अंधश्रद्धाः काही संकल्पना

आपण अंधश्रद्ध आहोत हे जवळपास कोणीच पटकन म्हणणार नाही. जरा खोलवर विचार केल्यावर कदाचित एक दोन बाबी मान्य केल्या जातील पण त्या तेवढ्याच. सर्वसाधारण अंधश्रद्धा म्हणजे दुसऱ्या कुणाची विचित्र समजूत असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. या सापेक्ष व्याख्येचा एक फायदा म्हणजे अंधश्रद्धेविरुद्ध सर्वांचे एकमत होऊ शकते! कारण दुसऱ्यांची अंधश्रद्धा दूर करणे हे प्रत्येकाचे स्वाभाविक कर्तव्य असते.
अंधश्रद्धा शब्द उच्चारला की साहजिकपणे मंत्र-तंत्र, शकुन-अपशकुन, फलज्योतिष्य, नवससायास, व्रतवैकल्ये अशा गोष्टी डोळ्यांसमोर येतात. या सर्वांना अंधश्रद्धा न म्हणता चिपळूणकरांनी ‘लोकभ्रम’ असा शब्दप्रयोग केला. अंधश्रद्धा असली तर डोळस श्रद्धा कुठली? असा प्रश्न या नावात पडत नाही. त्यामुळे हा शब्दप्रयोग जास्त चपखल वाटतो. अंधश्रद्धा शब्दाची व्याप्ती या लोकभ्रमापेक्षा जास्त आहे. ही व्याप्ती सांगणारा दुसरा शब्द नसल्याने श्रद्धा शब्दाशी घोटाळा करणारा अंधश्रद्धा हा शब्दच येथे वापरला आहे. पण त्याच्या अर्थाच्या छटा अंध+श्रद्धा यापेक्षा वेगळ्या आहेत. देव, पुनर्जन्म, आत्मा, स्वर्ग/नरक अश्या म्हणजे लौकिकार्थाने श्रद्धा मानल्या जाणाऱ्या संकल्पना अंधश्रद्धाच मानल्या जाव्यात असा काहींचा आग्रह असतो. विवेकवादाची ही भूमिका बहतेक तत्त्ववेत्त्यांनी ज्यात रसेल, दि.य.देशपांडे व हल्लीचे रिचर्ड डॉकिन्स आहेत त्यांनी आग्रहपूर्वक मांडलेली दिसते. दुसऱ्या बाजूला आत्मा, पुनर्जन्म, योगसाधना इत्यादी बाबींकडे सहानुभूतिपूर्वक पाहणारे वसंत पळशीकर ‘विज्ञान या गोष्टींबरोबर त्यांची (विवेकवाद्यांची) श्रद्धा – हो ती श्रद्धाच आहे – ही आंधळी आहे.’ असे म्हणतात. तर परामानसशास्त्राकडे सहानुभूतिपूर्वक पाहणारे डॉ. विजय बेडेकर यांच्या मते ज्या गोष्टींविरुद्ध निर्णायक पुरावा मिळाला नाही त्या सर्वांना अंधश्रद्धा मानू नये. या वेगवेगळ्या संकल्पनात अंधश्रद्धांची व्याप्ती कमी वा जास्ती होताना दिसते.
अंधश्रद्धा म्हणजे पुरावा नसताना धरलेला विश्वास अशी ढोबळ व्याख्या केली जाते. पण ही व्याख्या पुरेशी नाही. पुरावा नसताना आपण सर्वजण गफलतीने काहीतरी मानत असतो. चूक समजल्यावर आपण मग सुधारून घेतो. अशाला आपण गैरसमजूत होती असे म्हणतो पण अंधश्रद्धा होती असे म्हणत नाही. गैरसमजूत व अंधश्रद्धा यात भेदभाव करायचा ठरवला तर गैरसमजूत ही विरुद्ध पुरावा मिळाल्यावर संपते तर अंधश्रद्धेचे तसे होत नाही. विरुद्ध पुरावा मिळाला तरी त्याकडे कानाडोळा करणे वा त्यास खोटा ठरवणे हे एक अंधश्रद्धेचे लक्षण आहे.
