अमेरिकन शेती आणि भारत

तसे पाहिले तर अमेरिका (यूएसए) हा कोणाचेही कुतूहल चाळवणाराच देश आहे. अवघ्या ४५०-५०० वर्षांत शून्यातून उभे राहून हा देश आज सर्व जगात बलाढ्य देश झाला आहे. साहजिकच प्रत्येक गोष्ट अमेरिकेत कशी होते हे जाणून घेण्याकडे आपला कल असतो. पण तत्पूर्वी काही गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक आहे.
अमेरिकेचे क्षेत्रफळ ९३.८ लक्ष चौ. किलोमीटर आहे. भारताचे क्षेत्रफळ ३२.९ लक्ष चौ.कि.मी. आहे. अमेरिकेची लोकसंख्या २८ कोटी (२००५) तर भारताची लोकसंख्या १०३ कोटी (२००५) इतकी आहे. म्हणजे अमेरिकेत माणशी ३.३५ हेक्टर जमीन येते तर भारतात ती ०.३१ हेक्टर इतकी कमी आहे. अमेरिकेची नैसर्गिक संसाधने आपल्या जवळजवळ ११ पट आहेत. भारत ८ ते ३३ अक्षांशावर उष्ण कटिबंधात आहे तर अमेरिका ३० ते ५० अक्षांशावर समशीतोष्ण हवामानात आहे. अमेरिकेत गेली ४००-५०० वर्षांतच खऱ्या अर्थाने शेती होत आहे. त्यांना Virgin Soils चा फायदा मिळाला. भारतात १५००-२००० वर्षे तरी शेती होत आहे. त्यामुळे इथल्या शेतजमिनी निःसत्त्व झाल्या असण्याची दाट शक्यता आहे. आजचा अमेरिकन समाज ९३% साक्षर आहे तर भारत केवळ ५०% साक्षर आहे.
एखादा समाज पुढे यायचा तर तो ईर्षेने पेटायला हवा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इस्रायल. आज भारतात नेतृत्व पूर्णपणे स्वार्थांध, २५ कोटी सुशिक्षित, स्वास्थ्य लाभलेला मध्यम व नश्रीमंत वर्ग आत्मरत, तर उरलेला समाज पराभूत, उदास, नकारात्मक व दैववादी आहे. शिवाय तो एकसंधही (Homogeneous) नाही. धर्म, जातपात, भाषा यांत विभागला गेलेला आहे.
जेव्हा समाज नव्याने उभारी घेतो – जसे आपल्याकडे इंग्रजांच्या जाण्यामुळे झाले तेव्हा त्याच्या पुढे काही निश्चित स्वरूपाचे ध्येय असते, बांधिलकी असते. बांधिलकी जितकी नेमकी तितका प्रयत्न नेमका होतो, धडपड नेमकी होते. ती जितकी संदिग्ध, विसविशीत, तितके प्रयत्न पसरट होत जातात. सत्य, अहिंसा, सर्वधर्म-समभाव (‘सेक्युलर’चे तद्दन चुकीचे, राजकीय हेतूने केलेले भाषांतर. खरा अर्थ इहवादी, जड गोष्टींच्या संबंधित, धर्मातीत) ही ध्येये व्यवहारात अनाकलनीय, मोजमापापलीकडील (intangible) आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीचे घोषवाक्य होते. समता स्वातंत्र्य-विश्वबंधुत्व – असेच स्वप्नाळू. तो एक जुलमी सरंजामशाही आणि जाचक चर्चशाही विरुद्धचा उद्रेक होता. त्यामुळे त्यातून जन्माला आली ती वैचारिक खळबळ आणि नेपोलियनची हुकूमशाही.
