शेतीः शिक्षणाचे माध्यम

“आमच्या मुलांपैकी कोणालाही बैलांकडून काम करून घेता येत नाही. शेतीच्या तंत्राची माहिती नाही. आम्ही मेल्यावर हे लोक बहुतेक मातीची ढेकळं खाऊनच जगणार आहेत.” एक शेतकरी तावातावाने बोलत होता.
माझ्या मनात प्रश्न उभा राहिला, यासाठी दोषी कोण? मुलांनी शाळेत जायला हवे, किमान दहावी पास (किंवा नापास) असायला हवे असे खेड्यातील प्रत्येकालाच वाटते. पुढे जाऊ शकला तर फारच आनंदाची गोष्ट. कुठे चपराशी म्हणून लागला तर गंगेत घोडे न्हाले. आता शाळेत त्याला शेतीविषयी काही ज्ञान मिळते का? काही धडे असतात शेतीबद्दलड्डथोडीशी माहिती जाता जाता सांगणारे, पण शेतीचे असे ज्ञान जे प्रत्यक्ष शेती करायला उपयोगी असेल ते बहुतेक शेतकी विद्यालयांतही मिळत नाही. कारण तिथेही प्रत्यक्ष करण्यावर भर नसतो. शेतीच्या अवजारांची चित्रे काढा, त्यांचे उपयोग लिहा, असा प्रकार प्रारंभी चालतो. नंतरही त्यांनी जी प्रात्यक्षिके करावी लागतात त्यांचा व वर्गात ते जे शिकतात त्याचा संबंध कधीच जोडला जात नाही. याची जाहीर कबुली शिक्षण विभाग देतो! इंग्लिशच्या एका पाठ्यपुस्तकात एक प्रसंग आहे. एक शेती विषयात स्नातक झालेला तरुण शेतात जातो व पीक पाहतो. शेतकऱ्याला दिलेल्या खताच्या मात्रा वगैरे विचारून हिशेब करतो आणि म्हणतो, “टोमॅटोच्या एका झाडाला एक किलो तरी फळं यायला हवीत, पण तू जे काही खत दिलं आहेस ते अगदीच चुकलं आहे, त्यामुळे या झाडाला दोन चार तरी टोमॅटो लागतील की नाही याबद्दल मला शंका आहे.” तेव्हा तो शेतकरी शांतपणे म्हणतो, ‘अगदी खरं आहे, याला एकही टोमॅटो लागणार नाही, कारण हे वांग्याचं झाड आहे.”
कृषि महाविद्यालयात ट्रॅक्टर चालवण्यापासून (बैलांचा वापर मात्र तिथे नसतो.) लोणची-मुरब्बे करणे, फार्म हाऊस बांधणे इ. सर्व शिकविले जाते, पण या सर्वांचा शेतीशी काय संबंध हे कोणीही सांगत नाही. अशा वेळी सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहोचणार कसा? जर कोणाला संगणकाबद्दल शिकायचे असेल तर गल्लोगल्ली त्यासाठी केंद्रे आहेत, पण शेतीचे ज्ञान मिळवायचे असेल तर? काही उपाय नाही त्यासाठी. आपण शाळेत शिकतो की, आपला देश कृषिप्रधान आहे आणि ७० टक्के लोक शेती आणि त्यावर आधारित उद्योगांवर जगतात. आपल्या देशातून निर्यात होणाऱ्या मालापैकी बहुतांश माल हा शेतमाल असतो. अशा परिस्थितीत शेतीविषयी ज्ञान व जाण दोन्ही असणे अत्यंत आवश्यक आहे.
