भविष्यकथन

भविष्याची चिंता मानवाला प्राचीन काळापासून सतावत आली आहे. त्यावर मात करण्यासाठी काळाच्या ओघात भविष्यकथनाच्या विविध पद्धतींनी आकार घेतला. या सर्वांचा उगम पुराणकाळात झाल्याचे दिसून येते. सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असणारा आदिमानव जसजसा निसर्गबदलांशी परिचित होऊ लागला तसतसा निसर्गाच्या अफाट सामर्थ्यात स्वतःला जुळवून घेण्यास शिकला. हे शिकत असताना निसर्गाच्या वर्तमान स्थितीतून अथवा बदलातून भविष्यातील सृष्टी आकार घेत असते हे त्याला समजू लागले. झाड फुलांनी बहरलं की काही दिवसांत झाडाला गोड फळे लागतात. मुंगीसारखे कीटक पृष्ठभागावर दिसू लागले की थोड्याच दिवसांत पाऊस येतो. विशिष्ट प्राणी दिसेनासे झाले की उन्हाळा सुरू होतो. भिन्न भौगोलिक वातावरणात भिन्न वनस्पती आणि प्राणी आढळतात. यावरून भौगोलिक परिस्थितीचा परिणाम जीवसृष्टीवर होत असतो हे त्याच्या ध्यानात आले. त्याच्या आधारे त्याने प्राणी, वनस्पतींच्या निरीक्षणातून स्वतःला राहण्यालायक योग्य भौगोलिक पर्यावास शोधला. पुढे जाऊन भटकंती करणाऱ्या मानवी समूहाने तर मुक्कामाची जागा निवडताना बळी जाणाऱ्या प्राण्यांचे यकृत पाहून सभोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीचा अंदाज बांधण्यास सुरुवात केल्याचे आढळून येते. हीच पद्धत पुढे रोमन साम्राज्यात प्रचलित झाली. आणि नंतर या प्रथेचे रूपांतर रोमन सम्राट काँमॉडसच्या काळात प्रतिष्ठित लोकांच्या मुलांची आतडी पाहून भविष्य सांगण्यात झाले. या सर्वातून एक महत्त्वाची गोष्ट तत्कालीन मानवाच्या ध्यानात आल्याची दिसते, ती म्हणजे कोणतीही घटना अथवा बदल आपोआप घडत नाही तर त्याला कारण असते. विविध घटनांचा त्याने जोडलेला कार्यकारण संबंध जरी त्याला नीटसा समजला नसला तरी त्याचा मार्ग चुकीचा होता असे म्हणता येणार नाही. कारण तो निरीक्षण आणि रार्कावर आधारित होता. त्याचा उद्देश केवळ मानवी समूहाची भविष्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपतीतून सुटका करणे एवढाच होता. या भविष्यकथनामागे, निसर्गाला भविष्यातील घटना ज्ञात असतात आणि त्या तो सांकेतिक भाषेत प्राणी अथवा वनस्पतींमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवतो, अशी मानवाची समजूत होती. या समजुतीतून मांजर आडवे जाणे, घुबड ओरडणे, कुत्रे रडणे, टिटवी घरावरून ओरडत जाणे, अंगावर पाल पडणे इत्यादी अपशकुनी तर कावळ्याचे ओरडणे, मुंगुस आडवे जाणे इत्यादी शुभशकुनी मानण्याच्या प्रथा निर्माण झाल्या असाव्यात.
