‘एक विश्व एक स्वप्न’

काल (८ ऑगस्ट २००८) संध्याकाळी दूरदर्शनवर बीजिंग ऑलिंपिक्सचा मंत्रमुग्ध करणारा उद्घाटनसोहळा पाहिल्यापासून मनात अनेक विचारांनी गर्दी केली आहे.
दोन वर्षांपूर्वी सुमारे याच सुमारास एक महिनाभर मी चीनमध्ये थोडीफार भटकंती केली. दक्षिण, मध्य आणि पूर्व चीनच्या काही शहरांतून मी फिरलो. दुभाष्या-मार्गदर्शकांच्या (सर्व तरुण मुली) सहाय्याने चीनचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक चीनसंबंधीची सरकारी धोरणे आणि त्यासंबंधीची लोकमते समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण अविस्मरणीय अनुभव होता.
१९६२ च्या युद्धाच्या वेळी मी शाळेत होतो. त्यावेळी दुर्गम हिमालयातील थंडीत कुडकुडणाऱ्या आपल्या जवानांच्या मदतीसाठी आम्ही घरी स्वेटर आणि मफलर विणून आर्मीकडे पाठवले होते. चीनविरुद्धची आणि देशाभिमानी गाणी रागाने व आवेगाने गायली होती. हकीकत चित्रपट आवर्जून पाहिला होता आणि चीनविरुद्धचा राग बराच काळ मनात बाळगला होता.
चीनभेटीला जायच्या आधी व जाऊन आल्यावरही मी चीनसंबंधी अनेक पुस्तके वाचून काढली. माओची आणि माओविरोधातील अनेक पुस्तके महाविद्यालयीन काळातच वाचली होती. आधुनिक चीनची वर्णने वर्तमानपत्रातून आणि इंटरनेटवर वाचनात येत होतीच. सर्वांना, अगदी भारताच्या पंतप्रधानांनासुद्धा, भुलवणारे शांघायचे मायाजाल विस्मय निर्माण करत होते. चीनसंबंधी बरेच कुतूहल, काहीसा आकस आणि नाही म्हटले तरी थोडेसे दडपण होते.
चीनमधल्या पहिल्या प्रवेशात, कुनमिंग शहराच्या मध्यवर्ती असलेल्या अतिशय सुंदर सार्वजनिक-उद्यानाच्या पहिल्या भेटीतच तो आकस आणि ते दडपण पटकन नाहीसे झाले. एका स्वच्छ तलावासभोवतीचे हे उद्यान पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत लोकांच्या विविध उपक्रमांनी गजबजलेले असते. लहान मुले, तरुण जोडपी, ज्येष्ठ नागरिक, वृद्ध स्त्री-पुरुष या उद्यानाचा वापर खेळांसाठी, विश्रांतीसाठी, गप्पांसाठी, संगीत-नृत्यासाठी, व्यायामासाठी, गुजगोष्टींसाठी, अगदी झोपेसाठीसुद्धा करत असतात आणि या सर्वांसाठी या उद्यानात भरपूर जागा आहे. कोणतेही दडपण इथे कोणावरही नसते. एका संध्याकाळी या उद्यानात चाललेल्या एका, बहुधा तिबेटी वंशाच्या छोट्या गटाचे चिनी संगीत-नृत्य आम्ही पाहत होतो. काही वेळाने त्यांच्या गटप्रमुखाचे लक्ष आमच्याकडे गेले. “इंदू, इंदू” म्हणून त्यांनी आमचे स्वागत केले आणि आमच्याप्रीत्यर्थ एक गाणे व नृत्य सादर केले. गाण्याचा अर्थ कळला नाही, पण नृत्यातल्या कथ्थक-भरतनाट्यम्च्या आविर्भावातील आपुलकीने सर्व दुरावा नाहीसा झाला. चीन आणि चिनी माणसे अगदी जवळची वाटायला लागली.
चीनमधल्या पुढच्या मार्गक्रमणात भेटलेल्या विविध चिनी व्यक्तींनी मला भारावून टाकले, अगदी साध्यासाध्या माणसांनी, मग ते मार्गदर्शक, दुकानदार, वेटर किंवा टॅक्सी चालक असोत. प्रत्येकाची कार्यक्षमता, शिस्तपालन व विनम्रता कमालीची होती. एक महिन्याच्या या कालावधीत आम्हाला कुठेही एका मिनिटासाठीसुद्धा खोळंबावे लागले नाही. अगदी खूप गर्दीच्या पर्यटनस्थळीसुद्धा कमालीच्या शिस्तीत सर्वांचा वावर होता आणि सर्व आबालवृद्ध आपापल्यापरीने मौजमजा करीत होते.
