एक क्रान्तीः दोन वाद (भाग ५)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. दुसऱ्या भागात आपण इंग्लंडच्या लोकसंख्येवर व कायद्यांवर झालेले परिणाम तपासले. सोबतच आदिम समाजवादी विचार, मार्क्सचे विचार व अमेरिकेतील व्यवस्थापित भांडवलवाद तपासले. तिसऱ्या भागात आपण क्यूबा व स्वीडन या दोन देशांमधील समाजवादाच्या आवृत्त्या तपासल्या. गंमत म्हणजे स्वीडन हे चांगला समाजवाद व चांगला भांडवलवाद या दोन्हींचे उदाहरण मानले जाते! यानंतर आपण काही देशांचा इतिहास तपासून पुढे पुनर्बाजारीकरणाचे प्रयत्न व त्यानंतरचे प्रश्न पाहिले. आपण जवळजवळ आजपर्यंत आलो आहोत ! आता त्यापुढे -]
एका विचारवंताची भूमिका
एरिक हॉब्ज्बॉम हा इतिहासकार अनेक वर्षे औद्योगिक क्रांतीनंतरचे जग तपासतो आहे. द एज ऑफ रेव्होल्यूशन, द एज ऑफ कॅपिटल, द एज ऑफ एम्पायर आणि द एज ऑफ एक्स्ट्रीम्स, या चार ग्रंथांमधून त्याने औद्योगिक जीवनशैली रुजण्याची प्रक्रिया तपासली आहे. तो इंग्रज आहे. आंतोनियो पोलिटो या इटालियनाने हॉब्जबॉमशी प्रदीर्घ चर्चा केल्या, व त्याचे ऑन द एज ऑफ द न्यू सेंचरी नावाचे पुस्तक घडवले (मूळ इटालियन १९९९, अॅलन कॅमेरनचे इंग्रजी भाषांतर २०००; द न्यू प्रेस, न्यूयॉर्क). त्यातील एक संभाषण व्हॉट इज लेफ्ट ऑफ द लेफ्ट ? नावाच्या प्रकरणात गठित केले आहे. त्यातील अवतरणांमधून हीच कहाणी हॉब्जबॉमच्या भूमिकेतून रेखाटूया, उजळणी म्हणून.
डावे आणि उजवे (ढोबळमानाने समाजवादी आणि भांडवलवादी) ह्यांच्यात आजही फरक आहेत. हे विभाजन नाकारणारे बहुधा उजवे असतात. – – – असे विभाजन न मानणारी राजकीय व्यवस्था कल्पनेत अर्थातच उभारता येईल. – – –
गेल्या काही दशकांत ‘डावे’ या संज्ञेचे अर्थ बदलले आहेत. बदलली नाही ती त्यामागची विचारधारा, आयडिऑलजी, विशेषतः विकसित देशांमधली. ही विचारधारा इंग्रजी क्रांती आणि त्यातून उपजलेल्या अमेरिकन, फ्रेंच व रशियन क्रांत्यांचे संदर्भ वापरते. तिसऱ्या जगात (अविकसित देशांत) हे संदर्भ लागू पडत नाहीत, पण पाश्चात्त्य जगात ते आजही खरे आहेत. – – –
‘उजवे’ क्रांतीची परंपरा मानत नाहीत, पण त्या परंपरेचे आधुनिक वारस संवैधानिक शासनासारख्या त्या क्रांतीच्या अंगांना आत्मसात करूनच वागतात. – – –
सुरुवातीचे डावे राजेशाही, अभिजनशाही, सामंतशाही यांच्या विरोधात उदारमत आणि संविधान या नागरी (बूझ्ा) संस्थांसाठी झगडत – – – त्यासाठी त्या जनजागृतीचाही आधार घेत – -ते बदलाचे (= सुधारणांचे) पुरस्कर्ते असत, राजकीय बदलांचे आणि सामाजिक बदलांचे – आजही ते स्वतःला ‘प्रगतिवादी’ म्हणवून घेतातः
या डाव्यांमधील एकसंधता बदलत्या वर्गरचनेने दुर्बल केली आहे. – – – विसाव्या शतकात, विशेषतः उत्तरार्धात, स्थितिप्रियतेचे स्वरूपही बदलले आहे. आजचे स्थितिवादी, काँझर्व्हेटिव्ह्ज हे सुव्यवस्था आणि स्थैर्याचे पाईक नाहीत, पण त्यांना बदल आवडत नाही. – – – मागे वळू इच्छिणारे प्रतिगामी मात्र आता फारसे दिसत नाहीत. – – – थेंचर आणि रीगनसारखे लोक खरेच उजवे आहेत; पण देशभक्ती, अभिजनवाद त्यांसोबतच मूलभूत बदलांचाही त्यांनी पुरस्कार केला आहे. – – – बदलासाठीचा पक्ष (सुधारक) आणि स्थैर्य व सुव्यवस्थेचा पक्ष (सनातनी) हा भेद मात्र आज वापरता येत नाही.
इथे हॉब्जबॉम-पोलिटो राजेशाहीविरुद्धचा पक्ष हा पहिला डावा, तर लोकशाह्या प्रस्थापित झाल्यानंतरचा तो दुसरा डावा , अशी भाषा घडवतात.
दुसऱ्या डाव्यांचा एकोणिसाव्या शतकातला प्रभाव वर्गसंघर्षातून दिसतो. समाजातले गरीब, हाताने काम करणारे लोक संघटना व चळवळी उभारत; कधी पहिल्या डाव्यांसोबत, तर कधी एकटेच. ही डावी वृत्ती विसाव्या शतकातही टिकली. तिची तीन उद्दिष्टे असत. हे दुसरे डावे –
पहिल्या डाव्यांची कमाई (संविधाने, नागरी हक्क, नागरिकत्वाचा अधिकार) आपली मानत. २) राजकीय लोकशाही, समाजातील बहुसंख्यांचा राजकारणावर प्रभाव टिकवणे, यांसाठी ते लढत.
सर्वांना उपजीविकेचा हक्क असणे, सुबत्तेत वाटा मिळणे, सामाजिक हक्क मिळणे, यांसाठी ते लढत.
