एका वैज्ञानिकाचा विवेकवाद

या संदर्भात फाईनमन या वैज्ञानिकाचे महत्त्वाचे वचन आठवणीतून उद्धृत करतो. “कुठल्याही वैज्ञानिक सिद्धान्ताच्या सत्यतेचा अंतिम निकष म्हणजे प्रत्यक्ष प्रायोगिक पडताळा. तुमचा सिद्धान्त कितीही तर्कसंगत व सुंदर असेल, पण जर त्याचे निष्कर्ष प्रायोगिक निरीक्षणांशी जुळत नसतील, तर तो सिद्धान्त चुकीचा आहे. मग तुमचे नाव काहीही असो, तुम्ही कितीही बुद्धिमान असा, तुम्हाला कितीही पारितोषिके मिळालेली असोत. तुमचा सिद्धान्त अनुभवांशी जुळत नसेल, तर तो निखळपणे असत्य आहे.’ केवळ विज्ञानातच नाही, तर कोणत्याही वास्तवाकडे बघताना ध्यानात ठेवावा, असा हा सावधगिरीचा इशारा आहे.
तत्त्वज्ञानाविषयी बोलायचे झाले, तर मी वेडेवाकडे वाचन बरेच केले. उदा. आकारिक तर्क, कांट, रसेल व पुढे कामू, नित्शे. तरी एकदोन कोर्स वगळता पद्धतशीर अभ्यास केला नाही. पण आयआयटीत असताना ज्ञानप्राप्तीची पद्धत म्हणून तत्त्वज्ञानाचा अभ्यास हळूहळू असमाधानकारक वाटू लागला. विज्ञानातून मिळणाऱ्या निश्चित व निर्णायक उत्तरांच्या तुलनेने तत्त्वज्ञानातील अनेक चर्चा बऱ्यापैकी निष्फळ वाटू लागल्या. उदाहरणार्थ त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० अंश असते, हे अलीकडच्या भूमितीतील विधान घ्या. हे विधान अनुभवपूर्व आहे की, अनुभवजन्य ? ते अनुभवपूर्व असेल तर विश्लेषक आहे का संश्लेषक ? आता हा कांटसारख्या तत्त्ववेत्त्याने उभा केलेला व तत्त्वज्ञानात शतकभर गाजलेला वाद. त्याचा निकाल लावणारे निर्णायक उत्तर खरे विज्ञानाकडून मिळते. सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानुसार तीव्र गुरुत्वाकर्षण असेल तिथे अवकाशकाल अधिक वक्र असतो व युक्लिडच्या भूमितीचे नियम लागू होत नाहीत. म्हणजे स्वाभाविकपणे, कुठल्या ठिकाणी किती प्रमाणात युक्लिडच्या भूमितीतील विधाने सत्य आहेत हे अनुभवाअंतीच ठरवले जाणार. त्यामुळे कांटचा मूळचा प्रश्नच बराचसा गैरलागू ठरतो. आपण जर एखाद्या कृष्णविवराजवळ उत्क्रांत झालो असतो तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज २०० अंश असते हे विधान आपल्याला स्वाभाविकच सत्य असे अनुभवपूर्व वाटले असते. याच न्यायाने संज्ञाशास्त्र, भाषाशास्त्र, मानसशास्त्र व समाजशास्त्रापासून नीतिशास्त्रापर्यंत विविध शाखांमधील अनेक मध्यवर्ती प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडून अधिक नेमकेपणाने मिळतील, असे मला वाटते.
याचा अर्थ उदाहरणार्थ “नैतिक वर्तन कसे” याचे दिग्दर्शन विज्ञानाकडून होईल, असे मला म्हणायचे नाही.
