एक क्रान्ती : दोन वाद (भाग १)

प्रस्तावना:
इसवी अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगातील बहुतांश माणसे शेती व पशुपालन ह्यांवर जगत असत. त्यांच्या जीवनपद्धतीचे वर्णन अन्नोत्पादक असे केले जाते. त्यामागील राजकीय-आर्थिक-सामाजिक व्यवस्थेचे वर्णन सामंती , फ्यूडल (feudal) असे केले जाते. अठराव्या शतकाच्या मध्यावर मात्र एक नवी जीवनपद्धती उद्भवली. आधी इंग्लंडात उद्भवलेली ही पद्धत पुढे युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका, अशी पसरत आज जगाच्या बहुतेक भागांपर्यंत पोचली आहे. आजही जगातली अनेक माणसे शुद्ध अन्नोत्पादक जीवनपद्धतीने जगतातच, पण बहुसंख्येचे बळ मात्र नव्या औद्योगिक जीवनपद्धतीने जगणाऱ्यांकडेच आहे.

औद्योगिक जीवनपद्धतीचा उद्भव औद्योगिक क्रांती, The Industrial Revolution, या आर्नल्ड टॉयन्बीने सुचवलेल्या नावाने ओळखला जातो. आजच्या जगातील देशादेशांमधले व प्रत्येक देशातील वेगवेगळ्या समाजांमधले फरक प्रामुख्याने त्या देशा-समाजांमधील औद्योगिकतेशी निगडित आहेत. अर्थातच देशादेशांमधील व्यवहाराबाबतचे प्रश्नही औद्योगिकतेकडे कितपत वाटचाल झाली आहे याच्याशी निगडित आहेत. एकाच देशातील वेगवेगळ्या समाजांची, समूहांची औद्योगिकतेकडील वाटचालही समप्रमाणात झालेली नाही, त्यामुळे अनेक देशांमधले अंतर्गत प्रश्नही औद्योगिकतेच्या प्रमाणांमुळे उद्भवलेले आहेत. औद्योगिकतेच्या उद्भवात आणि प्रसारात एक बळी गेला, तो म्हणजे सामंती व्यवस्थेचा. त्या व्यवस्थेची जागा घेणारी व्यवस्था म्हणजे भांडवलवादी, कॅपिटलिस्ट, Capitalist व्यवस्था.

या व्यवस्थेसोबतच या व्यवस्थेला सदोष मानणारा एक विचारप्रवाहही उद्भवला, त्याला ढोबळमानाने समाजवादी, सोशलिस्ट, डेलळरश्रळीीं विचारधारा म्हणतात. या विचारधारेचे समर्थक औद्योगिकीकरणाच्या क्रियेला, औद्योगिक जीवनशैलीला सुष्ट, चांगले मानतात पण ती जीवनशैली रुजवण्यात, वापरण्यात भांडवलवादी व्यवस्था अपयशी ठरणारच असे मानतात. ते औद्योगिकतेच्या वापरासाठी काही पर्याय सुचवतात. भांडवलवादी व्यवस्था व तिला पर्यायी अशी समाजवादी व्यवस्था यांचा मागोवा घेण्याचा एक प्रयत्न या लेखात करत आहे. यात ऐतिहासिक, वास्तविक घटनाही तपासाव्या लागतील, आणि तात्त्विक बाबीही तपासाव्या लागतील. सुरुवात करू ती मात्र औद्यगिक क्रांतीपासून.

सामंती व्यवस्था
शेती, पशुपालन यांच्यातून अन्नाचे उत्पादन होते. ही अन्नोत्पादनाची क्रिया सातत्याने, संततपणे, रोजच्या रोज अन्न देत नाही. पिके पेरावी लागतात. त्यांची निगा राखावी लागते. काही आठवड्यांच्या, महिन्यांच्या काळाने पिके हाती येतात. फळझाडे लावावी लागतात. त्यांची देखभाल करावी लागते. काही वर्षांनंतर ही झाडे विशिष्ट मोसमांत फळे देतात. गाई, बकऱ्या, मेंढ्या, डुकरे, कोंबड्या यांना काही वर्षे, महिने पोसावे लागते आणि मगच त्यांचा अन्न म्हणून वापर करता येतो. रोज दूध देणाऱ्या गाई, रोज अंडी देणाऱ्या कोंबड्या, बारमाही फळे देणाऱ्या (थोड्याशा) फळझाडांच्या जाती, असे अपवाद वगळता अन्नोत्पादन झटक्याझटक्याने होते. यातून प्रश्न उद्भवतो तो अन्नाच्या साठवणीचा आणि राखणीचा, वर्षांतून एकदोनदाच धान्य हाती येते, पण ते वर्षभर वापरावे लागते. शेळ्यामेंढ्या काही वर्षांनीच खाण्याजोग्या होतात, आणि इतर वेळी नुसत्याच सांभाळाव्या लागतात. जेव्हा धान्य, भाज्या, मांस उपलब्ध होते तेव्हापासून ते वापरले जाईपर्यंत कसे साठवावे, कसे राखून ठेवावे, हे प्रश्नच असतात. कीडमुंग्यांपासून, उंदराघुशींपासूनचे संरक्षण, हा तसा सोपा भाग. अशा साठवणीची-राखणीची तंत्रे माणसांनी प्राचीन काळापासून घडवलेली आहेत. यापेक्षा कठीण प्रश्न आहेत ते इतर माणसांपासून रक्षणाचे!

