हिंसेचा इतिहास

मांजर-दहन हा सोळाव्या शतकातील पॅरीसमधील मनोरंजनाचा लोकप्रिय कार्यक्रम होता. ह्या ‘खेळा’त मांजराला एका दोरीला टांगून हळूहळू खाली आगीत सोडण्यात येई. नॉर्मन डेव्हीज या इतिहासतज्ज्ञाच्या मते “मांजर जसजसे होरपळत, भाजत, जळत जाऊन अखेरीस काळे ठिक्कर पडे, तसे प्रेक्षक (ज्यात राजाराण्यांचा समावेश असे) खदाखदा हसत किंचाळ्या मारत.” परपीडनानंदाचे असे बीभत्स प्रदर्शन आजच्या काळात अतयं वाटते. माणसाच्या संवेदनशीलतेतील हा बदल, गेल्या काही शतकात हिंसेत झालेली घट, हा मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा, पण दुर्लक्षित प्रवाह आहे.
हिटलर, स्टॅलिन व माओनंतरच्या शतकात व इराकच्या जखमा ओल्या असताना हिंसा उतरणीला लागल्याचा दावा करणे हा क्रूर विनोद किंवा अश्लील बाब वाटू शकते. परंतु अलिकडच्या काळातील संशोधनाचे निष्कर्ष मानवी इतिहासातील हिंसेला लागलेल्या ओहोटीकडेच निर्देश करतात.
ह्याविषयीचे बरेच दाखले पारंपरिक इतिहासाकडेही आहेत. मनोरंजनासाठी हिंसेचा वापर, अंधश्रद्धेपोटी नरबळी, श्रम वाचवण्यासाठी गुलामगिरीचा वापर, मालमत्ता बळकविण्यासाठी वंशच्छेद, शिक्षेच्या नावाखाली छळ व अंगच्छेद, मतभेदाची शिक्षा म्हणजे देहदंड, सत्ताप्राप्तीसाठी हत्या, युद्धातील विजय साजरा करण्यासाठी बलात्कार, नैराश्याला वाट फोडण्यासाठी सामूहिक नरसंहार, पेचप्रसंगावरील उतारा म्हणून खूनखराबा-मानवी इतिहासातील बहुसंख्य कालखंडांत वरील बाबी विनापवाद स्वीकारल्या गेल्या होत्या. परंतु, आज हे चित्र खचितच बदलले आहे. पाश्चात्त्य जगतातून ते जवळजवळ नाहीसे झाले आहे, इतरत्र त्याची व्याप्ती कमालीची कमी झाली आहे. अशा घटना घडल्याच तर त्या लपवल्या जातात; उघडकीला आल्या तर त्यांची सार्वत्रिक निर्भर्त्सना होते.
एक काळ होता जेव्हा समाजात ह्या वास्तवाचे व्यापक भान होते. विकास, सभ्यता, रानटीपणाकडून माणूसपणाकडे वाटचाल, ह्या संकल्पनांचे मूळही तेच होते. परंतु अलिकडच्या काळात ह्या संकल्पनाच चुकीच्या, किंबहुना धोकादायक आहेत असे मानण्याची प्रवृत्ती वाढते आहे. आधुनिक काळाचा गौरव करणे म्हणजे वसाहतीकरणासारख्या बाबींचे समर्थन करणे, इतर काळातील व इतर प्रदेशातील व्यक्तींचे सैतानीकरण करणे असा अर्थ लावला जात आहे. माणूस हा जात्याच शांतताप्रिय आहे, पण आधुनिक काळातील संस्थांनी त्याला भ्रष्ट केले आहे ही धारणा अलिकडच्या अनेक विचारवंतांच्या लिखाणातून प्रकट होते. उदा. होसे ओर्टेगा य गॅसे (Jose Ortega Y Gasset) – “युद्ध ही आंतरिक प्रेरणा नसून मानवाने लावलेला शोध आहे.” स्टीफन जे गूल्ड – ‘मानव हा जात्याच वाईट किंवा विध्वंसक प्राणी नाही”. अॅश्ले माँटेग्यु – “जीवशास्त्रीय अभ्यासातून विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेला दुजोरा मिळतो.’ परंतु समाजशास्त्रज्ञांनी जेव्हा इतिहासाच्या विविध कालखंडांतील हिंसेचे मोजमाप करायला सुरुवात केली, तेव्हा ‘उदात्त आदिमानवा’च्या संकल्पनेला हादरा बसला. आधुनिकता व तिच्या सांस्कृतिक संस्थांमुळे आपण अधिक हिंसक न होता शांतिमयतेकडे वाटचाल करू लागलो आहोत, हेच वास्तव त्यातून अधोरेखित झाले आहे.
