धार्मिक अंधश्रद्धा धर्मः

अंधश्रद्धांचा एक मोठा स्रोत म्हणून धर्माकडे पाहता येते. बहुतांश अंधश्रद्धांचा धर्माशी संबंध दिसतो. धर्माचे वा धार्मिक अंधश्रद्धांचे तीन भाग करता येतात. परंपरागत, वैयक्तिक व संघटनात्मक असे ते तीन भाग करता येतील. प्रत्येक धर्माला मूलतत्त्व असते (जे विविध पंथांमध्ये समान असते पण दोन धर्मांत असमान असते). एक ज्ञानी वा पुरोहितवर्ग असतो आणि एक सामाजिक अस्तित्व असते. यातील मूलतत्त्व हे वैयक्तिक, सामाजिक हे परंपरात्मक तर पुरोहितवर्ग हे संघटनात्मक अशी वर्गवारी करता येईल. सर्वसाधारणपणे सुधारणा (अंधश्रद्धानिर्मूलन) या प्रथम सामाजिक वा परंपरागत नंतर पुरोहितवर्गविरोधी व शेवटी मूलतत्त्वविरोधी असतात. पहिले दोन टप्पे हे चळवळीतून साधले जातात. तिसरा टप्पा वैयक्तिक असल्याने प्रत्येकाला तो आपापला गाठावा लागतो. सर्व धर्मांत एक समान धागा असतो असे म्हणता येईल. तो धागा म्हणजे मृत्यूनंतरचे जीवन असणे असे मानणे आणि ते जीवन सुखकर करण्यास ऐहिक जीवनात काहीतरी करता येते असे मानणे. सध्याच्या जीवनावर चांगला परिणाम करणारे काहीतरी धार्मिक कृत्य असते असे मानणे हाही अजून एक समान धागा आहे असे मानता येईल. धार्मिक तत्त्ववेत्ते मात्र याला गौण समजतात. धर्माची लोकप्रियता वाढण्यास याचाच मुख्य उपयोग असतो. अंधश्रद्धा व श्रद्धा यात तात्त्विक भेद करायचा झाल्यास ऐहिक जीवनात बदल घडवू पाहणाऱ्या असंबद्ध कृति/समजुती या अंधश्रद्धा प्रकारात मोडता येतील तर तथाकथित पारलौकिक जीवनातील बदल घडवू पाहणाऱ्या कृती/समजुती या श्रद्धा प्रकारात मोडता येतील. अर्थात हा श्रद्धा-अंधश्रद्धांचा वाच्यार्थ म्हणता येणार नाही.
धर्मांचे विभाग करता आले तर दोन होतील. एकात ईश्वराला व्यक्तिमत्त्व दिलेले आहे व तो एकच आहे. दुसऱ्यात असे काही नाही. ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम व काही हिंदू पंथ हे पहिल्या प्रकारात मोडू शकतात. अनेकेश्वरवादी हिंदू, अद्वैती, बौद्ध व जैन हे दुसऱ्या प्रकारात मोडतात. यातील ज्यू ख्रिश्चन व इरलाग हे धर्ग काही धार्मिक पुस्तके (जुना करार), विशिष्ट जगन्निर्मितीची व अंताची कल्पना मानतात म्हणून त्यांचा एक गट तयार होऊ शकतो. या तिन्ही धर्मांमध्ये संघटनात्मक बाबीदेखील इतर काही धर्मापेक्षा जास्त स्पष्ट आहेत. अकाली (शीख) व जैन हेदेखील संघटनात्मक बाबीत जास्त पुढे आहेत. हिंदू धर्माची निश्चित अशी संघटना दिसत नाही. अर्थात ऐतिहासिकरीत्या या बाबी नेहमीच सारख्या राहिलेल्या नाहीत. या संघटनांमुळे विवेकवादी चळवळी समोर कधी आह्वान उभे राहते तर कधी याच संघटना धार्मिक चळवळींचा कमजोर भाग बनतात.