असे रक्षण करणारी एक रचना म्हणजे सामंती व्यवस्था. गावखेड्यांमध्ये शेतकरी, गुराखी अन्न उत्पन्न करतात. त्यांना सुतार, चांभार, कुंभार, लोहार असे आलुतेदार-बलुतेदार विशेष कौशल्ये पुरवतात. शेती-पशुपालनाची उत्पादने राखून ठेवायची जबाबदारी असते गावच्या पाटला वर किंवा सरदारा वर. जमीन वापराचे हक्क, धान्य व इतर उत्पदनांच्या वाटपाचे हक्क, यांची नोंद करतात कुलकर्णी. वाद-तंटे सोडवणे हा पुन्हा पाटलाचा अधिकार. कुलकर्णीच बरेचदा धर्मगुरू, पुरोहितही असतात. अशा गावांच्या समूहांवर जहागीरदार राज्य करतात, आणि अनेक जहागिरी सांभाळणारे, ते राजे लोक. कुलकर्णी-ग्रामपुरोहितांचे काम प्रत्येक श्रेणीतले धर्मगुरु करतात. सोबतच गावखेड्यांसारखी नगरे-महानगरेही श्रेणीने रचली-उभारली जातात. या जबाबदाऱ्यांचा मोबदला म्हणून सर्व टप्प्यांवरचे पाटील-जहागीरदार-राजे आणि कुलकर्णी-देशपुरोहित-धर्मगुरु उत्पन्नाचा वाटाही घेतात; आणि सत्ताही गाजवतात. ही एकूण व्यवस्था म्हणजे सामंती व्यवस्था.

इथे उत्पादन प्रामुख्याने स्वतःच्या वापरासाठी केले जाते. गावे आपली उत्पादने निर्यात करत नाहीत. करभाराच्या रूपाने धान्य, भाज्या, गाईगुरे नगरांकडे जातात, येवढेच. अगदी नगण्य प्रमाणात विशेष कौशल्ये आवश्यक असणाऱ्या उत्पादनांचा व्यापार होतो. मखमल, पैठण्या विणणारे महानगरांमध्येच भेटतात; आणि गावखेडी सुती कापड, लोकरी घोंगड्यांवर भागवतात. यामुळे नगरांमध्ये पेठा असतात व्यापार करणाऱ्या; आणि कसबे असतात कसब असलेल्यांच्या कार्यशाळा. गावखेड्यांमध्ये अशा (SEZ!) भूप्रदेशाची गरज नसते. राजकीय रचना सामाजिक रचनेला समांतर असते. लढाईची वेळ आल्यास राजे जहागिरदारांकडून सैन्य व सेवा मागतात, आणि जहागीरदार पाटलांकडून. गावांवर, तालुक्यांवर राज्य करण्याचे अधिकार अशा मदत करण्याच्या जबाबदारीसोबतच येतात. जहागिरदाराने सैन्य देण्यात कुचराई केली तर राजा जहागीर हिसकावून दुसऱ्याला देऊ शकतो. या व्यवस्थेचा उगम जरी पाटील, जहागिरदार, राजे, यांच्या शस्त्रबळात असला तरी तो स्थिरावतो मात्र जन्माधिष्ठित वर्गाच्या रूपात. राजाचा मुलगा, नातलग आपोआप राजेपदासाठी लायक मानला जातो. धर्मगुरूंची कुटुंबेही धर्माचा अर्थ लावण्यात सक्षम मानली जातात, आणि ती राजांच्या कुटुंबांना राजेपणासाठी नैतिक अधिष्ठान पुरवतात. भारतातल्या शासकवर्गांचे, पुरोहितवर्गांचे अपरिवर्तनीय अशा जातींमध्ये रूपांतर झाले. इतरत्र जन्माधिष्ठित या शब्दाचे महत्त्व इतके वाढले नाही पण ते होतेच. अगदी पहिल्या महायुद्धाच्या वेळी, इस १९१४ मध्ये युरोपातील लहानथोर राजे-सम्राट बहुशः एकमेकांचे नातलग होते. भारतात ग्वाल्हेर-कश्मीरपासून फुटकळ दिघी वगैरे संस्थानांचे राजे आजही आपापसांतच विवाह करतात. एकूणच सामंती व्यवस्थेत, प्रत्येकाचे सामाजिक स्थान, स्टेटस, याला अपार महत्त्व दिले जाते.

व्यापारी भांडवलवाद
पण या एकूण रचनेच्या कडे किनारीवर काही जास्त चळवळ्ये, धडपड्ये लोक असत. त्यांच्यापाशी शेतीचे किंवा इतर कसले कौशल्यही नसे, आणि सैनिक, राजे होण्याइतके बाहुबळही नसे. पण ते प्रवास करत. देशोदेशी भटकत. कोठे काय वस्तू मिळतात आणि कोठे त्या वस्तू लोकांना हव्या असतात, हे जोखत. मग एकीकडचे गरजेपेक्षा जास्त उत्पादन त्याचा अभाव असलेल्या जागी नेऊन त्या जागचे ज्यादा उत्पादन इतरत्र नेत. एक लक्षात घ्यावे की असे वस्तुव्यवहार शेती, सामंती व्यवस्था, यांच्या आधी शिकार-संकलनाच्या अवस्थेतही होत असत. बाणांच्या टोकांसाठी उत्तम अशा ऑब्सिडियन या गारगोटीचे तुकडे त्यांच्या मूळ स्थानांपासून शेकडो किलोमीटर दूरही सापडतात. विशिष्ट आकारांचे, रंगांचे शंखशिंपले व देखणे दगड असेच कैक शे किलोमीटर दूरवर पोचत. पण या व्यवहारावर उपजीविका चालवल्या जात नसत. वस्तूंना उत्पादनाच्या जागांपासून गरजेच्या जागांपर्यंत नेणे, हाच पोटापाण्याचा उद्योग असलेले लोक शेती पशुपालनासोबतच उद्भवले. त्यांना व्यापारी म्हटले जाते.

