ई!

२६ फेब्रुवारी ‘०९ च्या लोकसत्ता मध्ये प्रशांत मोरे यांचा मराठी मासिकांची ग्लोबल स्पेस! हा लेख आहे. त्याचा मुख्य भाग असा.
निरनिराळी प्रसारमाध्यमे वरकरणी एकमेकांना मारक ठरत असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात ती परस्परपूरक असतात. माध्यमांचे हे “एकमेका साह्य करू’ धोरण सध्याच्या बदलत्या काळात काहीशा मागे पडलेल्या मराठी भाषेतील मासिक स्वरूपात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांना अनुकूल ठरल्याचे दिसत आहे. पुणेस्थित साची वेबनेट प्रा. लि. या कंपनीने ‘मायईमॅगझिन्स डॉट कॉम’ नावाचे संकेतस्थळ इंटरनेटच्या महाजालात मराठी मासिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यानिमित्ताने माध्यमांच्या कोलाहलात कसेबसे तग धरून राहिलेल्या मराठी मासिकांना चक्क ग्लोबल स्पेस मिळाली आहे. या एकाच पत्त्यावर महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून प्रसिद्ध होणारी मासिके वाचायला मिळणार आहेत. त्यामुळे जगभरातील मराठीजनांना आपापल्या संगणकाच्या डेस्कटॉपवर मराठी मासिके पाहता येतील. एरवीही काही अपवाद वगळता मराठी नियतकालिक विश्वातील मासिकांची स्थिती फारशी चांगली नाही. दिवाळी विशेषांकांचा अपवाद वगळता ९० टक्के मासिके स्टॉलवर विक्रीसाठीही ठेवली जात नाहीत. सार्वजनिक वाचनालयांमध्ये काही मासिके नियमितपणे येतात. याशिवाय टपालाने वर्गणीदारांपर्यंत अंक पोहोचविले जातात. मासिकांच्या माध्यमातून होणाऱ्या साहित्य व्यवहाराला आता पूर्वीची रया राहिलेली नाही. याचा अर्थ मासिकांमधून सकस साहित्य प्रसिद्ध होत नाही असा नव्हे. अनेकदा खूप चांगले फीचर्स आणि रिपोर्ताज असूनही ते अनुल्लेखाने मारले जातात. पूर्वी याच्या अगदी उलट परिस्थिती होती. मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरलेली विविध पुस्तके आधी मासिकांमधून क्रमशः प्रसिद्ध झालेली आहेत. पुढील काळात मासिकांचा हा प्रभाव हळूहळू कमी झाला. बरीच मासिके दिवाळी अंकाच्या नफ्यातून कसेबसे वर्षभरातील तोटा सहन करीत नियमितपणे प्रसिद्ध होण्याची कसरत करीत असताना दिसतात. वाचकांचा फारसा प्रतिसाद नसल्याने गुणी लेखकांनीही मासिकांकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली. वाचक आणि लेखक हे नियकालिकांचे प्राण. त्यांचाच फारसा प्रतिसाद नसल्याने जाहिरातदारांनीही हात आखडता घेतला. या सर्व दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी मराठी मासिकांना या संकेतस्थळाने एक ग्लोबल खिडकी उघडून दिली आहे. गेले सहा महिने या संकेतस्थळावर निरनिराळी मासिके दाखल होत आहेत. मासिकांच्या संपादक/प्रकाशकांनी साची वेबनेटला फक्त अंकाची पीडीएफ फाईल पाठवून द्यायची आहे. ते संकेतस्थळावर प्रकाशित करण्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्याचप्रमाणे वाचकांनाही या संकेतस्थळावर रीतसर लॉगइन करून अगदी विनामूल्य हवे ते मासिक चाळता येणार आहे.