गतकाळातील हिंसेची नोंद व गणना करणे ही सोपी बाब नाही. जंगलात कसलाही आवाज न करता एखादे झाड उन्मळून पडावे व त्याचा मागमूसही बाहेरच्या माणसाला लागू नये, असा हा मामला आहे. अगदी नजिकच्या काळातील ऐतिहासिक कालखंडांतही हिंसेविषयीची आकडेवारी अभावानेच आढळते. मधल्या काळातील आत्यंतिक रक्तपाताच्या काही घटनांवरून दीर्घकालीन प्रवाहाविषयी निष्कर्ष काढणे सोपे नाही. लोकसंख्येतील व्यापक बदल विचारात घेतले की निव्वळ आकड्यांपेक्षा तुलनात्मक आकडेवारी लक्षात घ्यावी लागते. परंतु त्यातून काही नैतिक पेच निर्माण होतात. उदा. शंभरातील पन्नासांची कत्तल आणि १०० कोटी लोकसंख्येपैकी १% लोकांचा खात्मा; यांपैकी अधिक गर्हणीय काय ? परंतु ह्या साऱ्या अडचणी विचारात घेऊनही, एक चित्र आकारताना आपल्याला दिसते. हिंसेतील घट ही एक खंडकालिक परिघटना (ऋीरलीरश्र झहशपोशपेप) आहे. सहस्रक, शतक, दशक – कोणत्याही कालखंडात ती स्पष्टपणे दिसते. हिंसेच्या विविध पातळ्यांना (उदा. वंशविच्छेद, युद्ध, दंगली, खून, बालक व प्राण्यांचा छळ) ती लागू पडते. हा प्रवाह कमीअधिक प्रमाणात संपूर्ण जगभर दिसतो. पश्चिमेत, विशेषतः इंग्लंड व हॉलंडमध्ये तो विशेष प्रकर्षाने जाणवतो. सतराव्या शतकात, विवेकवादाच्या प्रातःकाळी ह्या प्रवाहाला जबरदस्त गती मिळालेली दिसते.
प्राचीन समाजातील हिंसा
गेल्या काही सहस्रकांचा व्यापक आढावा घेतला तर आपल्या राज्यसंस्थापूर्व समाजांत व आजच्या परिस्थितीत खूप मोठा फरक दिसेल. इतिहासपूर्व काळातील कुन्हाडीच्या घावांच्या किंवा बाणांच्या खुणा असलेल्या कवट्या मोजल्या तर लक्षात येते की टोळी अवस्थेतील समाज आजच्या तुलनेत खूपच हिंसक होता. आजच्या युद्धात मरणाऱ्यांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच जास्त आहे हे खरे, पण टोळीसमाजांतील अंतर्गत व बाह्य संघर्षांची संख्या, टोळीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योद्ध्यांची व मृतांची संख्या व प्रत्येक संघर्षात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण हे सारेच खूप जास्त होते. आजच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केला तर कोणत्याही टोळीसमाजात लढायांत मरणाऱ्यांची संख्या २०० कोटींच्या घरात पोहचेल.
उजव्या विचारसरणीच्या प्रभावामुळेही अनेकजण प्राचीन संस्कृतीतील हिंसाचाराकडे दुर्लक्ष करतात. नीतिमूल्यांचा उद्गम मानल्या जाणाऱ्या बायबलमध्ये अनेक ठिकाणी हिब्रूनी परमेश्वराच्या आदेशावरून एकापाठोपाठ अनेक नगरांच्या कत्तलींचे गौरवीकरण केलेले आढळते. बायबलमध्ये कित्येक किरकोळ गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची सजा फर्मावली आहे. उदा. मूर्तिपूजा, धर्मद्रोह, समलैंगिकता, व्यभिचार, आईवडिलांचा अनादर व सब्बाथच्या दिवशी इंधन गोळा करणे. अर्थात् इतर टोळ्या-धर्मांतील माणसे हिब्रूपेक्षा कमी खुनशी नव्हती. हिंदु, ख्रिश्चन, मुस्लिम व चिनी समाजांच्या प्राचीन इतिहासात छळांची व कत्तलींची सुरस वर्णने सापडतात.
शतकांच्या पातळीवर विचार केला तर मध्ययुगीन व आधुनिक काळात युद्धामुळे झालेल्या संहाराची संख्यात्मक तुलना करणे कठीण आहे. काही इतिहासकारांच्या मते नोंद झालेल्या युद्धांची संख्या पूर्वीच्या तुलनेत आधुनिक काळात अधिक आहे. पण जेम्स पेनने म्हटल्यानुसार, “सोळाव्या शतकातील भिक्षूपेक्षा आधुनिक माध्यमे माहिती संकलनाचे कार्य अधिक साकल्याने व कार्यक्षमतेने करतात” एवढाच निष्कर्ष त्यातून निघू शकतो. गेल्या पाच शतकात पाश्चात्त्य जगातून अनेक रानटी प्रथांचे उच्चाटन झाले. उदा. गुलामगिरी, हातपाय कलम करणे, डोळे फोडणे, चाबकाचे फटकारे, जाळणे, चाकाला बांधून हाडे मोडणे इ. मॅन्युएल आईस्नर ह्या अपराधतज्ज्ञाने पश्चिम युरोपातील अनेक विभागांतील इ.स.१२०० ते १९९५ ह्या काळातील खुनांच्या नोंदींचा अभ्यास केला. प्रत्येक देशात ह्या काळात मानवहत्येच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे त्याला आढळले. उदा. इंग्लंडमध्ये हे प्रमाण चौदाव्या शतकात दर लाखामागे २४ होते जे १९६० च्या दशकात ०.६ पर्यंत घसरले होते.
दशकांच्या मोजपट्टीवरदेखील चित्र आश्चर्यकारकरीत्या सुखद आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापासून जागतिक पातळीवरील हिंसाचार सातत्याने कमी होत आहे. ह्यूमन सिक्युरिटी ब्रीफ २००६ अनुसार देशादेशांतील युद्धांत मरणाऱ्यांची संख्या प्रतिवर्ष ६५,००० (पन्नासचे दशक) वरून २,००० पर्यंत (२००० चे शेवटचे दशक) कमी झाली. ह्याच शतकाच्या उत्तरार्धात अमेरिका व पश्चिम युरोपमध्ये युद्धे, सैनिकी उठाव व वांशिक दंगलींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले.