शेती-पशुपालन युरेशिया या दोन संलग्न खंडांमध्ये सुमारे इसपूर्व ५००० सालापासून सार्वत्रिक आहे. यात आफ्रिकेचा उत्तर किनाराही आला. आधी व्यापार फक्त काही कळीचे महत्त्व असलेले धातू, मसाले, शोभेच्या वस्तू, मद्ये यांपुरताच असे. हळूहळू कापड, धान्ये वगैरेही व्यापारी वस्तूंमध्ये धरली जाऊ लागली. पण तरीही दूरवरचा व्यापार वेळखाऊ आणि जोखमीचा असे. मार्को पोलो हा इस बाराव्या शतकातील प्रख्यात व्यापारी आपल्या काही नातलगांसोबत चीनला गेला, आणि तब्बल पंचवीस वर्षे तेथे राहूनच परतला! सिंदबादच्या सफरी काल्पनिक असल्या तरीही काही प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहेत. पण हळूहळू व्यापारातला साहसाचा भाग कमी होत गेला, आणि तोही एक सामान्य पेशा झाला. इस बाराव्या शतकात व्यापारी लोक माल विकत घेण्यासाठी इतरांचे पैसे वापरू लागले. असे पैसे देणारे अर्थातच त्याच्यातल्या नफ्याचा भाग मागून घेत. ही झाली भागीदारी, पार्टनरशिप काही भागीदार प्रत्यक्ष कामे करत, तर उरलेले केवळ भांडवल पुरवत. हे आधी इटलीतील व्हेनिस, जिनोआ वगैरे राज्यांत घडले. पुढे यातूनच विकसित झालेल्या सामूहिक भांडवल संस्था, जॉइंट स्टॉक कंपन्या युरोपभर पसरल्या. पेढ्या (बँका), हुंड्या (ड्राफ्ट्स, पे ऑर्डर्स), हमी (गॅरंटीज), कर्ज (लोन), ठेवी (डिपॉझिट्स), विमा (इन्शुअरन्स) असे सारे आज सवयीचे असलेले अर्थव्यवहाराचे तंत्रज्ञानही विकसित होत होते. इस १६०८ मध्ये अॅम्स्टरडॅमला शेअर बाजारही बांधला गेला.
या भांडवलाधिष्ठित व्यापाराला खरा जोम पुरवला तो इस चौदाव्या शतकातल्या ब्लॅक डेथ या प्लेगच्या साथीने. तीनच वर्षांत या साथीमुळे युरोपाची एकतृतीयांश प्रजा मारली गेली. अनेक गावांमध्ये शेते कसणारे उरले नाहीत. विणकर, सूत कातणारे उरले नाहीत. धर्मगुरू, सरदार उरले नाहीत. हाहाःकार माजला. सामंती व्यवस्था मुळापासून हादरली. तिला नैतिक अधिष्ठान पुरवणारी धर्मसंस्था दुबळी झाली. पश्चिम युरोपात कॅथलिक व पूर्व युरोपात ग्रीक ऑर्थोडॉक्स हे दोन प्रमुख पंथ होते. आता दोन्हींना अंशतः नाकारणारा प्रॉटेस्टंट पंथ उद्भवला. या पंथाला कुठेकुठे तीव्र विरोधही उपजला. अनेक ठिकाणी विरुद्ध मताच्या लोकांना छळून, हाकलून दिले गेले. इस सोळाव्या-सतराव्या शतकांमध्ये अशा निर्वासितांनी युरोपच्या प्रजेत बरीच सरमिसळ झाली. सतराव्या शतकापासून युरोपीय नाविक आशिया खंडाशी संपर्क साधू लागले. आशिया खंडातून मसाले, चहा, रेशीम यांची युरोपात मोठ्या प्रमाणावर आयात होऊ लागली. या व्यापारात प्रचंड फायद्याची शक्यता असे, तशीच संपूर्णपणे बुडण्याचीही. दोन वर्षांत दामदुप्पट, खरेदी किमतीच्या अठरावीस पटीने विक्री, असेही संदर्भ भेटतात आणि चार जहाजे पाठवली आणि ती बेपत्ता झाली, असेही! या धोक्यासोबतच स्पर्धाही उत्पन्न झाली. इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स, पुर्तुगाल, स्पेन, इटली, अनेक देशांना दर्यावर्दीपणाचा इतिहास होता. एकाला घबाड मिळाले की लगेच इतरही जण त्या क्षेत्रात उड्या घेत. स्पर्धा देशादेशांमध्येही असे, आणि एकाच देशातल्या व्यापाऱ्यांमध्येही. स्पर्धेने धोके तीव्र होतात. खरेदी किंमती वाढतात आणि विक्री किंमती घटतात. याने नफाही घटतो. भांडवल पुरवणारे व व्यापारी आपल्या धोकादायक काम करण्याचे डांगोरे पिटत असतानाही धोके व स्पर्धा कमी करण्यासाठी धडपडत असत व आजही धडपडत असतात. यातून भांडवलसघन व्यापाराचे एक वेगळे अंगही घडते साठेबाजी व सट्टेबाजीचे. सतराव्या शतकातले अॅम्स्टरडॅमचे डच व्यापारी स्पर्धा टाळणे, साठेबाजी, सट्टेबाजी यात तज्ज्ञ होते. हॉलंडची दहाबारा वर्षांची धान्याची गरज पूर्ण होईल येवढे साठे ते घडवत. मसाले, तांबे, साखर, अत्तरे, सोरा (सुरुंगाच्या दारूचा एक महत्त्वाचा घटक) वगैरेंच्या व्यापारातही त्यांचा एकाधिकार असे.

अर्थातच यासाठी प्रचंड भांडवलाची गरज असे. पंधराव्या ते अठराव्या शतकामध्ये युरोपभर वेगवेगळ्या देशांचे व्यापारी संघटना बांधून, व्यापारी संस्थांचे समभाग विकून, भांडवल उभे करत व्यापाराचे महत्त्व वाढवत होते. या काळाला व्यापारी भांडवलवादाचा काळ असे म्हणता येईल; मर्कंटाइल कॅपिटॅलिझम, Mercantile Capitalism चा काळ. चौदाव्या ते अठराव्या शतकांत प्रत्यक्ष व्यापार-वाहतूक करणाऱ्यांपेक्षा भांडवल पुरवणारे जास्त महत्त्वाचे होत गेले. कोण असत, हे भांडवलदार? प्रॉटेस्टंट पंथ काटकसर आणि धनसंचयावर भर देत असे. इंग्लंडात व इतरत्र ब्लॅक डेथ ने मेलेल्यांच्या जमिनी गाव-सरदाराच्या मालकीच्या होत असत. पगारदारीने कामगार ठेवून या जमिनी मालकांना श्रीमंत करत. शुद्ध सामंती व्यवस्थेतले लॉर्ड-जहागिरदार आता मोठे जमीनदारही होऊ लागले. जमीनमालकी पैसा मिळवून देते हे लक्षात आल्यावर गावातील शेतीखाली नसलेली जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरू झाली. ही एन्क्लोजर प्रक्रिया, जमीन-बंदिस्तीची प्रक्रिया निर्यातवाढीबरोबर आली, आणि शेतीतली गुंतवणूक वाढवत गेली. शेतीतंत्रे सुधारू लागली. सरदार-सामंत अधिकच श्रीमंत होत गेले.

