श्रद्धा आणि अंधश्रद्धा

अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या चळवळीमध्ये सगळी चळवळ या विषयाभोवती फिरत असते. आणि ज्या काही शिव्या आणि ओव्या आम्हांला चळवळीमध्ये मिळत असतात, त्याचा याच विषयाशी संबंध असतो. काही जणांना असे वाटते, आमचे काम अयोग्य आहे, अनिष्ट आहे, अरास्त आहे. काही जणांना असे वाटते की, हे काम झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपला देश २१ व्या शतकात पदार्पण करणार नाही. आणि काहीजणांना असे वाटते की, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली आम्ही देव, धर्म, परंपरा बुडवत आहोत. ते म्हणतात, ‘अंधश्रद्धा म्हणजे काय ? अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धेच्या निखाऱ्यावरची राख. राख उडवून लावली की आतला निखारा पुन्हा पूर्वीसारखा तेजस्वी होतो. त्याप्रमाणे अंधश्रद्धेची राख उडवून लावण्याची गरज आहे. पण त्याचवेळी राख उडवण्याच्या कृतीत तो निखाराच विझला जाणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
‘ श्रद्धेची सापेक्षता ’
हे असे घडते याचे कारण – एकाची श्रद्धा असते, ती दुसऱ्याची अंधश्रद्धा असते आणि तिसऱ्याची अंधश्रद्धा असते, ती चौथ्याची जीवन-मरणाची श्रद्धा असते, आणि म्हणूनच श्रद्धा आणि अंधश्रद्धा नीटपणे समजावून घ्याव्या लागतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा समजावून घेताना अडचण येते; कारण त्या कालसापेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष असतात. आपल्याला माहीत आहे की, काही वर्षांपूर्वी राजस्थान येथे देवराला या गावात पतीच्या निधनानंतर एक स्त्री सती गेली आणि संपूर्ण देशभर एकच गदारोळ उडाला. अशा प्रकारे सती जाण्याला बंदी करणारा कायदा यापूर्वीच होता. परंतु देशभरातील प्रक्षुब्ध लोकांची मागणी लक्षात घेऊन तो कायदा कडक करावा लागला. आता केवळ सती जाणे आणि सती जाण्याला मदत करणे एवढाच दखलपात्र गुन्हा नाही, तर अशा प्रकरणाचे उदात्तीकरण करण्यासाठी त्या प्रसंगी हजर राहणे हीदेखील गंभीर घटना मानण्यात आलेली आहे. याचे कारण आज आपण सगळेजण मान्य कराल की, सती जाणे ही निखालस अंधश्रद्धा आहे. पण मागच्या शतकामधील गोष्ट काय होती? ज्या वेळेला लॉर्ड बेंटिंकने सती जात असलेल्या एका स्त्रीला मोठ्या धैर्याने वाचवले, त्या वेळेला त्या काळच्या बनारसमध्ये लोकांचा मोठा मोर्चा निघाला होता, असे लॉर्ड बेंटिंक आपल्या डायरीत लिहितो. आणि त्या लोकांची मागणी एकच होती की, ‘सती जाण्यापासून या स्त्रीला रोखणारे तुम्ही कोण ? स्वतःच्या पतीच्या निधनानंतर सदेह सती जाणं हा आमच्या पवित्र धर्मश्रद्धेचा अधिकार आहे’. लॉर्ड बेंटिंकने ज्यावेळी सतीच्या विरोधाचा कायदा केला, त्यावेळेला शहाणे-सुरते शास्त्री-पंडित अलाहाबादच्या हायकोर्टामध्ये गेले की, ‘आमच्या पवित्र धर्मश्रद्धेमध्ये या पद्धतीने ढवळाढवळ करण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला नाही.’ ही झाली श्रद्धेची कालसापेक्षता. श्रद्धेची व्यक्तिसापेक्षता कशी असते यासाठी सत्यसाईबाबांचे उदाहरण घेऊ. सगळ्यांनी सत्यसाईबाबांचा फोटो बघितलेला आहे. सत्यसाईबाबा हे आजच्या जगातले महान बाबा, गुरु, महाराज, साधू असे त्यांच्या भक्तांकडून मानले जाते. सत्यसाईबाबांचे वैशिष्ट्य काय आहे ? ते हवेतून हात फिरवतात आणि तुम्हाला विभूती देतात. हवेमधून हात फिरवतात आणि तुम्हाला सोन्याची किंवा चांदीची अंगठी देतात., आणि हवेमधून हात फिरवून त्यांनी सोन्याचे लॉकेट किंवा रत्नाचे हारदेखील आपल्या शिष्यांना दिल्याच्या गोष्टी त्यांच्या अधिकृत पुस्तकात मौजूद आहेत. साईबाबांचे हे महान चमत्कार त्यांना या देशातील राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेकजणांचे श्रद्धास्थान बनवतात. याउलट हे चमत्कार इतर अनेकांना निव्वळ बनवाबनवी व अंधश्रद्धा वाढवणारे बुवाबाजीचे प्रकार वाटतात. ही झाली श्रद्धेची व्यक्तिसापेक्षता.