[भारतीय उपखंडात मात्र ह्या काळात १९४७ सालची फाळणी, १९६२ चे भारत-चीन युद्ध, १९६५, १९७१, १९९९ ची भारत-पाक युद्धे, १९७१ चा बांगलादेशचा मुक्तिसंग्राम ह्यामुळे व्यापक प्रमाणावर रक्तपात झाला. भारताला कलंक लावणाऱ्या बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतरची दंगल, १९८४ चे शीखविरोधी दंगे व गुजराथमधील नरसंहार ह्या घटनाही ह्याच काळातल्या आहेत. आजही काश्मीर व ईशान्य भारताच्या भळभळत्या जखमा, जातीय व सांप्रदायिक विद्वेषाचे खोलवर भिनलेले विष व विविध अस्मितांच्या टक्करीतून वारंवार उडणारा हिंसेचा भडका – यामुळे लेखकाचा आशावाद जसाच्या तसा स्वीकारणे आपल्याला कठीण जाते – तरीही त्याचे मुख्य प्रतिपादन चिंतनीय आहेच – सं.]
शीतयुद्धानंतर जगातील प्रत्येक कोपऱ्यात राज्याधारित संघर्ष कमी झाले; जिथे संघर्षाची ठिणगी पडली, तिथेही बहुतांशी भडका उडण्याऐवजी वाटाघाटीतूनच तोडगे निघाले. बार्बारा हार्फ ह्या राज्यशास्त्रज्ञेच्या मते १९८९-२००५ ह्या कालखंडात नागरी हत्यांच्या चळवळीमध्ये ९०% नी घट झाली. हिंसेतील घट जाणवत का नाही ?
हत्या व क्रौर्य उतरणीला लागले आहे हे खरे; पण ह्या वास्तवाने जग समजून घेण्याच्या आपल्या क्षमतेविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकी महत्त्वाची बाब इतक्या लोकांच्या नजरेतून कशी सुटली? त्याचे कारण आहे आकलन भ्रम. कोणत्याही गोष्टीची संभाव्यता आपण कशी ठरवतो? ती किती सहजपणे आपल्याला आठवते यावरून. व्यापक संहाराची दृश्ये (माध्यमांमार्फत) आपल्या दिवाणखान्यात पोहचण्याची व तेथून आपल्या स्मृतीत रुतून राहण्याची शक्यता अधिक असते.
वृद्धापकाळाने मरणाऱ्यांच्या बाबतीत असे घडत नाही. पाश्चात्त्य समाज व त्यातून उद्भवलेल्या आधुनिक संस्थांमुळे काही चांगले घडू शकते, ह्याविषयी बौद्धिक विश्वात असलेला व्यापक अविश्वास, हे त्यामागील दुसरे कारण. कार्यकर्ते व मते घडविण्यामागील अर्थकारण, हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. जग दिवसेंदिवस उन्नत व मानवी होत आहे, अशा घोषणांमधून कुणाला फुले किंवा डॉलर्स थोडेच मिळणार आहेत ? महत्त्वाची बाब ही की हिंसेला लागलेल्या ओहोटीसोबत हिंसेचे समर्थन किंवा गौरवीकरण करणाऱ्या प्रवृत्तींमध्येही कमालीची घट झाली आहे. आजच्या समाजातील संवेदनशील घटक हा मुखर व नेतृत्वात आहे. अबू गरीबच्या तुरुंगातील अत्याचार व टेक्सासमध्ये विषारी इंजेक्शनद्वारे केलेले काही खून ह्या घटना निंदनीय आहेतच, पण मानवी इतिहासातील क्रौर्याच्या तुलनेत त्या सौम्यच म्हणाव्या लागतील. आज विचार करताना आपण म्हणतो – ‘माणसाचे एवढे पतन कसे होऊ शकते?’ आपल्या नैतिकतेची परिमाणे वाढली आहेत ह्याची आपण दखल घेत नाही.
ह्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावायचा, हेही मोठेच आह्वान आहे. काल, भूगोल व सामाजिक संघटनेच्या सीमा उल्लंघून सर्व समाजाला एकाच दिशेने सातत्याने ढकलणाऱ्या ह्या ताकदीचे विश्लेषण करणे सोपे नाही. आपले नेहमीचे खलनायक-बंदुका, ड्रग्ज, माध्यमे व अमेरिकन संस्कृती-फारसे परिणामकारक नाहीत म्हणायचे. जीवशास्त्रीयदृष्ट्या उत्क्रांतीच्या अंगानेही ह्याचा अर्थ लागणे कठीण. कारण, पृथ्वीवर दीनदुबळ्यांचे राज्य येईल हे मान्य केले, तरी एवढ्या थोड्या कालावधीत नैसर्गिक निवडीच्या माध्यमातून दीनदुबळ्यांच्या जनुकांना प्राधान्य मिळणे कठीण आहे. अर्थात्, हिंसेची आवड कमी होण्याइतपत मानवी स्वभाव बदललेला नाही. तिरपा ठसा संपादकांचा सामाजिक मानसशास्त्रज्ञांच्या मते ८०% लोक नावडत्या व्यक्तींचा खून करण्याची दिवास्वप्ने पाहतात. शेक्सपीयरची नाटके, व्हिडिओ गेम, मेल गिब्सनचे सिनेमे, रक्तरंजित रहस्यकथा व आईस हॉकीला असणाऱ्या लोकप्रियतेवरून जाणवते की आधुनिक मानवाला अजूनही हिंसा पाहायला आवडते. [तिरपा ठसा संपादकांचा].