मात्र अमूर्त तत्त्वज्ञानापेक्षा उत्क्रांती, न्यूरोबायॉलॉजी व आपले भौतिक, जीव-रासायनिक जगाचे वैज्ञानिक आकलन ध्यानात घेऊन व त्या मर्यादांतच अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे अधिक उचित आहे असे मला वाटते. तत्त्वज्ञानातील अर्थाने मी साधारणपणे वास्तववादी व अनुभववादी आहे, असे म्हणू शकेन. विज्ञानाची पहिली आधारभूत निष्ठा (कोअर बिलीफ) म्हणजे “वास्तव अस्तित्वात असते, तसेच व्यक्तिनिरपेक्ष व वस्तुनिष्ठ सत्य अस्तित्वात असते’. दुसरी आधारभूत निष्ठा म्हणजे “इंद्रियगोचर अनुभव व सुसंगत तर्क यांच्या आधारे आपण या वास्तवाचे ज्ञान मिळवू शकतो.’ हे मी अर्थात ढोबळमानाने म्हणत आहे. नाहीतर आइन्स्टाइनने गंमतीने म्हटल्याप्रमाणे बहुतेक वैज्ञानिकांची वैचारिक भूमिका पद्धतशीर तत्त्वज्ञांना संधीसाधूपणाची वाटण्याचा संभव आहे. म्हणजे उदाहरणार्थ वरीलप्रमाणे अनुभववादी व वास्तववादी म्हटले, तरी विज्ञानातील अनेक मूलभूत संकल्पना या मानवी कल्पनाशक्तीचा मुक्त आविष्कार असतात, असे मानणारी ‘आदर्शवादी’ भूमिकाही एका मर्यादेपर्यंत खरी आहे. त्यामुळे यापलिकडे अधिक खोलात खल करणारी चिकित्सा मला फारशी फायदेशीर वाटत नाही. हा एक प्रैक्टिकल वा उपयुक्ततावादी दृष्टिकोण म्हणता येईल.
ज्ञानप्राप्तीची पद्धत म्हणून ही अनुभववादी, वास्तववादी किंवा थोडक्यात विज्ञानवादी भूमिका मी स्वीकारली व त्याला धरून स्वाभाविक जीवनाचा दृष्टिकोण म्हणून मी विवेकवाद स्वीकारला आहे. मला बुद्धिप्रामाण्यवाद किंवा इंग्रजीतील रॅशनॅलिझमपेक्षाही ‘विवेकवाद’ हा शब्द अधिक चांगला व अर्थपूर्ण वाटतो. विवेक म्हणजे केवळ बुद्धीचे प्रामाण्य नव्हे; त्यामध्ये भावना व नैतिकतेची जाणीवही अंतर्भूत आहे. म्हणजे मानवी भावना या शेवटी जीवरासायनिक प्रक्रियांचा वस्तुनिष्ठ परिणाम आहेत, हे खरे आहे; पण त्यांचे व्यक्तिनिष्ठ वास्तव व मानवी संदर्भ विवेकवाद नाकारत नाही. उदाहरणार्थ, हापूसच्या रसाळ आंब्याचे रासायनिक विश्लेषण कितीही केले, तरी स्वादाचा एक एकत्रित, आनंददायी मानवी अनुभव हा केवळ बुद्धीच्या निकषावर निश्चित होत नाही. त्यामुळे बुद्धीच्या प्रामाण्याबरोबर सौंदर्यजाणीव, प्रेम, सहानुभूती, करुणा, सत्याची चाड, न्याय या मानवी मूल्यांवर विवेकवाद आधारित आहे. मात्र या मूल्यांचे मूळ पारलौकिक तत्त्वात न शोधता भौतिक विश्वाच्या नियमांच्या चौकटीत उत्क्रांती व मानवी इतिहासाच्या संदर्भात शोधले पाहिजे, अशी विवेकवादी भूमिका आहे. अनुभव व तर्काची कठोर कसोटी लावण्याची विज्ञानाची, साम्यदर्शनाची जी रीत आहे, त्याबाबत विवेकवाद आग्रही आहे. त्या अनुषंगाने येणारा स्केप्टिसिझमही विवेकवादासाठी आवश्यक आहे. पण तरीही विवेकवाद म्हणजे
