संपादकीय

मंदीची कहाणी The Grapes of Wrath
आर्थिक मंदी म्हणजे एखाद्या समाजाने केलेली उत्पादने विकत घेण्याइतकी क्रयशक्ती लोकांकडे उपलब्ध नसणे. यातून बेकारी वाढते. लोकांची क्रयशक्ती आणखीनच घटते आणि मंदी अधिकच तीव्र होते. अशी एक महामंदी, द ग्रेट डिप्रेशन, १९२९-३९ या काळात अमेरिकेला त्रासून गेली. अमेरिकेला उत्पादने पुरवणाऱ्या देशांनाही याची झळ लागली. या काळाचे उत्कृष्ट वर्णन जॉन स्टाइनबेकच्या द ग्रेप्स ऑफ ऍथ (The Grapes of Wrath, १९३९) या कादंबरीत भेटते. आज पुन्हा एकदा अमेरिका हे केंद्र असलेली जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या स्थितीजवळ आहे. जगाच्या बऱ्याच भागांत दोन हस्तक, एक मस्तक यांना काम मिळणार नाही, अशी धास्ती सर्व अर्थशास्त्रज्ञांना छळते आहे. यावेळी द ग्रेप्स ऑफ रॅथ ची पुन्हा ओळख करून घ्यायला हवी. १९२९ अखेरीला अमेरिकन शेअरबाजार कोसळला. अनेकांना वाटते की, यामुळे मंदी सुरू झाली, पण वास्तव वेगळे आहे. जॉन केनेथ गॅलब्रेथचे १९२९: द ग्रेट क्रॅश (१९५५) हे पुस्तक तपशिलात दाखवून देते, की शेअरबाजार कोसळणे हा परिणाम होता, कारण नव्हे. आधी मंदी होती आणि तिचा परिणाम म्हणून शेअरबाजार कोलमडला.
सुरुवात झाली अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागातील शेतीपासून. वर्षानुवर्षे कापूस नाहीतर मका यांपैकी एकच एक पीक घेतल्याने जमिनीचा कस पार उतरला. त्यातच काही वर्षे सलग पावसाने हुलकावणी दिली. जराशी वाऱ्याची झुळूक, चालणाऱ्याच्या पावलांची हालचाल, यांनीही कमरेएवढे उंच धुळीचे लोट उठू लागले. सगळे शेती-क्षेत्र डस्ट बोल, धुळीचे वाडगे बनले. स्टाइनबेक पहिल्या प्रकरणभर फक्त धुळीचे वर्णन करतो! नापिकी, नापिकीमुळे कर्जाची गरज, कर्जफेड न होणे, खंडाने जमिनी देणाऱ्या कंपन्या आणि बँकांनी जमिनी जप्त करणे, अशा क्रमाने अमेरिकन शेतकरी उद्ध्वस्त झाले. घरांमधले किडूकमिडूक मातीमोलाने विकून विस्थापितांचे लोंढे पश्चिमेकडे, कॅलिफोर्नियाकडे वाहू लागलेतेथील फळबागांमध्ये काम शोधायला. अपार अडचणींमधून वाट काढत कॅलिफोर्निया गाठला, तर एका माणसाच्या कामासाठी दहा-वीस माणसे तयार होती. मग बेकारांची पिळवणूक, भाकरीच्या तुकड्यासाठी कुत्र्यांनी भांडावे तशी बेकार जथ्यांची भांडणे. जरा जरी कोणी जीवनावश्यक मजुरीसाठी हट्ट केला, तर त्याला कॉमी (कम्युनिस्ट) लालभाई म्हणून पकडणे व मारणे. वाढती हलाखी, मोडणारी कुटुंबे. एका तीन पिढ्यांच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करून स्टाइनबेक ही कहाणी सांगतो, फुरसतीने, पाचशे-साडेपाचशे पाने व्यापत.
