अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळींचा वेध

भाग तीनः कार्यकर्ते : व्यक्ती व संघटना
१९६७ ते १९८० दरम्यान आर्थिक, राजकीय घडामोडींना वेग आला होता. तरुणांची आंदोलने होत होती. नक्षलवादी चळवळीचा उगम, बिहार व गुजरातमधील आंदोलने याच काळातली. महाराष्ट्रात अशा अस्वस्थतेबरोबर, तरुण दलितांची चळवळ दलित पँथर, सामाजिक बदलाची चळवळ युक्रांद यांचे वारे वाहत होते. १९७४ मध्ये वरळीत दलित-सवर्ण दंगा झाला, यापुढे काहीच महिन्यांत दलित युवकांनी मराठवाड्यात सरकारी यंत्रणेविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. विविध पुरोगामी चळवळी यावेळी कार्यरत होत्या. ज्यांतील काही नावे पुढीलप्रमाणे : रॉयिस्ट, राष्ट्र सेवा दल, सर्वोदयी, सत्यशोधक समाज, आंबेडकरांचे अनुयायी, भूमिसेना, ग्रामस्वराज्य समिती, मागोवा, शहादा तळोदा गट, छात्र युवा संघर्ष वाहिनी, यूथ ऑर्गनायझेशन, क्रांतिकारी महिला संघटना. समाजवादी पक्षातील बाबा आढाव (हमाल पंचायतचे संस्थापक) यांनी सत्यशोधक चळवळीला नवीन चालना दिली. त्यांनी महात्मा फुले समता प्रतिष्ठान सुरू केले ज्यातून पुढे विषमता निर्मूलन समिती स्थापन झाली. त्यांनीच झी-डलळशपलश रपव एरिश्रळीं अलींळेप गाळींशश नावाची संघटना स्थापली. नरेंद्र दाभोलकरांची समाजवादी युवक दल म्हणून संघटना होती. कुमार सप्तर्षी, कुमार शिराळकर, सुधीर बेडेकर, सुभाष जोशी, अमर हबीब इत्यादींचे कार्य यात महत्त्वाचे होते. यातूनच समता आंदोलन नावाची चळवळ सुरू झाली.

अशा संघटनांनी अघोरी चालीरीतींविरुद्ध लढा पुकारला होता. त्यांनी मध्ययुगीन समाजघडण, मूल्ये, चालीरीती टाकून देण्यासंबंधी विविध कार्यक्रम केले. सरंजामशाही, पुरोहितशाही, वैदिक कर्मकांडे, सत्यनारायण यांविरुद्ध आवाज उठविला. सामाजिक क्षेत्रातील देवदासी पद्धत, पोतराज, निर्वस्त्र राहून देवीची पूजा करणे, वाघ्या मुरळी, जटा, महानुभाव पंथातील कृष्णाशी विवाह करण्याची पद्धत अशा गोष्टींविरुद्ध आंदोलने केली. चौगुले व डॉ. आनंद वसकर यात सहभागी होते. याचबरोबर भोंदूबाबांविरुद्धदेखील यातील काही चळवळी लढा पुकारत असत. हुंडा, लग्नविधी आणि त्यातली जात बंधने, सती, अस्पृश्यता यांवर या संघटना क्रियाशील होत्या. ‘एक गाव एक पाणवठा’सारखी चळवळ ही यातलीच. यातील कम्युनिस्ट सोडले तर इतरांना वर्गसंघर्षाची चळवळ अपुरी वाटत असे. वर्गसंघर्षाचे तत्त्व मान्य असले तरी मुख्यतः गांधी व जयप्रकाश नारायण यांच्या प्रभावामुळे या चळवळी अहिंसेला मूल्य मानत असत. अशा वैचारिक मतभेदामुळे पुढे अंधश्रद्धा निर्मूलनाची एक नेमके उद्दिष्ट असलेली चळवळ उभी राहिली (ज्यात अशा मतभेदांना स्थान नव्हते).

विज्ञानातून सामाजिक परिवर्तनाकडे जाणाऱ्या चळवळी याचदरम्यान प्रसार पावत होत्या. केरळ शास्त्र परिषद, मराठी विज्ञान परिषद, प्रयोग परिवार, महाराष्ट्र रशनॅलिस्ट असोसिएशन, बुद्धिप्रामाण्यवादी मंच याच दरम्यान कार्यरत होता. लोकविज्ञान संघटना ही यातील एक महत्त्वाची संघटना. अंधश्रद्धेविरुद्ध ही संघटना लोकजागृती करत असे. १९८२ मध्ये महाराष्ट्र विज्ञान जत्रा मोठ्या जोरात काढण्यात आली. बी. प्रेमानंदांच्या दौऱ्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळींना विशेष जोर चढला. विज्ञान यात्रा विदर्भ व मराठवाड्याचा काही भाग सोडल्यास सर्वत्र पोचली होती. अनेक मान्यवरांनी ज्यात लक्ष्मणशास्त्री जोशी होते, यास पाठिंबा दिला. एकंदर ४५ ठिकाणी या यात्रेचे विशेष स्वागत केले गेले. यानंतर प्रेमानंदांनी विदर्भ दौरा केला. कोल्हापूरमध्ये विज्ञानप्रबोधिनी, साताऱ्यातील डॉ. दाभोळकरांची स्वागत समिती, नागपुरातील नागेश चौधरी, सुधाकर जोशी, डॉ. पांडे यांचा या यात्रेत सहभाग होता. श्याम मानव यावेळी प्रेमानंदांसोबत गुजरात दौऱ्यावर गेले. या सुमारास ते तरुण शांतिसेनेचे कार्यकर्ते होते व साप्ताहिक मनोहरमध्ये काम करीत. या सर्वांची परिणती म्हणजे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना ज्याचे अध्यक्ष मुकुंदराव किर्लोस्कर होते.