‘तर्ककर्कश बुद्धिप्रामाण्यवाद’ असा जो आरोप लावला जातो, तो गैरसमजुतीतून आलेला आहे. ही थोडी तात्त्विक चर्चा खोलात जाऊन करण्याचे एक कारण म्हणजे तू मला ‘देव’ या संकल्पनेबाबतची माझी भूमिका विचारली आहेस, म्हणून या प्रश्नाचे उत्तर वैयक्तिक व सार्वत्रिक अशा दोन पातळ्यांवर देता येईल. आधी माझ्या व्यक्तिगत निष्ठेविषयी बोलू. भौतिक विश्वाचे व जीवसृष्टीचे आपले जे वैज्ञानिक आकलन आहे, त्यानुसार जगन्नियन्त्या ईश्वराला त्यात काही स्थान आहे असे दिसत नाही. शिवाय वेगवेगळ्या मानवी संस्कृतीत व धर्मांत देवाची कल्पना अगदी पूर्णपणे भिन्न आढळते. त्यामुळे ‘देव’ ही एक वस्तुस्थिती असण्यापेक्षा ती एक मानवी सांस्कृतिक निर्मिती आहे, असेही निदर्शनास येते. त्यामुळे मी शुद्ध नास्तिक आहे. तात्त्विकदृष्ट्या अज्ञेयवादी भूमिकेचेही समर्थन करता येईल. पण कुणीतरी गंमतीने म्हटल्याप्रमाणे अज्ञेयवादी हा घाबरट नास्तिक असतो.
या संदर्भात विज्ञानातील एका महत्त्वाच्या संकल्पनेचा उल्लेख केला पाहिजे. विज्ञानातील कुठलेही वस्तुस्थिती निर्देशक विधान हे निखालस सत्य असू शकत नाही. उदाहरणार्थ ‘माझी उंची सहा फूट आहे’ हे विधान घ्या. प्रत्यक्ष मोजताना ती कधी पाच फूट अकरा इंच आढळेल, वा कधी सहा फूट एक इंच आढळेल. मी उंची अनेकवेळा मोजली, तर सहा फूट कमी-जास्त असे एक ‘डिस्ट्रिब्यूशन’ आपल्याला मिळेल. त्यामुळे कुठलेही मापन या अर्थाने ‘अॅप्रॉक्सिमेट’ असते. अधिक चांगली पट्टी वापरली तर या मापनातील ही त्रुटी मी कमी करू शकेन, पण पूर्णपणे त्रुटीविरहित मापन आपल्याला शक्य नाही. आइनस्टाइनच्या एका वचनानुसार “To the extent a statement refers to reality, it is not absolutely certain, and to the extent a statement is absolutely certain, it does not refer to reality!” उदाहरणार्थ, दोन अधिक दोन चार, हे शुद्ध अंकगणितातील विधान म्हणून निखालस सत्य आहे. मात्र दोन फूट दोरी अधिक दोन फूट दोरी म्हणजे चार फूट दोरी या विधानाची सत्यता तपासताना मात्र आपल्याला वर म्हटल्याप्रमाणे मापनातील त्रुटी लक्षात घ्यावी लागते. कुठल्याही सत्यवाचक विधानाची ही मर्यादा विज्ञानाने स्वतःहून स्वीकारली आहे.
मात्र या मदित विज्ञान खात्रीलायक व निश्चित विधाने करू शकते. म्हणजे ‘उद्या सूर्य उगवेल’ हे विधान शंभर टक्के खात्रीने आपण करू शकत नाही; पण यावर उदाहरणार्थ, रुपयाला कोटी या दराने पैज लावू शकतो. विज्ञानातील सर्व विधाने या संख्याशास्त्रीय दृष्टीने कमी-अधिक विश्वासार्ह असतात. हे सांगण्याचे प्रयोजन असे, की ईश्वराचे अस्तित्व किंवा फलज्योतिष, वास्तुशास्त्र वा परामानसशास्त्राची सत्यता हे आपल्या प्रत्यक्ष जीवनाला भिडणारे व चर्चेत असणारे विषय आहेत. त्याबाबत समाजमनात एक दृढ विश्वास खोलवर रुजलेला आहे. या पार्श्वभूमीवर याबाबतची वैज्ञानिक भूमिका काय आहे, हे नेमकेपणाने सांगणे गरजेचे वाटते. त्यासाठी निरीक्षणांवर आधारित वैज्ञानिक रीत काय आहे, याविषयी खोलात जाऊन बोलणे भाग आहे.
