धर्मांतराविषयी

[धर्मांतर आणि त्याला विरोध करण्यातून उद्भवलेली हिंसा आज अनेक प्रांतांना, देशांना छळते आहे. ५ ऑक्टो. २००८ या लोकसत्ता त सुधींद्र कुळकर्णी (अनुवादः स्वा. वि. ओक) यांचा धर्मांतरावर चर्चा का नाही? हा लेख होता. त्याचा महत्त्वाचा अंश असा]
देशात विविध ठिकाणी चर्चेसवर तसेच ख्रिश्चन समुदायावर होत असलेल्या हिंसक हल्ल्यांचे समर्थन कुणीही विचारी भारतीय नागरिक करणार नाही. कायदा पाळणाऱ्या कोणत्याही समाजात हिंसाचार आणि लुटालुटीच्या प्रवृत्तीला, विशेषतः धार्मिक विद्वेषातून जन्माला आलेल्या हिंसाचाराला स्थान असू शकत नाही.
मात्र या हिंसक घटनांना प्रसारमाध्यमांनी (देशातील आणि आंतरराष्ट्रीयही) जी प्रसिद्धी दिली, सेक्युलर बुद्धिमंत आणि राजकीय पंडितांनी त्यावर जे एकांगी भाष्य केले आहे ते चिंता करायला लावणारे आणि अस्वस्थ करणारे आहे. या घटनांमागे जे मूळ कारण आहे, परकीय मदतीच्या जोरावर इव्हँजेलिकल ख्रिश्चनांनी सातत्याने चालविलेली धर्मांतराची मोहीम, तिच्याकडे या सगळ्यांनी सामूहिक दुर्लक्ष करीत तिला कमीतकमी प्रसिद्धी दिली आहे. ज्या हिंदूंना काही विशिष्ट ख्रिश्चन संघटनांच्या धर्मांतराच्या प्रयत्नांबद्दल चिंता वाटते ते एकतर आपली चिंता प्रभावीपणे मांडू शकत नाहीत अथवा प्रसारमाध्यमे त्यांची योग्य ती दखल घेऊन त्यांना पुरेशी प्रसिद्धी देत नाहीत. आज स्युडो सेक्युलॅरिझमच्या या जमान्यात हिंदू संघटनांचा दृष्टिकोण ही जणू जातीयच भूमिका असावी, अशी वागणूक आजचा ‘मेन स्ट्रीम मिडिया’ देत असतो. मला असे वाटते की आपण ख्रिश्चनांच्या विरोधातील मोहीम आणि धर्मांतराच्या विरोधातील मोहीम यांच्यात स्पष्टपणे फरक केला पाहिजे. ख्रिश्चनविरोधाचा ठाम विरोध करून धर्मांतरविरोधाबाबात मुक्त चर्चा होण्याची, त्याबाबत मतमतांतरे प्रकट होण्याची गरज आहे. याचे कारण हा मुद्दा भारताच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारताची सेक्युलर राज्यघटना धार्मिक स्वातंत्र्याची ग्वाही देते. देवापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग असल्याचे ही मूल्ये पुरातन काळापासून मान्य करीत आली आहेत. आपल्या घटनाकारांनी हे धार्मिक स्वातंत्र्याचे मूल्य पश्चिमेतून आयात केलेले नाही. आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील ज्या प्रदेशांवर विजय मिळवून पाश्चात्त्य देशांनी तेथे वसाहती केल्या, तेथील लोकांच्या धर्मभावनांची त्यांनी कदर केली नाही. या तीन खंडांमध्ये पाश्चात्त्य राजवटी स्थापन होताना चर्चने कोणती भूमिका वठवली, हा क्रूर आणि काळाकुट्ट इतिहास आहे.
