मंगळूर आणि ‘बायकीपणा’

तुमच्या मते स्त्रियांचे सामाजिक स्थान पुरुषांच्या तशा स्थानाच्या तुलनेत कुठे असते? वर? खाली? बरोबरीत? उत्तर देताना घाई करू नये, कारण या एका प्रश्नाबाबत फारदा आपण स्वतःला फसवत असतो. उदाहरणार्थ, “मी माझ्या पत्नीला, मुलीला पूर्ण स्वातंत्र्य देतो. अगदी बरोबरीने वागवतो.”, हे म्हणणारा पुरुष स्वतःला पत्नी, मुलगी, या स्त्रियांचा वर समजून त्यांना स्वातंत्र्य देत’ असतो. “हे मला पूर्ण स्वातंत्र्य देतात.” असे म्हणणारी स्त्री आपण ‘ह्यांच्या’ खाली आहोत, हे मान्य करून वर ‘ह्यांना’ सांभाळून घेत असते! त्या मानाने, ‘आमच्या घरी सर्वांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.”, हे विधान बरेचसे समतावादी आहे. आणि अशा चर्चेत खांदे उडवून गप्प बसणे बहुधा खरेच समतावादी आहे डड्ड कारण ते ही चर्चा दखलपात्र मानत नाही, “मी श्वासोच्छ्वास करतो/करते’ हे जसे उल्लेख करण्याजोगे नाही तसेच स्वातंत्र्य देणेघेणे उल्लेखनीय न मानणारी ती प्रतिक्रिया आहे.
सामाजिक स्थानात बरोबरी मानण्यात आर्थिक बरोबरीही अध्याहृत असते. माणसाच्या इतिहासातला बराच काळ ‘आर्थिक’ या शब्दाचा अर्थ केवळ अन्न-वस्त्र-निवारा कमावण्याशी संबंधित होता. फळेमुळेधान्ये वेचणे, जुजबी शिकार करणे, कातडी पांघरणे, गुहाकपारींमध्ये राहणे, असे सारे करत माणसे जगत असताना आर्थिक व्यवहाराचा अर्थ केवळ ‘जगणे’, असाच होता. पुरातत्त्वीय इतिहासातून असे दिसते की अशा पद्धतीने जगताना बहुतांश अन्न-वस्त्रे स्त्रिया कमावत, तर पुरुष मुख्यतः शिकार करत व टोळी-कुटुंबाचे ‘नेतृत्व’ करत.
गुरे पाळण्याच्या अवस्थेत मात्र पुरुषांचा सहभाग वाढला. शेतीसोबत माणसांचे आर्थिक गाडे पुन्हा एकदा मूळपदावर आले. नांगरट हे पुरुषी काम, तर इतर सारे स्त्रीपुरुषांनी मिळून केले जाई. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, असे एक अत्यंत साधार मत आहे. शेतीचा ‘शोध’ स्त्रियांनी लावला, याचा खरा अर्थ म्हणजे शेतीतंत्रे स्त्रियांनी विकसित केली. पण या साऱ्या काळात शारीरिक बळ आणि आक्रमकता या बाबतींमध्ये पुरुष स्त्रियांपेक्षा पुढे राहिले, आणि मानवी समाजांत पुरुषसत्ता हाच प्रमाण नमुना घडला. इतिहासात कुठेकुठे मातृसत्ता भेटतेही; पण ते प्रमाण मात्र कुठेच प्रस्थापित झाले नाही. फारतर वारसाहक्क स्त्रियांकडे असण्याचा प्रघात पडला, पण ती मातृसत्ता नव्हे (matrilineality is not matriarchy.)