आज एकीकडे प्रचंड बेरोजगारी आहे, तर दुसरीकडे शेतात काम करायला लोक मिळत नाहीत, म्हणून मग शेतकयाला नाइलाजास्तव यंत्रांचा वापर करावा लागतो. बैल हे अक्षय ऊर्जास्रोत आहेत, जे शेतकऱ्यांच्या गोठ्यात तयार होतात, ते शेतातील चारा खाऊन काम करतात आणि शेणाच्या रूपाने आणखी एक ऊर्जास्रोत शेतकऱ्याला उपलब्ध करून देतात. पण हे बैल हाताळायला शिकायचे असेल तर बारा-तेरा वर्षांच्या वयात त्याची सुरुवात करावी लागते, तेव्हाच त्या कामासाठी आवश्यक स्नायू मजबूत होऊ शकतात. मोठ्या वयात शेतीची इतर कौशल्याची कामे शिकणेही फार कठीण असते.
शेतीचे ज्ञान हे आरोग्यविज्ञानाच्या ज्ञानासारखे आहे. आरोग्यविज्ञान फक्त पुस्तके वाचून कधीच पूर्णपणे आत्मसात होत नाही, त्यासाठी रोग्यांसोबत काम करावे लागते. तसेच शालेय शिक्षणात जर शेतीविषयक ज्ञान द्यायचे असेल तर फक्त पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही, त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड द्यावी लागेल. मग प्रश्न हा येतो की, सगळ्यांना या ज्ञानाची गरज आहे का? आपण आज म्हणतो की प्रत्येकाने संगणक साक्षर असायला हवे, कारण जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात संगणकाने प्रवेश केलेला आहे. त्याहीपेक्षा जास्त संबंध शेतीचा आपल्या जीवनाशी आहे. असे म्हटल्यास वावगे होणार नाही की शेतीच जीवनाचा मूलाधार आहे. त्यामुळे त्याविषयीची ‘साक्षरता’ असणे अगदी प्रत्येकालाच गरजेचे आहे.
काही वर्षांपूर्वी भाप्रसेची (खअड) परीक्षा पास झालेले तरुण-तरुणी आमच्या घरी आले होते. त्यावेळी गोबरगॅसचे दिवे प्रकाशासाठी आम्ही वापरत असू. वीज आम्ही वापरत नसू. तर ते बघून त्यातली एक तरुणी चीत्कारली, “अय्या किती छान आहे आहे हा लॅम्प ! माझं जिथे कुठे पोस्टिंग होईल नं, तिथे मी असा लॅम्प लावून घेईन.” “पण त्यासाठी गोबरगॅस प्लॅन्ट बांधावा लागतो.” इति मी. “हो का? पण काहो, आपल्या देशातील गोबरगॅस प्लॅन्टची योजना का सक्सेसफुल झाली नाही?’ हा प्रश्न त्यांच्यासोबत आलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे फेकण्यात आला होता. “त्याचे काय आहे मॅडम, आपल्या देशात शेणाची कमतरता आहे, त्यामुळे गोबरगॅस प्लॅन्ट चालत नाहीत.” अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण ! “हा निष्कर्ष शासनाने कुठून काढला? प्रोफेसर्स कॉलनीत सर्वे करून का?” – मी त्यांना थंड पाणी देत खवचटपणे विचारले. अधिकारी दचकले, म्हणाले, “तुम्हाला हो कसे माहीत?” मी म्हटले, “अंदाज माझा.”
एवढ्यात दुसरा एक तरुण म्हणाला, “पण तुमचा फ्रीज कशावर चालतो? किती छान थंडगार पाणी आहे.’ मला हसू फुटले. मी त्याला माझा मोठा मातीचा माठ दाखविला आणि अधिकाऱ्यांना म्हटले, “तुम्हाला गोबर गॅस प्लॅन्टसाठी दिलेले टार्गेट पूर्ण करायचे होते. प्रोफेसर लोक गॅस प्लॉन्ट बांधायला तयार झाले. मग काय प्रत्येक प्रोफेसरच्या घराजवळ गॅस प्लॉन्टसाठी खड्डा खणायला सुरुवात झाली. तो खड्डा दोन फूट खोदून झाल्यावर अनुदान दिले जात असे. ते मिळवून घेतल्यावर खड्याचे खोदकाम बंद करण्यात आले. पुढे ते गॅस प्लॅन्ट कसे चालत आहेत अशी चौकशी केल्यावर तुम्हाला उत्तर मिळालं – सगळे बंद आहेत, कारण शेणच उपलब्ध नाही. खरे ना?”