म्हणजे, खऱ्या अर्थाने बदल झाला आहे तो आपल्या हिंसक प्रवृत्तींना प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या तयारीमध्ये. समाजशास्त्रज्ञ नॉर्बर्ट एलियासच्या मते पाश्चात्त्य आधुनिकतेने स्व-नियंत्रण, दीर्घकालीन नियोजन आणि इतरांच्या भावना-विचारांविषयी संवेदनशीलता यांद्वारे एका ‘नागरीकरणाच्या प्रक्रियेला गती दिली. आधुनिक मेंदुविज्ञानाच्या मते ही सारी मेंदूच्या ‘प्री-फ्रंटल कॉर्टेक्स’ची कार्ये आहेत. मानवप्राण्याने निसर्गातील ‘देवदूतां’च्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रक्रियांचा अधिकाधिक वापर करून आपल्याला अधिक उन्नत केले, ह्यात शंका नाही. ते घडण्यामागे चार प्रकारची स्पष्टीकरणे आहेत.
उत्क्रांतिशास्त्राची स्पष्टीकरणे
हॉब्जच्या मते नैसर्गिक हिंसक प्रेरणांनुसार जगण्याची अखेर केवळ अराजकात होते. आपले हितसंबंध जपण्यासाठी कोणत्याही समूहाला शेजारच्या समूहावर हल्ला करून त्यांची संपत्ती लुटण्याची प्रेरणा होऊ शकते. तसे होण्यापूर्वीच शेजारचा समूह पहिल्या समूहावर स्वसंरक्षणार्थ हल्ला करू शकतो. ही साखळी कितीही वाढू शकते. ही स्फोटक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पहिला हल्ला करणार नाही, कोणी केला, तर उत्तर देऊ असे धोरण उपयोगी पडू शकते. पण ते टिकाऊ होण्यासाठी सर्व संबंधितांचे जुने हिशेब फिटलेले असणे, आवश्यक आहे, नाही तर बदला, प्रति-बदल्याची शृंखला सुरू होऊ शकते. ह्यावर उपाय एकच – अशा एका आधुनिक राज्यसंस्थेची निर्मिती, जी सर्व समूहांचे नियंत्रण करू शकेल. हिंसेचा अधिकार केवळ राज्यसंस्थेला असेल व ती निष्पक्षपणे केवळ शिक्षा म्हणून संबंधितांविरुद्ध हिंसेचा वापर करू शकेल. त्यामुळे वातावरणातील तणाव संपून स्व-संरक्षणासाठी आक्रमण करण्याच्या प्रवृत्तीला पायबंद बसू शकेल. आईस्नर व एलियास यांच्या प्रतिपादनानुसार युरोपमधील हिंसेला लागलेल्या ओहोटीचे प्रमुख कारण सरदार-उमरावांच्या योद्धा समाजापासून आधुनिक समाजात झालेल्या स्थित्यंतराला आहे. आजही आपल्याला हिंसेचे तांडव अराजकसदृश ठिकाणीच दिसते, उदा. सीमान्त प्रदेश, ड्रग माफिया व गुंडांच्या आधिपत्याखालील प्रदेश, कोलमडलेली साम्राज्ये इ.
पेनच्या सिद्धान्तानुसार जीविताचे मोल हा ह्यामागील कळीचा मुद्दा आहे. जेव्हा आयुष्याला मोल नसते, वेदना व मरण हा रोजच्या जगण्याचा भाग असतो, तेव्हा दुसऱ्याचा छळ करण्यात किंवा त्याचा जीव घेण्यात कुणाला काही वावगे वाटत नाही. तंत्रज्ञान व आर्थिक विकासामुळे आयुर्मर्यादा व जीवनस्तर उंचावल्यामुळे आयुष्याचे मोल वाढले आहे. त्यामुळे माणसे इतरांविषयी अधिक संवेदनशील झाली आहेत.
रॉबर्ट राईट शून्येतर-बेरीज-खेळां वर (नॉन-झिरो सम् गेम्स) आधारित तर्काचा आधार घेऊन मांडतो की संघर्षापेक्षा सहकार्य जेव्हा अधिक उपयुक्त व लाभदायक ठरते, तेव्हा माणसे स्पर्धेपेक्षा सहकाराला प्राधान्य देतात; उदा. जर दोघा स्पर्धकांना जाणवले की परस्परांशी व्यापार (वस्तुविनियोग) केला, श्रमाची विभागणी व शस्त्रसंधीतून-शांतीतून मिळणारा लाभही वाटून घेतला, तर ते दोघांनाही लाभकारक ठरेल. अशा वेळी ते लाभासाठी हातमिळवणी करतील. कमीत कमी वेळात व श्रमात जास्तीत जास्त भूभागावरील लोकांपर्यंत आपला माल व संकल्पना पोहचविण्याचे तंत्रज्ञान जसजसे विकसित होते, तसतसे इतरांना मारण्यापेक्षा जिवंत ठेवणे अधिक लाभदायक ठरते; त्यातून सहकाराला चालना मिळते.
