डार्विन आणि स्त्रीवादः संवादी शक्यता

निसर्गाविषयी भूमिका घेण्याबद्दल स्त्रीवाद्यांमध्ये बहुतांशी प्रतिकूलता आढळते. निसर्ग म्हणजे निष्क्रिय, अपरिवर्तनीय, ज्याविरुद्ध लढावे लागेल असा अडथळा – असेच चित्रण स्त्रीवादी साहित्यात दिसते. स्त्रीवादी राजकारणाचा रोखही बढेशी असाच राहिला आहे. अर्थात् मानवी किंवा सामाजिक जीवनाच्या जीवशास्त्रीय विश्लेषणाबद्दल स्त्रीवाद्यांना वाटणाऱ्या शंका अप्रस्तुत नाहीत. कारण शास्त्रज्ञांनी जीवशास्त्रीय अध्ययनांमध्ये शरीर, शारीरिक क्रिया-प्रक्रिया यांच्याविषयी मांडलेली गृहीतके, त्यांसाठी वापरलेली तंत्रे व निकष यांमध्ये अनेकदा पूर्वग्रहदूषित व अवैज्ञानिक बाबी आढळतात. विशेषतः उजवी मंडळी आपल्या मतांच्या पुरस्कारासाठी ज्या प्रकारचे विश्लेषण/अध्ययन वापरतात, त्याच्याबद्दल तर स्त्रीवाद्यांचे आक्षेप हमखास लागू पडतात. परंतु, सरतेशेवटी आपण सर्वच निसर्गाचा, जीवशास्त्राचा एक भाग असल्यामुळे निसर्ग किंवा जीवशास्त्रालाच नाकारणे कितपत योग्य ठरेल ? जीवशास्त्राचे पुरुषसत्ताक दृष्टीतून केले जाणारे चित्रण एकांगी व उथळ आहे; जीवनाची, विशेषतः स्त्री-जीवनाची बहुविधता, व्यामिश्रता, संपन्नता त्यातून प्रकट होत नाही हा स्त्रीवाद्यांचा दावा आहे. तो सिद्ध करायचा झाल्यास जीवशास्त्रालाच न नाकारता, त्याचे अधिक संपन्न व विविधांगी रूप त्यांनी सादर केले पाहिजे. तेव्हा कोठे ‘आम्हीच आमचे जीवशास्त्र’ (We are our biologies) ही त्यांची घोषणा प्रत्यक्षात उतरू शकेल. माझ्या दृष्टीने जीवशास्त्र व संस्कृती (एका अर्थाने nature & nurture) यांना जोडणारा कळीचा मुद्दा पुढीलप्रमाणे आहे — संस्कृतीचे अस्तित्व व सामाजिक परिवर्तन यासाठी जीवशास्त्र (सजीवांची शारीरिक रचना व संघटन) कश्या पद्धतीने साह्यभूत होऊ शकते?
चार्ल्स डार्विन ह्या आधुनिक काळातील एका अतिशय महत्त्वाच्या विचारवंताच्या मांडणीकडे स्त्रीवाद्यांनी केलेले दुर्लक्षही असेच लक्षणीय आहे. विशेषतः अलिकडच्या काळात नीत्शेपासून देरिदा व लाकानपर्यंत अनेक पुरुष विचारवंतांविषयी स्त्रीवादी समीक्षा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना डार्विनकडे स्त्रीवाद्यांनी केलेले दुर्लक्ष अधिकच नजरेत भरते. निसर्ग व जीवशास्त्राविषयी (जो डार्विनच्या प्रतिपादनाचा गाभा आहे) स्त्रीवाद्यांना वाटणारा कमालीचा अविश्वास हेच त्यामागील कारण असू शकते. परंतु, तसे केल्याने काळ व उत्क्रांती याविषयी डार्विनने केलेल्या मांडणीच्या व्यापक व उत्पाती परिणामांकडे त्या पाठ फिरवताना दिसतात. खरे तर डार्विनची मांडणी व तिचे परिणाम समजून घेणे ही जीवशास्त्राविषयीच्या त्यांच्या पर्यायी मांडणीसाठी अत्यावश्यक बाब ठरू शकते. डार्विनच्या समीक्षेचे काही प्रयत्न स्त्रीवाद्यांनी केलेले आहेत. जॅनेट सेयर ह्यांचे बायॉलॉजिकल पॉलिटिक्स : फेमिनिस्ट अँड अँटि-फेमिनिस्ट पस्पेक्टिव्हज् हे १९८२ सालचे पुस्तक त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यांनी डार्विनची मांडणी व सध्या प्रचलित सामाजिक डार्विनवाद व डेलळेलळेश्रेसू ह्यांत फरक केला आहे. ‘कोणत्याही प्रजातीचे गुणधर्म ठरीव नसतात, तर पर्यावरणातील बदलांशी सुसंगत परिवर्तन त्यांच्यात घडत असते’ ही डार्विनची मांडणी त्यांना आकृष्ट करते. त्यात त्यांना परिवर्तनाच्या असंख्य संभावना, आणि म्हणूनच स्त्रीवादाची बीजे दिसतात. सेयर्सच्या मते सामाजिक नातेसंबंध व मूल्यव्यवस्था ह्यांच्यात मूलभूत परिवर्तन घडवू पाहणाऱ्या स्त्रीवादी चळवळींना ही मांडणी साह्यभूत ठरू शकेल. दुर्दैवाने ह्या मांडणीचा पुरेसा विस्तार व त्याला आधारभूत विश्लेषण त्या करताना दिसत नाहीत.
