स्वयंसेवी संस्थांचे कार्य: चिकित्सक दृष्टीची गरज

कोणत्याही गोष्टीच्या सर्वसाधारण आकलनासाठी तिच्याकडे इतिहासाच्या चौकटीतून पाहणे फायद्याचे ठरते. त्याप्रमाणे स्वयंसेवी संस्थांचा उदय, त्यांचे चरित्र, त्यांत आलेले बदल इत्यादि गोष्टींच्या सारासार आकलनासाठी त्यांच्याकडे ऐतिहासिक दृष्टिक्षेप टाकणे आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था संकल्पनेच्या पातळीवर खूप प्रचलित असू शकतात. पण त्यांचा वर्तमान स्वरूपातील उदय हा १९ व्या शतकात झालेला दिसतो. त्या काळात त्या गुलामगिरीविरुद्ध आणि स्त्रियांच्या मतदान-हक्कासाठी चाललेल्या चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. त्यांचे ‘बिगर सरकारी संघटना’ (Non-Governmental Organisation- NGO) हे नामकरण संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या स्थापनेनंतर म्हणजे १९४५ सालानंतर प्रचलित झालेले आहे.
या दोन शतकांतील स्वयंसेवी संस्थांच्या कामाकडे दृष्टिक्षेप टाकला तर त्यांना तीन प्रवर्गांमध्ये (Catagories) विभागता येते. पहिल्या प्रवर्गामध्ये युद्ध, नैसर्गिक दुर्घटना, अपघात इ. मुळे पीडितांना त्वरित मदत उपलब्ध करणाऱ्या संस्था येतात. या प्रवर्गातील स्वंयसेवी-संस्था दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपातील पुनर्बाधणीच्या काळापर्यंत जास्त प्रचलित होत्या. दुसऱ्या प्रवर्गातील स्वयंसेवी संस्था दूरगामी सामाजिक व आर्थिक विकासावर आपले लक्ष केंद्रित करताना दिसतात. या प्रवर्गातील स्वयंसेवी संस्था १९६० पासून युरोपात दिसायला लागल्या. तिसऱ्या जगातील देशांमध्ये तांत्रिक प्रशिक्षण, शाळा, दवाखाने, शौचालये, यांसारख्या सुविधांचे निर्माण, अशा कामांत गुंतलेल्या दिसतात. स्वावलंबन, स्थानिक उत्पादक संसाधनांचा विकास, ग्रामीण बाजारपेठेचा विकास, लोकांचा एकंदरीत विकासकार्यातील सहभाग यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर असे. त्या बचत गट, मायक्रो-क्रेडिट सोसायट्या इ. ना उत्तेजन देत. तिसऱ्या प्रवर्गातील स्वयंसेवी संस्था सामाजिक कृतीवर भर देताना दिसतात. लोकांची क्षमतावृद्धी करण्याची, त्यांचे अंगभूत अंतःसामर्थ्य प्रकट करण्याची, त्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ करण्याची, भांडवलशाहीपूर्व सामाजिक प्रणालींचा प्रभाव घालविण्याची भाषा त्या बोलत असतात. लोकांना शांततापूर्ण मार्गाने संघटित करून त्या साम्राज्यवादी संस्था आणि स्थानिक सरकारांवर त्यांची धोरणे बदलण्यासाठी दबाव आणताना दिसतात.
पहिल्या प्रवर्गात प्रामुख्याने चर्चसारख्या ख्रिश्चन धार्मिक संस्था प्रत्यक्ष वासाहतिक काळाला चरित्रांकित (characterize) करताना दिसतात. दुसऱ्या प्रवर्गातील स्वयंसेवी संस्थांचे शीतयुद्धाच्या काळात वर्चस्व होते आणि तिसऱ्या प्रवर्गातील स्वयंसेवी संस्था वर्तमान उदारवादी जागतिकीकरणाच्या काळात कार्यरत आहेत. सर्वसाधारणपणे या वर्गीकरणात काही प्रमाणात सरमिसळ (overlap) दिसत असली तरी या संस्थांच्या प्रमुख उपक्रमांशी हे वर्गीकरण मेळ राखते. ढोबळ मानाने पहिल्या प्रवर्गातील संस्थांना आपण धर्मादायी (charity) संस्था, दुसऱ्या प्रवर्गातील संस्थांना विकास-संस्था आणि तिसऱ्या प्रवर्गातील स्वयंसेवी संस्थांना सहभागी जागतिकी-करणवादी-संस्था म्हणू शकू.
