“तत्त्वमीमांसा’ आणि वास्तव

[अर्नेस्ट एव्हरार्ड (Earnest Everhard) या (काल्पनिक!) क्रांतिकारकाच्या आयुष्यातील १९१२ ते १९३२ या काळाचे वर्णन त्याची पत्नी एव्हिस (Avis) हिने लिहिले, व एका झाडाच्या ढोलीत लपवून ठेवले. सातेकशे वर्षांनंतर हा वृत्तांत सटीप रूपात प्रसिद्ध होत आहे, अशी कल्पना करून जॅक लंडनचे द आयर्न हील (The Iron Heel, Jack London, १९०८) हे पुस्तक लिहिले गेले. गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातला लंडन हा प्रसिद्ध अमेरिकन कथाकार. त्याची बरीच पुस्तके आजही पुनःप्रकाशित होत असतात. काही तर अमेरिकन प्रचारसाहित्यातही भेटतात. द आयर्न हील मात्र अनेक वर्षे उपलब्ध नव्हते, कारण ते भांडवली व्यवस्थेची एक जालीम आवृत्ती रेखाटते! पण ज्या पुस्तकांच्या स्वामित्वहक्कांची मुदत संपली आहे अशी पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध करून देणाऱ्या गुटेनबर्ग प्रकल्पा ने २००६ साली ते सायबर अवकाशात आणले. हर्षवर्धन निमखेडकरांनी ते आसु ला उपलब्ध करून दिले. पुस्तकाच्या सुरुवातीला एव्हिसच्या वडिलांनी आयोजित केलेल्या एका कामगारवर्गाविषयीच्या संमेलनात अर्नेस्ट एव्हरार्डची काही धर्ममार्तंडांशी झालेली एक मुठभेड आहे. तिचा हा संक्षेप.]
बाबा मात्र अर्नेस्टला गप्प राहू द्यायला तयार नव्हते. ते म्हणाले, “आज आपल्यासोबत कामगारवर्गातले श्री. एव्हरार्ड आहेत. मला वाटते की ते एक ताजा दृष्टिकोन आपल्यापुढे ठेवू शकतील’. इतरांनी सभ्यपणे अर्नेस्टला बोलायची विनंती केली. आपल्यावर उपकार केल्यासारखी भावना दाखवली जाते आहे, हे लक्षात आल्याने अर्नेस्टला मजा वाटलेली दिसली.
“मला धार्मिक वादांचे नियम खरं तर माहीत नाहीत” तो विनयाने जरासा चाचरत म्हणाला. पण इतरांनी त्याला आग्रह केला. डॉ. हॅमरफील्ड म्हणाले, “बोला हो! सच्चेपणानं मांडलेलं सत्य कोणाच्याही तोंडून ऐकायला आम्ही तयार आहोत.” अर्नेस्ट हसला, “म्हणजे तुम्ही सत्य आणि सच्चेपणात भेद करता?” हॅमरफील्ड चपापले.
“बरं तर”, अर्नेस्ट म्हणाला. “सुरुवातीलाच सांगून टाकतो ढ तुम्हाला काऽऽही माहीत नाही आहे, कामगारांबद्दल. तुमचं समाजशास्त्र तुमच्या विचारांच्या पद्धतीसारखंच दुष्ट आणि निरुपयोगी आहे.” सगळ्याची सुस्ती एकाएकी संपली, आणि ते खडबडून जागे झाले. ‘येवढा काय दुष्टपणा आहे आमच्या विचारांमध्ये?’ डॉ. हॅमरफील्ड रागाने म्हणाले. “तुम्ही आहात तत्त्वमीमांसक (शीरहिीळलळरपी). त्या पद्धतीनं तुम्ही वाट्टेल ते सिद्ध करू शकता, आणि इतर सारे तत्त्वमीमांसक चुकत आहेत असं स्वतःला पटवून देऊ शकता. विचारांच्या क्षेत्रात तुम्ही आहात अराजकवादी. आपापली वेडी विश्व उभारता, कल्पना आणि पूर्वग्रहांच्या आधारानं, आणि त्यांच्यातच जगता – प्रत्येकी एका विश्वात. तुम्हाला तुम्ही ज्या वास्तविक जगात राहता ते माहीत नसतं; आणि वास्तवाच्या दृष्टीनं तुमचे विचार मनोविकारांसारखे असतात. मघाशी तुमच्या घटापटाच्या चर्चा ऐकताना मला वाटत होतं की तुम्ही या विसाव्या शतकातल्या बौद्धिक जीवनापासनं फार दूर आहात -हजारो वर्षांपूर्वीच्या वैदू आणि देवचारांइतके दूर.”
