प्रश्नांतील गुंता वाढतो

अमरावती जिल्ह्यातील कातपूर गावच्या पाचेक हजार शेतकऱ्यांनी यापुढे बीटी कापूस न घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही जण सोयाबीनकडे वळत आहेत, तर काही थोडे सेंद्रिय शेती करू पाहत आहेत.
चार वर्षांपूर्वी बीटी कापसाने चमत्कार होईल, व उत्पन्न कैक पटींनी वाढेल, असे दावे केले गेले. हे नवे बियाणे कीटकनाशकांची गरज कमी करेल, हा मुख्य मुद्दा ठसवला गेला. आता असे दिसते आहे की पूर्वी दुर्मिळ असलेला लाल्या हा रोग बळावला आहे. यात पांढऱ्या माश्या रोपांच्या देठांवर हल्ला करतात, आणि पाने लाल पडून फुले अकालीच सुकून जातात. रोग आटोक्यात आणायला चौपट-पाचपट कीटकनाशके फवारावी लागतात. सोबतच असे सांगितले जात असते की बियाण्याची उत्पादनक्षमता प्रेपूर वापरायला खतेही जास्त द्यावीत. निविष्टांचे खर्च, कर्जाची वाढती गरज, नगदी पिकांकडेच जाणे आवश्यक ठरणे, या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी कातपूरचे कास्तकार बीटी कापूस त्यागू इच्छितात.
बीटी पिकांमुळे आरोग्याला कोणताही धोका नाही, असे सांगितले जात असतानाच कातपुरातील सात गाई बीटी चारा खाऊन मेल्या असल्याचे सांगितले जाते. विनोद तायवाडे हा शेतकरी म्हणतो, “आम्ही धोका पत्करू इच्छित नाही. गाई तर मेल्या. आता अनोळखी बियाणे टाळणेच बरे!” कृषि-अधिकारी सांगतात की बीटी चाऱ्याने गुरे मरत नाहीत. पण डॉ.के. पी.प्रभाकरन नायर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मृदातज्ज्ञ मानतात की बीटी चाऱ्याने पोटात अल्सर्स होऊ शकतात, व रवंथ करणारी गुरे याने मरू शकतात.
साध्या बियाण्याचा तुटवडा, बीटीच्या नावावर खोटी बियाणी खपवली जाणे, हे नेहमीचे भारतीय प्रश्न आहेतच. पण लंबेचौडे दावे करणारी बियाणी आणि नेमक्या वापर-तंत्राचे प्रशिक्षण नसणे, यांमुळेही प्रश्नांतील गुंता वाढतो.
[इंडियन एक्स्प्रेस (२० नोव्हें. २००९) मधील रेनिता रवींद्रन यांच्या फोर इयर्स ऑफ बिटर हार्वेस्ट्स या लेखावरून.]