अंधश्रद्धेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे भीती. आपल्या एखाद्या समजुतीला पुरावा नसेल आणि शिवाय त्यासंबंधी भीती असेल तर त्यास अंधश्रद्धा म्हणता येईल. शकुन-अपशकुन, कोप, नवस, भूतप्रेत, भविष्यकथन वगैरे गोष्टी या व्याख्येत चपखलपणे बसतात. विज्ञान बदलते असते. यातील संकल्पना आज एक आणि उद्या एक अश्या होऊ शकतात. पण सहसा या बदलत्या संकल्पना भीतिकारक नसतात. एकेकाळी अशी समजूत होती की रॉकेट हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापार (शीलरशि शिश्रेलळीं पेक्षा जास्त वेगाने) कधीच जाऊ शकणार नाही. वेळेनुसार ही संकल्पना बदलली पण त्यात भीतीचा सहभाग नव्हता.
आजच्या सुधारक मध्ये सुरुवातीच्या अंकात दिवाकर मोहनींनी श्रद्धांची चिलखते हा शब्दप्रयोग केला होता. माझी अमुक गोष्टीवर श्रद्धा आहे असे म्हणणे म्हणजे मी आता काही ऐकून घेणार नाही असा होतो. उदा. ‘रामाचा जन्म अयोध्येत रामजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी झाला होता अशी माझी श्रद्धा आहे.’ अशी श्रद्धेची चिलखते वाद टाळण्यासाठी वा पुरावा ऐकून न घेण्यासाठी उपयोगी ठरतो.
काही श्रद्धांची निर्मिती अंधश्रद्धेची भीती काढण्यासाठी होते. म्हणजे भूत लागू नये म्हणून कुठलेसे स्तोत्र वा मंत्र म्हणायचा, किंवा ब्रह्मगाठ, वा क्रुस दाखवायचा असे सर्व प्रकार. आता या स्तोत्र मंत्रादी प्रकारात भीती नसते तर आश्वस्तपणा असतो. अंधश्रद्धांची भीती घालवणारे ते एक कवच असते. श्रद्धेच्या चिलखताचा हा एक वेगळा अर्थ. या सर्वांना काही जण श्रद्धा असे म्हणतात. थोडक्यात भीतियुक्त समजूत (गैर) म्हणजे अंधश्रद्धा तर निर्भय समजूत (ही ही गैरच) ती श्रद्धा असे म्हणता येईल. भीती हा अंधश्रद्धेचा महत्त्वाचा गुण असल्याने भीतीचे निराकरण करणे जरुरी असते. त्याचे दोन लौकिक उपाय आहेत. एकात विवेकवादी विचार अंगीकारावे लागतात. तर दुसऱ्यात भीती घालवायला श्रद्धेचा अंगीकार करायला लागतो. या दुसऱ्या मार्गाची लोकप्रियता जास्त आहे. यामुळे कित्येकांना श्रद्धा ही आधारासारखी वाटते. आणि ती संपली तर पुढे काय असे वाटत राहते. श्रद्धाप्रचारक, यांत बहुसंख्येने धर्ममतप्रचारक सामील आहेत, आपल्या मतांचा प्रचार करण्यासाठी या भीती निराकरण तत्त्वज्ञानाचा आधार सगळ्यात जास्त घेताना दिसतात. आणि वरकरणी ही अंधश्रद्धेवर मात असली तरी या प्रचारात अंधश्रद्धेला खोटे ठरवून चालत नाही. कारण तसे झाले तर त्यांच्या उपायाला किंमत राहणार नाही. म्हणून अंधश्रद्धेची वाढीव भीती दाखवत श्रद्धेचा वाढीव उपचार करायचा असे यांचे स्वरूप असते. अंधश्रद्धेचे विवेकवादी निराकरण