कुटुंबाबाहेरची पात्रेही आहेत. त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचा म्हणजे जॉन केसी (Casey), माजी धर्मगुरु, आता नुसताच जोड (Joad) कुटुंबाचा मित्र. त्याच्या आणि जोड कुटुंबाच्या संभाषणांमधून स्टाईनबेकची भूमिका स्पष्ट होते – “पापपुण्य, बरेवाईट असे काही नसते ४ फक्त लोकांच्या क्रिया असतात’, ही ननैतिक, नॉन-जजमेंटल भूमिका कधी टिकते, कधी मोडते. जाताजाता उल्लेख येतात, की नवसर्जन हा बव्हंशी एकेकट्या माणसाचा प्रांत आहे; पण राज्यकर्त्यांनी घाबरावे ते मात्र एक भाकरी वाटून घेणाऱ्या दोघा जणांना! अर्थात, ग्रेप्स ही कादंबरी आहे, तात्त्विक प्रबंध नाही. स्टाईनबेक माणूस आणि निसर्ग यांच्या संबंधावर प्रेमाने लिहितो, कारण त्याचे अभ्यासाचे क्षेत्र जीवशास्त्र हे होते. नांगरटीसाठी घोड्यांऐवजी ट्रॅक्टरांचा वापर होऊ लागण्याचे हे वर्णन पाहा –
घोडा काम संपवून तबेल्यात जातो तेव्हा जीवन आणि चैतन्य शिल्लक राहते, श्वासोच्छ्वास, ऊब, गवतावर टप्टप् करणारे खूर, गवत चावणाऱ्या दाढा, जिवंत कान आणि डोळे. तबेल्यात जीवनाची ऊब असते, ऊब आणि वास. पण ट्रॅक्टरचे एंजिन थांबले की ते ज्या खनिजांपासून बनले तितकेच मृत होते. त्यातली उष्णता जाते, प्रेतातून जीवनाची ऊब जावी, तशी. मग टिनाचे दरवाजे बंद होतात आणि ट्रॅक्टरवाला माणूस वीसेक मैल दूरच्या घरी जातो, गाडी चालवत. त्याने आठवड्याभरात, महिन्याभरात परतायलाच हवे असे नाही, कारण ट्रॅक्टर निर्जीव आहे. हे सोपेही आहे, आणि कार्यक्षमही. इतके सोपे आहे हे, की जमीन आणि तिची कास्त यांमधले आश्चर्य नाहीसे होते. आणि आश्चर्यासोबत जमिनीबाबतची समज आणि तिच्याशी असलेले सखोल नातेही संपते. कारण जमीन म्हणजे नत्र नव्हे, स्फुरदही नव्हे, कापसाच्या धाग्याची लांबी म्हणजेही जमीन नव्हे — यंत्रमानव निर्जीव ट्रॅक्टर चालवतो, अनोळखी, प्रेम नसलेल्या जमिनीवर, तेव्हा समज उरते ती रसायनशास्त्राची, मग तो स्वतःकडे, जमिनीकडे तुच्छतेने पाहू लागतो. टिनाची दारे बंद करून तो घरी जातो. ते घरही त्याची जमीन नसते.
हा आहे मार्क्सने वर्णन केलेला परात्मभाव, एलिअनेशन (Alienation)- म्हटला तर चैतन्यवादी, म्हटला तर जडवादी!
घोड्यांच्या नांगरांची जागा ट्रॅक्टर्सने घेणे. मोजकेच सामान घेऊन घरे सोडताना त्यागाव्या लागलेल्या वस्तूंसोबत वर्षांच्या, दशकांच्या, आयुष्यांच्या आठवणींचाही केला जाणारा त्याग. कफल्लकांची दिलदारी. भोवताली उपाशी मुलेबाळे असताना घशात अडकणारे घास, वरकरणी पिळवणूक करणाऱ्यांचीही व्यवस्थेने होणारी पिळवणूक. सारे तटस्थपणे नोंदत कादंबरी शेवटाकडे पोचते. गूळच्या दहा बारांच्या कुटुंबातले चार पाचच उरलेले असतातड्रङ्कनवरा पळून गेलेल्या गुलीच्या बाळंतपणात अडकलेले. बाळंतपण होते, पण बाळ मरते. पाऊसपाण्याने एक म्हाताराही तेथे आलेला असतो, उपासमारीने मरायला टेकलेला. बाळंत झालेल्या मुलीची आई तिला म्हाताऱ्याला अंगावर पाजायला सांगते आणि कादंबरी संपते.
