विस्तारणारी क्षितिजे

नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूरमध्ये दृश्यकलेचा एक अभूतपूर्व उत्सव साजरा केला गेला. “विस्तारणारी क्षितिजे’ नावाचे आधुनिक आणि समकालीन भारतीय दृश्यकलेचे एक प्रदर्शन त्या काळात नागपूरमध्ये भरले होते. ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आणि जणुकाही त्याच्या स्वागतासाठी म्हणून नागपुरातील सिस्फा आर्ट गॅलरीने शहरातील लहान-मोठ्या आर्ट गॅलरीजमध्ये अनेक छोटी छोटी प्रदर्शने भरवली होती. आठवडाभर नागपुरातील चित्ररसिकांना कलेची एक मेजवानीच उपभोगायला मिळाली.
विस्तारणारी क्षितिजे’ हे प्रदर्शन प्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन आणि बोधी आर्ट गॅलरी ह्यांच्या अथक प्रयत्नांतून आकारास आले. महानगरातच गोठल्या गेलेल्या समकालीन भारतीय दृश्यकलेची ओळख महाराष्ट्रातील इतर भागातील प्रेक्षकांनाही व्हावी ह्या हेतूने निवडक कलाकारांची चित्रे घेऊन आठ शहरांमध्ये हे प्रदर्शन त्यांनी फिरविले.
अनेक अर्थाने हे प्रदर्शन वेगळे होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आधुनिक कलेच्या विकासात महत्त्वाचे योगदान केलेल्या तीस कलाकारांच्या मूळ कलाकृती ह्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. महानगरांपासून दूर असलेल्या रसिकांना साधारणपणे कलाकृतींच्या प्रतिकृतींवर ८ प्रिंटस्वरच समाधान मानावे लागते. ह्यामध्ये बऱ्याच वेळा चित्रांचे रंग, पोत बदलले जातात, त्यांच्या आकाराची कल्पना येत नाही. मूळ कलाकृती पाहताना ही अडचण आपोआप दूर झाली.
ह्या प्रदर्शनाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे दीपक घारे ह्यांनी सोप्या मराठीमध्ये करून दिलेली कलाकृतींची ओळख. खूपदा भाषेची क्लिष्टता आणि विद्वज्जड शब्दयोजना रसिकांना कलेपासून दूर लोटतात. पण ह्या प्रदर्शनात मात्र कलाकार, त्यांची शैली, कलेच्या विकासातील त्यांचे योगदान ह्याचे अतिशय मर्मग्राही विश्लेषण दीपक घारे यांनी केल्यामुळे प्रेक्षक आणि कलाकृतींमधील दुरावा कमी व्हायला फार मदत झाली.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रदर्शन फक्त तीस कलाकारांच्या तीस कलाकृतींमध्ये मर्यादित नव्हते. आधुनिक आणि समकालीन दृश्यकलेचा एक उत्सवच प्रदर्शनाच्या दालनात आठ दिवस साजरा होत होता. चित्रकारांवरची पुस्तके, कलाकृतींच्या प्रतिकृती तिथे विक्रीसाठी उपलब्ध होत्याच ड त्या तशा बहुतेक प्रदर्शनात असतात ड्ड पण प्रसिद्ध कलाकारांवरची दर्जेदार पुस्तके मध्यभागी टेबलांवर मांडून ठेवलेली होती जी कोणीही हाताळू शकत होते. दिवसभर टेबलापाशी ती पुस्तके पाहात आणि वाचत बसलेले रसिक प्रेक्षक, चित्रकलेचे विद्यार्थी हे दृश्यच फार आनंददायक होते. ह्याशिवाय तीन दिवस संध्याकाळी प्रदर्शन संपल्यावर एक तासभर चित्रकारांवरच्या फिल्म्स दाखवल्या जात होत्या. शेवटचे तीन दिवस प्रदर्शनामध्ये ज्यांच्या कलाकृती ठेवल्या होत्या असे तीन कलाकार प्रेक्षकांबरोबर आपल्या कलेच्या संदर्भात संवाद करण्यासाठी निमंत्रित केले होते. ‘दृश्यकला आणि इतर कला’ ह्या विषयावरील परिसंवादाने प्रदर्शन संपले.
आजचा सुधारक ह्या विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या मासिकात दृश्यकलेच्या प्रदर्शनाबद्दल विस्ताराने का लिहावेसे वाटले ? आसु चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे ह्यांनी म्हटले होते, ‘ज्याने बुद्धी सुसंस्कृत होईल असे काहीही वर्ण्य नाही.’ हे प्रदर्शन पाहात असताना कलेच्या माध्यमातून होत असलेल्या वैचारिक अभिव्यक्तीची जाणीव विशेष तीव्रतेने झाली. आमंत्रित कलाकारांच्या भाषणातून कलाकृतींच्या निर्मितीमागे असलेली त्यांची चिंतनशीलता व्यक्त होत होती, जी फार प्रभावित करणारी होती. त्यांच्याशी झालेल्या संवादामुळे ‘अनोळखी आणि म्हणून आपल्यासाठी नाहीच’ असे वाटणाऱ्या ह्या दृश्यकलेबद्दल एक आत्मीयता निर्माण झाली.