स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख कार्य या काळात निरनिराळे असण्यामागचे खरे कारण त्यांच्या दात्यांच्या गरजांमधील परिवर्तन आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. वासाहतिक काळात, स्वयंसेवी संस्थांचे मुख्य उद्दिष्ट हे वासाहतिक सत्तेच्या संस्कृतींचा आणि तिच्या मूल्यांचा वासाहतिक देशांमध्ये प्रसार करणे आणि वासाहतिक देशांत हेरगिरी करून आवश्यक माहिती गोळा करणे हे होते. म्हणून त्यांना वासाहतिक सरकारचा भरपूर पाठिंबा होता. चर्चसारख्या मिशनरी संस्था हा त्या काळात स्वयंसेवी संस्थांचा प्रचलित फॉर्म होता. त्या वसाहतीतील राज्यकर्त्यांना संपूर्णपणे मदत करत होत्या.
प्रत्यक्ष वासाहतिक शासनकाळानंतर, म्हणजे न-वासाहतिक पर्वामध्ये जगभर स्वयंसेवी संस्था प्रचंड प्रमाणावर जन्माला आल्या. या काळात अमेरिकन स्वयंसेवी संस्थांची युरोपातील स्वयंसेवी संस्थांवर सरशी झाली. अमेरिकेजवळ वसाहती नसल्यामुळे आणि वसाहती देशांमध्ये वासाहतिक शासनाबाबत सर्वसाधारणतः तिरस्काराची भावना असल्यामुळे अमेरिकन स्वयंसेवी संस्थांना या देशांमध्ये सहजपणे आपले पाय रोवता आले. द्वितीय महायुद्धानंतर इतर साम्राज्यशाही सत्ता दुर्बळ झाल्या होत्या आणि अमेरिका सर्वांत बलाढ्य देश म्हणून वर आला होता. त्याचा फायदासुद्धा अमेरिकन स्वयंसेवी संस्थांना मिळाला व त्यांना आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये सहजपणे आपला फैलाव करता आला.
अमेरिकेतील स्वयंसेवी संस्थांच्या या प्रसारामागे मुख्य उद्देश हा या देशांमध्ये वाढत चाललेल्या ‘साम्यवादाच्या धोक्या’ला थोपवून धरणे होता. अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी या धोक्याला थोपवून धरण्यासाठी वैचारिक, राजकीय व लष्करी नेतृत्व स्वतःकडे घेतले होते. १९२१ मध्ये सोवियत युनियनमध्ये दुष्काळ पडला असताना अमेरिकेने तेथे आपल्या स्वयंसेवी संस्थांमार्फत जवळपास ५० कोटी डॉलर्स किंमतीच्या अन्न, वस्त्र, औषधे आणि इतर वस्तू वाटल्या होत्या. क्रांत्युत्तर रशियात अशा मदत-कार्यात अमेरिकन रिलीफ अॅडमिनिस्ट्रेशन ही स्वयंसेवी संस्था सर्वांत पुढे होती. रशियातील प्रतिक्रांतिकारकांना मदत करून बोल्शेविक क्रांतीचा पराभव करण्याचे सर्व प्रयत्न