या सर्व काळात, चौदाव्या ते अठराव्या शतकांत, देश, राष्ट्र या संस्था आजच्याइतक्या रेखीव, विरचित रूपात अस्तित्वात नव्हत्या. आजचे ग्रेट ब्रिटन तेव्हा इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड, अशा राज्यांत विभागलेले होते. इतर युरोपभरही आजच्या राष्ट्रांच्या सीमांमध्ये डझनावारी लहान राज्ये असत. प्रत्येक राज्य व्यापार व त्यापासून मिळणाऱ्या महसुलासाठी वेगवेगळी प्रलोभने देत असे. व्यापारी नफा कमावण्यासाठी या लहानखुऱ्या राज्यांमधील व्यापारात लवचीकपणा येत असे, व नफा वाढत असे. नगरराष्ट्र, प्रॉटेस्टंट विचार, शेतीसुधार अशा घटकांचे जे मिश्रण पश्चिम युरोपात घडले ते इतरत्र घडले नाही. यामुळे दूरदूर पसरलेले व्यापारी जाळे जगभर पोचले, पण केंद्रस्थान मात्र युरोपातच राहिले. यातून व्यापारी भांडवलवाद विकसित व प्रस्थापित झाला.

भांडवली उत्पादन
पंधराव्या शतकापासून मध्य युरोपात धातूंसाठीचे खनिकर्म भांडवली तत्त्वावर होत असे. जमिनी विकत घेऊन, कामगारांना नोकरीस ठेवून, राजांना राजस्व देऊन खनिजांपासून धातू शुद्ध करण्याचे काम भांडवलदार करत असत. याच्याही आधी, अगदी तेराव्या शतकापासून महागडी वस्त्रे प्रामुख्याने भांडवलदारांच्या प्रयत्नांनी विणली व विकली जात. साधा वस्त्रोद्योग मात्र अगदी अठराव्या शतकापर्यंत सूत कातणारे व विणकर यांच्या अखत्यारीत होत असे. महागडी वस्त्रे विणण्याचे सामान मात्र शुद्ध पैसेवाले विकत घेत, व कलाकारांकडून कापड विणवून घेत. हळूहळू ही पद्धत साध्या कापडांमध्येही पसरू लागली. व्यापारी सूत विकत घेत व विणकरांना पुरवत. नंतर ते कापड विकत घेऊन ग्राहकांना पुरवत. ही पद्धत इंग्लंडात पुटिंग आऊट , putting out या नावाने ओळखली जाई. इस १४१२ मध्ये कव्हेंट्री या गावात विणकरांनी पुटिंग आऊट व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीविरुद्ध संप केल्याची नोंद आहे. इथे भांडवलवादाच्या स्वरूपाचे एक महत्त्वाचे अंग जाणवते. खाणकामगार श्रम देतो. धातू शुद्ध करणारा विशेष ज्ञान व श्रम दोन्ही पुरवतो. साधी कापडे विणणारा, सूत कातणारा साधी कौशल्ये व श्रम देतो. मखमल-किनखाप (पैठण्या-पटोला) विणणारे विशेष कौशल्ये पुरवतात. नफा मात्र भांडवल पुरवणारा कमावतो! कौशल्ये, श्रम, यांचे मूल्य कुठे कमी असते; तर कुठे काय खपते, कुठे काय मिळते हे माहीत असण्याचे मूल्य जास्त असते. श्रमिक, कुशल श्रमिक, यांना आपल्या मेहेनतीतून, कसबातून आपण कमावतो त्यापेक्षा कैकपट कमावणारा आपल्याला पिळून घेतो, असे वाटू लागते.
याच्याविरोधात श्रमिकांनी, कुशल कामगारांनी एकत्रित होऊन आपले महत्त्व वाढवून घेण्याचे प्रयत्नही पूर्वीपासून होत आले आहेत.

सोळाव्या शतकात कुशल कामगार सोसायट्या घडवू लागले. सतराव्या शतकात या संघटनांना कॉम्बिनेशन्स म्हटले जाऊ लागले. सतराव्या शतकापासून आज ओळखीचा असलेला यूनियन्स हा शब्द वापरात आला. या संघटनांचे मुख्य अस्त्र होते संप हे काम न करण्याचे. या अस्त्राचे महत्त्व अर्थातच कौशल्याच्या पातळीनुसार ठरते. कौशल्य जास्त तर संपाचा परिणाम जास्त. वस्त्रोद्योगातील कव्हेंट्रीच्या संपाचा उल्लेख मागे आला आहेच. इस १५३९ साली लायॉन्स, फ्रान्स येथील छपाई कामगार संपावर गेले. फ्रान्समध्येच पॅरिसमधले छपाईकामगार इस १५४१ पासून इस १५७१ पर्यंत अधूनमधून संप करत होते.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात श्रमिक आणि भांडवलदार यांच्यातील वादांना एक नवे, मोठे, वेगळे परिमाण लाभले. त्या वेळेपर्यंत सर्व उत्पादनासाठी मुख्यतः मानवी ऊर्जा, पाशवी (पशुंची) ऊर्जा वापरली जात असे. बैल-रेडे-घोडे जमीन नांगरत. माणसे पेरणी-कापणी करत. माणसे कापूस वेचत, सूत कातत, विणत. घोडे-बैल खाणींमधून खनिजे उपसत, आणि माणसे जमिनीतून खनिजे काढत. खनिजांपासून चुना, धातू, कोळसा काढायला माणसांची ऊर्जा वापरली जाई. कुठेकुठे वाहते पाणी, वाहते वारे यांच्या ऊर्जेचा वापर केला जाई, पण हे अपवाद होते. मानवी ऊर्जा, पाशवी ऊर्जा, हेच मुख्य ऊर्जास्रोत असत. पण ग्रीकांचे, इसपूर्व पहिल्या शतकापासून इंधन जाळून, पाण्याची वाफ करून एक नवा ऊर्जास्रोत घडवायचे प्रयत्न चालू होते. इस १७६९ मध्ये पहिले काहीसे(च) कार्यक्षम वाफेचे इंजिन इंग्लंडात घडवले गेले. फारच थोड्या काळात लाकडे, कोळसा जाळून मिळणारी ऊर्जा लोकप्रिय झाली.

