संपादकीय

एकोणीसशे पन्नास-साठच्या दशकात वादविवेचनमाला नावाची एक ग्रंथमाला काही घरांमध्ये दिसत असे. जॉर्ज बर्नार्ड शॉचे अॅन इंटेलिजंट वुमन्स गाईड टु कॅपिटॅलिझम, सोशलिझम एट् सेटरा (नेमके नाव जरा वेगळेही असेल!) हे पुस्तकही इंग्रजी वाचणाऱ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात ओळखीचे असे. नंतर मात्र विनय हर्डीकरांच्या शब्दांत ‘सुमारांची सद्दी’ सुरू झाली. अभ्यास थांबला आणि अडाणी अतिसुलभीकरणे वापरात आली.
कॅपिटॅलिझम म्हणजे मुक्त बाजारपेठ किंवा पाशवी पिळवणूक, समाजवाद म्हणजे भोंगळ सद्भाव (मृणाल गोरे, डॉ लोहिया) किंवा बनेल अवसरवाद (अमरसिंग-मुलायमसिंग!), साम्यवाद म्हणजे श्रमिकांचा स्वर्ग किंवा आडमुठे लालभाई, अशी सुलभीकरणे आज वापरात आहेत. वापरणाऱ्यांमध्ये अशिक्षितही आहेत, खखढ-खखच-खअड मधील अत्युच्चशिक्षितही आहेत आणि अर्थशास्त्र-राज्यशास्त्र शिकलेलेही आहेत.
शेतीवर आधारित जीवनपद्धतीची जागा औद्योगिक पायावर उभ्या असलेल्या जीवनपद्धतीने घेतली. आज विकसित देश, पहिले जग वगैरे नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देशांत ही प्रक्रिया पूर्णत्वाजवळ गेली आहे. तेथे शेतीवर उपजीविका चालवणाऱ्यांची टक्केवारी एका आकड्याइतकी खाली गेली आहे. त्या समाजांचा इतका कमी भाग अन्नोत्पादनात असूनही ते देश अन्न सधन आहेत. भारत, चीन, ब्राझील, रशिया अशा देशांत ही प्रक्रिया जोम धरत आहे. औद्योगिकतेवर जगणारे वाढत आहेत, पण अन्नोत्पादनावर जगणाऱ्यांचे प्रमाण अजूनही मोठे आहे. बरेच आफ्रिकन देश, इतर जगातले काही देश, आजही औद्योगिकीकरणाच्या प्राथमिक अवस्थेत आहेत. त्यांच्यात उद्योगांवर जगणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. भांडवलवाद, समाजवाद (पोटभेद : साम्यवाद) ह्या विचारधारा, आयडिऑलजीज, पहिल्या जगात, आजच्या प्रस्थापित औद्योगिकीकृत देशांत घडल्या. शेतीची जागा उद्योगांनी घेताना त्या घडल्या. त्यांतही एकसंधता नव्हती व नाही. जेव्हा इतर देशांमध्ये उद्योगांचे महत्त्व वाढू लागले तेव्हा त्या देशांमध्येही या विचारधारा पोचल्या, व त्यांच्याही स्थानिक आवृत्त्या घडल्या. समाजांनी, माणसांनी बदलत्या परिस्थितीला बदलते प्रतिसाद देण्यातून त्या घडल्या. या कहाणीची रूपरेषा ‘एक क्रांती : दोन वाद’ नावाच्या एका लेखमालेतून आजचा सुधारक च्या वाचकांपुढे मांडायची आहे. या कहाणीवर प्रचंड लेखन झालेले आहे. आणि कोणताही लेख, कोणतेही पुस्तक, या प्रक्रियेची रूपरेषाच देऊ शकते. रूपरेषा म्हटले की सुलभीकरणही आलेच, याची जाणीव ठेवूनच लेख लिहिला आहे व वाचला जावा. आसु नेहेमीच चर्चेला सुरुवात करत असतो, अंतिम उत्तर देत नसतो, हे संपादक वारंवार नोंदतातच!
रूपरेषांमध्ये सुलभीकरण असले तरीही त्या उपयुक्त असतात. इंग्रजीत १९७०-८० च्या दशकात वेगवेगळ्या विचारवंतांच्या जीवन, कार्य व विचारांच्या रूपरेषा देणारी फाँटाना मॉडर्न मास्टर्स ही ग्रंथमाला होती. गेल्या आठदहा वर्षांत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन टु या नावाने कालखंड, वाद, विचारवंत वगैरेंच्या ओळखी करून देत आहे. मराठीत असे काही घडत असले तर ते माहीत नाही. तसे काही घडावे, असे मात्र तीव्रतेने वाटते.
लेखाच्या विषयावर उपलब्ध पुस्तकांची संख्या प्रचंड आहे. त्यांपैकी काही संदर्भग्रंथांची यादी सोबत देत आहोत. पण या संदर्भग्रंथांपुरतेच लेखाचे संदर्भ मर्यादित नाहीत.
(१) Lectures on the Industrial Revolution of the eighteenth Centurry in England, Arnold Toynbee, Longman, Green & Co. 1884-1928
(?) The Age of Empire, Eric Hobsbawm, Vintage, 1987 (3) A Very Short Introduction to Socialism, Michael Newman, Oxford, 2005/2007 (४) A Very Short Introduction to Capitalism, James Fulcher, Oxford, 2004/2006 (५) 20: 21 Vision, Bill Emmott, Penguin, 2003/2004 (६) Natural Capitalism, Hawken, Lovins & Lovins, Little, Brown, 1999.
वाचकांच्या सोईसाठी ही यादी अधूनमधून लेखांसोबत दिली जाईल.