म्हणून अशा लोकांना पसंत नसते. त्यांच्या मते काळी जादू, नजर लागणे (या जवळपास कुठल्याच धर्ममतात समाविष्ट नाहीत) वगैरे गोष्टी अंधश्रद्धा असतात पण त्यांचे निराकरण विवेकवादी रूपाने न होता कुठल्या मंत्राने होणे चांगले. कारण या श्रद्धांच्या चिलखतांचा बाजार बराच मोठा असतो. या मानाने स्वर्ग/मोक्ष इत्यादि पारलौकिक बाबी श्रद्धेच्या प्रचारासाठी फार मोठ्या कामात येत नाहीत असे दिसते. पारलौकिक बाबतीत (देव, स्वर्ग/नरक, आत्मा इत्यादि) कुठलाच पुरावा मिळण्याची शक्यता नसते. तेव्हा पारलौकिक बाबींसाठी श्रद्धा शब्द वापरता येतो ही व्याख्यादेखील बरीच चपखल आहे. तर परामानसशास्त्र, नवस, फलज्योतिष , भूत लागणे या सर्व ऐहिक बाबतीत पुरावा मिळू शकतो. पण शोधूनही तो सापडत नाही म्हणून त्यांना अंधश्रद्धा म्हणता येईल. ही व्याख्या चिपळूणकरांच्या लोकभ्रम संकल्पनेला जवळची आहे.
अंधश्रद्धा-निर्मूलन करणारे कार्यकर्ते याबाबतीत पॅक्टिकल भूमिका घेताना दिसतात. साहजिकपणे ज्या बाबी विघातक आहेत, पिळवणूक करणाऱ्या आहेत, फसवणूक करणाऱ्या आहेत, जास्त पसरल्या आहेत किंवा ज्यांचे निराकरण जास्त सहज आहे अशा बाबींना ते प्राधान्य देतात. याचा अर्थ इतर बाबींना ते कमी लेखतात असे नाही. प्रस्थापित धर्मविरोधी (जसे सध्याचे शिवधर्मप्रणेते वा मार्क्सवादी) चळवळीतील कार्यकर्त्यांवर पुरेसे धर्मविरोधी नसल्याचा आरोप करतात. अशांचा रोख व साध्य हे विवेकवादी चळवळीच्या बाहेरचे असल्याने देखील साहजिकच आहे. चळवळीतील कार्यकर्ते असंघटित धर्माच्या (वैदू-भगत) विरुद्ध जितक्या परखडतेने बोलतात तितक्या परखडपणे संघटित धर्मप्रकाराविरुद्ध बोलत नाहीत. संघटित आरोग्यविषयक बाबतीतही हीच भूमिका ते बाळगतात. सहसा ते आयुर्वेद, होमिओपॅथी या प्रणालींविरुद्ध प्रचार करत नाहीत.
जगातील इतर चळवळींची भूमिका यापेक्षा थोडी वेगळी दिसते. त्यांच्या मते संघटित व असंघटित धर्मप्रकार एकासारखे एक आहेत. सरकारी पातळीवर (यात सरकार अनुदानित शिक्षण धरले जाते) कुठल्याही धर्माच्या आधारे वा त्याच्या प्रचारार्थ निर्णय घेतला जाणार नाही याकडे त्यांचे लक्ष असते. आयुर्वेद, होमिओपॅथीसारख्या प्रकारांना सरकारी आश्रय वा मान्यता मिळू नये यासाठी ते प्रयत्नशील असतात. अंधश्रद्धेविरुद्ध वैचारिक प्रचार, अभ्यास, संग्रह याबाबतीत ते येथील चळवळींपेक्षा खूप पुढे दिसतात. तर भारतातील चळवळी ह्या जनमानसाकडे जाणाऱ्या आढळतात.
अर्थात या चळवळींची भूमिका व अंधश्रद्धेच्या संकल्पना यात फारशी गल्लत करू नये. चळवळी या साहजिकरीत्या परिस्थितीनुरूप वा कामानुरूप अंधश्रद्धेच्या व्याप्तीचा संकोच वा प्रसरण करत असतात.