र. धों. कर्वे

१८८२ साली सुधारक मधील ‘स्त्रीदास्यविमोचन’ ह्या अग्रलेखात आगरकर म्हणतात, ‘कालांतराने फाजील संतत्युत्पत्ती होऊ न देता स्त्री-पुरुषाचा संयोग होऊ देण्याची युक्ती काढता येईल. स्त्रियांच्या आरोग्यरक्षणाला आवश्यक म्हणून जी काय दोन तीन मुले ठरतील तेवढी तरुण वयात करून घेतली म्हणजे पुढे टांकसाळ बंद ठेवण्याचा उपाय शोधून काढण्याकडे वैद्यकशास्त्राचे मन लागले आहे. व या कामात त्यास लवकरच यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. असे झाले तर आताप्रमाणे डझन किंवा दीड डझन अल्पायुषी मनुष्यप्राणी जगात आणण्यापेक्षा आईबापांच्या जागी खुंटास खुंट उभा करण्यापुरती दोन सुदृढ पोरे झाली तरी बस्स आहेत.’ योगायोग असा की त्याच वर्षी म्हणजे जाने. १८८२ मध्ये मुरूड येथे बुद्धिप्रामाण्यवादामध्ये आगरकरांचा खरा वारस ठरावा अशा र.धों.कर्वे ह्यांनी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या प्रथम पत्नी राधाबाई ह्यांच्या पोटी जन्म घेतला. थोर तत्त्वनिष्ठ आणि प्रखर बुद्धिवादी र.धों.कर्वे भारतातील संततिनियमनाचे आद्य पुरस्कर्ते आणि कामशास्त्राचे प्रणेते झाले. त्यांचे ह्या क्षेत्रातील कार्य त्यांचे वडील भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या स्त्री-शिक्षण क्षेत्रातील कार्याच्या तोडीस तोड ठरले. आगरकरांनी कुटुंबनियोजनाचा विचार लोकसंख्या-नियंत्रणाप्रमाणेच स्त्रीदास्यविमोचनाच्या दृष्टिकोणातून केला. र.धों.कर्त्यांनी पण त्याच भूमिकेतून संततिनियमन आणि समृद्ध कामजीवनाच्या कार्यासाठी स्वतःस वाहून घेतले.
मुंबईत गणिताचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी गणित विषयात एम्.ए. करण्याचे ठरविले. गणिताच्या अधिक अभ्यासासाठी फ्रेंच भाषा येणे आवश्यक वाटल्याने त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमध्येच फ्रेंच शिकायला सुरुवात केली, संभाषणाचा सराव केला. याच काळात लैंगिक विषयावरील ग्रंथ प्रथम त्यांच्या वाचनात आले. या विषयावर इंग्रजीपेक्षा फ्रेंच भाषेतील साहित्य विपुल होते. त्यातच १९१७ साली ते कर्नाटकातील धारवाड कॉलेजमध्ये शिकवीत असताना त्यांना पुढील अध्ययनासाठी दीड वर्षांची रजा मिळाली आणि ते फ्रान्समधील पॅरिस विश्वविद्यालयात दाखल झाले. ‘दिप्लोमा द एस्युद सुपिरिअर’ साठी तयारी करत असतानाच तेथील बी.ए.च्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकविण्याची खास अनुमती त्यांना विश्वविद्यालयाने दिली होती. तेथे त्यांनी फ्रेंच भाषेचा खोलवर अभ्यास केलाच त्याबरोबरच फ्रेंच समाजजीवनाचाही जवळून अभ्यास केला. कामशास्त्र-कलानिपुण वारांगनांची पॅरिस शहरात कमी नव्हती. तेथील रंगेल जीवनाचे वर्णन पुढे त्यांनी आपल्या ‘पॅरिसच्या परी’ ह्या पुस्तकात केले आहे. ‘तुझ्या शरीराची मालकीण तूच’ ह्या नावाने त्यांनी व्हिक्टर मागरिट यांच्या संततिनियमनविषयक कादंबरीचा अनुवाद केला. लैंगिक विषयावरील पुस्तकांचे त्यांचे दांडगे वाचन होते. ते उद्धृत करत असलेल्या लेखकांपैकी बदँड रसेल, सिग्मड फ्राईड, मेरी स्टोप्स, डॉ. रॉबिन्सन, डॉ. नॉर्मन हेअर ही झाली काही नावे. फ्रान्सहून परतल्यानंतर त्यांचा अध्यापनसेवेतील ज्येष्ठताक्रम डावलल्याने स्वाभिमानी र.धों.नी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी संततिनियमनाचे काम जोरात सुरू केले. साधने विकणे, सल्ला देणे चालू केले. स्त्रीग्राहकांसाठी व्यक्तीनुरूप साधने बनवून सल्ला देण्याचे काम त्यांच्या पत्नी मालतीबाई तेवढ्याच उत्साहाने करीत. ह्याचवेळी उभयतांच्या जीवनकार्याची दिशा ठरून गेली. आर्थिक विवंचनेची तमा न बाळगता दोघांनीही अखेरपर्यंत ह्या कार्याला वाहून घेतले व त्यासाठी असीम त्याग केला.
