ कार्यकर्ते यांच्या प्रतिमेत अंतर का पडते, याचे हे स्पष्टीकरण असले, तरी समर्थन नाही. संस्थाचालक, त्याचे वरिष्ठ सहकारी आणि प्रत्यक्ष ‘फील्ड’मध्ये फिरणारे संस्थेचे कार्यकर्ते कामानिमित्त एकत्र येत असतात. या विषमतेचा परिणाम दोघांवर होतो. काही निमित्ताने जेव्हा कार्यकर्त्याला फंडिंग एजन्सीच्या सांस्कृतिक स्वरूपाचे दर्शन होते, तेव्हा तो सहाजिक अस्वस्थ होतो. त्याला यात अन्याय दिसतो. कार्याला मिळणारे पैसे आणि प्रवास, बैठका यांवर खर्च होणारे पैसे यांचे व्यस्त प्रमाण त्याला खटकते. त्याची ‘त्याच्या लोकां’शी बांधिलकी जर पक्की असेल, तर संस्था आणि अशा प्रकारचे तथाकथित समाजकार्य यांच्याविषयी त्याला वाटणारी बांधिलकी आपुलकी डळमळीत होऊ लागते. हे कामासाठी धोकादायक असते.
आणि त्याची बांधिलकी जर पक्की नसेल, त्याच्यातली वैयक्तिक उन्नतीची प्रेरणा जर त्या बांधिलकीवर कुरघोडी करत असेल, तर ‘हे आपले लक्ष्य ; इथे आपल्या पोचायचे आहे, असे आपल्याला व्हायचे आहे,’ अशी महत्त्वाकांक्षा त्याच्या मनात जागते.
संवेदनशील संस्थाचालकालादेखील या विरोधाभासाचा त्रासच होतो. फंडिंग एजन्सीच्या संस्कृतीविषयी दुरावा वाटू लागतो, त्यांच्याकडून पैसे घेणे कमीपणाचे वाटू लागते, स्वत:च्या मार्गाविषयी संदेह निर्माण होऊ लागतो. किंवा तोही सरळ सरळ भ्रष्ट पैसेखाऊ याअर्थी नाही, कीड लागण्याअर्थी होऊ लागतो. एकूण, स्वत:ला दानधर्म करणाऱ्यातला समजू लागतो. गाडी बाळगणे त्याला नैसर्गिक वाटू लागते आणि कधी काळी फील्डमध्ये गेलाच, तर तिथली जनता त्याला ‘प्रजा’ वाटू लागते.
इथे राज्याचा प्रधान झालेल्या गरिबाने स्वत:ची मती भ्रष्ट न होण्यासाठी एका खोलीत जुने जाडेभरडे कपडे मुद्दाम सांभाळल्याची कहाणी आठवते. स्वत:ची मूळ प्रेरणा जागी ठेवून श्रीमंती वातावरणात वावरण्याला आपद्धर्म म्हणून स्वीकारण्याइतकी अविचल आत्मनिष्ठा फार थोड्यांकडे आढळते. असे ‘योगी’ त्यांच्या कार्यक्षेत्रात; म्हणजे अविकसित, मागास प्रदेशात राहतात. तिथल्या बऱ्यावाईट परिस्थितीचे चटके खात जगणाऱ्या त्यांच्या फील्ड वर्कर्सच्या सुखदुःखांत सामील होतात. सामाजिक संस्थांचे संपूर्ण क्षेत्र बदनाम होत नाही, ते अशा मोजक्या उदाहरणांमुळेच.
कार्यकर्त्याला किती पैसे मिळावेत, याला आणखीही एक बाजू आहे. समजा, सामाजिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थेने चीनमधल्या ‘बेअरफूट डॉक्टर’च्या धर्तीवर उपचारक म्हणजेच प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करण्याची योजना घडवली. ही योजना त्या प्रकारच्या इतर योजनांपेक्षा उजवी आहे, असे प्रतिपादन करताना योजनामूल्याचा निकष जर महत्त्वाचा ठरणार असेल, तर त्या कार्यकर्त्यांना कमी मोबदला दिल्यास योजना जास्त सरस ठरेल, इतर ठिकाणी (राज्य, देश) अनुसरणीय ठरेल !
मुळात एखादा समाजकार्याच्या वाटेकडे जातोच का ?
