मालिकाबद्ध पुस्तकातले डोह

आजचा सुधारक ची पहिली दोन वर्षे (एप्रिल ‘९० ते मार्च ‘९२) पानांचे क्रमांक दर महिन्यात नव्याने सुरू केले जात. एखाद्या महिन्यात एक ते बत्तीस क्रमांक दिले, की पुढील महिना परत एक पासून सुरू केला जाई. नंतर असा विचार आला, की लेखांवरील चर्चा, पत्रे, प्रतिक्रिया, असे करत एखाद्या विषयावरील सर्वांचे सर्व मुद्दे समजून घेण्यामुळे मासिक खरे तर मालिकाबद्ध पुस्तकासारखे रूप घेते. त्यामुळे एकेक वर्ष तरी पानांचे क्रमांक सलग द्यावेत. एप्रिल ‘९२च्या अंकापासून आजवर ही पद्धत सुरू आहे. त्यावेळी मी आसु चा वाचकही नव्हतो, पण दि.य.देशपांडे, दिवाकर मोहनी वगैरेंकडून सलग पृष्ठक्रमांकांमागचा विचार कळला.
चर्चाविषयांमध्ये काही विषय वारंवार येतात. धर्म, शिक्षण, नीती, कुटुंबव्यवस्था, श्रद्धा-अंधश्रद्धा, अशा विषयांच्या चर्चेत विवेकाचा वापर कसा करावा, ही तर न संपणारी चर्चा आहे. मते, मतभेद, पुरावे, यांमधून साहित्यातील संज्ञाप्रवाहासारखा, stream of consciousness सारखा एक सामूहिक विचारप्रवाह आसु त सुरू असतो. या प्रवाहात अधूनमधून रुंद पात्रांसारखे, तळ्यांसारखे, डोहांसारखे विशेषांक असतात.
वाचक कधीकधी पत्रांमधून किंवा मेळाव्यांचे वेळी “अमुक विषयाची चर्चा एकदा निर्णयापर्यंत नेऊन संपवत का नाही?” असा प्रश्न विचारतात. खरे तर बहुतेक विषयांमध्ये अंतिम निर्णय असे नसतात. तसे निर्णय शक्य आहेत असे मानणेही मला अविवेकी वाटते. ही बाब विज्ञानाच्या क्षेत्रात जास्त नेमकेपणे आणि निःसंदिग्धपणे जाहीर केली जाते. विज्ञानाचा एक तत्त्वज्ञ प्रत्येक निसर्गनियम किंवा वैज्ञानिक तत्त्व हे आजवर खोटे न ठरलेले (आणि त्यामुळे व्यवहारात वापरण्याजोगे), याच दर्जापर्यंत जाऊ शकणारे विधान मानतो. ते अंतिम, निर्विवाद सत्य कधीच ठरत नाही. हा आहे कार्ल पॉपर. काही जण कार्ल पॉपरचा प्रमुख विरोधक थॉमस कून आहे असे मानतात. तोही वैज्ञानिक तत्त्वांना एका परिवर्तनीय आलोकाचा (paradigmMm) भाग हाच दर्जा देतो; अंतिम सत्याचा नव्हे. हा तात्पुरत्या मान्यतेचा भावच विवेकी आहे; आणि हे विज्ञानाच्याच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांत खरे आहे.
एकदा का एखाद्या मताला तात्पुरती मान्यताच देता येते असे मानले, की अधूनमधून त्या वेळेपर्यंच्या उपलब्ध पुराव्यांचा आणि मतमतांतरांचा आढावा घेणे आलेच. हे काम आजचा सुधारक विशेषांकांमधून करत असतो. अर्थात, विशेषांकांचे विषय कधीही अंतिमतः हातावेगळे करण्याचा प्रयत्न नसतो. कधीकधी तर तो चर्चेला चालना देण्याचा प्रयत्न असतो. आजवरच्या विशेषांकांचा क्रमवार आढावा आता घेणार आहे. दर अंकाच्या ओळखीनंतर प्रकाशनकाळ, अंकक्रमांक, अंकाचा आकार आणि अतिथी संपादकांची नावे नोंदली आहेत. जिथे अतिथी संपादकांची नावे नाहीत, ते आसु च्या संपादकमंडळाने घडवलेले अंक मानावे.
