पुरुषांच्या नावे एक खुले पत्र

प्रिय सद्गृहस्थहो, आमच्याविषयी व आमच्या उद्दिष्टांविषयी आपण आपल्या मनात काही गैरसमज बाळगून आहात, असे आमच्या निदर्शनास आले आहे. आपण सर्व एकत्र येऊन एक अधिक संतुलित समाज बनविण्याच्या कामात या गैरसमजुती व काही तद्दन खोट्या गोष्टींमुळे अडथळा निर्माण होतो. आपल्या मनातील हे अपसमज-गैरसमज दूर करावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. कृपया तसे करण्याची संधी आम्हाला द्यावी.
१. तुमचे लिंगच्छेद करण्याचा आमचा अजिबात इरादा नाही.
२. (स्त्री व पुरुषांच्या) भूमिकांची अदलाबदल करणे हे आमचे ध्येय नाही. हजारो वर्षे आम्ही ज्या तुरुंगात खितपत पडलो त्यात तुम्हाला बंदिस्त करून ठेवणे हे आमचे उद्दिष्ट नाही. तुम्ही घरात राहून रांधा, वाढा, उष्टी काढण्यात, घर टापटीप ठेवण्यात व मुलांना सांभाळण्यात गुंतला आहात; आम्ही संसदेतील चर्चा आटोपून घरी येऊन टीव्हीवर क्रिकेट मॅचचा आस्वाद घेत आहोत व तुम्ही आमच्या हातात गरमागरम भज्यांची बशी व वाफाळलेला चहाचा कप ठेवत आहात
कधी कधी गंमत म्हणून आम्ही अशी खुन्नसवाली स्वप्ने बघतो. पण प्रत्यक्षात आमच्या मनात तसले काही नाही, ह्याविषयी तुम्ही निःशंक राहा.
३. आमच्यातल्या बऱ्याच जणींना कधीकधी नटाय-मुरडायला आवडते; आम्हाला फक्त आमच्याकडून कोणी तशी अपेक्षा केलेली आवडत नाही.
४. आम्ही तुम्हाला सेक्सी समजावे अशी तुमची अपेक्षा आहे, तसेच आम्ही शारीरिकदृष्ट्या आकर्षक आहोत असे तुम्हाला वाटावे असे आम्हाला वाटते. तुम्हाला आमच्या स्तनांचे प्रचंड आकर्षण वाटते हेही आम्हाला मान्य आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. त्या स्तनांच्या आत एका मानवी हृदयाची स्पंदने आहेत आणि आमच्या नशील्या डोळ्यांमागे एक पूर्णपणे कार्यक्षम मेंदूदेखील आहे. तुमच्या स्त्री-दाक्षिण्याची आम्ही नोंद घेतो व त्याबद्दल आभारही मानतो. पण गाडीचा किंवा खोलीचा दरवाजा उघडणे, किंवा बसमधली आमची आरक्षित जागा आम्हाला देऊ करणे, यामुळे ‘उलटा जमाना आला आहे’ किंवा ‘पुरुषांचे शोषण होते आहे’ असे जर तुम्हाला वाटत असेल, तर ते मात्र आम्हाला मान्य नाही. माफ करा, अदबीने बोलणे व दरवाजा उघडणे अशा कृतीतून साऱ्या जुन्या गोष्टींची फिर्टफाट झाली असे मानणे चुकीचे आहे. तुम्हाला जर खरेच तसे वाटत असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला आमचे म्हणणे कळलेच नाही असा होतो.
5. आम्हाला विचाराल तर जेवणाचे बिल तुम्ही देण्यापेक्षा ‘समान कामासाठी समान वेतन’ आम्ही नक्कीच पसंत करू.