१९२२ मध्ये ख्रिश्चन मिशनरी चालवीत असलेल्या विल्सन कॉलेजमध्ये अर्धवेळ प्राध्यापकाची नोकरी स्वीकारताना उरलेल्या वेळात माझ्या पसंतीचे कुठलेही काम करण्यास मी मोकळा राहीन असे त्यांनी व्यवस्थापनास बजावले. याच काळात त्यांनी ‘संततिनियमन’ आणि ‘गुप्तरोगापासून बचाव’ ह्या विषयांवर इंग्रजीतून पुस्तके लिहिली. संततिनियमनावर मराठीतूनही लिहिले. त्यांच्या या पुस्तकांची जाहिरात देण्यास ‘टाईम्स ऑफ इंडिया’सारख्या नावाजलेल्या वर्तमानपत्रानेपण नकार दिला. ह्यावरून कोणत्या परिस्थितीत कर्वे आपले काम अविचल निष्ठेने चालू ठेवीत होते ह्याची आपल्याला कल्पना येते. दरम्यान विल्सन कॉलेजमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांचा संततिनियमनावरील एक लेख ‘किर्लोस्कर खबर’ ह्या किर्लोस्करवाडी उद्योगसमूहाच्या मुखपत्रात छापून आला. औंध संस्थानातील एका ज्यू दिवाणाने ह्यासंबंधीची तक्रार विल्सन कॉलेजच्या मिशनरी चालकांकडे केली. कॉलेज व्यवस्थापनाने त्यांना बोलावून संततिनियमनाचा प्रसार बंद करण्यास सांगितले. र.धों.कर्त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. दोन आण्यांत पोटभर राईसप्लेट मिळणाऱ्या त्या जमान्यात दरमहा तीनशे रुपये पगार देणाऱ्या नोकरीवर पाणी सोडणे, तेही संततिनियमनाचे काम चालू ठेवण्यासाठी, ही एक असामान्य बाब होती. ‘गणित शिकवायला तुम्हाला पाहिजे तेवढी माणसे मिळतील पण संततिनियमनाचा प्रसार मी केला नाही तर तो बंद पडण्याचा संभव आहे’, असे बाणेदार उत्तर त्यांनी दिले. व्यवस्थापनानेपण सहा महिन्यांचा ज्यादा पगार देऊन ‘आपला स्वकार्याबद्दलचा हट्ट आदरणीय वाटतो’ असे पत्र देऊन त्यांना नोकरीतून मोकळे केले. पुढील दोनतीन वर्षे चरितार्थासाठी त्यांनी अगदी टॅक्सी ड्रायव्हरपासून हर त-हेचे व्यवसाय करून बघितले परंतु सगळीकडे त्यांच्या प्रचारकार्याला होणारा विरोध आडवा आला.
