साहित्याचा एकाकी/एकटा आवाज

मी आता आपल्यासमोर जे काही मांडणार आहे ते एका टीकाकाराच्या किंवा व्यावसायिक समीक्षकाच्या दृष्टिकोणातून नव्हे वा एखाद्या अॅकॅडेमिक प्रोफेसरच्या दृष्टिकोणातूनही नव्हे. तो आहे एका लेखनकर्मीचा दृष्टिकोण, ज्याच्यासाठी साहित्य हे गेली चाळीस-पन्नास वर्षे एक आसऱ्याचे ठिकाण, निवारा-आणि दुःख आणि वेदनांच्या क्षणी परमशांती आणि सांत्वना देणारा असा एक चिरतन स्रोत राहिलेले आहे.
फॉकनरने कुठेतरी असे म्हटलेले आहे की ज्या माणसांना आयुष्य जगता येते ती ते जगतात, आणि ज्यांना ते जमत नाही अशी माणसे आयुष्याविषयी लिहितात. मी या दुसऱ्या वर्गात मोडणारा आहे. खरे तर प्रत्येक कलावंत हा कमी अधिक प्रमाणात त्या प्रागैतिहासिक आदिम कलावंतासारखाच असतो, जो लाखो वर्षांपूर्वीच्या त्या काळात, इतरांबरोबर शिकारीला न जाता मागे गुहेत थांबायचा; इतरांच्या जगण्याचे तो निरीक्षण करायचा. कदाचित तो पंगु असेल किंवा आजारी असेल असेही शक्य आहे. पण आता लाखो वर्षांनंतर जेव्हा आपण त्या गुहा बघतो, त्यातली चित्रे बघतो तेव्हा त्या चित्रकाराने चितारलेल्या त्या चित्रांवरून त्या दुर्गम डोंगरदऱ्यातून, घनदाट अरण्यांमधून राहणाऱ्या माणसांच्या जीवनशैलीविषयी आपण अनुमान बांधू शकतो.
आजच्या व्याख्यानाचा ‘साहित्याचा एकाकी/एकटा आवाज’ हा विषय ऐकून तुम्ही बुचकळ्यात पडला असाल. यात एक विरोधाभास स्पष्ट जाणवतो. साहित्य आणि एकाकी – – – या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत. ‘साहित्य’ हा शब्दच मुळी सहयोग दर्शवतो. साहित्याची भूमिका सदासर्वदा, सहजीवनाच्या सामाईक अनुभवाची देवाणघेवाण करण्याचे माध्यम, अशीच राहिलेली आहे. मग त्याचा आवाज एकटा, एकाकी कसा काय असू शकतो? कोणाला असा प्रश्न पडू शकतो की आजच्या मासमीडियाच्या युगात इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि वर्तमानपत्रांच्या भडिमारात बिचाऱ्या कवितेचे, कथेचे नि कादंबरीचे काहीतरी मूल्य उरले आहे का? आणि असेल तर ते काय आहे ? साहित्याचा आवाज हा आज केवळ एकाकीच नव्हे तर उपेक्षितदेखील झालेला नाही का? आजकाल वारंवार ऐकायला येते की एकविसाव्या शतकात पुस्तके लुप्त होतील; आपण प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर वाचू शकू, शिकू शकू. हे ऐकले की मनात एक प्रश्न उमटतो की असे जर
खरेच झाले तर आपले आयुष्य किती रसहीन, किती शुष्क होऊन जाईल ? कारण आपल्या आयुष्यातल्या किती जागा, किती कोपरे असे असतात, ज्यांची पोकळी कुठलेही धर्मप्रतिष्ठान, कुठलेही राजकारण किंवा कुठलीही सामाजिक विचारधारा किंवा वाद वा इझम, यांपैकी एकही गोष्ट भरून काढू शकत नाही.