अर्नेस्ट जास्त जास्त आक्रमकतेने मनापासून बोलत होता. त्याच्या बोलण्याची तीव्रता इतरांना स्वतःच्या कोशांमधून बाहेर काढून स्वतःला विसरायला लावत होती. बिशप मोअरहाऊस अर्नेस्टच्याच तीव्रतेने ऐकत होते. डॉ. हॅमरफील्ड संतापाने लाल होत होते. बाबा तर कुठल्याही क्षणी हसणार असे मला वाटले – आपण सगळ्यांवर कसा बाँब टाकला, या विचाराने. “तुम्ही शब्द फार ढीलेपणानं वापरता आहात. आम्ही तत्त्वचिंतक आहोत, म्हणजे नेमकं काय?” डॉ. हॅमरफील्ड म्हणाले. “तुम्ही फक्त तत्त्वांची मीमांसा करता, म्हणून तुम्हाला तत्त्वमीमांसक म्हटलं. तुमची पद्धत विज्ञानाच्या थेट विरुद्ध आहे. आपल्या म्हणण्याची वैधावैधता तुम्ही तपासतच नाही. तुम्ही सारं काही सिद्ध केलं म्हणता, पण काहीच सिद्ध करत नाही. कोणत्या दोन माणसांचं पटतं, तुमच्यात! प्रत्येक जण स्वतःच्या मनात, जाणिवेत बुडी मारून स्वतःचं आणि विश्वाचं स्पष्टीकरण शोधतो. स्वतःच्या बुटांच्या लेसेस धरून स्वतःला उचलण्याचा प्रयत्न करता. केवळ जाणिवेतनं जाणिवेचं स्पष्टीकरण कसं देता येईल?” अर्नेस्ट म्हणाला.
“मला समजत नाही आहे, तुमचं म्हणणं, मनोव्यापार तर सगळे तत्त्वमीमांसेसारखेच असणार ना? सर्वांत नेमकं आणि भरवशाचं शास्त्र म्हणजे गणित. ते तर केवळ तत्त्वांवर उभं आहे. वैज्ञानिकांचे सगळे विचारही तात्त्विकच असतात, खरं ना?” बिशप म्हणाले. तुम्ही समजत नाही म्हणालात, तेच खरं! तुम्ही आपल्याशीच व्यक्तिनिष्ठ राहून निगमन करता, डिडक्शन. वैज्ञानिक तर अनुभवातून तथ्य गोळा करून विगामी पद्धतीनं विचार करतात, इंडक्टिव्ह. तुम्ही तत्त्वांकडून तथ्यं शोधता, वैज्ञानिक तथ्यांमधून तत्त्वं घडवतात. तुम्ही तत्त्वमीमांसक स्वतःतून विश्वाचं स्पष्टीकरण देता, वैज्ञानिक विश्वात स्वतःचं स्पष्टीकरण शोधतात. “बरं आहे रे देवा, आम्ही वैज्ञानिक नाही!” डॉ. हॅमरफील्ड म्हणाले. “मग आहात काय, तुम्ही?” अर्नेस्टने विचारले. “तत्त्वज्ञ.” अर्नेस्ट मोठ्याने हसला. ‘बघा! जमीन सोडून हवेत उडता आहात, एका उडणाऱ्या यंत्रासाठीच्या शब्दावर आरूढ होऊन ! जरा भूतलावर येऊन तत्त्वज्ञान म्हणजे काय ते तरी सांगा. “तत्त्वज्ञान म्हणजे…. “डॉ. हॅमरफील्ड थांबले आणि खाकरले. पुढे म्हणाले, “ते मनाने आणि वृत्तीने तत्त्वज्ञ असलेल्यांशिवाय कोणाला संपूर्णपणे सांगताच येणार नाही. टेस्ट-ट्यूबमध्ये नाक खुपसून बसलेल्या मर्यादित वैज्ञानिकाला तर ते समजणारच नाही.’ आता अर्नेस्ट निखळ भ्रातृभावाने हसत म्हणाला
“मग आता माझी व्याख्या ऐका- पण एक लक्षात ठेवा – माझ्या म्हणण्यातली चूक काढता आली नाही, तर तत्त्वमीमांसक म्हणून गप्प बसा! तत्त्वज्ञान म्हणजे विज्ञानाचं सर्वांत व्यापक रूप. त्यातली विचाराची पद्धत विज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रातल्या पद्धतीसारखीच, विज्ञानाच्या सर्व क्षेत्रांमधल्या पद्धतीसारखीच असते. इंडक्शन वापरत सर्व विज्ञानक्षेत्रांना एकत्र केलं, की तत्त्वज्ञान घडतं. स्पेन्सर म्हणतो की प्रत्येक विज्ञानक्षेत्र हे ज्ञानाचं आंशिक संघटन असतं. असे सगळे अंश एकत्र करून तत्त्वज्ञान घडतं. ते सर्व विज्ञानांचं विज्ञान आहे. पाहा, पटते का माझी व्याख्या?”