फ्रान्सबरोबर मोत्यांचा व्यापार करणाऱ्या एका कंपनीत त्यांना सचिवाची नोकरी मिळाली आणि थोडे आर्थिक स्थैर्य आले. कंपनीचा संचालक फ्रेंच तर त्याची बायको इंग्लिश त्यामुळे त्यांच्या आपापसातील पत्रांचा अनुवाद करण्याचे खाजगी कामही ते करीत. त्यांचे स्वतःचे लेखन चालूच होते. “विनय म्हणजे काय?’ हा आपला लेख त्यांनी ‘किर्लोस्कर खबर’कडे प्रकाशनासाठी पाठविला. ह्या लेखात विनय म्हणजे एक ढोंग आहे. नग्नतेकडे तटस्थ वृत्तीने पाहणाऱ्यास लाज वाटण्याचे कारण नाही. अशी भूमिका त्यांनी मांडली होती. हे विचार पचायला जड वाटल्याने वा प्रकाशनानंतर होणारे संभाव्य वादंग टाळण्यासाठी त्यांचा हा लेख नाकारण्यात आला. ‘किर्लोस्कर खबर’ हे त्या काळी एक नवमतवादी, पुढारलेले मुखपत्र होते. आपले स्वतःचे प्रकाशन सुरू करण्याखेरीज र.धों.कर्त्यांना गत्यंतरच उरले नाही. १९२७ च्या जुलै महिन्यात ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाचा जन्म झाला. ही एक ऐतिहासिक संथ, सामाजिक क्रांतीची सुरुवात होती. १९२७ ते १९५३ आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत सतत २७ वर्षे त्यांनी पोटाला चिमटा घेऊन हे मासिक चालविले. हा एक विक्रम होता. समाजस्वास्थ्याची दरमहा ४००० प्रतींची गुजराती आवृत्तीसुद्धा नारायण निमकर नावाच्या गृहस्थाने सलग दोन वर्षे काढली होती. मध्यमवर्गातील घराघरांतून ‘समाजस्वास्थ्य’ पोचले होते. त्यांच्या ह्या प्रचंड कार्याची दखल, नोंद व मोजमाप, ह्यांबाबत नेहमीच ढिसाळ असलेल्या कृतघ्न समाजाने आणि अलिप्त बुद्धिवंतांनी ठेवली नाही ह्याची खंत वाटते.
‘समाजस्वास्थ्य’मधून र.धों.कर्त्यांनी विपुल लेखन केले. ‘अश्लिलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा किंवा इतर वस्तूंचा गुण नसून तो फक्त तसा आरोप करणाऱ्या मनाचा गुण आहे.’ १९३९ पासूनच्या ‘समाजस्वास्थ्य’च्या प्रत्येक अंकाचे आरंभी हे वाक्य छापलेले असे. ज्या काळी लैंगिक परिभाषेतील शब्द उच्चारणे पण निषिद्ध होते त्या काळी वेश्या व्यवसाय, कामवासना, गुप्तरोग, नग्नता, व्यभिचार, समागम, आसने, संततिनियमन अशा विषयांवर लिखाण करून समाजस्वास्थ्याचे एकामागून एक अंक काढणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे होते. त्यांच्या लेखनातून विषयाचा सखोल अभ्यास, वैज्ञानिक दृष्टिकोण आणि एक प्रकारचा आत्मविश्वास दिसून येतो. व्यापारी दृष्टीने समागम सोसणारी स्त्री अशी वेश्येची व्याख्या ते करत. वेश्यांसंबंधी विविध देशात कोणते कायदे केलेले आहेत याबद्दल त्यांनी सलग सहा लेख लिहिले. कोणत्याही स्त्रीला मग ती आपली लग्नाची बायको का असेना समागम करायला लावणे (भाग पाडणे) हे (तिला) वेश्येपेक्षा हीन समजणे होय असे ते म्हणत. विवाहसंस्था हा उंदराचा सापळा आहे. आत शिरायला सोपा पण बाहेर पडणे अशक्य. पातिव्रत्य हे नैसर्गिक नसून ती पुरुषांची अरेरावी आहे. पति-पत्नी यांचा संबंध जिव्हाळ्याचा, मैत्रीचा , प्रेमाचा असावा. कोणतीही एक व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी ‘देव’ असणे शक्य नाही. स्त्रियांनी कुंकू लावणे टाळावे, पुनर्विवाह करावा. तिला सांपत्तिक स्वातंत्र्य असावे. मुले किती व केव्हा हे ठरविण्याचा हक्क स्त्रीचा आहे. मनाविरुद्ध संतती होणे अथवा इच्छा असूनही मूल न होणे हे तिला आयुष्यभर दुःखाचे कारण होऊ शकते. संततिनियमनाची साधने फसली तर गर्भपात करता यावा. सुदृढ, निरोगी मूल होणे अशक्य असेल तर शस्त्रक्रिया करून घ्यावी. हे विचार त्यांनी मांडले.