चिकित्सेतील अडचणी
श्रद्धेची चिकित्सा होत नाही याची प्रमुख कारणे तीन. एक शब्दप्रामाण्य, दोन ग्रंथप्रामाण्य, तीन व्यक्ती. व्यक्ती स्वतः श्रद्धेची चिकित्सा करत नाही आणि इतरांनी श्रद्धेची चिकित्सा केलेली तिला चालत नाही. शब्दप्रामाण्य याचा अर्थ असा की, व्यक्तीचा शब्द प्रमाण मानावयाचा, त्याची चिकित्सा करावयाची नाही. व्यक्तीने सांगितलेला शब्द हे अंतिम सत्य आहे; त्याबाबत तपासण्याची, चिकित्सा करण्याची गरजच नाही. अशी भूमिका अनेकदा घेतली जाते. त्यामुळे श्रद्धेची चिकित्सा होणे दुरापास्त होऊन बसते. इतर क्षेत्रांत सोडाच, परंतु विज्ञानाच्या क्षेत्रातदेखील हे झालेले आहे. गॅलिलिओने दुर्बीण शोधून काढली. त्या आधारे त्याने आपल्या अन्य सहकाऱ्यांना अशी विनंती केली की, या दुर्बिणीमधून तुम्ही बघा. आत्तापर्यंत आपल्याला माहीत नसलेल्या गुरु या ग्रहाचे आणखी तीन उपग्रह तुम्हाला दिसतील. त्यावेळी विद्यापीठात अॅरिस्टॉटलने सांगितलेल्या ज्ञानाच्या आधारे शिक्षण दिले जात असे आणि अॅरिस्टॉटलचे म्हणणे हा अंतिम शब्द मानला जात असे. अॅरिस्टॉटलने जे सांगून ठेवले नाही ते असणे शक्यच नाही, अशी त्याच्या शिष्यांची श्रद्धा होती. कारण अॅरिस्टॉटल हा प्रकांड पंडित होता. त्याचे वर्णन असे केले जात असे की, ‘कश ळी र रीिींशी ष रश्रश्र हे ज्ञपे’. अॅरिस्टॉटलवरील श्रद्धेच्यामुळे दुर्बिणीतून बघण्यास गॅलीलिओच्या सहकाऱ्यांनी त्याला नकार दिला. त्याला ते म्हणाले की, ‘तुला दिसणारे गुरूचे तीन उपग्रह हे उपग्रह नाहीतच. ते तुझ्या दुर्बिणीच्या काचेवरील तीन डाग आहेत. गॅलीलिओ म्हणाला, ‘मग काच पुसून घेऊ या’. ते म्हणाले की, ‘ती काच पुसून घेतल्यानंतरही जर तुला ते उपग्रह दिसत असतील, तर तुझ्या डोळ्यांच्यामध्ये काही बिघाड झाला असेल’. गॅलीलिओ म्हणाला, ‘मग तुम्ही तुमचे डोळे लावून बघा’. ते म्हणाले, ‘आम्हाला आमचे डोळे लावण्याची गरजच वाटत नाही. आमची आमच्या ज्ञानावर आणि गुरूच्या शब्दांवर पक्की श्रद्धा आहे. तुझ्या डोळ्यांत बिघाड झाला नसेल, तर मग कदाचित तो तुझ्या मेंदूत झाला असेल. शेवटी त्या सहकाऱ्यांनी दुर्बिणीमधून बघितलेच नाही. कारण त्यांनी अॅरिस्टॉटलचा शब्द प्रमाण मानला. हे झाले शब्दप्रामाण्य.
