‘निर्माण’

मी हृषिकेश सध्या पुण्यामध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागातून येताना काही पुसट स्वप्नेही पाहिली होती. मात्र या सगळ्यात स्वतःला हरवून बसलो आहे, असे नेहमी वाटायचे. ज्या गोष्टी करण्यात मला आनंद यायचा नाही त्या स्वीकाराव्या लागायच्या, किंवा समाजाने तयार केलेल्या चौकटबद्ध जीवनपद्धतीत अडकल्याचा भास व्हायचा. समाज म्हणजे काय? समाजासाठी काही करावे! असे काही मनात आलेही नव्हते. परंतु पुढे वाचन केले. काही संस्थांची कामे पाहिली किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेतला. यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला, पण संधी निर्माण झालीच नाही. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली. निर्माण : युवांसाठी शोध व विकासक्रम म्हणजे युवांसाठी शिबिरांची मालिका आहे. पुढे शिबिरासाठी निवड झाली, तेथपासून आजवर झालेले स्वतःमधील बदल व निर्माणचा प्रवास सांगतो आहे.
निर्माणः हा गडचिरोली येथील डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या सर्च -शोधग्राम मध्ये वेगवेगळ्या विषयांतील चार शिबिरांच्या मालिकेतून शिक्षण घेतलेल्या युवांचा गट आहे. ती एक शैक्षणिक प्रक्रियाही आहे. संवेदनशील आणि स्वयंसेवी वृत्तीने काम करू पाहणाऱ्या, स्वतःसमवेत समाजात काही सकारात्मक बदल घडवू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील कृतिशील युवांचा हा गट आहे. निर्माणच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांचा अभ्यास केला जातो. समाजाच्या प्रश्नांकडे सहृदयतेने बघून परिस्थिती बदलून एक चांगल्या प्रकारचे जीवन निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे, असे निर्माणचे सदस्य मानतात. समाजरचनेच्या शेवटच्या स्तरावरील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तारुण्यात काही नवीन करावेसे वाटल्यास अनेक प्रश्न समोर येतात. काही प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण यातील बहुतेक प्रश्न अंतिमतः अनुत्तरितच राहतात. व्यक्तिगत ताकद कमी पडत असल्याने समविचारी लोकांची आवश्यकता भासते. मी कसा आहे किंवा माझा स्वभाव काय? अथवा माझ्या जीवनाचे ध्येय किंवा स्वधर्म काय? माझे हे तरुण शरीर, माझे मन आणि माझ्या गोंधळात भर टाकणाऱ्या मागण्या यांचा आपण कितपत विचार करतो? बहुधा सध्याच्या जागतिकीकरणाच्या आणि फक्त स्वतःचाच आर्थिक विकास करू पाहणाऱ्या प्रवाहासोबत आपण जात तर नाही ना? समाजाप्रति आपली काही कर्तव्ये आहेत याची आपल्याला जाणीव व्हायला हवी. यामधूनच निर्माण या युवा संघटनेचा उदय होतो आहे.
निर्माण अंतर्गत मुख्यतः चार शिबिरांची मालिका (प्रत्येकी सहा महिन्याच्या अंतराने) सर्चमध्ये होत असते. स्वतःसमवेत समाजाचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्राच्या बहुतेक भागातून आलेले अगदी तरुण व आदिवासी कार्यकर्ते, कोणत्याही प्रकारे जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग याची विषमता न मानता पण आधुनिक, शास्त्रनिष्ठ, सत्याग्रही, चिकित्सक, संशोधनातून समाजपरिवर्तन करू पाहतात.