संगीत, नृत्य, नाट्य ह्या साऱ्या ललित कलांमध्ये सहजतेने रमणारा प्रेक्षक आधुनिक आणि समकालीन दृश्यकलेपासून मात्र अंतर ठेवून राहतो ह्यामागचे मुख्य कारण त्याला तिची भाषा समजत नाही हेच आहे. ती भाषा समजावून सांगणारे मार्ग आणि साधने सहज उपलब्ध नाहीत. संगीत, नृत्य, नाट्य हे तिन्ही कलाप्रकार सादरीकरणाचे असल्याने ते प्रेक्षकांसमोरच साकार होतात. प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच त्या कला बहरतात आणि सर्वसामान्य प्रेक्षकही दर्जेदार रसिकांसारखाच पण वेगळ्या पातळीवरचा आनंद त्यांच्यातून घेऊ शकतो. ह्या कलांमधले नवे प्रवाह प्रेक्षकांनी आपलेसे केले ते त्याचमुळे.
ह्याउलट फोटोग्राफीच्या शोधानंतर चित्रकलेतील यथार्थवादी शैली मागे पडली आणि आधुनिक चित्रकलेला सुरुवात झाली. १९ व्या शतकात युरोपभर धार्मिक, सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाले. ते बदललेल्या जगातले वेगळे अनुभव पचवायला सगळ्यांनाच जड गेले. कलाकारांना तर ते व्यक्त करण्याकरिता चित्रकलेसाठी जणू वेगळीच भाषा तयार करावी लागली. रंग-रेषा-आकारांचाच वापर करून, स्वतःची अनोखी शैली निर्माण करून हे बदललेले वास्तव त्यांनी आपल्या कलेतून उलगडण्याचा प्रयत्न केला. इम्प्रेशनिझम, पोस्ट इम्प्रेशनिझम, क्यूबिझम, सररिअॅलिझम असे अनेक नवीन प्रवाह चित्रकलेत निर्माण झाले.
चित्रकलेतील ह्या आधुनिक प्रवाहांची ओळख भारतीय कलाकारांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली. पण अभिजात भारतीय कलेची विविध अंगे, भारतातील लोककला आणि हे आधुनिक पाश्चात्त्य प्रवाह ह्यांच्या रसायनातून आधुनिक भारतीय दृश्यकलेची निर्मिती व्हायला काही काळ जावा लागला.
कलेच्या प्रमुख हेतूंपैकी अलंकरण (decoration) हे आद्य प्रयोजन मानले जाते. ह्या प्रयोजनाला वास्तवाचा अन्वयार्थ लावण्याच्या प्रयोजनाची आणि स्वतःचा अनुभव व्यक्त करण्याच्या धडपडीची पण जोड मिळाली. कला ही फक्त परिसर सुशोभित करणारी गोष्ट न उरता जगण्याचा शोध घेण्याचे महत्त्वाचे माध्यम बनली.
विस्तारणारी क्षितिजे पाहताना सुरुवातीला हे सगळे इतक्या स्पष्टपणे जाणवले नाही. काही चित्रांमधली ताकद, गतिमानता ह्यांना मनाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही चित्रातील गूढताच वेधक वाटली तर काही चित्रे मात्र ही चित्रे आहेत का चित्रकोडी असा प्रश्न निर्माण करणारी वाटली. पण पुन्हा पुन्हा पाहिल्यावर आणि त्यांच्या शेजारी असलेले दीपक घारे ह्यांचे सोप्या भाषेतील अर्थपूर्ण रसग्रहण वाचल्यावर त्या कलाकृतींमधील मर्म हळू हळू उलगडायला लागले. प्रामुख्याने जाणवले ते म्हणजे सध्याचे विलक्षण गुंतागुंतीचे, तणावाचे जीवनानुभव व्यक्त करण्यासाठी कलाकारांनी वापरलेली विविध माध्यमे. अनुभवाची व्यामिश्रता व्यक्त करण्यासाठी जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा एकापेक्षा जास्त माध्यमांचा वापर त्यांनी मुक्तपणे केलेला दिसला. स्वतःच्या माध्यमाची ताकद आणि मर्यादा ह्या दोन्हीची उत्तम जाण असल्यामुळेच हा प्रयोग त्यांनी केला हेही जाणवले. नीलिमा शेख ह्यांच्या ‘अखेरचा केशरिया’ (ढहश ङसी डरषषीप) मध्ये केशरी रंगच्छटांमधून हलकेच उमटणारे आगा शहीद अलीच्या कवितेचे शब्द चित्राचा अर्थ आपल्यासाठी उलगडून सांगतात. त्या शब्दांशिवायही चित्र प्रभावी आहे पण त्या शब्दांमुळे चित्राची आर्तता जास्त तीव्र होते.