पीटर सिंगर शांतिमयतेच्या वाढत्या प्रभावाचे श्रेय माणसाच्या सह-अनुभूतीच्या सातत्यपूर्ण वृद्धीला देतो. पूर्वी मी व माझ्या जवळचे (मित्र किंवा रक्ताचे नातेवाईक) यांच्यापुरते सीमित असलेले आपुलकीचे क्षेत्र हळूहळू व्यापक होत कुळ, जमात, देश, वंश, स्त्री-पुरुष भेद यांच्या कक्षा ओलांडून आता मानवेतर प्राण्यांपर्यंत व्यापक झाले आहे. राईटच्या सिद्धान्ताचा आधार घेतल्यास परस्पर-सहकार्याचे लाभ दोघांनाही मिळत असल्याने ही प्रक्रिया अधिक वेगवान झाली असावी. पण त्यापलिकडे एक निखालस सत्य उरतेच : जाणिवेच्या कक्षा रुंदावल्यामुळे माणूस जितका इतरांचा विचार करू लागतो, तितकी त्याची स्वार्थपरायणता कमी होऊ लागते. आधुनिक समाजाच्या विविधांगी, मिश्र स्वरूपामुळे, साहित्य, पत्रकारिता इ. माध्यमांतून इतर व्यक्तींच्या अनुभवाला सामोरे जाण्याची अधिक संधी मिळाल्यामुळे, त्यांच्या आपल्यातील सामाईकपणा शोधणे माणसांना अधिक सोपे जात असावे.
कारणे कुठलीही असली, तरी हिंसेची उतरती भाजणी हे एक वास्तव आहे. याचा अर्थ आपण आता काही न करता निवांत बसून राहावे असा होत नाही. आजची शांतता हे गेल्या पिढ्यांच्या कर्तृत्वाचे फळ आहे. त्याचप्रमाणे आज अस्तित्वात असलेली हिंसा नष्ट करण्यासाठी आपण आता प्रयत्न करणेही गरजेचे आहे. विशेषतः अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व आधुनिकतापूर्व हिंस्र मनोवृत्तीचे राष्ट्रीय नेते हे स्फोटक मिश्रण समाजात सक्रिय असताना आपली निष्क्रियता घातक ठरू शकेल.
माणसाची अमानुषता हा कित्येक पिढ्यांसाठी नैतिकतेचा व तत्त्वज्ञानाचा प्रश्न होता. आता त्यामागील कार्यकारण भाव समजून घेण्याची वेळ आली आहे. म्हणून आपण “युद्धे का होतात?” असे विचारण्याऐवजी “शांतीचे मूळ काय ?” असे विचारायला हवे. मांजरदहनाचा आनंद लुटण्याच्या मानसिकतेचा संबंध राज्यांनी केलेल्या वंशच्छेदाशी असेल, तर मानवजात गेली काही शतके काहीतरी योग्य नक्कीच करीत आहे. ते काय आहे समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. भविष्याचा वेध
[ स्टीव्हन पिंकरच्या Life in the Fourth Millenium ह्या लेखाचा हा संपादित अनुवाद. मागील लेखाचा उत्तरार्ध म्हणून त्याकडे बघता येईल – सं.]
गेली शंभर सहस्रके मानवप्राणी पृथ्वीतलावर वास्तव्य करून आहे; परंतु एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला जग जसे आहे, त्याची कल्पनादेखील आपल्या पूर्वजांनी कधी केली नसेल. अज्ञान व मिथकांची सद्दी संपून त्याजागी जीवन आणि विश्वाविषयी विस्तृत व सखोल समज प्रकटली आहे. मानवी अधिकार व कायद्याचे राज्य ह्या वैश्विक संकल्पनांच्या रेट्यामुळे गुलामगिरी, रक्तपात व पितृसत्ता पृथ्वीवरील मोठ्या भूभागातून नष्ट झाल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे जग छोटे झाले आहे आणि मने विशाल.
मानवी परिस्थितीतील ही क्रांती आणखी किती पुढे जाईल ? आजपासून हजार वर्षांनी आयुष्य कसे असेल ? आपल्या पूर्वजांप्रमाणे आपल्यालाही भविष्याची कल्पना करता येणार नाही का? विज्ञानाच्या प्रगतीमुळे विश्वातील साऱ्याच रहस्यांचा भेद झाल्यामुळे नवल करण्याजोगे काही उरणारच नाही का? माहिती-महाजालामुळे प्रत्येक व्यक्ती सुटी, स्वायत्त बनून मानवी संबंध केवळ कृतक वास्तवापुरतेच ( रिश्र शिरश्रळी) राहतील का? दांपत्यजीवन, कुटुंब, समूह, समाज, शहरे यांचे काय होईल ? इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे होणारे कलेतील बदल आपल्या आकलनापलिकडचे असतील ? माध्यमे मानवी मनही बदलवतील ?
हजार वर्षांनंतरच्या आयुष्याविषयी छातीठोक विधान करणे मूर्खपणाचे आहे. रेडिओ व ‘उडती यंत्रे’ प्रत्यक्षात येणे अशक्य आहे असे म्हणणाऱ्या आपल्या पूर्वजांना आपण हसतो. पण भविष्यकाळ हा कल्पनेच्या पलिकडचा आहे असे मानणेही मूर्खपणाचे ठरेल. महायुद्धानंतर शहरे रसातळाला जातील, हवाई वाहतूक ‘जॅम’ होईल व माणसे अणुशक्तीचा वापर व्हॅक्यूम क्लीनर चालवायला करतील असा अदमास बांधणाऱ्या तज्ज्ञांनाही आपण हसतो. माझ्या मते, भविष्यातील मानवी जीवन कितीही बदलले तरी ते आपल्या कल्पनेपलिकडचे चमत्कृतिपूर्ण वगैरे नसेल. कारण, वर्तमान व भविष्याला आकार देणाऱ्या वेगवान परिवर्तनकारी घटकांमध्ये एक गोष्ट कायम आहे — मानवी स्वभाव.