परंतु हा अपवाद वगळल्यास बहुसंख्य स्त्रीवादी समीक्षक डार्विनीय मांडणीला एका प्रकारच्या नियतिवादाचे संकुचित स्वरूप देताना दिसतात. पॅट्रिशिया अँडेअर गोवाटी (Patricia Adair Gowaty) हे ह्या संदर्भातले एक महत्त्वाचे आणि प्रातिनिधिक नाव. तिच्या मते डार्विनवाद हा स्त्रीवादाला समांतर सामाजिक व राजकीय प्रवाह आहे. हे दोन्ही प्रवाह वेगवेगळ्या अवकाशांत कार्यरत असल्यामुळे त्यांचा परस्परांवर काही अनुकूल प्रतिकूल परिणाम होत नाही. अशा मांडणीमुळे डार्विनवादाच्या प्रभावापासून स्त्रीवाद सुरक्षित राहतो; पण ‘परिवर्तनशीलता’ हा डार्विनवादाचा गाभा आहे, ह्या मूलभूत बाबीकडे मात्र दुर्लक्ष होते. स्त्रीवाद म्हणजे सामाजिक समतेचा लढा व विज्ञान म्हणजे कार्यकारणभावाचा शोध असे दोन हवाबंद कप्पे केले, की त्यांच्या आंतरक्रियेची, परस्परांकडून शिकण्याची, समृद्ध होण्याची, स्वतःसोबत दुसऱ्याला बदलण्याची संभावनाच संपुष्टात येते.
बहुसंख्य स्त्रीवादी विचारक डार्विनवादाला एवढेही महत्त्व देत नाहीत; डार्विनची मांडणी पुरुषप्रधानतेला उजाळा देणारी, आणि म्हणूनच स्त्री(मुक्ती)विरोधी आहे असे शिक्कामोर्तब करून त्या मोकळ्या होतात. फ्रॉईडच्या मांडणीवर अशाच प्रकारचा हल्ला स्त्रीवाद्यांनी केला होता. अर्थात् ‘पुरुषत्वाला महत्त्वाचा व स्त्रीत्वाला गौण’ लेखण्याचा आरोप स्त्रीवादाच्या जन्मापूर्वीच्या प्रत्येक मांडणीवर करता येईल. ते एक वेळेस मान्य केले तरी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की (फ्रॉईड, डार्विन किंवा अन्य विचारकांच्या) मांडणीत असे काही आहे का, ज्याद्वारे सध्याच्या (पुरुषसत्ताक) सत्तेच्या रचनेला समजण्यात व ती बदलविण्यात आपल्याला साह्य होईल ? स्त्रीवादी समज व प्रतिसाद अधिक सूक्ष्म, संपन्न, व्यामिश्र होण्यास ते साह्यभूत ठरतात का? स्त्रीवादाला बळ पुरविण्याजोगी काही वैचारिक रसद-प्रारूप, पद्धती, प्रश्न, संदर्भचौकट, दृष्टिकोण-त्यांच्याकडे आहे का? फ्रॉईडचा प्रतिवाद करतानाच स्त्रीवादाने त्याच्याकडून बरेच काही घेतले. विशेषतः त्याचे अचेतन मनाचे विश्लेषण आणि व्यक्तीला स्वतःची लैंगिक ओळख होण्याची/सापडण्याची प्रक्रिया यामुळे स्त्रीवाद समृद्धच झाला आहे. डार्विनवादाच्या बाबतीत असे का घडले नाही, याचे मला आश्चर्य वाटते. डार्विनच्या प्रतिपादनातील काही गोष्टी मला मोलाच्या व स्त्रीवादाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात. कालदृष्ट्या पुढे जाणे म्हणजे विकास असे तो मानत नाही; वैविध्य व त्यातून नवनिर्मिती, पदार्थ व त्याचे जैविक प्रकटीकरण ह्या दुव्यांविषयीचा तो सर्वांत महत्त्वाचा (ओरिजिनल) विचारक आहे. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत लैंगिक निवडीला कळीचे स्थान आहे असे तो मांडतो. वैविध्य (समलिंगी, भिन्नलिंगी, एकाच/अनेक प्रजातीतील) हा त्याच्या मांडणीचा गाभा आहे. ह्या लेखाच्या उर्वरित भागात मी डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या परिणामांची चिकित्सा स्त्रीवादी दृष्टिकोणातून करण्याच्या शक्यता आजमावणार आहे.