उपविभागीय अधिकारी तसे प्रामाणिक होते. ते म्हणाले, “खोदकामच बंद पडले ते मला माहीत नाही, पण उत्तर मात्र हेच मिळाले. पण तुम्ही फार हुशार आहात हो, तुम्हाला कसे कळले हे?”
“याला सामान्यज्ञान म्हणतात. ही हुशारी खेड्यातल्या कुणाही जवळ असते. गोबर गॅस प्लॅन्ट चालवायला शेण लागते, ते गुरांकडून मिळते. प्रोफेसर लोक गाई-गुरे कुठे पाळू शकणार? पण फुकटाफाकटी अनुदान मिळत आहे तर ते का न घ्या? हा त्यांचा विचार, तर टार्गेट पूर्ण होत आहे हा तुमचा विचार!”
आता ही अवस्था ज्यांच्या हाती आपले प्रशासन आहे त्या लोकांची. मी बघते की त्यांपैकी पुष्कळांना खरोखर काही तरी करायची तळमळ असते. आमचे हे उपविभागीय अधिकारीही अशीच तळमळ असणारे होते. त्यामुळेच या भाप्रसेची परीक्षा पास झालेल्यांसाठी जो आठ दिवसांचा खेड्यात जाऊन तिथल्या परिस्थितीबद्दल जाणून घ्यायचा काळ असतो त्या काळात ते खरोखरच त्या मंडळींना खेड्यावर फिरवीत होते. पण ते शेतीसाक्षर नव्हते. गोबरगॅस प्लॅन्ट चालवायला शेण लागते हे त्यांना माहीत होते, पण त्यासाठी गाई-गुरे लागतील आणि ती सांभाळणे हा एक पूर्ण स्वतंत्र विषय आहे. त्याचेही शास्त्र असते. एखादा प्राध्यापक अथवा त्याची पत्नी मुळात शेतकरी असले, त्यांना या विषयाची माहिती, आवड असली तरच ते गो-पालन करू शकतात. हे या भल्या अधिकाऱ्यांना कळलेच नव्हते.
आणि असे हे शेतीविषयी निरक्षर असलेले प्रशासक जेव्हा पंचवार्षिक योजना बनवितात, जिल्ह्याचे प्रशासन सांभाळतात, मोठमोठ्या विभागांमध्ये कार्यरत असतात तेव्हा असाच गोंधळ घालतात आणि त्यापायी इकडे शेतकऱ्यांवर आत्महत्या करायची पाळी येते व त्यासाठी जाहीर केलेली ‘पॅकेजेस’ कुचकामी ठरतात.
दूध कुठून मिळते याचे उत्तर ‘बाटली देते, भैय्या देतो’ असे शहरी मुलांकडून मिळते. छोटी मुले तर म्हैस काळी असते, ती पांढरे दूध कसे देणार, असेही विचारतात. आपण जे पराठे छोले, नमकीन किंवा मिठाया, फळे, भाज्या अगदी आईस्क्रीमसुद्धा असे जे काही खातो ते या मातीत जन्मते याचे भान लहानांना काय, मोठ्यांनाही नसते. एका बाईने वृत्तपत्रात एक लेख लिहिला होता, पावसाळा कसा कंटाळवाणा, त्रासदायक आहे हे सांगणारा. तिने पावसावर कविता लिहिणाऱ्या तमाम कवींची खिल्ली उडविली होती, व म्हटले होते की पावसाला यायचेच असेल तर त्याने गावात यावे. पण इथे शहरात तो नको. तो चिखल, तो दमट चिकचिकाट, ते भिजणे अन् ते सर्दी-पडसे! माझा लेक जो अस्सल शेतकरी आहे तो हा लेख वाचून भडकला. “अरे थट्टेतले आहे ते लिहिणे” माझे त्याला समजावणे. “तसे असेल तर ती थट्टा जीवघेणी आहे. खरेच त्या बाईच्या शहरात दोन-चार वर्षे पाऊस न पडू दे, मग तिचा आनंद कुठे टिकून राहील ते मी बघतोच.” लेकाचे फणफणत दिलेले आव्हान.