निसर्गाची सांकेतिक भाषा समजणारी नव्हती. ज्यांना समजली त्यांना तत्कालीन मानवाने दैवी शक्तीचा आविष्कार मानला आणि त्यामुळे कार्यकारण-संबंधाला पूर्णतः तिलांजली मिळाली. पण केवळ एवढ्यानेच भविष्यकथनाच्या विविध पद्धती निर्माण झाल्या नाहीत. भिन्न प्रदेशात राहणाऱ्या मानवी समूहांना भिन्न नैसर्गिक परिस्थितीशी तोंड द्यावे लागले. ज्या पर्यावरणात राहात असे तेथील उपलब्ध साधनांचा वापर तो दैनंदिन जीवनात करू लागला. त्यातून त्याने वेगवेगळ्या जीवनपद्धती जश्या विकसित केल्या तश्याच भविष्यकथनाच्या विविध पद्धती निर्माण झाल्या. या भविष्यकथनात तो सभोवताली सापडणाऱ्या साधनांचा वापर करत असे. सर्व बाजूंनी समुद्राने वेढलेल्या जपानी बेटावर कासवाच्या पाठीवरच्या आकृत्या पाहून भविष्य सांगितले जाई. कारण त्याची समजूत होती की ईश्वराची इच्छा मानवाला कळावी म्हणून स्वतः ईश्वराने कासवाच्या पाठीवर आपली इच्छा आकृतिरूपात मांडली. चीनमध्ये सहा रेषांनी बनलेल्या चौसष्ट वेगवेगळ्या भौमितिक आकृत्यांचे साधर्म्य नैसर्गिक आकाराशी जोडून भविष्य सांगितले जाई. या पद्धती काळानुसार बदलत गेल्याचे दिसून येते. कासव जसे दुर्मिळ झाले तसे त्याची जागा कॉफी बियांनी घेतली. म्हणजेच सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या साधनांचा वापर भविष्यकथनात होऊ लागला. अशा प्रकारच्या भविष्यकथनात कार्यकारणभावांऐवजी दैवीशक्तीला महत्त्व दिल्याने भविष्य सांगणाऱ्याला अमर्याद महत्त्व प्राप्त झाले. राजे, महाराजे आपल्या राजदरबारात ज्योतिष्याची नेमणूक करू लागले. वापरली जाणारी साधने केवळ निमित्तमात्रच राहिली. त्यामुळे भविष्यकथनाच्या विविध नावीन्यपूर्ण पद्धती तयार झाल्या. उदा. पोपटाद्वारे भविष्यकथन, वश केलेल्या पिशाच्चाने कानात भविष्य सांगणे (कर्णपुतळी), स्फटिकात नजर रोखून, काजळाच्या डबीत पाहून, रुद्राक्ष पाहून, फासे टाकून (रमलविद्या), अंकावरून (अंक सामुद्रिक), चेहरा, शरीराची ठेवण, तीळ व खुणा पाहून (अंगलक्षण होराशास्त्र), तळहातावरच्या रेषा पाहून (हस्तसामुद्रिक) भविष्य सांगणे इत्यादी. या प्रकारात आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते ती म्हणजे व्यक्तिकेंद्रित भविष्यकथन. व्यक्तीच्या भविष्यात काय घडणार याची भविष्यवाणी.
आजच्या वैज्ञानिक युगात वर उल्लेखलेल्या भविष्यप्रकारांचा फोलपणा सर्वज्ञात आहे. पण हस्तसामुद्रिकाविषयीचे चित्र किंचित वेगळे आहे. कारण जसे प्रत्येकाचे आयुष्य वेगळे तसे तळहाताचे ठसेही वेगळे. या युक्तिवादामुळे बहुदा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात १९५० साली घेतलेल्या जनमत-चाचणीत २०% लोक यावर विश्वास ठेवत असल्याचे दिसून आले. पण थोडा जरी तार्किक विचार केला तरी त्याचा फोलपणा आपल्या ध्यानात येतो. उदा. दीडशे वर्षांपूर्वी जेव्हा भारतातील स्त्रियांना ब दलितांना शिक्षणाचा हक्क नव्हता, तेव्हा खरोखरच त्यांच्या हातावर शिक्षणरेषा नव्हती का? आणि समाजसुधारकांच्या प्रयत्नांनी जेव्हा शिक्षणाचा हक्क मिळाला तेव्हा सर्वांच्या तळहातावर पटापट शिक्षणरेषा उमटू लागली का?
मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आणखी एक भविष्यप्रकार उदयाला आला तो म्हणजे ‘फलज्योतिष्य’. जन्मवेळी आकाशस्थ ग्रहगोलांची स्थिती पाहून, कुंडली मांडून भविष्य सांगणे. आकाशातील चांदण्यांचे कुतूहल मानवाला आदिम अवस्थेपासूनच होते. आकाश-निरीक्षणातूनच त्याला चांदण्यांच्या शिस्तबद्ध हालचालींची जाणीव झाली. सूर्य-चंद्राच्या हालचाली आणि समुद्राची भरती-ओहोटी यातील लयबद्धता, विशिष्ट तारा अथवा तारकासमूह विशिष्ट ठिकाणी आला की बदलणारे हवामान इत्यादींमुळे त्याला आकाशातील हालचालींचा संबंध निसर्गातील कालबद्ध बदलांशी असल्याचे जाणवू लागले. (याच समजुतीच्या आधारे बहुसंख्य शिक्षित समाज फलज्योतिषाला विज्ञान मानून त्यावर विश्वास ठेवत असावा.) आणि त्यातून फलज्योतिषाचा उदय झाला. सुरुवातीला सभोवतालच्या निसर्गावर होणाऱ्या परिणामांचे भाकित केले जात असावे. नंतर काळाच्या ओघात आकाशातील ग्रहस्थिती पाहून व्यक्तीचे भविष्य सांगण्याची प्रथा रूढ झाली असावी. आज ही पद्धत समाजाच्या सर्व थरांत संपूर्ण जगभर वापरली जाते. या पद्धतीत भविष्यकथनाची सुरुवात कुंडलीपासून होते. कुंडली म्हणजे जन्मस्थळापासून जन्मवेळी आकाशाचा तयार केलेला नकाशा. तो तयार करण्यासाठी सूर्य पृथ्वीभोवती ज्या मार्गाने फिरतो त्या क्रांतिवृत्ताचे बारा भाग करून प्रत्येक भागात विशिष्ट आकृती (सिंह, मेष, कर्क इ.) दर्शविणाऱ्या तारकासमूहांना नावे देऊन बारा राशी तयार केल्या. त्याच क्रांतिवृत्ताचे सत्तावीस भाग करून प्रत्येक भागातील तारकासमूहाला नाव देऊन सत्तावीस नक्षत्रे तयार केली. यात पृथ्वी मध्यभागी समजण्यात आली आहे. कुंडली तीन प्रकारे दर्शवली जाते. आपल्याकडे आयताकृती, पाश्चिमात्त्य जगात वर्तुळाकार तर दक्षिण भारतात चौकोनी. चौकोनी कुंडलीत राशींची स्थाने ठरलेली असतात. आणि लग्न (जन्मवेळी पूर्वेची रास) ज्या राशीत तिथे ‘लग्न’ असे लिहिण्याची पद्धत आहे. कुंडली तयार करण्याच्या प्रामुख्याने तीन पद्धती आहेत. जन्मवेळेस जन्मस्थळाच्या पूर्वेस जी रास, ती कुंडलीच्या प्रथम स्थानात (लग्न स्थानात) लिहून कुंडली तयार करणे. ती झाली लग्न कुंडली. दुसरी राशी कुंडली : त्यामध्ये जन्मवेळेस चंद्र ज्या राशीत ती रास प्रथमस्थानात लिहून कुंडली तयार करणे. तर तिसरी भावचलित कुंडली. ही कुंडली जन्मवेळेची सांपतिक वेळ, स्पष्ट भावसाधन आणि स्पष्ट ग्रहसाधन या आधारे बनवली जाते. त्यातही दोन प्रकार : एक सायन भावचलित आणि दुसरी निरयन भावचलित. निरयन पद्धतीनुसार मेष रास ही अश्विनी नक्षत्रापासून, खरं तर रेवती नक्षत्राच्या झिटापेशियम या शेवटच्या ताऱ्यापासून सुरू होते. यास अश्विन्यारंभबिंदू म्हणतात. तर सायन पद्धतीत मेष रास वसंत संपात बिंदूपासून म्हणजेच अश्विन्यारंभबिंदूच्या मागे साडेतेवीस