मुंबई मेरी जान’

‘डोंबिवली फास्ट’सारखा चांगला सिनेमा पाहायला मिळेल, एवढ्याच अपेक्षेने ‘मुंबई मेरी जान’ पाहायला गेलो नि एक अप्रतिम सिनेमा पाहिल्याचे समाधान घेऊन परतलो. हल्लीच्या मल्टिप्लेक्समध्ये पूर्वीप्रमाणे एक नि एकच सिनेमा दाखवत नाहीत म्हणून.. नाहीतर, तिथल्या तिथे बसून पुन्हा, वेगळ्या दृष्टीने, पाहावेत अशा सिनेमांची वानवा असताना अशा एखाद्या सिनेमाचा लाभ म्हणजे पर्वणीच.
योगेश विनायक जोशी नि उपेंद्र सिधयेंनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाला नायक नाही, नायिका नाही, खलनायक नाही, कथावस्तू नाही, सलग सूत्र नाही, उत्कंठावर्धक प्रसंग नाहीत, व्यक्तिरेकांचे संघर्ष नाहीत, नाच-गाणी, हाणामाऱ्या नाहीत. आहेत ती फक्त सपाट, सामान्य माणसे नि त्यांच्या करुण-विदारक कहाण्या, फारशा पुढे न सरकणाऱ्या, कारण त्यांना अगतिकतेचा शाप आहे. “महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी वाचती’ त्या लव्हाळ्यांच्या जातकुळीची ही सामान्य माणसे प्रसंगी हतबल होतात, पण हताश न होता वास्तवाचा यथार्थ स्वीकार करतात, निमूटपणे. ‘डोंबिवली फास्ट’चा नायक अखेरच्या श्वासापर्यंत संघर्षाच्या पावित्र्यात होता. मृत्यू समोर दिसत असूनही त्याची ‘विंडो सीट’ साठी धडपड संपत नव्हती. ‘मुंबई’मध्य मात्र एकट्यादुकट्या नव्हे तर सर्वच व्यक्तिरेखांनी परिस्थितीचा समंजस स्वीकार केलेला दिसतो. नि त्यापुढे जाऊन जीवनकलह सुसह्य होण्यासाठी मैत्रीचा, प्रेमाचा, सद्भावाचा, सख्याचा, सौहार्दाचा हात पुढे केलेला दिसतो.
एक मामुली कॉफीवाला (इरफान खान)… महागडी कार बेदरकारपणे चालविणाऱ्या, सिगारेटीवर तब्बल नव्वद रुपये खर्चुन उरलेल्या दहा रुपयांवर आरामात पाणी सोडणाऱ्या व प्रसंगी संतापाने बेभान होऊन मोबाईल फेकून देणाऱ्या धनांध युवकाला पाहून थक्क होतो. ही पैशांची गुर्मी, मस्ती, मोबाइलचा चुराडा तो ‘साक्षीभावा’ने पाहतो. अवाढव्य शॉपिंग-मॉलमध्ये जातो. बायको मुलीला त्या अद्भुत, मायावी दुनियेचे दर्शन घडविताना अचानक पकडला जातो, तो नेहमी फुकट स्प्रे मारून घेतो म्हणून. “कॉफीच्या वासाचा स्प्रे तुमच्याकडे असता ना, तर जरूर घेतला असता,” असं कसंबसं म्हणून वेळ साजरी करायचा प्रयत्न करतो, पण मारहाण, धक्काबुक्की व बायको-मुलींसमोरील अपमान सहन न होऊन वेगळ्या प्रकारे सूड उगविण्यास प्रवृत्त होतो. कुणाही पुढे आपली व्यथा न मांडता आल्याने जी घुसमट होते, तशी घुसमट ‘मुंबई’त कितीतरी जणांची होते. कॉफीवाला मात्र अखेरीस पत्नीजवळ घडाघडा मन मोकळे करतो आणि त्याच्यातील माणुसकीचा झरा कसा झुळझुळू लागतो, ते पडद्यावर अवश्य पाहण्याजोगे.
केवळ कॉफीवाल्याचाच नव्हे, तर सुरेश (के. के. मेनन), तुकाराम पाटील (परेश रावल), युसुफ, त्याची आई ह्या सर्व व्यक्तिरेखांत दडलेला माणूस आपल्याला दिसू लागतो. मुस्लिमांविषयी तेढ बाळगणाऱ्या व प्रत्येक मुसलमानाकडे ‘दहशतवादी’ म्हणून संशयी नजरेने पाहणाऱ्या सुरेशच्या मनातील सैतान अखेरीस नाहीसा होतो व त्याचे युसुफशी मैत्रीचे नाते जडते.