१) वामन मल्हार जोशींच्या साहित्याचा नव्याने विचार करणारा पहिला विशेषांक होता [डिसें. ‘९०-जाने.’९१, अंक १.९-१०, जोडअंक.]
२) धर्मनिरपेक्षता या संकल्पनेची तात्त्विक चर्चा दुसऱ्या विशेषांकाने केली. [सप्टें.-ऑक्टो.’९१ अंक २.६-७, जोडअंक.]
३) १९ जुलै ‘९२ च्या साधना साप्ताहिकात ना.ग.गोरे यांनी निसर्ग आणि मानव नावाने एक लेख लिहिला. या लेखाला वसंत पळशीकरांनी उत्तर दिले. (साधना २९ ऑगस्ट ‘९२). यातून उद्भवलेली चर्चा आसु ने विशेषांकाच्या रूपात प्रकाशित केली. [एप्रिल-मे ‘९३, अंक ४.१-२, जोडअंक.]
४) आगरकरां च्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या भूमिकेचे पुनरवलोकन केले गेले. [जून-जुलै ‘९५, अंक ६.३-४, जोडअंक.]
५) धर्मनिरपेक्षता व सर्वोच्च न्यायालय या नावाने धर्मनिरपेक्षतेबाबत न्यायसंस्थेची भूमिका तपासली गेली. [जुलै-ऑगस्ट ‘९६, अंक ७.४-५, जोडअंक, सत्यरंजन साठे]
६) समान नागरी कायदा ही धर्मनिरपेक्षतेकडे जाणारी एक वाट आहे. तिचा अभ्यास एका विशेषांकातून केला गेला. [नोव्हें.डिसें.’९६, अंक ७.८-९, जोड अंक, जया सागडे]
७) मासिकाच्या पहिल्या संपादकमंडळात व सल्लागारांत मिळून दहा व्यक्ती होत्या. यांपैकी नऊ जण महाविद्यालये, विद्यापीठे यांत अध्यापन करणारे किंवा केलेले होते. दहावे दिवाकर मोहनी, ज्यांच्या आस्थाविषयांत शिक्षणाला नेहेमीच अग्रक्रम असतो. यामुळे शिक्षण, त्याला राजकीय रंग देण्याचे प्रयत्न, इत्यादी विषय आसु त नेहमीच येत असतात. याचाच भाग म्हणून शिक्षणामागील हेतू यावर एक विशेषांक काढला गेला. [जुलै-ऑगस्ट ‘०२, अंक १३.४-५, जोडअंक, संजीवनी कुळकर्णी]
याच्याच आगेमागे प्रोब (Peoples Report on Basic Education) अहवालाचे विस्तृत परीक्षण (अंक ११.० ते ११.१२, विद्यागौरी खरे) आणि प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन (अंक १५.१ ते १५.५, भास्कर फडणीस) या दोन लेखमालाही शिक्षणाकडे लक्ष वेधून गेल्या.
८) विज्ञानाचा उपयोग “काय आहे?” या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी करावा, हे विवेकवादाचे एक अंग. पण विज्ञानाची नेमकी पद्धत कोणती यावर मात्र बराच गोंधळ घातला जातो. आधुनिक विज्ञानाचे स्वरूप हा विशेषांक यावर उतारा पुरवतो. [जाने.-फेब्रु. ‘०४, अंक १४.१०-११, जोडअंक, चिंतामणी देशमुख,
या अंकाच्या प्रकाशनानंतर मौज चे श्री. पु. भागवत यांनी तो पुस्तकरूपातही प्रकाशित व्हावा अशी सूचना केली. मौज च्या मार्फत तसे पुस्तक २००७ अखेरीस प्रसिद्धही झाले. परंतु त्याआधी श्री.पु. व चिंतामणी देशमुख यांचे निधन झाले.