कृषिमंत्री जेव्हा म्हणतात, “शेतीला पर्याय शोधायला हवा, शेती सगळ्यांना पोसू शकत नाही.” तेव्हा मला हाच प्रश्न पडतो की, शेतीला पर्याय असू शकतो का? शेती हा काय उद्योग आहे? शेती हे तर जीवन आहे. शेतीच तर सगळ्यांचे पोषण करीत आहे. सोने-हिरे झाले काय नि कार किंवा कॉम्प्युटर असले काय, आपण खातो भाजीभाकरीच. खरी लक्ष्मी अन्नधान्यच आहे. दिवाळीत नवे धान्य घरी येते त्या लक्ष्मीची पूजा आपण करायला हवी. विनोबा म्हणतात, “शेतकीतून मिळालेले थोडेसुद्धा ‘बहु’ आहे, कारण ते थोडे झाले तरी नवीन पैदाशीचे आहे. बुद्धी विकण्याचे व्यवसाय करून धनाचे ढीग मिळविले तरी त्यात नवीन कमाई नाही. द्रव्याचे नुसते स्थलांतर आहे. त्याने एक पिशवी भरल्याने दुसरी पिशवी रिकामी होण्यापलीकडे जगाच्या समृद्धीत भर अशी पडत नाही, परंतु शेतकऱ्याच्या कमाईच्या हर एक कणात साक्षात् लक्ष्मीचा निवास आहे. लक्ष्मी निराळी, पैसा निराळा. पैसा काय, चोरीने मिळतो, लुटीने मिळतो, सट्टेबाजीने मिळतो, लबाडीने मिळतो, तोंडपाटिलकीने मिळतो, दंडुक्याने मिळतो, राजाच्या शिक्क्याने मिळतो आणि कशाने मिळत नाही? पण लक्ष्मीचा एक कणही मिळविण्याचे सामर्थ्य फक्त शेतीत आहे.
आता याचे भान जर नसले तर सर्व प्रकारचे अर्थशास्त्र अनर्थशास्त्र ठरते. आज मोठमोठ्या शहरांत राहणारे लोक शहरालगत प्लॉटस घेऊन तिथे घर बांधतात, शहरात जीव उबला म्हणजे मोकळ्या हवेत जाता यावे यासाठी. ही घरे बांधायला ज्या विटा बनविल्या जातात त्यासाठी उत्कृष्ट पोयट्यांची माती वापरली जाते, जी बनायला शेकडो वर्षं लागतात. या पोयट्याच्या मातीशिवाय शेती होऊ शकत नाही, शिवाय या विटा भाजायला लागणारे लाकूड मिळवायला परिसरातली सर्व झाडेझुडपे वापरण्यात येतात.
