अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची चळवळ

विवेकवादाच्या चळवळीत शासन आणि न्यायव्यवस्था ह्यांचा काय सहभाग असतो, समाजसुधारक आणि सामाजिक संस्था ह्यांना काय तडजोडी करायला लागतात आणि विरोधकांची त्यामध्ये काय भूमिका असते असा सर्व अंगाने अंनिसच्या कायदाविषयक चळवळीचा अभ्यास केला तर ते उद्बोधक ठरेल.
अंनिस १९९० पासून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. ह्यात शासनाची चालढकल अशी राहिली. एका राजवटीत १९९५ मध्ये कायद्याचे अशासकीय विधेयक विधानपरिषदेत प्रचंड बहुमताने मंजूर झाले परंतु कायद्याची प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. नंतर दुसरी राजवट आली. त्यांनी १५ ऑगस्ट २००३ ला ‘जादूटोणाविरोधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य’ अशी जाहिरात करून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. २००५ मध्ये विधानसभेत सत्तारूढ पक्षातीलच काहींनी त्याला विरोध केला. परिणामतः त्यातील काही कलमे गाळण्यात येऊन तो सौम्य करण्यात आला. त्यातील स्वयंसेवासंस्थांच्या सहभागाची तरतूद काढून टाकण्यात आली आणि सुधारित कायदा २००५ मध्ये विधानसभेत मंजूर करण्यात आला. विधानपरिषदेत त्याला मंजुरी देणे हा केवळ औपचारिकतेचा भाग होता. कायद्याचा मसूदा नामवंत विधिज्ञ, वरिष्ठ पोलिस अधिकारी, शासनाचा सामाजिक न्याय विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग व इतरांनी मान्यता दिलेला होता. तरीही विधानपरिषदेतील अध्यक्षांनी तो संयुक्त चिकित्सा समितीकडे धाडला आणि समितीने दोन वर्षात एकही बैठक भरविली नाही. विधानसभा, विधानपरिषदेतून शासकीय कौल मिळूनही कायद्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची राजकीय इच्छाशक्ती कुठल्याही पक्षाने दाखविली नाही. कुठल्याही चांगल्या, वाईट बदलाला विरोध हा असणारच परंतु त्याला न जुमानता आपल्या ध्येयधोरणांवर दृढविश्वास दाखविणे मतांच्या मिंध्या शासनाला जमत नाही. जेव्हा राज्यकर्ते केवळ सत्तेच्या मागे असतात तेव्हा सर्व निर्णय राजकीय सोय बघून घेतले जातात असे सगळीकडे आढळून येते. ‘बाईला जिवंतपणी जाळीत असतील तर ते थांबविणे राज्यकर्त्यांचे काम आहे’ अशी धीट भूमिका घेऊन सनातन्यांच्या विरोधाला न जुमानता १७५ वर्षांपूर्वी सतीचा कायदा करणारा व्हाईसरॉय लॉर्ड बेंटिंक हा अपवादात्मक होय.
कायद्याच्या या लढ्यात अं.नि.समितीने आपली बौद्धिक, आर्थिक आणि शारीरिक शक्ती खर्च केली. त्यातून समाजप्रबोधन झाले. संघटना बळकट झाली, विस्तारली. उपोषण करणे, स्वतःच्या थोबाडीत मारून घेणे, रक्ताने पत्रे लिहिणे, काळ्या बाहुलीची सरशी झाली हे बघवत नाही म्हणून डोळ्याला काळी पट्टी लावणे असे आगळे-वेगळे विविध निषेध कार्यक्रम जिल्ह्या जिल्ह्यातून आयोजित केले गेले. त्यातून जनमताचा रेटा निर्माण झाला. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, जनसामान्यांचे जीवन मुश्कील करणे हे निषेध दर्शविण्याचे धोपटमार्ग समिती अनुसरत नाही हे तरुण कार्यकर्त्यांच्या मनावर ठसले. गोपाळ कृष्ण गोखले सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा व्हावा म्हणून प्रयत्न करीत होते. तो अजूनही प्रत्यक्षात आला नाही. कायद्यासाठीचा लढा नेहमीच असा दीर्घकाळ चालणारा, वेळखाऊ असतो हे लक्षात आले आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली.