डार्विनीय उत्क्रांती
डार्विनची नेमकी मांडणी काय आहे? एक, आज अस्तित्वात असलेल्या प्रजाती व सजीव हे पूर्वीच्या सजीव रूपांतून उत्क्रांत झाले आहेत. म्हणजेच ‘ऑरिजिन ऑफ स्पीशीज’ काही असेल, तर तो पूर्वीच्या प्रजाती व त्यांच्या रूपांतरणात आहे. दोन, जुन्यातून नव्याची उत्क्रांती कशी होते? रूपांतरण व म्यूटेशन्सच्या अव्याहत चक्रातून विविधता व विपुलता ह्यांच्या सातत्यपूर्ण आंतरक्रियेतून नव्या सजीव रूपांची उत्पत्ती कशी होते, ही प्रक्रिया डार्विनने समजावून सांगितली आहे.
डार्विनच्या मते उत्क्रांतीच्या मुळाशी तीन गतिकीय घटक आहेत – – बहुविधता, प्रचुरता व नैसर्गिक निवड. त्यांच्या गतिशील आंतरक्रियेमुळेच सजीव संस्था स्थितिशील न राहता गतिमान, विकसनशील व परिवर्तनशील बनतात. एवढेच नाही तर ही आंतरक्रिया एका अकल्पित, इतिहासाच्या व वर्तमानाच्या सीमा उल्लंघणाऱ्या भविष्याकडे साऱ्या सजीव सृष्टीला खेचणाऱ्या सहजप्रवृत्तीला, नैसर्गिक शक्तीला जन्म देते. बहुविधता म्हणजे काय ? प्रत्येक प्रजातीत व्यक्तिगत विविधतेच्या असंख्य सूक्ष्म छटा अस्तित्वात असतात, त्यातूनच आंतरप्रजातीय विविधतेचा उगम होतो. ह्यातील बहुसंख्य बदल वास्तवाशी गैरलागू, पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या बाबतीत निरुपयोगी व म्हणूनच उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अनावश्यक किंवा प्रतिकूल असतात. पर्यायाने असे सजीव/प्रजाती नामशेष होतात. पण निवडक स्वैर (random) बदल मात्र पर्यावरणाशी अनुकूल व पर्यायाने उत्क्रांतीला साह्यभूत असतात. तेवढेच फक्त टिकतात व पुढच्या पिढीत संक्रमित केले जातात. पुनरुत्पादनातील प्रचुरता किंवा अत्यधिकता हीदेखील नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तिच्यामुळे एकूण प्रजातींची व प्रत्येक प्रजातीतील सजीवांची संख्या अतोनात वाढते. त्यामुळे सजीवांना व प्रजातींना दुर्भिक्ष्य व पर्यावरणातील प्रतिकूलतेशी मुकाबला करावा लागतो. जगण्यासाठी उपलब्ध संसाधनांची मर्यादित संख्या व त्यावर अवलंबून असणाऱ्या प्रजाती/सजीवांची अमर्याद संख्या ह्यातूनच तगण्यासाठी स्पर्धेचा, जगण्याच्या संघर्षाचा जन्म होतो. नैसर्गिक निवडीचे मूळ ह्यात आहे. जर जगू इच्छिणाऱ्यांची संख्या मर्यादित असेल किंवा त्यांच्या गुणधर्मांत फारशी विविधता नसेल, तर नैसर्गिक निवडीद्वारा अधिक योग्य सजीवांच्या निर्मितीची प्रक्रियाच बोथट होईल. अर्थात् बहुविधता व अतिरेकी पुनरुत्पादनाच्या प्रक्रिया हाताबाहेर जाऊ नयेत, यासाठी निसर्गाची स्वतःची नियंत्रणव्यवस्था असते. त्यामुळे उत्क्रांतीला पूरक बदल तेवढेच टिकतात.