ग्रंथप्रामाण्य म्हणजे काय ? मी अलिकडे एकदा जालना येथे गेलो होतो. त्या जिल्ह्यातील साखर कारखान्यातील एक अधिकारी मला भेटावयास आला. तो म्हणाला, ‘मी तुमची पुस्तकं वाचलेली आहेत. मी तुमच्या मताचा आहे. परंतु माझे अन्य सहकारी मित्र मला असं विचारतात की, ज्ञानेश्वरांनी गाथेमध्ये असं लिहून ठेवलं आहे की, जो कोणी या गाथेचं पठण करील त्याचे अनेकविध फायदे होतीलच. परंतु त्याबरोबरच त्याची भूतबाधाही पळून जाईल. ज्या अर्थी ज्ञानेश्वरांनी भूतबाधा पळून जाण्याबद्दल लिहिलं त्याअर्थी भूतयोनी अस्तित्वात असेल, त्याची बाधा होत असणार हे सिद्धच होतं. ज्ञानेश्वर म्हणतात, भूत असतं. तू म्हणतोस, भूत नसतं. शहाणं कोण ? ज्ञानेश्वर की तुमचे दाभोलकर ? याचे उत्तर सरळच आहे की, ज्ञानेश्वरच. त्यामुळे भूत असते असा निष्कर्ष निघतो.’ लक्षात घ्या ज्ञानेश्वर हे फार मोठे कवी आणि तत्त्वज्ञ होते. पण म्हणून त्यांनी त्यांच्या पुस्तकात जे लिहून ठेवले ते ग्रंथप्रामाण्य तसेच्या तसे मानावयाची गरज नाही. यामुळे ज्ञानेश्वरांना कमीपणा येत नाही. काय घडते पहा. जत्रेमध्ये किंवा यात्रेमध्ये लोक इकडून तिकडे फिरत असतात. कोठेतरी एका ठिकाणी गारुड्याचा खेळ चाललेला असतो. बाजूला लोकांचं कोंडाळं असतं. भरपूर गर्दी झालेली असते. स्वतःच्या तीन-चार वर्षांच्या पोराला घेऊन जत्रेत फिरणारा बाप त्या कोंडाळ्याच्याजवळ थबकतो. टाचा वर करून आत काय आहे, हे बघण्याचा प्रयत्न करतो. त्याला जवळपास काहीच दिसत नाही. एवढ्यात ते पोर म्हणते, ‘बाबा, बाबा, तुम्ही मला उचलून खांद्यावर घ्या. बाप त्याला उचलतो, आपल्या खांद्यावर बसवतो. मग पोराला मधल्या वर्तुळातील सर्व काही दिसू लागते. तो बापाला सांगू लागतो. ‘इथं एक गारुडी आहे. तो पुंगी वाजवत आहे. त्याच्यासमोर नाग आहे. तो नाग डोलत आहे. आजूबाजूला अशा अशा गोष्टी आहेत.’ हे सारे ऐकल्यानंतर बाप पोराला असे म्हणत नाही की, ‘लेका, तू फक्त चार वर्षांचा आणि मी चौतीस वर्षांचा! मला जे कळत नाही, मला जे दिसत नाही; ते तुला समजतं काय ?’ खरे उत्तर हे आहे की, बापाला जे दिसत नाही ते पोराला दिसत आहे; कारण पोरगा बापाच्या खांद्यावर बसलेला आहे. त्यामुळे तेवढ्या संदर्भात पोरगा बापापेक्षा श्रेष्ठ होतो. सातशे वर्षांच्या विज्ञानाची शिडी करून मी आणि आपण सर्व ज्ञानेश्वरांच्या खांद्यावर बसलो आहोत. ज्ञानेश्वरांच्या काळी मग मनाचे आरोग्य, मनाचे आजार, भूतबाधा या कल्पना स्पष्ट नसणे स्वाभाविक होते. परंतु आता आपणाला माहीत आहे की, जगात भूत कुठेच नसते. ते तुमच्या आमच्या मनात असते. त्यामुळे या बाबतीत आपल्याला ज्ञानेश्वरांच्या गाथेचे प्रामाण्य मानण्याची गरज नाही. काही अंधश्रद्धा जातात, त्याची कारणे