६. समाजातल्या साऱ्या वाईट गोष्टींसाठी तुम्ही जबाबदार आहात असे आम्ही मानत नाही (त्यातला बराचसा वाटा आमचाही आहे). प्रचलित समाजव्यवस्थेचे बळी फक्त आम्हीच आहोत, असाही आमचा दावा नाही. उदाहरणार्थ, तुमच्यातल्या कोणाला जर वाटले की व्यावसायिक यशाच्या पायऱ्या चढण्यापेक्षा आपण घरी बसून मुलांना वाढवावे किंवा एखाद्या कलेची उपासना करावी, तर त्याच्या पुरुषपणाबद्दलच शंका घेतली जाईल, याची आम्हाला जाणीव आहे. सामाजिकीकरणाची प्रक्रिया बहुतांशी व्यक्तीच्या नेणिवेच्या पातळीवर घडते; त्यामुळे बहुसंख्य पुरुषांना त्याचे भानच नसते. तुमच्यातले काहीजण जेव्हा ‘पायातली वहाण पायातच ठेवा’ असा आग्रह धरतात, तेव्हा त्यांच्यातील थोडेच जण तसे जाणीवपूर्वक करत असतात, हेही आम्ही जाणतो. म्हणूनच स्त्री-पुरुष नात्यातील असंतुलन ही एक समस्या असल्याचे भान खूपच कमी पुरुषांना असणे स्वाभाविकच आहे. तुम्ही जेव्हा ह्या प्रश्नाविषयीची स्वतःची जाणीव विकसित करण्यासाठी व त्याचे उत्तर शोधण्यासाठी धडपडता, तेव्हा आम्ही तुम्हाला मनापासून सलाम करतो.
७. ‘स्त्रीवाद’ किंवा ‘स्त्रीमुक्तीवाद’ ह्या संकल्पनेचा शब्दकोशातील अर्थ ‘स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने सामाजिक, राजकीय व अन्य अधिकार मिळावे असे मानणारी विचारधारा’ असा आहे. स्त्रीमुक्तीचा अर्थ ‘स्त्रियांना पुरुषांपेक्षा श्रेष्ठ मानणे’ किंवा ‘पुरुषांचा द्वेष करणे’ असा होत नाही. स्त्री-पुरुष समानतेवर विश्वास फक्त बायकांचाच असतो असे नाही. खरेतर स्त्रीमुक्तीवादी पुरुषांना आमच्याकडे भरपूर भाव मिळतो.
८. आम्ही सदासर्वकाळ संतापलेलो नसतो व तिन्हीत्रिकाळ संघर्षाची, आंदोलनाची, रस्त्यावर येण्याची भाषा करीत नसतो. झाले आहे असे की आम्हाला परिवर्तन हवे आहे, आणि दीर्घकाळ वाट पाहून आमची सहनशक्ती संपायला आली आहे. तुमच्या साथीशिवाय आम्हाला समानता साध्य करता येणार नाही. समीकरणाची दुसरी बाजू, मानवतेचा अर्धा हिस्सा म्हणजे तुम्ही. कळविण्यास खेद होतो, पण ही वस्तुस्थिती आहे की सत्ता तुमच्याच हातात आहे. सत्तेसोबत जबाबदारी येते व जबाबदारीतला आमचा वाटा उचलण्याची आमची तयारी आहे. तुमच्यातल्या काही जणांच्या मनात आमच्याविषयी निष्कारण भीती आहे. तिचा तुम्ही त्याग कराल, अशी आम्हाला आशा आहे. कारण तुम्ही आमचे साथीदार आहात, शत्रू नाही, ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ असे हे युद्ध नाही. आपले दोघांचे मिळून युद्ध आहे विषमतेशी, पुरुषप्रधानतेशी. आम्ही तुम्हाला ह्या युद्धात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत.
सप्रेम.

स्त्रीमुक्तीवादी स्त्रियांच्या वतीने
एरिका लिट्ल – हेरन
[ पूर्वप्रसिद्धी : पिकेट वृत्तपत्र, नोव्हें. २००६]