पवित्रतेची बदलती व्याख्या

प्रभाकर नानावटी नवीन संस्कृती
आर्थिक व्यवहारांचे व माहिती-संवाद तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण होत असलेल्या या कालखंडात सर्वस्वी वेगळी वाटणारी संस्कृती मूळ धरू पाहत आहे. ही नवीन संस्कृती मानवी हिताची असेल किंवा नसेलही. आता अस्तित्वात असलेल्या संस्कृतीच्या उलथापालथींची अनेक कारणे असू शकतील. पृथ्वीतलावरील प्रत्येकाला हवामानबदलाचा फटका बसत आहे. आपल्यातील सर्वांना पेट्रोलियम पदार्थ संपून जाण्याच्या भीतीने त्रस्त केले आहे. ऊर्जास्रोतांची कमतरता/अभाव या भीतीमुळे आपल्या सर्वांनाच आर्थिक अरिष्टांना सामोरे जावे लागेल की काय अशी धास्ती वाटत आहे. हीच धास्ती पाण्यासाठी, अन्नासाठी, ऊर्जास्रोतांसाठी ठिकठिकाणी युद्ध पेटवत आहे. यामुळे दारिद्र्यात भरच पडत आहे. विषमता वाढत आहे. या व इतर अनेक कारणांमुळे भयभीत झालेल्या समाजगटांचा आपापल्या संस्कृतीवरचा विश्वास उडत चालला आहे. जगाच्या पाठीवर शेकडो वर्षे अस्तित्वात असलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतींचा -हास होत असून या सर्व संस्कृतींच्या सपाटीकरणाची प्रक्रिया जोमाने सुरू झाली आहे. एक नवीन संस्कृती सर्वांना गिळंकृत करत आहे. त्यातून उद्भवलेल्या अगतिकतेपायी बहुतांश सामान्यांचा कल एका प्रकारच्या मूलतत्ववादाकडे-कदाचित तो धार्मिकही असेल वा अत्यंत टोकाच्या विरोधाचाही असू शकेल-झुकत आहे की काय असे वाटू लागले आहे.
जगाच्या पाठीवर तीनचारशे कोटी लोक कुठल्या ना कुठल्या ईश्वरावर वा ईश्वरप्रणीत धर्मावर श्रद्धा ठेवून जीवन जगण्याच्या प्रयत्नात आहेत. यांत बहुसंख्य हिंदू, मुस्लिम व कडवे ख्रिश्चियन्स आहेत. उरल्यसुरल्यांमधील शंभरेक कोटी लोकांची अशा प्रकारच्या सर्वव्यापी संकटविमोचक परमेश्वरावर श्रद्धा नाही. कदाचित यांपैकी काही नास्तिक असतील, किंवा परमेश्वराला नाकारणारे बौद्धधर्मीय असतील. राहिलेल्या इतरांना ईश्वर असला काय वा नसला काय, काहीही फरक पडणार नाही. त्यामुळेच आता या सर्व गोष्टींचा पुनः एकदा आढावा घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कदाचित अशा प्रकारचा पुनर्विचार सश्रद्धांना त्यांच्या श्रद्धेवर हल्ला केल्यासारखा वाटेल. व इतरांना सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ दिसणाऱ्या गोष्टीबद्दल पुनः पुनः चर्चा करण्याची गरजच काय असेही वाटेल. गॅलिलिओला जेव्हा त्याकाळच्या धर्मन्यायपीठासमोर आरोपी म्हणून उभे केले तेव्हा ज्याच्या नावाने लाखो-करोडोंची कत्तल झाली त्या ईश्वराशी आपला सुतराम संबंध नको, हा विचार त्याच्या मनात आला असेल. गॅलिलिओ करत असलेली विधाने धार्मिकांच्या दृष्टीने अपवित्र होती. म्हणूनच त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले.