प्रत्येक धार्मिक चळवळ ही कोणा लोकोत्तर माणसापासून तयार झाली असते. ही माणसे समाजाला नेतृत्व देणारी आणि लोकप्रिय असतात. यांच्या नावावरचे चमत्कार विचारात घेतले नाहीत तरी त्यांच्या बुद्धीची, न्यायप्रियतेची, दयाळूपणाची, ज्ञानाची चुणूक आपल्याला त्यांच्या चरित्रातून दिसते. बरेचदा त्यांचा लढा प्रस्थापितांविरुद्ध दिसतो. यादृष्टीने पाहिल्यास मासिस्ट दृष्टिकोणातून त्यांना क्रांतिकारी म्हणता येते. मात्र ह्याच्या विरोधात अशा महापुरुषांचे ज्ञानी अनुयायी ज्यांना हळूहळू पुरोहितवर्गात गणता येते असे असतात. म्हणजे हा वर्ग व्यवस्थेच्या बाजूने असतो, राज्यकर्त्यांसोबत असतो. राज्यकर्त्यांना धार्मिक अधिष्ठान देतो. तळागाळातल्यांना उपेक्षितो. हे सर्व नेहमीच असे होत नसले तरी ते बहुतांशाने खरे आहे. याचबरोबर काही चांगल्या गोष्टीही घडतात. म्हणजे हा वर्ग धार्मिक ज्ञानाचा एक साठा तयार करतो. हा वर्ग शिक्षित असल्याने इतर ज्ञानही त्यात जोडले जाते. धार्मिक चळवळीच्या प्रणेत्यांच्या वचनावर आधारित अशी एक नियमव्यवस्था बनवितो. बरेचदा त्या शिकवणीला तत्त्वज्ञानाची जोड देऊन एकसंधपणा आणतो.
धार्मिक चळवळ ही समाजातील चालीरीती, सण इ. शी फारशी फारकत घेत नाही. कित्येक धार्मिक सण हे त्या धर्मकालापूर्वीचे होते. याची उदाहरणे म्हणजे ख्रिस्ताच्या आधी ख्रिसमस व इस्टर, महमदापूर्वीपासूनची चालू असलेली मक्कावारी, अनेक हिंदू दैवते याच पद्धतीने धर्मात शिरलेली दिसतात. यात अलिकडचे उदाहरण म्हणजे साईबाबा. दिवाळी, पोंगल यांसारखे सण, बारसे, बाप्तिस्मा, मुंज, कम्युनियन यांसारख्या चालीरीती (अधिक माहितीसाठी रा. चिं. ढेरे यांचे लोकदैवतांचे विश्व, लज्जागौरी, इतर साहित्य वाचावे.) हिंदू धर्मात अशाच रीतीने आल्या असे जाणवते. यातील कित्येकांची सामाजिक गरज असते. पुरोहितवर्ग या सर्वांना एक धार्मिक अधिष्ठान देत असतो. या सर्वांमुळे धर्माच्या कक्षेत सर्वप्रकारचे ज्ञान, सामाजिक नियमव्यवस्था, सणउत्सवादी कृत्ये, सामाजिक चालीरीती आणि शेवटी पारलौकिक फायदा असे सर्व येऊन बसते म्हणून कित्येक धर्मपुरस्कर्ते धर्माला एक जीवनव्यवस्था म्हणवतात. अर्थात त्या सर्वांत काहीसे काळानुरूप चांगले असते. म्हणून सुधारणावादी चळवळींना विरोध होतो. या सुधारणा जीवनव्यवस्था बदलवणाऱ्या असतात असे वाटते. काही जण चांगल्या गोष्टींकडे पाहून वाईट गोष्टींमध्ये काहीतरी न समजलेला चांगला उद्देश आहे असे मानतात. यातून सर्व त्याज्य विरुद्ध सर्व ग्राह्य असा नाहक वाद घडतो. अर्थात काळ बदलत असल्याने त्याज्य परंपरा समाजातून दूर होत असण्याची प्रक्रिया पण चालूच असते.