ही डाव्यांची दुसरी आवृत्ती रशियन राज्यक्रांती, पहिले महायुद्ध या काळापर्यंत टिकली. नंतर मात्र ती दुभंगली. त्या वेळेपर्यंत, (युरोपात तरी) सार्वत्रिक लोकशाही घडत होती. काही सामाजिक हक्क आणि कल्याणकारी योजना आश्चर्यकारक वेगाने मान्य झाल्या होत्या -यांतली कामगारांची इस १८९० च्या ‘मे दिना’ला केलेली मागणी तर आठ तासांचा कामाचा दिवस, ही होती. – – –
दुसऱ्या महायुद्धानंतर कामगारांची ऐहिक स्थिती आणि कल्याणकारी योजनांमध्ये नाट्यमय सुधार झाले. – – –
डाव्यांच्या यशानेच त्यांच्या कार्यक्रमातली हवा गेली. मागे वळून पाहताना समाजवाद हे अस्थितादर्शी, युटोपियन स्वप्न तरी होते, किंवा चळवळीतली घोषणा तरी. रशियन राज्यक्रांतीपर्यंत – – – समाजवादी डाव्यांमध्ये अर्थव्यवस्थेला सामाजिक कसे करता येईल यावर गंभीर चर्चाही नव्हती. – – –
समाजवादी तत्त्वप्रणाली (थिअरी) ही भांडवलवादी वास्तवावरील टिप्पणी (क्रिटीक, critique) होती; वेगळ्या समाजाच्या घडणीची योजना नव्हती. आणि हे मार्क्सिस्टांबाबतही खरे होते, हे समजून घ्या, मेक नो मिस्टेक – – –
फक्त बोल्शेविक (रशियन मार्क्सवादी) जाणीवपूर्वक समाजवादी समाज घडवायचा प्रयत्न करत होते – – – आणि त्या प्रकल्पाचे अपयश इस १९६० नंतर उघड होत गेले – – – ही व्यवस्था स्वतःला बदलू शकली नाही आणि कोलमडली. याने डाव्या लोकशाही समाजवादी शाखेची विचारधाराही क्षीण झाली – – –
जागतिकीकृत अर्थव्यवस्थेने लोकशाही समाजवाद्यांच्या मुळावरच घाव घातला. संपत्तीचे पुनर्वाटप, कल्याणकारी योजना, पूर्ण रोजगारासाठीची शासकीय गुरू-आर्थिक (रिलीशलेपोळल) धोरणे , या उपायांनी धरून ठेवलेले समाज जागतिक घडामोडींपासून सुटे व राखीव ठेवणे अशक्य झाले.- – –
या (डाव्या लोकशाहीवादी) समाजांमध्ये हाताने कामे करणाऱ्यांचा वर्ग इस १९७० नंतर घटू लागला. अमेरिकेत एखादेवेळी हे दहा वर्षे आधीही होऊ लागले असेल. एकूण पाश्चात्त्य औद्योगिक देशांमध्ये तंत्रज्ञानातील सुधारणांनंतरही इस १९४५ ते १९७० या काळात कामगारांची संख्या स्थिर तरी राहिली किंवा वाढलीही – – -.
ती इस १९७० नंतर घटू लागली तेव्हा डावे पेचात आले. त्यांच्यापाशी योग्य कार्यक्रमच नव्हता. नवा समाज उभारणे सुचवावे, तर त्यासाठी प्रतिमान (विशश्र) उपलब्ध नव्हते. घडलेल्या सामाजिक-आर्थिक धोरणांना टिकवून ठेवणे, असा स्थितिवादी कार्यक्रमच हाती उरला – – – याला एक वेगळाही आयाम होता. राजकारणातून समाज बदलता येतो, याचीच विश्वासार्हता घटू लागली.
आधी वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी लढणे सामूहिक स्वातंत्र्याशी विसंगत नव्हते. विसावे शतक संपताना या दोन गरजांमधला विरोध स्पष्ट होऊ लागला. समाजाचे खाजगीकरण झाले आणि समाजघटकांची सामाजिक ओळख क्षीण झाली. सामूहिक उद्दिष्टांसाठी, सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या डाव्यांवर हा मोठाच आघात आहे. लोकशाही ज्या कारणांमुळे कार्यक्षम ठरते त्याच कारणांसाठी डावे पक्षही सामूहिक कृती करू शकतात. – – -. खाजगी आणि स्वार्थी हेतूंमुळे डाव्या मूल्यांची धूप होते आहे, झीज होते आहे. – – – लोकांना सामूहिक कृति करायला उद्युक्त करणे अवघड होत आहे. लोक गरीब असत त्यावेळी ते सामूहिक कृती करण्याच्या घोषणांना मान देत, कारण इतर आशास्थाने नसत. (आता) गरजांचा उंबरठा ओलांडल्यावर लोकांना खाजगी मार्गांनीच जास्त मिळवता येईल, असे वाटू लागले आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या मूळ त्रिसूत्रीपैकी बंधुभावाला आज वजन उरलेले नाही, पण स्वातंत्र्य आणि समता अजूनही मूल्यव्यवस्थांमध्ये आहेत. स्वातंत्र्य म्हणजे काय ते आपण जाणतो. व्यावहारिक पातळीवर समता म्हणजे शासकीय धोरणांमधून संपत्तीचे (अंशिक) पुनर्वाटप होऊन सामाजिक सोई घडणे. मुक्त बाजारपेठ हे घडवण्याची ग्वाही देऊ शकत नाही. अगदी थेंचरच्या स्थितिवादी वारसांनीही आरोग्य, शिक्षण, वृद्धांसाठीच्या कल्याणकारी योजना, ही क्षेत्रे प्रामुख्याने शासकीय आहेत हे मान्य करून त्यांत मूलभूत सुधारणाच केल्या.
थोडक्यात म्हणजे, डाव्या आणि क्रांतिकारी मूल्यव्यवस्थेपैकी स्वातंत्र्य लोकशाहीच्या रूपात मिळते, समता जितपत आवश्यक आहे तितपत(च) सरकारी यंत्रणा देतात, आणि बंधुभावाचा बळी पाश्चात्त्य, प्रस्थापित औद्योगिक अर्थव्यवस्थांनी देऊन टाकलेला आहे! मग बाजारपेठ काय करते?