परंतु तरीदेखील अनेक अंधश्रद्धा गळून पडलेल्या आपण बघतो. हे कशामुळे घडते? हे घडते याची काही कारणे आहेत. काही विशिष्ट स्वरूपाच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काही विशिष्ट स्वरूपाची परिस्थिती उपकारक ठरते. जसे – ज्या अंधश्रद्धा निखालसपणे आज्ञानावर आधारित आहेत, अश्या अंधश्रद्धा ज्ञानाच्या प्रकाशात वितळून जातात. एकवेळ अशी होती की हे माहीत नव्हते की एखाद्या व्यक्तीला ताप का येतो? व्यक्तीला ताप येई. तापाबरोबर तोंडावर फोड येत. काही दिवसांनी ताप जाई. तोंडावरचे फोडही जात. त्याच्या खपल्याही पडत. परंतु व्रण कायम राहात आणि तोंड हे ठोक्याच्या तपेल्यासारखे दिसे. म्हणून हा देवीचा कोप आहे, असे मानले जाऊन याला देवीचा रोग समजला जाऊ लागला. मग एक वेळ अशी आली की ज्यावेळेला देवीच्या लसीचा शोध लागला. लक्षात असे आले की, देवीचा जंतू हा फक्त माणसांच्याकडून माणसांच्याकडेच जाऊ शकतो. जगामध्ये जर एकही माणूस देवीच्या रोगाचा रोगी उरला नाही; तर जगातून देवी रोगाचे उच्चाटन होणे शक्य आहे. आज तसे झालेले आहे. ‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये, नव्हे, एक लाख रुपये मिळवा.’ असे जरी तुम्ही सांगितलेत, तरी आता तो रोगी मिळणार नाही, आणि देवीची लस टोचून घेण्याची गरजच राहिली नाही. म्हणजे ज्ञान आले, अज्ञान गेले. अज्ञानाच्या बरोबरची अंधश्रद्धा गेली. अंधश्रद्धेचा दुसरा प्रकार असतो अमानुष अंधश्रद्धांचा. ज्या अंधश्रद्धा मानुष नसतात, अमानुष असतात; त्या अस्तित्वात असतात, परंतु त्यांच्याबद्दल समाजमानसामध्ये एक घृणास्पदता, संताप आणि चीड असते. आपल्याला देवदासीच्या प्रथेबद्दल माहिती आहे. देवदासीच्या प्रथेमध्ये डोक्यात आलेली केसाची जट किंवा आईवडिलांनी केलेला नवस यासाठी तरण्या-ताठ्या मुलीचे लग्न देवाशी अथवा देवीशी लावले जाते. यामुळे काय होते? देवाशी लग्न ही कल्पना अनैसर्गिक असल्यामुळे प्रत्यक्षात ती मुलगी एक तर मुंबईच्या वेश्याबाजारात विकली जाते किंवा गावच्या टग्यांचं धन बनते. तिच्या सुखी संसाराच्या स्वप्नांची राखरांगोळी होते. या गोष्टी आजही चालू आहेत. परंतु याबद्दल जनमानसामध्ये एक संताप चळवळींमुळे जागृत झाला आहे. अश्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनमानसाचा पाठिंबा मिळवणे आवश्यक असते. याच प्रकारच्या आणखी काही अंधश्रद्धा म्हणजे अघोरी अंधश्रद्धा. काही ठिकाणी नवस फेडण्यासाठी अघोरी पद्धतींचा वापर केला जातो. काहीजण स्वतःला कपाळावर ब्लेडनं चिरा मारून घेतात. तर काहीजण पळत येऊन देवळाच्या दगडी भिंतीवर आपले डोके फाडकन आपटून घेतात. यामुळे स्वाभाविकपणेच त्रास होण्याची, जिवाला धोका होण्याची शक्यता असते. कुठल्याच धर्माने, संतांनी, देवांनी अशा स्वरूपाची उपासना सांगितलेली नाही. हा अघोरी प्रकार धर्माचरणाचा भाग नाही, हे लोकांना पटवणे तुलनेने सोपे जाते असा अनुभव आहे.