अंशांवर सुरू होते कारण पृथ्वीला परांचन गती असल्याने दर बहात्तर वर्षांनी वसंत संपात बिंदू एक अंशाने अश्विन्यारंभबिंदूपासून दूर जातो. परिणामी सायन-पद्धतीनुसार जर श्रावण महिन्यात सूर्य सिंह राशीत असेल म्हणजेच स्वगृही तर निरयन पद्धतीनुसार सूर्य कर्कराशीत. त्यामुळे सूर्याच्या परिणामात कमालीची तफावत आणि भविष्यकथनात भिन्नता अपरिहार्य. प्रश्नकुंडली हा आणखी एक प्रकार आहे. यात व्यक्तीला प्रश्न पडतो ती वेळ जन्मवेळ मानून कुंडली तयार करून भविष्य सांगणे. या सर्व प्रकारात एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या कुंडल्या तयार होणार आणि त्याद्वारे सांगितलेले भविष्यही वेगवेगळे येणार. केवळ कुंडली तयार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या नाहीत तर भविष्य ठरविण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. दशाविचार, गोचरफलादेश, ताजिक, दिनवर्ष पद्धती, डिरेक्शन ह्या त्यांतील महत्त्वाच्या पद्धती आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीची एकच कुंडली वेगवेगळ्या ज्योतिष्यांना दिली तर त्यातून नेमके एकच भविष्य येणे कदापि शक्य नाही. विज्ञान ‘ग्रहगोलांचे परिणाम मानवावर होत नाहीत’ असे म्हणत नाही. मात्र ‘ते परिणाम सर्वांवर सारखेच आणि ताबडतोब होत असून ते अतिशय सूक्ष्म असतात.’ असे मानते. तर फलज्योतिषानुसार ते जन्मवेळेनुसार व्यक्तिगणिक वेगवेगळे असल्याचे मानते. म्हणजेच जन्मवेळेच्या ग्रहस्थितीनुसार आयुष्यभर ग्रह, राशी, नक्षत्रे परिणाम करत असतात. हे परिणाम कोणत्या प्रकारचे असू शकतील? गुरुत्वाकर्षणाचा विचार करायचा तर फलज्योतिषातील नऊ ग्रहांपैकी राहू आणि केतू यांना भौतिक अस्तित्वच नाही. ते काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यामुळे त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रश्नच उद्भवत नाही. चुंबकीय लहरींचा विचार केला तर चंद्र, शुक्र, मंगळ यांना चुंबकीय क्षेत्रच नाही. राशींचा विचार करायचा तर प्रत्येक रास तीस अंशाची मानली असली तरी प्रत्यक्षात त्या समान आकारमानाच्या नाहीत. त्यांच्यातील अंतरे पण सारखी नाहीत. प्रत्येक राशीत असणाऱ्या ताऱ्यांची संख्याही सारखी नाही. आणि प्रत्येकातील सर्व तारेही पृथ्वीपासून सारख्याच अंतरावर नाहीत. हीच गोष्ट नक्षत्रांबाबत. फलज्योतिषात मात्र सर्व राशी व नक्षत्रे एकाच त्रिज्येच्या गोलाकार पृष्ठभागावर आहेत आणि पृथ्वी मध्यावर आहे असे मानून गणिती आकडेमोड केली आहे. त्यामुळे केवळ प्राचीन आहे आणि ऋषिमुनींनी सांगितले म्हणून त्याला विज्ञान म्हणता येणार नाही. विज्ञान वस्तुनिष्ठ असते. व्यक्तिनिष्ठ नसते. ऋषिमुनींना खरोखर दैवी शक्ती वा दिव्य दृष्टी असती तर राहू, केतू ऐवजी फलज्योतिषात युरेनस, नेपच्यून दिसले असते.
