भाग दोनः विवरणात्मक मंत्र, मांत्रिक व चमत्कारः

[प्रा. मच्छिन्द्र मुंडे (जन्म १९५८) अंधश्रद्धा-निर्मूलनाचे काम करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. दोन हजाराच्या आसपास व्याख्याने, प्रात्यक्षिके, सहा पुस्तकांचे लेखन, भोंदूबाबांची हातचलाखी ओळखण्यात हातखंडा व त्यामुळे पर्दाफाश करणे, भरपूर संघटनात्मक कार्य अशी त्यांची थोडक्यात ओळख आहे.] तुम्ही विवेकी कसे बनलात?
माझे लहानपण खेड्यात व घरच्या वारकरी वातावरणात गेले. डोंबिवलीजवळचे आगासन हे माझे गाव. माझ्या गावात सातवीपर्यंत शाळा होती. हायस्कूल डोंबिवलीत आणि नंतरचे शिक्षण मुंबईत झाले. मी सातवीत असताना (१९७२ साली) आमच्या गावच्या शाळेत संपतराव कदम गुरुजी हे विवेकी विचाराचे शिक्षक तेथे बदलून आले. आम्हाला शिकवताना ते एकदा म्हणाले की देव नसतो तसे भूतही नसते. आमच्या वर्गातील एका मुलाने हे घरी सांगितले. मग त्याचे आजोबा रागवायला/भांडायला शाळेत आले. गुरुजींनी त्यांच्याशी चर्चा केली आणि यात एक आव्हान घेतले. गावचा वेताळ (गावाबाहेर एका दगडाला शेंदूर लावला होता.) कोपिष्ट म्हणून प्रसिद्ध होता.त्या वेताळाला अमावस्येच्या रात्री १२ वाजता भेट द्यायची असे ते आह्वान होते. त्यावेळी आमची पी.एस.सी.ची परीक्षा असल्यामुळे आम्ही काही मुले शाळेत राहून अभ्यास करीत असू. आमच्यासमोरच गुरुजी काठी व कंदील घेऊन निघाले व परतले. तिथे जाऊन खूण म्हणून लघवी करून आले. गुरुजींवर आता हे बेतणार अशी हवा त्यावेळी गावात होती, पण काहीच झाले नाही. इथून माझा विवेकाचा प्रवास सुरू झाला. तुम्ही चळवळे कधी झालात ?
गुरुजींचा सहायक म्हणून मी एका बळी जाणाऱ्या डुकराचे दावे गुपचुप कापले. वेळेवर डुक्कर नाहीसा झाल्याने बळी जाणे टळले. ही माझी चळवळीची सुरुवात म्हणता येईल. त्यानंतरही कोप होण्याच्या भीतीखाली गाव होते, पण काहीच झाले नाही. मी पुढे डोंबिवलीत शाळेत गेलो. तिथले काही शिक्षक याच विचाराचे होते. माझे काही मित्र कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. मी त्यावेळी डोंबिवलीत स्वतंत्र खोलीत राहायचो, त्यामुळे त्यांच्यासाठी आयतेच ते बैठकस्थान झाले. बी. प्रेमानंदांचा महाराष्ट्र दौरा माझ्या कानावर/वाचनात आला. आपणही चमत्कार करून दाखवू असे वाटू लागले. अकरावीत असताना मी अशी प्रात्यक्षिके करू लागलो. राजकारण करण्यापेक्षा लोकशिक्षण करून समाजात जास्त काळ टिकतील असे परिणाम करावे असे माझ्या मनात आले. याचा एक परिणाम म्हणजे मी बारावीत असताना एक पुस्तक लिहिले व प्रसिद्ध केले. बंडखोर बेकाम तरुण (बंबेत) अशी संघटना मी स्थापन केली होती. गावच्या आमच्या आळीतली विहीर मी हरिजनांसाठी खुली करून दिली (१९७८ साली). यावेळी गावात मला विरोध झाला. पण काही युक्त्यांनी मी त्यावर मात केली. याच सुमारास ‘प्रागतिक’ नावाचे सायक्लोस्टाईल साप्ताहिक मी काढत असे. मी लिहिलेले पुस्तक डोंबिवलीच्या अंधश्रद्धा-निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राजू देशपांडे यांच्या हाती पडले. ते बघून ते मला शोधत आले. त्यानंतर मी अंनिस चळवळीत सहभागी झालो. मांत्रिकांचे हृदय परिवर्तन होते का?
