पिसाळलेले म्हणा आणि गोळी घाला !

“कॉल ए डॉग मॅड अँड शूट इट” अशी म्हण इंग्रजीत आहे. याचा अर्थ असा की कुत्र्याला मारायचे आहे ना? मग तो पिसाळलेला आहे असे म्हणा, आणि त्याला गोळी घाला.
जनुकबदल पिकांबद्दल (genetically modified crops) हेच चालू आहे. भीती पसरवण्यात आनंद मानणारा एक तथाकथित पर्यावरणवादी/समाजवादी/पुरोगामी म्हणवून घेणारा कंपू भारतात कार्यरत आहे. त्यांनी का कोण जाणे पण जनुकबदल पिकांना गोळी घालावयाचे ठरवले आहे. त्यासाठी मग जनुकबदल पिकांचे सर्व गुण नाकारून त्यांना विषारी, धोकादायक, पर्यावरणाला धोकादायक, शेतकऱ्यांना परावलंबी बनवण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेले हत्यार, वगैरे विशेषणे बहाल केली आहेत. ही विशेषणे सिद्ध करण्याची, खरेच जनुकबदल पिके धोकादायक आहेत याचा पुरावा देण्याची जबाबदारी मात्र एन.डी.पाटील आणि वंदना शिवा आणि कंपनी घेत नाही. ती जबाबदारी मात्र कृषिविद्यापीठे आणि केंद्रीय शेतीखात्याची.
पण कृषिविद्यापीठांनी कसबा-बावडा येथे प्रायोगिक प्रक्षेत्रावर चालू केलेली जनुकबदल मक्याची चाचणी मात्र एन.डी.पाटील आणि कंपनीने झुंडशाहीने आणि राजकीय दबावाने बंद पाडली; कारण चाचणी पूर्ण होऊन त्यात जर हा मका माणसाला/जनावरांना नुकसानकारक नाही असे सिद्ध झाले तर ते या कंपूला फारच अडचणीचे ठरेल. सत्य बाहेर आले तर फायदातोटा यांचा हिशेब करून ते बियाण स्वीकारता येईल किंवा नाकारता येईल. उघड गोष्टींबद्दल भीती निर्माण करता येत नाही. अज्ञाताबद्दल मात्र बागुलबुवा उभा करता येतो. या कंपूच्या दृष्टीने झाकली मूठ सव्वा लाखाची आहे.
जनुकबदल पिके काही विवक्षित हेतू मनात ठेवून निर्माण केली जातात. उदा. १) कीड-प्रतिबंधः उदा. बीटी कापूस, बीटी मका, बीटी वांगी, वगैरे. बीटी जनुकांमुळे तयार होणारे जैवकीटकनाशक हे फक्त बोंडअळी व त्या वर्गातील अळ्यांनाच मारक आहे. ते वनस्पतीच्या अंगातच मर्यादित रहाते, जमिनीत, हवेत पाण्यात पसरत नाही. जैव असल्याने ते बायोडिग्रेडेबल आहे. या वर्गातील अळ्या सोडता इतर कीटक, प्राणी, मासे यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे इतर कीटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीटी कापसाच्या पिकावर जंतुनाशकाचा वापर करावाच लागतो – पण जंतुनाशक वापराचे प्रमाण खूपच कमी होते, त्यामुळे खर्च खूप कमी येतो, पर्यावरणाचे नुकसान खूप कमी होते. हे विष अत्यंत नॅरो-स्पेक्ट्रम असल्याने त्याचा माणसावर काही परिणाम होत नाही. अमेरिकेत बीटी मका गेली अनेक वर्षे माणसे व जनावरे खात आहेत, पण त्याचा वाईट परिणाम झाल्याची वार्ता नाही. भारतात गुजरात, पंजाब, हरियाणामध्ये बीटी कापूस गेली काही वर्षे पिकवला जातो. त्याच्या सरकीचे तेल माणसे खातात, सरकीची पेंड जनावरे खातात. त्यापासून वाईट परिणाम झालेला नाही. तरीही भारतात आणखी चाचण्या घेण्यास विरोध कोण करत आहे ?
