पुस्तक परिचय- वेताळाच्या आरोग्यकथा

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिलेले हे एक वेगळ्या प्रकारचे पुस्तक. “बंडखोरी करणाऱ्या व नवनिर्मितीच्या मुळाशी असणाऱ्या प्रश्न विचारण्याच्या व उपस्थित करण्याच्या प्रवृत्तीस’ ही अर्पण पत्रिकाही कुतूहल वाढवणारी आहे.
औषधशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण मिळवून मुंबईला एस्.एन्.डी.टी. विद्यापीठात २० वर्षे प्राध्यापिकी केलेल्या या लेखक महोदयांनी महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांनाही वाचा फोडली. स्त्री भ्रूणहत्येचे महाराष्ट्रातील वाढते प्रमाण, सोबतच औषधनिर्मिती व विक्रीचा बाजार, त्यात होत जाणारी रुग्णांची फसवणूक, जाणीवपूर्वक किंवा अजाणता डॉक्टर मंडळी यात का सामील होतात ; या सर्व प्रश्नांना उत्तरे शोधायचा प्रयत्न करतानाच त्यावर काही उपाय करता येतील का, हा महत्त्वाचा प्रश्न ते आपल्यासमोर मांडतात.
प्रत्येक व्यक्तीने-रुग्ण असणाऱ्या वा स्वस्थ असणाऱ्या व्यक्तीने – वाचावे असे हे पुस्तक आहे. काल्पनिक विक्रम-वेताळ संवादाने मांडणी केलेली माहिती व विचार वैज्ञानिकदृष्ट्या खरे आहेत.
मनोविकास प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे कव्हरही आकर्षक आहे. आरोग्याचे ‘‘सफरचंद” (An apple a day keeps the doctor away ) मुखपृष्ठ व मलपृष्ठावर मिळून कापलेल्या अवस्थेत आहे व त्यात व्यायाम करणारे सुदृढ शरीराचे रेखाचित्र बरेच काही सांगून जाते. कव्हरचा हिरवा रंगही सूचक आहे.
अनुक्रमणिका ३६ निरनिराळ्या शीर्षकांनी समृद्ध आहे. ‘पी हळद हो गोरी’, ‘बेबीचा बाब्या झाला’, ‘बदलीसे निकला है चांद’, ‘आखुडशिंगी बहुदुधी’, ‘अंगठा चोखणाऱ्या प्रौढांचा देश’, ‘रिव्हर्स फारमॅकॉलॉजी’, ‘सुई आत आजार बाहेर’, ‘जिराफ लटकूराम आणि कंपनी’, ‘आरोग्याच्या गावा जावे’, ‘करके देखो’ वगैरे वगैरे कुतूहल वाढवण्यास समर्पक आहेत.
दुनिया में मूों की कमी नहीं, गालिब एक खोजो तो हजार मिलते हैं,
दूर खोजो तो पास मिलते हैं ।। हा गालिबचा शेर प्रत्येक कथा वाचताना आठवल्यास नवल नाही. आपल्या देशातल्या जनतेचे अज्ञान, अंधश्रद्धा, आणि सुशिक्षित अडाणी लोकांची अर्धवट ज्ञानाने झालेली विचित्र वृत्ती या सर्वांच्या मुळाशी आहे असे पदोपदी वाटत राहाते.
सुरुवातीची कथा – कानात वापरण्याच्या ‘शरीीवी’ शी संबंधित आहे. भ्रमनिरास करणारी आहे. खतरनाक औषधे – त्यांचे दुष्परिणाम, लोमोटिलसारखी घातक औषधे – मेक्साफॉर्म-एंटेराव्हायोफॉर्म वगैरेंनी झालेले उपपरिणाम अनुभवाला येऊनही तत्सम औषधे अजूनही बाजारात आहेत. त्याचबरोबर टकलावर केस उगवण्यासाठी वापरण्यात येणारी विविध औषधे व तेलांचे प्रकार, त्यासाठी हार्मोन्सचा होणारा वापर, हे टक्कलवाल्या व्यक्तीचे किती नुकसान करू शकतो यावर बरीच माहिती आहे.