आणखी एका प्रकारच्या अंधश्रद्धा बाळगल्या जातात. गतिमान जीवन समाजामध्ये त्यांचे पालन करणे शक्य नसते. समाजामध्ये स्पृश्य आणि अस्पृश्य असे भेद पूर्वी होते आणि आजही आहेत. त्यामध्ये स्पर्शबंदी होती, रोटीबंदी होती, बेटीबंदी तर होतीच होती. आजही परिस्थिती काय आहे? आज स्पर्श आणि रोटीबंदी जवळपास गळून पडल्या आहेत. समाजसुधारकांचे प्रयत्न याला कारणीभूत आहेत. परंतु त्याबरोबरच गतिमान समाजव्यवस्थेने यासाठी हातभार लावला आहे. तुम्ही एकदा बसच्या किंवा रेल्वेच्या गर्दीत घुसलात की, तुम्हाला कुणाचा स्पर्श होतो आणि ती व्यक्ती कोण आहे हे कळण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे स्पर्शबंदी अर्थहीन आहे. तुम्ही एकदा हॉटेलात गेला की, तुम्हाला ज्या कपातून चहा दिला त्या कपामध्ये आधी कोण चहा प्याला आहे याची तुम्हाला माहिती कळणे शक्य नाही यामुळे रोटीबंदी पाळणे शक्य होत नाही. माणसे रोटीबंदी आणि स्पर्शबंदी पाळत नाहीत, कारण त्यांनी मनातून जात ही एक अत्यंत जहरी अंधश्रद्धा सोडून दिली आहे, असे मात्र नाही. स्वतःच्या, मुलांच्या लग्नामध्ये मात्र जात आवर्जून पाहिली जाते. कारण त्या ठिकाणी ती स्पष्ट असते, ती पाळणे शक्य असते. मासिक पाळीमध्ये स्त्री आजही स्वतःला अपवित्र मानते. परंतु पूर्वीच्या काळी मासिक पाळीत स्त्री पाच दिवस घरामध्ये एका बाजूला कोपऱ्यात बसत असे. आज कोणत्याही नोकरीच्या ठिकाणी मासिक पाळीची म्हणून महिन्याला पाच दिवसांची रजा दिली जात नाही. त्यामुळे मासिक पाळीत स्त्री अस्पर्श आहे ही कल्पना दूर होण्यास मदत होते.
समाजसुधारक ज्यासाठी प्रयत्न करतात, त्या अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होते. याचे कारण आपल्याला हा एक चांगला वारसा मिळालेला असतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुणे शहरामध्ये अनेक स्त्रिया तांबडी अलवणी नेसलेल्या आणि डोक्याचे केशवपन केलेल्या दिसत. त्या अभागी विधवा होत्या, ज्यांनी केशवपन करणं हा त्या काळचा धर्मसंस्काराचा, धर्मश्रद्धेचा भाग होता. अलिकडे अशी घटना महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात घडली की, एका स्त्रीने पतीच्या निधनानंतर स्वतःचे केशवपन करण्याची इच्छा प्रगट केली. आता तसा विचार केला, तर स्वतःचे केस हा व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. कोणीही पुरुष स्वतःचे केस का काढतो! काही वेळेला तिरुपतीला जाऊन आला आणि देवाला केस दिले म्हणून काढतो? काही वेळेला सिनेमातल्या हिरोचे अनुकरण करण्यासाठी तुळतुळीत चमनगोटा करतो आणि काही वेळेला घरामध्ये घडलेल्या अप्रिय घटनेमुळे धार्मिक कृत्याचा भाग म्हणून तो स्वतःचे केस काढतो. केस स्वतःचे असतात. त्यामुळे ते केव्हा काढायचे हा अधिकार त्या व्यक्तीचा असतो. याच पद्धतीने ती सुशिक्षित विधवा स्त्री म्हणाली, ‘माझ्या पतीच्या निधनानंतर मी माझा विपुल केशसंभार सांभाळू इच्छित नाही. मी केशवपन करणार!’ एका बाजूने विचार केला, तर तिचे केस हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग होता. तरीही तिला सर्वांनी हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, ‘बाई ग, तू केशवपन करू नकोस. पतीच्या निधनानंतर स्त्रीच्या जीवनाला अर्थ नाही, तिच्या सौंदर्याला अर्थ नाही, तिने विद्रूप दिसणे अधिक चांगले, या सर्व कल्पना पतीच्या निधनानंतर स्त्रीचे केशवपन करण्याच्या मागे होत्या. या सर्व केवळ अंधश्रद्धाच नव्हत्या, तर स्त्रीवर लादलेली गुलामगिरी होती. पतीच्या निधनानंतर केशवपन करण्याचे स्त्रीने बंद केले याचा अर्थ या अंधश्रद्धेच्या गुलामगिरीतून तिने स्वतःची सुटका करण्याचे एक पाऊल पुढे टाकले. परंतु जर व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने पुन्हा हे सुरू झाले, तर याचा अर्थ महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणेचा प्रश्न ५० वर्षे मागे नेल्यासारखा होईल. तेव्हा तू केशवपन करू नकोस.’ ही विनंती तिला करण्यात आली आणि तिने ती मान्य केली. तेव्हा अज्ञानावर आधारित असलेल्या अंधश्रद्धा, अमानुष आणि अघोरी अंधश्रद्धा, गतिमान समाजजीवनाशी विसंगत असणाऱ्या अंधश्रद्धा, समाजसुधारकांनी प्रयत्न केलेल्या आणि त्यामुळे गळून गेलेल्या अंधश्रद्धा या अंधश्रद्धा आज जात आहेत, जाण्यास अनुकूलता निर्माण होत आहे. परंतु तरीही अंधश्रद्धेचे एक मोठे क्षेत्र आज शिल्लक आहे. ते शिल्लक असण्याचे कारण आपणास बघावयाचे आहे आणि त्याबरोबरच श्रद्धेचे स्वरूप अधिक खोलात समजावून घ्यायचे आहे. अंधश्रद्धा – आधार घेणे, आहारी जाणे
आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा या संदर्भातील आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याचा आपण विचार करू. हा मुद्दा असा आहे की, अंधश्रद्धांचे निर्मूलन हे पूर्णतः आणि सर्वांच्या बाबतीत शक्य आहे का? या बाबतीमध्ये विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की माणसे अंधश्रद्ध का होतात? या संदर्भात आमच्या संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर म्हणाले होते की, ‘तुम्हाला असे वाटत नाही का की, माणसं अंधश्रद्ध असतात; कारण अंधश्रद्ध असणं ही त्यांची गरज असते?’ याचा अर्थ आपण नीट समजावून घेतला पाहिजे. माणसाना जेव्हा अनपेक्षितरीत्या मोठा आघात सोसावा लागतो, त्यावेळेला त्या आघातांनी आपले स्वतःचे व्यक्तिमत्त्व उद्ध्वस्त होऊ नये म्हणून माणसे अंधश्रद्धेचा आधार घेतात. हा आघात कधी जमत आलेले मुलीचे लग्न मोडण्याचा असतो, हाता-तोंडाशी आलेली मुलाची नोकरी जाण्याचा असतो, घरामधल्या एखाद्या पुरुषाला मोठा अपघात होण्याचा असतो किंवा याच स्वरूपाचे इतर काही असू शकतात. आपण एक उदाहरण घेतले, तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. माणसाचे व्यक्तिमत्त्व चांगले असते आणि एखादी बजाजची स्कूटर चांगली असते. माणसाचे व्यक्तिमत्त्व चांगले असते, याचा अर्थ त्याला आईवडिलांकडून मिळालेली आनुवंशिकता आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाची आजूबाजूच्या वातावरणात झालेली घडण ही योग्य असते. बजाजची स्कूटर चांगली असते, याचा अर्थ बजाजच्या स्कूटरचे भाग आणि त्यांची जुळणी योग्य असते. पण बजाजची स्कूटर चांगली असली, तरी तिला शॉक अॅबसॉर्बर बसवलेला असतो. कारण स्कूटर चांगली असली तरी रस्ता चांगला नसतो, रस्त्यावर खाचखळगे असतात आणि