इतिहासातील नवेजुने

अॅक्टन व त्याच्या सहकाऱ्यांना (१८९६ साली) वाटत असे की भविष्यात कधीतरी ‘अंतिम इतिहास’ लिहिता येईल. साठ वर्षांनी सर जॉर्ज क्लार्कने यावर टिप्पणी केली –
“भावी पिढ्यांतील इतिहासकारांना (अंतिम इतिहास लिहिता येईल) असे वाटत नाही. त्यांना त्यांचे कार्य वारंवार उल्लंघून नवनवे इतिहास लिहिले जात राहतील असे वाटते. त्यांच्या मते भूतकाळाबाबतची माहिती एका वा अनेक माणसांच्या मनांच्या प्रक्रियेतूनच आपल्यापर्यंत येते. त्यामुळे ती मूलभूत, व्यक्तिनिरपेक्ष, अपरिवर्तनीय तथ्य-कणांच्या रूपात असू शकत नाही. इतिहास संशोधन ही अंतहीन प्रक्रिया आहे. काही घाई झालेले विद्वान यामुळे संशयवादी होतात. ते एक अशी भूमिका घेतात-ज्याअर्थी इतिहासाचे मूल्यमापन माणसागणिक व दृष्टिकोणागणिक बदलू शकते, त्याअर्थी कोणताही दृष्टिकोण इतरांपेक्षा जास्त ग्राह्य मानता येत नाही. वस्तुनिष्ठ ऐतिहासिक सत्य नसतेच.”
मला वाटते की मी १८९०-१९०० च्या दशकात लिहिलेले सर्व काही निरर्थकच असणार, असे मानण्याइतका अद्ययावत आहे; पण १९५० नंतरचे सारेच खरे मानण्याइतपत मी प्रगत झालेलो नाही.
[ई.एच.कार, आपल्या व्हॉट इज हिस्टरी? (मॅमिलन १९६१) या पुस्तकात हे उपरोधिक विधान करतो.]