या संदर्भात अजून एका गोष्टीवर मला भर द्यावासा वाटतो. आधुनिक विज्ञान ही केवळ प्रयोगनिष्ठ निरीक्षणांची एक जंत्री नाही. तर अशा कोट्यवधी स्वतंत्र निरीक्षणांमधील परस्परसंबंध व कार्यकारणभाव उलगडून दाखवणारी ती एक व्यापक विचारव्यवस्था आहे. उदाहरणार्थ, ऊर्जेच्या अक्षयत्वाचा नियम हा लक्षावधी प्रयोगात अनेक दशके प्रत्यक्ष तपासून पाहिला आहे, हे तर खरेच; पण त्याचबरोबर क्वांटम सिद्धान्तामध्ये त्याला नोयूदरच्या प्रमेयाचा सखोल सैद्धान्तिक पाया आहे. भौतिक जगाचे वैज्ञानिक आकलन किती प्रगल्भ आहे, याची बऱ्याचदा पुरेशी कल्पना असत नाही. एक उपमा द्यायची झाली तर पृथ्वीविषयीचे आपले ज्ञान हजार वर्षांपूर्वी अगदीच मर्यादित होते. त्या तुलनेने आता आपण पृथ्वीचा कोपरा आणि कोपरा तपासून पाहिला आहे असे म्हणता येईल. उपग्रह, पाणबुड्या, गिर्यारोहण यांच्या निरीक्षणातून सुटलेला ‘अज्ञात भूप्रदेश’ असण्याची शक्यता आता जवळजवळ नाहीच.
भौतिक घडामोडी निश्चित करणाऱ्या नियमांचे आपले वैज्ञानिक ज्ञान तर यापेक्षाही कितीतरी सखोल व प्रगल्भ आहे. त्यामुळे एखादे विधान जर या साऱ्या एकमेकांशी घट्ट विणलेल्या ज्ञानाशी सुसंगत नसेल, तर कुठलाही प्रयोग करायच्या आधीच ते संशयास्पद ठरते. म्हणजे समजा एखाद्याने सांगितले की, ‘कोकणात तीन तोंडाचा, नेत्रातून आग ओकणारा महाकाय ‘धुमधामफुफाट’ नावाचा प्राणी अस्तित्वात आहे; त्याचे शरीर पूर्ण सुवर्णाचे बनलेले आहे. तो प्रकाशाहून अधिक वेगाने उडतो व तो प्रत्येकाच्या पापपुण्याचा हिशोब ठेवतो.’ आता यांतील प्रत्येक विधान अशक्य नसले तरी अधिकाधिक असंभव आहे. म्हणजे कोकणात इतकी वर्षे कुणालाच हा प्राणी दिसला नसण्याची शक्यता फार कमी आहे. पण ठीक आहे, कदाचित तो कुठेतरी खोलवर गुहेत राहात असेल, मात्र त्याचे शरीर सुवर्णाचे बनले असणे उत्क्रांतिविषयक व इतर जीवसृष्टीच्या आपल्या ज्ञानाच्या संदर्भात असंभव आहे, आणि त्याहीपुढे जाऊन तो सापेक्षतावादाचे नियम तोडून प्रकाशातीत वेगाने जाणे तर अजूनच असंभव आहे. या पार्श्वभूमीवर धुमधामफुफाटविषयी अज्ञेयवादी भूमिका घेणे शक्य असले तरी शहाणपणाचे नाही. याच न्यायाने पारलौकिक अस्तित्व व तदानुषंगिक कल्पना वास्तवाच्या पातळीवर असंभव आहेत असे म्हणावे लागेल.