रस्त्यावरच्या त्या खाचखळग्यांमुळे स्कूटरला कमी धक्का बसावा आणि स्कूटरला बसला तरी चालेल, सीटवर बसलेल्या आपल्याला कमी धक्का बसावा, यासाठी वाहनाला शॉक अॅब्सॉर्बर असतात. जीवनाच्या ज्या रस्त्यावरून आपण जातो, त्याच्यावरही अपेक्षाभंगाचे असे अनेक लहान-मोठे खड्डे असतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे वाहन या अपेक्षाभंगाच्या खड्डयांच्या मध्ये मोडून पडू नये, धक्का सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये यावी म्हणून अंधश्रद्धांचे शॉक अॅब्सॉर्बर आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाला बसवतो. ही गोष्ट योग्य नाही, पण क्षम्य आहे. माणसे समजून घेण्याचा हा प्रश्न आहे. श्रद्धेचे चार निकष श्रद्धेच्या बाबतीमध्ये चार निकष लावावयाचे, ते कोणते ? पहिला निकष हा सत्याचा म्हणजे तपासण्याचा. ज्या श्रद्धेला सत्याच्या आधारे प्रश्न विचारलेला चालत नाही, ती श्रद्धाही अंधश्रद्धाच असते. म्हणजे? बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी फार छान म्हटलेले आहे —
“तुम्हाला जर एक पिवळा चकचकीत तुकडा मिळाला तर तुम्ही आनंदाने अशा उड्या मारू लागता का की, मला सोनं मिळालं ? तुम्ही असं म्हणता की, हा पिवळा तुकडा आगीमध्ये टाकून जर ते सोनं असेल, तर ते उजळून निघेल; पितळ असेल तर वितळून जाईल. तुम्ही जो निर्णय एखाद्या पितळेच्या धातूच्या तुकड्याबद्दल घेता, तो निर्णय स्वतःच्या जीवनामध्ये तुम्ही ज्याच्या आधारे जीवनाची उभारणी करणार त्या मूल्यांबद्दल का घेत नाही? त्या मूल्यांबद्द्ल तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. याचा अर्थ असा की, सत्याच्या आधारे तुमच्या श्रद्धेची अग्निपरीक्षाही तुम्ही केली पाहिजे. दुसरा निकष म्हणजे आपल्यापेक्षा वेगळ्या श्रद्धा असणारे लोक समाजात असणार. त्याच्यामुळे जोपर्यंत लोक सर्व प्रकारचे औचित्याचे बंध पाळून वेगळ्या श्रद्धांचा प्रसार करतात तोपर्यंत त्यांना परवानगी दिली पाहिजे. आपल्यापेक्षा वेगळ्या श्रद्धांचा प्रसार करण्याची, प्रचार करण्याची, संघटित करण्याची आणि त्याद्वारे लोकांना आपल्या बाजूचे बनवण्याची परवानगी देणे हे दुसऱ्याच्या श्रद्धेच्या आदराशी संबंधित आहे, सहिष्णुतेशी संबंधित आहे आणि जीवनातल्या अहिंसेच्या मूलभूत नियमांशी संबंधित आहे. म्हणजे ‘माझी श्रद्धा हीच सत्य आहे. आणि माझ्यापेक्षा वेगळ्या श्रद्धा बाळगणाऱ्याला येथे अजिबात स्थान नाही’, असं म्हणणं ही मोठीच अंधश्रद्धा आहे. म्हणून श्रद्धेची पहिली कसोटी ही सत्याची आहे, तर श्रद्धेची दुसरी कसोटी ही अहिंसेची आहे. श्रद्धेची तिसरी कसोटी काय आहे ? श्रद्धेची तिसरी कसोटी म्हणजे श्रद्धा ही कृतिशील असते. कृतिशील असते याचा निकष असा – भीती आणि मोह या माणसाला दुर्बल करणाऱ्या दोन प्रबळ प्रेरणा असतात, माणसे स्वतःच्या निर्णयामध्ये भीती आणि मोह यांच्यामुळे खूप मोठे बदल घडवतात. तुमची तुमच्या धर्मावर श्रद्धा आहे; पण तुम्हाला असं विचारलं की, ‘काय रे, लेका वीस लाख रुपये देतो कॅश. धर्म बदलतोस का?’ तर ही शक्यता आहे की आजूबाजूला कोणी ऐकत नाही हे बघून तुम्ही विचाराल, ‘नक्की वीस लाख रुपये देणार ना? मग धर्माचं काय करायचं ते तुमच्या इच्छेप्रमाणं करू’. किंवा जर कोणी उद्या तुमच्या किंवा तुमच्या मुलाबाळांच्या मानेवर तलवार ठेवली आणि सांगितले, ‘धर्म बदललात, तर ठीक; नाही तर तुमचं मुंडकं उडवतो’. तरी तुम्ही असा विचार कराल की, ‘पहिल्यांदा जीव जगला; तर पुढचं सगळं.’ ‘शिर सलामत तो पगडी पचास’. आणि आणि मग स्वाभाविकपणे तुम्ही म्हणाल की, ‘जान बची लाखो पाये, तू म्हणतोस तसं करू’. आणि मग मनातल्या म्हणाल, सवडीसवडीनं पुन्हा जमेल, त्यावेळी पुन्हा धर्म बदलू.’ याला तुम्ही शहाणपणाचा विचार म्हणू शकाल; परंतु श्रद्धावान विचार म्हणू शकणार नाही. आणि चौथी कसोटी म्हणजे श्रद्धा माणसाचा मूल्यविवेक उन्नत करते. अंधश्रद्धा माणसाचा मूल्यविवेक अवनत करते. मी ज्यावेळेला एखादी गोष्ट श्रद्धापूर्वक स्वीकारतो, त्यावेळेला त्याबरोबर येणारा मूल्यात्मक आशय मला मान्य करावा लागतो. मी जर असं मानत असेन की, प्रभुरामचंद्र हे माझे श्रद्धास्थान आहे; तर प्रभुरामचंद्रांचा मूल्यात्मक आशय – ते सत्यवचनी होते आणि एकपत्नीव्रती होते, हा आहे. एका बाजूला प्रभुरामचंद्रांच्याबद्दल जे बोलतात ती माणसं स्वतःच्या व्यवहारामध्ये या गोष्टींबाबत खबरदारी घेतात की नाही आणि आग्रह धरतात की नाही, हे बघण्यासारखं आहे. यांपैकी सत्यवचनीपणाबद्दल या देशामध्ये न बोललेलं बरं अशी स्थिती आहे. म्हणजे ‘सत्यमेव जयते’ हे आपलं वाक्य आहे अशोक स्तंभावर लिहिलेलं. आणि ‘असत्यमेव जयते’ हा आपला अनुभव आहे. आणि ‘असत्यमेव जयते’ यासाठी आपल्याला कुठंच रामाची अडचण येत नाही.”
त्याहीपेक्षा सोपे उदाहरण आपण घेऊ. राम हा त्या काळामध्ये एकपत्नीव्रती होता. आज तर एकपत्नीव्रताचा कायदा आहे. परंतु ज्यावेळेला रामजन्मभूमीचा लढा उभा राहिला त्याच वेळेला एक विदारक वास्तव महाराष्ट्रासमोर आले की, महाराष्ट्रामध्ये सहा लाख परित्यक्ता स्त्रिया आहेत की ज्यांना नवऱ्यांनी कारण नसताना टाकून दिलेले आहे आणि ज्यांचे संसार वाऱ्यावर आलेले आहेत. या सहा लाख परित्यक्ता स्त्रियांचे जिणे, त्याचे जगणे, त्यांचे समाजात असणे हे प्रभुरामचंद्रांच्या मूल्यांच्या श्रद्धेच्या आदर्शाशी सुसंगत आहे की विसंगत आहे ? हे जर विसंगत असेल; तर जे रामचंद्रांच्या श्रद्धेची बात करतात, त्यांनी या विषयावर पोटतिडकीने बोलायला पाहिजे. परंतु मंडळी या विषयाबाबत मूग गिळून बसतात. त्यावेळेला राम हा मताचा विषय होतो. मूल्याचा होत नाही. त्याच्यामुळे आपण ज्याला ‘श्रद्धा’ हा शब्द वापरतो, काहीजण त्याला ‘निष्ठा’ हा शब्द वापरतात. काहीजण त्याला ‘डोळस’ हा शब्द वापरतात; शब्द कुठला वापरता याला महत्त्व नाही – परंतु ‘तुमच्या श्रद्धेची चिकित्सा तुम्ही करता की नाही? तुमच्या श्रद्धेच्यापेक्षा वेगळ्या श्रद्धेच्या बाबतीत सहिष्णु आणि अहिंसक तुम्ही वागता की नाही? तुमची श्रद्धा तुम्हाला कृतिशील करते की अवनत करते?’ याच्यावर तुम्ही ज्याला स्वतची श्रद्धा म्हणता, ती तपासून घेता येते. हा तपासण्याचा आग्रह एकूणच मानवी जीवन पुढे नेतो. म्हणून आम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा अंधश्रद्धा-निर्मूलन चळवळीचा वैचारिक चर्चेचा विषय बनवतो.
[श्रद्धा अंधश्रद्धा या पुस्तकातून ]