आता शेती-पशुपालनावर बेतलेले समाज मुळापासून बदलू लागले. वाफेची एंजिने अगदी कमी मानवी श्रमांमधून प्रचंड ऊर्जा उत्पन्न करून ती उत्पादन व वाहतुकीला जुंपू लागली. नांगरटीपासून सागरी व जमिनीवरील वाहतुकीपर्यंत सुचेल त्या कामांना वाफेची एंजिने जुंपली गेली. चरखे-माग चालवणारी माणसे घरच्याघरी कुटीरोद्योग करत. आता डझनावारी चात्या-माग चालवणारे कारखाने शेकडो माणसांना एकाच जागी आणून कामे करू लागले. धातुकामात वाफेच्या एंजिनांवर चालणाऱ्या भात्यांचा वापर सुरू होऊन धातूंचे उत्पादन वाढले. एकूण औद्योगिक उत्पादनांचे प्रमाण, स्केल हे वाढू लागले. श्रमांचा एकूण उत्पादनातला सहभाग कमी झाला.

शेतीवर आधारित सामंती व्यवस्थेत मूठभर राजेरजवाडे वगळता सर्व माणसे समान असत. नैसर्गिक आपत्तीची वर्षे वगळता बहुतांश समाज खाऊन पिऊन सुखी असे. गरजेपेक्षा फार कमी उत्पादन होणे (तेजी) किंवा फार जास्त उत्पादन होणे (मंदी) सहज शक्य नसे. वस्तूंच्या किंमती, थोड्याशा असलेल्या पगारदारांची वेतने, सारे जवळपास स्थिर असे. अन्नोत्पादकच समाजात बहुसंख्य असल्याने साठेबाजी नगण्य असे. वस्तुविनिमय, बार्टर, हाच व्यवहार असल्याने चलन, भांडवल, पैसे, यांना फारसे महत्त्व नसे. समाजातल्या सर्व व्यक्तींचे हक्क आणि जबाबदाऱ्या हे दीर्घ परंपरेतून घडलेल्या जाळ्याने ठरवून दिलेले असत. या अर्थव्यवस्थेला तिच्या सामाजिक अंगावरून सामाजिक स्थान, स्टेटस, म्हटले जाई.

आता अन्नोत्पादनात गुंतलेल्यांचे समाजातील प्रमाण घटले. शेती-पशुपालनाने उपजीविका भागणे अशक्य होऊन औद्योगिक उत्पादनांमध्ये ढकललेल्यांचे प्रमाण वाढले. पण यात थोडीशीच माणसे गुंतत, कारण वाफेची एंजिने हाच मोठा ऊर्जास्रोत झाला होता. औद्योगिक असो की शेतीचे उत्पादन विकत घेणारे मात्र मुख्यतः औद्योगिक कामगारच असत. त्यांची वस्तू विकत घेण्याची क्षमता पगारांमुळे मर्यादित असे. शेतकरी ज्यादाचे उत्पादन विकून पैसे कमावत, पण स्वतःसाठी शेती करणारे संख्येने घटलेले होते. बहुतेक शेती जमीनदारांच्या मालकीची, पण पगारी नोकरांकरवी केली जाणारी असे. आणि पगार कमी ठेवणे हे भांडवलदार-मालकांचे मुख्य सूत्र असे. औद्योगिक कामगार, शेतीवरील पगारदार यांची क्रयशक्ती वाढू देणे भांडवली मालक, जमीनदार यांच्या हिताचे नसे, कारण अशी पगारवाढ नफा खाऊन टाकी, पण हेच कामगार-पगारदार उत्पादनांचे मुख्य ग्राहकही असल्याने पगार (क्रयशक्ती) फार दाबून ठेवणेही शक्य नसे. या दोन परस्परविरोधी गरजांचा समन्वय फारदा कामगारांना जेमतेम जगते ठेवूनच साध्य होत असे. इस १७७६मध्ये अमेरिका (यूएसे) इंग्लंडपासून फुटून निघाली. लवकरच इस १७८९ मध्ये फ्रान्समध्ये राज्यक्रान्ती होऊन अल्पजीवी प्रजासत्ताक, रिपब्लिक स्थापन झाले. काही काळ इंग्लंडही राज्यक्रांतीच्या कडेलोटाच्या स्थितीत होते. पण अमेरिका व फ्रान्समधील घटना औद्योगिकतेच्या उद्भवाशी निगडित नव्हत्या, तर राज्यकर्त्यांच्या असंवेदनशीलतेतून उपजल्या होत्या. अमेरिका या वसाहतीबाबत कठोर असलेले इंग्रज राज्यकर्ते स्वतःच्या देशात मात्र तुलनेने सौम्य होते. औद्योगिकता वाढू लागली आणि ही स्थिती बदलून अत्यंत गुंतागुंतीची झाली.

राजा नामधारी होता. राज्यकर्ता वर्ग जुन्या जमीनदारांमधून घडलेला, आता भांडवली उत्पादनात शिरू लागलेला होता. हाऊस ऑफ लॉर्ड्स तर त्यांचेच होते, पण हाऊस ऑफ कॉमन्स मधील सांसदही लॉर्ड्सच नेमत असत. यांच्या खाली दोन कामगारवर्ग होते शेतीवरचे पगारदार, ऊर्फ कॉटेजर्स; आणि कारखान्यांमधले श्रमिक. शेतीवरच्या श्रमिकांना खाण्यापिण्याची ददात नसे. औद्योगिक कामगारांना मात्र ना कामगार-कायद्यांचे संरक्षण होते, ना चांगल्या पगाराचे. आणि अगदी तळाशी होता वाढता बेकारांचा वर्ग.