फसल्यावर अमेरिकेने या स्वयंसेवी संस्थांमार्फत आपले कारस्थान चालविले. पहिल्या महायुद्धानंतर ऑस्ट्रिया, हंगेरीत क्रांतीची लाट थोपवून धरण्यासाठी व त्यांना बोल्शेविकांपासून वेगळे करण्यासाठी अमेरिकेने या स्वयंसेवी संस्थांमार्फत अन्नधान्याचे वाटप केले होते. सोविएत युनियन व पूर्व युरोपात अमेरिकन साम्राज्यवाद्यांच्या मदती-मागचा मुख्य हेतू तेथील भांडवलीतत्त्वांना बळकटी आणण्याचा, त्यांच्या अर्थव्यवस्थांना उदारमतवादी आर्थिक धोरणांकडे ढकलण्याचा आणि अमेरिकन साम्राज्यवादाविषयी जनतेत अनुकूल भावना निर्माण करण्याचा होता. शिवाय, अमेरिकेला तिचे अतिरिक्त अन्नधान्य या देशांमध्ये पाठविल्याने त्यांच्या अमेरिकांतर्गत किंमतींना स्थैर्य देण्यास मदत होत होती ते वेगळे. तिसऱ्या जगात ‘कामाबदल्यात अन्न’ किंवा शाळांमध्ये दुपारचे जेवण यांसारख्या योजनांचा आपल्या स्वयंसेवी संस्थांमार्फत पुरस्कार करण्यामागे अमेरिकेचा आपल्या अतिरिक्त अन्नधान्याची सोय लावण्याचा मुख्य उद्देश होता.
जागतिकीकरणाच्या काळात स्वयंसेवी संस्थांनी या नवउदारमतवादी धोरणांच्या अनिष्ट परिणामांना शिथिल करण्याचे काम स्वीकारले आहे. या संस्था जागतिकी-करणाविरुद्ध कुरबूर करत असल्या तरी त्या त्याच्याविरुद्ध नसतात. जागतिकीकरणाच्या कार्यान्वयनात लोकांचा सहभाग असावा, जागतिकीकरणाला ‘मानवी चेहरा’ असावा, त्यात शाश्वत विकासाची तत्त्वे समाविष्ट असावीत, असा त्यांचा सूर असतो. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना, आशियाई विकास बँक यांसारख्या साम्राज्यवादी संस्थांमध्ये सुधार करणे शक्य आहे असा आभास त्या लोकांमध्ये निर्माण करत असतात. या संस्था जनतेच्या मनातील साम्राज्यवादाविरोधी उफाळणारा रोष शमवून तिला सुधारणावादी विचारसरणीकडे वळविण्याचा प्रयत्न करत असतात. जनतेच्या मनातील असंतोषाला संवैधानिक, शांततापूर्ण आणि धोकारहित मार्गाकडे वळवून त्या ‘सेफ्टी व्हाल्व’ची भूमिका बजावत असतात. शोषित जनतेला विविध प्रवर्गांत व ओळखींमध्ये विभागून त्या तिची वर्गीय एकता होऊ देत नाहीत. त्याउलट समाजातील वर्गीय विभाजनाला अवमानून शोषित आणि शोषकांच्या जात, वंश, लिंग, धर्म, भाषा राष्ट्रीयता इ. ओळखींच्या आधारे एकत्रीकरणाचे प्रयत्न या संस्था करत असतात.