राजधानी बीजिंग परिसरात आम्ही दहा दिवस होतो. चीन आणि चिनी माणसांना जवळून जाणून घेण्यासाठी मुद्दाम जास्त अवधी ठेवला होता. बीजिंगमधील आमची मार्गदर्शक तरुण मुलगी चांगलीच बोलकी होती. इंग्रजी फार चांगले नसले तरी अगदी आत्मविश्वासाने गप्पा मारायची. आधीचे मार्गदर्शक स्वतःहून एखाद्या वेगळ्या विषयावर सहसा बोलायचे नाहीत, परंतु ही मुलगी आम्हाला वेगवेगळे प्रश्न स्वतःहून विचारायची. आमच्या प्रश्नांनाही काहीही हातचे न राखता उत्तरे द्यायची, वादविवादही घालायची. माओच्या तसेच सध्याच्या सरकारच्या काही अत्याचारांबद्दल पोटतिडिकीने बोलणारी ही मुलगी लगेचच माओने निर्माण केलेल्या आत्मविश्वास आणि शिस्तीबद्दल अभिमानाने बोलायची. ईश्वर आणि धर्म यांसंबंधीची तिची मते सरळसोट होती. “मी बौद्ध धर्म पाळते, पण तो फक्त माझ्या मनामध्ये, मंदिरामध्ये आणि घरामध्ये. सार्वजनिक जागेत ईश्वराला आणि धर्माला स्थान नाही.’ भारताबद्दल तिला बरेच कुतूहल आणि आपुलकीही असावी, परंतु तिबेट आणि दलाई लामांचा विषय निघताच तिने आम्हाला सडेतोडपणे सुनावले, “दलाई लामा धर्म आणि राजकारण यांची गल्लत करत आहेत. त्यांनी यातले काहीतरी करावे. भारताने त्यांच्या या दुटप्पी धोरणाला साथ देऊन मोठी चूक केली आहे.”
या काळात बीजिंग ऑलिंपिकमय झालेले होते. पूर्वतयारीमध्ये गुंतलेले होते, विविध क्रीडांगणांची बांधकामे जोरात चालू होती, खेळाडू आणि पर्यटक यांच्यासाठी सुविधा निर्माण होत होत्या, रस्ते रुंदीकरण चालू होते, नवा प्रशस्त विमानतळ उभा राहत होता, बगीचे व हिरवळ तयार केली जात होती, सार्वजनिक शौचालये बांधली जात होती. मुख्य म्हणजे हे सर्व उत्कृष्ट नियोजनाखाली चालले होते. याच्या जोडीस जोड म्हणून सर्व शहरवासीयांचेही प्रशिक्षण सुरू होते, विशेषतः इंग्रजी बोलणे आणि पर्यटकांचे आदरातिथ्य करणे.
शहरात फिरताना अनेक ठिकाणी जुन्या इमारती रस्ते रुंदीकरणासाठी पाडल्या जाताना दिसत होत्या. माझ्या यासंबंधीच्या जबरदस्ती, नुकसानभरपाई, मालक/भाडेकरू यांवरील अन्याय इत्यादी प्रश्नांवर आमच्या मार्गदर्शक तरुणीचे उत्तर समर्पक होतं, “चीनमध्ये जमिनीचे मालक सरकार असते. सरकारी प्रकल्पांसाठी जागा हवी असेल तर तिथल्या निवासी व्यक्तींना पुरेशी आगाऊ सूचना देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते. आपली पूर्वापार असलेली जागा सोडणे क्लेशदायक असते परंतु बहुधा सर्वजण येवढ्या त्यागाला तयार असतात. कोणाचा फार विरोध झाल्यास कायदेशीर इलाज केला जातो, परंतु सार्वजनिक विकासाची कामे खोळंबली जात नाहीत.” एके दिवशी आम्ही बीजिंगमधील जुन्या, गरीब, ‘हुडाँग’ या वसाहतीतील एका सर्वसामान्य कुटुंबासमवेत एक दुपार घालवली. त्यांच्या बरोबर जेवलो, दुभाष्यामार्फत गप्पा मारल्या. ही वसाहतसुद्धा आता लवकरच उठणार याची खंत कुटुंबीयांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. पण सरकारतर्फे मिळणाऱ्या नवीन जागेत जाण्याचा, बीजिंग शहराच्या सर्वांगीण विकासाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोण सकारात्मक वाटला. बहुसंख्य जनतेचा असा दृष्टिकोण हेच चीनच्या वेगवान विकासाचे रहस्य असावे. एकदा बीजिंगच्या प्रदूषणाबाबत विचारताच आमची मार्गदर्शक म्हणाली. ‘आम्हाला याची जाणीव आणि काळजी आहेच. सरकार व आमचे विविध शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत आणि मी तुम्हाला खात्री देते की दोन वर्षांनी तुम्ही ऑलिंपिक पाहायला जरूर या, बीजिंग प्रदूषणमुक्त असेल.’