औद्योगिक तंत्रज्ञानातील क्रांतीला भांडवलाधिष्ठित उत्पादनाला जुंपले गेले, आणि जगभरातील विषमता वाढू लागली. एक अंदाज असा आहे की औद्योगिक क्रांतीआधी जगातील गरीब देश आणि श्रीमंत देश यांच्या दरडोई सरासरी उत्पन्नातले प्रमाण जेमतेम १.८ इतके होते. म्हणजे श्रीमंत देश सरासरीने गरीब देशांच्या फक्त पावणेदोनपट श्रीमंत होते. तुलनेसाठी २००५ सालचे दरडोई सरासरी ठोक राष्ट्रीय उत्पन्न पाहिले तर केनियाच्या १,१७० डॉलर्सची तुलना अमेरिकेच्या ४१,९५० डॉलर्सशी करावी लागते ३५ पट. आणि हे आकडे समान क्रयशक्तीचे, पर्चेसिंग पावर पॅरिटीचे आहेत.
(संदर्भ : स्टॅटिस्टिकल आऊटलाईन ऑफ इंडिया, २००६-०७; टाटा सर्व्हिसेस लि.)

बरे, हे सरासरी दरडोई प्रमाण आहे. देशांतर्गत विषमतेचे मोजमाप येथे नाही. इंग्लंडात देशांतर्गत विषमतेचे परिणाम औद्योगिक क्रांतीने तीव्रतर केले. इस १८१२-१८१८ या काळात यंत्रांना दुष्ट मानून ती फोडणारी लडाइट (Luddite) चळवळ उत्पन्न झाली व मोडून काढली गेली. इस १८१९ मध्ये मँचेस्टरच्या वस्त्रोद्योग कामगारांनी सर्वांना मतदानाचा हक्क मागितला, तेव्हा त्या सभेवर घोडदळाने हल्ला केला. ही घटना पीटर्ल (Peterloo) या नावाने ओळखली जाते; वॉटलूंच्या महासंग्रामाशी तुल्यबल !

याआधीही इंग्लंडात गरिबी होती, पण ती बहुतेककरून अपंगांची गरिबी होती. आता सुदृढ, सक्षमांमध्ये बेकारीमुळे उद्भवलेली तीव्र गरिबी दिसू लागली. इंग्लंडात चौदाव्या शतकापासून गरिबांच्या रक्षणासाठी पुअर लॉ उर्फ गरीब कायदा होता. प्रत्यक्षात तो अत्यंत असामान्य परिस्थितीतच सरकार गरीब व्यक्तींना मदत करेल, असे सांगत असे. इतर साऱ्या सामान्य परिस्थितीत गरिबांना मदत करण्याची जबाबदारी गावकरी व चर्च यांच्यावरच असे. आता हे पुरेनासे झाले.

बहुसंख्यांचे सर्वाधिक भले
प्रॉटेस्टंट विचार, नगरराष्ट्रांमुळे आलेला लवचीकपणा, शेतीचे एकत्रीकरण आणि तंत्रसुधार, अशा घटकांच्या युरोपीय मिश्रणातून व्यापारी भांडवलदार रुजला होता. आता इंग्लंडमधील काही वैशिष्ट्यांमुळे गरिबी हटाव चा एक विचार तेथे उद्भवला.

जेरेमी बेंथम (इस १७४८-१८३२) आणि जॉन स्टुअर्ट मिल् (इस१८०६-१८७३) यांनी एक नीतिविचार मांडला, की सर्वाधिक लोकांचे सर्वाधिक भले करणारा पर्याय इतर पर्यायांऐवजी निवडणे, ही नीती आहे. असे न करणे, ही अनीती आहे. हे the greatest good of the greatest number तत्त्व अनेक धारणांवर बेतलेले आहे. एक म्हणजे इथे ऐहिक, भौतिक भल्याचाच केवळ विचार आहे. दुसरे म्हणजे संख्येला महत्त्व देण्यातून एक सर्व माणसे सारख्याच महत्त्वाची माना, असा समतेचा विचार आहे. आणि असे बहुसंख्यांचे भले करण्याची जबाबदारी सर्वांवर आहे, म्हणजे इथे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने इतर सर्वांचा विचार करावा, हा बंधुभावाचा आदेशही आहे. बेंथम-मिल् विचारधारा आज उपयोगितावाद, युटिलिटेरिअॅनिझम, Utilitarianism या नावाने ओळखली जाते.सामंती व्यवस्था कोलमडून तिची जागा औद्योगिक जीवनशैली घेऊ लागली. समाजाच्या अर्थव्यवहाराचा पाया बदलला. आर्नल्ड टॉयन्बी हा औद्योगिक क्रांती या शब्दप्रयोगाचा जनक आणि त्या प्रक्रियेचा प्रथम विश्लेषक म्हणतो, “विकासाचा खरा मार्ग आधी सामाजिक स्थानाकडून कराराकडे जातो, आणि नंतर कराराकडून एका नव्या प्रकाराच्या सामाजिक स्थानाकडे जातो, जे कायद्याने ठरते. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर हा मार्ग अनियंत्रित कराराकडून नियंत्रित कराराकडे जातो.’ करारांना महत्त्व याने जन्माधिष्ठित स्टेटसला महत्त्व देणाऱ्या विचारधारेची जागा घेतली हेच टॉय्न्बी सांगत आहे.

खरे तर सामंती व्यवस्था फार काही अनियंत्रित नसे. त्या व्यवस्थेत सामाजिक स्थानाचा गैरवापर करणारे राजेरजवाडे व शासन-सामंत उलथवले जात. दुसरीकडे, कायद्याने मान्यता दिलेले करार फार काही नियंत्रित नसत. तरीही टॉयन्बीच्या म्हणण्यात तथ्य आहे.
बेंथम-मिलना अर्थव्यवस्थेचा विचार करताना त्यात नीतिविचार आणण्याची गरज भासली. पण असे करणारे ते पहिले विचारवंत नाहीत. भांडवली उत्पादनपद्धतीचा औपचारिक पुरस्कार करणारा पहिला विचारवंत होता अॅडम स्मिथ (१७२३-१७९०). याचे द वेल्थ ऑफ नेशन्स हे १७७६ साली प्रकाशित झालेले पुस्तक भांडवलवादाचा आदिग्रंथ मानले जाते. विशेषतः १७७६ सालीच अमेरिका इंग्लंडपासून स्वतंत्र झाल्याने अमेरिकनांना अॅडम स्मिथचे नाव घेताच कानाच्या पाळ्यांना हात लावण्याची इच्छा होते! पण स्मिथनेही द वेल्थ ऑफ नेशन्स लिहिण्याआधी आपल्या क्रियांपासून इतरांना नुकसान होऊ न देण्याबद्दलचे पुस्तक लिहिले होते (Theory of Moral Sentiments १७५९). स्मिथनंतर हा विचार काहीसा मागे पडला. तरीही लोकसंख्यावाढीच्या काही शंकास्पद कल्पनांमुळे थॉमस माल्थस (१७६६-१८३४) हा लोकांना नीतीने वागण्याचे आवाहन करताना दिसतो.