शहराच्या आसपासची शेकडो किलोमीटर परिसरातली जमीन या कारणांमुळे ओसाड झाली आहे. पावसाचे पाणीही अशी जमीन धरून ठेवू शकत नाही, त्यामुळे त्या परिसरातील नैसर्गिक जलस्रोतही आटतात. जे लोक हे तथ्य जाणतात, म्हणजेच जे शेतीसाक्षर आहेत त्यांनी याला पर्याय शोधायचे प्रयत्न केलेत किंवा असेही म्हणता येईल की असे पर्याय आजही गावोगावी प्रचलित आहेत. पण आजच्या बिल्डर्सना व नागरिकांनाही याची जाण नाही, कारण ते शेतीसाक्षर नाहीत. आहारशास्त्री आता असे मानतात की, ज्या परिसरात जे पिकते ते त्या त्या परिसरातील लोकांसाठी उपयुक्त असते. तसेच ज्या ऋतूत जी फळे, जे धान्य, जो भाजीपाला उपलब्ध होतो तो त्यावेळी आरोग्यदायी असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर उन्हाळ्यात मिळणारी काकडी, टरबूज, खरबूज, कांदा, कैरी हे सर्व गर्मीमुळे आपल्या शरीरातून घामावाटे निघून जाणाऱ्या खनिजाक्षारांची पूर्ती करतात, तरतरी देतात. हिवाळ्यात पचन उत्तम असते. अशा वेळी तीळ, शेंगदाणे, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, मूग, उडीद, तूर अशी त-हेत हेची धान्ये, भरपूर फळे व भाज्या उपलब्ध होतात. यावेळी थंडीच्या मदतीने शरीर सर्व पोषक द्रव्ये शरीरात साठवून ठेवते. तसेच विदर्भात बोरे-पेरू, चारोळी मिळते, तर बदाम, सेब बाहेरून मागवायची गरज नाही. म्हणजेच कोणत्या ऋतूत काय पिकते व कुठे काय मिळते हे लक्षात घेतले तर बरेचसे आहारशास्त्र कळते. या सर्व उदाहरणांवरून लक्षात येते की, जीवनाशी संबंधित बहुतेक सर्व शास्त्रांचा शेतीशी संबंध आहे, म्हणून शेती हा एक विषय अभ्यासक्रमात ठेवण्याऐवजी शेतीच्या माध्यमातून अनेक विषय शिकविता येतात.
अगदी बालवाडीतल्या मुलाला विविध प्रकारचे बियाणे हाताळायला देता येते, इतके सुंदर आणि वेगवेगळे आकार असतात बियांचे! चपटे, गोल, चौकोन, त्रिकोण, दंडगोल, नक्षी असलेले, रंगही आकर्षक. लाल मसूर, हिरवे मूग, पांढरी ज्वारी, काळे उडीद.
पुढे पहिलीत तीच बियाणे मोजणे, पेरल्यावर किती उगवले ते बघणे, कोवळी पाने, जरड पाने, त्यांचे आकार-प्रकार, रंग पाहणे, त्याबद्दलची एखादी कविता शिकणे, त्या धान्याचे नाव लिहिणे… भाषा, वनस्पतिशास्त्र, गणित सारेच त्या आधारे शिकणे शक्य आहे. पुढे शेतीच्या अवजारांच्या आधारे त्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेबद्दल सांगताना भौतिकशास्त्र ; पिकांच्या वाढीसाठी लागणारी रसायने, जी निसर्गातून त्यांना मिळतात, ते समजावून देताना रसायनशास्त्र ; शेतीसाठीच्या शत्रू-किडी, मित्रकिडी, पशु-पक्ष्यांची शेतीला होणारी मदत व अडथळे, निसर्गाची परिपूर्ण संरचना यांच्या मदतीने जीवशास्त्र, अशी सर्व शास्त्रांची ओळख सातवीपर्यंत तरी प्रत्यक्ष शेतीतल्या क्रिया करताकरता होणे शक्य आहे. पुढे ज्याला जे विषय विशेषकरून शिकायचे असतील त्यांना आठवीपासून तसा अभ्यासक्रम निवडता येईल.
असा प्रयोग सेवाग्राम, वर्धा येथील आनंद निकेतन विद्यालयात सुश्री सुषमा शर्मा व त्यांचा चमू करीत आहेत.