श्याम मानव हे यवतमाळ जिल्ह्यातील एका खेड्यातून आले. लहानपणी घरात व परिसरात असलेल्या मांत्रिकी वातावरणाने ते प्रभावित झाले होते. पुढे जयप्रकाश नारायण, दादा धर्माधिकारी, चंद्रशेखर पांडे आदींच्या विचारप्रभावामुळे व स्वतःच्या अभ्यासामुळे विवेकवादी बनले. कोवुरांच्या पुस्तकांच्या प्रभावामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करण्याचे ठरवले. कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर, प्रात्यक्षिकांसह व्याख्यान, भोंदूबाबा, तांत्रिक मांत्रिकांचा भांडाफोड करणे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे रहस्यमय गोष्टींचा अभ्यास करून सत्य बाहेर आणणे अशा प्रकारच्या कामातून समितीचे कामकाज चालते. चमत्कार करून दाखविणाऱ्या बाबाला २ लाखाचे आव्हान देते. खटोली बाबा, लष्करीबाबा, गिरिपुंजे महाराज, नकली शेख फरीद बाबा आदी अनेक बाबांचा त्यांनी भंडाफोड केला आहे. केवळ अंधश्रद्धांच्या बाबतीत नव्हे तर जीवनाच्या विविध क्षेत्रांकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवणे, हे समितीचे लक्ष्य आहे. त्यासाठी प्रबोधनात्मक व संघर्षात्मक कार्यक्रम हाती घेतले जातात.’

भारतातील इतर संघटना
फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन ही भारतातील विवेकवादी चळवळींची शिखर संघटना आहे. मंगलोरचे नरेन्द्र नायक यांचे यात मोठे योगदान आहे. भारतातील प्रत्येक प्रांतात विवेकवादी चळवळी कार्यरत आहेत. बिहार, पंजाब, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक इत्यादी प्रांतात त्या विशेषतः काम करतात.

४ ऑक्टोबर २००९ ला प्रेमानंदांचे निधन झाले. १९७५ पासून ते विवेकवादी चळवळीत कार्यरत होते. त्यांचे चमत्कार प्रात्यक्षिकांचे दौरे, इंडियन स्केप्टिक हे नियतकालिक, त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके याला जवळपास तोड नाही. त्यांच्या व्यवसायातून येणारा पैसा ते आपल्या समाजकार्यासाठी आणि लोकशिक्षणासाठी खर्च करत. त्यामुळे ते स्वतः एका संस्थेसारखे होते असे म्हणायला हरकत नाही. गुरु बस्टर्स माहितीपटात त्यांच्या सहज प्रात्यक्षिकांची एक झलक पहायला मिळते. त्यांची राहणी अतिशय साधी आणि प्रभावित करणारी होती. त्यांच्या दौऱ्यातून देशभरातल्या कित्येक विवेकवादी जनचळवळींना प्रेरणा मिळाली. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संपर्क ठेवला होता.

तर्कशील सोसायटी ही मुख्यत्वेकरून पंजाब व हरियाणात कार्यरत आहे. सुमारे १०० शाखा, ३० पुस्तके, पंजाबी व हिंदीतून तर्कशील नियतकालिक असा तिचा पसारा आहे. १९८४ साली अब्राहम कोवून यांच्या बिगॉन गॉडमेन नावाच्या पुस्तकाचा पंजाबी अनुवाद प्रकाशित झाला व या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेचा प्रसार इंग्लंड व कॅनडात झाला आहे. चमत्कार प्रात्यक्षिके आणि जोडीला व्याख्यान अशा रीतीने ते कार्यक्रम करतात. दरवर्षी तर्कशील मेळा भरवतात. तर्कशील सोसायटी पंजाब यांचे हिंदी नियतकालिक हे वाचनीय असतात. भगतसिंगाचे मी नास्तिक का आहे हे पुस्तक, कोवूरांची पुस्तके अशा अनेक तहांनी त्यांचा प्रचार चालू असतो. (https://tarksheel.org/) (बलविंदर बर्नाला यांच्या संपर्कातून मिळालेली माहिती.)

जागतिक संघटना
बहुतांश प्रगतशील देशांमध्ये स्केप्टिक, ब्राईट, CSICOP आदी नावांनी या संघटना काम करतात. वेबसाईटस (आंतरजालावरील संस्थळे), नियतकालिके, लोकप्रबोधन, आव्हान प्रक्रियेतून लोकसंवाद आदी मार्गांनी ती कार्यरत असतात. स्केप्टिक्स डिक्शनरी, जेम्स रंडी यांचे आव्हान, नियकालिकात स्केप्टिकल इंक्वायरर, स्केप्टिक ही यातील विशेष प्रसिद्ध आहेत.
http://www.csicop.org/resources/international_organizations या संस्थळावर याबाबतची माहिती मिळते.