वरकरणी बथ्थड वाटणारा तुकाराम पाटीलनामक हवालदार सुरेशलाच नव्हे तर कदमलाही (विजय मौर्य) ज्या पद्धतीने जगाची रीत समजावतो, ती पाहून त्याच्यातील ‘माणसा’चे दर्शन घडते व माणुसकीला सलाम केला जातो. स्वतःच्या अंतर्यामीची शल्ये खोलवर गाडून टाकत तुकाराम प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्याचे मळे हमखास फुलवितात नि त्याचवेळी जीवनभाष्येही करून मोकळे होतात. जगण्यासाठी आवश्यक असे मोलाचे धडे देतात. ‘निवृत्तीनंतर गावी जाईन नि शेतात मध्यरात्री ऊस चोरल्याबद्दल कोल्ह्यांना पकडीन, तुरुंगात टाकीन, तेव्हाच मला काही महत्त्वाचं कार्य केल्याचं समाधान लाभेल’ असे स्वप्न पाहणाऱ्या पाटिलांच्या मनातील विषाद विनोदाच्या झालरीने प्रकट होतो नि प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेतो. परिस्थितीवरील त्यांची टीका टिप्पणी, मल्लिनाथी इतकी मार्मिक असते की बघताबघता तुकारामाला चित्रपटाचा नायक म्हणायला हरकत नाही, अशा निष्कर्षाप्रत आपण येतो!
एकदा का ‘सैताना’ची जागा ‘माणसा’ने घेतली की मग काळजीचे कारण फारसे दिसत नाही. सुरेश, युसुफ, तुकाराम, कदम, कॉफीवाला वगैरेंचे व्यवहार पूर्ववत सुरू होतात नि मागच्या पानावरून पुढे याप्रमाणे सरकत राहतात, सुरळीतपणे पुढे जातात, असे म्हणायचे.
राहता राहिली रूपाली. (की रुदाली ?) (सोहा अली खान). मीडियासाठी ‘बाइट’ घेताघेता दैवदुर्विलास असा की तिचाच बाइट घ्यायची वेळ आली! तिचे पुढे काय झाले, युसुफ काय करतो, सुरेशचे बरे चालते का, त्यांच्या बाकीच्या मित्रांचे, निखिलच्या बायकोचे, हात गेलेल्या मित्राचे पुढे काय झाले? काय झाले, असे प्रश्न इथे सर्वस्वी गैरलागू.
मुळात संपूर्ण चित्रपटाला बॉम्बस्फोटांची पार्श्वभूमी आहे. ११ जुलै २००६ ला मुंबईला झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेमुळे मुंबईकर हादरले त्याचे प्रत्ययकारी चित्रण येथे केलेले दिसते (म्हणून चित्रपट ‘केवळ प्रौढांसाठी’ आहे). ‘याचि देही याचि डोळां’ अनुभवलेले सुरेश नि निखिल उद्ध्वस्त होतात. वास्तविक अशावेळी पाहिलेले, दिसलेले बोलून मोकळे व्हावे, पण असे ‘शेअरिंग’ होत नाही. मग ते सोसत राहतात, घुसमटत राहतात. रुपाली, कदमही आपापल्या परीने अन्वयार्थ लावत राहतात; पण त्यांच्याही भावनांना मोकळी वाट मिळत नाही. त्यांचे सोसणे संपत नाही, तर जाणवत राहते. परस्परसंवादांचा अभाव ‘मुंबई’त अचूकपणे टिपला आहे. एकमेकांचा आधार न घेता एकेकट्याने दुःख पेलणारी ‘मुंबईतील माणसे मृतात्म्यांसाठी दोन मिनिटे गांभीर्यपूर्वक शांतता पाळतात नि नित्यकर्मास सुरुवात करतात. प्रत्येकाची वाटचाल चालू राहते. झाले गेले विसरून नव्या उमेदीने आल्या दिवसाचे स्वागत केले जाते. ‘मुंबई मेरी जान’ म्हटले असले तरी वास्तविक कोणत्याही महानगरीत हे असेच घडत असते. प्रचंड, विलक्षण गतीने कालचक्र फिरत असते नि काळाच्या रेट्यात भलीभली दुःखे पचवून माणसे आगेकूच करत