माझ्या मते डाव्या राजकारणासाठीही बाजारपेठ हा अर्थव्यवहारासाठी आवश्यक घटक आहे, आणि एखादेवेळी संपत्तीच्या उत्पादनासाठी तो आवश्यक आहे हे मान्य करून मुक्त बाजारपेठ मात्र नाकारावी लागते.
बाजारपेठा साधारणपणे उजव्या पक्षाच्या असतात आणि डाव्यांच्या विरुद्ध भूमिका घेणाऱ्या असतात. बरे, स्वातंत्र्य-समता तरी खरेच सुरक्षित आहेत का ? त्यांच्या सुरक्षिततेसाठी लोकशाही राजकीय व्यवस्था आवश्यक आहे, आणि–
मुक्त बाजारपेठेचे तत्त्व अंतिमतः, परिणामतः असे प्रतिपादन करते की राजकारणाची गरज नाही. ग्राहकराजा सर्वांच्या वर आहे, आणि त्याला सर्वाधिक पर्याय बाजारपेठ उपलब्ध करून देते. या तत्त्वानुसार राजकीय प्रक्रिया डावलल्या तरी जातात किंवा बाजारपेठेचा उपपरिणाम या रूपात ढाळल्या जातात. – – – जर ग्राहक सतत खरेदीतून आपली निवड व्यक्त करत असतील, आपली मते माध्यमांच्या मतदान-चांचण्यांमधून व्यक्त करत असतील, तर नागरिक असण्याला काय अर्थ उरतो?
जर खरेच खरेदीचे, मत-चांचण्यांचे महत्त्व निर्णायक मानले तर सामूहिक कृती कशासाठी केल्या जातील ? लोकशाहीसाठी तर नक्कीच नाहीत.
अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण अर्ध्याहून कमी असते. स्कॉटलंडमध्ये “लोकांच्या ऐतिहासिक महत्त्वाकांक्षा पुया करणारे” असे ज्यांचे वर्णन केले गेले, त्या पहिल्या सांसदीय निवडणुकांमध्ये ६०% मतदान झाले. दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या निवडणुकीत लोक मैलोगणती रांगा लावून मते देत होते. पश्चिमेत निवडणुका आता अल्पसंख्यांक गटांच्या व्यवस्थापनाखालील इव्हेंट्स उरल्या आहेत. – – –
आज तंत्रज्ञानामुळे घरबसल्या मतदान करता येते. पण माझ्या मते एका दिवसासाठी का होईना, लोकांना कृतिशील बनवणारी निवडणूकप्रक्रिया समाजाला एकत्र असण्याचे भान देण्यासाठी आवश्यक आहे. – – –
राजकारण अल्पसंख्यांनी चालवणे, इतरांनी त्याला खऱ्या आयुष्याशी असंबंद्ध मानणे, हे सार्वजनिक आयुष्यासाठी चांगले नाही – डाव्यांसाठी तर नाहीच नाही. हॉब्सबॉम-पोलीटोंच्या चर्चेतून भारताला कोणता निष्कर्ष काढता येईल? माझ्या मते मुख्य निष्कर्ष हा, की सर्व लोकांसाठी आरोग्य, शिक्षण, मूलभूत सामाजिक सुरक्षा मिळेपर्यंत तरी बाजारपेठ ही शक्ती समाजाच्या, समाजातील बहुसंख्य व्यक्तींच्या प्रतिनिधींच्या उर्फ लोकशाही राज्यशासनाच्या कह्यातच राहायला हवी. आणि हे घडण्यात बाजारपेठेला बांधूनच ठेवावे, मोकळे सोडू नये; हे म्हणणाऱ्या डाव्यांची भूमिका महत्त्वाची आहे. तिला पर्याय नाही. त्या भूमिकेच्या सजगपणावर, शाहाणपणावरच भारतीय समाजाचे समाज म्हणूनचे अस्तित्त्व अवलंबून राहील.
भावी पिढ्यांचा पर्यावरणवाद
औद्योगिक क्रांतीपर्यंत माणसे मुख्यतः सजीव वस्तूंपासून उपजीविकेची साधने घडवत असत. अन्न तर वनस्पती, प्राणी, यांच्यापासूनच मिळत असे, पण इतर सामानसुमानातही धातूंचे प्रमाण नगण्य असे. हत्यारे, शस्त्रे, भांडीकुंडी, दागिने, यांच्यापलिकडे खनिजांचा वापर होत नसे. वनस्पती, प्राणी, यांचा वापर करूनही त्या रचना सहज संपत नाहीत. सूर्यप्रकाश हा ऊर्जास्रोत आपोआपच वनस्पतींचे उत्पादन घडवून आणतो, आणि त्या वनस्पतींवर प्राणी नव्याने घडत राहतात.
खनिजांचे तसे नाही. जमिनीतून खनिजे काढली गेली की ती नव्याने उत्पन्न होत नाहीत. वनस्पती, प्राणी यांचे स्रोत मानवी हिशेबात तरी अक्षय्य, शाश्वत, पुनर्नूतनीय असतात. खनिजांचा मात्र केवळ क्षयच होतो. त्यातही धातूंचा पुनर्वापर करता येतो. मामुली झीज वगळता माणसांनी पृथ्वीच्या पोटातून काढलेले धातू आजही माणसांच्या वापरात आहेत. इंधन म्हणून वापरलेल्या कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, या खनिजांचा पुनर्वापर करता येत नाही. वापराने त्यांचे रूप असे काही बदलते की पुन्हा वापर शक्यच नसतो.