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य व त्या धर्माची शिकवण इतरांना देता येण्याचेही स्वातंत्र्य. एखाद्याला स्वतःहून आपला धर्म बदलायचा असेल तर त्यालाही आपली घटना मान्यता देते. परंतु धर्मपरिवर्तन करण्याच्या या अधिकाराच्या आडून अनेक दशकांनंतर काय काय होऊ शकेल, याची कल्पना बहुधा आपले घटनाकार करू शकले नसावेत. परंतु अडचणीच्या वाटणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे धाडस आपण का दाखवत नाही ? उदाहरणादाखल सांगायचे झाले तर मला माझा धर्म बदलण्याचा अधिकार आहे याचा अर्थ मला इतरांचाही धर्म बदलण्याचा अधिकार आहे ? अगदी मोठ्या संख्येने ? योजनाबद्ध पद्धतीने? भारतातील काही भागातील, काही जिल्ह्यातील, काही प्रांतांतील लोकसंख्येचा समतोल बिघडविण्याचे ज्यांचे थेट अथवा अप्रत्यक्ष उद्दिष्ट आहे अशा परकीय शक्ती आणि स्रोतांनी पाठविलेल्या पैशांच्या मदतीने इतरांचा धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य मला आहे ? या पैशाचा विनियोग दारिद्रयनिर्मूलनासारखे प्रकल्प सुरू करून त्यायोगे ‘सेवा’ भाव दाखवून आणि त्याचे लाभार्थी असणाऱ्या गरजूंचा धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य मला आहे ? अशा प्रश्नांची चर्चा होण्याची आवश्यकता आहे.
अलीकडच्या काही घटनांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थ कोणालाही इतरांच्या पूजा-पद्धती, त्यांच्या देव-देवतांची हेटाळणी अथवा निर्भर्त्सना करण्याचा अधिकार आहे ?
एक गोष्ट मान्य की अशा प्रकारे समाजसेवेच्या बुरख्याखाली धर्मांतराची मोहीम सगळ्याच किंवा खूप ख्रिश्चन संस्था राबवीत नाहीत. पण त्यांच्या प्रचार-साहित्यामध्ये सातत्याने हिंदूंची जाति-पद्धत, दलितांची दयनीय स्थिती आदींबाबत अनुदार उल्लेख असतात. यातून ध्वनित होणारा संदेश स्पष्ट असतो तुम्हाला न्याय, समता आणि प्रतिष्ठा हवी असेल तर हिंदू धर्म सोडावा लागेल.
धर्मांतराच्या आणखी एका पैलूमुळे हिंदू संतप्त आहेत. देशातील धर्मांतराबाबतची सविस्तर आणि तुलनात्मक माहिती जर सरकारने जाहीर केली तर त्यातून अनेक धक्कादायक बाबी उजेडात येतील. एका बाजूला हिंदू धर्मातून ख्रिश्चन होणाऱ्यांची संख्या लक्षावधींमध्ये आहे. त्यातही मुख्य भरणा हिंदू ‘एससी-एसटी’चा असतो. दुसरीकडे भारतातील एकही मुस्लिम माणूस पुढे येऊन सांगणार नाही की मी घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा वापर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे. माझा प्रश्न आहे ख्रिश्चन मिशनरी मुस्लिमांना गोस्पेलचे धडे का देत नाहीत ? चर्च गरीब मुस्लिमांच्या वस्त्यांमध्ये ‘सेवा’कार्य का करीत नाहीत? मुस्लिमांना शिक्षणाची, आरोग्य सेवेची गरज नाही ? की असे केल्यास त्याचे जोरदार प्रत्युत्तर येईल अशी भीती वाटते? इस्लाम आपल्या अनुयायांना धर्म सोडून जाण्याची परवानगी देत नाही. आणि जो कोणी हा आदेश धुडकावतो त्याचा सामना थेट मृत्यूशीच असतो! याचा सरळ अर्थ असा आहे की ख्रिश्चन मिशनरी हिंदूंच्या सहनशीलतेचा आणि ‘एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति ।’ या वृत्तीचा गैरफायदा उठवतात. आता यावर सुभाष आठल्यांचे मत