माझा ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की माणूस हा स्वभावतः एकांतप्रिय असतो. जरी तो कुटुंबात राहात असला, युनिव्हर्सिटी, कारखाने, दुकान, ऑफीसेस मधून काम करत असला, अनेक गोष्टी समूहात करत असला तरी स्वतःसोबत राहायलाही त्याला आवडते. त्याची दिवास्वप्ने, मनातल्या विविध प्रकारच्या शंका, आशंका, भीती, त्याचे आठवणींचे जग, मृत व्यक्तींच्या स्मृती, हरवलेली प्रीती ही जी त्याच्या मनातली संपदा, हे मनीचे हितगुज, केवळ आपल्याच मनासोबत होऊ शकते, इतरांसोबत नव्हे. अशा प्रकारे आपण स्वतःसोबत, स्वतःच्या मनासोबत हितगुज करत असतो तेव्हा आपण साहित्य वाचत नसतो तर निःशब्दपणे ते जगत असतो.
साहित्याच्या दोन महत्त्वाच्या वैशिष्ट्यांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. त्यांपैकी पहिले म्हणजे साहित्य एखाद्या माणसाच्या व्यक्तित्वाला कुठल्याही एका व्याख्येत सीमित आणि संकुचित करत नाही. आपण अॅरिस्टॉटलने माणसाची केलेली ती प्रसिद्ध व्याख्या ऐकलेलीच असेल. “Man is a Social animal.’ काही लोक मनुष्यप्राण्याला ‘झेश्रळींळलरश्र रपळारथ’ मानतात. परंतु अशा प्रकारे माणसाला कुठल्याही एका व्याख्येच्या सीमेत बद्ध करणे म्हणजे त्याच्या संपूर्ण, बहुआयामी, समृद्ध, असीम अशा विश्वाला अगदी संकुचित, दरिद्री करून टाकण्यासारखे आहे.
माणसाला आपण अशा रीतीने एका सीमेत बांधून त्याचे अवमूल्यन करू शकत नाही. साहित्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य हेच की ते मानवीय समाजाने विकसित केलेल्या प्रत्येक ज्ञानशाखेच्या उंबरठ्यावर जाऊन तिचे दार ठोठावते, तिच्या परिधीत प्रवेश करते, आणि त्या त्या ज्ञानशाखेच्या दृष्टिकोणातून माणसाला त्याच्या क्रियाकलापांना समजून घेते, आणि मग त्याला स्वतःची विशिष्ट वाणी बहाल करून अभिव्यक्ती करते. साहित्यात वास्तव जीवन, समाजशास्त्र, इतिहास, राजकारण, राज्यशास्त्र हे सर्वच असतात, परंतु साहित्य यांपैकी एकाचेही गुलाम नसते. आपले काही भाऊबंद वेळोवेळी असे म्हणत असतात की साहित्यात हे असायला पाहिजे, ते असायला पाहिजे, साहित्य असे असायला पाहिजे, तसे असायला पाहिजे; पण यामुळेच साहित्याची गळचेपी होते; ते बिघडते, कारण ते म्हणत असते की, “hm–hm तर मी नाही!”
कारण साहित्याला माणसाच्या जीवनाचे प्रतिबिंब त्याच्या समग्र अस्तित्वाच्या आत धगधगणाऱ्या ज्वालेत बघायचे असते. लक्षात घ्या, मी इथे ‘समग्र अस्तित्व’ म्हणतो आहे, हीच बहुधा साहित्याची सर्वाधिक सुंदर आणि सर्वाधिक अपरिभाषित अशी व्याख्या होऊ शकते. कारण माणसाच्या समग्रतेचे मोजमाप कधी कोणी करू शकत नाही.
टॉलस्टॉयने एका ठिकाणी फारच सुंदर रीतीने म्हटले आहे की, …आपण साहित्याला आपले मापदंड लावून त्याचे वर्गीकरण करतो. आपण म्हणतो की या भागात ही समाजशास्त्रीय तत्त्वे आहेत, या अमुक प्रकारच्या साहित्यात ही राजकीय तत्त्वे आहेत, ही ऐतिहासिक तत्त्वे आहेत वगैरे वगैरे…. टॉलस्टॉय म्हणतो की हे असे वर्गीकरण करणे हे तेवढेच मूर्खपणाचे आणि हास्यास्पद आहे, जेवढे समुद्राच्या लाटांचे वर्गीकरण करणे ठरेल. प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हा असाच परिभाषित न होऊ शकणारा, असीम असा विस्तार असतो. आणि या असीम जीवनाच्या सत्याचा साक्षात्कार आपल्याला साहित्यातून घडतो. दूरदर्शन, वर्तमानपत्र किंवा मासमीडियासारख्या कुठल्याही सशक्त माध्यमात अशाप्रकारे जीवनसत्याचा साक्षात्कार घडविण्याची क्षमता नाही.