हिंदुत्वाचा झेंडा मिरविणाऱ्या संघटनांनी ‘या कायद्याने हिंदूंच्या धर्माचरणात बाधा येते’ असा अत्यंत खोटा, खोडसाळ प्रचार केला. फॅसिस्ट वृत्तीच्या ह्या लोकांनी गोबेल्स तंत्राचा अवलंब केला. खेड्यापाड्यापासून शहरापर्यंतच्या आपल्या प्रत्येक कार्यक्रमांतून, आपल्या दैनिकांतून, लाखोनी पत्रके वाटून आपली प्रचारयंत्रणा कायद्याच्या विरोधात पुरेपूर राबविली. कायदा झाला तर तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करता येणार नाही, ज्ञानेश्वरी वाचता वा छापता येणार नाही, वारीला जाता येणार नाही इत्यादी हास्यास्पद गोष्टी ह्या प्रचारात पुनः पुनः सांगितल्या गेल्या. अशा त-हेचा विरोध हिंदू धर्माच्या प्रगत बुद्धिवादी परंपरेला अशोभनीय होता.
वेड्या माणसाला भूतबाधा झाली म्हणून साखळीने बांधणे; चमत्काराचा दावा करून लोकांना फसविणे; दैवी कृपा मिळविण्यासाठी जीवघेण्या जखमा करणे; गुप्तधनासाठी नरबळी देणे ; अतींद्रिय शक्तीचा दावा करून भीती दाखविणे; एखाद्या व्यक्तीला सैतान ठरविणे; एखादी व्यक्ती करणी, चेटूक करते असे सांगून त्या व्यक्तीची नग्न धिंड काढणे; एखाद्याला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून अघोरी उपाय करायला लावणे; विषबाधेवर गंडा, दोरा, मंत्र-तंत्र करणे; बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणे; पूर्वजन्मीचा दाखला देऊन लैंगिक संबंध ठेवणे; इत्यादी उघड उघड अंधश्रद्धेचे एकूण १२ प्रकार आता कायद्यात उरले आहेत. ह्यातला कुठला प्रकार हिंदू धर्मांतर्गत मोडतो असे ह्या हिंदुत्ववाद्यांना कुणीही खडसावून विचारले नाही. ह्या हिंदुत्ववाद्यांनी आता सामाजिक समता आणि बंधुभावाबाबत संतांची परंपरा सांगणाऱ्या वारकरी पंथातही शिरकाव करून घेतला आहे. ‘वाजे पाऊल आपुलें, म्हणे मागे कोण आलें ?’ ‘नवसासायासे पुत्र होती, तरी का करणे लागे पती’ अशी परखड वचने सांगणाऱ्या संतांच्या पालख्या मानाने मिरविणारे वारकरी जेव्हा ह्या कायद्याच्या विरोधात घोषणा देऊ लागले, ‘रास्ता रोको’ करू लागले तेव्हा विवेकवादी चळवळ चार पाउले मागे गेली.
सर्वसामान्य जनता विद्वेषी हिंदुत्वाच्या पारड्यात मत टाकणारी नाही हे सरकारला अजून उमजले नाही. तिघा जणांना फाशीची शिक्षा झालेले सिंधुदुर्गातील नांदोस येथील ‘पैश्याचा पाऊस पाडण्याचे’ प्रकरण, अमरावतीला दलित भगिनीला चेटकीण ठरवून तिची काढलेली नग्न धिंड, मुरबाडला गुप्तधनाच्या शोधात दिलेला लहान मुलीचा नरबळी ह्या अलिकडच्या घटनांबाबत आमजनतेशी संवाद साधला तर लक्षात येते की जनता ह्या अंधश्रद्धांच्या विरोधात ठाम आहे आणि संबंधित पीडित व्यक्तींची कीव करते. परंतु राजकीय पक्ष असंघटित जनसामान्यांच्या ह्या मानसिकतेबाबत अनभिज्ञ आहे. त्यांनी वारकऱ्यांच्या निषेधाचा धसका घेतला आहे.
सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी न्यायव्यवस्था व शासन फार काही करू शकत नाही. आणि आपले समाजजीवन न्यायव्यवस्थेवर किती सोपवावे ह्याबाबतही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. बालविवाह, भ्रूणहत्या, हुंडापद्धती ह्याबाबत कायदे असूनही हे प्रकार थांबले नाहीत. ते कमी होण्यामागे कायद्यापेक्षाही सामाजिक दबावाचा भाग अधिक आहे. कायद्यामुळे सामाजिक दबाव वाढतो हे मात्र मान्य करायला हवे. विवेकवादी चळवळीचा इतिहास
सत्य हे बुद्धिवादाखेरीज प्राप्त होत नाही. अशा बुद्धिवादाचा आणि विवेकी विचाराचा आजतागायतचा आढावा घेताना भारतातील ऋग्वेदकालीन वैदिक संस्कृतीपासून ते विसाव्या शतकातील समाजसुधारकांपर्यंतचा काल विचारात घेता येईल. त्याची स्थूलमानाने कालानुसार मांडणी खालीलप्रमाणे करता येईल. इ.स.पू.१५०० चा वैदिक काल, इ.स.पू.१००० चा लोकायतवाद, इ.स.पू.७०० चे बुद्ध धर्माचे तत्त्वज्ञान, त्यानंतर जैन धर्म, कर्मकांडयुक्त ब्राह्मणी धर्माचे पुनरुत्थापन, उत्तरेतील सूफी तत्त्वज्ञान, दक्षिणेत १२ व्या शतकातील संत बसवेश्वर, इ.स.१५०० मध्ये संत कबीर, इ.स.१३०० ते इ.स.१७०० दरम्यान ज्ञानेश्वर, तुकाराम आदि संत आणि त्यानंतर १९ व्या व २० व्या शतकातील समाजसुधारक, लेखनाद्वारे केलेला विवेकी विचारांचा प्रसार व आजच्या अंधश्रद्धानिर्मूलनाच्या चळवळी असा कालक्रम घेता येईल.
‘विवेकवादी चळवळ’ कशाला म्हणायचे
अंधश्रद्धांचे मूळ हे अज्ञानात असते. हितसंबंधीय ह्या अंधश्रद्धा टिकून राहाव्या म्हणून प्रयत्न करतात. युक्त्या काढतात. आणि सश्रद्ध (की भोळ्या ?) लोकांचे शोषण करतात. न्याय, नीतीची चाड अनुस्यूत असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रसार करून अधिकाधिक लोक आपल्या जीवनात विवेकवाद कसा स्वीकारतील ह्यासाठी त-हेत-हेने प्रयत्न करणे म्हणजेच विवेकवादाची चळवळ होय. ही चळवळ तीन प्रकारची असू शकते. एक वैचारिक स्तरावर मौखिक चळवळ, दुसरी लिखाणातून प्रसार करणारी व तिसरी वैयक्तिक अथवा संघटनात्मक कृती करणारी चळवळ. विवेकवादाच्या ह्या चळवळी विवेकवादाकडे जाणाऱ्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असतात. शंभर टक्के विवेकवादाचा दावा करणे हीच एक अंधश्रद्धा ठरेल. विवेकवादात अंतर्भूत अशा नीतिमूल्यांची अनेक अंगे असतात त्यामुळे त्यात लवचीकता येते. सत्य हे ‘अंतिम सत्य’ नसते त्यात कालानुसार व अनुभवाने बदल संभवतो. विवेकवादी चळवळीचा अभ्यास करताना ह्याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