सर्दी-पडशांवरील औषधांच्या जाहिराती किती फसव्या असतात, त्यामुळे काही फायदा खरेच होतो का, याबद्दल जागरूकता निर्माण करणारा लेख फारच महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी आजीबाईचा बटवा किंवा घरगुती औषधेच कशी परिणामकारक व बिनपैशाची असतात यावर ऊहापोह केला आहे. गोरे होण्यासाठी करण्यात येणारे खटाटोप हे गोरे करण्याऐवजी त्वचेचे किती नुकसान करतात यावरची कथाही डोळ्यात अंजन घालणारी ठरते.
जीवनसत्त्वांचा अवास्तव व प्रमाणाबाहेरचा उपयोग केल्याने ‘अमृत’ मिळत नसते, तर त्यांचे उत्सर्जन होऊन ती वायाच जास्त जातात. त्याचबरोबर खनिजे-कॅल्शियम, मँगेनीज, फॉस्फरस, झिंक, तांबे, आयोडिन, वगैरे यांचा विनाकारण गैरवापर होतो. फक्त लोह, कॅल्शियम व झिंक शिवाय अन्य कोणतीही खनिजे-औषधांच्या रूपाने देणे अशास्त्रीय व अनावश्यक आहे – यावर एक कथा चांगली आहे.
शरीरवर्धके किंवा Growth stimulant (anabolic steroids) वापरण्यात त्यांची उपयुक्तता व संभाव्य धोके या दोन्ही बाबींचा विचार होणे अतीव जरुरीचे असते. त्यासाठी रुग्ण व नातेवाईक यांनी जागरूक राहून सर्व समजावून घेऊन त्यांचा वापर केला पाहिजे हे महत्त्वाचे.
भूक वाढविणारी औषधे वापरणेही अशास्त्रीय आहे. निरनिराळी ‘माऊथवॉशेस’ ‘सांसों में खुशबू वाली आणि त्यावर खर्च होणारा पैसा किती अनावश्यक असतो, गैरवाजवी असतो यावरही बरीच चर्चा केली आहे. हर्बल मेडिसिन्सवरही बरीच डोळे उघडण्यासाठी केलेली चर्चा सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. आयुर्वेदिक औषधे, त्यांचे मार्केटिंग, त्यांच्या किंमती आणि ‘नो साईड इफेक्ट्स’ अशा जाहिरातींमुळे होणारी फसवणूक, यावरही दोनतीन कथांमध्ये बरीच उपयुक्त चर्चा आहे.
खेळाडूंमध्ये वापरण्यात येणारी उत्तेजक संप्रेरके, खेळाडूंना, देशांना तात्कालिक विजय मिळवून देतात, पण त्यांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम त्यांना जन्मभर भोगावे लागतात याचा विचार कोणी करायचा?
डॉक्टरांनी केलेल्या इंजेक्शनचा उपयोग रुग्णांना चुकीचा संदेश देतो. इंजेक्शनची सवय लावण्याचे काम डॉक्टरच करतात. त्यात तात्पुरते बरे वाटणे, त्याचा मानसिक परिणाम, ‘सुई टोचली की आराम लवकर मिळतो’ हे रोग्याला पटवण्यात अनेक डॉक्टर्स समर्थ असतात. त्यात त्यांना मिळणारा पैसा किती असतो, कारण नसताना येईल त्या रुग्णाला इंट्राव्हिनस सलाईन लावणे या डॉक्टरांच्या सवयी, इत्यादी रुग्णांमध्ये गैरसमज निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. इन्स्टंट इलाजाचा खराच उपयोग होतो का, यावर रुग्ण कधी विचार करतील ?
‘जय माता दी’ या कथेत तर स्त्रीभ्रूणहत्येविरुद्धच्या कायद्याला डॉक्टरच कशी बगल देतात, चोरून सोनोग्राफी करून गर्भाचे लिंग सांगतात. जास्त पैसे घेऊन सर्रास गर्भजलपरीक्षा व सोनोग्राफीच्या सहाय्याने कित्येक स्त्रीगर्भाचे गर्भपात होत आहेत. व पुरुष व स्त्रीचे नैसर्गिक प्रमाण एकास एक न राहता १००० पुरुषांमागे ७०० स्त्रिया एवढे कमी व्हायला लागले आहे. सोनोग्राफी व गर्भजलपरीक्षा गर्भातल्या विकृती जाणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने अस्तित्वात आले. पण त्याचा उपयोग या गैरवापरासाठीच अधिक होतो, तोसुद्धा बरेचदा सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गात जास्त प्रमाणात व गरिबांमध्येही काही प्रमाणात केला जातो. अशा ‘गर्भलिंगपरीक्षा बंदी’ कायद्याची ठोस अंमलबजावणी करून वैद्यकीय तंत्राचा गैरवापर करणाऱ्या डॉक्टरांना तुरुंगात पाठवावे लागेल, त्यांचे डॉक्टरकीचे लायसेन्स रद्द करावे लागेल. हे सर्व समजावून सांगून जनतेची जागृती नक्कीच होईल, व हे करण्याचा चांगला प्रयत्न लेखकाने या कथेत केला आहे.