आपण टॉलस्टॉयच्या ‘अॅना कॅरेनिना’ कादंबरीतल्या अखेरच्या दृश्याचे उदाहरण घेऊया. नायिका आत्महत्या करायला निघालेली आहे. तिचा संपूर्ण भूतकाळ, तिच्या प्रेमाची दुःखद गाथा, ज्या प्रेमासाठी तिने आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले ते प्रेम गमावल्यामुळे एका गहन हताशेने वेढले गेलेले तिचे अस्तित्व, या सर्वांचे टॉलस्टॉयने दोन-तीन पृष्ठांमध्ये शब्दांच्या माध्यमातून जिवंत चित्रण केले आहे. हे साक्षात्कारी चित्रण दूरदर्शन किंवा चित्रपट माध्यमाच्या बिंबांमध्ये आबद्ध केले जाऊ शकते ? शब्दांच्या विशिष्ट रचनांच्या जादुई किमयेने एका संपूर्ण जीवनाची गाथा आपल्यासमोर उलगडत जाते; त्या रचनेतला एक जरी शब्द बदलला, त्या रचनेत एक जरी फेरबदल केला तरी तिची संपूर्ण वीण उसवली जाऊन ते किमयागारी शब्दशिल्प कोलमडून पडेल आणि निरर्थक शब्दांचा ढीग तेवढा उरेल.
हे झाले साहित्याचे एक वैशिष्ट्य आणि दुसरेही याच्याशी जोडलेलेच आहे. ते असे की कुठल्याही एका साहित्यकृतीला, तिच्या ऐवजीचा पर्याय असू शकत नाही. ती ज्या प्रकारे अभिव्यक्त झालेली आहे फक्त त्याच प्रकारे होऊ शकते. तिला अभिव्यक्त होण्याचा दुसरा प्रकार असू शकत नाही. कारण ज्या भाषेतून, शब्दमाध्यमातून ती व्यक्त झालेली असते त्यातच तिचे रूप, आकार, सौष्ठव सामावलेले असते, अंगभूत असते, त्यातूनच तिच्यात प्राण संचारित झालेला असतो. कोणी म्हणेल, भाषेद्वारा तर अनेक गोष्टी व्यक्त होतात. वर्तमानपत्रे, राजकारणी नेत्यांची व्याख्याने हीही भाषेच्या माध्यमाचाच वापर करतात. मग साहित्याच्या भाषेचेच काय एवढे वेगळेपण, एवढे विशेष काय आहे? आपण कधी साहित्याची भाषा, या इतर सर्वांपेक्षा वेगळी कशी, याचा कधी विचार करून पाहिलात का? जर केलात तर आपल्या हे लक्षात येईल की कुठलीही अभिजात साहित्यकृती, मग ती कविता-कथा-कादंबरी, काहीही असू शकेल, एकदा वाचून झाल्याबरोबर तिचे सत्य आपल्यापर्यंत पूर्णपणे पोहोचले आहे, असे होत नाही. काहीतरी कळायचे उरलेले आहे असे जाणवत राहाते. आपल्याला सगळे काही आकळल्याची, गवसल्याची, ज्ञात झाल्याची तृप्ती किंवा पूर्ण समाधान कधीच मिळत नाही. एक अतृप्तता पुरून उरते. ती कविता-कथा-कादंबरी पुन्हा पुन्हा वाचण्याची, त्यातून सत्याचे नवनवीन पैलू उलगडत जाण्याची आशा, अभिलाषा शिल्लक उरते. म्हणून एखादी श्रेष्ठ दर्जाची साहित्यरचना आपण वाचली आणि आपल्याला ती पूर्ण कळली असे आपण कधी म्हणू शकत नाही. आपण वारंवार त्या रचनेपाशी जातो. प्रत्येक वेळी सौंदर्यानंदाची प्राप्ती तर करून घेतोच, पण आपल्या दोन वाचनांच्या मध्ये काही वर्षांचा कालावधी उलटलेला असेल तर त्या मधल्या काळात आपण जे काही जगलो त्यानंतर एका नवीन दृष्टीने आपण त्या साहित्यकृतीचे वाचन करतो, त्यातून अर्थांचे नवे पदर उलगडण्याचा प्रयत्न करतो. ही एक अद्भुत गोष्ट आहे. कारण कविता, कथा-कादंबरी तर तीच जुनीच साहित्यकृती असते. तो कवी किंवा लेखकही कधीच ह्या जगातून निघून गेलेला असतो. तरीदेखील आपल्या जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती आपल्यापुढे अर्थांचे नवनवे आयाम उलगडते. बदललेली ती नसते तर बदललेले असते आपले अंतरंग, आपली आस्वादक्षमता, आकलनशक्ती ; त्यामुळे वाचनाच्या वेळी आपल्यासाठी त्या साहित्यकृतीचा, तिच्या सत्याचा अधिक विस्तार झालेला असतो. वृद्धी झालेली असते.