९) आज भारताची चाळीसेक टक्के लोकसंख्या शहरी झाली आहे. महाराष्ट्रात तर अर्धे लोक नागरी आहेत. नागरीकरण हा विषय यामुळे महत्त्वाचा ठरतो. [ऑक्टो.-नोव्हें. ‘०४, अंक १५.६-७, जोडअंक, सुलक्षणा महाजन]
१०) याचाच पुढचा भाग म्हणून मुंबईसाठी गृहनिर्माण धोरण ही पुस्तिकाही लँड रीसर्च इन्स्टिट्यूट च्या सहकार्याने काढली गेली निोव्हें. ‘०५, अंक १६.८, सामान्य आकारातील पुरवणी, शिरीष पटेल व सुलक्षणा महाजन]
११) जसा औद्योगिकीकरणाने रोजगाराचा प्रकार बदलतो, तसाच तंत्रज्ञानातील बदलांमुळेही बदलतो. भारतीय वस्त्रोद्योगातील बदलांमुळे मुंबई, अमदाबाद वगैरे गावांवर असे गंभीर सामाजिक परिणाम झाले. यांपैकी अमदावादचे उदाहरण तपासणारे यान ब्रेमन व पार्थिव शहा (छायाचित्रकार) यांचे वर्किंग इन द मिल् नो मोअर (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस) हे पुस्तक संक्षिप्त रूपात गिरणी विशेषांक या नावाने प्रकाशित केले. पुस्तकाच्या संक्षेपासोबत या विषयावर विचार केलेल्या अनेक जणांचे लेखही विशेषांकात आहेत. [मे ‘०५, अंक १६.२, सामान्य आकार, श्रीनिवास खांदेवाले.]
१२) विभावरी शिरूरकर (= बाळूताई खरे, मालतीबाई बेडेकर) यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे पुनरवलोकन केले गेले. [ऑक्टो. ‘०५, अंक १६.७, सामान्य आकार, पुष्पा भावे.
१३) शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ही भारतातील मोठी समस्याग्रस्त क्षेत्रे. त्यांच्या काही अंगांवरचा विशेषांक आवश्यकच होता. [मे-जून ‘०७, अंक १७.२-३, जोडअंक, चिं.मो.पंडित].
१४) असेच समस्याग्रस्त क्षेत्र आहे आरोग्यसेवा हे. [सप्टें. ०६, अंक १७.६, जोडअंक, संजीवनी केळकर].
१५) १९०६ साली आगरकरां ची दीडशेवी जयंती होती. त्यानिमित्ताने आगरकरांकडे पुन्हा एकदा काहीशा तपशिलात पाहिले, आणि त्यांच्या सुधारक शी आजचा सुधारक ची नाळ कशी जोडलेली आहे हे तपासले. [डिसें. ‘०७, अंक १७.९, सामान्य आकार, भा. ल. भोळे.]
१६) जातिव्यवस्थेच्या बदलत्या रूपाचे एक विश्लेषण लॅन्सी फर्नाडिस आणि सत्यजित भटकळ यांच्या The Fractured Civilization: Caste in the Throes of Change या पुरतकात भेटते. त्याचा संक्षेप ठिकया या विशेषांकात सादर केला गेला. [फेब्रु. ‘०७, अंक १७.११, सागान्य आकार
१७) दामोदर धर्मानंद कोसंबी हे एक उपेक्षित व्यक्तिमत्त्व. त्यांच्या विचारांची ओळख त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने करून दिली गेली. [जून ‘०७, अंक १८.३, सामान्य आकार, जयंत गडकरी.
१८) आरक्षण हे पूर्वापार चालत आलेल्या सामाजिक भेदभावाचे परिणाम सौम्य करण्याचे हत्यार म्हणन जगभर वापरले गेले आहे. तसे करण्याची आरक्षण ही आदर्श पद्धत नाही, परंतु आरक्षण व्यवहार्य आहेच. हे ठसवणारा जात : आरक्षण विशेषांक आसु ने काढला. [एप्रिल-मे ‘०८, अंक १९.१-२, जोडअंक, प्रभाकर नानावटी व टी.बी.खिलारे.
१९) टपालखात्याच्या नियमांप्रमाणे एका प्रकाशनवर्षात दोन जोड अंक काढता येत नाहीत. विशेष जोड अंकांची तयारी वेळखाऊ असते. या स्थितीत एक जोडअंक येऊन गेला आहे व दुसरा तयार आहे, असे झाल्यास जोडअंक तरी बराच पुढे ढकलावा लागतो. किंवा विशेषांक विखुरलेल्या रूपात काढावा लागतो. स्वयंसेवी संस्थाबाबतच्या विशेषांकासाठी आम्हाला दुसरा पर्याय वापरावा लागला. सिप्टें. ‘०९, ऑक्टो. ‘०९ आणि नोव्हें.’०९, अंक १९.६, १९.७, १८.९, सुबोध वागळे व कल्पना दीक्षित..