‘कबुतराच्या खुराड्यातील हात’ या कथेत तर फार्मसिस्टच्या लायसेन्सचा दुरुपयोग कसा केला जातो, यावर डोळ्यांत अंजन घातले गेले आहे. आता नव्या जमान्यात, नवी आह्वाने, नव्या संधी समोर येत आहेत. क्लिनिकल फार्मसी, औषध माहिती केंद्रे व औषधविक्रेतेही लोकांच्या उपयोगी पडल्याने समाजातील त्यांचे स्थान उंचावेल व प्रतिमाही उजळेल पण प्रतिमेकडे लक्ष पुरवण्याऐवजी फार्मसिस्टांनी व्यावसायिकतेवर, कौशल्य वाढवण्यावर व मुख्य म्हणजे व्यावसायिक नीतिमूल्ये जपण्यावर भर दिला तर त्यांना समाजात नक्कीच गौरव प्राप्त होईल. एरवी डॉक्टर्ससकट सर्व व्यावसायिकांच्या संघटना ह्या लुटारूंच्या टोळ्या बनल्या आहेत, या सर्वसामान्यांच्या मताला पुष्टी मिळेल.
क्लिनिकल रिसर्च ट्रायल्स, शास्त्रीय कसोट्यांचा आग्रह व पारदर्शकता या निकषांवर अन्न व औषध प्रशासनाची कार्यपद्धती अवलंबून आहे. पण इथेच कसे शेत खाणारे कुंपण आहे, हे लेखक सांगतो.
एकीकडे आपण अत्याधुनिक औषधे स्वीकारली, पण त्यांची व्यवस्था लावणे मात्र आपल्याला जमले नाही. औषधांबद्दलची जागरूकता वाढवणे आणि औषधांच्या विपरीत परिणामांची नोंद ठेवणाऱ्या यंत्रणेची किमान मुहूर्तमेढ करणे, या दोन गोष्टींबद्दल आशेला जागा आहे. शेवटी सातत्यपूर्ण दक्षता ही केवळ स्वातंत्र्याचीच नव्हे तर आधुनिक वैद्यकाचा वापर करण्याची किंमत आहे.
एक अधिक एक अकरा की शून्य’ या कथेचे सूत्र असे –औषधांच्या दुनियेत दोन औषधांच्या एकत्र परिणामांची बेरीज शून्य, एक, दोन, चार अकरा काहीही होऊ शकते; परस्परपूरक किंवा परस्परविरोधी असू शकते. दोन औषधे, औषध-आजार, औषध-अन्न किंवा औषध-निदानपरीक्षा यात आंतरक्रिया होऊ शकते. त्याने रुग्णाला त्रास भोगावा लागू शकतो. व रोग एकीकडे आणि साइड इफेक्टस्ने होणारे दुसरेच सहन करावे लागते. त्यांचे गुणधर्म-आजार याबद्दल रुग्णांनी जास्त जागरूक होण्याची गरज आहे.
पाच.
उत्क्रांतिसिद्धान्त, जात आणि जनुके देवेन्द्र इंगळे
जाति-विभङ्ग पाणानं, अनामना हि जातियो ।।
एवं नत्थि मनुस्सेसु, लिङ्गं जातिमयं पुथु ।।* तथागत गौतम बुद्ध
(मनुष्येतर) प्राणिमात्रांमध्ये भिन्नभाव दाखविणाऱ्या जाती असतात; पण मनुष्यांमध्ये पृथक्ता दाखवणारे जातिमय लिंग नसते. (मज्झिमनिकाय, वासेट्ठसुत्त (२.४८.२.३), उद्धृत – शरद पाटील, दासशूद्रांची गुलामगिरी, खंड १ : भाग २, प्राज्ञ प्रकाशन, वाई, १९८७, पृ. ४५८)