आज अनेक भारतीय वृत्तपत्रांच्या ऑनलाइन आवृत्त्या उपलब्ध आहेत. अमेरिकेत तर ही पद्धत फार वेगाने लोकप्रिय होत गेली आहे. या अमेरिकन आविष्काराचा (phenomenon) अर्थ लावणारा एक लेख टाइम साप्ताहिकाच्या २ मार्च २००९ च्या अंकात आहे. (How to Save Your Newspaper, Walter Isaacson) आयमॅकसन टाइम चे माजी संपादक आहेत. त्यातली काही तथ्ये अशी – क) १९९० मध्ये छापील वृत्तपत्रांचा वाचक वर्ग ६.३ कोटी होता, तो २००७ मध्ये ५.१ कोटीच उरला. ख) २००४ मध्ये दररोज सरासरीने १४ लाख लोक ऑनलाइन वाचत असत. ऑक्टोबर २००८ मध्ये हा आकडा २३ लाख झाला. ग) सोबतच जाहिरातींमधून होणारे उत्पन्न घटत गेले आहे. २००४ मध्ये दरसाल दोनेक टक्क्यांनी वाढणारे छापील आवृत्त्यांचे जाहिरात उत्पन्न २००८ पर्यंत दरसाल एकोणीस टक्के घटू लागले आहे. याच काळात ऑनलाइन जाहिरात-उत्पन्न ३०-४० टक्के वाढीऐवजी तीन टक्के घट दाखवू लागले आहे. घ) यामुळे अनेक मान्यवर वृत्तपत्रे नादारीचे अर्ज करू लागली आहेत (दिवाळखोर होऊ लागली आहेत) लॉस एंजलीस टाइम्स व शिकागो ट्रिब्यून ही प्रमुख नावे आहेत. ख्रिश्चन सायन्स
मॉनिटर ने छापील आवृत्ती थांबवून ऑनलाइनच सुरू ठेवली आहे. डीट्रॉइटची दोन वृत्तपत्रे आठवड्यातून तीनदाच छापली जातात. सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल ने कठोर काटकसर सुरू केली आहे –
पहिला बळी अर्थातच स्वतः वार्तासंकलन करण्याचाच दिला जातो. च) प्यू रीसर्च सेंटर च्या अभ्यासानुसार २००८ साली कधीतरी वृत्तपत्र वाचकांपैकी पैसे देणाऱ्यांच्या (छापील आवृत्त्या वाचणाऱ्यांच्या) संख्येपेक्षा फुकट वाचणाऱ्यांची संख्या (ऑनलाइन वाचकांची) संख्या जास्त झाली.
आयमॅकसन आपल्या विश्लेषणात म्हणतात -वृत्तपत्रांच्या उत्पन्नाचे तीन पारंपरिक स्रोत म्हणजे न्यूजस्टैंड-विक्री, वर्गणीदार आणि जाहिराती. नव्या व्यापारी प्रतिमानात (Business model मध्ये) यांपैकी एकावरच भर आहे. तो एक पाय कितीही मजबूत झाला तरी तिपाई डुगडुगणारच – मंदीमुळे अनेक प्रकाशकांना अशी तिपाई उभी राहूच शकत नाही हे जाणवले.
बरे, न्यूजस्टँड असो की वर्गणीदार यादी, पैशाचा व्यवहार वाचक व नियतकालिक यांच्यात असतो. नियकालिक मजकूर पुरवते व मोबदल्यात पैसे घेते. मजकुरात नियतकालिकाच्या स्वभावाप्रमाणे वार्ता-माहिती असते, ललित साहित्य असते, वृत्तविश्लेषण असते, इतर ललितेतर साहित्य असते इ. इ. आज या साऱ्याला कंटेट (content) म्हटले जाते.
कल्पना अशी आहे की नियकालिकाचा खप मजकूर, कंटेंट याप्रमाणे ठरतो, आणि जाहिरातदार या खपाच्या पाठीवर स्वार होऊन संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचतात. हे नियकालिकांच्या सुरुवातीच्या काळात तरी खरे होते. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर इंग्रजी राजवटीत अनेकानेक नियकालिके आपापल्या व्यक्तिमत्त्वानुसार मजकूर छापून प्रांताच्या कोन्याकोपऱ्यांपर्यंत जात असत. जाहिरात ही बाबच नसे. मग व्यापार वाढला. त्याला जाहिरातींची गरज भासू लागली. नियकालिके पूरक उत्पन्नासाठी जाहिराती छापू लागली. युरोप-अमेरिकेत हे आधीच घडून गेले होते. गेल्या शतकात तर जाहिरातींचे महत्त्व इतके वाढले की त्या शेपटीने कुत्र्याला हलवणे सुरू झाले. मार्शल मॅक्लुहान हा माध्यमशास्त्री तर म्हणे मजकुराला जाहिरातींमधले भरताड, द स्टफ बिट्वीन द अॅड्ज, म्हणू लागला. तिपाईचा एकच पाय हत्तीपाय होऊ लागला!