म्हणजेच निर्माण हा समाजपरिवर्तनाच्या सफरीवर निघालेल्या युवक-युवतींचा शिक्षण देणारा, आत्मविश्वाससंपन्न, विधायकरीत्या बंडखोर पण सर्जनशील व्यक्तिमत्त्व बनवणारा अभ्यासक्रम म्हणता येईल. या शिबिरांतील मुख्य विषय खालीलप्रमाणे होते. १) जीवनशिक्षण – लैंगिकशिक्षण, प्रजनन आणि सहजीवन २) समाज व सृष्टी माझे नातेसंबंध व जबाबदारी ३) ग्रामीण भागाचा अभ्यास व अनुभव आणि निर्माणचे पुढचे स्वरूप ४) निर्माणचे संघटनात्मक स्वरूप व कृती कार्यक्रम
निर्माण संघटनात्मक स्वरूप व कृती कार्यक्रम निर्माण अभ्याक्रमातील पहिल्या शिबिराचा अभ्यासविषय होता. जीवन-शिक्षण ड्ड लैंगिक शिक्षण, प्रजनन व सहजीवन या शिबिरात अम्मा (डॉ. राणी बंग) सर्वांशी खुलेपणाने संवाद साधत असल्याने सुरुवातीला लैंगिक शिक्षण हा विषय समजावून घेताना वाटणारा संकोच कमी होत गेला. ही माहिती शिक्षक, पालक मुलांना करून देत नाहीत. कदाचित त्यामुळे इंटरनेट ब्ल्यूफिल्म्स, मासिके यातून ‘समजणारा’ हा विषय घृणास्पद समजला जातो. वयात येणे, मासिक पाळी, गरोदरपण, बाळंतपण, कामजीवन, बेजबाबदार लैंगिक वर्तन, प्रेम (एकतर्फी प्रेम) गर्भपात इ. विषय वैज्ञानिक दृष्टिकोनातून, खोलातून अनुभवातून मांडले गेल्याने निकोप माहिती समजली.
सहजीवन हा विषय आयमॅब्स (ISABS) या संस्थेच्या वैज्ञानिक अतिथींकडून कार्यशाळेच्या स्वरूपात समजला जातो -अर्थातच थोडासा गोंधळात टाकणारा विषय. हा प्रामुख्याने भावना (feelings), जाणिवा आणि कामजीवन यावर आधारित होता. नातेसंबंध हे अगदी भावनिक व संवेदनशील वृत्तीने हाताळत स्पर्शातून, संवादातून देहबोलीवरून भावना व्यक्त करण्याचे तंत्र मिळते. यातूनच शिबिरार्थी भावनिक पातळीवर एकत्र होतात. निसर्गासोबत एकरूप होताना खेळ, गाणी यांमधून चित्रउभारणीचे तंत्र, Visualisation Technique विकसित होते.
निर्माणचे दुसरे शिबीर समाज आणि सृष्टी : माझे नाते व जबाबदारी असे होते. या सत्रात आंतरिक शोधासमवेत आरोग्य, समाज, निसर्ग, शेती, पाणी, जग, संशोधनातून परिवर्तन, आदिवासीजीवन, इ. विषय समजावण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्तींनी साधलेला संवाद खूप अर्थपूर्ण आणि प्रेरणादायक होता. याशिवाय आंतरिक शोधासाठी आयसॅब्स संस्थेतर्फे कार्यशाळा होती. यात स्वतःचे मन, माझ्यापासून समाजापर्यंतची विविधता, एकटेपणा, वंचित समजल्या जाणाऱ्या घटकांचे जीवन स्वतः त्या भूमिकेतून समजावून घेणे, गरजा (पशशवी), स्वतःचे विशेष हक्क, यांवर कार्यशाळा होती. जागतिकीकरण स्त्री-पुरुष समानता, आरोग्याचा प्रश्न, शेती, पाणी इ. विषय कुमार केतकर, ज्योती म्हापसेकर, डॉ. अभय बंग, डॉ. आनंद कर्वे, विजय जावंधिया, डॉ. राजेंद्रसिंग यांनी समजावून दिले. सामाजिक प्रश्न सोडविताना संशोधनाचा वापर इथपासून आदिवासींपर्यंत जाणे आणि स्वतःच्या आंतरिक शोधापासून अर्थपूर्ण जीवनाचा
शोध घेणे यांवर कामे झाली.
निर्माण तीन ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव व अभ्यास आणि निर्माणचे भविष्यातील स्वरूप यांवर होते. हे सत्र भारतीय खेडी प्रत्यक्ष बघा – भोगा आणि बोला, या स्वरूपाचे असल्याने ग्रामीण व्यवस्थेचा अनुभवच शिबिरार्थीना दिला जातो. या खेड्यांतील वास्तव्यात शिबिरार्थीस भिडणाऱ्या मुख्य तीन समस्या ओळखायच्या होत्या, आणि त्यावर प्रत्यक्ष काम सुरू करण्यासोबत निर्माणचा भविष्याचा वेध घ्यायचा होता. शिक्षण, शेती, आरोग्य, व्यसन, प्रशासन व कायदा, Appropriate Technology असे महाराष्ट्रीय व स्थानिक पातळीवर गट करून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. या सत्रास मार्गदर्शन रमेश पानसे, डॉ. अभय बंग, अरुण देशपांडे, दत्ता बाळसराफ, अनिल शिदोरे, इत्यादींचे होते.
