आय.सी.एस.ई.-इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह स्टिम्युलेटिंग एज्युकेशन?

मागील वर्षीचे पर्सेंटाईल सूत्र, ह्या वर्षीचे ९०:१० च्या कोट्याचे प्रकरण, तसेच कपिल सिबलांची वक्तव्ये विचारात घेता मुळात प्रत्येक बोर्डाची अंगभूत वैशिष्ट्ये समजून घेणे गरजेचे आहे. आय.सी.एस.ई.बोर्ड विविध इयत्तांमध्ये गणित, भाषा, विज्ञान आदि विषयांची हाताळणी कशा प्रकारे करते, हे जवळून पाहायची संधी मिळाल्याने गेली बारा वर्षे मला जाणवलेल्या वैशिष्ट्यांवर प्रकाशझोत टाकत आहे. माझा अनुभव सार्वत्रिक असेल, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. आय.सी.एस.ई.च्या प्रत्येक शाळेत असेच असेल, असे मुळीच नाही. मुळात हे बोर्ड शाळेला बऱ्याच अंशी स्वायत्तता देते. विषय व पुस्तके निवडण्याचे तसेच परीक्षापद्धती व सत्रनियोजन ठरविण्याचेही शाळेला स्वातंत्र्य असते. वैविध्यपूर्ण उपक्रमांची आखणी आपापल्या सोयी-सवडीनुसार शाळा करू शकते. न्यायालयाने समज दिल्याने का होईना, पण ‘एस.एस.सी. बोर्डाच्या शाळांनी आपला दर्जा उंचावण्यासाठी नेमके काय करावे’ असा प्रश्न जेव्हा कळकळीने उपस्थित केला जातो, तेव्हा मला आय.सी.एस.ई. बोर्डाच्या एका नामांकित शाळेत आढळलेल्या खालील वैशिष्ट्यांची प्रकर्षाने आठवण होते.