आजचे ताजे वर्तमानपत्र वाचून झाले की आपण ते फेकून देतो कारण त्यातली भाषा ही केवळ विशिष्ट माहिती किंवा बातमी ग्रहण करण्याचे साधन असते. तेवढी आपलपर्यंत पोहोचली की तिचा उपयोग संपलेला असतो. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. तेही भाषेचा उपयोग करून ; आपण केमिस्टच्या दुकानात जातो, त्या प्रिस्क्रिप्शननुसार औषधे विकत घेतली की त्याचा उपयोग संपतो. परंतु कथा-कादंबरी-कवितेच्या बाबतीत असे घडते का? यावरून असा निष्कर्ष निघतो की साहित्यात भाषेचा केवळ साधन म्हणून वापर नसतो, ती केवळ एका भौतिक उपयोगासाठी वापरलेले साधन नसते तर ती सर्वार्थाने त्या साहित्यकृतीची अविभाज्य अशी साथीदार असते. त्या कलाकृतीत भाषेचे स्वतःचे असे एक स्वायत्त सत्य असते. जे आपल्याला केवळ त्याच कवितेत, कथेत किंवा कादंबरीत भेटते. भाषेमध्ये परिबद्ध असलेल्या साहित्याच्या ज्या प्राणतत्त्वाबद्दल मी बोलतो आहे त्या प्राणतत्त्वाचे जर आपण दुसऱ्या माध्यमात जसेच्या तसे उचलून रोपण केले तर त्याला आपण खोटे म्हणू. त्याच्यातल्या सत्याला दरिद्री, विपन्न करून टाकू. कुत्सित करून टाकू. मेक्सिकन लेखक मार्कीजची कादंबरी ‘वन हन्ड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड” खूप गाजली. ह्या कलाकृतीसाठी मार्कीजला नोबेल प्राईज मिळाले. हॉलीवुडच्या प्रोड्यूसर्सनी त्याला या कादंबरीवर सिनेमा बनवण्याचे अधिकार बहाल करण्याची विनंती केली, त्यासाठी त्याला लाखो डॉलर्स देऊ केले. पण मार्कीज त्यासाठी तयार झाला नाही वार्ताहरांनी त्याला विचारले की “इतक्या कथा कादंबांवर सिनेमे निघत असतात, मग आपणच त्यासाठी तयार का नाही?” त्यावर मार्कीजने दिलेले उत्तर फारच मार्मीक आणि बोधप्रद आहे, आणि आपल्याला साहित्य या कलाप्रकाराच्या मर्माशी घेऊन जाणारं आहे.
तो म्हणाला, “जगातल्या लाखो लोकांच्या मनांत माझ्या कादंबरीतल्या पात्रांच्या प्रतिमा ठसलेल्या आहेत. त्यांचे रूप-रंग, आकार हे प्रत्येक वाचकाच्या मनात वेगवेगळे आहेत. हे बहुआयामी सौंदर्य, हे विविध सौंदर्याविष्कार कुठल्याही एका कलाबिंबात सामावणे अशक्य आहे. कादंबरीतील नायक-नायिकेच्या बाबतीत प्रत्येक वाचकाच्या मनात एक स्वतंत्र बिंब आहे. पण एकदा त्या कादंबरीवर सिनेमा निर्माण झाला, की ही सारी विविधता, संपृक्तता आक्रसून केवळ सिनेमाच्या त्या एका बिंबात संकुचित होऊन जाईल — आणि मला तसे होवून नको आहे.”