कधीकधी तर जाहिरातींपासूनचे उत्पन्नच उरले, व नियतकालिके फुकट वाटली जाऊ लागली. फ्रान्समधील अशा एका दैनिकाचा संदर्भ जॉर्ज ऑर्वेल पुरवतो – १९२०-३० या काळातला. ज्यांना वाचकांचे महत्त्व वाटत असे, मजकुराची चाड असे, त्यांना हे रुचत नसे. आयमॅकसन नोंदतो – टाइमचा सहसंस्थापक हेनरी ल्यूस याला जाहिरातींच्याच उत्पन्नावर फुकट दिली जाणारी प्रकाशने तुच्छ वाटत. तसे करण्याला तो ‘नैतिकदृष्ट्या घृणास्पद” (morally abhorrent) आणि ‘आर्थिकदृष्ट्या आत्मघातकी’ (economically self-defeating) मानत असे.
फुकट नियकालिके पुरवणे, किंवा भरपूर अनुदानित नियतकालिके पुरवणे असामान्य नाही. वर ख्रिश्चन सायन्स मॉनिटर चा उल्लेख आला आहे. ते दैनिक आज फक्त ऑनलाइनच उपलब्ध आहे. याचा अर्थ जाहिरातींमधून (ज्या घटत आहेत) जे उत्पन्न होईल, त्यामधून जो मजकूर उत्पादित करता येईल, तेवढाच फक्त हे दैनिक पुरवणार. जाहिरातदारांना ख्रि.सा.मॉ. चा वाचकवर्ग पूर्णपणे बांधील (committed) आहे असे वाटेल, तोवर ऑनलाइन जाहिराती मिळतील. ख्रिश्चन सायन्स हा अवैज्ञानिक असा गूढवादी (mystical) पंथ आहे -भारतातील अनेक स्वामी, बुवा इत्यादींच्या पंथासारखा; पण तरीही भरपूर सेक्युलर मजकुराचे वृत्तपत्र चालवणारा. पण मजकुराचा दर्जा व व्याप्ती खालावणार. आर्थिक मंदीने जाहिरात उत्पन्न खालावणार. हे दुष्टचक्र भेदू शकले, तर ख्रि.सा.मॉ. तगणार. नाहीतर मात्र ते बंद पडणार. यात वाचकाला गृहीत धरणे आहे – बांधिलकी हे या गृहीत धरण्याचे सौम्य आणि गुलाबी वर्णन आहे.
हे टाळायचे काही इलेक्ट्रॉनिक मार्ग आयमॅकसन सुचवतात. पण आज तसे मार्ग नीटसे, सहजपणे उपलब्ध असणारे नाहीत, हेही लेखात नोंदले आहे.
यासोबत एक काल्पनिक जाहिरात आहे
खाली संपादकीय टिप्पणी आहे – अनेक लोकांनी आजच ही जागा भरण्यात रस दाखविला आहे.
आयमॅकसन मजकुरासाठी पैसे देणेघेणे आवश्यक का, हे स्पष्ट करतात – लहानपणी मी आणि माझा मित्र थॉमस मासे पकडायला जात असू. थॉमस पेट्रोलपंपाजवळील बर्फ पुरवणाऱ्या यंत्रांमधून कधीकधी बर्फ चोरत असे. त्याचे म्हणणे होते की बर्फ फुकटच हवा. जर बर्फ फुकट द्यायचा असेल, तर कोणी बर्फ बनवेलच का, याचा विचार आम्ही करत नसू. सुदैवाने आम्ही मोठे होऊन त्या भूमिकेबाहेर पडलो. आज जे मजकूर फुकट पाहू-वाचू इच्छितात, त्यांनी विचार करावा, की (तसा मजकूर पुरवायला) बगदादमध्य ब्यूरो कोण उघडेल, किंवा रवांडात प्रतिनिधी का नेमेल.
माझी मुलगी इंटरनेटवरील मजकूर, संगीत आदींसाठी पैसे मागू पाहणाऱ्यांना ‘दुष्ट’ (evil) म्हणते. मी दुष्टाव्यातून मजकुरासाठी पैसे मागत नाही. माझी मुलगी चांगली सर्जनशील आहे. पुढे तिच्या कामासाठी लोकांनी पैसे द्यायला हवेत, नाहीतर ती मला पैसे मागेल किंवा स्टॉकब्रोकर होईल.
आणि माझे वार्ताहरकीवर प्रेम आहे. मला तो पेशा मूल्यवान वाटतो. मजकुरासाठी पैसे घेतल्याने वार्ताहरांना शिस्त लागते, की वाचकांना मूल्यवान वाटणारा मजकूरच त्यांनी घडवायला हवा.