औद्योगिकतेच्या आज वापरात असलेल्या आवृत्तीत हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे – त्या औद्योगिकतेच्या ऊर्जेची पायाभूत संसाधने क्षयी, अशाश्वत, वापरल्याने संपणारी आहेत. याचा एक उप-अर्थ हा, की आज या संसाधनांचा वापर करणे आपोआपच भावी पिढ्यांच्या संसाधन-वापरावर निर्बंध आणणार आहे. जर एखादी विचारप्रणाली समाजाच्या सर्व घटकांना समान वागणूक देणाऱ्या संस्था घडवू पाहत असेल, तर त्या विचारधारेला अशा अशाश्वत संसाधनांचा वापर अविवेकी वाटायला हवा. संसाधनाच्या पुरवठ्यावर, वापराच्या प्रमाणावर, अशा वापरातल्या अविवेकाची तीव्रता ठरते. उपलब्ध संसाधने झपाट्याने संपवणे ठार अविवेकी, तर पुरवून पुरवून खात राहणे कमी अविवेकी.
पारंपरिक समाजवाद्यांना याची जाणीव नव्हती. भांडवलवादी विचारधारेत तर आजही विवेकाचे हे अंग अजिबातच नाही. हा आरोप वाटत असेल तर नॅचरल कॅपिटॅलिझम (पॉल हाँकेन, अॅमरी लव्हिन्स व एल. हंटर लव्हिन्स, प्रकाशक : लिट्ल ब्राऊन, २०००) या पुस्तकात नोंदलेली भांडवलवादाची प्रत्यक्षातली भूमिका पाहा – १) उत्पादन व वितरणाच्या मुक्त बाजारपेठी व्यवस्थेमध्ये नफ्याच्या पुनर्गुतवणुकीतून भांडवल व श्रम यांची उत्पादकता वाढत जाते, म्हणून आर्थिक प्रगतीसाठी अशा मुक्त बाजारपेठी व्यवस्था सर्वोत्कृष्ट ठरतात. २) मोठे आणि जास्त कार्यक्षम कारखाने जास्त (प्रकारांचे व प्रमाणांचे) उत्पादन वाढत्या बाजारपेठांमध्ये वाढत्या विक्रीसाठी घडवतात, म्हणून असे कारखाने स्पर्धाक्षम असतात. ३) एखाद्या अर्थव्यवस्थेतील अंतर्गत उत्पादाची (ऋझ ची) वाढ मानवी सुख वाढवते. जर काही संसाधनाचा तुटवडा उद्भवलाच तर त्यामुळे पर्यायी संसाधनांचा विकास होईलच. ५) आरोग्यदायी पर्यावरण-रक्षणाची काळजी महत्त्वाची आहेच, पण जीवनाचा स्तर उंचावणाचा आर्थिक वाढीच्या संदर्भातच या काळजीचे महत्त्व जोखले जाते. ६) मुक्त उद्यमशीलता आणि बाजारपेठी दबावांमधून माणसे व संसाधने आपोआपच त्यांच्या सर्वोत्कृष्ट व सर्वोच्च वापरांमध्ये वाटली जातील.
या धारणा नोंदून लेखक पुढे नोंदतात –
व्यवहारातील भांडवलवाद ही पैशांमध्ये (financially) व्यवहार्य (viable), पण अशाश्वत (unsustainable) अशी मानवी विकासातील विकृती (aberration) आहे. – – – ती विचारधारा स्वतःचीच हिशेब मांडायची तत्त्वे पाळत नाही. आपले भांडवल खर्चुन ती त्याला आय, आवक मानते. वापरातील सर्वांत महत्त्वाच्या संसाधनांचे; म्हणजे नैसर्गिक संसाधने, सजीव सृष्टी व सांस्कृतिक संस्थांचे मूल्य ; हे शून्यवत् मानले जाते.
लेखकत्रय अमेरिकन आहे. भांडवलवाद मानणारे, पण त्याची समीक्षाही करणारे आहे. त्यांनी नोंदलेल्या धारणा भांडवलवादी तर बाळगतातच, पण सोबतच पारंपरिक समाजवाद्यांनाही त्यांपैकी काही धारणा ग्राह्य वाटतात.
जसे १)येथे मुक्त बाजारपेठी ऐवजी सामाजिक नियंत्रणाखालील हा शब्दप्रयोग घालणे समाजवाद्यांना पुरेसे वाटते. श्रम व भांडवलांची उत्पादकता वाढण्यात अ-मानवी ऊर्जास्रोतांचा मोठा भाग आहे, हे विसरले जाते. २)स्पर्धाक्षमता ऐवजी कार्यक्षमता म्हटले, तर हा मुद्दा समाजवादीही मान्य करतात. मोठ्या उत्पादनकेंद्रांसोबत वाढता वितरणखर्चही धरणे त्यांना आवश्यक वाटत नाही. ३), ४) व ५) हे मुद्दे पारंपरिक समाजवाद्यांनाही ग्राह्य वाटता. मुद्दा ३) मध्ये वाटप तरी अ-भांडवली हवे, मुद्दा ४) मध्ये पुनर्नूतनीयता कळीची आहे व जीवनाच्या स्तरात आरोग्यदायी पर्यावरणाला कळीचे महत्त्व आहे, हे भांडवलवादी व समाजवादी, दोघेही विसरतात. ६) हा एकच मुद्दा समाजवादी नाकारतात.
जरी पारंपरिक समाजवाद विकासाच्या पक्षाचा आहे, तरी विकासाच्या मर्यादाही प्रथम समाजवाद्यांनाच जाणवल्या. यामागे निसर्गाचे प्रेम, सारी सृष्टी एकसंध असण्याची जाणीव, असे भाव नव्हते. त्यांच्या जागी आजच्या माणसांना आरोग्यदायी पर्यावरण उपलब्ध होत राहण्याचा भाव होता; आणि जरा पुढे जाऊन भावी पिढ्यांना संसाधने उपलब्ध होत राहण्याचा भाग होता. रेचेल कार्सनचे सायलंट स्प्रिंग हे पुस्तक आधुनिक पर्यावरणवादाचा आदिग्रंथ आहे, असे मानले जाते. त्याचा सारा भर उद्योगांच्या आरोग्यावरील परिणामांवर आहे. ते पुस्तक वाचून उद्योगांच्या अनारोग्यकारक परिणामांना विरोध सुरू झाला तो अर्थातच प्रस्थापित औद्योगिक राष्ट्रांत, किंवा पहिल्या जगात. अशा पर्यावरणवादी चळवळी सुरू झाल्या तेव्हा साम्यवादी, कम्युनिस्ट दुसरे जग अस्तित्वात होते. रशिया, चीन या देशांमध्ये पर्यावरणवादाला थारा मिळाला नाही. चीन हा आजही पर्यावरणाच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करत अविवेकी औद्योगिकीकरण करणारा देश मानला जातो.