श्री सुधींद्र कुळकर्णी धर्म-प्रसाराचा, म्हणजेच धर्मांतर करण्याचा व करवण्याचा हक्क मान्य करतात. त्यांचे आक्षेप आहेतः १) मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवण्याचा हक्क असावा का? प्रतिप्रश्न का नसावा ? धर्मांतर हे त्या व्यक्तीच्या कल्याणासाठी आहे असा माझा प्रामाणिक विश्वास असला, तर एका व्यक्तीचे धर्मांतर जितके समर्थनीय आहे तितकेच मोठ्या संख्येने केलेले धर्मांतरदेखील समर्थनीय आहे. धर्म बदलणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने पाहिले तर तुरळक, व्यक्तिगत धर्मांतर हे फारच अवघड व भविष्यात मोठे प्रश्न निर्माण करणारे असते. जन्मापासून आई, वडील, इतर नातेवाईक यांच्याशी भावनिक संबंध असतात, इतरांशी मैत्रीचे हळुवार बंध असतात, जातिबांधवांशी आपुलकीचे, सामाजिक सामावलेपणाचे व आधाराचे संबंध असतात. जन्म, मृत्यु, लग्न, सण, उत्सव असे सर्व आनंदाचे, दुःखाचे प्रसंग त्यांच्या सहभागानेच साजरे केले/निभावले जातात. व्यक्तिगत धर्मांतराने हे सर्व नातेवाईक, मित्र, जातिबांधव दुरावले जाण्याची, एकाकी पडण्याची सार्थ भीती असते. मुलांच्या लग्नाविषयी समस्या निर्माण होते. त्यामुळे इच्छा असूनही अनेक जण धर्मांतर करत नाहीत. मन मारून मूळ धर्मातच वावरतात. याउलट जर मोठ्या समुदायाने किंवा अख्ख्या जातीने धर्मांतर केले, तर हे सर्व भेडसावणारे प्रश्न उद्भवत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर, समुदायाने, धर्मांतर करणे-करवणे हेच अधिक शक्य पातळीवर असते, श्रेयस्कर असते.
अशा मोठ्या संख्येने होणाऱ्या धर्मांतराबद्दल मूळ धर्मातील लोकांना वाईट वाटणार, त्यामुळे त्यांना अल्पसंख्य होण्याची भीती वाटणार, असुरक्षित वाटणार, हे आपण समजू शकतो, पण ती स्वार्थी भावना आहे, स्वतःबद्दलच्या प्रेमातून निर्माण झालेली भावना आहे, धर्मांतरित बांधवांबद्दलच्या प्रेमातून निर्माण झालेली ही भावना नाही. या स्वार्थी, असुरक्षिततेच्या भावनेपोटीच अधर्मांतरित व्यक्ती धर्मांतरितांच्या देशभक्तीबद्दल संशय व्यक्त करतात, त्यांच्यावर प्रेम करण्याऐवजी त्यांचा द्वेष करू लागतात, त्याचे अहित चिंतू लागतात. मग भीती, जाळपोळ, खून, बलात्कार ही साधने वापरून फेर-धर्मांतराचे प्रयत्न करणे व या प्रयत्नांना दाद न देणाऱ्यांचे खून करणे हे समर्थनीय वाटू लागते.
२) धर्मांतर करण्यासाठी संस्थात्मक प्रयत्न व्हावेत का? एका किंवा अनेक व्यक्तींनी ते आपल्या आयुष्याचे ध्येय (मिशन, Mission) बनवावे का? त्यासाठी परदेशांचा पैसा वापरावा का? उत्तर धर्मांतराने त्या व्यक्तीचे ऐहिक आणि/अथवा पारलौकिक कल्याण होणार आहे अशी जर धर्मांतर करवणाऱ्याची खात्री/श्रद्धा असेल, तर या गोष्टीमध्ये काहीच गैर नाही.