अमेरिकेचे ब्रीदवाक्य आहे – जीवन-स्वातंत्र्य-सुखप्राप्ती (life, liberty & persuit of happiness). याशिवाय laissez faire – माणसाच्या आर्थिक धडपडीत राज्यकर्त्यांना हस्तक्षेप करण्याचा करण्याचा अधिकार नाही. शिवाय आपल्याच धडपडीतून प्राप्त केलेल्या संपत्तीवर मर्यादा नाही. आणि लिमिटेड कंपन्यांनाही व्यक्ती ठरवून अमर्याद संपत्ती जमा करण्याचे स्वातंत्र्य. आज अमेरिकेतल्या कित्येक कंपन्यांची अंदाजपत्रके कित्येक देशांच्या अंदाजपत्रकांपेक्षा पटींनी जास्त असतात. फ्रेंच ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेला सामाजिक संदर्भ होता. अमेरिकन ‘स्वातंत्र्य’ ही संकल्पना अनिबंध व्यक्तिस्वातंत्र्याची आहे. (आयन रँडचे साहित्य पाहावे). सार्वत्रिक मतदानावार आधारित लोकशाही हा भारत, अमेरिका यांतील समान धागा आहे.
अशी ही पार्श्वभूमी असताना ‘अमेरिकन शेती’ आपण का जाणून घ्यायची ? उदरभरणाची शेती, उपजीविकेची शेती या संकल्पना आता मागे पडल्या आहेत. एकवेळ ‘खाऊन पिऊन सुखी’ यावर माणूस खूष होता. आज माझ्याकडे घरकाम करणाऱ्या बाईंकडे रेफ्रिजरेटर, मिक्सर-ग्राईंडर, टी.व्ही. आणि मोबाईल फोन आहे. का नसावा? त्यासाठी त्या आणि त्यांचे पती प्रामाणिक कष्ट करतात. त्यांची मुलगी दहावीत आहे आणि पुढे महाविद्यालयातही जाण्याची उमेद धरून आहे. ती घरकाम करणार नाही. आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान, उत्पादनतंत्रे यांनी हे घडवून आणले. जीवनशैली पार बदलली.
आजकाल कुठल्याही उपक्रमाला अर्थव्यवहाराचा पाया असतो. शेतीलाही तो आहेच. जागतिकीकरणाचा अर्थ म्हणजे हा ‘अर्थव्यवहार, व्यापार उदीम’ जागतिक पातळीवर संघटित होत आहे. अशा वेळी या व्यासपीठावर आपल्या शेतीला अमेरिकन शेतीबरोबर नांदायचे आहे. स्पर्धा हा शब्द मी जाणीवपूर्वक टाळला आहे. कारण स्पर्धा, चढाओढ तुल्यबळांतच होऊ शकते. शिवाय आजची विचारसरणी ही स्पर्धेपेक्षा परस्परावलंबनाकडे झुकू लागली आहे. अगदी बाजारपेठीय अर्थव्यवस्थाही. दुसरीकडे कमालीची ‘राष्ट्रीय भावना’पण दिसून येते. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना अनुदाने, आयात मालावर निर्बंध आणि कर, Intellectual Property Rights आणि पेटंटस्द्वारे नाकेबंदी असे सर्व काही चालू असते.
अमेरिकन शेतीचे तीन टप्पे कल्पिता येतात. पहिला टप्पा हा ब्रिटिश वसाहतीच्या काळातला. त्यावेळचे शेतकरी हे चर्चला आणि सरंजामशाहीला कंटाळून नशीब काढण्याच्या हिरिरीने आलेले होते. फारसे शिकलेले नव्हते, पण अतिशय कष्टाळू होते. अमर्याद भूमी पाहून त्यांची लालसा चेतवली गेली. जमिनींच्या मालकीच्या आकांक्षा जागृत झाल्या. या काळात (आणि पुढेही काही वर्षे) लाखो गुलामांची आफ्रिकेतून आयात करून त्यांना घोड्याबैलांबरोबर कामाला लावले गेले. वसाहतींच्या आधी एतद्देशीय लोक शेती वगैरे फारशी करतच नव्हते. जमिनीच्या मालकीची संकल्पना अस्तित्वात नव्हती. हा प्राथमिक काळ नवीन हवामानाशी जुळवून घेणे, एतद्देशीयांशी आणि युरोपीय अन्यदेशवासीयांशी संघर्ष करण्यातच गेला. पण शेती स्थिरावली. अतिरिक्त उत्पादन व त्याची निर्यातही सुरू झाली. औद्योगिकीकरणाला सुरुवात झालेल्या युरोपीय देशांना कच्चा माल, अन्नधान्य हवेच होते.