बीजिंगमध्ये सर्वांसाठी, सर्व कामांसाठी ऑलिंपिक हे एकमेव लक्ष्य ठेवलेले होते. ऑलिंपिकपूर्वी सर्व बांधकामे पूर्ण करायची, रस्ते रुंदीकरण पूर्ण करायचे, हिरवळ निर्माण करायची, लोकांना पर्यटकांचे आदरातिथ्य करायला शिकवायचे, इंग्रजी बोलायला शिकवायचे, यादी अमर्याद असावी! पण जिद्दही अमर्याद दिसत होती सरकारची आणि जनसामान्यांचीही. कुनमिंग मधल्या एका प्रशस्त चौकात फिरत असताना अचानक दोन अगदी छोट्या चीनी मुली माझ्याजवळ आल्या आणि अतिशय विनम्रतेने अडखळणाया इंग्रजीत म्हणाल्या, “आम्ही तुमची मुलाखत घेऊ इच्छितो.” मी हो म्हणताच दोघींनीही आपापल्या वह्या उघडल्या आणि एका मागोमाग काही बाळबोध प्रश्न इंग्रजीत विचारले, “आपले नाव काय ? आपण कोणत्या देशातून आला? आपली राष्ट्रभाषा कोणती? आपण चीनमध्ये किती दिवस राहणार ? आपल्याला आमचा देश आवडला का?” वगैरे वगैरे. मी दिलेली उत्तरें व्यवस्थित वहीत इंग्रजीत लिहिली आणि माझे आभार मानून ही मुलाखत संपवली. चौकशी केल्यावर त्यांनी मला सांगितले की हा त्यांच्या खास ऑलिंपिकसाठीच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. काल उद्घाटनाच्या कार्यक्रमात पतंग घेऊन आनंदाने विहरणाऱ्या छोट्या चिनी मुलीला पाहताना या छोट्या मुलाखतकार मुली माझ्या डोळ्यासमोर आल्या. अशा अनेक छोट्या जिद्दी मुलामुलींमुळेच बीजिंग ऑलिंपिक तर यशस्वी होईलच, पण हा देशही लवकरच सर्व क्षेत्रांमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर जाईल.
चीनमध्ये फिरताना जाणवलेल्या काही बाबींचा खास उल्लेख करायला हवा.
चीनमध्ये व्यक्तिपूजेला स्थान नाही. माओच्या काळात सर्व वातावरण माओमय जरूर होते, पण ते माओच्या प्रभावामुळे. माओचा चीनच्या विकासाचा दृष्टिकोण हा लोकाभिमुखच होता. आजतर हे अगदी ठळकपणे जाणवते. आजच्या चीनमध्ये माओ प्रत्यक्ष दिसत नाही, पण तो चिनी जनतेच्या अस्मितेतून सतत जाणवत राहतो. चीनमधली छोटी व मोठी शहरे नियोजनबद्ध आहेत. स्वच्छता व शिस्त सर्वच ठिकाणी दिसते. वाहतुकीला पुरेसे असे रुंद रस्ते आहेत, त्यांमध्ये सायकल व स्कूटरसारख्या जनसामान्यांच्या वाहनांना खास वेगळ्या मार्गिका आहेत. पादचाऱ्यांसाठी प्रशस्त पदपथ आहेत, बसायला बाके आहेत, अनेक पदपथांवर व्यायामाची साधने आहेत. प्रचंड वाहतुकीतूनसुद्धा पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वाहने आदराने उभी राहतात.
माओच्या सांस्कृतिक क्रांतीत अनेक गोष्टी भरडल्या गेल्या, नष्ट झाल्या. तरीही आज पाच हजार वर्षांच्या चिनी संस्कृतीची मानचिन्हे उत्कृष्ट पद्धतीने जतन केली आहेत व देशी परदेशी पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. त्यांपैकी अनेकांना जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळालेला आहे व त्याचा चिनी जनतेला अभिमान आहे. कालच्या ऑलिंपिक उद्घाटनसोहळ्यातही हा सांस्कृतिक वारसा संपूर्ण जगाला एका दिमाखाने पण गौरवपूर्वक दाखवला गेला.