किडीला तोंड देणाऱ्या बियाणांप्रमाणेच व्हायरसमुळे होणाऱ्या, फंगसमुळे होणाऱ्या (उदा. तांबेरा) रोगांना दाद न देणारे जनुकबदल करणे शक्य आहे. २) तणनाशकांना दाद न देणारी पिकेः ही पिके असलेल्या शेतात तणनाशक द्रव्ये वापरून तण मारता येते. त्यामुळे भांगलणीचा खर्च वाचतो व तणाचा चांगला बंदोबस्त झाल्याने पीक जास्त येते. शेतकऱ्याचा खर्च व त्रास कमी होतो. ३) अवर्षणाला तोंड देऊ शकणारी पिके: या जनुकबदलामुळे पिके अवर्षणाला तोंड देऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्याचे होणारे मोठे नुकसान टळते. ४) अधिक पौष्टिक पिकेः उदा. बीटा कॅरोटीनचे जास्त प्रमाण असलेला तांदूळ, ज्यामुळे माणसातील अ जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघेल, अधिक प्रोटीन असलेला बटाटा किंवा तांदूळ, ज्यामुळे प्रथिनांच्या कमतरतेवर मात करता येईल. ५) क्षारयुक्त जमिनीत वाढू शकणारी पिके.
या विविध प्रकारच्या जनुकबदल पिकांमुळे शेतकऱ्याचे आयुष्य थोडे अधिक सुरक्षित होईल, कमी कष्टाचे होईल, शेती थोडी कमी तोट्याची, कदाचित् थोडी फायद्याची होईल. सर्वसाधारण जनतेची अन्नसुरक्षा वाढेल. पण शेतकऱ्यांना गरीब आणि दुर्बल ठेवण्यातच ज्यांचा स्वार्थ आहे, त्यांना हे कसे पटवणार ? वरीलपैकी २ ते ५ प्रकारच्या पिकांमध्ये तर कोणताही विषारी पदार्थ तयार होत नाही. तरीही त्यांची योग्य चाचणी व्हायला हवी हे मान्यच.
शेतकऱ्याला मूर्ख समजू नये. त्याचा फायदातोटा त्याला कळतो. फायदा असल्यास तो जास्त किंमत देऊन बीटी बियाणे विकत घेईल. त्याचा आर्थिक तोटा होतो हे खोटी आकडेवारी देऊन सिद्ध करण्याचा खटाटोप करू नये. शेतकऱ्यावर जनुकबदल बियाणे घेण्याची कोणी सक्ती करत नाही. नेहमीचे बियाणे त्याच्याकडे असतेच. पण त्याच्या समोर असलेला एक आशादायक आणि आश्वासक पर्याय गर्भातच खुडून टाकू नये.
अमेरिका आणि बहुद्देशीय कंपन्या यांना दोष देण्यात अर्थ नाही. आपल्या नाकर्तेपणामुळे सर्व महत्त्वाचे संशोधन अमेरिकेत चालते व त्याचा फायदा आपण घेत असतो. औषधे घेताना, मोबाइल फोन घेताना, इंटरनेट, संगणक वापरताना, हे संशोधन आम्हाला चालते. हे सर्व संशोधन व उत्पादन बहुराष्ट्रीय कंपन्याच करतात. हे संशोधन व त्यापासून उपयोगी औषधे/वस्तू बनवणे हे महागही असते आणि धोक्याचेही असते. एखादे औषध बाजारात आणल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसून आले, तर आधीचा सर्व खर्च वाया जातो, वर प्रचंड नुकसानभरपाई द्यावी लागते, शिवाय कंपनीचा लौकिक, बँडनेम खराब होते व कंपनीचे दिवाळे निघण्याची पाळी येते. धोकादायक, विषारी बियाणे बाजारात आणायला मॉन्सँटोसारख्या कंपनीस काय वेड लागले आहे ? स्वार्थासाठी का होईना, पुरेपूर काळजी घेणे हे त्या कंपनीस जीवनावश्यकच आहे. आफ्रिकेतील किंवा जगातील कोणत्याही देशास जनुकबदल बियाणे वापरण्याची सक्ती करणे आज जगातील कोणत्याही कंपनीच्या तर सोडाच, पण अमेरिकेच्याही आवाक्यातील गोष्ट नाही. जे काही युरोपीय देश जनुकबदल पिकांना सरसहा नकार देत आहेत ते व्यापारी कारणांनी नकार देत आहेत, ती पिके धोकादायक, विषारी आहेत म्हणून नाही. याच युरोपीय देशांना आफ्रिकेतील बरेच देश मका वगैरे धान्ये निर्यात करतात, आणि निर्यात धान्यात थोडीदेखील जनुकबदल धान्याची भेसळ झाल्यास ही निर्यात बंद होईल या भीतीने, जनुकबदल धान्ये/पिके अंतर्गत वापरासाठीदेखील वापरण्यास ही राष्ट्रे नाईलाजाने नकार देत आहेत. म्हणजे त्यांच्यावर जनुकबदल पिके न वापरण्याची अप्रत्यक्ष सक्ती होत आहे! खरे तर ही पिके वापरल्यास, तेथील दुष्काळ व उपासमार कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिका, बहुराष्ट्रीय कंपन्या, जागतिक व्यापार संघटना आणि जागतिकीकरण यांच्याबद्दल विनातथ्य आणि आंधळी ओरड करण्याची भारतीय पुरोगामी मंडळींमध्ये फॅशनच पडली आहे.