दत्ता सातखेडे (नाव थोडेसे बदलले) नावाचा तरुण मांत्रिक उल्हासनगरला राहतो असे कळले. ‘आडू माडू..’ असा मंत्र म्हणत त्याचे चालायचे. त्याला भेटलो. शाळेत जाण्याचा प्रश्न टाळण्यासाठी त्याने हे सुरू केले आणि चिकटले असे तो म्हणाला. त्याच्याशी बोलल्यावर तो मांत्रिकगिरी बंद करायला तयार झाला. मात्र त्यास त्याबदली कामाची गरज होती. जोस्तोवर ते मिळाले नाही तोस्तोवर त्याचे हे चालूच राहिले. माझ्या माहितीच्या माणसाकरवी त्याला काम मिळाले आणि त्याचा मंत्रोद्योग संपला. फराख शेख (नाव थोडेसे बदलले) नावाच्या मांत्रिकाने माझ्या मित्राला २०० रुपयाने फसवले. त्याचा शोध घेत मी त्याला भेटलो. त्यालाही नोकरी मिळवून दिली व त्याचे काम थांबले. काही मांत्रिक पिढीजात असतात. पैसे मिळवणे हे आता त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसते. माझ्या माहितीत असे दोन मांत्रिक होते. एक जण साप उतरवायचा मंत्र वापरायचा. माझ्या आतेभावाला साप चावला तेव्हा त्याला त्याच्याकडे नेले होते. माझ्या लहानपणची गोष्ट ही. त्याच्यावर पाणी उडवून त्याने सापाचे विष उतरवायचे मंत्र म्हटले होते आणि पैसे घेतले नव्हते. बऱ्याच वर्षांनंतर तो मला भेटला. त्याने मान्य केले की साप उतरवण्याची कुठलीही विद्या त्यास नव्हती. पण लोकांना आधार वाटतो या कारणाने त्याने ते चालू ठेवले होते. खरोखर विषबाधा झाली असे त्याला वाटले तर तो खुबीने दुसरीकडे म्हणजे हॉस्पिटलला वगैरे पाठवत असे. या मांत्रिकाचे सापाचे ज्ञान कच्चे होते. चावण्याच्या खुणा बघून विषारी बिनविषारी असे त्यास कळत नव्हते. दुसरे एक मांत्रिक काविळीचे औषध द्यायचे. त्यांचा मुलगा डॉक्टर होता व माझ्या परिचयाचा होता. त्यांची पद्धत म्हणजे रोग्याला ते कशात तरी लपेटून ढेकूण खायला द्यायचे. मग पथ्य पाणी वगैरे सांगायचे. मुख्य उद्देश पथ्यपाण्याचा होता असे ते म्हणायचे. यांचाही पैसे कमावणे हा प्रकार नव्हता. या दोन्ही मांत्रिकांचे उद्योग मी मुद्दाम जाऊन बंद पाडले नाहीत. मांत्रिकांना शिक्षा होते का?
जवळपास नाही. यास मुख्य कारण म्हणजे न्यायव्यवस्था. १९९१ च्या आसपास, नंदूरबार जिल्ह्यातील असलोदमंदाणे गावातील अस्लम शेख नावाचा मांत्रिक प्रसिद्ध होता. त्याला आम्ही रीतसर पकडून दिले. सुरुवातीला आम्ही त्याचा पाठपुरावा केला. पण तारखा इतक्या पडायच्या की आम्हाला जाणे-येणे कठीण होऊ लागले. पोलिसही आपली केस पूर्ण करायची जबाबदारी नीटसे पाळत नाहीत असे दिसले. मंत्र म्हणजे काय ? तुमच्या माहितीतील मंत्र कुठचे ?