फलज्योतिषाला मिथ्या विज्ञान का म्हणायचे ? याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्याने ग्रह राशी आणि नक्षत्रांना चिकटवलेले गुणधर्म. उदा. चंद्र, गुरू, शुक्र, शुभ ग्रह तर रवि, शनि, मंगळ पाप ग्रह. यामागचे कारण काय ? उत्तरच नाही. तार्किक विचार केला तरी उत्तर मिळत नाही. रविमुळे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली आणि आजपर्यंत टिकली. त्यामुळे खरे तर रवि शुभ असायला हवा. दुसऱ्या बाजूला तो सर्व ग्रहांत श्रेष्ठ. गुरु-शुक्र दोन्ही शुभ ग्रह पण ते म्हणे एकमेकांचे शत्रू. मंगळाचे उच्चस्थान मकर तेच गुरूचे नीच स्थान तरी मंगळ, गुरु एकमेकांचे मित्र. शुक्र स्त्रीलिंगी, रवि पुल्लिंगी तर शनि नपुंसक. मघा, पूर्वा, उत्तरा या तीन स्त्रीलिंगी नक्षत्रापासून तयार होते पुलिंगी सिंह रास. शनीचा मूळ पिंड दुःख-नैराश्यवादी आहे. तो पूर्वजन्मी केलेल्या कर्माप्रमाणे फल देणारा आहे. शुक्र हा भिन्न लिंगामधील आकर्षण निर्माण करणारा ग्रह आहे. तो प्रेमभावना दाखवतो. व्यक्तीचे कामसुख, व्यक्तीचे स्त्रीसंबंध शुक्रावरून पाहतात. शुभ ग्रह वक्री झाले की ते निर्बल होतात. वस्तुतः कोणताही ग्रह उलट दिशेने चालत नाही. पृथ्वीसापेक्ष तो वक्री असल्याचे भासते. अशा कितीतरी मनोरंजक कल्पना फलज्योतिषात वाचायला मिळतात. त्यामागचा कार्यकारण-भाव मात्र कुठेच आढळत नाही. मनुष्याच्या आयुष्यात कोणत्या काळी काय घडणार हे सांगण्यासाठी विशोत्तरी महादशेची निर्मिती पराशर आचार्यांनी केली. त्यामध्ये माणसाचे सरासरी आयुष्य १२० वर्षे धरून त्याचे कमी अधिक कालावधीचे नऊ कालखंड पाडून प्रत्येक कालखंडाची मालकी एकेका ग्रहाकडे दिली. मुलाचा जन्म होतो तेव्हा चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचा स्वामी जो ग्रह असेल त्या ग्रहाची महादशा सुरू होते. उदा. गुरूची महादशा सुरू झाली. ती संपल्यावर क्रमाने शनि, बुध, केतू इत्यादींच्या महादशा येत राहतील. आणि त्या त्या ग्रहांची विशिष्ट फळे मिळत राहतील. यामध्ये ग्रहाचा क्रम ठरलेला असतो. ही कल्पना अचाट आहे पण कार्यकारणभावाचा पत्ता नाही.
फलज्योतिषाचे समर्थक भविष्य खरे ठरल्याचे दाखले देतात. पण खरोखरच भविष्य खरे ठरते का ? कधीच नाही. अलिकडेच ऑक्टोबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील याबाबत भविष्यवाणी करण्याचे २१ लाख रुपयांचे आह्वान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिष्यांना दिले होते. पण कोणीही पुढे आले नाही. पृथ्वीवर सर्व ग्रह सूर्याच्या एका बाजूला येणार आणि या अष्टग्रहीमुळे, पृथ्वीवर हाहाकार उडेल, भूकंप, वादळ, पाऊस अशी अरिष्टे येतील असा दावा जगभरातील ज्योतिष्यांनी १९६२ साली केला होता. प्रत्यक्षात काहीही घडले नाही. मात्र लोकांना घाबरवून जपजाप्य, होमहवन, नवस, ग्रहशांती, खडे आदि कर्मकांडे करायला लावून ज्योतिष्यांनी भरपूर माया गोळा केली. वाईच्या डॉ. शरद अभ्यंकर यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये जन्मतःच मृत पावलेल्या काही बालकांच्या पत्रिका बनवून त्यावरून ज्योतिष्यांना भाकित वर्तवण्यास सांगितले. सर्व ज्योतिष्यांनी या बालकांचे उत्तम व उज्ज्वल भविष्य वर्तविले.