१९३०-४० च्या दशकात स्टाइनबेकने तीन कादंबऱ्या लिहिल्या. इन डूबियस बॅटल ऑफ माईस अँड मेन, आणि ग्रेप्स. सोबतच वर्तमानपत्रांमध्ये लेखही लिहिले जात होते, जे पुढे द हार्वेस्ट जिप्सीज या नावाने प्रकाशित केले गेले. शेवटच्या स्तनपानाच्या दृश्याला बीभत्स ठरवून पुस्तकाची होळी करण्यात आली! पण लेखक-प्रकाशक खंबीर होते. ऑक्टोबर १९३८ मध्ये पुस्तक लिहिणे सुरू होते आणि १९३९ मार्चमध्ये प्रकाशनही झाले. आज तर पुस्तक लिहीत असतानाची स्टाइनबेकची रोजनिशीही अभ्यासकांना उपलब्ध आहे.
अमेरिकेतच नव्हे तर जगभरातल्या उदारमतवाद्यांना, डाव्यांना हे पुस्तक दैवतासारखे, iconic वाटते. पुस्तकाला ललित साहित्याचे पुलित्झर पारितोषिक मिळाले. १९४० साली जॉन फोर्डने दिग्दर्शित चित्रपटही निघाला. त्यातली हेनरी फाँडाची भूमिका अविस्मरणीय ठरली. आज पेंग्विन श्राव्य-पुस्तक या कंपनीने डिलन बेकर या ख्यातनाम नटाच्या आवाजातील ग्रेप्सचा बारा ध्वनिफितींचा संचही प्रकाशित केला आहे. १९६३ साली स्टाइनबेकला नोबेल पुरस्कार मिळण्यातही ग्रेप्सचे महत्त्व सर्वाधिक मानले जाते.
भारतात तालीम है अधुरी। मिलती नहीं मजुरी। ही स्थिती तर सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहे, असा सूर लावला जातो. पण ती स्थिती गेली काही वर्षे गंभीर, नव्हे, भीषण होत आहे. गुन्हेगारी, नक्षलवाद, अतिरेकी वागणूक, धार्मिक-पंथीय असहिष्णुता, दहशतवाद, या साऱ्यांना मंदी बळ पुरवत असते.
ग्रेप्स मधले कुटुंब अमेरिकन आहे. अडचणींवर मात करायला धडपडणाऱ्या परंपरेचे आहे. अपार दारिद्र्यातही सहजी पोलीस-हस्तक्षेप सहन न करणारे आहे. भारतात मात्र बहुसंख्य लोक अन्याय सहन करणारे, असह्य झाले तर आत्महत्या करणारे आहेत. पण गुन्हेगारी, मूलतत्त्ववाद, दहशतवाद या वृत्तीही नगण्य नाहीत. आपला समाज असा भक्ष्य आणि भक्षक यांच्यात वाटला जाऊ शकेल. भक्षक गुन्हेगारच नसतीलड्ढड्डतथाकथित नेतेही याच वर्गात मोडतील.
ताज-ओबेरॉय हल्ल्यानंतरचा एक एसेमेस आहे, ‘बोटीतून येणाऱ्यांना जवान मारतीलही, व्होटिंगमधून येणायांचे काय ?”
स्टाइनबेक माणसाने माणसाला धरून राहावे, असेच सांगतोड्डड्डकादंबरीभर. पण ते शहाणपण सुचण्याआधी नामदेव ढसाळच्या “जिकडे तिकडे वरखाली खालीवर मध्ये नरकच नरक उभारावेत…..’ ही स्थिती येऊ शकते.
आपण याबाबत आपल्या मुलाबाळांना, नातवंडा-पणतवंडांना काय सल्ला देणार ? [ह्या लेखाची संक्षिप्त आवृत्ती रविवार ४ जानेवारी २००९ च्या लोकसत्ता त प्रसिद्ध झाली होती.]