परंतु पश्चिम युरोपातील अनेक देशांमध्ये पर्यावरणवाद व लोकशाही समाजवाद यांचे एकत्रीकरण झाले. जर्मनी, स्वित्झर्लंड, सर्व स्कँडिनेव्हियन देश, यांमध्ये हिरवे पक्ष घडले. खनिज संसाधनांचा वापर कमी करणे, पर्याय शोधणे, यंत्रांची कार्यक्षमता वाढवणे, प्रदूषण कमी करणे, या साऱ्या बाबी राजकीय कार्यक्रमांचा भाग बनल्या. हळूहळू इतर पहिल्या जगातही हे विचार पसरले. आजही स्थिती सुधारायला जागा आहे, आणि संवेदनशीलता बरीच वाढली आहे.
या तुलनेत नव्याने औद्योगिकीकरण करणाऱ्या देशांत पर्यावरणाचा विचार जोमदार झालेला नाही. बहुतेक भांडवलवादी व बरेच पारंपरिक समाजवादी-साम्यवादी आजही पर्यावरणी प्रश्नांकडे स्वच्छ नजरेने पाहू शकत नाहीत. तसे विचार एकतर प्रगत देशांच्या इतरांना गरीबच ठेवण्याच्या कारस्थानाचा भाग मानले जातात, किंवा भोंगळ सहिष्णुतेचा भाग मानले जातात. वाढीव कार्यक्षमता व शाश्वतीच्या अंगाने चालणाऱ्या पर्यावरणवादी चळवळी क्षीण आहेत. कायद्यांमधल्या पर्यावरणीय तरतुदी गोंडस असून अंमलबजावणी मात्र क्षीणच राहते. जे थोडे यश पर्यावरणी भूमिकांना मिळते, ते सर्वोदयवाद-गांधीवादाच्या अंगाने मिळते. पण ते नगण्य आहे. प्रसारमाध्यमांचा सक्षम वापर पर्यावरणवाद्यांना जमत नाही, तर असंवेदनशील भांडवली विचार सहज प्रसृत होतात. मुळात पर्यावरणी विचारांचा थेट लोकांच्या स्वार्थाशी संबंध आहे, तोच त्यांचा पाया आहे, याची जाणीव पसरलेली, विस्तृत, अशी नाही.
एक मात्र खरे, की पर्यावरणाबद्दल जी काही परिणामकारक किंवा निष्फळ कृती माणसे करताहेत, ती प्रामुख्याने भांडवलवादबाह्य, समाजवादी तरी किंवा गांधीवादी तरी, अशा अंगानेच केली जात आहे. नॅचरल कॅपिटॅलिझम ची मांडणी आजतरी भांडवलवाद्यांना पटलेली नाही.
समाजवादाच्या सुरुवातीचे युटोपियन व अराजकवादी विचार बहुतेककरून पर्यावरणावादी होते. सां-सिमाँ हा एकच औद्योगिकीकरणाचा पुरस्कर्ता होता, तर इतर सारे विकासाला गौण मानणारे, निसर्गाकडे पुन्हा वळा, back to nature वृत्तीचे होते. मार्क्स आणि त्यानंतर मात्र पारंपरिक समाजवाद शुद्ध विकासवादी झाला. रुडॉल्फ बारो (Rudolf इरही, १९३५ -हयात) या मार्क्सवादी विचारवंताने याचे काही विश्लेषण केले आहे. त्याच्या मते मार्क्सला केवळ औद्योगिक समाजच दिसत होता, त्यामुळे आजवरचे मार्क्सवादी उत्पादनप्रक्रियेतील मानवी संबंध, वर्गसंबंध बदलण्यावरच लक्ष केंद्रित करतात. मुळात उत्पादनाची प्रक्रियाही बदलू शकते, बदलतच असते, याकडे मात्र दुर्लक्ष होते. याबाबतीत पोथीवरची निष्ठा बदलायचा एक प्रयत्न भारतात झाला आहे. माधव गाडगीळ व रामचंद्र गुहा यांनी भारताचा परिसरसास्त्रीय इतिहास लिहिताना उत्पादनाच्या पद्धती, modes of production याऐवजी संसाधन-वापराच्या पद्धती, modes of resource use हा शब्दप्रयोग वापरला आहे. त्याने उत्पादनप्रक्रिया केवळ औद्योगिकच नसतात, हे ठसवले जाते.
वळणे आणि फाटेः
मार्क्सवादाच्या समीक्षेचे अनेक प्रयत्न झाले आहेत, व अशा प्रत्येक प्रयत्नाने समाजवादी विचारसरणीला नवे आयाम दिले आहेत.
समाजवाद्यांपैकी काही जणांना अर्थव्यवस्थेवरचा भर एकांगी होतो असे वाटू लागले. हर्बर्ट मार्केज (Herbert Marcuse, १८९८-१९७९) जास्त मोकळ्या समाजरचना, लैंगिक-कौटुंबिक रचना उभारणे निकडीचे आहे, असे सांगू लागला – आधार होता मार्क्स आणि फ्रॉइडचा. १९६४ साली त्याने एक वेगळीही मांडणी केली. त्याच्यामते युरोपीय श्रमिक औद्योगिक-भांडवली व्यवस्थेचा भाग बनला होता. क्रांती करण्याची त्याला इच्छा उरलेली नव्हती. वंशाने अल्पसंख्य लोक, मूलभूत नवा विचार मांडणारे विचारवंत, हे आता क्रांतीचे कारक ठरणार होते. प्रस्थापित सामाजिक आर्थिक-सांस्कृतिक-राजकीय-लैंगिक संरचनांना विरोध करण्यातून उभ्या झालेल्या चळवळी मार्केजचा आधार घेऊ लागल्या.