या पार्श्वभूमीवर मिलचा विचार पाहिल्यास तो अर्थव्यवहाराच्या संदर्भात पूर्वसूरींच्या विचारांमध्ये सांधेजोड करत भांडवली उत्पादनातून अपरिहार्यपणे उद्भवणारी विषमता कमी करायला धडपडत आहे, हे लक्षात येते.

‘मुक्त’ बाजारपेठ
स्मिथने त्याचे प्रसिद्ध पुस्तक लिहिले त्यावेळी वाफेची ऊर्जा उत्पादनाला जुंपली गेली नव्हती. व्यापारी लोक उत्पादनात शिरू लागले होते. त्यांची मुख्य क्षमता होती गुंतवणूक करू शकण्याची, किंवा भांडवलाची. स्मिथच्या आकलनानुसार हा भांडवलदारवर्ग कामगारांची वेतने देऊन वस्तू घडवून विकण्यासाठी झटणारा होता. कामगार आपले श्रम विकून उपजीविका चालवणारे होते आणि व्यापाऱ्यांची, भांडवलदारांची उत्पादने विकत घेणारेही होते. स्मिथच्यामते बाजारपेठ ही यंत्रणा कामगार, उत्पादक आणि ग्राहक यांचा समन्वय घडवून आणते, आणि कामगार व भांडवल या दोघांनाही पुरेसे उत्पन्न देत समाजाला कार्यक्षमही बनवते आणि उत्पन्नाचे न्याय्य वितरणही करते. सर्व व्यक्तींनी आपापले स्वार्थ जपण्यातून समाजाचे भले होते. या यंत्रणेसाठी स्मिथने अदृश्य हात , द इन्व्हिजिबल हँड, हा शब्दप्रयोग वापरला. मागणी, पुरवठा, किंमती, सर्वांचे स्वार्थ या साऱ्यांचा मेळ आपोआप घालणारा बाजारपेठेमागचा हा अदृश्य हात ! जरी आज दोन अडीच शतकानंतर त्या शब्दप्रयोगाचा वापर गांभीर्याने केला जात नसला तरी ती कल्पना मात्र अनेकांच्या मनांत रुजलेली आहे.

स्मिथची बाजारपेठेची कल्पना स्वतः काम करणाऱ्या, फारतर काही भागीदारांना सोबत घेऊन काम करणाऱ्या भांडवलदारांवर बेतलेली होती. बाजारपेठेचे, मागणी-पुरवठ्याचे, किंमतींचे संपूर्ण ज्ञान असलेले भांडवलदार प्रत्येक निर्णय निव्वळ व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी घेत असतील तरच अदृश्य हात काम करतो; असे स्मिथचे म्हणणे होते. व्यापार-व्यवहारातले धोके पत्करत, स्पर्धेला सामोरे जात, नफा अधिकतम करण्यासाठीच भांडवल वापरत काम करणारी ही आदर्श बाजारपेठ होती. आणि वर इतरांना त्रास न देणारा नीतिविचार सर्व भांडवलदारांना मान्य होऊनही स्मिथला हवे होते.

प्रत्यक्षात यातल्या कोणत्याही अटी कधीच पूर्ण होत नाहीत! स्मिथच्या काळाआधीच सामूहिक भांडवल संस्था, जॉइंट स्टॉक कंपन्या घडल्या होत्या. पुढे भागधारकांना संरक्षण देणाऱ्या मर्यादित जबाबदारीच्या, लिमिटेड लाएबिलिटी कंपन्यांनी धोके कमी करण्याला कायद्यांत बसवले. आता कंपन्यांची मालकी आणि कंपन्या चालवणे, व्यवस्थापन करणे यांची फारकत झाली. अॅडम स्मिथला अपेक्षित स्वतः कंपनी चालवणारा मालक किंवा भागीदार ही कल्पना कालबाह्य झाली. व्यवस्थापक आपले स्थान टिकवायला आवश्यक तेवढा नफा मालकांना देऊन उरलेला स्वतःच्या पगारांमध्ये व सुखसोईंमध्ये रिचवू लागले. व्यापारी धोके, स्पर्धेतून उद्भवणारे धोके, ना मालकांना हवे असतात, ना व्यवस्थापकांना. यामुळे स्पर्धकांशी संगनमत, कंपन्यांचे एकत्रीकरण, स्पर्धक कंपनी विकत घेणे, (कार्टेलायझेशन, मर्जर्स आणि अॅक्वझिशन्स) असे प्रकार सुरू झाले. साठेबाजी, सट्टेबाजी यांतून होणारे नफे सामान्य उत्पादन व व्यापारातून होणाऱ्या नफ्यांपेक्षा बिनधोक व प्रमाणाने जास्त असल्याने भांडवलदार उत्पादक किंवा व्यापारी पर्यायांऐवजी साठेबाजी-सट्टेबाजीकडे वळू लागले.