 • प्राथमिक शाळेत प्रत्येक धडा संपला की त्यावर आधारित प्रश्नपत्रिका (वर्कशीट) गृहपाठ म्हणून दिली जाते. दिलेल्या जागेत विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहिणे अपेक्षित असते. अशा वर्कशीट्स शिक्षकांकडून काटेकोरपणे तपासल्या जातात व विद्यार्थ्यांना परत केल्या जातात. मग त्या घरी फाईलमध्ये जपून ठेवल्या जातात. काही विषयांना पुस्तकांऐवजी अशा शीट्सच दिल्या जातात. त्यामुळे लहान वयात वह्या-पुस्तकांचा भार वाहण्यापासून मुलांची मुक्तता होते. वर्गातील अभ्यास करण्यासाठी वह्या असतात व त्या वर्गातच ठेवल्या जातात. पालकसभेच्या वेळी त्यांवरून नजर फिरवता येते.
 • आय.सी.एस.ई.ची पुस्तके अवश्य नजरेखालून घालावीत. विशेषत: इतिहास, भूगोल, पर्यावरण-शिक्षण यांसारखे विषय ज्या सचित्र, सुबोध व रंजक रीतीने शिकवले जातात, त्याला तोड नाही. गुळगुळीत कागदांवरील सुस्पष्ट रंगीत चित्रांची आकर्षक छपाईची पुस्तके वाचणे निखळ आनंददायी असते (अर्थातच त्यांची किंमतही जबर असते). जेव्हा विषयाची तोंडओळख होते, तेव्हा विषयाचे बाह्यरूपही दिलखेचक असणे आवश्यक असते. अंतरंगही त्याला साजेसेच असते. गोष्टीरूपाने विषय समजावला जातो व गोष्टीचे तात्पर्य मुलांच्या लक्षात येण्याशी मतलब असतो. परिणामी, हे विषय चक्क मुलांचे ‘मोस्ट फेवरिट’ असतात. विज्ञान-गणितापेक्षा ह्याच विषयांत मुलांना गती असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांनी ह्याच विषयांमध्ये अधिक गुण संपादित केलेले दिसतात.
 • आपल्याला फक्त भरघोस गुण दिसतात, पण त्यापाठीमागील परिश्रम लक्षात घ्यायला हवेत. उदाहरणार्थ – ऑक्सफर्ड रीडिंग सर्कल नजरेखालून घातल्यास त्यांना शिकविल्या जाणाऱ्या इंग्रजीच्या स्तराची कल्पना येते. सातवीतील भूगोलाचे रिता राजनसंपादित पुस्तक पाहिले, तर अभ्यासक्रमाच्या व्याप्तीची व खोलीची कल्पना येते. इतका सर्वार्थांनी कठीण अभ्यासक्रम विद्यार्थी कसा काय पेलतात, ह्याचा विचार करताना लक्षात येते की मुळात त्या त्या विषयाची गोडी निर्माण झालेली असते. चौथीचा भूगोल शिकवताना दहा जणांचा गट आपापल्या राज्यांमध्ये जातो व तेथील हवामानाचा, राहणीमानाचा, जमीनपावसाचा, पिकापाण्याचा अभ्यास करतो व त्याचा वृत्तांत कथन करतो, अशी प्रत्येक पाठाची रचना आढळली. पंजाब, गुजरात, ह्याप्रकारे केलेला अभ्यास सहजपणे लक्षात राहतो.
 • रूढार्थाने आपण जिला ‘परीक्षा’ म्हणतो, त्या परीक्षा सहावीपर्यंत घेतल्या जात नाहीत. धडा संपला की केव्हाही त्यावर ‘स इज टेस्ट’ देण्याची शक्यता असते. ह्यामुळे ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ अशा प्रकारांना बऱ्याच अंशी आळा बसतो. मूलभूत संकल्पनांचे मुळात आकलन झालेल्या विद्यार्थ्यांची केव्हाही चाचपणी केली किंवा चाचणी घेतली, तरी ते उत्तरे देण्यास तत्परच नव्हे, तर उत्सुक असतात. ना अभ्यासाचा त्रास, ना परीक्षेचे टेन्शन.
 • घोकंपट्टीपेक्षा बुद्धीचा कस लागेल, अशी प्रश्नपत्रिका सुरुवातीपासूनच दिली जाते. विचारांना चालना देणाऱ्या प्रश्नांचा सराव झाल्याने सरधोपट किंवा चाकोरीबद्ध शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांना आवडेनाशी होते. म्हणजे शिक्षणक्षेत्रातील चांगल्या-वाईटाची जाण त्यांच्यात निर्माण होते.
 • स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय लागल्याने व ती जोपासल्याने विविध प्रकल्पही विद्यार्थी स्वतंत्रपणे व समर्थपणे पार पाडतात. दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक आठवडाभर ऐतिहासिक स्थळी घेऊन जातात व तेथेच त्या स्थलाशी निगडित समस्या लक्षात घेऊन इतिहास-भूगोलाचे, पर्यावरणाचे प्रकल्प दिले जाता. हिंदी व इंग्रजीत आपले अनुभव लिहिले की झाले भाषांचे प्रकल्प! मुले खूष नि शिक्षकही खूष. पालकांची सुटका झाल्याने तेही खूष. अर्थात पर्यटनापूर्वी त्या स्थळाची सांगोपांग माहिती ग्रंथ, इंटरनेट, अॅटलास, विश्वकोश पाहून गोळा करावी लागते. “कठोर परिश्रमांना पर्याय नाही!”
 • प्रत्येक प्रश्नपत्रिकेत दोन गुण नीटनेटकेपणासाठी राखून ठेवलेले असतात.
 • परीक्षेपूर्वीची दहा मिनिटे केवळ प्रश्नपत्रिकावाचनासाठी राखून ठेवलेली असतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचण्याची व त्यातील नेमके निवडण्याची सवय त्यामुळे लागते. अन्यथा धांदलीपायी होणारे गोंधळ आपण नेहमी पाहतोच.
 • प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ढोबळ, ठरावीक, साचेबद्ध कधीच नसते. शिकलेल्या विषयाचे उपयोजन विद्यार्थ्यांना जमते की नाही, हे तपासण्याचा उद्देश असतो.
 • पालकांना उद्बोधक ठरू शकणारी काही निवेदने तसेच मार्गदर्शक सत्रे वाखाणण्यासारखी असतात. आठवी-नववीपर्यंत अभ्यास, परीक्षा इत्यादींचा बाऊ न करता आजारीपणामुळे शाळा बुडाली, परीक्षा गेली, तरी हरकत नाही. पण ‘शरीरमाद्यं….’ची शिकवण पालकांनी देणे आवश्यक आहे; पण नववी-दहावीतील विद्यार्थ्यांमध्ये मात्र किरकोळ दुखण्यांवर मात करून परीक्षा देण्याची जिद्द निर्माण करावी, अशा आशयाचे प्राचार्यांचे निवेदन आजही मनात घर करून आहे.
 • शिक्षणक्षेत्रात ज्या प्रचंड उलथापालथी होत आहेत, त्यांचे यथार्थ चित्रण करणारी निवेदने वारंवार दिली जातात.
 • शाळा बुडवून सण-समारंभ, लग्न, मुंजी, व्रतेवैकल्ये करावयाची झाल्यास त्यासाठी प्राचार्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. प्राचार्य सहजासहजी राजी होणार नाहीत, हे सुज्ञांस सांगणे न लगे. शाळेला फसवून, खोटी कारणे, सबबी देऊन पालकांनी मुलांस खोट्यानाट्याची शिकवण देऊ नये; त्यापेक्षा शनिवार-रविवारी व इतर सुट्यांमध्ये अशा कार्यक्रमांची आखणी शक्यतोवर करावी, अशी अपेक्षा असते.
 • स्कोलॅस्टिक, नॅशनल बुक ट्रस्ट यांसारख्या नामवंत प्रकाशकांची पुस्तके वर्षातून तीन-चारदा प्रदर्शित केली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने हाताळायची संधी मिळते व विविध दृक्-श्राव्य माध्यमांद्वारा शिक्षण देण्याची संधी पालकांना मिळते.

ह्यातील सर्वच्या सर्व बाबींचे अनुकरण जरी इतर शाळांना व्यावहारिक अडचणींमुळे करता आले नाही (व काही बाबी तत्त्वतः मान्य नसल्या) तरीही नीरक्षीरविवेकाने, सारासार विचाराने ह्यांवर विचार होणे आवश्यक आहे. सर्व बोर्डाच्या अभ्यासक्रमांचा, परीक्षापद्धतीचा, मूल्यमापनाचा तौलनिक विचार करणे ही काळाची गरज आहे.

सी-२, ५०१, लोकमीलन, चांदिवली, मुंबई ४०० ०७२. (मोबा. ९८९२८५२१८०)