दुसरा टप्पा यांत्रिकीकरणाचा. स्वातंत्र्ययुद्धानंतर वसाहतवादाचा शेवट झाला. आता गुलामगिरीला समर्थन देणे कठीण होते. लोकशाही स्वीकारलेली होती. तेव्हा कायद्याने तरी गुलामगिरी नष्ट झाली. पण मोठमोठ्या – हजार दोन हजार एकर जमिनी कसायच्या तर होत्या. मग यांत्रिकीकरण आले. ट्रॅक्टर, ट्रिलर, हॉर्वेस्टर आले. गोडाऊन्स आली. आणि Internal combution engine च्या शोधामुळे वाहतुकीत आमूलाग्र बदल झाला. डींशरा डहळीी मुळे सागरी वाहतूक तर बदललीच होती. इंग्रजांचे सागरी वर्चस्व १८१८ या युद्धानंतर बंद झाले. आता Truck Transport, Railway Transport मुळे अंतर्देशीय वाहतूक सुलभ होऊन बंदरांपर्यंत माल पोहोचवणे सहजसाध्य झाले. शेती-उत्पादनाला जोर चढला. युरोपीय कच्च्या मालाची मागणी (उदा. कापूस) दोन महायुद्धे, जगात इतरत्र पडलेले दुष्काळ यांमुळे अमेरिका हा देश जगाचा अन्नदाता झाला.
दोन महायुद्धे होऊन गेली होती. रासायनिक खते, कीटकनाशके, यांत्रिकीकरण इ.मुळे शेतीने आता प्रचंड उद्योगधंद्याचे स्वरूप धारण केले होते. भांडवली गुंतवणूक, आधुनिक व्यवस्थापन,बाजारपेठांचा अभ्यास यामुळे तिसऱ्या टप्प्यावर शेती हा शेतकरी कुटुंबांचा व्यवसाय न राहता त्याचे लोरीिळरींळेप झाले आहे. अन्नधान्य शेती, नगदी पिकांची (ऊस, कापूस, तंबाखू) शेती, फळभाज्यांची शेती असे अनेक पर्याय उभे राहिले. त्यासाठी मग रस्ते, सिंचन व्यवस्था, बी-बियाणे, इंधन-पुरवठा, प्रशिक्षित मनुष्यबळ हे सर्व काही आले. इतर उद्योगांत मागणी-पुरवठ्याचे तंत्र कमी-अधिक दिवस, दोनतीन पाळ्यांत काम असे करून काहीसे सावरता येते. शेतीत ऐनवेळी असे काही करता येत नाही. मोसमाच्या आरंभीच शेतीक्षेत्र आणि उत्पादन नक्की करावे लागते. त्यानंतर बरेचसे निसर्गावर अवलंबून असते.
अशा या corporate शेतीला आंतरराष्ट्रीय पातळीवर टक्कर देणे तर कठीण आहेच, पण त्यांच्या भारतातल्या आगमनालाही थोपवणे सोपे नाही. एका सामाजिक-राजकीय ऊमींच्या क्षणी आपण जमिनींचे समन्याय तत्त्वावर वाटप केले. कमाल जमीन धारणा कायदा केला. ९० टक्के सरकारी भागभांडवल घालून सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या चालविण्याचा प्रयत्न केला. आज त्या जमिनी पाणी, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे निःसत्व झाल्या. मूळ उद्देश म्हणजे उपजीविकेचे कुठचेच साधन नसलेल्यांना काही थोडेसे तरी मिळावे. पण माणसाला सतत वरवर चढण्याची संधी हवी असते. ती या तुकड्यांमधून कशी मिळणार ? असो, तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल. एवढे मात्र निश्चित की शेती हा केवळ उत्पादनाचा विषय राहिला नसून त्यात आता राजकारण-अर्थकारण आले आहे. आंतरराष्ट्रीय करार, आयात-निर्यातशुल्क, आधारभूत किंमती, सार्वजनिक वितरण व्यवस्था–अनेक गोष्टी आता महत्त्वाच्या झाल्या आहेत. अशा वेळी अमेरिकन कॉर्पोरेट शेतीचे आह्वान कसे पेलायचे?
६, सुरुची, संत जनाबाई पथ, पूर्व विलेपार्ले, मुंबई ४०० ०५७ मोबाईल : ९८१९८३६३१७