स्पर्धक-ग्राहकांशी होणारे व्यवहार असे आदर्शापासून दूर जात असताना कामगारांशी होणारे व्यवहारही अनियंत्रित होत होते. बारा ते सोळा तास काम करावे लागणे व त्यातून जेमतेम उपजीविका भागणे, हे सामान्य, सार्वत्रिक होते. जराजराशा कारणाने पगार कापणे, कामाच्या जागा व यंत्रे अनारोग्यदायी किंवा थेट धोकादायक असणे, हेही सार्वत्रिक होते. स्त्रिया, अल्पवयीन मुले, यांना ही अशाच स्थितीत काम करावे लागे, हे विशेष. १८३८ साली इंग्लंडात पहिला बरा, मानवी मूल्यांना महत्त्व देणारा फॅक्टरी अॅक्ट अंमलात आला. त्याआधी मात्र कामगारांची पिळवणूक, हा भांडवलदारीचा अविभाज्य भाग असे. बेकारी हाच पर्याय असल्याने कामगार ही पिळवणूक मान्य करत, पण तरीही अपवाद उद्भवत असत. संप, चळवळी, हिंसा सर्रास उद्भवत. कामगारांना यूनियन्स घडवणे, संघटित होणे आवश्यक वाटू लागले, सोबतच भांडवलदारांच्या संघटनाही घडू लागल्या. सुमारे इस १८३३ च्या फॅक्टरी अॅक्टपर्यंतचा काळ हा तीव्र संघर्षाचा काळ होता. याआधी इंग्लंडात इस १८०२ मध्ये काही फॅक्टरी अॅक्ट्स घडवले गेले होते, पण ते परिणामकारक ठरले नाहीत. आणि इस १८३३च्या फॅक्टरी अॅक्टनेही इंग्लंडातल्या कामगारांना काही संरक्षण दिले तरी एकूण भांडवलदारावरील बंधने मात्र सातत्याने, संततपणे कमीच होत गेली.
उदाहरणार्थ, इंग्लंडात सोळाव्या शतकात काही कायदे घडवून पगार, अन्नपदार्थांच्या किंमती, त्यांची गुणवत्ता, वगैरेंचे नियंत्रण केले गेले. कुशल कामगारांनी नवशिक्ये उमेदवार ठेवण्याबाबतही कायदे केले गेले. इस १८१५ मध्ये हे कायदे रद्द केले गेले. इस १८४६ मध्ये इंग्लंडने धान्यावरील सीमाशुल्क रद्द केले. पुढे १८६० सालापर्यंत एकूणच आयातकर उठवले गेले. पण यात इंग्लंड खऱ्या अर्थाने बाजारपेठेला शासकीय नियंत्रणाबाहेर नेत होते असे मात्र नाही. हे स्पष्ट करण्यासाठी इंग्लंडचे इतर जगापासूनचे वेगळेपण तपासावे लागेल.

वाफेची इंजिने वापरण्यात इंग्लंड अग्रेसर होते. इंधनासाठीचा कोळसा आणि एंजिनासाठीचे लोखंड यांत इंग्लड श्रीमंत होते, हे याचे प्रमुख कारण. एकूणच औद्योगिकीकरणात इंग्लंडला यामुळे आघाडी गाठता आली, हेड-स्टार्ट मिळवता आला. यामुळेच इंग्लंडने शेतीकडे दुर्लक्ष केले. अठराव्या शतकाअखेरीस युरोपात चाळीसेक टक्के प्रजा अन्नोत्पादनात गुंतलेली असे, आणि इतर जगात हे प्रमाण सत्तरेक टक्के असे. इंग्लंडने मात्र शेतीवर जगणाऱ्यांचे प्रमाण अगदी सोळा टक्क्यांइतके खाली जाऊ दिले. यामुळे अन्नधान्याच्या आयातीला उत्तेजन देणे गरजेचे झाले, पण इंग्लंडेतर जगात अन्न स्वस्त असल्याने ही आयात कष्टप्रद नव्हती. इतर देश सीमाशुल्कामधून जे साध्य करत, ते इंग्लंड सागरी वाहतुकीबाबच्या नियमांमधून करत असे. इंग्लंडशी होणारा सर्व सागरी व्यापार केवळ इंग्रजी जहाजांमधूनच करावा लागे, मग ती आयात असो की निर्यात. यामुळे सीमाशुल्काबाबत उदार राहणे, शेती घटू देणे, हे सारे इंग्लंडला परवडत राहिले. औद्योगिक क्रांतीनंतरच्या शतकाभरात इंग्लंडने आंतरराष्ट्रीय व्यापारात सर्वांत मोठ्या आयात करणाऱ्या देशाचे स्थान कमावले व टिकवले. व्यापारासाठीची जहाजे आणि अर्थव्यवहार यांवर मात्र इंग्लंडने मजबूत पकड राखली. याने इंग्रज आरमार जगातील सर्वांत प्रबळ आरमार झाले, आणि द सिटी ऑफ लंडन ही जगाची आर्थिक राजधानी झाली. यंत्रे, कापड यांसोबतच इंग्लंडची मोठी निर्यात होती भांडवलाची आणि माणसांची!
खनिज संपत्ती, वाफेच्या इंजिनांचे जनक असणे, त्यासोबतच इंग्लंडात एक वेगळाही घटक होता प्रजेच्या एकजिनसीपणाचा, प्रजा होमोजीनियस असण्याचा. जरी या घटकाला अर्थशास्त्रीय महत्त्व देण्याचा प्रघात नसला तरी इंग्लंडने स्वतःच्या सीमांमध्ये बंधुभाव सर्वांत सक्षमपणे जोपासला, हे नाकारता येत नाही. विशेषतः भारतीय तुलनांमध्ये इंग्लंडमधील प्रजा स्वतःला मूलतः एक मानते, हे महत्त्वाचे ठरते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (इस १९३९-१९४५) जॉर्ज ऑर्वेल या प्रसिद्ध लेखकाने इंग्रजी समाजाचे वर्णन “चुकीची माणसे सत्तेत असलेले कुटुंब”, असे केले. ऑर्वेल इंग्लिश साम्राज्यवादाचा कट्टर विरोधक होता. युद्धकाळ वगळता चुकीची माणसे सत्तेत असण्यावर प्रखर टीका करणारा म्हणून तो विख्यात होता. युद्धकाळात मात्र तो सहजच कुटुंब असण्याकडे लक्ष वेधू लागला, तुलनाच करायची झाली तर पेशवाई बुडतेसमयी ब्राह्मण्याला विटून इंग्रजांना सामील झालेल्या महार रेजिमेंटचा विचार करा. इंग्लंडच्या बंधुभावाला आपण फुटीरतेनेच उत्तर दिले, हे जाणवेल.

१९, शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपूर ४४० ०१०