परंतु ती बालके जन्मतःच मृत असल्याचे एकाही ज्योतिष्याला सांगता आले नाही. एप्रिल १९९१ मध्ये पुण्याच्या साप्ताहिक सकाळमध्ये महाराष्ट्रातील सात नामवंत ज्योतिष्यांनी मे १९९१ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे भविष्य वर्तविले होते. सातपैकी सहाजणांनी पंतप्रधानपदी राजीव गांधी विराजमान होतील तर एकाने भाजपाला सत्ता मिळेल असे सांगितले होते. परंतु कुंडलीवरून मृत्ययोग सांगण्याचा दावा करणाऱ्या ज्योतिष्यांपैकी एकालाही राजीव गांधींच्या हत्येचे भाकीत करता आले नाही. मूळ नक्षत्रात जन्मलेले मूल आई-वडिलांचा नाश करते असे फलज्योतिषात म्हटले आहे. याच मूळ नक्षत्रात जन्मलेल्या संत एकनाथांनी म्हटले आहे, “मूळीच्या मूळी एक जन्मला, मायबापें घोर धाक घेतला, कैसें नक्षत्र आले कपाळा, स्वयें लागलों दोहोंच्या निर्मूला.”
तार्किक विचार आणि वैज्ञानिक चिकित्सेने फलज्योतिषाचा फोलपणा सिद्ध होत असून लोक फलज्योतिषाकडे का जातात ? याला अनेक कारणे आहेत, १) भविष्याची चिंता आणि त्यातून आगतिक झालेली मानसिकता, २) मनात खोलवर रुजलेला दैववाद आणि त्यातून ज्योतिषावर बसलेला प्रगाढ विश्वास, ३) शक्याशक्यतेचा नियम : बहुतेक प्रश्न द्विपर्यायी असतात. उदा. नोकरी मिळेल का? मूल होईल का? इत्यादी. यांपैकी कोणतेही उत्तर दिले तरी ते बरोबर येण्याची शक्यता ५०%. बरे ज्योतिषी एवढे सांगून थांबत नाही. ‘शंकरावर लघुरुद्र कर’, ‘संकष्ट्या धर’, ‘नवचंडी कर’, अशुभ ग्रहाचा मंत्रजप कर’ इत्यादी. त्यामुळे भविष्य चुकलेच तर उपासना करण्यात कमी पडला. एवढेच नाही तर ज्योतिषी एकच गोष्ट जातकाला सांगत नाही. आयुष्यात घडणाऱ्या शेकडो घटना सांगितल्यावर त्यातील काही गोष्टी खऱ्या ठरतात. त्यामुळे जातकाला आपले भविष्य खरे ठरल्यासारखे वाटते. आणि खोट्या ठरलेल्या गोष्टींबाबत ‘नसीब’ नावाची कल्पना कामी येते. खरे ठरलेल्या भविष्याचा जातक स्वतःच गाजावाजा करतो आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चटकदार बातमीची वाट पाहणाऱ्या प्रसारमाध्यमांना आयता मुद्दा मिळतो. परिणामी फक्त खरी ठरलेली भाकिते तुमच्या-आमच्यापर्यंत पोहोचतात आणि तीही पराचा कावळा बनून. ४) दुटप्पी भाषाः ज्योतिषी नेहमी गुळमुळीत आणि संदिग्ध भाषेत भविष्यकथन करतात. त्यामुळे सोईनुसार हवा तो अर्थ काढता येतो. उदा. “प्रकृतीची काळजी घ्या, कारण शनि नीचीचा आहे. पण घाबरण्याचे कारण नाही. गुरु स्वग्रही परततोय.’ आता जातक आजारी पडला तर शनीचा फटका आणि ठणठणीत राहिला तर गुरूची कृपा. काहीही घडले तरी भविष्य खरेच. काही बाक्ये सर्वांना लागू पडतात. उदा. “बाहेरून जरी तुम्ही शिस्तबद्ध आणि स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत असला तरी आतून तुम्हाला कधी कधी चिंता भेडसावतात आणि असुरक्षितता जाणवते.” तर काही वाक्ये जरी प्रत्येकाला लागू होत नसली तरी मनाला समाधान देणारी असतात. उदा. “तुम्हाला अभिमान आहे की तुम्ही स्वतंत्रपणे विचार करता आणि दुसऱ्यांची