स्लमडॉग करोडपती

D: It is written पण नेमकं काय? पाण्याच्या वाफेवर लिहिलेला जमालचा संघर्षमय भूतकाळ की फसवा वर्तमानकाळ की उज्ज्वल भविष्यकाळ ??
जमाल… एक अमिताभवेडा क्रिकेटप्रेमी, तर सलीम, त्याचा मोठा भाऊ, आईसोबत ‘आमची’ मुंबईच्या झोडपट्टीत राहात असतात. हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये जीव वाचवताना राम भेटतो. पण आईला गमावून अनाथ, निष्पाप भावंडे – द टू मस्केटीयर्स – आणि लतिका – द थर्ड – जगण्यासाठी एकांडा संघर्ष सुरू करतात.
पोटासाठी कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या या मुलांना भिकारी बनवण्यासाठी एक दिवस ममनचे लोक घेऊन जातात. मुलांचे डोळे काढून काहींना पांगळे करून भिकेला लावण्याच्या या धंद्याचा ममन बादशाह असतो. इथे त्यांना ‘दर्शन दो भगवान मोहे….’ म्हणत सूरदास भेटतो. बंधुप्रेम आणि मोकळे जगण्याची आस दोघा भावंडांना याही कठीण परिस्थितीतून सहीसलामत बाहेर काढते. पण लतिका ? ती फसते कारण सलीमची आत्मकेंद्री वृत्ती. हजरजबाबीपणा आणि निरीक्षण, वेळ पडली तर अगदी चोऱ्या आणि फसवणूक, यांच्या जोरावर ताजमहालच्या बाहेर ही पोरे स्वतःचे चांगलेच बस्तान बसवतात. (थोडक्यात डार्विनच्या सिसश्रश षी एळीींशपलश चे उत्तम उदाहरण). पण लतिका – काही जमालला झोप लागू देत नाही. ममनने तिचे काय केले असेल ? ती कशी असेल ? ह्या चिंतेपायी तो परत मुंबईला येतो. अखेर ‘चेरी’ला शोधतो. तिची सुटका करताना स्वतःच्या बचावासाठी सलीम ममनचा खून करतो आणि ममनच्या लोकांपासून संरक्षणासाठी झोपडपट्टीतल्या गुंडाचा जावेद खानचा आश्रय घेतो. याच दरम्यान मोठ्या भावाच्या नात्याने लतिकावर हक्क सांगून सलीम जमालला हाकलून देतो. जमाल दुखावून तिथून निघून जातो आणि कॉल सेंटरमध्ये असिस्टंटची (चायवाल्याची) नोकरी स्वीकारतो.
पण बालपणापासूनच्याच जिज्ञासा आणि कुतूहल ह्या गोष्टी त्याचे सामान्यज्ञान वाढवत असतात. एक दिवस सलीमला भेटून लतिकाबद्दल विचारल्यावर त्याला जावेद खान, लतिका आणि सलीमचे काम याबद्दल कळते म्हणून तो परत तिच्या शोधात निघतो. अखेर तिला घराबाहेर काढण्यात यशस्वी झाल्यावर परत दोघांवर अनिश्चितता घाला घालते. जावेदचे लोक – स्वतः सलीम, लतिकाला पळवून नेतात. आणि तिच्यापर्यंत पोहचण्याचे साधन जमाल म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’त भाग घेतो. स्वतःच्या अनुभवांच्या, स्मरणशक्तींच्या व सामान्य ज्ञानाच्या जोरावर तो एक करोड जिंकण्यापर्यंत मजल मारतो. पण फितवेगिरीच्या संशयावरून पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कसे माहिती होते याचे त्याने पोलिसांनी दिलेले स्पष्टीकरण म्हणजेच स्लमडॉगचा करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास !
पण जमालचे गणित बरोबर ठरते आणि सलीमच्या मदतीने लतिका त्याला परत भेटते. यात सलीम त्याचा जीव गमावतो पण जावेदचा जीव घेऊनच.
संपूर्ण सिनेमा हा एक धावता आढावाच आहे, जमालच्या जगण्याचा आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा. कठोर वास्तवाचे केलेले मिश्किल आणि तितकेच खोडकर चित्रण आहे हे. एकाच वेळी चेहयावर हसू आणि डोळ्यात आसू आणणारे कितीतरी प्रसंग यात टिपलेले आहेत. रेल्वेमधून फुकट प्रवास करतात म्हणून टीसी दोघांना गाडीतून ढकलून देतो आणि म्हणतो, ‘क्या तेरे बाप की गाडी है क्या ?’ यावर जमाल म्हणतो, ‘क्यों बे, तेरे बाप की गाडी है क्या ?’ हा त्यातलाच एक.
याशिवाय, सगळ्यात ठसणारी गोष्ट म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरे जमाल स्वतः जगला होता. कुठल्याही पाठ्यपुस्तकापेक्षा त्याने पूर्ण केलेला अभ्यासक्रम अधिक कठोर आणि अधिक पॅक्टिकल होता. जमालच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहताना सारखे जाणवत राहते की परिस्थिती कशीही आली तरी चांगला माणूस म्हणून जगता येते. पण त्याच वेळी, सलीमचे संरक्षण लाभले नसते तर काय, ह्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही.
चित्रपटाचे कथानक पडद्यावरून सरकताना आणि संपल्यावरही मनात रेंगाळत राहते, ते ए. आर. रेहमानचे संगीत! भूतकाळ आणि वर्तमानकाळातील घटनांचा पद्धतशीर मिलाफ करून कुतूहल निर्माण करण्यात दिग्दर्शक डेनी बॉइल यशस्वी झाले आहेत. चित्रपटाचे कथानक गतिशील असून काही अपवाद वगळता चित्रपट विशिष्ट लयीत पुढे सरकत राहतो.
चित्रपटाचा गाभा असलेले जमालचे लतिकावरचे प्रेम हा प्रेक्षकांसाठी नवीन विषय नसला तरीही भारतीय चित्रपटातील ‘प्रेमा’पेक्षा हे प्रेम परिपक्व असल्याचे जाणवते. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ‘भारतातील गरिबीच्या प्रदर्शनातून धंदा करणारा चित्रपट’ अशी टीका यावर करण्यात आली. हा खरे तर वादाचा विषय होऊ शकतो मात्र या विषयावरील चित्रपटाची गरज होती यावर दुमत असू नये.
‘स्लमडॉग करोडपती’च्या उत्कृष्टतेवर ऑस्कर मानांकनाने शिक्कामोर्तब केले आहेच. विशेषतः ए. आर. रेहमान, गुलजार आणि रसेल पोकुट्टी याना मिळालेला हा बहुमान त्यांच्या कलेला न्याय आहेच शिवाय एक भारतीय म्हणून अभिमान वाटावा अशी ही घटना नक्कीच आहे.
[ ‘स्लमडॉग करोडपती’ हा एक अर्थी चावून चोथा झालेला विषय. तो चित्रपट ‘भारतीय’ समजावा की नाही, हे अतिशयोक्ती, गरिबीचे प्रदर्शन, अनेक मुद्द्यांवर रिमेच्या रिमे लिहिली गेली. पण लिहिणारे ‘प्रस्थापित’, मध्यमवयीन होते. या टिपणाची लेखिका ‘एकवीस पूर्ण’ वयाची आहे, आणि तिचा वेगळा आणि ‘वयस्कां’ पेक्षा जास्त तटस्थ दृष्टिकोण आहे. – सं]