३) देशाच्या, प्रांताच्या किंवा त्याहून लहान विभागाच्या लोकसंख्येतील विविध धार्मिक गटांच्या प्रमाणात बदल घडवण्याच्या हेतूने केलेले मोठ्या प्रमाणावरील धर्मांतरदेखील धर्मांतराच्या स्वातंत्र्यात मोडते काय ? उत्तरः या प्रश्नात धर्मांतरामागे अन्य काही दडवलेला हेतू आहे असा गर्भित आरोप आहे. हा आरोप सिद्ध, शाबीत करावा लागेल. वर्तमानकाळात वसाहती स्थापन करण्यात, दुसऱ्या देशांवर राज्य करण्यात, कोणत्याच देशाला स्वारस्य राहिलेले नाही. त्यामुळे, अन्य देशाच्या लोकसंख्येत धार्मिक बदल घडवण्यात राजकीय हेतू असेल असे वाटत नाही. सध्या सर्व देशांना व्यापारात रस असतो. शिवाय असा आरोप करण्यात धर्मांतरित व्यक्ती देशद्रोही असतात असा गर्भित आरोप आहे, जो नक्की चुकीचा आहे. असा मूलभूत अविश्वासच धर्मांतराला उत्तेजन देणारा आहे. धर्मप्रेमाला देशभक्तीचे स्वरूप देणे चुकीचे आहे.
४) धर्मांतर-स्वातंत्र्यामध्ये हिंदूधर्मातील उणिवा दाखवून देण्याचे देखील स्वातंत्र्य समाविष्ट आहे काय ? उत्तरः होय. कोणाही धर्मप्रचारकाला इतर धर्मातील दोष दाखवावेच लागतात. हिंदुधर्मातील देवदेवतांच्या कथांमध्ये खरेच खूप अनैतिक गोष्टी भरलेल्या आहेत ज्यांची निर्भर्त्सना त्या कथांमध्ये केलेली नसते. निर्भेळ नैतिक संदेश या कथांमधून मिळत नाही. कित्येक प्रथा, परंपरा, कर्मकांडे एकतर निरर्थक तरी आहेत, नाहीतर स्वतःच्याच घटकांवर (जातींवर, विधवांवर वगैरे) अन्याय करणाऱ्या (सॅडिस्टिक) आहेत. हिंदू-धर्म-सुधारकांनीच त्यांच्यावर कठोर प्रहार केले आहेत. मग इतर धर्मप्रसारकांनी हे दोष दाखवले, तर त्याबद्दल एवढे हळवे होण्याचे काय कारण आहे? इतर धर्मीयांचा हळवेपणा स्वीकारण्याचे काय कारण आहे ? निंदकाचे घर शेजारी असावे, कारण त्यातून आत्मपरीक्षण व सुधारणा शक्य होते. अशी निंदा वास्तवाला सोडून असेल, तर तिला हिंसा न करता लेखन, वाचन, व्याख्यान, प्रसार-माध्यमे यामार्फत व संवादाने, उत्तर देणे आत्मविश्वासाचे व सु-समाज-पोषक ठरेल. आपल्याला पूज्य वाटणाऱ्या देवता/ग्रंथ/जागा इतरांना पूज्य वाटतीलच असे नाही. त्यांच्यावर टीका, टिप्पणी, दोषदर्शन झाले, तरी ते उमदेपणाने व खिलाडूपणे स्वीकारण्याची तयारी असणे हेच सामर्थ्याचे लक्षण आहे. हळवेपणाचे प्रदर्शन व राजकारण हानिकारक होय. असे हळवेपण हा भारतीय संस्कृतीचा वारसा नाही. इतर धर्मीयांचे हळवेपण हे आमच्या हळवेपणाचे कारण किंवा समर्थन असू शकत नाही.
५) परदेशातील पैसा वापरून भारतातील दरिद्री लोकांसाठी आरोग्य, शिक्षण, व्यवसाय व एकूण दारिद्र्य निर्मूलनाच्या सेवा सुरू करणे व त्या आधारे धर्मप्रचार करणे योग्य/कायदेशीर आहे काय? उत्तरः होय. धर्मांतर करणाऱ्यांच्या दृष्टिकोणातून मी या प्रश्नाकडे पाहतो. गरिबी, रोगराई, अडाणीपणा व बेकारी यांच्या खाईतून सुटण्यासाठी मला जर परकीय पैसा वापरणाऱ्या धर्मप्रसारकांची मदत घ्यावी लागली, तर मी जरूर ती स्वीकारेन. धर्मांतर करणे त्यासाठी आवश्यक असेल, तर जरूर धर्मांतर करेन. अर्थात्, माझे मूळ धर्मबांधव जर मला याच सेवा सन्मानाने पुरवत असले,
तर हा प्रश्नच उद्भवणार नाही. पण आम्हीही तुला गरिबीतून सुटण्यासाठी मदत करणार नाही, व इतर धर्मांच्या प्रचारकांनी अशी मदत केलेली आम्हाला पसंत पडणार नाही असे म्हणणे जुलमाचे, चुकीचे व निर्दयपणाचे नाही का?