निर्माणचा चौथा टप्पा जानेवारी २००८ पहिल्या आठवड्यात पूर्ण झाला. निर्माणच्या आतापर्यंतच्या शिबिरांचे व प्रक्रियेचे माझ्या बाबतीत फलित काय हे तपासते आणि निर्माणच्या संघटनात्मक स्वरूपासोबत पुढील कृती कार्यक्रम ठरविणे. सदर सत्रात निर्माण व स्वतःच्या जीवनाचे ध्येय (mission) आणि उद्दिष्ट (goal) यांचा शोध घेण्यावर चर्चा झाली. संशोधनाच्या पद्धतींचा सविस्तर अभ्यास, शिबिरार्थीचा स्वतःचा सामाजिक कृती कार्यक्रम, बदल घडविणाऱ्यांची भूमिका इ. विषय हाताळले गेले. निर्माण संघटना म्हणून उभी राहताना संघटनेची भूमिका आणि उद्दिष्टे, रचना, जीवनशैली, सामाजिक कामात कुटुंबाचे कार्य इत्यादी प्रश्नांवर शिबिरार्थीनी निर्णयात्मक पातळीवर चर्चा केली. या सत्रास मुख्यतः विवेक सावंत, डॉ. अभय बंग, अनिल शिदोरे, दत्ता बाळसराफ मार्गदर्शक होते.
निर्माण विकासक्रमातील शिबिरामधल्या सहा महिन्यांच्या काळात शिबिरार्थीना स्वतःला तपासायची संधी मिळते, यातून स्थायी विकासाची कल्पना समजली. आपण प्रत्यक्ष समाजात पाहतो की समाज आणि समाजाचे प्रश्न सोडविणारे वेगळे दिसतात. तर मग सामान्यजनच समाजपरिवर्तन करणारे का होऊ शकत नाहीत? सामान्यजन स्व किंवा फक्त स्वतःचा विकास या चक्रव्यूहात इतके अडकतात की स्व आणि समाज या पूर्णपणे विभिन्न गोष्टी झाल्या आहेत. ‘मायबाप’ या संकल्पनेतून आपण केव्हा सुटणार? मी कोण आहे यापेक्षा मी कोणाकोणाचा आहे याचे गांभीर्य समोर येऊ शकते.
दररोज असंख्य सामाजिक प्रश्न प्रत्यक्ष दिसतात. यांतील काही प्रश्नांवर निर्माण चा युवा गट प्रत्यक्ष काम करू पाहतो आहे. संशोधन, सेवा, शिक्षण व संवाद यातून परिवर्तन होत असल्याने हे चार मार्ग निर्माण च्या जीवनशैलीत समाविष्ट आहेत. संशोधन हे सामाजिक प्रश्न सोडविण्याने प्रभावी ठरत असल्याने एखादी समस्या समजावून न घेऊन ती सोडविण्यासाठी स्वतःची बुद्धी, कल्पकता, व्यवहारज्ञान, अभ्यास आणि इतर काय करायला हवे याचा अंदाज आल्यास प्रश्न सोडविता येऊ शकतात. यासाठीच लोकांमध्ये जाणे, पाहणे, शिकणे आणि लोकांना सोडवून हव्या आहेत त्या समस्या सोडविणे शक्य होते.
आमचा अनुभव हा सर्वांचा होऊ शकतो. मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स म्हणतो डढहळपसी श लेपीळवशी ती शिीीपरश्र रीश हिश ीं सशपशीरश्र. अमुक एक गोष्ट फक्त मीच अनुभवतो, असे मला वाटत; परंतु नेमकी तीच गोष्ट प्रत्येकजण अनुभवत असतो. निर्माण युवा संघटने त सामाजिक जाणीव झाली व एकमेकांसोबत असलेली भावनिक जोड जाणवली. माझा जीवन जगण्याचा हेतू समजला. स्वतःसमवेत समाजासाठी काही करणाऱ्या युवक-युवतींसाठी ही एक संधी आहे. या युवा गटाने काही सामाजिक कार्यक्रम हाती घेतले आहेत.
Friends, ultimately its we who make the difference.
[ निर्माण योजनेवर पुढे एक विश्लेषणात्मक विशेषांक काढायची योजना आहे. सध्या त्या योजनेची तोंडओळख या लेखातून करून देत आहोत. ] निर्माण, द्वारा, सर्च, गडचिरोली.