“Extraordinary claims require extraordinary proof.’ हे सूत्र येथे ध्यानात ठेवले पाहिजे. काही वर्षांपूर्वी फलज्योतिष्याचा अभ्यास विद्यापीठातून केला जावा, अशी मागणी जोरदार राजकीय पाठिंब्यासहित झाली होती. त्याला विरोध करण्यामागची वैज्ञानिक भूमिका हीच होती. महाराष्ट्रात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’-सारख्या चळवळींमधून या प्रश्नांवर एक सामाजिक मंथन घडून येत आहे. विज्ञाननिष्ठ समाजाकडे जाणाऱ्या वाटचालीत प्रबोधनवादी परंपरेतील हे एक महत्त्वाचे योगदान आहे असे मी मानतो. कदाचित काही वर्षांनी फुले व आगरकरांच्या कार्यासारखे त्याचे मूल्यमापन होईल.
मात्र ईश्वरकल्पना व धर्मजाणीव यांत मी फरक करतो. ईश्वर अस्तित्वात नसला, तरी धर्मजाणीव किंवा आध्यात्मिक प्रेरणा ही एक सखोल मानवी गरज आहे, असे मी मानतो. न्यायाची कल्पना, नैतिक जाणीव, मित्रत्वाची व सहकार्याची भावना, प्रेमिकेशी तादात्म्याची अनुभूती, मुलाबाळांचे वात्सल्य व यापुढे जाऊन समाजाशी काही नाते जोडण्याची इच्छा यांचा समावेश धर्मजाणिवेत करावा लागेल. उस्ताद अमीर खाँचे गाणे ऐकल्यावर होणारा विशुद्ध आनंद किंवा विश्वाच्या उत्पत्तीविषयीचे कुतूहल हा या आध्यात्मिक अनुभूतीचा विकास मानावा लागेल. मी असे म्हणेन, की एका बाजूने व्यक्तीचा अहंकार, किंवा अधिक चांगल्या अर्थाने आत्माविष्काराची प्रेरणा व दुसऱ्या बाजूने इतरांशी जोडून घेण्याची त्याची गरज, किंवा ‘स्व’पलीकडे नेणारी ही धर्मजाणीव, या दोन्हीतील तणावातून मानवी कृती निश्चित होते. हे तणाव विधायक रीतीने कसे व्यक्त होतील, हे बघण्याचे काम धर्माचे आहे.
हा अर्थातच विवेकवादी नीतिशास्त्राचा प्रश्न आहे. नित्शेने परमेश्वराचा मृत्यू जाहीर केल्यापासून देवाच्या अनुपस्थितीत मानवी मूल्यांची मांडणी कशी करायची, हे विवेकवादासमोरचे आव्हान आहे. नित्शेने सत्ताकांक्षा किंवा ‘विल टू पॉवर’ हा मानवी मूल्यांचा आधार मानला ; पण ही मीमांसा मला अपुरी वाटते. त्याबरोबरच सहकार्य व न्यायबुद्धी, प्रेम, सहानुभूती या प्रेरणाही मानवी मनात तीव्र प्रमाणात आहेत, असे मी म्हणेन. स्पर्धेची प्रेरणा व सत्ताकांक्षा ही मूलभूत आहे, त्याचप्रमाणे सहकार्याची प्रेरणाही मूलभूत आहे. किंबहुना स्पर्धेबरोबर मनुष्यजात सहकार्य शिकली, हेही उत्क्रांतीचेच फलित आहे व त्यावरच मनुष्यजातीचे यश अवलंबून आहे.