असतात. मुंबई, दिल्ली, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, लंडन आणि अगदी अलीकडील बंगलोर अहमदाबादसुद्धा. बॉम्बस्फोटाचे धक्के पचवत महानगरी पुढे जात असते; अविरत, अखंड. महानगरीला असंख्य समस्या भेडसावत असतात नि प्रत्येक समस्येला अनंत पैलू असतात. अशा वेळी एक नि एकच कथासूत्र शक्य तरी आहे का ? सुसूत्रता, सुसंगती, नेमकेपणा, आशयाच्या अभिव्यक्तीचा ओघवतेपणा, अशा तार्किक अपेक्षांना छेद देणारे वास्तव हरघडी अनुभवत असताना एका विशिष्ट सूत्रबद्ध, ठाशीव आशयाची अपेक्षा भाबडी ठरते. (जसा चित्रपट, तसेच त्याचे परीक्षणही. त्यात मुद्दे असतील, विचार असतील; पण पारंपरिक पद्धतीने एक नि एकच वैचारिक धागा पकडून मांडणी केली जाईल, ही अपेक्षा चुकीची.) ।
चित्रपटातील काही गोष्टी खटकतात. मॉलमधील सरकत्या जिन्यावर मदत करायला कुणीही फिरकू नये, अगदी दरवानानेही निव्वळ बघ्याची भूमिका घ्यावी, हा प्रकार अतिशयोक्तीपूर्ण वाटतो. मुंबई मदतीसाठी प्रसिद्ध आहे. पूरसदृश परिस्थिती असो की अपघात असो की बॉम्बस्फोट ; मुंबईकर हातचे काम टाकून तत्क्षणी धावतो. पोलीस व अन्य शासनयंत्रणेने मदतकार्यास प्रारंभ करण्यापूर्वीच मंबईकरांनी जीवाची पर्वा न करता मदतकार्याचा ओघ सुरू केलेला असतो; हा कायमचा अनुभव. अर्थात तो चित्रपटात आला आहेच, पण जाता-जाता पोलीसयंत्रणेवर भेदक क्ष-किरणे टाकली आहेत. एकदा ‘वर्दी’ घातली की ‘संवेदनशीलता’ संपवून टाकणे भाग पडते त्याशिवाय तरणोपाय नाही, असा समज तमाम पोलीसवर्गाबाबत करून दिला जातो. प्रामाणिक, कर्तबगार, संवेदनशील पोलीस जणू काही नाहीतच व शासनाच्या इतर खात्यांतील सर्वच्या सर्व जणू काही इमानी, कार्यक्षम व संवेदनक्षम असतात, असा समज पसरविला जातो व तो पोलीसखात्यावर अन्यायकारक आहे. त्याऐवजी, पोलीस शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात, असे आडवळणाने सूचित केले असते, तर अधिक योग्य झाले असते. मुख्य म्हणजे पोलीसखात्यावर अकार्यक्षमतेचा, भ्रष्टाचाराचा, गुन्हेगारीचा शिक्का बसला नसता.
पोलिसांप्रमाणेच समस्त वैद्यकीय वर्गावरही येथे अन्याय झाला आहे, असे मला वाटते. आपत्काली प्रत्येक डॉक्टर-नर्स इत्यादी व्यावसायिक-वैयक्तिक सुखदुःखे बाजूला सारत, जीवाची पर्वा न करता अहोरात्र कर्तव्यभावनेने जखमींवर उपचार करत असतात. चित्रपटात इस्पितळे येतात, रुग्ण येतात, त्यांचे नातेवाईक येतात; पण डॉक्टर, परिचारिका इत्यादी महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष होते ते खटकते. अर्थात अशा काही त्रुटींमुळे चित्रपट उणावत बिलकूल नही. पुनःपुन्हा पाहावा, असे वाटत राहते.
‘डोळ्यांत पुनःपुन्हा पाणी येत आहे’ अशा आशयाचे एक(मेव) गाणे चित्रपटात आहे. संगीत, अभिनय, वेशभूषा, संवाद अशा एकेक क्षेत्रात सरस ठरणारा निशिकांत कामत दिग्दर्शित ‘मुंबई मेरी जान’ अप्रतिम न ठरता तरच नवल
सी-२, ५०१,५०२, लोकमीलन, चांदिवली, अंधेरी (पू.), मुंबई ४०० ०७२.