परंपरागत अंधश्रद्धाः
शकुन-अपशकुन, भविष्यकथन, नवसादी कर्मे, आयुर्वेदादी परंपरागत औषध-उपचारपद्धती, योगादी तंदुरुस्त राहण्याची शास्त्रे, भूतखेत उतरवणाऱ्या व्यक्ती, मंत्रे व ठिकाणे, सर्पदंशासारख्या संकटांवर लागू पडणारे मंत्र, वास्तुशास्त्र अशा बाबी यात मोडतात. यातील बहुतेकांवर याच अंकात वेगळे लेख असल्याने यावर येथे सविस्तर लिहिण्याची गरज नाही. या सर्व गोष्टी धार्मिकतेच्या उंबरठ्यावरच्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळी व संघटित धार्मिक नेतृत्व या दोघांमध्ये बरेचदा परंपरागत अंधश्रद्धांवर वाद होत नाही. अनेकदा त्यांचे एकमत होते. विज्ञानाच्या कसोटीवर उतरणाऱ्या पारंपरिक समजुतींना वैज्ञानिक सत्य म्हणून मान्यता मिळणे हे साहजिक असते (जसे आयुर्वेदातील काही औषधे). त्याचबरोबर पारंपरिक अभिमानाला त्यातून पुष्टी मिळते. मात्र ज्याविरुद्ध अजून निर्णायक पुरावा मिळाला नाही अशा गोष्टींना मानण्याचा कल परंपराभिमान्यांकडून पहायला मिळतो. यातच ज्यांच्या विरोधात निर्णायक पुरावा आहे अशा गोष्टींना मानणे असे घडते.
परंपरा या आजच्या एकत्रित समूहाच्या असल्या तरी त्यांचा उगम विभिन्न समूहात घडलेला असू शकतो. याशिवाय त्याबद्दल कोणी एकत्रित विचार न केल्यामुळे त्यामध्ये खूप विरोधाभास सापडतो. असे विरोधाभास अंधश्रद्धा-निर्मूलनाचे कळीचे मुद्दे होऊ शकतात. म्हणून या अंधश्रद्धांचा अभ्यास जरुरी असतो. विभिन्न समाजातून आलेल्या असल्याने त्यांच्याबद्दल आत्मीयता ही समूहानुरूप वेगवेगळी असते. समाजातील तळागाळातल्यांच्या समजुती (उदा. वैदू, करणी, भगत, मांत्रिक, भानामती) या समाजातील अभिजनवर्गाच्या समजुतींपेक्षा फारशा भिन्न नसतात. (उदा. आयुर्वेद, यंत्र, मंत्र, स्तोत्र, शांत, श्राद्ध). यातील एकास अंधश्रदा म्हणण्यास फारसा विरोध नसतो. पण दुसऱ्यांच्या मागे संघटनात्मक पाठबळ उभे राहिलेले दिसते. पहिल्या वर्गात (गरीब दुबळ्यांच्या) परंपरागत अंधश्रद्धांचा व्यापक प्रसार झालेला दिसतो. तसेच गरिबांच्या असलेल्या अंधश्रद्धा कायम राखण्यात श्रीमंतांचे भले असते. दीनदुबळ्यांच्या अंधश्रद्धा या त्यांचे खूप नुकसान करणाऱ्या असतात. त्यांना प्रगतिशील आयुष्य जगू न देणाऱ्या असतात. म्हणून अंधश्रद्धांच्या चळवळी त्यांना एक नंबरचा शत्रू मानून काम करतात. यात फारसे वावगे नाही. मात्र त्याबरोबर संघटनात्मक वा पुरोहितवर्गमूलक अंधश्रद्धांना कमी लेखून चालणार नाही. या सर्व सधन व शिक्षित समाजातील असल्याने त्यांच्या समर्थनार्थ मोठे पाठबळ उभे राहिलेले दिसते. हे पाठबळ आधुनिक ज्ञानाचा, कायद्याचा, पैशाचा, लोकशक्तीचा आणि कधी कधी हिंसात्मक साधनांचा वापर करत असते.