ह्या प्रक्रियेचा एक अर्थ असाही होतो की अतिसूक्ष्म वेगळेपण हे देखील अनपेक्षित परिस्थितीत उत्क्रांतीच्या चक्रात महत्त्वपूर्ण ठरू शकते. हे वेगळेपण, हा छोटासा बदल जर उत्क्रांतिदृष्ट्या लाभकारक असेल तर तो पुढील पिढ्यांत संक्रमित व वर्धिष्णु होत जाऊन त्यातून रूपांतरणाचा, गुणधर्मांतील परिवर्तनाचा नवा प्रवाह निर्माण होऊ शकतो. असा विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या सजीवांचा समूह वेगळ्या पर्यावरणात गेला किंवा स्थलांतरित झाला, तर त्यातून पुढे नव्या प्रजातींची निर्मिती होऊ शकते.
ह्या प्रक्रियेचा तोल टिकविण्यात ‘नैसर्गिक निवडी’च्या तत्त्वाचा महत्त्वाचा वाटा आहे. ह्या संकल्पनेत अशा सर्व प्रक्रियांचा समावेश होतो, ज्यांद्वारे वैयक्तिक विविधतेचे मूल्य व महत्त्व ठरविण्याचे निकष निर्माण होतात. डार्विनने त्याला ‘जतनतत्त्व’ (principle of preservation) म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात ही दुधारी तलवार आहे. एकीकडे ह्या तत्त्वाद्वारे वैयक्तिक व आंतरप्रजातीय विविधतेला चाळण लावून त्यांपैकी जीवन-संघर्षाला निरुपयोगी अशा बहुसंख्य सजीवांच्या पुनरुत्पादनावर अंकुश लावला जातो. उत्क्रांतिदृष्ट्या निरुपयोगी प्राणी, प्रजाती त्यामुळे नामशेष होतात. दुसरीकडे, ह्या संघर्षात तगणाऱ्या सजीवांवर दबाव टाकून अधिक वैविध्यपूर्ण सजीवांचे अत्यधिक पुनरुत्पादन त्यांद्वारे करण्यात येते.
नैसर्गिक निवडीच्या संकल्पनेला डार्विन ‘कृत्रिम निवड’ व ‘नैसर्गिक निवड’ असा आणखी एक वळसा घालून ती अधिक व्यामिश्र व संपन्न बनवितो. माणूस (पाळीव) प्राण्यांच्या पैदायशीसाठी (breeding) जी तंत्रे व प्रक्रिया वापरतो, ती ‘कृत्रिम निवड’. डार्विन मानवनिर्मित निवड वि. निसर्गनिर्मित निवड असे द्वंद्व उभे न करता तो मानवनिर्मित निवडीकडे अधिक जटिल ‘नैसर्गिक निवड’ समजून घेण्याचे एक साधन म्हणून बघतो, हे विशेष.
नैसर्गिक निवडीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘लैंगिक निवड’. (लैंगिक पुनरुत्पादन करणाऱ्या सजीवांना उभयलिंगी सजीवांपेक्षा उत्क्रांतिप्रक्रियेत प्राधान्य मिळते.) भिन्नलिंगी प्राण्याला आकृष्ट करण्यासाठी आवश्यक गुणधर्म (सौंदर्य, आकर्षकता, डौल, प्रियाराधन-कौशल्य इ.), प्राण्यांनी त्यासाठी घेतलेला सक्रिय पुढाकार, आनंद किंवा कामेच्छा यांचे प्रकटीकरण; या साऱ्यांनी नैसर्गिक निवडीच्या संकल्पनेला बहुरंगी व ‘मजेदार’ बनविले आहे. कधी कधी तर लैंगिक निवडीसाठी आवश्यक घटक नैसर्गिक निवडीच्या निकषांवर कुरघोडी करताना दिसतात. उदा. मोराच्या चित्ताकर्षक पिसाऱ्यामुळे त्याला कोणताही उत्क्रांतीय लाभ होत नाही. जीवनसंघर्षात त्याला तो उपयोगी पडत नाही. उलट त्यामुळे तो भक्षकाच्या नजरेस सहज पडून त्याचे भक्ष्य बनू शकतो. पण ‘साध्यासुध्या’ लांडोरीला आकृष्ट करण्यासाठी पिसाऱ्याचा डौल आवश्यक आहे. बिनपिसारावाले मोर नामशेष झाले, पण पिसारावाले तगले, ह्याचा अर्थ एवढाच की ‘लैंगिक निवड’ नैसर्गिक निवडीला ‘भारी पडली’.