मंत्र अर्थपूर्ण व अर्थशून्य अशा दोन पद्धतीचे असतात. कधी कधी दोन्ही असतात. ‘आडू माडू काडू, उंबराखाली गाडू, तेरा दुखता तो मैं क्या करू’ हा मंत्र दत्ता सातखेडेनेच केला होता. ‘बिसमिल्लाहिर हम्मानिरहिम, कुत्सिन मात्सिन मियांसिन शाखिसिन अब्बुसिन, बिसमिल्लाहिर हम्मानिरहिम’ हा एक निरर्थक मंत्र. ‘बांधरे बांध आल्यागेल्याची पीडा बांध, बांधरे बांध याच्यावरची नजर बांध’ असा एक मंत्र. ‘काली काली महाकाली, बसला राजा शिवा खेळी’ असाही एक मंत्र. हे सर्व मंत्र प्रत्यक्षात वापरले गेलेले मंत्र. यांचा परिणाम भक्तांवर किंवा अडल्यानडल्यांवर भरपूर होतो.
विविध मानवी समूहांमध्ये मंत्राची एक सरळ व सुलभ परंपरा चालत आलेली आहे. त्यांचा बोलबाला नसलेला मानवी समूह विरळाच. मानवी समाजातील हे मंत्र येतात आणि जातात. पण आपल्याकडील शिक्षित, उच्चशिक्षित माणसं या मंज्ञत्रांची स्तुती व मंत्र पठणाची महती सांगत आली आहेत. आज प्रगत विज्ञानाची फोडणी देऊन त्याला फसव्या (शिर्शीवे) विज्ञानाची झालर चढवून नवा सोंगाड्या नवीन ज्ञान म्हणून घराघरात पसरवीत आहे. त्यांच्या मते मंत्र म्हणजे ‘मननात् त्रायते’. याचा अर्थ ज्याचे मनन केल्यास आपले स्वतःचे व समूहाचे तारण होते तो. ज्यावेळी केंद्रित ध्वनिकंपने व मनःशक्ती बाहेर पडते किंवा शरीरात एकवटते तिला मंत्रशक्ती असे ते संबोधतात. त्यांच्यामते सर्वश्रेष्ठ मंत्र म्हणजे गायत्री मंत्र. जो दोन्ही अर्थप्रधान आणि ध्वनिप्रधान आहे.
याउलट शाबरी मंत्र हा बोधरहित असल्याने त्याला ध्वनिप्रधान मंत्र म्हटले आहे. गायत्रीमंत्राचा अर्थ बघितला की असे वाटते की यात काहीच खास नाही. यामागचे छद्मविज्ञान मात्र अल्फा, बीटा कंपने सारखे शब्द वापरून तयार केलेले दिसते. ही अल्फा बीटा कंपने काय असतात ?
EEG इलेक्ट्रो एंसेलोग्राफीच्या शोधानंतर या अवस्था उघडकीस आल्या. मेंदूच्या अॅक्टिविटीमुळे काही विद्युत्तरंगीय कंपने होत असतात. यांची जाणीव पहिल्यांदा १८७५ साली झाली; नंतर मोजमाप १९२४ साली व्हायला लागले. या कंपनांची फ्रिक्वेंसी असते व त्याचा संबंध मेंदूच्या चार अवस्थांशी लावण्यात आला. बीटा, अल्फा, थिटा व डेल्टा व हल्ली गॅमा अशा पाच अवस्था लक्षात आल्या. यातील अल्फा अवस्थेत मेंदूत आठ ते तेरा हर्ट्झ फ्रिक्वेंसीच्या विद्युल्लहरी असतात. सर्वसाधारणपणे डोळे बंद असताना पण झोपले नसताना ही अवस्था येते. थिटा व डेल्टा मध्ये माणूस झोपी जायला लागतो.तर बीटा ही सर्वसाधारणपणे जागृतावस्था मानली जाते. असे दर्शवले जाते की मंत्राच्या सहाय्याने ध्यानधारणा केली तर मनुष्य अल्फा अवस्थेत जातो व त्याचा मेंदू अल्फा तरंग पाठवू लागतो. मात्र यात काही दम नाही. कारण कुठल्याही माणसाने डोळे बंद केले तर तो अल्फास्टेटमध्ये जाण्याची शक्यता असते. याशिवाय कित्येक प्राण्यांमध्ये हे अल्फा विद्युत तरंग आढळले आहेत. या छद्मविज्ञानाचा उपयोग कसा केला जातो?
