संपादकीय नवे गडी, नवा राज!

आजचा सुधारक चालवण्याशी अनेकांचे, वेगवेगळ्या पातळ्यांवरचे, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असतात. वाचक/ग्राहक हा संबंधितांच्या संख्येने सर्वांत मोठा प्रकार. यांतही आजीव, दरवर्षी वर्गणी देणारे, परदेशस्थ, संस्थासदस्य, (ज्यांच्याशी आसुचे आदानप्रदान होते अशी) नियतकालिके, (ज्यांनी आसु वाचावा असे वाटल्याने अंक सप्रेम पाठवले जातात, असे) विचारवंत, इत्यादी प्रकार असतात. या सर्वांकडून येणारे प्रतिसाद, हा आसु चे धोरण ठरण्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. पण कागदोपत्री एक व्यक्ती मासिकाची प्रमुख असावी लागते, आणि तिने शेवटी प्रकाशनाची सर्व जबाबदारी घ्यायची असेत. ही व्यक्ती म्हणजे प्रकाशक. आसु च्या सुरुवातीला काही वर्षे दिवाकर मोहनी व काही वर्षे विद्यागौरी खरे यांनी प्रकाशक म्हणून काम केले.आज भरत मोहनींकडे ही जबाबदारी दिली जात आहे. मासिकाच्या सुरुवातीपासून भरत मोहनी या ना त्या प्रकारे मासिकाशी जुळलेले आहेतच. आता या नात्याला एक औपचारिक बैठक दिली गेली आहे.
मासिकासाठी मजकूर मिळवणे, त्यावर प्रक्रिया करणे, प्रकाशनाची वेळ पाळणे व इतर संलग्न कामे संपादक मंडळ करते. आज दिवाकर मोहनी, नंदा खरे व सुनीती देव हे तिघे मिळून मंडळ घडले आहे. तिघेही बराच काळ मासिकाशी निगडित आहेत – व तिघेही उतारवयात आहेत.
यामुळे संपादक मंडळाचा विस्तार होणे व तो लवकर होणे निकडीचे आहे. सल्लागार हे भावी संपादक होऊ शकतात, या भावनेतून त्यांच्या संमतीने ते निवडले-नेमले जातात. आज सल्लागारांमध्ये प्रमोद व उत्तरा सहस्रबुद्धे, प्रभाकर नानावटी, टी.बी. खिलारे, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, मिलिंद मुरुगकर, अश्विनी कुलकर्णी, लोकेश शेवडे व सुलक्षणा महाजन, असे नऊ जण आहेत. बहुतेक जण आसु चे वाचक-लेखक आहेत. अनेकांनी विशेषांकांचे अतिथी संपादक म्हणून काम केले आहे, करत आहेत. संपादक, सल्लागार मासिकाच्या मूळ उद्दिष्टांकडेच जात आहेत ना, हे पाहण्यासाठी एक अनौपचारिक विश्वस्त मंडळ आहे. हे वर्षातून एकदा भेटते, परंतु बहुतेक विश्वस्त एकमेकांशी व संपादक-सल्लागारांशी संपर्कात असतात. धोरणात्मक निर्णय नेहेमीच विश्वस्त व संपादक-प्रकाशक यांच्यातील चर्चेनंतरच घेतले जातात. आज विश्वस्त मंडळात ताहेरभाई पूनावाला, सुभाष आठले, नंदा खरे, सुनीती देव, भरत मोहनी, भा. ल. भोळे व जयंत फाळके आहेत. यांपैकी पहिले पाच विश्वस्त मंडळाच्या सुरुवातीपासून आहेत. भा. ल. भोळे सल्लागार, अतिथी संपादक, लेखक अशा अनेक भूमिकांमधून मासिकाशी सुरुवातीपासून संबंधित आहेत. जयंत फाळके यांचे अनेक लेख आसु त आलेले आहेत.
पण विश्वस्तमंडळातील पाच सदस्य अनेक वर्षे त्या पदावर आहेत. संपादकमंडळात गेली बारा वर्षे वाढ झालेली नाही. आजही स्त्री-सदस्यांची संख्या बरीच कमी आहे. मराठवाडा व कोकण या प्रदेशांमधून कोणीही विश्वस्त, संपादक, सल्लागार नाही. आणि यातली एकही बाब इष्ट मानता येत नाही.
मासिक महाराष्ट्रात सगळीकडे जाते. वर्गणीदारांची संख्या फार कमी आहे, तरीही भौगोलिक पोच विस्तृत आहे. मासिकाच्या पदाधिकाऱ्यांत मात्र कोकण-मराठवाडा नाहीत. मासिक ढोबळमानाने उपयोगितावादी, म्हणजेच व्यक्तिस्वातंत्र्यवादी आहे. पण स्त्री-सदस्य कमी आहेत. “काम करतो” असे म्हणून जबाबदारी घेऊ इच्छिणारे वाढत नाही आहेत. ही सर्वच वैचारिक मासिकांची स्थिती आहे, असे म्हणून ती मान्य करणे इष्ट नाही.
एक महत्त्वाचा प्रश्न आहे पदाधिकाऱ्यांच्या वयांचा. विवेकवाद रुजवण्यातल्या अडचणी जरी बहुतकरून आगरकरांच्या काळापासून चालत आलेल्या असल्या, तरी अविवेकाचे नवनवे आविष्कार पुढे येत असतात. त्यांना प्रतिसादही नवनव्या मार्गांच्या, तंत्रांच्या वापरातून दिला जायला हवा. आणि यात वाढते वय अडचणीचे ठरते. बुजुर्ग विश्वस्त, मध्यमवयीन संपादक, तरुण प्रकाशक व सल्लागार, ही आदर्श रचना आहे. काळासोबत सारे वर सरकत जायला हवे. दि.य.देशपांड्यांनी यांचे भान ठेवले होते. त्यांचा कित्ता गिरवायचा एक प्रयत्न, म्हणून ही नवी जुळणी केली जात आहे.
वाचकांच्या प्रतिक्रिया तर हव्याच असतात.