स्वत:च्या सुखवस्तू स्थितीला कर्तृत्वाबरोबर विशिष्ट समाजस्तरात जन्म मिळाल्याचा अपघातही कारणीभूत आहे, या जाणिवेसोबत येणाऱ्या सदसद्विवेकबुद्धीच्या टोचणीमुळे, किंवा समाजाचे देणे चुकवण्यासाठी, किंवा पुण्य कमावण्यासाठी. असल्या कोणत्याही कारणापायी समाजकार्य करणारे यथाशक्ति योगदान देत राहतात, जे बऱ्याचदा पैशाच्या रूपातले असते. आपल्या थोडक्या प्रयत्नांमुळे दुसऱ्या कुणाला तुलनेने फारच जास्त मिळते आहे, या जाणिवेने उत्साहित होऊन जे काम करतात, त्यांना तो आनंदच पुरेसा असतो. या दोन्ही प्रकारच्या कामात ‘लक्ष्य’ असे काही नसते. ते एका अखंड प्रक्रियेचा भाग असते. पण, काम करता करता कधी कधी लोकांच्या कृतज्ञतेची चटक लागते, त्यातला नावलौकिक सर्वांत जास्त ग्लॅमरस वाटू लागतो. त्या लौकिकात वर वर चढणाऱ्या पायऱ्या दिसू लागतात आणि समाजकार्यात शिखर गाठण्याची मनीषा उत्पन्न होते. हे शिखर अर्थातच सापेक्ष असते, त्या समाजसेवकापेक्षा मला लोक मोठा मानतात,’ अशा स्वरूपाचे असते. पण मग हळू हळू प्रत्यक्ष कामापेक्षा लौकिकाचे वजन वाढू लागते. प्रसिद्धीला, मरातबाला महत्त्व येते. कामाचा जोर ओसरलेल्या आणि लौकिकाचे पॉलिश चकचकीत ठेवण्यापुरते प्रयोजन उरलेल्या संस्था शोधणे फारसे कठीण नाही.
यातही एक गोम आहे. प्रामाणिक माणूस सुरुवातच संस्था स्थापून करत नाही. काम वाढले, की संस्थेच्या चौकटीची गरज भासू लागते. एकदा चौकट उभारली, की ती टिकवून धरणे हे देखील एक काम होते. त्यासाठी सतत पैसे मिळवावे लागतात. परदेशी फंडिंगवर अवलंबून राहायचे नसेल, तर देशात, प्रतिष्ठितांत लौकिक राखावा लागतो. गरजेपेक्षा जास्त पैसा हाती आला, की त्याचा विनियोग ‘चांगल्या’ कामासाठी करण्याची सद्भावना असलेल्यांचे प्रमाण आपल्या समाजात कमी नाही. पण त्यांच्यात ‘फील्ड’मध्ये जाऊन शोध घेणारे कमी. बहुतेक लौकिकावर विसंबतात. म्हणून लौकिक हवा; प्रत्येक कामाचा, सन्मानप्राप्तीचा गाजावाजा हवा.
वर म्हटल्याप्रमाणे परदेशी वा देशी फंडिंग मिळते, ते प्रकल्पासाठी. संस्थाचालकाचे आणि मग संस्थेचे खरे काम चालू ठेवायचे तरी पैशांसाठी प्रकल्प हाती घ्यावा लागतो. पाणी साठून जमिनीत मुरेल आणि भूगर्भातली पाण्याची पातळी उंचावेल, यासाठी वैराण माळावरच्या उंचवट्यांवर खळगे खणलेले मी पाहिले आहेत. प्रकल्प संपला आणि खड्यात पाणी घालणे बंद झाले. पाण्याची पातळी जशीच्या तशी. पण त्या पैशांनी संस्था चालू राहिली, इतर कामे होत राहिली. अर्थात, कामे-बिमे विसरून निव्वळ दुकानदारी करणारेही असतात. तेही प्रकल्प बनवून संस्था चालवतात. पण जिथे पैसा आहे, तिथे असे लुच्चे लफंगे येणारच. स्वयंसेवी संस्था हा दोन्ही बाजूंनी अपवाद नव्हे.