मी पहिल्यांदा सांगितलेले मंत्र हे कुणा मांत्रिकाने म्हणावयाचे मंत्र होते. गायत्री मंत्रासारखे मंत्र हे ज्याने त्याने म्हणावयाचे आहेत. गायत्री मंत्र हा एके काळी फक्त ब्राह्मणांनी म्हणावयाचा मंत्र होता. तो स्त्री वा शूद्रांसमोर म्हटलाही जात नसे. हळूहळू लोक शिकू लागले आणि मंत्रोपचार कमी व्हायला लागले. आता अशा प्रकारच्या छद्मविज्ञानाच्या साहाय्याने उच्चशिक्षित लोकांना
असे सांगितले जाते की हा मंत्र बुद्धिवर्धक वगैरे आहे. आणि ईईजीसारख्या तंत्राने ते सिद्ध झाले आहे. मंत्र व चमत्कार यांचा काय संबंध?
मंत्र हे चमत्काराची वातावरणनिर्मिती करण्यासाठी वापरले जातात. मांत्रिक सहसा मंत्रोपचारासोबत काही क्रिया करत असतो. त्या क्रियांतून तो काहीतरी चमत्कार झाला असे दर्शवतो. माझ्या लहानपणापासून मी अनेक मांत्रिकांचे चमत्कार स्वतः पाहिले. असे चमत्कार करणारे जसे अशिक्षितांमध्ये दिसतात तसेच ते उच्चशिक्षितांमध्येही दिसतात. अशिक्षित जनातील चमत्कार हे छोट्या हातचलाखीने होतात तर सुशिक्षित समाजातील काही मांत्रिक हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे असतात. याशिवाय त्यांना छद्मविज्ञानाची साथ बोलताना असते. तुमच्या अनुभवातील उच्चशिक्षित वर्गात झालेला चमत्कार सांगा.
आय.आय.टीत झालेला दीपक राव यांचा प्रयोग माझ्या डोळ्यांसमोर आहे. भारताचे युरी गेलर म्हणून हा गृहस्थ ओळख करून द्यायचा. हा पूर्वी युरी गेलरसारखा व्यवसायाने जादुगार होता. पण ते फारसे चालले नसल्याने त्याने मनःशक्तीचे प्रयोग दाखवायला सुरुवात केली. आम्ही त्याविरुद्ध तेथे जाऊन पत्रके वाटली व अंनिसचे २१ लाखाचे आह्वानही दिले. वेळेवर हा प्रकार ध्यानात येऊन दीपक रावने प्रश्नोत्तरे टाळली. मात्र त्याचे प्रयोग मी जवळून पाहिले. मनाने पेन पेंसिल उचलणे (अदृश्य धाग्याच्या सहाय्याने), मनातले ओळखण्याचा प्रयोग, असे अनेक छोटेमोठे प्रयोग त्याने केले. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना सांगितले की हे सर्व प्रयोग आम्ही तुम्हाला करून त्यांची फोड करून सांगू. तुम्ही तसे केलेत?
तसा प्रसंग आला नाही. एकतर मुलांनी आम्हाला बोलावले नाही. आणि दुसरे म्हणजे संयोजकांना तरी आमचे बोलणे पटले होते व दीपक रावला बोलावण्यात चूक झाली असे वाटले होते. त्याच्या प्रयोगांची फोड मला एकेक करून सुचली. आता मी त्याचे सर्व चमत्कार करून दाखवतो. दीपक रावचे पुढे काय झाले ?
मी यासंबंधाने नाव घेऊन लेख लिहिला. अंनिस वार्तापत्रात मुखपृष्ठावर त्याचे छायाचित्र असा तो लेख होता. याची दखल महाराष्ट्र टाईम्स सोडून इतर वृत्तपत्रांनी घेतली नाही. महाराष्ट्र टाईम्समधील उतारा वाचून दीपक राव यांनी याबद्दल अशी मखलाशी केली की मी चमत्कार करतो हा दावा कधीच केला नव्हता. पण हा खुलासा बरोबर नसल्याचे संदर्भासकट पत्र पाठवल्यावर त्याने त्यात लक्ष घालणे सोडून दिले. आय.आय.टी.तल्या प्रात्यक्षिकाचा दीपक रावने चांगलाच फायदा करून घेतला असे कळले. हल्ली उच्चभ्रू समजलेल्या सहनिवासात खूप जास्त फी घेऊन त्याची चमत्कारदर्शनाची प्रात्यक्षिके होतात असे कळले. तुम्ही इतके चमत्कार पाहिले व त्यांची फोड केलीत. यातील सर्वांत कठीण चमत्कार सांगा.