आंतोनिओ ग्राम्शी (Antonio Gramsci, १८९१-१९३७) या इटालियन कम्युनिस्टाच्या रोजनिश्या १९६०-७० च्या दशकात नव्याने चर्चेत आल्या. भांडवलवादाने सत्ता काबीज केली ती आपल्या विचारधारेमुळे. त्यात राजकीय-आर्थिक सत्ता वगैरे उघड बाबी महत्त्वाच्या नव्हत्या, असे ग्राम्शीचे म्हणणे. भांडवलवादाशी लढायचे असेल तर समाजवादाला पर्यायी संकल्पना, पर्यायी संस्कृती घडवावी लागेल, हे त्याचे मत त्याच्या मृत्यूनंतर तीसेक वर्षांनी पुन्हा चर्चेत आले. ट्रॉट्स्कीवादी विचारही नव्याने मांडले जाऊ लागले. या विचारानुसार स्तालिन व त्यानंतरच्या रशियाने क्रांतीची मार्क्सची कल्पना न वापरल्याने समाजवादाची वाटचाल खुंटली होती. माओच्या चिनी व इतर समर्थकांच्या मते बहुजन श्रमिकांची मदत न घेता रशियाची वाटचाल होत होती, आणि हा बदलवाद , revisionism अनाठायी होता. अशा वेगवेगळ्या समीक्षांमधून समाजवादाच्या अनेकानेक आवृत्त्या घडल्या. काळ होता १९७०च्या आगेमागे पाचसात वर्षे. या युरोपीय चर्चेचे परिणाम भारतातही दिसले, पण ते मुख्यतः एकट्यादुकट्यांच्या चर्चांमधून. भारतातला प्रमुख समाजवादी विचार फार काळ रशियावादी राहिला, व नंतर एक भाग माओकडे वळला. मार्के ज, ग्राम्शी, ट्रॉटस्की, सारे जनाधार नसलेल्या विचारवंतांपुरतेच आले आणि गेले.
युरोप-अमेरिकेत मात्र समाजवाद्यांपैकी व समाजवादाशी नाते नसलेले अनेक लोक अनेक चळवळी उभारत, रेटत होते. अण्वस्त्रविरोधी चळवळी, वैश्विक प्रेमाचा संदेश देणारे हिपी (भारतात ज्यांना अंमली पदार्थग्रस्त हिप्पी म्हणतात, ते!), स्त्रीवादी गट, भाडेकरू संघटना, विद्यार्थी चळवळी, व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळी, अशा अनेक प्रकारांनी भांडवलवादाबाबत प्रश्न विचारले जात होते. या साऱ्यांना एकत्रितपणे द न्यू लेफ्ट, नवडावे म्हटले जाई, व जाते. हे सारेच गट समाजवादाच्या काही वृत्ती, काही धारणा स्वीकारत असत, पण थेट समाजवादी मात्र नसत. या गटांनी भांडवलवादातल्या दोषदर्शनासोबतच समाजवादालाही आपल्या भूमिका व व्यवहारातील धोरणे व पद्धती तपासायला भाग पाडले. एकूण नव-डाव्यांमध्ये बऱ्याच चळवळी, बरेच पंथ उगवले, बहरले आणि नष्ट झाले. कधीकधी तर हे इतक्या झपाट्याने झाले की ते वाद केवळ फॅशन म्हणून उभे झाले होते अशी शंका यावी!
आणि कुटुंबसंस्था
एंगेल्सने १८८४ साली त्याला उपलब्ध मानवशास्त्रीय पुरावे व मते यांच्या आधाराने कुटुंब, खाजगी मालमत्ता आणि राज्यशासन यांचे संबंध तपासले. कुटुंबव्यवस्था अस्तित्वात येण्याआधी मुक्त लैंगिक व्यवस्था असे, आणि स्त्रियांकडेच सत्ताकेंद्रे असत. मग मात्र कुठेकुठे स्त्रियांची संख्या घटली, आणि पुरुष विशिष्ट स्त्रियांवर हक्क सांगू लागले. हे कुटुंबसंस्थेच्या उगमाचे चित्र भारतात राहुल सांकृत्यायन यांच्या वोल्गा ते गंगा मध्येही भेटते. पशुंना पाळायला सुरुवात झाल्यावर ते काम पुरुषांचे असल्याने पुरुष हे संपत्तीचे मालक झाले, आणि पुरुषसत्ताक कुटुंबे घडली. आज एंगेल्सची ही मांडणी नव्या पुराव्यांनी आणि मतांनी अपुरी व चुकीची ठरवली आहे. एंगेल्सच्या मतानुसार घरकाम व्यक्तिगत न राहता सामाजिक होणे, कुटुंबसंस्थेची जागा कामव्यवहाराधारित प्रेमसंबंधांनी घेणे, यातूनच स्त्रियांना मुक्तता मिळू शकते.
रशियात कम्युनिस्ट राजवट आल्यावर स्त्रियांचे स्थान सुधारणारे कायदे केले गेले. नागरी विवाह, मागेल त्या स्त्रीला घटस्फोट, विवाहबाह्य संततीला विधिमान्यता, गर्भपाताला परवानगी, असे सारे हक्क मान्य केले गेले. पण स्त्रियांचे काही वेगळे, विशिष्ट प्रश्न असतात हे सहजपणे मान्य होत नव्हते. जर्मन समाजवादी क्लारा झेट्किन (उ. Zetkin, १८५७-१९३३) हिला स्त्री समाजवाद्यांना लैंगिक प्रश्नांची चर्चा करू देण्यावरून लेनिन रागावला. अलेक्झांड्रा कोलांताई (अ. Kollantai, १८७५-१९५२) हिला रशियातील स्त्रीसमस्यांबाबतच्या खात्याचे प्रमुख केले गेले (१९२०). तिने पाळणाघरे, बालसंगोपनगृहे, प्रसूतिगृहे वगैरे उभारली. पण १९२२ साली तिला अपमानित करून क्षुल्लक पदावरच नेमले गेले. तरीही समाजवादी राष्ट्रांमध्ये स्त्रियांना भांडवलवादी राष्ट्रांमधल्यापेक्षा वरचे स्थान दिले जात असे. व्यक्तिगत समस्यांना राजकीय महत्त्वही असते, हे मात्र पद्धतशीरपणे नाकारले गेले.
दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलवादातून प्रगत झालेल्या देशांमधले स्त्रियांचे स्थान झपाट्याने बदलले. युद्धाने नोकरीचे क्षेत्र स्त्रियांना खुले केले होतेच. शैक्षणिक क्षेत्रातही स्त्रियांचे प्रमाण वाढले. घरकामाच्या उपकरणांचे तंत्रज्ञान सुधारून मोकळा वेळ वाढला. स्त्रीचे स्थान पुरुषांच्या स्थानाइतके तरी महत्त्वाचे असावे, यासाठी भांडवलवादी राष्ट्रांत दबाव वाढला. समाजवादी विचारवंतही एंगेल्सचे चित्र नाकारत होते. सीमाँ द बूव्हॉ, ज्यूलिएट मिचेल, यांनी समाजवाद प्रस्थापित होणे येवढेच स्त्रियांना मुक्त करण्यासाठी पुरेसे नाही; आवश्यक मात्र आहे, असे दाखवून दिले. केट मिलेटने तर स्त्री-पुरुष संबंधांशी आर्थिक समाजवाद असंबद्ध आहे, आणि पुरुषसत्ता केवळ विचारप्रणाली आणि सामाजिक संस्थांमधून रुजलेली आहे, असे मत मांडले.
एकूणच मार्क्सवाद, विशेषतः त्यातला अर्थव्यवस्थेवरचा भर, हे स्त्रियांचे सामाजिक स्थान समजण्यात, बदलण्यात पुरेसे नाही. व्यक्तिगत वागणूक अंतिमतः राजकीयच असते. अशा विचारांमुळे समाजवादी विचार जास्त सर्वस्पर्शी, संपन्न झाला. पण दर नव्या विचारासोबत नव्याजुन्यांमध्ये वादही उभे झाले, आणि समाजवादात पंथभेदही वाढले.
देवाण-घेवाण
अॅडम स्मिथने भांडवलवादी उत्पादन आणि व्यापाराला प्रतिष्ठा दिल्याला (१७७६) आज सव्वादोनशे वर्षांवर काळ लोटला आहे. त्याला अपेक्षित मुक्त बाजारपेठ, खुली स्पर्धा, भांडवलदाराने समाजातील इतर घटकांना हानी न पोचवणे, या साऱ्यातून कार्यरत होणारा अदृश्य हात, यांपैकी काहीही वास्तवात उतरले नाही. उदारमताच्या पुरस्कर्त्यांना उपयोगितावादी मूल्ये भांडवलवादी अर्थव्यवस्थेतून व्यक्त होतील, साध्य होतील, असे वाटले होते. तेही झाले नाही.
आधी काही काळ इंग्लंडातच तीव्र विषमता आणि गरिबी उद्भवली. मग तो प्रकार इंग्लंडात सौम्य झाला, तर युरोपात तीव्र झाला. माणसांची निर्यात, वसाहती घडवणे, साम्राज्ये घडवणे, हे उपाय युरोपने वापरले. गरिबी-विषमता युरोपात सौम्य झाल्या, तर इतर जगात वाढल्या.
काही लोकांना विषमता, तेजीमंदीचा झोपाळा, ही भांडवलवादाची अंगे रुचेनात. स्पर्धेइतकेच सहकार्यही मानवी आहे असे त्यांना वाटले. त्यांनी ज्या व्यवस्था सुचवला, घडवल्या, त्यांना समाजवादी म्हटले जाऊ लागले. यात अनेक पंथ होते, ज्यांपैकी एका जहाल पंथाने एका मोठ्या देशात सत्ता मिळवली. हा साम्यवाद इतर लोकशाही समाजवादाच्या आवृत्त्यांपेक्षा सुटा पडला. साम्यवाद पोथीबद्ध होत गेला. भांडवलवादातील (स्वार्थापोटी आलेला का असेना) तंत्रवैज्ञानिक नवनवोन्मेष साम्यवादाला अंगी बाणवता आला नाही. लोकशाही समाजवाद मात्र अनेकानेक युरोपीय व इतर देशांत सत्तेवर न येता कामगार, सामान्यजन, यांच्या हिताच्या कायद्यांवर आग्रह धरत राहिला. निवडणुका, लोकशाही, पर्यावरणवाद, स्त्रीवाद, असे नवनवे विचार स्वीकारत राहिला. बदलत्या तंत्रविज्ञानाचा, व्यवस्थापनशास्त्राचा आधार घेत लोकशाही समाजवादाच्या नव्या आवृत्त्या घडत राहिल्या. स्वीडनमधील कामगार चळवळ आजही भरघोस जनाधारातून स्वतःचे सत्ताकेंद्र घडवून आहे. पूर्वीचा अल्पशिक्षित क्यूबा आज औषधे व जैवतंत्रज्ञानीय उत्पादने निर्यात करत आहे.
पुढ्यात आलेल्या प्रश्नांना कल्पक व व्यवहार्य उत्तरे शोधण्यात भांडवलवाद सक्षम राहिलेला आहे. ही क्षमता बरेचदा अवसरवादासारखी असते. कधी केन्सीय तर कधी थेंचराइट नमुन्याची उत्तरे शोधत अदृश्य हाताचा मृत्यू झाकून ठेवायची धडपडही दिसत असते. हा मुद्दा जराशाच तपशीलात पाहू.