मानवी स्वभाव हा कोऱ्या पाटीसारखा असतो, असे ह्या क्षेत्रातील तज्ज्ञांना अनेक दशके वाटत होते. आता मात्र संशोधन सांगते की मानवी मन हे अतिशय सुघटित (1ळलहश्रूीिशिव) आहे. माणूस वेगाने शिकतो हे खरे आहे. पण हे शिकणे शक्य होते मेंदूतील असंख्य जोडण्यांमुळे (circuits) व त्याला योग्य प्रकारे शिकण्यास प्रवृत्त करणाऱ्या भावनांमुळे. मानवी मेंदूत विविध संकल्पना मापण्याची अवजारे असतात; उदा. अवकाश (मिलीमीटर्स ते किलोमीटर्स), काल (दशांश-सेकंद ते वर्षे), छोट्या संख्या, इतर सजीव व इतरांची मने. त्याला कृतिशील करणारी ताकद म्हणजे विविध भावना. प्रेम, क्रोध, अपराधभाव, लालसा, अहंकार व सहानुभूती. हावभाव, हातवारे आणि भाषेद्वारे संवाद साधणे ही मानवी मनाची मूलभूत प्रेरणा आहे.
उत्क्रांतीच्या प्रक्रियेत हा वारसा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून लाभला, व तोच आपण हजार वर्षानंतरच्या पिढीतही संक्रमित करणार आहोत. जीवशास्त्रीय उत्क्रांतीमुळे आपण अधिक बुद्धिमान, शहाणे होत नसतो; त्यामुळे केवळ विशिष्ट पर्यावरणात अधिक योग्य ठरणाऱ्या गुणधर्माची इतरांच्या तुलनेत प्राधान्याने निवड करण्यात येते. विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या व्यक्तींनी इतरांच्या तुलनेत अधिक पुनरुत्पादन केले व ही प्रक्रिया हजारो पिढ्या चालली, तरच आपल्या जीवशास्त्रीय घडणीत लक्षणीय परिवर्तन होऊ शकेल; एरवी नाही. म्हणूनच आपले वंशज दिसायला बहुतांशी आपल्यासारखेच असतील ; प्रचंड मोठ्या डोक्याचे व किरकोळ अंगाचे नसतील.
जनुकीय अभियांत्रिकी (genetic engineering)च्या माध्यमाद्वारे मानवी स्वभावात आमूलाग्र बदल होईल, असेही मला वाटत नाही. जनुकीय बदल (genetically modified, GM) केलेल्या भाज्या व व धान्ये खाण्याची कल्पनाही बहुसंख्य लोकांना नकोशी वाटते. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा वापर मानवी शरीरावर किंवा त्यातून निर्मित cell line वर करण्याच्या संकल्पनेला प्रचंडच विरोध होईल. सुरक्षितता जपण्याच्या मानवी स्वभावामुळे अणुशक्तिचालित व्हॅक्यूम क्लीनरसोबत जेनेटिक इंजीनियरींगची रवानगीही इतिहासाच्या कबाडखान्यात केली जाईल.
शार हाइल.
आपले वंशज बहुतांशी आपल्यासारखेच
मानवी स्वभावात बदल झाला नाही तर पुढच्या सहस्रकातील मानवी जीवन भविष्यवेत्त्यांच्या अंदाजापेक्षा अधिक ‘आपल्यासारखे’ असेल. शिक्षणाचेच उदाहरण घेऊ. अनेकांना वाटते की शिक्षणात क्रांती होऊन शाळा कालबाह्य ठरतील. काहींच्या मते समरहिल सारख्या मुक्त शाळांद्वारे मुले तंत्रज्ञानाच्या मदतीने, आनंदाने शिकतील, सराव व पाठांतराच्या धबडग्यातून मुक्त होऊन साक्षरता व ज्ञान सहजतेने उमलेल. काहींच्या मते बालकांच्या विकासाच्या सुरुवातीलाच मेंदूला योग्य प्रकारे उत्तेजित केल्याने चमत्कार घडतील. उदा. गरोदर बाईला मोझार्टचे संगीत ऐकवल्यास पोटातले मठ्ठ मूल अतिहुशार होईल.
पण ह्या क्षेत्रात एक असाही मतप्रवाह आहे की मुळात शिक्षण हा मानवी मनाला फारशी न भावणारी गोष्ट करायला लावण्याचा प्रयत्न आहे. बोलणे, पाहणे, चालणे, ‘कॉमन सेन्स’ वापरणे ह्या गोष्टी मुले सहजपणे करू शकतात. पण त्यांच्या (आपल्या) पाषाणकालीन मेंदूला आधुनिक सभ्यतेतील बऱ्याच गोष्टी पचविणे जड जाते, उदा. भाषालेखन, आकडेमोड, इतिहास (काल व अवकाशाचा भलामोठा खंड) व विज्ञान (अवकाश व कालाचा सूक्ष्म खंड) यांचा अभ्यास. त्यामुळे मानवी मेंदूला परक्या वाटणाऱ्या ह्या विषयांचा अभ्यास करणे ही यापुढेही तारेवरची कसरतच ठरणार आहे. भविष्यातही शिक्षकांचे अध्यापनकौशल्य व विद्यार्थ्यांची मेहनत व शिस्त ह्या आधारांवर नेटाने करायची वाटचाल, असेच शिक्षणाचे स्वरूप असेल.