लैंगिक निवड व वंश
विविध वंशांमधील फरक केवळ पर्यावरणाच्या दबावामुळे निर्माण झाले असे मानणे चुकीचे ठरेल, लैंगिक निवडीचीही त्यात काही भूमिका निश्चितच आहे. मुळात स्त्री-पुरुषांनी एकमेकांची लैंगिक व पुनरुत्पादक साथीदार म्हणून निवड करताना चेहेरेपट्टी, वर्ण, केसांची रचना ह्यांतील सूक्ष्म फरकही महत्त्वाचे ठरले असतील. जीवशास्त्रीयदृष्ट्या किरकोळ फरक लैंगिक आकर्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले असण्याची शक्यता आहे. कालांतराने हेच फरक व्यापक होऊन विविध टोळ्यांच्या स्थलांतरामुळे विभिन्न भौगोलिक परिस्थितीमध्ये अधिक स्थायी स्वरूपाचे झाले असावेत व त्यातून वांशिक विभिन्नता जन्मली असावी असे डार्विन मांडतो.
थोडक्यात, विविधता, विपुलता व नैसर्गिक निवडीच्या गुंफणीतून साकारलेली उत्क्रांतीची प्रक्रिया सूत्रबद्ध, संतत, नियमाधिष्ठित आहे आणि त्याच वेळी उत्स्फूर्तता, आकस्मिकता, संधी, शक्यतांमुळे तिच्यात अकालीततेचे धूसर रंगही मिसळले आहेत. विविधता व आनुवंशिकतेद्वारा काही बदल क्रमशः, हळूहळू, प्रदीर्घ कालावधीत घडताना दिसतात, तर कधी कधी नैसर्गिक निवडीच्या माध्यमातून अनेक उत्पाती बदल, मोठ्या जनसंख्येच्या पातळीवर वेगाने घडताना देखील आढळतात. ह्या दोन्ही पदरांच्या परस्परगुंफणीतूनच नव्याचा जन्म होतो.
डार्विनच्या मते chance म्हणजे निव्वळ योगायोग, अकारण घडणारी गोष्ट नव्हे. उलट अनेकविध कारणे उपलब्ध असल्यामुळे कोणतीतरी एक, सरळरेषीय घटना न घडता विक्षेपणाद्वारे विविध घटनांची साखळी निर्माण होऊ शकते. त्यामुळेच, उत्क्रांतीच्या प्रक्रियेत भविष्यकाळ भूत व भविष्याशी जुळलेला असला, तरीही त्यांपासून मुक्त व म्हणूनच अज्ञात असतो. थोडक्यात, उत्क्रांती ही मूलतः खुली, भविष्याकडे निरंतर खेचली जाणारी प्रक्रिया असून तिच्यात कोणतीही विशिष्ट दिशा, विशिष्ट फलिताची अपेक्षा, किंवा विकास वा सुधारणेची हमी अनस्युत नाही; मात्र विस्तार व परिवर्तनाची आंतरिक बीजे तिच्यात दडलेली असतात, एवढे निश्चित.