ईश्वर वा धर्म या संकल्पना जगातील सजीव-निर्जीवांची पवित्र व अपवित्र अशी दोन वर्गात विभागणी करतात. पवित्र स्वीकारार्ह व अपवित्र त्याज्य म्हणून भेदाभेद केला जातो. एखादी गोष्ट पवित्रच का याला त्यांच्याकडे उत्तर नसते. एकेकाळची पवित्र नदी आज गटारगंगा झाली तरी त्यांना त्याचे सोयर-सुतक नसते. कालमान-परिस्थितीप्रमाणे पवित्र-अपवित्रतेच्या व्याख्या बदलण्याचे भानही नसते. ईश्वराशी निगडित असलेल्या या पवित्रतेच्या कल्पना नेहमीच निखळ सत्यापासून दूर नेण्याची सक्ती करतात. पवित्रतेच्या पुनःशोधाच्या प्रक्रियेत अलिकडील वैज्ञानिक संशोधनामुळे शोध लागलेल्या अनेक अनाकलनीय व गुंतागुंतीच्या क्लिष्ट सिद्धान्तांचा व त्यातून तावून सुलाखून निघालेल्या कल्पनांचा विचार करावा लागेल. असे करताना वैज्ञानिक विश्वात आतापर्यंत प्रचलित असलेल्या प्रत्येक गोष्टीचे लघुरूपीकरण करण्याची सवय सोडून द्यावी लागेल. ही सवय १८व्या शतकाच्या प्रारंभापासून वैज्ञानिकाना जडलेली आहे. यात आपण घटनांचे विश्लेषण करत करत अणु-परमाणूपर्यंत पोचत असतो. प्रसिद्ध गणितज्ज्ञ लाप्लास यांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे या विश्वातील प्रत्येक अणु-परमाणूचे स्थळ, काळ व वेग यांची अचूक माहिती मिळाल्यास, न्यूटनचे गतिनियम वापरून, या जगाचा भूतकाळ, वर्तमान व भविष्यकाळ सहजपणे वर्तविता येणे शक्य आहे.
जगाकडे बघण्याचा दृष्टिकोण
अशा प्रकारे जगाकडे बघण्याच्या दृष्टीची दोन वैशिष्ट्ये आहेत. एक वैशिष्ट्य नियतीवाद आहे. परंतु हा नियतीवाद क्वांटम सिद्धान्तामुळे केव्हाच बाद झाला आहे. यामुळेच कदाचित आपल्याला कुठलीही गोष्ट गंभीरपणे घेण्याची गरज वाटेनाशी झाली आहे. एखाद्याने दुसऱ्याचा निघृणपणे खून केला तरी त्यात काय विशेष, माणसाचा खून म्हणजे त्याच्या शरीरातील अणु परमाणूंची पुनर्रचना असे म्हटल्यासारखे होईल. अशा प्रकारचा वैचारिक प्रवास नेहमीच मानवी समाज ते व्यक्ती, व्यक्ती ते मानवी शरीर, शरीर ते अवयव, अवयव ते अवयवातील पेशी, पेशी ते जीवरसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र ते रसायनशास्त्र, रसायनशास्त्र ते भौतिकशास्त्र असा होत राहील.
दुसरे वैशिष्ट्य लुघुरूपीकरण असेल. आपण आता विज्ञानाच्या चरमसीमेच्या जवळपास आहोत. त्यामुळे वैज्ञानिक या लघुरूपीकरणाविषयी अत्यंत साशंक आहेत. जीवावरणातील (बायोस्फिअरमधील) फेरबदल वा कलाप्रकारातील आवडी-निवडी वा आर्थिक व्यवहारातील चढउतार वा मानवी संस्कृतीचे गुणविशेष या भौतिकशास्त्राच्या उपपत्ती (डेरिवेटिव्ह) आहेत, असे कदापि म्हणता येणार नाही. अणु-परमाणूंच्या स्थिति-गतीवरून मानवी उत्क्रांती, पर्यावरण, जीवावरण किंवा जीवावरणापासून उत्क्रांत होत असलेली एक सुसंबद्धता व त्याची निरंतर प्रक्रिया
इत्यादींचे विश्लेषण भौतिकीच्या नियमाच्या आधारे करता येणे शक्य नाही. हृदयाचेच उदाहरण घेतल्यास हृदय हा अवयव उत्क्रांति-प्रक्रियेतून उदयास आलेला जैवस्वरूपात असलेला एक महत्त्वाचा अवयव आहे. तो केवळ अणु-परमाणूंचा गोळा नाही.त्याचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे.