याला खरे आह्वान उत्पन्न झाले, ते औद्योगिकतेने. श्रम कमी करणारी यंत्रे घडली, आणि शारीरिक बळाचे महत्त्व कमी झाले. कारखाने जर ‘इलेक्ट्रॉनिक कन्सोल’ पुढे बसून चालवायचे असतील, तर त्या कामात स्त्रीपुरुष भेद निरर्थक ठरतो. औद्योगिक काळातच प्रथम स्त्रीमुक्तीचा विचार पुढे आला, हा योगायोग नव्हे. आक्रमकता मात्र पुरुषांकडेच राहिली. युद्ध हा मानवी व्यवहारात सातत्याने भेटणारा प्रकार. त्यात जोवर आक्रमकता आणि बळ यांना महत्त्व होते तोवर पुरुषसत्तेला पर्याय नव्हता. पण आज युद्धेही क्षेपणास्त्रांनी हवाई-सागरी हल्ल्यांमधून लढली जातात. बराच शत्रुसंहार नेमकी बटने दाबण्यातून होतो. या कामांचा विचार करता स्त्रीपुरुषभेद आता केवळ पारंपरिक मानसिकतेचा एक ‘जीवाश्म’, एक fossil मानायला हवा.
पण आपली सत्ता गमावायला कोण सुखासुखी तयार होईल! यंत्रांमुळे शारीरिक बळाचे महत्त्व कमी झाले आणि स्त्रियांना आर्थिक बाबतीत उघडपणे पुरुषांशी बरोबरी साधता आली. खरे तर इतिहासाचा बहुतांश काळ आर्थिक जबाबदारी घेण्यात स्त्रिया पुढे, तर श्रेय घेण्यात पुरुष पुढे, असे चित्र दिसते! मतदानाचा अधिकार, निवडणुका लढवण्याचा अधिकार, अशा टप्प्यांनी स्त्रियांनी नेतृत्वात वाटा कमावून राजकीय बरोबरीही साधली.
राहता राहिली सामाजिक बरोबरी ड्ड मुख्यतः वृत्ती आणि धारणांमधून साधता येणारी ही बाब.
इथे मात्र जगभरातील पुरुषमंडळी एक होऊन शेवटचा बालेकिल्ला लढवताना दिसतात. या मुद्द्याबाबत जग सुरैय्या यांचा एक लेख याच अंकात आहे.
मंगळूर प्रकरणात श्रीरामसेनेला खरे काय दुखले? दारू पिणे नक्कीच नाही. ५ फेब्रुवारी २००९ च्या इंडियन एक्स्प्रेस मध्ये तृषा गुप्ता श्रीरामसेनेचे एक संस्थापक प्रवीण वाळके यांचे एक ‘वचन’ देतात, “बार्स आणि पब्स केवळ पुरुषांसाठीच हवेत.”! एक पाहावे, गुजरात राज्य आणि वर्धा जिल्हा यांना त्या त्या जागच्या ‘शासना’ने दारूमुक्त ठरवले. परिणाम हाच झाला, की इतर ठिकाणी वर्षांतील काही दिवशी तरी दारू विकली-विकत घेतली जात नाही (२६ जाने., ३० जाने., १५ ऑगस्ट, २ ऑक्टो.); तर वर्धा आणि गुजरात येथे वर्षाचे ३६५ दिवस दारूची खरेदीविक्री होते. देशाचे इतर भाग “दोनचारच दिवसांसाठी कायदा का मोडा?” म्हणतात, तर गुजरात-वर्ध्यात वर्षभराच्या (विनयहीन?) कायदेभंगात कधीच खंड पडत नाही! लोकांच्या, मुख्यतः स्त्रियांच्या पुढाकाराने दारूमुक्त झालेला गडचिरोली जिल्हा मात्र दारूमुक्ती हा उपचार न मानता मनापासून ‘कोरडा राहतो ड्डू तोही वर्षभर !
मंगळूर प्रकरणानंतर श्रीरामसेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक भारतीय संस्कृतीच्या एकूण हासाबद्दल तावातावाने बोलले. ‘व्हॅलेंटाईन्स डे’ या ‘प्रेमदिना’बद्दल ते म्हणाले, “वर्षभर प्रेम करा, की! एकाच दिवशी का?” खरे आहे. पण भारतीय संस्कृतीनेही पोळ्याच्याच दिवशी बैलांशी चांगले वागा, वसुबारसेलाच गाईगुरांचे लाड करा, नरकचतुर्दशीलाच घर स्वच्छ ठेवा, भाऊबिजेलाच ‘बहिणींनो भावांची सेवा करा’, वटपौर्णिमेलाच ‘बायकांनो, नवऱ्यांचे दीर्घायुष्य चिंता’; असे एकदिवसीय आदेश दिलेलेच आहेत. प्रेम करण्याचा दिवस भारतीय पंचांगात नाही. पण तो पाश्चात्त्यांकडून उसना घेतल्याने भारतीय संस्कृतीवर अतिक्रमण होते किंवा त्या संस्कृतीचा हास होतो, हे कसे? जर मुतालिक ‘व्हॅलेंटाईन्स डे’ हा भेटकार्ड-कंपन्यानी धंदा वाढावा म्हणून घडवलेला दिवस आहे, या कारणासाठी आक्षेप घेत असते, तर ते विवेकी ठरले असते. हे उघड गुपित जोखल्याबद्दल मुतालिकांच्या चाणाक्षपणाचेही कौतुक करता आले असते.