इ.स.च्या ४ थ्या शतकात महर्षि वात्स्यायन नावाचा श्रेष्ठ, अभ्यासू, पारदर्शक कामसंशोधक होऊन गेला. त्यांनी सूक्ष्म अवलोकन करून, जिज्ञासू बुद्धीने आणि उपलब्ध साधन-सामुग्रीने कामशास्त्राची मूलतत्त्वे सांगणारा ‘कामसूत्रम्’ हा अलौकिक ग्रंथ लिहिला. संस्कृत भाषेतील हा प्राचीनतम ग्रंथ आहे. आपल्या ‘आधुनिक कामशास्त्र’ ह्या ग्रंथात र.धों.कर्त्यांनी वात्सायनाच्या ‘कामसूत्रम्’ ग्रंथातील कधीच प्रकाशात न आलेले विचार लोकांना समजावून सांगितले. पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, ‘कोणी हा विषयच घाणेरडा व अश्लील समजून त्यासंबंधी आपण विचारच करीत नाही अशी स्वतःची समजूत करून घेतात तर कोणी त्यात धर्म व पावित्र्य या असंबद्ध बाबी घुसडतात आणि ‘प्रजोत्पादनाचा उद्देश असल्याशिवाय समागम करता कामा नये’ वगैरे हास्यास्पद विधाने करून स्वतःची फसवणूक करतात. या विषयासंबंधी निखळ असा शास्त्रीय विचार लोकांपुढे मांडणे अत्यंत जरूर आहे.’ दुसऱ्याचे नुकसान केल्याशिवाय जे जे सुख भोगता येईल, ते ते भोगण्याची प्रत्येकाला मुभा असली पाहिजे व यातच कामसुखाचा समावेश होतो. या जगात माणसाला मिळणाऱ्या सुखात कामसुखाला महत्त्वाचे स्थान असल्याने ते व्यक्तीला नाकारणे म्हणजे अन्याय करण्यासारखे आहे. दुसऱ्याच्या सुखासाठी झटणे हे कामशास्त्राचे मुख्य नीतितत्त्व आहे. याकडे लक्ष वेधून स्त्रीच्या सुखावर समागमाचे नियम बसविणाऱ्या वात्स्यायनासारख्या विचारवंताचा त्यांनी गौरव केला. (प्राचीन ग्रीक, रोमन लोकांमध्ये ह्या दृष्टिकोणाचा अभाव होता असे त्यांच्या वाचनात आले.)
ज्या देशात वात्स्यायनासारखा कामशास्त्राचा विज्ञाननिष्ठ अभ्यासक आणि र.धों.कर्त्यांसारखा या क्षेत्रातील समर्पित कार्यकर्ता होऊन गेला तेथील आजची परिस्थिती काय आहे? लग्नाच्या पहिल्या रात्री घटस्फोट होत आहेत. कुमारी मातांची संख्या आणि बलात्काराचे प्रमाण वाढते आहे. मुलगा हवा ह्यासाठी गर्भजलपरीक्षा व गर्भपात केले जात आहेत. पत्रिका बघून विवाह होत आहेत. पुत्रकामेष्टी यज्ञ आणि गोपाळविधीसारखे उपाय सांगून गरजूंना नागविणारे वैदू, भटभिक्षुकांची चलती आहे. हा दैवदुर्विलासच म्हणायला हवा. (विवेकवाद्यांची माफी मागून!)
वैयक्तिक जीवनामध्येही र.धों.कर्वे प्रखर बुद्धिवादी होते. त्यांच्या आचारविचारात एकता होती. लग्नानंतर आपल्याला एकही मूल होऊ द्यायचे नाही असे लग्नापूर्वीच त्यांनी आपल्या भावी पत्नीकडून बाँडपेपरवर लिहून घेतले होते. ‘आम्हा दोघांनाही पुत्रप्राप्तीची आतुरता कधीच नव्हती. कित्येकांना धार्मिक कारणासाठी पुत्र पाहिजे असतो तर कित्येकांना वारस हवा असतो. आम्हा दोघांपैकी कोणीच धार्मिक नव्हते व मिळकतच नसल्याने वारसाला काय मिळणार ?’ असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचा त्या काळातील प्रेमविवाह होता. मालतीबाईंचे इंटरपर्यंत महाविद्यालयीन शिक्षण झाले होते. मुरूड ते पुणे अशा सहा सात दिवसाच्या बैलगाडीचा प्रवासात त्यांचा परिचय झाला. त्या काळातले त्यांचे सहजीवन परिपूर्ण होते. समाजस्वास्थ्याच्या अंकाच्या मालतीबाईच लेखनिक होत्या. कर्त्यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाला त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. शाळेत ड्रिल टीचर म्हणून स्वतःला मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात संसार करायची मालतीबाईंची तयारी होती. संततिनियमनाची साधने बनविणाऱ्या, विकणाऱ्या त्यांच्या ‘राईट एजन्सीज’चा सर्व कार्यभार त्यांनी उचलला होता. मृत्यूपूर्वी दहा वर्षे त्यांचे कमरेखालील शरीर रक्तक्षयाने लुळे पडले होते. त्यांच्यावर केलेल्या प्रयोगामुळे त्यांना अपंगत्व आले असा अपप्रचार त्यांच्या हितशत्रूनी केला. त्या काळात र.