विधाने परीक्षणाशिवाय मानत नाही. स्वतःचा उत्कर्ष घडवून आणण्याची क्षमता असलेले पण पूर्ण वाव न मिळालेले गुण तुमच्यात आहेत.” अशी वाक्ये घेऊन एक व्यक्तिचित्र तयार केले जाते. ते प्रत्येकाला आपलेच वाटते. याला सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ जयंत नारळीकर यांनी त्यांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या पुस्तकात बार्नम इफेक्ट संबोधून सविस्तर वर्णन केले आहे. कुंडली पाहून जर असे भविष्य कथन केले तर कोणालाही ते पटण्याजोगे आणि लागू पडणारे असेल. पणजीत फलज्योतिषाचा व्यवसाय करणारे संस्कृतिकोशकार पं. महादेवशास्त्री जोशी शास्त्रानुसार भविष्य सांगायचे पण त्यांनी सांगितलेले भविष्य खरे ठरायचे नाही. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी गोव्यातील नामवंत भास्कराचार्यांना सल्ला विचारला. त्यावर ते म्हणाले, “तुम्ही ग्रंथाधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात. इथे शब्दजंजाळच कामी येते. समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करायचं. भविष्य सांगायचं ते बरंच सांगायचं अन् त्याला आशेच्या घोड्यावर बसवून पाठवून द्यायचं. अहो, हा धंदा आहे. यात तुमचं वाक्चातुर्य जितकं प्रभावी तितकं भविष्य बरोबर.” महादेवशास्त्री जोशींसारख्या प्रामाणिक माणसाला हे न पटल्याने पुढे वर्षभरातच त्यांनी आपला ज्योतिष्याचा व्यवसाय बंद केला.
फलज्योतिष्यांनी केलेले दावे खरे ठरतात का? हे तपासण्यासाठी जगभरातील वैज्ञानिकांनी अनेक चाचण्या घेतल्या. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीतील बर्नी सिव्हरमन या शास्त्रज्ञाने साडेतीन हजार लग्ने व घटस्फोट यांचा अभ्यास केला. फलज्योतिष्यांनी पत्रिकेवरून कोणत्या जोड्या योग्य म्हणजे पत्रिका जुळणाऱ्या व कुठल्या न जुळणाऱ्या हे सांगितले. वस्तुस्थितीची तुलना करता त्यांना पत्रिकेच्या निष्कर्षाचा वस्तुस्थितीशी संबंध नसल्याचे आढळले.
थोड्याफार फरकाने अशा स्वरूपाच्या चाचण्या भारतातील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. वि.म.दांडेकर, कॅलिफोर्निया विद्यापीठातील शॉन कार्लसन, सारबॉन विद्यापीठातील डॉ. मिशेल गाँकेला यांनी घेतल्या. सर्वांचे निष्कर्ष फलज्योतिष्याच्या विरोधात गेले. वैशिष्ट्य म्हणजे ज्यांना फलज्योतिषाचा खरे-खोटेपणा तपासायचा होता ते सर्व वैज्ञानिक होते. त्यांना फलज्योतिषाविषयी आवड व कुतूहल होते. मात्र एकाही ज्योतिषाने अशा प्रकारची चाचणी घेतली नाही. आणि आजही कोणी ज्योतिषी त्याबाबत तयारी दाखवत नाही. दहा वर्षांपूर्वी भारतातली सर्व विद्यापीठांवर अंकुश ठेवणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाने (यू.जी.सी.ने) फलज्योतिष हा विषय विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत केला. पण तो विज्ञानशाखेत न ठेवता संस्कृत भाषेत समाविष्ट केला. यातून फलज्योतिष वैज्ञानिकांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते.