डार्विन व संस्कृती
डार्विनच्या मते प्रजाती व भाषा या दोघांमध्ये उत्पत्ती व विलयाच्या बाबतीत विलक्षण साम्य आहे. सजीवांप्रमाणे भाषांचे ‘नैसर्गिक’ वा ‘कृत्रिम’दृष्ट्या वर्गीकरण करता येऊ शकते. प्रभावशाली, प्रबळ भाषा व प्रजाती वेगाने फोफावतात, त्यासोबत इतर मात्र लय पावतात. प्रजातींप्रमाणे, भाषाही लुप्त झाल्यावर पुन्हा प्रकट होऊ शकत नाहीत. प्रत्येक भाषेला एकच विशिष्ट जन्मस्थळ असते. दोन वेगळ्या भाषांची सरमिसळ करणे शक्य आहे. (सजीवांप्रमाणे) भाषांमध्येही विलक्षण विविधता असते व रोज नवे शब्द ‘घडत’ असतात. पण स्मृतीला मर्यादा असल्याने भाषांप्रमाणे शब्दही कालांतराने लुप्त होतात. विशिष्ट शब्द टिकून राहण्यामागील कारण आहे ‘नैसर्गिक निवड’. डार्विन ‘नैसर्गिक’ व ‘मानवनिर्मित’, ‘निसर्ग’ व ‘संस्कृती’ असा भेद करताना दिसत नाही. उत्क्रांतीची त्याची संकल्पना केवळ नैसर्गिक किंवा जीवशास्त्रीय बाबींपुरती मर्यादित नसून सर्वांत प्रगल्भ अशा बौद्धिक व सांस्कृतिक कार्यकलापांना समजून घेण्यासाठीही ती उपयुक्त ठरू शकते. म्हणूनच डार्विनवर दोषारोप करण्याऐवजी त्याच्या ह्या मांडणीतून स्त्रीवादी विमर्श व संघर्षाला काय शिकण्यासारखे आहे, हा विचार स्त्रीवाद्यांनी केला पाहिजे. मात्र त्यासाठी स्त्रीवादाने परक्या (कोणी तर स्त्रीविरोधीही) मानलेल्या संकल्पना व विचारव्यूहांविषयी खुलेपणा ठेवायला स्त्रीवाद्यांना शिकावे लागेल. एवढेच नाही, तर त्यापलिकडे जाऊन स्त्रीवादालाच वेगळ्या पद्धतीने समजून घ्यावे लागेल. स्त्रियांसाठी बरेवाईट काय ते ठरविणारी विचारधारा, हे स्त्रीवादाचे स्वरूप आता राहिलेले नाही. स्त्रीवादाला अधिक उत्क्रांत होण्यासाठी स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची जोखीम उचलावी लागेल. वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळे कस लावून स्त्रीवाद तपासावा लागेल. त्यातून स्त्रीवादाला एक नवे, मुक्त, उन्नत, प्रगल्भ असे स्वरूप प्राप्त करून द्यावे लागेल. डार्विनच्याच नव्हे, तर दुसऱ्या कोणत्याही विचाराशी सामना करताना केवळ त्यातील त्रुटी न दाखवता, तो समजावून घेऊन त्यात (शक्य झाल्यास) परिवर्तन घडविण्यासाठी प्रथम त्या विचारप्रणालीची संदर्भ चौकट व मार्गदर्शक तत्त्वे तात्पुरती का होईना, स्वीकारावी लागतील.
स्थूल निष्कर्ष
स्त्री-विमर्श व स्त्रीवादी संशोधनपद्धतीची फेरमांडणी करण्यासाठी डार्विनच्या उत्क्रांतिवादाचे काय योगदान असू शकेल, ह्याविषयीचे माझे काही स्थूल निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत – १. डार्विनचे उत्क्रांतीचे प्रतिमान हा एका अर्थाने दमनाच्या विविध विचारधारांना दिलेला महत्त्वपूर्ण प्रतिसाद आहे. मूठभर व्यक्तींच्या शरीर व कार्यकलापांना प्राधान्य देण्यासाठी बहुसंख्यांना त्याची किंमत मोजण्याला भाग पाडणाऱ्या अन्याय्य व क्रूर प्रणालींच्या कार्याचा परिपाक म्हणजे दमन होय. पर्यावरणातील बदल, मग ते नैसर्गिक असोत की सामाजिक, प्राण्यांवर असे परिणाम घडवून आणतात. डार्विनचे वैशिष्ट्य हे की तो ह्यातून मार्ग काढण्यासाठी प्राण्यांनी स्वतःत समुचित बदल घडवून आणणे, हाच प्रभावी मार्ग आहे असे सुचवितो. पर्यावरण बदलून पूर्वस्थितीत