संपादकीय

बरेचदा विवेकवादी माणसाला जागोजाग पसलेल्या अंधश्रद्धेचा प्रश्न बिनमहत्त्वाचा वाटतो. याचे कारण अंधश्रद्धेचे मूळ भोळसरवृत्ती हे आहे. जगातल्या अंधश्रद्धा एके दिवशी संपल्या तरी भोळेपणा चालूच असल्याकारणाने नव्या अंधश्रद्धा निर्माण होतील. शिवाय जुन्या व नव्या अंधश्रद्धांमध्ये समाजहितास घातक असण्याच्या बाबतीत डावे उजवे करता येणार नाही. मग अंधश्रद्धांचा प्रश्न गैरमहत्त्वाचा ठरतो. अंधश्रद्धांचे मूळ बरेचदा भोळेपणात असले तरी त्यांचा प्रचार हा त्यातला नाही. अंधश्रद्धेचे प्रचारक, मग ते पारंपरिक अंधश्रद्धेचे असोत वा आधुनिक अंधश्रद्धेचे असोत, काही हेतू ठेवून हे काम करतात. खूपदा हा हेतू आपली पोळी भाजण्याचा असतो. अशा प्रचाराविरुद्ध आघाडी उघडणे हे म्हणून महत्त्वाचे ठरते. या अंकातील मजकूर विवेकवाद्यांना अशी आघाडी उघडण्यास मदत करेल असे वाटते.
नुकतेच अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार येथे राज्यस्तरीय विज्ञानप्रदर्शन आयोजित केले गेले होते. या प्रदर्शनातील पहिले बक्षीस एस.टी.धावत असताना त्यावर पवनचक्की फिरवून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रयोगाला मिळाले. अशी फुकटची ऊर्जा मिळत नसते हे विज्ञानाचे तत्त्व येथे साफ अमान्य केले होते. याच प्रदर्शनात गोमूत्रापासून बनवलेले व कर्करोगाचा प्रतिकार करणारे औषध ठेवले होते. (लोकसत्ता २८ फेब्रुवारी) याच वृत्तात ‘ब्रह्मांडीय शक्तीपासून निर्माण केलेल्या जैवऊर्जेचा…’ असा एक अंधश्रद्धपूर्ण वाटणारा प्रयोग दिलेला आहे. काही वर्षांपूर्वी आय.आय.टी.त तंत्रउत्सवात (टेकफेस्ट) दीपक राव यांचे मनःशक्तीचे प्रयोग, परामानसशास्त्राविषयीची भाषणे झाली होती. याच उत्सवात दोन वर्षांपूर्वी एक निर्माणवादी माणसाचे भाषण झाले होते. केवळ सुशिक्षितच नाही तर विज्ञानाचे शिक्षक, तंत्रज्ञानाचे विद्यार्थी आणि वैज्ञानिक हेही अंधश्रद्धेचे शिकार होताना दिसतात. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नावाजलेल्या ठिकाणांहून मिळालेली चुकीची माहिती. मिथ्याविज्ञान (pseudoscience) या प्रकारात अंधश्रद्धांना वैज्ञानिकतेचा आव आणला जातो. मिथ्यावैज्ञानिक विज्ञानाची भाषा बोलत अंधश्रद्धेचा प्रसार करीत राहतात. यामुळे विवेकी व्यक्तींची फसगत होताना बरेचदा दिसते. होमिओपॅथी, अॅक्युप्रेशर/पंक्चर, चुंबकचिकित्सा, संमोहन, निर्माणवादी (creationists जे उत्क्रांतीला खोटे ठरवू पाहत आहे.) असे कितीतरी प्रकार मिथ्याविज्ञानाची उदाहरणे म्हणून देता येतील.
पारंपरिक विज्ञान हा एक सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. त्यात ती आयुर्वेद वा योगासारखी आपली परंपरा असेल तर अजून जिव्हाळ्याची. पारंपरिक विज्ञानांनी आधुनिक विज्ञानाची पायाभरणी केली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ‘किमया’ (अल्केमी) ही एक त्यातीलच बाब. किमयाकारांनी लोखंडाचे सोने करण्याचे अथक प्रयत्न केले. त्यांतून आधुनिक रसायनशास्त्राला खूप माहिती मिळाली. ग्रहज्योतिषकारांनी भविष्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात कित्येक शतके अवकाशातल्या अचूक नोंदी ठेवल्या. याचा फायदा कोपर्निकसला झाला एवढेच नाहीतर अजूनही होतो. आयुर्वेद, युनानी, चिनी अशा अनेक पारंपरिक विज्ञानांतून आधुनिक वैद्यकशास्त्राने अनेक औषधे मिळविली. पारंपरिक विज्ञाने ही निश्चित उपयोगी आहेत पण ती सर्वथा स्वीकारार्ह नाहीत. पारंपरिक विज्ञाने ही उपयोगी असल्याने त्यांचे जतन केले पाहिजे पण त्यांचा अंगीकार जपून व तपासून केला पाहिजे. सरकारी पातळीवर अशी तमा न बाळगता कारभार होताना दिसतो. त्यामुळे अनेक आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वैद्य तयार होतात. हे तयार झालेले वैद्य बहुतांशी आपले परंपरागत विज्ञान न जपता आधुनिक वैद्यकशास्त्रात येतात. सरकार सूट देते म्हणून आयुर्वेदिक औषधांचा प्रचार प्रसार व्यावसायिक कंपन्या करतात. बरीचशी अशी औषधे मूळ आयुर्वेदात नसतात. हे सर्व पारंपरिक विज्ञाने जपण्याच्या उद्देशाखाली चालते. या अंकात जाहीर झालेल्या सर्वेक्षणातून असे लक्षात येते की आयुर्वेदाला संपूर्ण विज्ञान मानणारे जवळपास दोन तृतीयांश लोक आहेत. सुशिक्षित वर्गातदेखील हे प्रमाण जास्त आहे.