“स्तुत्य आहे, प्रयत्न.” डॉ. हॅमरफील्ड म्हणाले. “पाहा हं! माझी अट आठवा. ती तत्त्वमीमांसेला मारक आहे. चूक दाखवा, माझ्या व्याख्येत, नाहीतर तत्त्वमीमांसक त-हेनं चूक सापडेपर्यंत गप्प बसा!” काही काळ कोणीच बोलेना. पण अर्नेस्टचे संपले नव्हते. “तत्त्वमीमांसकांना बाद ठरवायची एक वेगळीही पद्धत आहे. त्यांनी मानवजातीसाठी काय केलं आहे ते तपासा. हवेशीर कविकल्पना आणि स्वतःच्याच सावल्यांना देवत्व बहाल करणं! हो, माणसांची करमणूक होते, तत्त्वमीमांसेतून, हे मान्य. पण काही सज्जड काम केलं आहे? भावनांचा उगम त्यांना हृदयात दिसला – वैज्ञानिकांना रुधिराभिसरण तिथे भेटले. दुष्काळ आणि रोगराईला त्यांनी दैवी प्रकोप मानलं ड्डड्ड वैज्ञानिक कणग्या बांधत होते, दलदलींचा निचरा करत होते. त्यांनी मानवाकृती देवांची देवळं बांधली, तेव्हा वैज्ञानिक रस्ते आणि पूल बांधत होते. ते विश्वाचं केंद्र पृथ्वीवर ठेवत होते, तेव्हा वैज्ञानिक ग्रहगतीचे आणि तारकानिर्मितीचे नियम शोधत होते. काऽऽही काऽऽही केलं नाही तत्त्वमीमांसेनं माणसांसाठी. जसजसं विज्ञान विकसित होतं आहे, तसतशी तत्त्वमीमांसा मागे हटते आहे. विज्ञान वस्तुनिष्ठ नियम शोधत आहे, तर तत्त्वमीमांसा नवनवीन व्यक्तिनिष्ठ स्पष्टीकरणांनी नवनवीन तथ्यांना झाकत असते. तुम्ही वैदू आहात. चरबी खाणारे एस्किमो आणि तुम्ही तत्त्वमीमांसक यांच्यातला फरक आहे फक्त काही सहस्रकांमध्ये शोधल्या गेलेल्या तथ्यांचा.
[काही वर्षांपूर्वी एका लेखात पु. ल. देशपांड्यांनी श्री. म. माट्यांच्या लिखाणातील एक उतारा उद्धृत केला होता –
“शंकराचार्य, रामानुजाचार्य, यांच्यासारखे जे प्रखर बुद्धिमान लोक आहेत, ते मला केवळ तालीमबाजांसारखे वाटतात…. आतून माझे मन असे सांगत असते की, गड्या, ही कसरत आहे. हे काही खरे नव्हे. खरे नव्हे म्हणजे केवळ अनुमानाचे आहे. वास्तवाशी ओळख आहे व ती दाखवलेली आहे, असे नव्हे.”
जॅक लंडनच्या कादंबरीचा नायक भाषा वेगळी वापरतो आहे, पण माटे मास्तरांचेच म्हणणे सांगतो आहे. लंडनची सर्वच मांडणी आज शतकभरानंतर जशीच्या तशी मान्य करता येत नाही. आज विज्ञानाची पद्धत शुद्ध इंडक्टिव्ह आहे, हे शंकास्पद ठरले आहे. माट्यांचा ‘केवळ अनुमाना’बाबतचा अनादर आज अनाठायी मानला जाईल. पण अनुभवांमधून तत्त्वे घडवणे व तपासणे, विज्ञानातून मानवोपयोगी तंत्रज्ञान घडवणे, यांच्या वाढत्या उपयुक्ततेने मेटॅफिजिकल तत्त्वमीमांसेचा फोलपणा अधोरेखित झाला आहे. दि. य. देशपांड्यांचे विवेकवादावरील लेख, आसु चा आधुनिक विज्ञानावरचा विशेषांक, राजीव सान्यांच्या नवपार्थहृद्गत मधील आसु ने पुनःप्रकाशित केलेले प्रकरण, असा एक विज्ञान आणि तत्त्वज्ञान (तत्त्वमीमांसा नव्हे !) यांच्यातील संबंधाचा शोध आसु मध्ये सुरू आहे. त्याच माळेतील हे एक काटेकोरांटीचे फूल! -का.सं. ]