याप्रमाणे वर्तमान स्वरूपातील स्वयंसेवी संस्थांचे सर्वसाधारण चरित्र हे साम्राज्यवादाचे हितसंबंध जपणारेच आहे. अस्तित्वात असणाऱ्या शोषणप्रणालीच्या चाणाक्ष संरक्षकाचे आहे. त्यांचे काम कितीही स्तुत्य वाटत असले, त्या जनतेची बाजू घेऊन कितीही पोटतिडिकीने बोलत असल्या, लोकांना सक्षम करण्याची भाषा बोलत असल्या, त्यांच्या शोषणप्रक्रियांचा पर्दाफाश करताना दिसत असल्या आणि प्रसंगी त्यासाठी त्याग करतानासुद्धा दिसत असल्या तरी अंतिम कसोटीवर ज्या लोकांमध्ये त्या काम करतात, त्यांच्यापेक्षा त्या त्यांच्या दात्यांनाच जबाबदेही असतात, हे निर्विवाद आहे. जेवढ्या अप्रत्यक्ष प्रमाणात त्यांना साम्राज्यवादी संस्था वित्त पुरवीत असतात, तेवढ्याच प्रमाणात त्यांचे काम स्वायत्त वाटत असते. स्वयंसेवी संस्थांमध्ये बऱ्याच व्यक्ती खरोखर निष्ठावान असतात आणि खऱ्या सेवाभावाने त्यांत काम करतात. त्यांच्यामुळेसुद्धा या संस्थांबाबत संभ्रम निर्माण होतो. पण संस्थांचे चरित्र त्यातील व्यक्तींवरून ठरत नसते. संस्थेचे चरित्र त्यातील व्यक्तींच्या चरित्रांच्या गोळाबेरजेपेक्षा निराळे असते. स्वयंसेवी संस्थांच्या नुसत्या कामाकडे पाहता आपण प्रभावित होण्याचीच शक्यता असते. कारण त्या समाजाीतल समस्येच्या एखाद्या अंगावरच आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करून त्याचा खोलवर ध्यास घेण्याचा प्रयत्न करतात, जे इतरत्र सहसा कुठेही आढळत नाही. प्रश्नाची व्याप्ती आणि संघटनेचा आकार त्यांना सृजनशील बनायला मदत करतो. खरोखर या प्रक्रियेतून स्वयंसेवी संस्थांनी प्रचलित प्रश्नांना कित्येकदा नावीन्यपूर्ण दृष्टिकोण दिले, सृजनशील उत्तरे दिली. प्रत्येक प्रश्नाला प्रकल्पाच्या स्वरूपात हाताळण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्या कार्यक्षम वाटतात. या गोष्टी स्वयंसेवी संस्थांची बलस्थाने वाटत असल्या तरी त्यांचे सुकाणू हे अंतिमतः साम्राज्यवादी संस्थांच्या हातात असते, हे कदापि विसरून चालणार नाही.
१. कोणत्याही देशात समाजजीवनाच्या साऱ्याच गरजा राजकीय पक्ष-संघटनांच्या माध्यमातून पुरविल्या जाऊ शकत नाहीत. साधारणतः समाज हा तीन क्षेत्रांनी (शिलीी) बनलेला दिसतो; सरकार, खाजगी क्षेत्र व आर्थिक बाबी वगळता नागरी समाज. यांपैकी नागरी समाज ही व्यक्ती, समूह आणि जन-चळवळींच्या सर्व सामाजिक उपक्रमांना सामावून घेणारी विस्तृत संकल्पना आहे. या संकल्पना अगदीच वादातीत जरी नसल्या तरी कमी जास्त प्रमाणात कोणत्याही समाजाला या प्रकारची तीन अंगे असतात, असे मानण्यास हरकत नाही. स्वयंसेवी काम या नागरी समाजाच्या कक्षेत येणारे आहे. राजकीय पक्ष व संघटना त्यांच्या कक्षेत येणारी कामे खचितच करू शकतात. पण सामान्यतः त्यांच्या उतरंडीच्या संरचनेमुळे त्यांच्यावर व्याप्ती, कार्यक्षमता आणि धोरणात्मकता या बाबतीत मर्यादा पडतात. शिवाय त्यांचा कल सामान्यतः ‘वरून खाली’ या स्वरूपाचा असतो. अर्थात, ही संरचना आणि त्यातून उद्भवणाऱ्या मर्यादा या काही राजकीय पक्ष आणि संघटना आवश्यकपणे चरित्रांकित करतातच असे नाही. पण तरीही सर्वसाधारणतः त्यांच्याबाबतीत असे जे म्हटले जाते, ते सर्वसाधारण अनुभवांवरून खरे वाटते. भूकंप, सुनामी, महापूर, दुष्काळ, महामारी यांसारख्या नैसर्गिक अरिष्टाच्या वेळी म्हणून आपल्याला अनेक स्थानिक धार्मिक-राजकीय-स्वयंसेवी संघटना विनाविलंब कार्यरत झालेल्या दिसतात. त्यानंतर राजकीय पक्ष-संघटनाचे नाम-फलक दिसायला लागतात.