कुठेतरी मनुष्याला कैवल्याची किंवा चिरंतन मूल्यांची ओढ असते; त्यामुळे तो ‘देव’ कल्पनेकडे गेला. त्यामध्ये सुरक्षिततेची मानसिक गरज आहे. पण देवाच्या गैरहजेरीत अशी कुठली अढळ मूल्ये नाहीत हे स्वीकारणे भाग आहे. त्यामुळे, विवेकवादी नीतिमत्ता ही भौतिकशास्त्राच्या नियमासारखी स्थलनिरपेक्ष व कालनिरपेक्ष नाही. ती अर्थात मनुष्यजातीच्या उत्क्रांतीच्या इतिहासाने निश्चित झालेली आहे व ती मनुष्यजातीबरोबरच नष्ट होणार आहे. या अनिश्चिततेचा मला त्रास होत नाही. वास्तव जसे आहे तसे स्वीकारले पाहिजे व या मर्यादेत आपण विवेकवादी नीतिमत्ता उभी करू शकतो, असे मला वाटते. याचा अर्थ ज्याच्या त्याच्या मर्जीने कोणीही काहीही करावे अशी सोईस्कर व सापेक्ष नैतिकता स्वीकारली पाहिजे असे नाही.
उदाहरणार्थ मोटारसायकल चालवण्याची वेगमर्यादा चांगल्या रस्त्यावर शंभर कि.मी. असेल तर खडबडीत रस्त्यावर साठ कि.मी. असेल. एखादा रेसरायडर सुरक्षितपणे दीडशे कि.मी. वेगानेही जाऊ शकेल. म्हणजे वेगमर्यादविषयी असे एक डिस्ट्रिब्यूशन असले तरी सामान्यपणे सर्वसाधारण चालकाने सर्वसाधारण रस्त्यावर दीडशे कि.मी. वेगाने चालवणे हे त्याच्या व इतरांच्या दृष्टीने धोक्याचे आहे असे वस्तुनिष्ठ विधान आपण करू शकतो. हीच गोष्ट कमी अधिक प्रमाणात इतर नैतिक वर्तनाबाबत खरी आहे. त्यामुळे ज्याच्या त्याच्या मर्जीने कुणी काहीही करावे अशी सोईस्कर नैतिक सापेक्षता स्वीकारण्याची गरज नाही. या रीतीने कुठल्याही अलौकिक तत्त्वाचा आधार न घेणारी, मनुष्यजातीचे जीवशास्त्रीय व ऐतिहासिक वास्तव ध्यानात घेणारी, पण पुरेशी दृढ नैतिक मांडणी शक्य आहे असा माझा विवेकवादी विश्वास आहे. किंबहुना वेगवेगळ्या समाजातील व्यक्ती गुंतागुंतीची सामाजिक व न्यायव्यवस्थेची बंधने स्वतःहून स्वीकारतात ही गोष्ट वरील विधानाचा सबळ पुरावा म्हणता येईल.
विवेकवादाविषयी माझी ही व्यक्तिगत वैचारिक भूमिका थोड्या विस्ताराने सांगितल्यानंतर प्रबोधनाच्या चळवळीच्या संदर्भात मला एक मुद्दा सांगावासा वाटतो.एखादी व्यक्ती आपले आंतरिक जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आधार घेईल ही गोष्ट बऱ्याचवेळा विचारांपेक्षा तिच्या मानसिक गरजांनी व व्यक्तिगत इतिहासाने निश्चित होते. त्यामुळे धर्मविषयक निष्ठा हा एक अत्यंत खाजगी मामला आहे असे मी मानतो. शिवाय एकाच धर्मकल्पनेचे दोन व्यक्तींचे आकलन व सामाजिक आविष्करण पूर्णतः भिन्न असू शकते. त्यामुळे अकारण एखाद्याच्या धार्मिकतेचा उपहास करणे इष्ट नाही असे मी समजतो. याला कदाचित सहिष्णु विवेकवाद म्हणता येईल. अर्थातच बऱ्याचवेळा जेव्हा व्यक्तिसमूहाच्या एखाद्या धर्मकल्पनांचे सामाजिक क्षेत्रात वा इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण होते तेव्हा मात्र खंबीर विवेकवादी भूमिकेतून त्याविरुद्ध संघर्ष करणे अटळ होते.
[साधना (दिवाळी २००८) मधील नवविज्ञान आणि मी या अतीश दाभोलकरांच्या (मुलाखत व शब्दांकनः विनोद शिरसाठ) लेखातून साभार]