मुतालिकांनी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला सरासरीपेक्षा जास्त बलात्कार होतात, असेही एक विधान केले. पण नवरात्रातील दांडियाच्या काळात ‘निरोध’चा खप दुप्पट होतो, असेही ऐकिवात आहे. म्हणजे सणामागची संस्कृती कोणती, हे महत्त्वाचे नसावे. दोन्ही ‘वाढीव कामव्यवहाराच्या घटनां’वर खरा उपाय हा की कुमारवयात विरुद्धलिंगी व्यक्तींबद्दल कुतूहल असते, हे मान्य करावे. ते कुतूहल नीट न शमवले गेल्याने विकृती उद्भवतात, हे मान्य करावे. कुमारवयीन मुलामुलींना चांगले, मोकळे लैंगिक शिक्षण द्यावे. मुलामुलींमधील मैत्रीकडे साशंक नजरेनेच पाहणे गैर आहे, तशी मैत्री (अगदी लैंगिक आकर्षणासकटही!) स्वागतार्हही असू शकते, ही भूमिका समाजात पसरवण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न करावा. हे सारे मुतालिकादि परंपराग्रस्तांना, संस्कृतीचा चुकीचा अर्थ लावून काळजी करणाऱ्यांना जमणार नाही. पुण्यातील सार्वभाषिक ब्राह्मण संमेलनात एक ‘आचार्य’ असे म्हणाले म्हणे, की ब्राह्मणांची बलस्थाने तीन ड गंध, शेंडी आणि जानवे! आचार्यांना या समजुतीमुळे सर्व स्त्रिया (ब्राह्मणही) दुर्बळ ठरतात, हे सुचले का? की स्त्रियांना माणसांमध्ये, ब्राह्मणांमध्ये आचार्य धरत नाहीत?
त्यासाठी विवेकाचा जागरूक वापर लागतो. स्वतःच्या संस्कृतीबद्दल मूलभूत आश्वस्तता लागते. आणि पुरुषसत्ता अनिवार्य नाही, ती एखादेवेळी घातक ठरू शकते, मुळात ती विषमतेला पोसणारी अमानुष पद्धत आहे, हेही उमगावे लागते. हे समाजधारणांमध्ये रुजवणे सोपे नाही. वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या स्त्रियांना पुरुषांच्या खालचे स्थान देण्यातून सहजपणे आपण त्याच चाकोरीत नव्याने अडकू शकतो. सोबत दोन रेखाचित्रे आहेत, काही वर्षांपूर्वी एका युरोपीय देशात प्रदर्शित झालेली.
युरोप-अमेरिकेत स्त्रीपुरुष एकत्रपणे उपाहारगृहात गेल्यास काय खावेप्यावे याचा अंतिम निर्णय पुरुषाने घेण्याचा प्रघात होता. अन्नाची, मद्याची गुणवत्ता पाहून पसंतीनापसंती व्यक्त करणे पुरुषी अधिकारातच मानले जाई. दोन्ही बाह्यांचे ‘मीलन’ झालेला स्त्रीचा स्वेटर जणु म्हणतो आहे. “मग भरवूनही दे, अन्न – नाहीतरी इतर अधिकार बळकावलेच आहेस!”