धर्मनिरपेक्ष चीनमध्ये आता अनेक शहरांतून बौद्ध मंदिरांबरोबर चर्च व मशिदीही दिसतात. पण धर्म आणि ईश्वर सार्वजनिक जागी किंवा रस्त्यावर येत नाहीत. कालचा संपूर्ण सोहळा चिनी भाषेतूनच झाला. चीनला स्वतःच्या संस्कृतीचा तीव्र अभिमान आहे, पण चीनमध्ये धर्म आणि संस्कृती यांची गल्लत केली जात नाही. कालच्या उद्घाटनसोहळ्यात चिनी संस्कृती प्रतिष्ठेने मिरवीत होती, पण धर्म आणि ईश्वर कुठेही नव्हते. त्यामुळेच की काय हा सोहळा सर्वांना आपलासा वाटला, अगदी दूरदर्शनवरून पाहणाऱ्यांनासुद्धा. एका माजी जर्मन खेळाडूची प्रतिक्रिया वैशिष्ट्यपूर्ण होती, “या उत्कृष्ट सोहळ्यात चिनी संस्कृतीची आम्हाला ओळख झाली, भाषा चिनी होती, पण हा संपूर्ण सोहळा वैश्विक होता. त्यातली संगीताची भाषा ही विश्वातल्या अनेक अंतःकरणांना जोडणारी होती.” या ऑलिंपिकचा नारा म्हणूनच समर्पक आहे “एक विश्व – एक स्वप्न”!
या सोहळ्यातील कलेची अदाकारी केवळ तांत्रिक नव्हती तर इथे मानवी कुशलता आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ घातला गेला होता. तंत्रज्ञान आज अनेक ठिकाणी मिळते, पण इथली मानवी कुशलता ही शिस्त, जिद्द आणि आत्मविश्वास यांचा दुर्मिळ संगम होता.
ही शिस्त, जिद्द आणि आत्मविश्वास चिनी जनतेमध्ये माओने निर्माण केला एका चीनी लोककथेच्या माध्यमातून ‘डोंगर हलवणारा मूर्ख म्हातारा’ या गोष्टीतून !
दोन वर्षांपूर्वीची माझी चीनची भेट संपवून आम्ही भारतात परतण्यासाठी पहाटे तीन वाजता टक्सीने बीजिंग विमानतळाकडे निघालो होतो. रस्त्यावर अगदीच तुरळक वाहतूक होती. टॅक्सी वेगाने राजमार्गाला लागली आणि तेवढ्यात पुढे येणाऱ्या एका चौकात हिरवा सिग्नल लाल झाला. रस्त्यावर एकही गाडी नव्हती, पादचारी असण्याची अजिबात शक्यता नव्हती, कुठेही वाहतूक नियंत्रक पोलीसही नव्हते. आमच्या टॅक्सीचालकाने शांतपणे गाडी थांबवली व सुमारे एक मिनिटाने सिग्नल पुन्हा हिरवा होताच विमानतळाकडे प्रयाण केले. शिस्त, जिद्द आणि आत्मविश्वास हे चिनी जनतेच्या रक्तातच नव्हे तर जनुकांमध्येही भिनलेले असावे आणि तेच त्यांचे प्रमुख सामर्थ्य आहे.
गेल्या वर्षी मी कामानिमित्त सिक्कीमला गेलो असताना आवर्जून नाथू ला इथे गेलो. ही चीन व भारतामधील सीमा रेषा. हा जुना रेशमाच्या व्यापाराचा मार्ग आता दोन्ही सरकारांनी खुला केला आहे. तरीही सीमेवर दोन्ही सैन्याच्या चौक्या आहेतच. मी कुंपणातून पलिकडच्या चिनी सैनिकाला हस्तांदोलनासाठी आवाहन केले. चेहऱ्यावर कोणतेही भाव नसलेला तो सैनिक काहीसा नाखुषीने, पण जवळ आला व त्याने माझ्याबरोबर हस्तांदोलन केले. मला १९६२ ची आठवण झाली. त्याच मला आज आपल्या या शेजारी राष्ट्राबद्दल कौतुकादर वाटू लागला आहे.
वृंदावन, २२७, राममहाल विलास एक्सटेंशन-२, एच.आय.जी.कॉलनी, फर्स्ट मेन रोड, बेंगळुरू, कर्नाटक – ५६० ०९४ दूरध्वनी : ०८०-२३४१७३६६/२३४१७२८३; भ्रमणध्वनी : ०९४४९१४९२३६