शाळा-शाळांमधून असा अभ्यासक्रम राबवायचा असल्यास त्यासाठी लागणारी जमीन खेडेगावात गावकऱ्यांना मागता येईल. शहरात अशी जागा मिळणे कठीण असेल तर कुंड्या, गच्ची यांचा वापर करता येईल. आठवड्यातील एक दिवस शेतावर सहल काढणे, शेतकयांसोबत शेतातील कामे करू लागणे, उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत शेतावर शिबिरे आयोजित करणे असेही नियोजन करता येईल. असे प्रत्यक्ष कृती करताकरता मिळालेले शिक्षण मनोरंजक तर असतेच पण ते कधीच विसरले जात नाही. तो माणूस कुठेही काम करीत असो, त्याची दिशा चुकत नाही.
मी एकदा रासायनिक कीटकनाशकांच्या दुष्परिणामांवर संशोधन करून कोणत्या कीटकनाशकांवर बंदी आणली जावी त्याबद्दल काम करणाऱ्या संस्थेत पोहोचले. कोणत्या कीटकनाशकांनी आपल्या शरीरातील कोणत्या हाडांवर, स्नायूंवर काय दुष्परिणाम होतात यावर तिथे संशोधन सुरू होते. तो प्रचंड खटाटोप पाहून मी त्यांना म्हटले, “कोणतेही रासायनिक कीटकनाशक हे वाईटच, त्यामुळे ते वापरूच नये यावर तुम्ही काही विचार केला आहे का?” त्याना ते शक्य वाटेना. मग मी त्यांना सांगितले की, आमचा अनुभव सांगते (गेली २५ वर्षे आम्ही रसायनमुक्त शाश्वत शेती करतो) “रासायनिक खते वापरल्याने झाडे नाजूक बनतात, त्यांच्यावर रोगांचे-किडींचे आक्रमण जास्त होते, मग रासायनिक कीटकनाशके वापरावी लागतात. ही कीटकनाशके शत्रू व मित्र अशा दोन्ही किडींचा नाश करतात, अन् सगळे नैसर्गिक संतुलन बिघडवून टाकतात, पण हायब्रिड बियाणे खादाड असते, रासायनिक खताशिवाय त्याचे भागत नाही. म्हणून मग स्थानिक बियाणे वापरायला हवे. ते रासायनिक खताशिवायही सातत्याने स्थिर उत्पन्न देते. निसर्गस्नेही पद्धती वापरून त्यात वाढही करता येते. अशा पिकांवर मग रोगांचेही आक्रमण फारसे होत नाही. जे होते ते मित्रकिडी, पक्षी वगैरेंनी नियंत्रित होते. हा झाला माझा अनुभव. तुम्ही शास्त्रज्ञांनी या दिशेने संशोधन केल्यास सर्वसामान्यांच्या ते उपयोगाचे होईल.” त्यावर ते लोक म्हणाले, “तू जमिनीवर काम करतेस म्हणून समस्या मुळापासून उखडून टाकायचा विचार करतेस. आमची सुरुवात फांद्या छाटण्यापासून होते.”
आजच्या शिक्षणाची हीच शोकांतिका आहे. त्यावर विचार सगळा तुकड्यातुकड्यात होत असतो. संपूर्ण असे काहीच नसते, त्यामुळे पहिलीदुसरीच्या मुलांनाही अभ्यासाचा ताण येतो. तरुणांच्या मनात ‘पुढे काय?’ या विचाराने पोकळी निर्माण होते. त्यातून निराशा, मानसिक असंतुलन, आत्महत्या यांचे प्रमाण वाढत जाते किंवा त्यांच्या मेंदूचा ताबा हिंसा नि आक्रोश हे घेतात. त्यातून दहशतवाद फोफावतो.