आपल्या (प्राचीन) मानसिक जडणघडणीमुळे मोठ्या माणसांनाही वैज्ञानिक सत्याचे आकलन करणे कठीण जाते. भविष्यातही त्यात फारसा बदल होणे अपेक्षित नाही. महास्फोट (big bang), त्रिविध मितीपलिकडची चौथी मिती, लहरींसारखे वागणारे प्रकाशकण – ह्या संकल्पना भौतिकशास्त्राने सिद्ध केलेल्या असल्या तरी त्या आपल्या समजापल्याडच्या आहेत. मेंदूपेशीतील जोडण्यांमध्ये घडणाऱ्या विद्युत्-रासायनिक प्रक्रियांमध्ये जाणीव व निर्णयप्रक्रियांचे मूळ आहे असे मेंदुविज्ञान सांगते. ह्या जोडण्यांमध्ये फिरणाऱ्या रासायनिक पदार्थांद्वारे (neurotransmitters) आकडेमोड करता येऊ शकते, हेही आपण समजून घेऊ, पण आपल्या व्यक्तिगत भावना त्यातून कशा प्रकट होतात, किंवा ज्यांचे उत्तरदायित्व आपल्याला स्वीकारावे लागते, असे पर्याय त्यांद्वारे कसे ठरतात, हे आपल्या मेंदूच्या आकलनापलिकडचे आहे.
म्हणजे, आपले वंशजही पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या धर्म व तत्त्वज्ञानाच्या बाबींवरच काथ्याकूट करतील, अशी चिह्ने आहेत. हे विश्व अस्तित्वात कसे आले व त्यामागील प्रयोजन कुठले ? आपल्याहून वेगळे मेंदू (म्हणजे मन) असणाऱ्यांचे हक्क व त्यांच्याविषयी आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या ? – उदा. मानवी गर्भ, मानवेतर प्राणी, मतिमंद, गतिमंद, मरणोन्मुख माणसे अर्थातच मानवी मन तेव्हाही गर्भपात, प्राण्यांचे हक्क, इच्छामरण, मनोरुग्णांची व्याख्या व त्यांचे हक्क ह्या प्रश्नांचा छडा लावण्यात गुंतून पडेल. (मेंदूला शीण देणे ज्यांना आवडत नाही, ती मंडळी अर्थातच आपापल्या लाडक्या सिद्धांतांना/समजांना कवटाळून बसतील.)
माहिती तंत्रज्ञानाने मानवी मनाला आकार देण्यापेक्षा मानवी मन त्याला अनुरूप माहिती तंत्रज्ञान घडवेल, अशी दाट शक्यता आहे. संगणकाने आपल्या आयुष्यात एवढा शिरकाव का केला असावा ? कारण त्याचे आजचे स्वरूप आपल्या पाषाणकालीन मेंदूच्या ओबडधोबड कार्यपद्धतीशी सुसंगत आहे. त्याला प्रयत्नपूर्वक अशा पद्धतीने घडविण्यात आले आहे. संगणकाची स्वतःची आंतरिक कार्यपद्धती (शून्य, एक व गणिती तर्क) ही आपल्यापेक्षा खूपच भिन्न व अनुशासनबद्ध आहे. पण ज्ञानेन्द्रियांचा, विशेषतः डोळ्यांचा वापर करून शिकणाऱ्या, अवजार बनवणाऱ्या मानवप्राण्याने आपल्या आवडीनुसार त्याला घडवले. त्यातूनच विंडोज, विविध चिह्ने (icons), बटन्स, स्लाईडर्स, माऊस, आंतरजाल अशा ग्राहकस्नेही गोष्टींचा जन्म झाला. उद्या ह्याहून नाट्यमय बदल संगणकात होतील व ते सारे यंत्राला मानवाच्या दावणीला बांधणारे असतील. माणसाचा आवाज, स्पर्श किंवा चेहरा ओळखणे, आपण सांगितलेली कामे आपल्या विचारपद्धतीप्रमाणे पार पाडणे इ. नातेसंबंध महत्त्वाचे
उद्याचे जग आजच्यापेक्षा फार न बदलण्याचे आणखी एक कारण आहे – आपली भावनिक घडण. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. तो मित्र, कुटुंब, जोडीदार व त्याला आपला वाटणारा समाज यांच्यासाठी आसुसलेला असतो. ह्या सर्वांना प्रत्यक्ष भेटल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही. भविष्यात ई-मेल व ई-व्यापाराचा प्रसार वाढेल, यात शंका नाही; पण त्यामुळे आपण सारे जण आतल्या आत बंद बेटे किंवा घरकोंबडे होऊ अशी भीती बाळगणे व्यर्थ आहे. एकीकडे सोय व दुसरीकडे प्रत्यक्ष भेटीचा आनंद ह्यातील लाभ-हानी पाहूनच माणसे आपला पर्याय निवडतील. अगदी सरसकट अंतराळप्रवासाचे युग अवतरले तरी सणासुदीच्या दिवशी (मित्र-नातलगांना भेटायला निघणाऱ्यांमुळे) अवकाशात ट्रॅफिक जाम होईल यात शंका नाही.