स्वयंसेवी कामाची प्रस्तुतता सर्वच काळात होती. प्रश्न आहे, स्वयंसेवी संस्थांचे आजचे जे संस्थात्मक स्वरूप आहे, त्याची प्रस्तुतता आहे काय आणि त्याचे उत्तर कदाचित आज जनप्रतिरोधाचे झालेले एनजीओकरण पाहता ‘नाही’ असेच असू शकते. सामाजिक चळवळीच्या स्वरूपातील स्वयंसेवी संघटना समाजात अजूनही उल्लेखनीय प्रमाणावर कार्यरत आहेत. भांडवली मूल्यांच्या समाजातील फैलावामुळे त्यांच्यावर संसाधनांच्या तीव्र मर्यादा पडतात. पण तरीही लोकांवर भिस्त ठेवून, आपल्या अल्पशा संसाधनांबरोबर त्या काम करत असतात. त्या प्रस्थापित स्वयंसेवी संस्थांप्रमाणे शिस्तबद्ध, कार्यक्षम वाटत नसल्या तरी त्यांचे काम जनतेच्या जाणिवांना परिवर्तनाच्या दिशेने प्रगल्भ करणारे ठरते आणि दूरगामीपणे ते जास्त मोलाचे ठरते.
२. संकल्पनेच्या पातळीवर स्वयंसेवी कामाचा इतिहास कदाचित मानव-समाजाशी एकरूप होतो. माणूस हा जात्याच दुर्बल प्राणी; समूहाविना त्याचे अस्तित्वच शक्य नाही. माणसाचे व्यक्तिगत आणि सामाजिक अस्तित्व यात असा घनिष्ठ संबंध आहे. या संबंधांतूनच माणसात इतरांच्या कामी पडण्याची अंगभूत प्रवृत्ती निर्माण झाली, जिचे प्रकटीकरण म्हणजे स्वयंसेवी श्रम. इतरांना आपण निष्कामपणे मदत करावी, आपल्यामुळे समाजाचे हित व्हावे, भावी पिढीचे जीवन सुखकर व्हावे यासाठी माणूस झटत आला. ही सर्व कामे स्वयंसेवी होती. त्याची प्रतिमाने आत्मप्रेरणा, सेवाभाव व त्याग असलेली दिसतात. अशा परोपकारी माणसाविषयी समाजातसुद्धा दायित्वाची भावना असे. म्हणून अशा स्वयंसेवी कामासाठी माणसे मोठ्या प्रमाणावर उद्युक्त होताना इतिहासात दिसतात.
भांडवलशाहीच्या आगमनानंतर समाजातील मूलभूत मान्यता बदलल्या. प्रत्येक व्यवहार हा पैशाच्या माध्यमातून होऊ लागला. अर्थातच पूर्वीची प्रतिमाने कालबाह्य झाल्यासारखी दिसतात. ती अजिबात लुप्त झाली असे मात्र नाही. अजूनही कित्येक जनवादी चळवळीतून अक्षरशः हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी पूर्वीच्याच त्यागभावननेने प्रेरित होऊन समर्पित जीवन जगत आहेत. या चळवळींना कोणी स्वयंसेवी म्हणत नाहीत, हे त्यातल्या त्यात चांगले. ज्यांना अर्थात ‘स्वयंसेवी’ हे बिरुद लावले जाते, त्यांचा एक वेगळा प्रवर्ग आहे, ज्यात या प्रतिमानांचा अभाव दिसतो. यात ‘स्वयंसेवी’चा अर्थ फक्त एखाद्यावर पूर्ण वेळ काम करण्याचे बंधन नसणे इथपर्यंत सीमित असेल ; पण त्यात त्यागभावना, अंतःप्रेरणा, सेवाभाव या गोष्टी आढळत नाहीत. स्वयंसेवी संस्थांमधून काम करणे हा आज एक व्यवसाय झालेला आहे, ज्याचे औपचारिक शिक्षण उपलब्ध आहे आणि ज्यात इतक्या उच्चस्तरावरील जीवनमानाची हमी असते की बऱ्याच तरुणतरुणींना अशा ‘स्वयंसेवी’ संघटनांत श्रम करण्याची लालसा असते.