आणणे म्हणजे काळाची चक्रे उलटी फिरविण्यासारखे आहे, म्हणूनच ते अयशस्वी ठरेल. अस्तित्वा (साठी)चा संघर्ष म्हणजे तरी काय ? त्याचे यशापयश कसे मोजणार? अस्तित्वाला आवश्यक व पूरक व्यवहार्य व यशस्वी रणनीतींची निर्मिती हाच जीवनसंघर्षाचा गाभा आहे. कोणतीही रणनीती/कार्यपद्धती ज्या प्रमाणात नैसर्गिक निवडीला साह्यभूत ठरते, तितकी ती जास्त यशस्वी. हे जसे एखाद्या प्रजातीच्या अस्तित्वासाठी लागू पडते, तितकेच ते विचारधारांच्या बाबतीतही खरे आहे. स्त्रीवादाला आपले अस्तित्व टिकवून कालसंगत राहायचे असेल तर त्याला स्वतःमध्ये महत्त्वाचे व मूलभूत परिवर्तन घडवून आणण्याला पर्याय नाही. प्रत्येक प्रजातीमध्ये स्वतःच्या मर्यादा ओलांडून पलिकडे जाण्याची प्रक्रिया मंदपणे, पण अव्याहतपणे सुरू असते, हे डार्विनने सिद्ध केले. राजकारण म्हणजेदेखील व्यक्ती व समूहांमधील स्वतःच्या सीमा उल्लंघण्याच्या क्षमतांना गती देण्याचीच प्रक्रिया आहे. भूतकाळातील अन्याय व अत्याचाराच्या स्मृतीतून प्रेरणा घेऊन स्वतःच्या सबलीकरणातूनच स्त्रीवादी किंवा वर्णविरोधी चळवळी प्रभावी ठरू शकतात. डार्विनने प्रजातींच्या बाबतीत नैसर्गिक शक्तींच्या संदर्भात शोधलेले सूत्र सामाजिक शक्तींच्या संदर्भात स्त्रीवादी व अन्य पुरोगामी राजकारणाच्या बाबतीतही समुचित ठरू शकेल. २. मर्यादा ओलांडून स्वतःचे नूतनीकरण घडवून आणण्याचे हे सूत्र म्हणजे डार्विनप्रणीत उत्क्रांतीची गतिकीय प्रेरणा आहे. ती काळानुसार घडणाऱ्या परिवर्तनालादेखील लागू आहे. सारेच चराचर विश्व एका अज्ञात भविष्याच्या दिशेने खेचले जाते आहे. हे भविष्य गतकालाच्या सावटापासून मुक्त असते. विकास, परिवर्तन किंवा उत्क्रांति कोणत्या दिशेने घडेल हे आधी वर्तविता येणार नाही. केवळ सिंहावलोकनातूनच आपल्याला गतकाळातील प्रक्रियेचा अंदाज बांधता येईल. भूत किंवा वर्तमान हा भविष्यासाठी योग्य वारसा पुरवितो की नाही हे केवळ भविष्यच ठरवू शकेल. त्यामुळे इतिहास किंवा भूतकाळ समजून घेण्याची अन्य साधने (उदा. भूविज्ञान, मानववंशशास्त्र, पुरातत्त्वविज्ञान, मनोविश्लेषण, ह्यांद्वारे अस्थिर वर्तमानाची आंशिक (सिळिरश्र) कल्पना आपल्याला येऊ शकते. पण भविष्याचे दिग्दर्शन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. ३. स्त्रीवादी, किंबहुना साऱ्याच राजकीय विचारप्रणालींना काही प्रश्नांचा नेहमीच मुकाबला करावा लागतो. उदा. परिवर्तन कसे घडते? त्यासाठी कार्यरत घटक, प्रक्रिया व शक्ती कोणत्या? बदलाच्या ह्या प्रक्रियेचे भूत व वर्तमानाशी काय नाते आहे? डार्विनच्या मांडणीतून ह्या प्रश्नांच्या उत्तरांची बीजे सापडू शकतात. आज अस्तित्वात असणाऱ्या सुप्त संभावनांच्या प्रकटीकरणाच्या नव्या वाटा म्हणजे भविष्य. ते काल आणि आजच्यापेक्षा वेगळे असेल, पण अलग नसेल. सांस्कृतिक/जीवशास्त्रीय घटकांच्या पुनरावर्तन व आंतरक्रियेतून, तसेच जगण्यासाठी आवश्यक नव नव्या परिस्थितीच्या निर्माणातून भविष्याची निर्मिती होते. आज जे अस्तित्वात आहे, त्यातूनच नवे उद्भवणार आहे; पण आज अस्तित्वात असणाऱ्या असंख्य संभावनांपैकी परिवर्तनशील व लवचिक घटक त्यात योगदान देऊ शकतील व त्यामुळे उद्याचा चेहरा आजच्यापेक्षा वेगळाच