अर्थात् जीवशास्त्रीय संघर्षामुळे मानवी नात्यांना मत्सर, प्रतारणा, विश्वासघात, भावंडांमधील स्पर्धा, हेवेदावे, मानपानाचा सोस, वचनभंग हे पदरदेखील असतात. बुद्धिबळाच्या ह्या पटावर आपण सगळेजण आपापल्या चाली रचत असतो.
म्हणूनच आपल्या दूरच्या वंशजांचे मानसिक आयुष्य समजून घेणे फारसे कठीण जाऊ नये. नात्यातील ताण, विशेषतः जवळच्या नात्यातील (खरा-काल्पनिक) दुरावा हा त्यांच्या चिंतेचा मुख्य विषय असेल. चालता-बोलता, झोपेत-जागेपणी ते त्याचाच विचार करतील. ज्या माध्यमातून ते अभिव्यक्त होतील, त्यातही ह्याच कहाण्या असतील.
मानवी स्वभावाच्या अंगभूत मर्यादांमुळे मानवजातीचे भविष्य तिच्या भूत व वर्तमानापेक्षा फारसे वेगळे असणार नाही, यामुळे आता निराश व्हावे का? आजच्या जगातील नैराश्य व दुःखामुळे व्यथित होऊन अनेकजण भविष्यातील स्वप्नरंजनाचा आधार घेतात, एका कल्पनातीत चांगल्या, सुजाण, सशक्त मानवजातीचे स्वप्न पाहतात. हिमयुगात कैद आपल्या मेंदूतील डीएनए आपल्या भविष्यावर अंकुश ठेवून आहे ही बाब नैराश्यपूर्ण, इतकेच नाही तर धोकादायक वाटू शकते.
मानवी स्वभावाच्या अपरिवर्तनीयतेचा दाखला देत आतापर्यंत अनेक चुकीच्या गोष्टींची समर्थने करण्यात आली, उदा. युद्धाची अपरिहार्यता, स्त्रीदास्य, वांशिक भेदाभेद. कालौघात त्यांचे वैयर्थ्य सिद्धही झाले. परंतु त्याचप्रमाणे मानवी मनाच्या लवचीकपणाच्या व त्याच्या अमर्याद परिवर्तनशीलतेच्या नावाखाली करण्यात आलेले प्रयोगही भीतिदायकच होते, उदा. सोव्हिएट रशियातील नव मानव, कम्युनिस्ट राजवटीत लोकांच्या धारणा बदलण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी’ आयोजित छळछावण्या, अपत्यांमधील शारीरिक-मानसिक अपंगत्वासाठी आईला जबाबदार धरणे इ.
आपल्या आयुष्याची गुणवत्ता कशामुळे सुधारली आहे? साऱ्या मानवांच्या सामाईक गरजा (जगणे, स्वातंत्र्य, सुखाचा शोध) व त्यांचा चांगुलपणा, सामंजस्य, यांच्या मर्यादा यांचे भान राखल्यामुळेच हे शक्य झाले आहे. यातूनच व्यक्तींचे राज्य मागे पडून ‘कायद्याचे राज्य’ निर्माण झाले व त्यातूनच मानवाचा विकास झाला.
हजारो वर्षांपूर्वीच्या माणसांच्या कहाण्या व त्यांची कला आपल्याला आजही मोहिनी घालतात, त्यामागे मानवी मनोव्यापारांची वैश्विकताच आहे. नाही तर आपल्याहून वेगळ्या संस्कृतीतील शेक्सपीयर, बायबल व असंख्य नायकांच्या गोष्टी आपल्याला कशा आवडल्या असत्या? प्रयोग, अवलोकन, निष्कर्ष व सिद्धान्तनाच्या भक्कम इमल्यावर उभारलेले वैज्ञानिक शोध व सिद्धान्त म्हणूनच आपल्याला आश्चर्याचे धक्के व नवनवोन्मेषाचा आनंद देतात. महास्फोटाचा सिद्धान्त, उत्क्रांतिवाद, मेंदूच्या रचना व कार्याचा वेध ह्या साऱ्या बाबी सर्वसामान्य मानवी समाज व अंतःप्रेरणांहून वेगळ्या असल्यामुळेच आनंददायी ठरल्या आहेत.
आजच्या भविष्यवेत्त्यांच्या स्वप्नरंजनामुळे सर्वसामान्य माणसे घाबरली आहेत. ज्या जगात माणसे केवळ कृतक-वर्तमानात जगतात, आपापल्या बिळात राहून माहिती महाजालाद्वारेच इतर माणसांशी संपर्क ठेवतात, जेथील साऱ्याच गोष्टी कोणी आधीच ठरविलेल्या असतात, अगदी अपत्येदेखील कॅटलॉग पाहून, ऑर्डर बरहुकूम बनवून मिळतात, असे जग लोकांना नकोसे वाटते. त्यामुळे ते तंत्रज्ञानाच्या खऱ्याखुऱ्या विकासापासून विन्मुख होतात. मानवी स्वभावातील सातत्य हा एकमेव दिलासा आपण त्यांना देऊ शकतो. आपण जे जग आपल्या वंशजांना सुपूर्द करणार आहोत, त्यात वैज्ञानिक प्रगतीमुळे कंटाळा नाही, तर आनंद वाढेल, आपल्या अभिजात कला-वाययाची लज्जत कायम राहील आणि तंत्रज्ञान माणसाचा ताबा घेणार नाही, तर त्याला समृद्ध करेल. आजच्या व उद्याच्या जगाला आपण हाच भरवसा देऊ शकतो.