धों.कर्त्यांनी व्यक्तिशः आपल्या पत्नीची काळजी घेतली. त्यांच्या औषधोपचारावरही अतोनात खर्च केला. त्या निधन पावल्या त्यावेळची त्यांच्या एका चहात्याने सांगितलेली हकिकत अशी. ‘सकाळी ८ वाजता बाहेर चाललो होतो. तो कोपऱ्यावर अप्पा कर्वे दिसले. इतक्या सकाळीच कुठे चाललात असे विचारण्याआधीच ते म्हणाले, ‘रात्रीच वारली. सकाळी प्रार्थनासमाजाची प्रेतवाहिनी हातगाडी आणली. त्यालाच म्हणालो ५ रु. देईन, घेऊन चल. करायची काय
इतर माणसे ? त्रास कशाला सकाळीच ? बरे आहे. तो गाडीवाला पुढे जातो आहे तेव्हा मी जातो. बाकी कुठे जायचे ते त्याला सांगितले आहेच.” पत्नीचा मृत्यू ही नैसर्गिक घटना मानून त्यांनी धीराने स्वीकारली. त्यानंतर त्यांचे आयुष्य मात्र एकाकी झाले.
‘रॅशनॅलिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया’ ह्या संस्थेचे ‘रीझन’ नावाचे नियतकालिक होते. त्यासाठी र.धों.कर्वे लिखाण करीत. संस्थेच्या कामातही ते लक्ष घालीत. त्यासाठी र.धों.कर्वे लिखाण करीत. संस्थेच्या कामातही ते लक्ष घालीत. असोसिएशनच्या निबंधस्पर्धेत भाग घेऊन त्यांनी पारितोषिक मिळविले. त्यामुळे त्यांची डॉ. गोपाळराव देशमुख, डॉ. परुळेकर, मिनू मसानी, पुरुषोत्तम त्रिविक्रमदास व इतर सक्रिय सभासदांची ओळख झाली. ‘बहुजन समाजाला अंधश्रद्धेच्या आणि पुरोहितशाहीच्या मगरमिठीतून सोडविणे आणि शास्त्रीय दृष्टीने विचार करावयास शिकविणे’ हे संस्थेचे उद्दिष्ट होते. रघुनाथरावांच्या निबंधाचे शीर्षक होते ‘सेण्टस् अॅण्ड फकीर्स’. ‘साधू-संन्यासी फकीर आणि धर्माच्या नावाखाली लुबाडणाऱ्या अन्य ढोंगी मंडळींचा या देशात नुसता सुळसुळाट झाला असून पोषाखात आणि वागण्यात विचित्रपणा दाखवून कोणालाही या देशात साधू-फकीर बनता येते. भटजी हा उपद्रव देणारा, तर साधू हा बांडगुळासारखा असतो.’ असे आपले मत त्यांनी मांडले होते. असोसिएशनच्या सभासदांसमोर त्यांचे ‘अश्लीलता व कायदा’ यावर भाषण झाले होते. काही काळ त्यांनी ‘रीझन’चे संपादक म्हणून काम केले. त्यांचे वाचन दांडगे व चिंतन सखोल होते. कुठलाही अभिनिवेश न बाळगता तर्कशुद्ध, मोजके, सडेतोड असे त्यांचे बोलणे असे. त्यामुळे वैचारिक क्षेत्रातील अनेक नामवंत त्यांच्याभोवती आदराने जमत. मुंबईतील ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’मध्ये ते जमत. ते शेवटपर्यंत सोसायटीचे सन्माननीय सदस्य होते. विचारस्वातंत्र्य व उच्चारस्वातंत्र्य यांचा पुरस्कार करणारी साहित्यिकांची जागतिक संस्था झएछ चे ते सभासद होते. ‘श्री. ऋषिची भुताटकी’ हा प्लॅचेंटच्या खुळासंबंधी लेख त्यांनी लिहिला. ‘आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी युरोप व अमेरिकेत भुतांचे निरोप मनुष्यास कळविले ते सर्व लुच्चे होते व ते लोकांस फसवत होते असे कोर्टात सिद्ध झाले आहे’ असे सांगून ते प्लँचेटवाले, अध्यात्म सांगणारे बुवा, ज्योतिषी, मांत्रिक ह्यांच्यावर तुटून पडत. श्रद्धेमुळे तारतम्य कसे नाहीसे होते, लोक कशावरही विश्वास ठेवू लागतात, त्यातून आभास निर्माण होतात हे ते सोदाहरण पटवून देत असत.