सफाळा गावातील एक मिशनरी हा चमत्कार करीत असे. तो एक मेणबत्ती पेटवून त्यावर लिंबू धरायचा. मेणबत्ती विझल्यावर ते लिंबू मेणबत्तीला चिकटायचे. ते जर चिकटले तर बाधा झाली, अन्यथा नाही. हा प्रयोग पाहिल्यावर मी घरी येऊन तसे करून पाहिले. माझे लिंबू काही मेणबत्तीला चिकटेना. सुरवातीला वाटले की मेण वितळण्यामुळे हे घडते.पण ते बरोबर नव्हते. मग मी परत एकदा हा प्रयोग बघायला गेलो. जाताना तशीच दिसणारी एक मेणबत्ती मी स्वतःजवळ घेऊन गेलो होतो. मी तिकडे गेल्यावर त्याला मुद्दाम बोलण्यात गुंतवून मी गुपचूप मेणबत्ती बदलली. त्याची मेणबत्ती घरी घेऊन आल्यावर मला त्यातील गोम समजली.त्याने त्या मेणबत्तीत वातीजवळ एक सुई रोवून ठेवली होती. नंतर लक्षात आले की तो लिंबू न वापरता एक तत्सम चेंडू वापरत होता. तो चेंडू तो त्या सुईवर दाबायचा. सुई दिसू नये म्हणून तो मेणबत्ती जास्त वेळ पेटवायचा नाही. मेणबत्ती मोठी व कागदवाली असायची ज्यामुळे मेण वितळून खाली पडत नसे. चमत्कार करताना असे छोटे मोठे डिटेल्स महत्त्वाचे असतात. चमत्काराची फोड करताना व ते दर्शवताना झालेल्या चुकांमधून मी हे शिकत गेलो. लहानपणी मी नुसते वाचले होते की आगीवरून असे चालतात. त्यावेळी मी कुठेही हे न बघता चालायला लागलो. आता तत्पूर्वी पाय धुणे, आगीवर मीठ टाकणे ज्यामुळे तडतड वाढते पण उष्णता वाढत नाही, बाहेर आल्यावर लगेच पाणी टाकणे असे करायला लागलो. प्रत्यक्ष कृतीसोबत आणखी काय काय लागते ?
मी असे करताना भरपूर वाचतो. आता हा मंत्र व मांत्रिक हा विषय घेताना त्याची पूर्वतयारी म्हणून मी दुसऱ्या बाजूची अनेक पुस्तके विकत आणली. त्यांना काय म्हणायचे ते समजून घेतले. मानसशास्त्रीय चमत्काराची प्रात्यक्षिके देताना त्याचा मी अभ्यास केला होता. प्रत्यक्ष कृती न करणाऱ्या पण विवेकवादी असणाऱ्या वाचकवर्गाला तुम्ही काही सांगू इच्छिता का?
प्रत्येक विवेकी माणसाला आमच्यासारखे चळवळीत राहून वा प्रत्यक्ष काम करणे जमेलच असे नाही. कुणी कृतीतून तर कुणी चर्चेतून तर कुणी लिहून आपला सहभाग दाखवतात. प्रश्न चोहोकडून जेव्हा प्रचंड विरोधाला कार्यकर्ते सामोरे जात असतात. हल्लाबोल केल्यासारखा प्रचार चालू असतो. त्यावेळी हा लढा बोथट होऊ शकतो. म्हणून प्रत्यक्ष कृती न करणाऱ्या विवेकी वाचकवर्गाला एक आवाहन आहे. जेव्हा आम्हाला होणारा विरोध प्रत्यक्ष कृतीतून सुरू होतो तेव्हा तुम्हीही प्रसारमाध्यमाद्वारे, कधी मुलाखतीद्वारे, कधी चर्चेद्वारे तर कधी लेख लिहून यास विरोध नोंदवावा. त्यामुळे आमच्यासारख्यांचे बळ वाढेल.