मी जेव्हा साहित्याचा ‘एकाकी’, ‘एकमेव’ आवाज म्हणतो आहे तेव्हा मला साहित्याची ही एकमेवता, ही ‘एकमेवाद्वितीयता’ अभिप्रेत आहे. अशी एकमेवाद्वितीयता जी आपल्या संपूर्ण चेतनेला, अस्तित्वाला असीमपणे विस्तारते, जी महाकाव्यांमध्ये आढळते. म्हणूनच महाकाव्यांची गणना श्रेष्ठ दर्जाच्या कलाकृतींमध्ये होते. ऑल्डस हक्सलेचा एक अतिशय सुंदर निबंध आहे. ‘एपिक अँड द होल लाईफ-‘ ‘महाकाव्य आणि समग्र जीवन-‘ इथे जीवनाची समग्रता लक्षात घ्यायला हवी. साहित्य जीवनाच्या एकूण एका अंगाला प्रतिबिंबित करते. जीवनाची एखादी बाजू कितीही किळसवाणी, घाणेरडी, बीभत्स असेना का, साहित्यासाठी ती अस्पृश्य नसते. साहित्यात अस्पृश्यता अस्तित्वातच नसते, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अस्पृश्यता साहित्यात चालूच शकत नाही कारण जी साहित्यकृती सुंदर/असुंदर किंवा कुरूप असे भेद करते ती निर्जीव असते. साहित्यात सौंदर्य म्हणजे नवरस, ज्यात बीभत्स रसाचाही समावेश असतो. या सर्व रसांचा परिपोष करूनच साहित्यकृती वाचकाला समग्र जीवनाचा साक्षात्कार घडवते.
महाभारत यासाठीच एक महान साहित्यकृती आहे, कारण ते आपल्याला कुठल्याच कटु सत्यापासून दूर पळण्याची, त्याच्याकडे डोळेझाक करण्याची संधी देत नाही. सरोवरात पाण्याखाली लपून बसलेला दुर्योधन कृष्णावर तो खोटा, कपटी, कारस्थानी असल्याचा दाखले देऊन आरोप करतो. कुरुक्षेत्रावरच्या कर्ण-कुंती संवादाचे उदाहरण घेतले तर कर्ण दोषी की कुंती हे आपण ठरवू शकतो का ? कुठलीही महान कलाकृती कधीच कुणाला ‘जज्’ करत नाही, कुणाची बाजू घेत नाही. बायबलमधले जीझस ख्राईस्टचे ते कथन आठवा. — ‘जज् नॉट, अदरवाईज यू युअरसेल्फ विल बी जज्ड्.’ कुठलीही श्रेष्ठ, अभिजात कलाकृती कोण दोषी आणि कोण निर्दोष हे कधीच सांगत नाही. याच कारणास्तव महाभारतात धर्म इतका संदिग्ध, इतका द्विधाग्रस्त आहे की त्याची व्याख्या केली जाऊ शकत नाही.
आता मी साहित्याच्या तिसऱ्या वैशिष्ट्यावर येतो. साहित्यिक हे आपल्या कलेतून विरळा किंवा अतिरंजित परिस्थिती प्रस्तुत करतात. साहित्याला जे वास्तववादी मानण्यात येते ते कोणत्या अर्थाने ते जरा बघूया. जे वास्तव आपण जगतो त्यावर शेकडो निबंध लागलेले असतात. ते तसे असायला शेकडो परिस्थितीजन्य कारणे जबाबदार असतात. ही सर्व कारणे, परिस्थिती लक्षात घेऊनच साहित्य अशी एक निर्वाणीची स्थिती निर्माण करते की त्या स्थितीत, एरवी जगताना आपण ज्या असत्यांना लपवत राहतो ती लपवणे शक्य होत नाही. मघाशी आपण ‘अॅना कॅरेनिना’ कादंबरीचे उदाहरण घेतले, तेच परत एकदा घेऊया. एरवी आपण किती स्त्रियांना आपल्या प्रेमाखातर, पॅशनखातर पती-मुले-संसार सोडून निघून जाताना बघतो? फारच कमी. पण टॉलस्टॉयने अशीच एक विरळा घटना आपल्या साहित्यकृतीसाठी निवडून मनुष्यस्वभावामधल्या, त्याच्या प्रेमाच्या बाबतीतल्या एका विलक्षण अशा सत्याला प्रकट केले.