डार्विनचा पूर्व अनुकूलन सिद्धान्त
याचप्रकारे आपण वैज्ञानिक दृष्टीचे मूळ डार्विनवादात शोधण्याचा प्रयत्न करत असतो. डार्विनच्या सिद्धान्ताप्रमाणे हृदयाविषयी विचारल्यास शरीराला पुरेशा दाबाने रक्तपुरवठा करणारा एक अवयव असे उत्तर मिळेल. पुरेशा दाबाने रक्तपुरवठा करण्यासाठीच हृदयाचे ठोके पडत असतात. या ठोक्यांना डार्विनच्या निवडीचा सिद्धान्त लागू होईल का? कारण डार्विनच्या सिद्धान्तात निवडमूल्याला महत्त्व आहे. परंतु ठोक्यांना कसले निवडमूल्य असे वाटण्याची शक्यता आहे. मानवी शरीराचेच उदाहरण घेतल्यास काही मानवी शरीरांना आता निरुपयोगी वाटणारे अक्कलदाढ, आंत्रपुच्छ (अपेंडिक्स), टॉन्सिल्स इ.इ. सुमारे पन्नासेक अवयव अजून का त्रास देत असतात असा प्रश्न वैद्यकीय तज्ज्ञांना पडत असतो. हृदयाच्या ठोक्यांना डार्विनच्या पूर्व अनुकूलनाचा (प्री अडाप्टेशन) सिद्धान्त आजच्या संदर्भात तरी लागू करता येणार नाही असे वाटत असले तरी आजच्यापेक्षा वेगळ्या परिस्थितीत त्या ठोक्यांनाही निवडमूल्य असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे हृदयाचे ठोके हदयाचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झाले असतील. सजीवांच्या उत्क्रांतीच्या प्राथमिक अवस्थेत पाण्यातील माशांच्या दाढेतील हाडांपासून माणसांच्या कानामधील अस्थी विकसित झाले आहेत असे जीवशास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु काही बाह्य परिस्थितीमुळे या अस्थींना ध्वनिग्रहणाचे काम करण्यास उत्क्रांतीने भाग पाडले असेल. अशा प्रकारे जीवावरणाची उत्क्रांती व प्राणिमात्रांचा विकास या गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत हे नाकारता येत नाही.
हे सर्व खरे असल्यास डार्विनवादाच्या पूर्वानुकूलन सिद्धांताच्या आधारे यानंतरच्या सजीवांची किंवा निदान मनुष्यप्राण्याची उत्क्रांती कशी होईल याचा ढोबळ अंदाज करता येईल का? कदाचित याचे उत्तर नकारात्मक असेल. सजीवांच्या विकासातील टप्प्यांना कलाटणी देणारी बाह्यपरिस्थिती कशी व कुठे बदलत जाईल याची नेमकी यादी करणे अजिबात शक्य नाही. त्यामुळे सजीवांच्या शरीररचनेचे बाह्यपरिस्थितीला अनकूल असे बदल कसे होत जातील हे नेमकेपणाने सांगणे फार जिकिरीचे ठरेल.
दूरगामी परिणाम
या तर्कपद्धतीत काही तथ्य असल्यास त्याचे फार दूरगामी परिणाम होणार आहेत. निसर्गनियमांच्या आधारे या जगातील सर्व घटनांचे वर्णन करता येते, या गॅलिलिओच्या विधानालाच यामुळे धक्का बसणार आहे. निसर्गनियम घटनाप्रक्रियेतील सातत्याचे वर्णन करणारे असल्यास डार्विनीय पूर्वअनुकूलनाविषयी ते जास्त काही सांगू शकणार नाहीत. मुळातच आपण येथे न्यूटनच्या तर्कपद्धतीचा अवलंब करण्यास असमर्थ ठरत आहोत. न्यूटनच्या तर्कपद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला बदलत जाणारे परिवर्तनशील घटक, या बदलामागील सुसूत्रता, वा त्यांना जोडणारा एखादा नियम, त्यासंबंधीच्या प्रारंभिक शर्ती व त्यांच्या अंतिम मर्यादा, इत्यादींचा शोध घेत घेत त्यावरून जीवावरणामध्ये यानंतर काय घडणार याचे अनुमान करावे लागेल. परंतु मुळातच त्यासंबंधातील घटकांचाच नेमका अंदाज हाती लागत नाही. मध्य कानातील अस्थी वा फुफ्फुस वा यकृत इत्यादींची रचना पूर्ण झाल्यानंतरच ते कशासाठी आहेत हे लक्षात येते. कारण या रचनासंबंधीच्या पूर्वकल्पनांचा आपण विचारच करू शकत नाही.अशा गोष्टींचा ढोबळ अंदाज काढणेसुद्धा आपल्या बुद्धीच्या आवाक्याच्या पलिकडचे ठरेल. कारण यासाठी कल्पनेतील प्रारूपाच्या संभाव्यतेची गरज भासते. त्यामुळेच या प्रचंड विश्वातील जैविक किंवा अजैविक गोष्टींचा उलगडा करणे निसर्गनियमांच्या कुवतीच्या बाहेरची गोष्ट ठरेल. कारण येथे फक्त न संपणारी, कधीच न थांबणारी अशी एक सर्जनशीलता आहे. व त्यासाठी अतिभौतिक वा अलौकिक अशा निर्मिकाची गरज नाही.