वाचकसंख्या वाढवायला छापीलपेक्षा इलेक्ट्रॉनिक पद्धत चांगली, व कमी खर्चाची, हे तर खरेच आहे. पण जो काही कमीत कमी, आणखी काटछाट करता येत नाही असा खर्च असतो, त्याची भरपाई करण्याचे मार्ग आज तरी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये नाहीत, व छापील माध्यमांमध्ये आहेत. येथे जाहिरातींमधून खर्च भरून काढणे दुय्यमच मानायला हवे, कारण तसे करणे खरोखरीच नैतिकदृष्ट्या घृणास्पद आहे. याबाबतच्या किस्से-कहाण्यांचा तुटवडा नाही. एकच उदाहरण नोंदतो –
काही वर्षांपूर्वी एका विख्यात प्रकाशनगृहाचा मालक काही कायदा मोडण्याच्या प्रकरणात सापडला. त्याकाळी ते प्रकाशनगृह दैनिकांपासून मासिकांपर्यंतची नियकालिके (अनेकवचन प्रत्येक टप्प्यावर!) काढत असे. सक्तवसुली विभागाने गुन्हेगाराचा ताबा घेतला. दोनतीनच दिवसांमध्ये काही जाहिरातदार-उद्योगगृहांच्या मालकांनी सरकारवर दबाव आणून प्रकाशकाला सोडवले. असे सांगतात (!) की तेव्हापासून त्या जाहिरातदार-उद्योजकांना काही सवलती मिळतात. त्या आर्थिक नाहीत. उद्योजकांबाबत वाईट बातम्या न छापणे, अशा स्वरूपाच्या त्या सवलती आहेत! हे प्रकार नेहेमीच घडतात असे नाही, तसेच ते अपवादात्मकही नाहीत. जाहिराती घ्यावा-न घ्याव्या, हा ज्या त्या नियतकालिकाचा प्रश्न असतो. पण जेव्हा जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न मजकुराच्या दर्जामुळे आकृष्ट होणाऱ्या वाचकवर्गणीशी तुल्य होऊ लागते, तेव्हा बोलविता धनी बदलतो -नोम चोम्स्कीने नोंदल्याप्रमाणे वार्ता-विश्लेषणाची जागा संमतीचे उत्पादन घेते (आसु जुलै-ऑगस्ट, २००५, अंक १६.४-५). आणि आजच्या जास्तजास्त केंद्रीभूत होत चाललेल्या व्यवस्थांमध्ये हा मोठाच धोका आहे.
आजचा सुधारक कडे मायईमॅगझीन्स डॉट कॉम कडून ‘ई होता का?’ अशी विचारणा आली आहे. “एवीतेवी मजकूरजुळणी तुम्ही करताच, मग इंटरनेटवर मासिक नेण्यात ज्यादा खर्च नसेल तर काय हरकत आहे?’ हा प्रश्न आमचे काही स्नेही, वाचक इ. आम्हाला विचारत असतात. आम्ही खर्च केलेलाच असतो, हे खरे आहे. परंतु जिथे आजीव वर्गणीदार १९९० साली (व त्यानंतरही) भरलेल्या तुटपुंज्या रकमेवरील आजची वर्गणी देण्यासही खळखळ करतात, तिथे केवळ ग्लोबल स्पेस कमावण्याची इच्छा धरावी का? आजवर वाढीव वर्गणी देणाऱ्यांची संख्या विसांवर गेलेली नाही, हे मुद्दाम नोंदतो. आजीव वर्गणीदाराचे निधन झाले, पण ते दीडेक वर्षे कळवलेच नाही, असाही एक प्रकार घडलेला आहे, हेही आज प्रथमच नोंदतो.
आजही आसु चा अर्थव्यवहार प्रामुख्याने वाचकवर्गणी व आजीव रकमेवरील व्याजातूनच होतो. स्नेहीसोबत्यांच्या (न मागितलेल्या पण आवश्यक) मदतीचा भाग दिवसेंदिवस वाढत आहे, हेही खरेच. मराठीतील एकाही वैचारिक मासिकाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. आज दहा कोटींवर असलेला मराठी माणूस सर्व वैचारिक मासिके मिळून दहा हजारही अंक विकत घेत नाही. ही स्थिती बदलावी यासाठी मराठी भाषिकव्यापी प्रयत्न करणे आसु च्या क्षमतेबाहेर आहे. आसु पुरते प्रयत्न नोंदतो –
अ) दर लेखकासोबत आठदहातरी वाचक वाढतात. यांपैकी थोडेसे वर्गणीदारही होतात. त्यामुळे नव्या लेखकांचा शोध सुरू असतो. दर्जा घसरू न देता लेखकांना उरोजन दिले जाते.