स्वयंसेवी संस्थांचा आणखी एक प्रकार आहे, प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासाला मदत करणाऱ्या संस्था. भारताच्या दुर्गम भागांत ज्या आदिवासी टोळ्या राहतात, त्यातल्या कित्येक आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शरीर, राहणी, चालीरीती, भाषा, अशा विविध अंगांनी त्यांचा अभ्यास मानववंशशास्त्रासाठी महत्त्वाचा आहे. या अभ्यासातून मानवाच्या उत्क्रांतीविषयी आडाखे बांधता येतात. आपल्या देशाचे एक चमत्कारिक वैशिष्ट्य म्हणजे इथला पराकोटीचा सामाजिक विरोधाभास. अत्यंत गरीब आणि अचाट श्रीमंत, उच्चभ्रू आणि अडाणी; संस्कृतिसंपन्न आणि आदिम; एका ठिकाणी, शेजारीशेजारी नांदतात. अतिमागास आदिवासींचा अभ्यास करणे इथे सोपे आहे कारण त्या आदिवासींशी संबंध ठेवून असणारे, इंग्रजी येणारे आधुनिक लोकही इथे आहेत!
आता, या आदिवासींचा अभ्यास जास्त महत्त्वाचा, की त्यांचा विकास ? अभ्यास हवा असेल, तर त्या आदिवासींना आहेत त्या स्थितीत राहू द्यायला हवे. त्यांचा विकास करू गेले, तर ते अभ्यासाच्या कामाचे न उरण्याचा धोका उभा रहातो. आदिवासींशी संपर्क प्रस्थपित करून, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना शहाणे न करता केवळ अभ्यासवस्तू मानणारी संस्था अनादराला पात्र होऊ शकते.
हा प्रश्न सोपा नाही, त्यात निदान विकासाच्या व्यक्तिनिष्ठ संकल्पनांचा खोडा आहे. याहीपेक्षा अवघड प्रश्न आहे तो विज्ञाननिष्ठ सामाजिक संशोधनाचा. नवीन औषध वा उपचारपद्धती तपासून बघण्याची शेवटची पायरी असते, ‘कंट्रोल’ आणि ‘इंटरव्हेन्शन’ गट बनवून शास्त्रशुद्ध पद्धतीने चिकित्सा करण्याची. यासाठी रुग्णालयातल्या रोग्यांचा वापर होतो, तसाच समाजगटांचाही होतो. सर्व बाबतींत अगदी एकमेकांसारखे असलेले दोन समाजगट निवडून एका गटात नवी उपचारपद्धती लागू केली जाते, तर दुसऱ्या गटाला तसेच ठेवले जाते. दोन्ही गटांचे काटेकोर निरीक्षण नोंदवून उपचाराची परिणामकारकता आकडेवारीच्या वस्तुनिष्ठ अशा भक्कम आधाराने सिद्ध केली जाते. ही उपचारपद्धती कधी कधी जीवरक्षकही असू शकते. म्हणजे, जेव्हा एकीकडे ती जीव वाचवत असते, तेव्हाच दुसऱ्या समाजगटाला तो उपचार नाकारून काही जीव गेलेले बघणे भाग असते. याला निर्दयता म्हणावे का? विशिष्ट जिवाचा विचार केला, तर होय. पण अशा शास्त्रशुद्ध रीतीने सिद्ध झालेले औषध जगभर अगणित लोकांचे प्राण वाचवणार असते. अभ्यासाविना औषध देण्याचा धोकादायक खेळ कुठलेच सरकार चालू देत नाही.
समाजकार्य करणाऱ्याकडे किमान करुणा असावीच. समोरच्या तडफडणाऱ्या जिवाला वाचवू शकणारे औषध आपल्यापाशी आहे, हे माहीत असूनही ते न देण्यात काहींना करुणेपासून फारकत घेतल्यासारखे भासेल. पण, अखिल मानवजातीच्या भल्याच्या संदर्भात एखाद्या जिवाची किंमत देण्याइतके मन कठोर करणाऱ्याने करुणेला रामराम ठोकला, असे म्हणू नये. आणि विज्ञान निर्मम असतेच.
असो. स्वयंसेवी संस्थांची प्रतिमा ज्यांच्यामुळे डागाळू शकते अशा काही गोष्टींची चर्चा मी इथे स्वानुभवाच्या आधाराने केली आहे. तसे करताना पक्षपात टाळण्याचा प्रयत्नही केला आहे.
मानस, ३९ गिरिजा हाऊसिंग, चखऋ कॉलेज रोड, कोथरूड, पुणे ४११०३८