दुसरे चित्र आहे जाळीदार टीशर्टचे. पण तो घालणारी स्त्री आपल्याला पुरुषासारखाच मान मिळावा यासाठी क्लृप्ती योजते, ती मात्र पारंपरिक आहे. छातीवर पुरुषासारखे केस चिकटवले आहेत ! प्राचीन इजिप्तमध्ये सिंहासनारूढ राण्यांच्या पुतळ्यांनाही ‘दाढी’ कोरली जात असे कारण राज्यकर्त्याचे गुण पुरुषांमध्येच असतात, असे मानले जाई; त्याचीच ही आधुनिक आवृत्ती!
स्त्रीवादी कलाकृती अर्थातच ही तर्कपरंपरा उलटी करून तिला डोक्यावर उभे करतात. काही वर्षांपूर्वी तीनच कलाकार असलेल्या ‘संगीत देबूजीच्या मुली’ या तासाभराच्या नाटिकेचे प्रयोग महाराष्ट्रभर झाले. मध्यवर्ती कल्पना अशी – लवकरच काही दैवी प्रकोपाने पृथ्वीवरील सर्व पुरुषांच्या स्त्रिया तरी होणार, नाहीतर ते मारले तरी जाणार, असे कळते. एक राजा यापासून स्वतःला वाचवायचा मार्ग शोधत असतो. दोन स्त्रिया त्याला रामबाण उपाय सुचवतात- त्याने स्त्रीवेष करावा, म्हणजे तो पुरुष आहे, हे दैवी शक्तींना कळणार नाही! स्त्री हो तरी, नाहीतर स्त्री होण्याचे नाटक तरी कर, हेच पर्याय असतात!
जर पुरुषसत्ताक विचारांपुढे जायचे असेल तर पुरुषांना स्त्री होण्याचे नाटक करावे लागेल. ऋजुता, सहानुभूती, अनाक्रमक स्वीकारवृत्ती, हे गुण स्त्रियांमध्ये जास्त असतात, तर पुरुषांमध्ये कमी, असे समजले तरी जाते ना? मग ते आवर्जून स्वतःत आणावे लागतील. एखाद्याचे मत पटले नाही, वागणूक आक्षेपार्ह वाटली, तर निषेध सौम्य रीतीने व्यक्त करावा लागेल – ठोसे लगावून वा कपडे फाडून निषेध करता येणार नाही. आजकाल भारतीय समाजात एक विचित्र आक्रमकता दिसते आहे. ‘ईंट का जवाब पत्थर से’. २६ नोव्हेंबरला उत्तर एकच -पाकिस्तानवर हल्ला! लिट्ल चॅम्प्सनी गाणी कशी म्हटली? थोबाडीत मारल्यासारखी! चाबूक फटकावल्यासारखी! कोणाला थोबाडीत मारायचे, गाण्यातून? कोणावर चाबूक उगारायचा? विचार नको – चटपटीतपणा पुरे! हा पोरकट ‘लिट्ल्’पणा (‘लिटिल’ पणा नव्हे!) टाळावा लागेल. तसली आक्रमकता ना पुरुषी आहे, ना बायकी. ती केवळ पोरकट आणि अमानुष आहे. दिलदारी हा पुरुषी गुण आहे म्हणता? तो दाखवायला तयार व्हा. अनाक्रमक स्वीकारवृत्ती ‘बायकी’ गुण आहे म्हणता? तोही दाखवायला तयार व्हा – दिलदारीच्या दूर नाही, तो गुण. आणि चांगुलपणा, समजूतदारपणा, हे गुण तर ना पुरुषी आहेत ना बायकी, ना हिंदु ना मुसलमान. ते जर देव्हाऱ्यातून काढून वापरात आणले, तर मंगळूर प्रकरणे होणार नाहीत. पण जर जग सुरैय्या वैतागून पुरुषांमधल्या ज्या भेकडपणाचा ‘असांसदीय’ भाषेत उल्लेख करतात, तोच वापरायचा ठरला, तर सारेच संपेल.
एक सतत लक्षात ठेवायला हवे की स्त्रिया आणि पुरुष हे कात्रीच्या दोन पात्यांमधल्या फरकासारखे विभाजन आहे. जगायचे असेल तर दोन्ही हवीत. चांगले जगायचे असेल तर दोन्ही वर समान दाब हवा, दोन्हींना समान मान हवा – जे म्हणाल ते!