ही जुनी प्रतिमाने टिकविण्याची गरज आहे, असे जरी वाटत असले तरी बदलत्या काळात त्याची शक्यता दिसत नाही. ज्यांना सामान्यतः स्वयंसेवी संस्था म्हटले जाते, त्यांची संरचनाच अशी आहे की, त्यात ही प्रतिमाने पुनःस्थापित करणे आणि त्यांना टिकविणे अशक्य वाटते. खरे तर त्याची आवश्यकताही नाही. पण इतर जनवादी चळवळींमध्ये वर उल्लेखिल्याप्रमाणे ही प्रतिमाने अगदी प्रखरतेने आजही पाहायला मिळतात. काळ कितीही बदलला असला, तरी अश्या चळवळी, ज्यांचा संबंध माणसाच्या मूलभूत प्रेरणांशी आहे, मूल्यांशी आहे; कधीही संपणार नाहीत आणि जोवर त्या होत राहतील, तोवर ही प्रतिमानेसुद्धा प्रकट होत राहतील. त्यासाठी कोणत्याही बाह्य प्रयत्नांची आवश्यकता असणार नाही.
३. स्वयंसेवी संस्थाच्या साऱ्याच विकृती त्यांच्या विरोधी (adversary) वर्गाच्या वित्तावर विसंबण्यातून उद्भवतात आणि त्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या संस्थांच्या उदयापासूनच कमी जास्त प्रमाणात अस्तित्वात आहेत. आजच्या संदर्भात ह्या विकृतींना याप्रमाणे मांडता येईलः * स्वयंसेवी संस्था व त्यांचे कार्यक्रम हे स्थानिक लोकांचा कैवार सांगत असले तरी ते स्थानिक लोकांना नसून विदेशी वित्तदात्यांना जबाबदेही असतात. * या स्वयंसेवी संस्था राज्याची जनतेप्रति जबाबदारी डावलून सामाजिक समस्येची जबाबदारी खाजगी व्यक्तीवर टाकतात आणि या समस्यांच्या सोडवणुकीसाठी खाजगी संसाधनांचे महत्त्व ठसवत असतात. * ते जनतेच्या चळवळीपेक्षा त्यांच्या प्रकल्पाला जास्त महत्त्व देतात. * मूलभूत उत्पादनांच्या साधन-संपत्तीच्या नियंत्रणासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षासाठी जनतेला प्रोत्साहन न देता ते तिला सीमांत उत्पादनासाठी संघटित व प्रोत्साहित करत असतात. * लोकांच्या दैनंदिन जीवनाला आकार देणाऱ्या संरचनात्मक परिस्थितीकडे लक्ष न देता ते प्रकल्पांना तांत्रिक व वित्तीय सहाय्य मिळविण्याकरिता सारे काही करत असतात. * ‘जनशक्ती’, ‘सक्षमीकरण’,’लैंगिक क्षमता’, ‘शाश्वत विकास’, ‘तळागाळातून उद्भवणारे नेतृत्व’, यांसारख्या वाक्यप्रसारातून डाव्यांची भाषा को-ऑप्ट करून क्रांतिकारी कार्यक्रमास धूसर करतात. * गरीब समुदायांना त्रस्त करणारे विस्तृत सामाजिक चित्र लक्षात घेऊन या शोषण-प्रणालीविरुद्ध त्यांना एकवटून संघर्षासाठी उद्युक्त करण्याऐवजी त्या गरीब समुदायांना अनेक गट आणि उपगट