शेती म्हणजे सृजन. जे शेतीच्या सान्निध्यात असतात, जे मातीचा स्पर्श अनुभवतात, किड्यामाकोड्यांचे अद्भुत विश्व न्याहाळतात, स्वतः लावलेले झाड वाढताना, फळे-फुले लागताना बघून खूष होतात. त्यांच्या ताणाचा निचरा सहज होतो. मनातले हिंस्र विचार गळून जातात. कोणी म्हणेल मग शेतकरी आत्महत्या का करतात? कारण ज्याला काहीच पर्याय नाही ते शेती करतात अशी मानसिकता/परिस्थिती आज आहे. जे कृषिमहाविद्यालयात शिकतात तेही शेती करीत नाहीत, त्यामुळे अशिक्षित वा इतरत्र संधी नसणारे शेतीकडे वळतात. मजूरही जे इतरत्र रोजगार मिळवू शकत नाहीत तेच शेतीची कामे करतात. जर शिक्षणात शेतीला प्राथमिकता दिली गेली, प्रत्यक्ष काम करायचेही शिक्षण मिळाले तर पुढे शेतमालावर प्रक्रिया करणेही शेतकऱ्याला जमू शकेल. स्वतःला लागणारी अवजारे ते बनवू शकतील. शुद्ध बियाण्यांसाठी कंपन्यांवर अवलंबून राहायची पाळी येणार नाही. दहावीपर्यंत शिकलेला खेड्यातला मुलगा शेतीसंबंधीची आकडेमोड करू शकेल. काय केल्यास नुकसान येणार नाही, कुठे जास्त खर्च होत आहे, हे त्याला कळू शकेल. शेतीसंबंधी येणारी विविध माहिती वाचून नियोजन करणे त्याला जमू शकेल.
आज कपाशीला रोग झाला की तो फवारण्या करीत सुटतो. त्या फवाऱ्याने किडे मरतात की माणसे मरतात याचा विचारही तो करत नाही. बीटी कापसाने कीड येत नाही, या प्रचाराला तो बळी पडतो. पण बीटी म्हणजे काय? एकूण निसर्गाची रचना कशी आहे? मित्रकिडी कोणत्या, शत्रूकिडी कोणत्या, नैसर्गिकरीत्या किडींचे एकात्मिक नियंत्रण कसे करता येते, याची प्राथमिक माहिती जर त्याला शिक्षणातून मिळाली असेल तर तो पुढचे ज्ञान स्वतः मिळवून आत्महत्येपासून स्वतःला वाचवू शकेल. एकूणच शेती जर शिक्षणाचा पाया बनली, म्हणजेच शेतीचे जीवनात असलेले महत्त्व समाजाने मान्य केले, शेतकऱ्याला प्रतिष्ठा लाभली, सुजाण सुशिक्षित लोक विचारपूर्वक शेतीकडे वळले, शेतमालक स्वतः शेतात राबू लागले तर इतरांनाही आपण नाइलाजाने शेती करतोय असे वाटणार नाही. __ आपले नियोजनकार, शास्त्रज्ञ यांच्या ज्ञानाचा पाया शेती असल्यावर आजच्यासारखे हव्यासावर आधारित अर्थशास्त्र तयार होणार नाही, तर निसर्गाची रचना समजून घेऊन समाज समाधानी व तृप्त कसा राहील याचा विचार व त्या दिशेने संशोधन मग होऊ शकेल. रासायनिक शेती व जीएम बियाण्यासारखे निसर्गावर आक्रमण करणारे तंत्र मग विकसित केले जाणार नाही. तसे झाल्यास ग्लोबल वॉर्मिंग, दहशतवाद, वेगाने पसरणारे मधुमेह, हृदयरोग व कॅन्सरसारखे हव्यासामुळे निर्माण झालेले आजार यांच्यावर नियंत्रण मिळविता येईल.
असा अभ्यासक्रम सर्वांसाठी केव्हा उपलब्ध होईल सांगता येत नाही. तरीही ज्या कोणाला विचारपूर्वक शेतीकडे वळायचे असेल, शाश्वत जीवनशैली स्वीकारायची असेल, ती शिकून, समजून घ्यायची असेल त्यांचे आमच्या शेतावर स्वागत आहे.
दूरध्वनी : ०७२२९-२०२१४७