२०) डार्विन चे नैसर्गिक निवडीतून उत्क्रांतीचे तत्त्व हे विज्ञानातील अत्यंत महत्त्वाचे तत्त्व आहे. त्याने अनेक नैसर्गिक घटना व प्रक्रियांच्या आकलनात मदत होते. याचबरोबर उत्क्रांती, तिची यंत्रणा आणि तिचे परिणाम यांवर गैरसमजही भरपूर आहेत. यामुळे उत्क्रांती आणि नैसर्गिक निवड यांभोवती वादांची वादळे सतत घोंगावत असतात. २००९ साल हे डार्विनच्या द्विशताब्दीचे आणि त्याच्या ऑरिजन ऑफ स्पीशीज या मूलग्रंथाच्या दीडशेव्या जयंतीचे वर्ष आहे. या निमित्ताने जीवशास्त्राशी संबंधित क्षेत्रांमधल्या आधुनिक भूमिका आसु ने तपासल्या. [ऑगस्ट ‘०९, अंक २०.५, जोडअंक, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ..
नजीकच्या भविष्यात तीन विशेषांक येऊ घातले आहेत. प्रमोद व उत्तरा सहस्रबुद्धे अंधश्रद्धेचा विषय तपासणार आहेत. (एप्रिल ‘१०.२). मिलिंद मुरूगकर व अश्विनी कुळकर्णी सार्वजनिक अन्नधान्य-वितरण व्यवस्था तपासणार आहेत. चिं.मो. पंडित पाणीवापराशी निगडित समस्या तपासणार आहेत.
विषयांचा तुडवडा नाही. आसु च्या वाचकांपैकी कोणीही हात उंचावून “मी अमुक विषयावर विशेषांक घडवतो/घडवते.”, असे म्हणून चर्चेनंतर कामाला लागू शकतो/शकते.
साधारणपणे कृतिक्रम असा, विषय ठरल्यावर अतिथी संपादक विषयाच्या अंगोपांगावर एक टिपण बनवतो, व संभाव्य लेखकांची नावे सुचवतो. यात संपादकमंडळही भाग घेते. मग टिपण सर्व संभाव्य लेखकांना पाठवले जाते. जसजसे लेख उपलब्ध होतात व अतिथी संपादक त्यांच्यावर थोडीफार प्रक्रिया करतो, तसतशी त्यांची अक्षरजुळणी केली जाते. बहुतांश लेख जुळवून झाल्यावर अतिथी संपादक प्रस्तावना लिहितो, अंकाच्या प्रकाशनाची सूचना मासिकातून दिली जाते, व अंक प्रकाशित होतो. ही पूर्ण प्रक्रिया कधीकधी दीडदोन वर्षेही चालते!
येवढे करूनही अतिथी संपादक – संपादकमंडळ यांना अपेक्षित सर्व अंगांवरील लेख मिळत नाहीतच. कधीकधी अतिथी संपादकाची भूमिका कोण्या वाचकाला अपुरी किंवा एकांगी वाटते. हे सप्रमाण दाखवून देण्याचेही बहुतेकवेळी स्वागतच असते. कधी या चर्चेत आवाज चढतात. कधी वाचकांचे पूर्वग्रहच अतिथी संपादक एकांगी विषयमांडणी करतो आहे, अशा आरोपांना जन्म देतात. हे सारे चर्चेच्या रूपात विषयाचे आकलन वाढवणारेच असते. भाषा सभ्य हवी; इतपतच पंचगिरी संपादकमंडळ करते.
मराठीतील वैचारिक मासिके व पुस्तके यांचा खप लाजिरवाणा ठरावा इतका कमी आहे. अशा मासिकांची/पुस्तकांची परीक्षणेही धड होत नाहीत. एखाददुसऱ्या विवादास्पद लेखाला/पुस्तकालाच परीक्षण व प्रतिवाद होण्याचे भाग्य लाभते. आज मासिके व नियकालिके इंटरनेटवर टाकण्याकडे कल वाढला आहे. अशा सायबरावकाशातील लेखनावर त्याच अवकाशात चर्चाही होतात. माध्यमाचे रूप बहुधा या चर्चांना उथळ व तुटक बनवते. आमच्या मते विशेषांक हे यावर एक (असमाधानकारक का असेना!) उत्तर आहे. मश्रुवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर – ४४० ०१०.