संघटनात्मक अंधश्रद्धाः
धर्माच्या संघटनात्मक बाबीत धार्मिक विधी (जसे विवाह, अंत्यविधी, नमाज, बाप्तिस्मा, मुंज, यज्ञ), धार्मिक ठिकाणे व काही संकल्पना (कर्मसिद्धान्त), विश्वनिर्मितीचा सिद्धान्त) यांचा समावेश होतो. मूलतत्त्वापासून या बाबी थोड्याश्या वेगळ्या आहेत. धार्मिक मूलतत्त्वात ईश्वर अवतार, प्रेषित, मूळ धर्मग्रंथ आणि मरणोत्तर जीवनाच्या मूळ धार्मिक कल्पना अशा गोष्टींचा समावेश होतो. संघटनात्मक बाबतीत मुख्य खटकणारी गोष्ट म्हणजे पुरोहितवर्गाची मक्तेदारी. ही मक्तेदारी, हिंदूंमध्ये जातीशी निगडित असल्याने अधिक जास्त खटकणारी असते. पण तरीही इतर पुरोहितवर्ग यामध्ये मागे नसतो. एकेकाळी (काही प्रमाणात आताही) ख्रिश्चन, मुस्लिम, शीख धर्मगुरु हे राजकारणात नुसतेच सक्रिय नव्हते तर राज्यव्यवस्था चालवणारे होते. हा पुरोहितवर्ग समाजातील सधन वर्गातून येत असे.
धार्मिक मूलतत्त्व राखून पुरोहितवर्गाचे वर्चस्व अमान्य करणे ही प्रत्येक धर्मातील नवीन पंथाची सुरुवात असते. संघटनात्मक बाबीत पंथ हे एकमेकांपेक्षा भिन्न असतात. म्हणून काही जण त्यांना विभिन्न धर्म म्हणतात. सहसा अशा विभिन्न पंथांमध्ये आपसात लग्ने होत नाहीत म्हणून तसे म्हणणे फारसे चुकीचे ठरणार नाहीत. काही धार्मिक चळवळी (उदा. वारकरी, नाथपंथीय) अशी संघटनात्मक पायरी गाठत नाहीत मग त्यांना काय संबोधायचे असा प्रश्न राहतो.
पहिल्या वर्गातील अंधश्रद्धांमुळे त्या बाळगणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक नुकसान होऊ शकते. तर या वर्गातल्या अंधश्रद्धांचा वापर पुरोहित वा ज्ञानी वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी करीत असतो. यामुळे यांच्या प्रचारासाठी वैज्ञानिकतेचा, तंत्रज्ञानाचा, जाहिरातींचा वापर केलेला दिसतो. यातील एक उदाहरण म्हणजे सध्याचा क्रिएशनिझम. क्रिएशनिझम हे डार्विनच्या उत्क्रांतिवादाला आह्वान देण्यासाठी उभे केलेले एक बुजगावणे आहे. या बाजूने काम करणारे डार्विनच्या सिद्धान्तातील तपशिलावर आक्षेप घेतात. असे आक्षेप काढण्यात काही गैर नाही. विज्ञानाच्या प्रगतीत त्यांची मदतच होते. पण या आक्षेपांना दिलेल्या प्रत्युत्तरांचा वाद हा वैज्ञानिक माध्यमातून न घडता लोकप्रिय माध्यमातून घडताना दिसतो. या वादाच्या समर्थनार्थ केलेली विधाने वरकरणी वैज्ञानिक संकल्पनातून व्यक्त केलेली असतात, पण अशा वैज्ञानिक परिभाषेतील बाजू वैज्ञानिक तथ्यांवर आधारित नसतात.
आपल्याकडचे आधुनिक उदाहरण म्हणजे वैदिक गणित. या गणिताचा वेदांशी काहीही संबंध नाही. मूळ पुस्तकाच्या प्रस्तावनेतच तसे म्हटले आहे. या आधुनिक गणिताला वेदांचा मुलामा देऊन त्याची जाहिरातबाजी केली जाते. शिक्षणाच्या दृष्टीने यातील रीती नेहमीची गणिते सोडवण्यास फारश्या उपयोगी नाहीत. चीनी मणीपट्टी वा इतर मौखिक रीती यांच्यापुढे वैदिक गणित जात नाही. गोमूत्रापासून शीतपेय करायची योजना आहे असे ऐकिवात आहे. शंकराची पिंड आधुनिक अणुभट्ट्यांची प्रतिकृती आहे असे म्हणणे, ओम वा गायत्रीमंत्रातील नादाने शरीरात बदल घडून येतात असे म्हणणे, यज्ञाच्या धुराने पाऊस पडतो असे म्हणणे हे सर्व यातील प्रकार मानता येतील.