तुम्हाला हिंदू धर्मामध्ये न्याय, सन्मान आणि समानता मिळणार नाही” असा उघड संदेश जर धर्मप्रसारकांनी हिंदू-दलितांना व वन्य जमातींना दिला तर तो निखालस चूकच आहे, असे आम्हाला छातीठोकपणे म्हणता येईल काय ? त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही आमच्या वागणुकीत बदल करणार की धर्मप्रसारकांना कायद्याचा बडगा दाखविणार ?
धर्म बदलणे ही खाजगी व्यक्तिगत गोष्ट आहे. त्यामध्ये शारीरिक हिंसेचा, जबरदस्तीचा वापर होत नाही, एवढेच शासनाने पाहावे. त्यात आमिष, लालूच दाखवणे यांचा भाग आहे का नाही, हे पाहण्याचे अधिकार कोणालाच असू नयेत, कारण या अधिकाराचा गैरवापर होणार हे नक्कीच.
६) ख्रिश्चन मिशनरी गरीब मुस्लिमांमध्ये का धर्मप्रसार करत नाहीत ? मुस्लिम प्रत्याघाताला घाबरून ? उत्तर- मुस्लिम वस्तीत ख्रिश्चन धर्मप्रसार चालतो, चालत नाही, किती मुस्लिम दरवर्षी धर्म बदलतात याबद्दल काहीच माहीत नाही, तोपर्यंत हा प्रश्न विचारणे निव्वळ वादाकरताच होय. पण मुस्लिमांमध्ये जाती असल्या तरी अस्पृश्यता नाही, धर्माने केलेले जातिभेद नाहीत. धर्माधिष्ठित उच्चनीचभेद नाहीत, त्यामुळे धर्म बदलण्याची तीव्र आवश्यकता मुस्लिम गरिबांना वाटत नसणार, व त्यामुळे त्यांच्यामध्ये ख्रिश्चन होण्याचे प्रमाण कमी असणार. शिवाय ख्रिश्चन मिशनयांवर घाबरण्याचा आरोप करण्यापूर्वी दोनदा विचार केला पाहिजे. प्रत्यक्ष आकडे समजा जाहीर झाले, व त्यात असे दिसले की फक्त हिंदूच धर्मांतर करतात, मुस्लिम करत नाहीत, तर त्यात अनपेक्षित, धक्कादायक काय आहे ? पण त्यामुळे हिंदूंना धक्का बसून ते जागे झाले, त्यांनी आत्मपरीक्षण करून हिंदुधर्मात सुधारणा केल्या, तर चांगलेच होईल, नाही का ? हिंदुधर्मातील अनेक सुधारणा ख्रिश्चन राज्यकर्त्यांच्या प्रेरणेने, किंवा ख्रिश्चन धर्माच्या अनुकरणाने झाल्या आहेत, हे नाकारता येईल काय ? सध्या स्पर्धेचे युग आहे व स्पर्धेचे चांगले परिणाम आर्थिक क्षेत्रात आपण अनुभवत आहोत. धर्मांतील स्पर्धेमुळे जर हिंदुधर्म सुधारणांना चालना मिळाली तर ते सर्वांच्याच अभ्युदयास कारणीभूत ठरेल. जबरदस्तीची पुनर्धर्मांतरणे, किंवा धर्मांतरविरोधी कायदे हा उचित प्रतिसाद नाही.