फलज्योतिषात अंतर्विरोध आहे. ग्रह-राशीचे चांगले-वाईट परिणाम माणसाला भोगावे लागतात असे सांगून त्यातून सुटका करून घेण्यासाठी (परिणाम थांबवण्यासाठी) विशिष्ट विधी करायला सांगितले जातात. उदा. कालसर्प योग असेल तर नारायण नागबळी : नाशिकला त्रिंबकेश्वराच्या मंदिरात जाऊन सोन्याचा नाग देऊन संपूर्ण कुटुंबाने विधी करायचा. शनीची साडेसाडी असेल तर एकवीस शनिवार उपवास करा. शनीला तेल व रुईची माळ घाला. अशुभ ग्रहस्थितीत मूल जन्माला आले, ग्रहशांती करा. इत्यादी इत्यादी. जणू काय ग्रह आपले गुलाम आहेत.
वरील बाबी विचारात घेतल्या तर फलज्योतिष हे फसवे विज्ञान ठरते. म्हणूनच १९७४ साली १९२ शास्त्रज्ञांच्या सहीसकट (ज्यात अनेक नोबेल पारितोषिक विजेते होते) एक पत्रक प्रसिद्ध केले ज्यात फलज्योतिषावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून टीका होती. अशा अवैज्ञानिक फलज्योतिषाला विरोध करायची अनेक कारणे आहेत. १) व्यावहारिक दृष्टीने अनुरूप असलेल्या किंवा परस्परांबद्दल प्रेम असलेल्या जोडप्यांची लग्ने केवळ पत्रिका न जुळल्याने मोडतात. २) काही आवश्यक आणि लवकर करायच्या गोष्टी केवळ शुभमुहूर्तासाठी लांबणीवर टाकल्या जातात. ३) ग्रहणकाळात सर्व कामधंदा सोडून जपजाप करत बसल्याने आर्थिक विकासाला अडथळा येतो. जरी हा खेळ सावल्यांचा असला तरी समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. प्रयत्नवादास खीळ बसते आणि दैववादाला खतपाणी मिळते. फलज्योतिषामुळे माणूस आकाशातील ग्रहगोलांचा गुलाम बनतो. यावर स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘हे दूरवरचे ग्रहतारे जर माझे आयुष्य बदलू शकत असतील, तर मी ते जगण्यास लायक नाही, तेव्हा निर्भय बना व अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त व्हा.” एवढे सर्व माहीत असूनही देशातील बहुसंख्य प्रसारमाध्यमे, राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचाराचे मूलभूत कर्तव्य बाजूला ठेवून फलज्योतिषाचा प्रसार आणि प्रचार करताना दिसताहेत. त्यांनी ‘ज्या देशात भविष्यवादी ज्योतिष्यांचा धंदा भरपूर चालतो, तो देश हवा त्या आक्रमकांनी मन मानेल तेव्हा पायदळी तुडवून गुलाम करावा’ हा एका पाश्चात्त्य तत्त्वज्ञाचा इशारा आता तरी ध्यानात घ्यावा कारण तो भारताच्या इतिहासाला तंतोतंत लागू पडतो.
संदर्भः १) फलज्योतिषाचा बोजवारा : संपादन, लेखक – जगदीश काबरे
२) फलज्योतिषाचा फोलपणा : प्रकाशक – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
आकाशाशी जडले नाते : लेखक – जयंत नारळीकर ४) फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्यांचे भाकडः लेखक – माधव रिसबूड
कुंडली तंत्र आणि मंत्र : भाग – १ व २ : लेखक व. दा. भट ६) Superstition : Author: Felix E. Planer