डार्विनच्या शोधाची एकशेपन्नास वर्षे

येत्या जून-जुलैच्या सुमारास वरील विषयावर विशेषांक काढायची योजना आहे. त्यासाठी नियोजित अतिथि-संपादक, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ह्यांनी घडवलेले पत्र सोबत देत आहोत. हे पत्र अनेक तज्ज्ञांना तर पाठवले जात आहेच, परंतु आसु च्या लेखकांपैकी कोणास लिहिण्याची इच्छा असल्यास त्यांनी अतिथि-संपादकांशी संपर्क साधावा या हेतूने हे पत्र देत आहोत. संपर्काचा पत्ताः रवींद्र रु. पं., ८ आदर्शनगर, शिरपूर ४२५ ४०१.
ईमेल-rpravindra@rediffmail.com;
भ्रमणध्वनी ९७६४६ ४२४३४, ९८६९० ८७८८३
आजचा सुधारक हे विवेकवादी चिंतनाला वाहिलेले व मुक्त-सर्वंकष विचारविमर्शाचे व्यासपीठ बनू पाहणारे मराठी मासिक आहे. वर्षातील किमान एक अंक एखाद्या विशिष्ट विषयावर सखोल चर्चा घडवून आणणारा विशेषांक असावा असा आमचा प्रयत्न असतो.
२००९ सालातील जून-जुलै जोडअंक हा ‘डार्विनच्या शोधाची दीडशे वर्षे’ ह्या विषयाचा परामर्श घेणारा अंक असावा, असा आमचा मानस आहे. ह्या अंकाचा अतिथी-संपादक ह्या नात्याने हे पत्र आपणास लिहीत आहे. आपण ह्या विषयावरील अधिकारी व्यक्ती आहात. त्याच्या विविध पैलूंपैकी आपल्या आवडीच्या/अध्ययनाच्या क्षेत्रासंबंधी आपण लिखाण करावे, अशी विनंती करण्यासाठी हे पत्र. ह्या पत्रासोबत एक संपादकीय टिपण (मूळ इंग्रजीतून) व प्रस्तावित विषयांची यादी पाठवीत आहे. आपल्या नावासमोर नमूद केलेल्या विषयावर आपण लिखाण केल्यास आम्हाला आवडेल. आपणास यादीतील अन्य/यादीत न दिलेल्या पण विषयाशी संबंधित अन्य पैलूंवर लिखाण करायचे असल्यास हरकत नाही. माझ्याशी किंवा कार्यकारी संपादकांशी संपर्क केल्यास विषयाची पुनरावृत्ती टाळून आपल्या आवडीच्या विषयावर आपल्याला लिहिता येईल.
शब्दमर्यादा १२००-३००० शब्द. आपला लेख मार्च अखेरपर्यंत आमच्याकडे पोहचावा अशी अपेक्षा आहे. आपल्या कोणत्याही शंकेचे निरसन करायला, त्यानिमित्ताने ह्या विषयावर आपल्याशी संवाद करायला आम्हाला नक्कीच आवडेल. डार्विनच्या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्या भवतालाचाडसंकल्पना व कृतीच्या पातळीवर होऊ घातलेल्या विराट परिवर्तनाचाड्ढडोळस धांडोळा घेण्यास आपणास आवडेल, ह्या अपेक्षेसह. आपला रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ (कार्यकारी संपादक – नंदा खरे, १९३, शिवाजीनगर, नागपूर ४४००१०, संपर्क : ०७१२-२५३१९४८)