[१७ ऑक्टोबर २००८ च्या लोकमत मध्ये खुशवंतसिंगांचा तर कुणीही धर्मांतर करणार नाही! हा लेख प्रकाशित झाला. ते म्हणतात,
सध्याच्या जगात कोठेही बळजबरीने धर्मांतर केले जात नाही. भारतसुद्धा त्याला अपवाद नाही. देशातील गरीब, निरपराध आणि अजाण लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास बाध्य केले जात आहे असे जे म्हणतात ते शुद्ध खोटे बोलत असतात. आपल्या पूर्वजांच्या धर्मात ज्या सुशिक्षित व चांगल्या घरातील लोकांना शांती मिळत नाही असे काही मूठभर लोक धर्मांतर करीत असतात. याविषयीची उदाहरणे प्रामुख्याने अमेरिका, युरोपमध्ये पाहायला मिळतात. जेथे लोक ख्रिश्चन धर्माकडून बौद्ध धर्माकडे, हिंदू धर्माकडे, इस्लामकडे किंवा शीख धर्माकडे वळलेले दिसतात. काही बाबतीत अन्यधर्मीयांसोबत विवाह करण्यास तयार झाल्यामुळे धर्मांतर करावे लागल्याची उदाहरणे आहेत.
पण मोठ्या संख्येत धर्मांतर करणारा समाज हा त्यांना त्यांच्या धर्मांत सापत्न वागणूक मिळत असल्यामुळे धर्मांतर करण्यास प्रवृत्त झाल्याचे दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण या संदर्भात देता येण्यासारखे आहे. त्यांच्या महार समाजाला हिंदू समाजातील उच्चवर्णीयांकडून भेदभावपूर्ण वागणूक मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या समाजाला बौद्ध धर्माकडे नेले. हीच गोष्ट भारतातील ९० टक्के भारतीय मुस्लिम समाजाबद्दलही सांगता येईल. त्यांचे पूर्वज कनिष्ठ वर्णांतील असल्यामुळे त्यांनी समान दर्जा मिळावा म्हणून इस्लाम स्वीकारला. तेव्हा तलवारीच्या धाकावर इस्लामने धर्मांतर केले हा दावाही खोटा ठरतो. बरेच लोक अन्य धर्मांविषयी वाटणाऱ्या आस्थेमुळे धर्मांतर करतात. तर काहींची त्यांच्या धर्मांत उपेक्षा झाल्याने धर्मांतर करतात. परके लोक जेव्हा त्यांच्यापर्यंत पोचले, त्यांनी त्यांच्यासाठी शाळा बांधल्या, हॉस्पिटले उघडली, त्यांना शिक्षण दिले, तेव्हा साहजिकच त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटायला लागली. त्यांच्यामुळेच ते समाजात मान उंच करून वावरू लागले.
त्यांच्यापैकी बरेच जण ख्रिश्चन मिशनरी होते, जे दूरवर खेड्यापाड्यात काम करीत होते. त्यांनी निराश झालेल्या लोकांमध्ये आशेचा किरण आणला. आजही ख्रिश्चन मिशनरीजतर्फे ज्या शाळा वा महाविद्यालये चालविली जात आहेत, ती उत्कृष्ट शिक्षण केंद्रे म्हणूनच ओळखली जातात. त्यांची हॉस्पिटल्सही आपल्या आरोग्याचा दर्जा राखून असतात. त्यांच्या संस्था महागड्या तर नाहीतच पण भ्रष्टाचारापासून दूर आढळतात. लोक धर्मांतर करीत असले तरी ते मिशनरींबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेच्या भावनेतून धर्मांतर करीत असतात मग अशा धर्मांतराला तुम्ही सक्तीचे धर्मांतर म्हणाल का?
स्वतःला हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते म्हणविणाऱ्यांनी स्वतःच्या अंतःकरणात कधी डोकावून बघितले आहे का? त्यांच्यापासून लोक दूर का जातात हे त्यांनी कधीतरी समजून घेतले आहे का? तेव्हा सर्वप्रथम त्यांनी स्वतःचे घर सुधारावे. हिंदू समाजातील जाति-व्यवस्थेचे विरेचन करावे आणि समाजातील सर्वांसाठी आपले हृदय खुले ठेवावे. मग कुणीही धर्मांतर करणार नाही!]
२५, नागाळा पार्क, कोल्हापूर ४१६ ००३.