ह्यांत विभाजित करत असतात. * गरीब जनतेचे स्वयंसेवी संस्था अराजकीयीकरण (de-politicization) करून त्यांना विघटित करतात. त्याची परिणती निवडणुकीच्या प्रक्रियांना अवास्तव बळकटी देण्यात होत असते. * जी सामाजिक प्रणाली बहुजनांच्या शोषणाला जागा देते, तिच्या वरवरच्या बदलापलिकडे न जाता ते ‘उपेक्षित’, ‘अतीव गरिबी’, लैंगिक व वांशिक भेदभाव’ इत्यादीबाबत अथक पोपटपंची करत असतात. * लोकांच्या एकजुटीला नव-उदारमतवादी अर्थव्यवस्थेशी सहयोग (collaboration) व दुय्यमत्व (subordination) यामध्ये रूपांतरित करणे या संस्थांचे सुप्त उद्दिष्ट दिसते.
स्वयंसेवी संस्थांच्या प्रचलित संरचनेचा विचार करता त्यातून या विकृती घालविण्याची शक्यता फार कमी आहे. या स्वयंसेवी संस्थांचे अस्तित्वच अशा वित्तावर अवलंबून असल्यामुळे त्यात कोणताही बदल करता येईल असे वाटत नाही.
४. एकंदरीत शोषणाची व्याप्ती लक्षात घेता, सद्यःपरिस्थितीची डागडुजी केल्याने जगातून आपण शोषण घालवू शकू किंवा कमी करू शकू अशी आशा बाळगणे एकतर भोळसटपणा आहे किंवा शुद्ध फसवणुकीचा प्रकार आहे. लोकांना सद्यःस्थितीत आमूलाग्र क्रांतिकारी बदलच हवा असतो. त्यासाठी त्यांना क्रांतिकारी संघर्षच करायचा असतो. त्याला पर्याय नाही. स्वयंसेवी संस्था आपल्या कामातून त्यांच्या या वर्ग-संघर्षाच्या जाणिवा प्रगल्भ करू शकतील. हे वर सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या प्रकारच्या संघटना करत आहेत, पण हे स्वयंसेवी संस्थांना शक्य होईल असे दिसत नाही. आज प्रवाह हा या क्रांतिप्रवण संघटनांपासून स्वयंसेवी संस्थांकडे दिसतो, उलट नव्हे. म्हणून त्यांच्यासाठी नवीन प्रतिमाने संकल्पिण्याची आवश्यकता दिसत नाही.
५. वेगाने वाढणारी सर्वांगीण विषमता, जगात वाढणारे दृश्य आणि अदृश्य वर्गीकरण, कंगाली, वंचितता, गरीबी, शिक्षणाचा खेळखंडोबा, जात-समुदाय-धर्म व इतर अस्मितांच्या आधारे सत्ताधारी वर्ग खेळत असणाऱ्या चाली हे प्रश्न इतके भयाण आहेत की त्यांची सोडवणूक संस्थाबद्धरीत्या, जनतेच्या उत्स्फूर्त सहभागाशिवाय होऊ शकेल असे वाटत नाही. त्यासाठी जनतेची क्रांतिकारी चळवळच एकमेव उत्तर ठरते. सारेच संस्थाबद्ध उपाय अशा चळवळीच्या उद्भवात आणि बांधणीत अडसर ठरतात, असा आजवरचा अनुभव आहे. ४-डी, जीवनज्योत, सेटलवाड लेन, नेपियन सी रोड, मुंबई ३६.
वळवळीच्या उद्भवात असिस्थाबद्धरीत्या, जनतेच्या रबी, शिक्षणाचा खेळ