असेल. आपल्याला सजग करतो. ५. लैंगिक फरक व वांशिक फरक यांच्या परस्परात गुंतलेल्या (गुंफलेल्या ?) बहुपेशी नात्यांचे काही पदर डार्विनच्या कार्यामुळे स्पष्ट होतात. आज आपण ज्याला वांशिक फरक म्हणतो, त्यांच्या निर्मितीत लैंगिक निवडीची, पर्यायाने लैंगिक फरकाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आनुवंशिकतेच्या क्रमात लैंगिक फरक ठळक होण्यातही वांशिक फरकांचा मोठा वाटा आहे. प्रत्येक वंशात व वांशिक भेदाच्या प्रत्येक रूपात लैंगिक फरक कसे स्पष्ट होतात याचे अप्रत्यक्ष पुष्टीकरण डार्विनच्या सिद्धान्तातून मिळते. ६. डार्विनच्या मांडणीत असंगत; अतार्किक, अचानक बदलातून घडणाऱ्या परिवर्तनालाही महत्त्व आहे. एका अर्थाने पाहिले तर त्याची उत्क्रांतीची मांडणी गणिती तर्ककठोरता व मानव्यशास्त्रातील अनिश्चितता यांचा समन्वय होय. उत्क्रांति ही पूर्णपणे मुक्त, दिशाहीन, अमर्याद अगम्यही नाही, त्याचबरोबर ती पूर्णपणे बद्ध, सुरचित व व्याख्याबद्धही नाही. भौतिकी सुनिश्चितता, गणिती नेमकेपणा व काव्यातील स्वच्छंदता यांचे मनोहारी मिश्रण आपल्याला डार्विनप्रणीत उत्क्रांतिवादात आढळते. ७. डार्विनप्रणीत इतिहासाच्या प्रारूपातही आपल्याला सुनिश्चितता व खुलेपणा यांचा मिलाफ आढळतो. त्याची इतिहासाची संकल्पना केवळ द्वंद्वात्मक-गतकाळातील घटनांमध्ये सुनिश्चित प्राधान्यक्रम शोधणारी, त्यांना नेमक्या आडाख्यात बसविणारी नाही; त्याचप्रमाणे ती केवळ सुसंगत, घटनांची जंत्रीही नाही. जीवशास्त्रीय/सांस्कृतिकदृष्ट्या परिणामकारक काय घडू शकेल ह्यावर ऐतिहासिक बंधने आहे. आज अस्तित्वात असलेल्यातून ‘उद्या’ घडू शकतो. ह्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या, पण भूतकाळात लुप्त झालेल्या संभावना भविष्यात उमलू शकत नाहीत. म्हणजेच इतिहास ही केवळ जीवितांची कहाणी नाही. त्याचा अवकाश आजच्या वास्तवाचा नसलेल्या, पण एकेकाळी प्रस्फुटलेल्या संभाव्यतेची बीजे असणाऱ्या असंख्य शक्यतांनीही व्यापलेला आहे. प्रकट अप्रकट अशा संभाव्यतांच्या परिवर्तन, प्रस्फुटन, समाप्तीचा विराट पट म्हणजे इतिहास. त्यामुळे भविष्य अनाकलनीय, काहीही घडू शकणारे असते. परंतु, भविष्याकडे खेचले जाण्याची गती, शक्ती व दिशा भूतकाळातून वर्तमानकाळातल्या प्रवासातून, परिवर्तनातून ठरते. प्रत्यक्ष घडताना तिचा अदमास येत नाही, केवळ सिंहावलोकनातून संभाव्यतेच्या कोणत्या कळ्या फुलल्या व कोणत्या कोमेजल्या हे समजू शकते.
एकेकाळी स्त्रीवाद्यांनी मार्क्स, फ्रॉईड किंवा लाकनच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करावा, असे सांगितले जायचे. त्याप्रमाणे त्यांनी आता डार्विनचे शिष्यत्व पत्करावे असे मी सांगणार नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की स्त्रीवाद अधिक सक्षम, तीक्ष्ण व दूरगामी होण्यासाठी; वस्तुमात्र, निसर्ग, जीवशास्त्र, काळ व अस्तित्वाविषयी आपल्या धारणा सखोल व व्यापक होण्यासाठी डार्विनकडून आपल्याला शिकण्यासारखे भरपूर आहे. त्याचे काम कोणत्याही दृष्ट्या स्त्रीवादी नाही, पण सजीवांची उत्पत्ती, जीवनसंघर्षात तगून राहण्याच्या त्यांच्या बहुविध रणनीती ह्यात स्त्रीवाद्यांना रुची व स्वारस्य वाटण्यास हरकत नाही.