रंगरेषांबरोबर केवळ शब्दच नव्हे तर रोजच्या उपयोगातील वस्तूंचाही वापर कलाकार मुक्तपणे करताना दिसतात. मांडणावळ, ळपीरश्रश्ररींळेप हा शिल्पकलेचा आधुनिक आविष्कारही हेच दर्शवितो. दीपक घारे म्हणतात त्याप्रमाणे, “आजच्या काळात शिल्पे घडली जात नाहीत तर ती रचली जातात. उपलब्ध वस्तूंचा वापर करून त्यांच्या अर्थपूर्ण रचनेतून शिल्पाकृती तयार केली जाते.” अतुल दोडिया ह्यांच्या मांडणावळीत एका काचेच्या कपाटात ठेवलेल्या विविध वस्तू आहेत. गांधीजी, शिपाई, कवटी, तुटलेली बशी, दुभंगलेले घर आणि कपाटाच्या मागे असलेली रघु दंडवते ह्यांची ‘नवीनच दोस्त’ ही रायफल घेतलेल्या शिपायाची कविता. ह्या सर्व घटकांतून एक संमिश्र आशय आपल्याला जाणवतो. त्या वस्तूंना असलेल्या सामाजिक आणि राजकीय संदर्भातून सध्याच्या असुरक्षित वातावरणाची, रोजच्या जगण्याचा भाग बनलेल्या हिंसेची आपल्याला जाणीव होते.
रणबीर सिंग कालेकांचे ‘मॅन विथ कॉकरेल’हे व्हिडिओ इन्स्टॉलेशन तर समकालीन दृश्यकलेतील अंतिम टप्पा गाठते. व्हिडिओमध्ये एकच दृश्य पुन्हा पुन्हा पण थोड्या थोड्या फरकाने येत राहते. त्या सगळ्याचा दृश्य आणि श्राव्य परिणाम फार प्रभावीपणे आपल्याला अंतर्मुख करतो.
कलेच्या बदललेल्या संकल्पनांची ओळख करून देण्याचे काम ह्या प्रदर्शनाने केले. त्याचबरोबर कलाकाराच्या बदललेल्या भूमिकेची जाणीवही ह्या कलाकृतींमधून झाली. स्वतःच्या कलाकृतीवर संकल्पनेपासून अभिव्यक्तीपर्यंत पूर्ण ताबा असलेले आणि एकाच माध्यमात निर्मिती करणारे तय्यब मेहता, रामकुमार, अकबर पदमसी ह्यांच्यासारखे कलाकार एका बाजूला, तर संकल्पनात्मक मांडणीतून निर्मिती करणारे अतुल दोडिया, सुबोध गुप्ता, एन्. एस्. हर्षा ह्यांच्यासारखे ‘संयोजक’ कलाकार दुसऱ्या बाजूला असा हा कलाकारांचा विस्तीर्ण पट डीशिबी। ड्ड ह्या प्रदर्शनामुळे पहायला मिळाला. “विस्तारणारी क्षितिजे’ हे नाव खऱ्या अर्थाने सार्थ करणाऱ्या ह्या प्रदर्शनाचे संयोजक, प्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन प्रदर्शनाचा हेतू विशद करताना म्हणतात :
समकालीन भारतीय कला आज सर्वांगाने बहरून आली आहे. एक महत्त्वपूर्ण कलाविषयक चळवळ म्हणून तिला जगात मान्यता मिळत आहे… पण समकालीन कलेचा रसिक प्रेक्षक मात्र संख्येने फार मर्यादित असून तोही प्रामुख्याने महानगरांमध्येच एकवटलेला आहे… ही उणीव लक्षात घेऊन व ही त्रुटी दूर करण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून आम्ही महाराष्ट्रातील आठ शहरांमध्ये आधुनिक आणि समकालीन भारतीय कलेचे हे फिरते प्रदर्शन आयोजित केले आहे.
समकालीन दृश्यकला जाणून घ्यायची इच्छा असणाऱ्या अनेक रसिकांना ह्या प्रदर्शनाने दिशा दाखविली हे तर खरेच पण त्याबरोबरच रसिकांचीही काही जबाबदारी असते ह्याची जाणीवही हे प्रदर्शन पाहताना सतत होत होती. जीवनाच्या ह्या अस्ताव्यस्त पसाऱ्याचा अर्थ शोधणाऱ्या कलाकारांच्या धडपडीला सामोरे जाताना रिकाम्या हाताने जाऊन चालणार नाही. इतिहास, भोवतालचे राजकीय-सामाजिक वास्तव ह्यांचे संदर्भ माहीत नसतील तर समकालीन दृश्यकालच नव्हे तर इतरही ललित कला समजणार नाहीत. एक मोठा सांस्कृतिक ठेवा आपल्या हातातून निसटून जाईल.
१९३, शिवाजीनगर, नागपूर ४४० ०१०.