महाभारत काय किंवा श्रेष्ठ दर्जाच्या अशा कुठल्याही अभिजात साहित्यकृती काय, जी क्वचित आढळणारी, अपवादात्मक परिस्थिती आपल्या पात्रांसाठी निवडतात, तिच्यातच आपल्या सर्वांच्या सर्वसाधारण आयुष्याचे सत्य लपलेले असते. हा विरोधाभास वाटला तरी हेच साहित्याचे मर्म आहे. असे बघा, आपल्याला अशीच पुस्तके, कथा-कादंबऱ्या-काव्य सर्वाधिक हलवून सोडतात, स्पर्श करतात, ज्यातली परिस्थिती, आपल्या एरवीच्या जगण्याहून आपल्याला निराळी वाटते. असे का म्हणून ? ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या आयुष्यात नसतात त्याच आपल्याला एवढ्या का बरे स्पर्शेन जातात, भावतात, प्रेरित करतात ? याचे कारण हे की आपण चोवीस तास जे बाह्यांगी जगत असतो तेवढेच केवळ आपले जीवन नसते. ज्या गोष्टी आपण अनेक कारणांपायी जगू शकत नाही त्याही आपल्या जीवनाचा भाग असतात. आपण एका प्रकारे जगत असतो. पण आपल्या असहाय्यतेमुळे म्हणा किंवा भीरुपणामुळे किंवा इतरही कुठल्याही मर्यादांमुळे आपण जे जगू शकत नाही तेही आपल्या आत दबलेले असते.
रॉबर्ट फ्रॉस्टच्या एका कवितेतली ओळ आहे – मी एक वाट निवडली, दुसरी सोडून दिली,पण त्या दुसऱ्या वाटेने मला कुठे नेले असते, ते मला ठाऊक नाही. अशा कितीतरी वाटा आपण सोडून दिलेल्या असतात. पण त्या आपल्या आत असतात; आणि साहित्य आपल्याला हे समजण्यासाठी मदत करते की जे विकल्प आपण सोडून दिले ते आपल्या आत जिवंत आहेत, मेलेले नाहीत. ही अशी अनेक निवड न केलेली, आपल्या आत दबलेली पण जिवंत असलेली आयुष्ये जगण्याची संधी आपल्याला साहित्यात मिळते. तर असे असताना २१ व्या शतकात या सर्व शक्यता, हे सर्व, माणूस आपल्या आयुष्यातून पार काढून टाकेल, साहित्याचे अस्तित्वच राहणार नाही, असे शक्य आहे का? आम्हा भारतीयांना वाचिक परंपरेचा एक इतिहास आहे. आपले संस्कार हे केवळ लिखित पुस्तकांवर पुष्ट झालेले नाहीत. तो केवळ एक लहानसा हिस्सा आहे.
आजही भारताच्या दक्षिण टोकापासून उत्तरेपर्यंतच्या खेड्यांमधून ज्ञानी, अनुभवी आणि संवेदनशील माणसे आहेत, जी विद्यापीठात शिकली नाहीत. त्यांना कीट्स, बायरन, सुमित्रानंदन पंत तोंडपाठ नाहीत. ती आहेत पिढ्यान् पिढ्या रामायण, महाभारताच्या लोककथांवर पोसलेली. त्यांच्या श्रवणाने त्यांना आपल्या सांस्कृतिक परंपरांची ओळख पटलेली आहे. ज्यामुळे आपण या देशाचा नागरिक बनण्याचा, भारतीय गौरव प्राप्त करतो, ते नागरिकत्व किंवा भारतीयत्व हे केवळ एक राजकीय शिक्कामोर्तब नसून ते केवळ साहित्याचे (यात लोकसाहित्य आणि मौखिक परंपराही आली), संस्कारच आपल्याला शिकवू शकतात; जे शतकानुशतके आपल्या धमन्यांमधून स्पंदित होत आहेत.