मूलतत्त्वजन्य अंधश्रद्धाः
यांमध्ये ईश्वर, आत्मा आणि मरणोत्तर जीवन या तीन संकल्पनांचा प्रामुख्याने समावेश होतो. याबद्दल याच अंकात सविस्तर मांडणी केली असल्याने येथे लिहिण्यासारखे फारसे राहात नाही. बहुतेक धार्मिक समजुतींना साक्षात्कार हा मुख्य आधार असतो. साक्षात्कार हा वैयक्तिक असल्याने त्याची वैज्ञानिक सार्वत्रिकता मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे विज्ञान धर्मापर्यंत पोहोचू शकत नाही असा रास्त आरोप केला जातो. साक्षात्कार/समाधी/मरणोत्तर सुखी जीवनापर्यंत नेणारा मार्ग म्हणजे धर्म असे सांगता येईल. या सगळ्यांत वैयक्तिक अनुभवास जास्त किंमत आहे. सार्वत्रिक अनुभवाच्या म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रात ते येतच नाही. मात्र याला निरुपाय नाही असे नाही. याला बरेच उपाय आहेत. प्रेषित मोहमदाना काही साक्षात्कार झाले. पण ते भूतयोनीमुळे झाले की देवदूतांमुळे झाले यात वाद संभवत होता. यातील काही ज्यांना सैतानाची वचने म्हणतात हे देवदूतांमुळे झाले नाहीत असे एकेकाळी मानले जाई. भगवान बुद्धाचे असे काही वाद आहेत की ज्यात ते दुसऱ्यांच्या साक्षात्कारासंबंधी अशीच शंका घेताना दिसतात.
माझे पोट दुखते आहे या माझ्या अनुभूतीला कोठलाच वैज्ञानिक पुरावा देता येत नाही पण ते सत्य असू शकते. माझ्या वैद्यकीय तपासणीत याबाबतीत कारण वा संभावना सांगता येतील. पण समजा तीही काही मिळाली नाही तरीही ते सत्य असू शकते. आता मी असे सांगण्याने माझा काही वैयक्तिक स्वार्थ साधला जात असेल तरी ते सत्य असू शकते. कित्येक रोग हे मानसिकतेने आलेले असतात. तेव्हा तशीही तपासणी होऊ शकते. अर्थातच प्रत्येक तपासणीनंतर अशा विधानाच्या सत्यासत्यतेबाबत शक्यता वर्तवली जाऊ शकते.
साक्षात्कार आणि चमत्कारांचे तसेच आहे. म्हणजे साक्षात्कारी पुरुषाला त्यासोबत जे ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान कधी कधी वैज्ञानिक पद्धतीने तपासता येते. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका डॉक्टरांनी असे जाहीर केले की त्यांनी साक्षात्काररूपाने चंद्रसफर केली. त्याचे वर्णनही त्यांनी केले. त्या वर्णनाची कक्षा विज्ञानात बसत असल्याने त्यांच्या साक्षात्काराबद्दल खरे खोटे सांगता येणे शक्य होते. त्या वर्णनात तफावत आढळू शकते मग या तफावतीच्या आधारे शक्यता वर्तवली जाऊ शकते. पूर्वजांनी केलेले साक्षात्काराचे वर्णन हे अशाच माहितीच्या आधारे तपासता येते. बायबलमधील विश्वनिर्मितीही वैज्ञानिकतेच्या आधारावर तपासता येते. पण कुठे केलेले स्वर्गाचे वा नरकाचे वर्णन हे विज्ञानाच्या कसोटीवर तपासता येत नाही. दोन व्यक्तींच्या साक्षात्कारांमधून वेगवेगळी माहिती बाहेर येते मग यातील एकावर निश्चित शंका व्यक्त केली जाऊ शकते.
शंका येणे व त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करणे हा एक वैज्ञानिक प्रगतीचा मार्ग आहे. मूलगामी स्वरूपाच्या संकल्पनांबाबत हा मार्ग घेण्यास कोणाची हरकत नसावी असे वाटते.