गांधीजींची ब्रह्मचर्याची कल्पना, संततिनियमनाच्या आधुनिक दृष्टिकोणास असलेला त्यांचा विरोध, त्यांचे उपोषण, दारूबंदीचा आग्रह ह्यावर र.धों.कर्त्यांनी कडाडून टीका केली. गांधीजींनी राजकारणात जी धार्मिक परिभाषा वापरली ती त्यांना पसंत नव्हती. त्यांच्या धार्मिक ढंगामुळे कित्येक लोकांची विचारशक्तीच नाहीशी झाली. ते वास्तविक कोणत्याही विषयांत तज्ज्ञ नसताना त्यांना सर्वच विषयात तज्ज्ञ समजण्याची कित्येकांना सवय लागली. उपोषणाचे आततायी तंत्र राजकारणात शिरून लोक त्याचा सर्रास दुरुपयोग करू लागले.’ असे त्यांनी लिहिले आहे. ते पुढे म्हणतात. ‘या देशाचे दुर्दैव आहे की विवेकाच्या आधारावर उभी केलेली कोणतीही चळवळ येथे यशस्वी होत नाही. दांभिक प्रदर्शन, पायी चालणे, लंगोटी नेसणे, केस वाढवणे, खाण्यापिण्याचे काही विलक्षण नियम पाळणे अशा युक्त्यांनी येथे व्यक्तित्त्व निर्माण होते. लेनिन, स्तालीन, किंवा माओ-त्से-तुंग यांना अशा युक्त्या कराव्या लागल्या नाहीत. परंतु त्यांनी जे काम केले, तसे हजारो ढोंग्यांच्या हातून होणार नाही. असे लोक लोकांची दिशाभूलच करतील, त्यांना विवेकभ्रष्ट करतील.’
‘डॉक्टर’ ह्या टोपणनावाने र.धों.कर्त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’च्या शेवटच्या चार अंकातून ‘अनैसर्गिक नव्हे निसर्गपूरक’ ही लेखमाला सादर केली. त्यानंतर १४ ऑक्टो.१९५३ ला ते मृत्यू पावले. या लेखमालेतून त्यांनी सममीलन-समलिंगी संभोग हा अनैसर्गिक, असभ्य व बेकायदेशीर न मानता त्याचे निरुपद्रवित्व, समाजोपकारत्व व निसर्गपूरकत्व लक्षात घेऊन त्यास समाजाने मान्यता द्यावी, निदान दुर्लक्ष करावे व कायद्याने त्याबद्दल शिक्षा देऊ नये असे मत १९५३ साली मांडले. त्याबाबत अश्लीलतेचा खटला भरण्याची तयारी मुंबई सरकारने तेव्हा केली होती. त्यांच्या मृत्यूमुळे खटल्याचा विचार मागे पडला. आज भारत सरकारने समलिंगींच्या हक्कासंबंधी बिल पारित केले आहे. ह्यातच ह्या महान सामाजिक कार्यकर्त्याचे द्रष्टेपण दिसून येते.
ह्या देशाचे करंटेपण असे की स्वातंत्र्योत्तरही ह्या क्षेत्रात सतत ३३ वर्षे काम करणाऱ्या ह्या तपस्व्याच्या कार्याची दखल तर घेतली गेली नाहीच परंतु त्यांच्या कामात अडथळे आणले गेले. देशाच्या कुटुंबनियोजनाच्या धोरणात योगदान देण्याची संधीही त्यांना नाकारण्यात आली. सार्वजनिक तसेच शालेय पातळीवरील लैंगिक शिक्षणाचा तर खेळखंडोबा झाला. एड्सचा भस्मासुर जागा झाल्यावरही ह्याबाबत धीट पाऊले उचलण्यास शासन कचरते आहे. संदर्भः उपेक्षित योगी – मधुसूदन गोखले, बेळगाव
उपेक्षित द्रष्टा – दिवाकर बापट, ठाणे र.धों.कर्वे – य. दि. फडके

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.