म्हणूनच मी आपले लक्ष आणखी एका गोष्टीकडे वेधू इच्छितो की साहित्याचा आवाज जरी एकटा असला तरी त्यात अनेक परंपराचे पडसाद उमटलेले असतात. हे एखाद्या लहान मुलाप्रमाणे असते म्हणा ना. मूल जन्मते तेव्हा आई म्हणते, “अरे याचे नाकडोळे अगदी आजोबांवर गेले आहेत, हं!’; मोठे होऊ लागते तेव्हा कोणीतरी म्हणते, “चालण्याची ढब अगदी आपल्या काकासारखी आहे, बरे का याची!”; आणखी थोडा मोठा झाल्यावर कोणीतरी म्हणते, “डोळ्यांचा रंग मामाचा घेतला या बेट्याने!’; पण विलक्षण गोष्ट म्हणजे, निरनिराळ्या टप्प्यांवर त्या मुलाचे निरनिराळ्या लोकांशी साम्य जाणवत असले तरी त्या मुलाचे स्वतःचे असे एक विशिष्ट व्यक्तिमत्त्व असते. स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व ते कायम राखते.
ज्यात दुसरे पडसाद ऐकू येत नाहीत ते कसले साहित्य ? ‘निराला’ची कविता वाचताना त्यात जर ‘तुलसीदास’ ऐकू येत नसतील तर मग ‘निराला’ हे फार छोट्या दाचे कवी म्हणावे लागतील. प्रत्येक नवा कवी हा आपल्या कवितेतून जुन्या श्रेष्ठ कवींचे स्मरण करून देतो, आणि अशाप्रकारे आपल्या कवितेतून भाषेतील साहित्याच्या परंपरांचे जतन करतो. परंपरा म्हणजे काही एखादे शव नाही, ज्याला सांभाळून ठेवण्यासाठी म्हणून आपल्याला त्याला डोक्यावर घेऊन चालावे लागते! परंपरा ही एक जिवंत गोष्ट आहे. साहित्यनिर्मिती ही एक अद्वितीय सृजनप्रक्रिया आहे, जिच्यात अनेक प्रकारच्या बिंबांना, प्रतिमांना, स्वरांना, ध्वनींना संयोजित करावे लागते. यातली बरीच बिंबे, प्रतिमा वगैरे आपण आपल्या परंपरेतून, जुन्या कवींकडून घेतो. पण त्यांच्याशिवाय आपल्या साहित्यकृतीत अनेक नवी बिंबे, प्रतिमा, स्वर, आशय इत्यादि उतरतात कारण आपण आपल्या अगोदरच्या कवींच्या, लेखकांच्या खांद्यावर चढून जगाकडे, जीवनाकडे बघत असतो.
शेवटी फक्त एक गोष्ट नमूद करून मी हे बोलणे थांबवतो. साहित्याला वाचवण्याची जबाबदारी आपण केवळ साहित्यिकांवर सोडून चालणार नाही. इथे साहित्याला वाचवण्याचा अर्थ मला सामाजिक अंगाने अभिप्रेत आहे. म्हणजे कथा-कविता-कादंबरी यांनी समाजमनाच्या चेतनेला स्पर्श करून, त्याच्यात तरंग उठवून, त्याला अस्वस्थ करून सिंहावलोकन करायला भाग पाडणे, आपले सर्वच मापदंड पुन्हा एकवार तपासून पाहायला उद्युक्त करणे, हा अर्थ मला अभिप्रेत आहे. आणि हे शक्य व्हायला प्राध्यापक, अॅकॅडेमिशियन्स, विश्वविद्यालयातून निघणारी नियतकालिके अशा सर्वांच्या एकत्र प्रयत्नातून सकस मनोभूमी असलेले वाचक तयार व्हावे लागतील, ज्यांच्यासोबत साहित्य संवाद साधू शकेल. आपला समाज जेवढा अधिक सुशिक्षित, सुसंस्कृत, अभिरुचीसंपन्न होईल तितके कवींच्या लेखकांच्या रचनांचे पडसाद वाचकांच्या मनाच्या सांदीकोपयात खोलवर, समाजात दूरपर्यंत पोहोचून संवाद साधतील, वाचकांना आपल्या स्वतःच्या व सभोवतालच्या जीवनाला सर्वंकषपणे समजून घेण्यात साहाय्यभूत ठरतील.