ब) चित्रपट, नाटके, साहित्य यांच्या ताज्या अविष्कारांची दखल घेणारे लेख आवर्जून छापतो, कारण शुद्ध वैचारिक मजकुरापेक्षा अशा मजकुराचे आकर्षण जास्त असते. कोणी जर अशा ताज्या सांस्कृतिक व्यवहाराचे सदर चालवायची जबाबदारी घेऊ इच्छित असेल तर ते स्वागतार्ह ठरेल. तसे सदर दरमहा पुरवणेही आवश्यक नाही.
क) वादग्रस्त विषयांवरील लेखनाने वाचक वाढतात, असा विचारही अधूनमधून येतो. काही पत्रलेखक तर याचा अर्थ दुसऱ्याचा शब्द पडू न देणे, असा घेऊन साध्याशा मतभेदावरही हिरिरीने लिहितात. ह्या एका बाबतीत मात्र मी संयत प्रतिसादाकडे झुकू लागलो आहे. वादांमधून तत्त्वबोध व्हावा, कंठशोष नको, असा हा विचार आहे. अर्थात, मी ही पूर्वी घसरलो आहे – पुन्हाही घसरेन! पण वादाचे वादंग होऊ नयेत, याबाबतची जागरूकता वाढली आहे.
ड) आज जागरूक तरुणांचा मोठा वर्ग आहे. त्यांच्या संपर्कात राहून त्यांना वैचारिक लिखाणाकडे वळवण्याचा प्रयत्नही केला जातो. डॉक्टर बंग या दांपत्याच्या निर्माण प्रकल्पाशी जोडून घेणे, हा यातलाच भाग. त्या १८-२५ वयातील मुलामुलींना पडणारे प्रश्न आसु मधून सोडवण्याने वाचकांचे सरासरी वार्धक्य घटेल, अशा अपेक्षेने हे केले जात आहे. साम्यवाद, समाजवाद, भांडवलवाद इत्यादींचे सध्या चालू असलेले विश्लेषण हा त्याचाच भाग. जात आणि आरक्षण, N.G.0.0, उत्क्रांतिविचार, या विशेषांकांमागचा हेतूही यातूनच स्पष्ट होतो. बाटलेल्यांना बाटवणे कमी व्हावे, नव्याने मते घडवणाऱ्यांना वास्तवाचे वृत्तपत्री विश्लेषणापेक्षा सखोल विश्लेषण उपलब्ध व्हावे, हा प्रयत्न असतो. निर्माण च्या संकेतस्थळासाठी त्यांनी निवडलेले आसु तील लेखही उपलब्ध करून दिले गेले आहेत, ते यासाठीच.
हे सर्व उपाय वाचकाला केंद्रस्थानी ठेवून केले जात आहेत. लेखकांना मात्र आम्ही काहीही आर्थिक साहाय्य देऊ शकत नाही. या एका क्षेत्रात आम्हीही (घसरून!) लेखकांकडून बांधिलकी मागत असतो!
जाहिराती घेण्याला संस्थापक संपादक दि.य.देशपांडे यांचा विरोध होता, व आमचाही आहे. पण या मर्यादांमध्येही वाचक अर्थव्यवहार सबळ करू शकतात.
क) मुळात भरलेली आजीव वर्गणी रु. ५०० वा कमी असेल, तर ती वसूल झाली असे समजून नव्याने दरसालची/बारा वर्षांची वर्गणी देणे सुरू करावे. साधारणपणे आपला आजीव वर्गणीदार क्रमांक ३०० वा कमी असल्यास आपण बारा वर्षे अंक पावत आहात.
ख) आसु च्या आधीच्या वर्षांच्या अंकांचे खंड उपलब्ध आहेत. पहिला १७ वर्षाच्या खंडाचा संच रु. ३७५०/- मध्ये दिला जातो. आपल्या व आपल्या ओळखीतल्या ग्रंथालयांसाठी हे संच घेता येतील.
ग) आजच मासिकाची ई-आवृत्ती घडवण्यास आम्ही फारसे अनुकूल नाही – पण चर्चेचे स्वागत आहे! एक मध्यम मार्ग म्हणून विसाव्या वर्षांपासून दर अंकातील सर्व लेखांचा सारांश (पीळी) आसु च्या संकेतस्थळावर घालता येईल. आपण हे प्रायोजित करू शकाल – हो, सारांश करायला काहीसे स्वतंत्र संपादन व जुळणी लागेल! आम्ही यासाठीचा खर्च दरसाल रु. ५००/- धरत आहोत.
घ) इतर सूचनांचेही स्वागत होईल. आयमॅकसन यांनी दिलेल्या काल्पनिक जाहिरातीखालील टीप आम्हाला बुचकळ्यात पाडून गेली. संपादक-व्यवस्थापक मिळवणे इतके सोपे आहे का?