सीमाशुल्क न ठेवून इंग्लंडने आपली बाजारपेठ मुक्त असल्याचा देखावा उभा केला. सोबतच इंग्रजी जहाजेच वापरत मुक्तीला मूठमाती दिली. आज अमेरिका व युरोपीय यूनियन यांनी जागतिक व्यापार करार व संस्था (WTA व WTO) यांमधून मुक्त बाजारपेठेचा देखावा उभारला आहे. सोबतच शेती-अनुदाने, त्यांच्यावर नियंत्रण करणाऱ्या निळ्या-हिरव्या (वेगवेगळ्या देशांतील श्रम व पर्यावरणाबाबतच्या कायद्यांप्रमाणे सीमाशुल्के ठरवण्याचे नियम) अटी, अशी यंत्रणा उभारून मुक्तीचा मुडदा पाडला आहे. याहून फसवा प्रकार म्हणजे मुक्त बाजारपेठ याऐवजी मुक्त उद्यमशीलता, फ्री एंटरप्राईज, हे शब्द वापरणे. थोडक्यात म्हणजे, “आमचे ते बाळासाहेब, तुमचा तो बाळ्या’!
पण यासोबतच आज औद्योगिकीकृत झालेल्या देशांनी स्वतःच्या नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षा यंत्रणाही सक्षमपणे उभारल्या आहेत. यात रिपब्लिकन (आयसेनहॉवर), स्थितिवादी (थेंचर), असे कट्टर भांडवलवादी पक्षही मागे नाहीत. आरोग्यसेवा, शिक्षण, भविष्यनिर्वाहनिधीला समांतर यंत्रणा, या साऱ्या बाबतीत आपले घर भक्कम करून मगच उद्यमशीलतेला मोकळीक दिली जाते.
औद्योगिकीकरणाच्या वाटेवर असलेल्या ब्रिक (BRIC, ब्राझील, रशिया, भारत, चीन) देशांना हे न करताच पुढे जायची घाई झाली आहे. यांतील प्रत्येक देश आपल्या सार्वभौमत्वाला शाबूत ठेवत, नॉलेज इकॉनॉमी ची भाषा बोलत जागतिक व्यापारात उतरत आहे. पाया मात्र आरोग्य, शिक्षण, कल्याणकारिता (कएथ, हेल्थ, एज्युकेशन, वेल्फेअर) हा नाही. याच्या कारणांपैकी प्रमुख कारण हे की पहिल्या जगातील भांडवलवादाने समाजवादी विचारांशी जी देवाण-घेवाण केली, ती ब्रिक देशांनी केलेली नाही. यांपैकी बहुतेक देशांना ना भांडवलवादी औद्यगिकतेचा इतिहास आहे, ना समाजवादाचा — ना दोन्हींमागच्या उदारमतवादी आधुनिकतेचा. रशियन समाजवादही भांडवलवाद, लोकशाही यांना प्रतिसाद म्हणून घडलेला नव्हता. जीवशास्त्रज्ञांचे एक निरीक्षण आहे – पाडसाला जन्म देताना वेणा (birth pangs) भोगणारी हरिणी पाडसाला आपले मानते. जर भूल (अॅनॅस्थेशिया) देऊन, शस्त्रक्रिया करून पाडसाला बाहेर काढले, तर आई बाळावर प्रेम करत नाही!
आज ब्रिक राष्ट्रे आपापली विशेष कौशल्ये घडवत औद्योगिकीकृत होण्यासाठी धडपडत आहेत. युरोप, अमेरिका, जपानने जशी गरिबी निर्यात केली, तसे मात्र हे देश करत नाही आहेत. त्यांची खरी बाजारपेठ आजही पहिल्या जगातच आहे.
पण सामाजिक सुरक्षा सक्षम न करताच जागतिक व्यापारात उतरणे धोकादायक ठरू शकते. कशाचे खाजगीकरण करावे, कशाचे करू नये, याचे निर्णय शाहाणपणाने घ्यावे लागतील. उदाहरणार्थ, चीनमधील वैद्यकाचे खाजगीकरण आजच रोग होऊच न देण्याकडून रोगाच्या इलाजाकडे सरकते आहे. चीन, भारत, यांच्यात बेरोजगारीही बरीच आहे. भारतीय भांडवलदार भ्रष्ट व असंवेदनशील आहेत, तर रशियात भ्रष्ट व गुन्हेगारी!
आणि जगभरच लोकांचा राजकीय कृतीवरचा विश्वास घटतो आहे. पहिल्या जगात हे सुबत्तेतून होत आहे, तर इतरत्र भ्रष्टाचारामुळे घडत आहे.
याहीपलिकडे भौतिक मर्यादा आहेत. लोकसंख्या, क्षयी ऊर्जास्रोत, खनिज इंधनाच्या वापराचा हवामानावर होणारा परिणाम, प्रदूषणाने विषमय होणारे पाणी व अन्न, इत्यादींच्या पार्श्वभूमीवरच पुढील नाटक खेळले जाणार आहे. त्यातील भूमिका वठवण्यासाठी सुशिक्षणाची गरज आहे. कॉल-सेंटर्ससाठी अमेरिकन अॅक्सेंट, मोठ्या पगार-पॅकेज साठी एम्बीए पदव्या, रडतखडत बीएस्सी, कसाबसा बीकॉम अशा व्याख्यांमध्ये न गुंतणारे सुशिक्षण हवे आहे.
आह्वान मोठे आहे, पण काही बाबतींमध्ये मधले टप्पे ओलांडून प्रगतिपथ गाठणाऱ्या देशांना ते पेलवेल. राजकीयच नव्हे, तर सामाजिक इच्छाशक्ती मात्र जबरदस्त हवी. ती कशी घडवावी?
लेखाच्या विषयावर उपलब्ध पुस्तकांची संख्या प्रचंड आहे. त्यांपैकी काही संदर्भग्रंथांची यादी सोबत देत आहोत. पण या संदर्भग्रंथांपुरतेच लेखाचे संदर्भ मर्यादित नाहीत.
(1) Lectures on the Industrial Revolution of the eighteenth Centurry in England, Arnold Toynbee, Longman, Green & Co. 1884-1928
(2) The Age of Empire, Eric Hobsbawm, Vintage, 1987
(3) A Very Short Introduction to Socialism, Michael Newman, Oxford, 2005/2007
A Very Short Introduction to Capitalism, James Fulcher, Oxford, 2004/2006
20 : 21 Vision, Bill Emmott, Penguin, 2003/2004
(6) Natural Capitalism, Hawken, Lovins & Lovins, Little, Brown, 1999.