लेखक किंवा कवि आपली रचना जरी एकांतात एकट्याने रचत असला तरी त्या रचनेचे पडसाद हे संपूर्ण समाजाला व्यापून टाकतात, समाजमनाच्या तळापर्यंत शिरून त्याच्या अंतराला प्रकाशित करतात.
साहित्याचा हेतू बदल घडवणे हा नसतो तर वाचकाच्या चेतनेच्या अवकाशाला विस्तारित करणे हा असतो. उदाहरणादाखल एखाद्या मनोऱ्यावर चढून जाताना त्याच्या पहिल्या मजल्यावरून आपल्याला सभोवतालचे जे दृश्य दिसते त्यात दुसऱ्या मजल्यावरून बघताना आणखी नवे काहीतरी वाढलेले दिसते; व तिसऱ्या मजल्यावरून बघताना आणिक काही नव्या गोष्टी दृष्टीच्या टप्प्यात आल्यामुळे पुन्हा ते दृश्य अधिक विस्तारित होते.
साहित्याच्या बाबतीत ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक महान साहित्य-कृती ही सरकत्या काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या आकलनक्षमतेला अधिकाधिक विस्तारित, सक्षम करत जाते. परिणामतः प्रत्येक टप्प्यावर त्या एकाच साहित्यकृतीचा आपल्याला नवा साक्षात्कार होतो. तो पूर्वीपेक्षा अधिक अर्थपूर्ण, आलोकित करणारा असतो.
साहित्य आपल्याला एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे किंवा उपदेशकाप्रमाणे, सत्य काय नि असत्य काय, बरोबर काय नि चूक काय, हे सांगत नाही; तर साहित्य आपल्या विवेकाच्या अवकाशाला विस्तारित करते, आपल्या चेतनेचा आवाका अधिकाधिक विस्तारित करत नेते. त्यामुळे त्या विशिष्ट साहित्यकृतीशी होणाऱ्या प्रत्येक भेटीनंतर आपले जीवनाबद्दलचे आधीचे भ्रम, मापदंड, भ्रांती, धारणा, विश्वास सर्व गळून पडतात आणि त्यातूनच अधिक समृद्ध, व्यापक, परिपक्व, अधिक सहिष्णू, विनम्र अशी दृष्टी, समज, क्षमता आपण मिळवतो. आता या आधीच्या दृष्टिकोणाच्या गळून पडण्याला, विलीन होण्याला कोणी साहित्याचा नकारात्मक परिणाम म्हणेल तर ते बरोबर नाही, कारण आधीच्या दृष्टिकोणाच्या विलीनीकरणासोबतच एका नव्या अधिक शहाण्या, परिपक्व, सहिष्णु दृष्टिकोणाचे सृजन होते.
साहित्य आपले बोट धरून आपल्याला, हा बघ हा क्रांतीचा रस्ता आहे, हा सत्याचा मार्ग आहे, या मार्गात तुझे कल्याण आहे असे कधीच सांगत नाही. पण अंधार कुठे आहे, कशात आहे हे दाखवून प्रकाश शोधण्याची कुवत, क्षमता, प्रेरणा आपल्यात निर्माण करते. वर्तमानकाळात साहित्याची आत्यंतिक गरज आहे. विविध विचारधारांच्या कोलाहलात, धार्मिक अनुष्ठानांच्या, सांप्रदायिक घोषणांच्या गोंगाटात केवळ साहित्याचाच तेवढा एक कोमल आवाज आहे. जो आपल्याला आपले कान धरून काहीच शिकवत नाही; तर केवळ, हे जीवन समजण्यासाठी ज्या चेतनेची, संवेदनशीलतेची, सहिष्णुतेची आवश्यकता असते तिला अधिक सूक्ष्म, परिष्कृत, समृद्ध, व्यापक, विशाल करून सोडतो.

[मूळ लेखक: निर्मल वर्मा (१९२९-२००५). हिंदीतील एक श्रेष्ठ, संवेदनशील कादंबरीकार आणि कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. काही वर्षे टाइम्स ऑफ इंडिया करता युरोपातील सांस्कृतिक व राजकीय समस्यांवर विवेचनात्मक लिखाणही त्यांनी केले. साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले एक विचारवंत म्हणून हिंदी वाययात त्यांना मानाचे स्थान आहे.]