असे बियाणे वापरल्यास मॉन्सँटो कंपनीची एकाधिकार मक्तेदारी तयार होईल, व अन्नसुरक्षेसाठी ते धोकादायक होईल, हेदेखील खरे नाही. आज हे तंत्रज्ञान मूळ कंपनीकडून विकत घेऊन ३०-४० भारतीय बियाणे कंपन्या बी.टी.कापूस बियाणे भारतातच बनवून भारतीय बाजारात विकत आहेत, आणि तसा करार केल्यास निर्यातदेखील करू शकतील. गेल्या वर्षी मॉन्सँटो कंपनीला भारतीय व्यवहारात ३०-४० कोटी रुपये नफा झाला, तर या वर्षात भारतीय शेतकऱ्यांनी एक अब्ज डॉलरचा, म्हणजे पन्नास अब्ज रुपयांचा कापूस निर्यात केला. म्हणजे हा सौदा भारतीय शेतकयांना आणि भारताला भरपूर फायद्याचाच आहे. ही निर्यात बी.टी. कापूस बियाणे मिळाल्यामुळेच शक्य झाली. पण हे बियाणे भारतात चोरून, मागच्या दारानेच येऊ शकले. पुरोगाम्यांच्या विरोधामुळे आणि शासकीय शास्त्रज्ञांच्या घाबरटपणामुळे, योग्य चाचण्या वेळच्या वेळी होऊन त्याला मान्यता मिळाली नाही. ते बियाणे चोरवाटेने येऊन, शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होऊन त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर त्याला नाईलाजाने सरकारी यंत्रणांना मान्यता (पोस्ट-फॅक्टो) द्यावी लागली. सरकारी शास्त्रज्ञांच्या या घाबरटपणामुळेच कसबा-बावडा कोल्हापूर येथील जनुकबदल मक्याची चाचणी कृषिविद्यापीठाला अर्धवट सोडून द्यावी लागली. एक वर्षाच्या चाचणीची निरीक्षणे काय होती हेदेखील प्रसिद्ध करायला तेथील शास्त्रज्ञ घाबरत आहेत ! योग्य चाचण्या वेळापत्रकानुसार न झाल्यास हे बियाणेदेखील चोरट्या अवैध मार्गाने भारतात येईल आणि पसरेल. तसे झाल्यास ते अधिक धोकादायक ठरू शकेल. पण तशीच पुरोगाम्यांची इच्छा असावी. कोणत्याही मान्यवर शास्त्रज्ञांनी, प्रत्यक्ष प्रयोग न करता, बनवलेली मते म्हणजे केवळ संशय किंवा पूर्वग्रह होय, व त्यांची किंमत शून्य आहे.
पुढारी मंडळीचे पुढारीपण बऱ्याच वेळा भीती पसरवण्यावर अवलंबून असते. फार पूर्वी जलविद्युत् केंद्रातील पाण्यातील वीज काढून घेतली असल्याने ते पाणी शेतीसाठी वापरू नये असा प्रचार झाला. नंतर पवनचक्क्यांमुळे पाऊस कमी पडतो असा प्रचार झाला. कोणताही बदल किंवा नवी गोष्ट नाकारण्याची मूळ भारतीय प्रवृत्तीच आहे. त्यात भीती पसरवून जगणारे लोक भर घालतात!
वाजवी संशय आणि मुद्दाम पसरवलेली, अनाठायी व प्रमाणाबाहेर तीव्र भीती यांच्यात फरक करायला शिकले पाहिजे. गोळी घालण्यापूर्वी कुत्रे पिसाळले आहे याची खात्री करायला हवी, नाही तर उपयुक्त आणि स्वामिभक्त असे कुत्रेही मारले जाईल!
[ हा एक दृष्टिकोण आहे. डार्विन विशेषांकातील तारक काट्यांचा लेख दुसरीही बाजू मांडतो. काटे यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगत आहोत. उरश्रश्र र वेस रव, हा प्रकार दोन्ही बाजूंनी होत असतो ! – सं.]
२५, नागाळा पार्क, कोल्हापूर-४१६ ००३.