या सर्जनशीलतेच्या परिणामामुळे यानंतर काय घडणार आहे याचा अंदाज करता येणार नाही. फार फार तर आपण तर्क करू शकतो. परंतु या सर्जनशीलतेच्या पुढे तर्कही थिटा पडतो. म्हणूनच उत्क्रांतीच्या मंथनातून बाहेर पडलेले तर्कबुद्धी, विवेकशीलता, अंतःप्रज्ञा, कल्पनेची भरारी इत्यादी सर्वांचा वापर करत संपूर्ण मानवजातीचा विचार करत, एखाद्या निष्कर्षापर्यंत पोचावे लागेल. म्हणजेच कदाचित त्यासाठी आइन्स्टाइन व शेक्सपीयर या दोघांनाही एका खोलीत बंद करून विचार करण्यास भाग पाडावे लागेल.
पवित्रतेचे निकष
यासाठी ईश्वर हा शब्दप्रयोग करावा का? कदाचित तसे करण्याची गरज भासणार नाही. परंतु आजतरी हा शब्द अत्यंत प्रभावी प्रतीक ठरला आहे. व या शब्दाची जादू अजून ओसरली नाही, व ओसरण्याची शक्यताही वाटत नाही. गेल्या हजारो वर्षांपासून मानवीसमाज ईश्वराच्या अनेक रूप-स्वरूपांना शरण गेलेला आहे.त्याच्यापुढे नतमस्तक झाला आहे. मानवी कल्पनेप्रमाणे तो कधी युद्धदेवता असतो तर कधी शांतिदूत. तो कधी अन्नदाता असतो, कधी रक्षणकर्ता, कधी शिक्षा ठोठावतो, कधी जीव घेतो वा कधी मेलेल्यांना जिवंत करतो.
परंतु या विश्वनिर्मितीमध्ये ईश्वराचा सहभाग आहे अशी कल्पना करणेसुद्धा अत्यंत धाष्टाचे ठरेल. काही धार्मिकांना तर या जगाची निर्मिती सहा दिवसांत ईश्वराने केली असेही मनोमन वाटते. त्याउलट कुठल्याही नियमाविना मनमानी करत अस्ताव्यस्तपणे ती निर्माण झाली असे म्हणणेही विसंगत ठरेल. म्हणूनच आता आपल्याला पवित्रतेच्या व्याख्येचा पुनर्विचार करावा लागेल. हे करताना प्रत्येक सजीव व विश्वातील सर्व नैसर्गिक स्रोतांचा योग्यपणे आदर ठेवून जीवनव्यवहारास सामोरे जावे लागेल. त्यासाठी आपल्या आताच्या मूल्यवस्थेत आमूलाग्र बदल करावे लागतील. ही मूल्यव्यवस्था धर्म, धर्मनीती, वा धर्मसंकल्पना इत्यादींवर आधारित नसेल. अशा मूल्यव्यवस्थेत धार्मिक मूलतत्त्ववाद्यांना व जमातवाद्यांना अजिबात स्थान नसेल. त्यांच्यापासून होणाऱ्या भीतीला स्थान नसेल. या अवकाशाचा, जीवावरणाचा आपण सर्वांनी मिळूनच वापर करायचा आहे. युद्ध, दारिद्र्य, दुष्काळ, हवामान बदलाचे दुष्परिणाम, ऊर्जास्रोत संपून जाण्याची भीती, इत्यादींपासून मुक्त असलेल्या विश्वाची निर्मिती आपल्याला करायची आहे. निसर्गाशी दोन हात करण्याच्या आक्रमक पावित्र्याऐवजी निसर्गाशीच नम्र होऊन जीवन जगणे हाच एकमेव उद्देश आपल्यासमोर असणार आहे. या उद्देशपूर्तीसाठी जे जे करणे अत्यावश्यक आहे त्यांचेच आपण यानंतर पवित्र म्हणून नामकरण करणार आहोत.
८, लिली अपार्टमेंटस्, वरदायिनी सोसायटी, सूस रोड, पाषाण, पुणे ४११ ०२१.