हा अंक जास्तीत जास्त माहितीपर व्हावा असे ठरवले होते. म्हणून अंधश्रद्धांची माहिती व त्याविरुद्ध लढलेल्यांची व लढणाऱ्यांची माहिती येथे जास्त सापडेल. अंधश्रद्धा नेमक्या कुठल्या, कुठल्या अंधश्रद्धांना अग्रक्रम द्यायचा असे वाद विवेकवाद्यांमध्ये नेहमीच दिसतात. या अंकातील काही लेखांमुळे हे वाद समोर आलेले दिसतील.
हा अंक तयार होण्यापूर्वी मनात जो आकृतिबंध होता तो या अंकामुळे पूर्ण साध्य झाला असे वाटत नाही. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल यात माहिती यायला हवी होती. शाहू महाराज, शंकरराव किर्लोस्कर, धर्मानंद कोसंबी इत्यादींचा परिचय यायला हवा होता. त्याचबरोबर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व श्याम मानव यांचा व्यवस्थित कार्यपरिचय करून देणे गरजेचे होते. विज्ञानवादी चळवळीतील लोकविज्ञान, मराठी विज्ञानपरिषद यांचे संस्थात्मक काम बरेच आहे. आजचा सुधारकचे हे एकविसावे वर्ष. महाराष्ट्रातील पूर्णतः विवेकवादी चळवळीचाही (अंनिस) काळ याहून थोडासाच जास्त आहे. या मासिकाने केलेली तात्त्विक पायाभरणी मोलाची आहे. त्याबाबतचा आढावा घेतला गेला नाही. हे सर्व मुद्दाम केले गेले नाही. प्रयत्न करूनही यातील काही लेख मिळाले नाहीत. नीरज साळुखे यांनी या विषयात विशेष संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आहे. जोहानस क्लॅक या युरोपियन संशोधकाने भारतीय विवेकवादी चळवळींवर आपला प्रबंध लिहिला आहे. या दोघांचे लेख या अंकात यायला हवे होते. नीरज साळुखे यांच्या प्रबंधावरचे पुस्तक सध्या प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्या वेळी ही कसर कदाचित भरून काढता येईल. अंधश्रद्धा हा एक विश्वकोशासारखा पसारा असलेला विषय आहे. त्यामुळे त्यातील सर्व बाबींना एकाच अंकात न्याय देणे शक्य नव्हते. या विभागातील विषयांची निवड म्हणून कोणाला अपुरी वाटेल, पण त्याला नाईलाज आहे. सामान्यांच्या अंधश्रद्धांवर कमी जागा ठेवली आहे. सर्वेक्षणाचा भाग मूळ आकृतिबंधात नव्हता. यातून तयार झालेली आकडेवारी ही बरीच उपयोगी ठरेल असे वाटते. महाराष्ट्रात व काही प्रमाणात भारतातही विवेकवादी विचारांची एक सशक्त परंपरा आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळींमुळे ही परंपरा जनसामान्यांपर्यंत पोचत आहे. या चळवळींना जसे कार्यकर्ते आणि साधनसामुग्रीचे पाठबळ लागते तसेच ते वैचारिक व माहितीपर पाठबळ लागते. भारतीय चळवळीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग जास्त प्रमाणात दिसतो. त्यामुळे जनसामान्यांपर्यंत ते जास्त पोचतात. याउलट प्रगत देशांत वैचारिक व माहितीपर पाठबळ खूप जास्त दिसते. विवेकवादी विचार अधिक बळकट बनवायचे असतील तर येथील चळवळीतल्या कार्यकर्त्यांना वैचारिक व माहितीपर पाठबळ देणे जरुरी आहे. राठीत स्केप्टिक्स डिक्शनरीसारखा समृद्ध कोश तयार व्हावा, अर्बन लिजेंड सारखे आधुनिक अफवांचा वेध घेणारे संस्थळ असावे, क्कॅकवॉचसारखे वैद्यकाच्या आसपास फिरणाऱ्या भोंदूंना गाठणारे उपक्रम असावेत असे वाटते.
संपादनाचे काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ. सर्वाधिक जाणवलेली गोष्ट म्हणजे हातीची सत्ता (कात्री चालवण्याची) उपभोगणे आनंददायी नाही. लेखकांनी याबाबत चांगले सहकार्य केले. त्यांनी फारसे वाईट वाटून घेतले नसावे अशी मी आशा करतो. संपादनाच्या सर्व कामात मोठ्या प्रमाणात प्रभा पुरोहित, सुहास शिंगारे, निखिल जोशी आणि उत्तरा सहस्रबुद्धे यांनी आपुलकीने सहभाग घेतला. याशिवाय सर्वेक्षणात दीपक राखुंडे, मिलिंद गायकवाड, प्रसाद ठाकुर, चेतन शिंदे, सलिल जोशी, मुकुंद देसाई आदींनी उत्साहाने सहभाग घेतला.