विवेकवादाची सुरुवात
प्रश्न विचारून आपले जीवन व सभोवतालचे जग ह्याचे स्वानुभवाने आकलन करून घेणे हे वैज्ञानिक दृष्टिकोणाचे एक लक्षण मानले तर अशा त-हेचा मानवी संस्कृतीच्या ज्ञात इतिहासातील पहिला प्रयत्न भारतात सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी झाला. ‘हे विश्व केव्हा, कुणी व कसे निर्माण केले की हे आपोआप निपजले ? देव विश्वनिर्मितीनंतर आले का?’ अशा मूलगामी प्रश्नांचा ऊहापोह जगातील प्राचीनतम ग्रंथ जो ऋग्वेद त्यात आढळून येतो. संशयवादाची ही सुरुवात होती असे म्हणता येईल. ऋग्वेदाच्या १० व्या मंडळात वैदिक ऋषी एकीकडे श्रद्धादेवीची प्रार्थना करतात. परंतु संशयाची आणि आक्षेपांची माला चालूच राहते. ‘सुरुवातीला सृष्टीत देव नव्हता. ईश्वर, आत्मा इत्यादी सनातन, नित्य असे काही असत नाही’ असे पण ते प्रतिपादन करतात. याचवेळी चार्वाकवादाचा जन्म झाला आणि वैज्ञानिक दृष्टिकोणाचे बीज पेरले गेले.
लोकायतवाद चळवळ
चार्वाकाच्या तत्त्वज्ञानाचे सर्वांत प्राचीन नाव ‘लोकायतवाद’ असे आहे. चार्वाकमताचा पहिला तत्त्वचिंतक बृहस्पति त्याचे हे नाव असावे असे इतिहासकार मानतात. तर्कशुद्ध विचारपद्धतीने मांडलेले इहवादाचे हे तत्त्वज्ञान इ.स.पू.६०० वर्षांपर्यंत एक सुस्थापित चार्वाकवादी तत्त्वज्ञान म्हणून नावारूपास आले. आणि इ.स.१३०० नंतरही चांगलेच प्रचलित होते. उपनिषदातील आस्तिक दर्शनांचा उगम बरेचदा चार्वाकवादी नास्तिकांचा प्रतिवाद करताना झाला आहे. चार्वाकांचे तत्त्वज्ञान सांगते, प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. देह आणि आत्मा एकच आहे. स्वर्ग, नरक व पुनर्जन्म नाही. मरण हाच मोक्ष. वर्णभेद, जातिभेद अशास्त्रीय आहेत. पातिव्रत्य वगैरे मूल्य स्त्रीस्वातंत्र्यघातक आहेत. वरचे तूस काढून जसा आपण भात खातो त्याप्रमाणे दुःख दूर करून सुख उपभोगावे.’ स्वर्गातील पितरांना जर येथून पिंड देता येतो तर प्रवासाला निघताना शिदोरी घेण्याची काय गरज? मृत्युपश्चात् जर देह परलोकात जातो; तर तेथून परत आलेला, कुणीच कसा भेटत नाही. अशासारखा बिनतोड युक्तिवाद चार्वाकवादी करतात. ‘बहुजनांच्या हितासाठी चार्वाकमताचा आश्रय घेणेच श्रेयस्कर’ हा त्यांचा दावा रास्त वाटतो. व्याकरणकार पाणिनी व ‘अर्थशास्त्र’कार कौटिल्याच्या ग्रंथातून ‘लोकायत’शास्त्राला योग, सांख्य आदि दर्शनांच्या बरोबरीचा मान होता. महाभारतातही वेदोपनिषदातील पंडितांच्या बरोबरीने लोकतत्त्वज्ञानाचाही गौरवपूर्वक उल्लेख असे. बृहदारण्यक उपनिषदांत याज्ञवल्क्य प्रश्न टाकतात. ‘वृक्ष मुळापासून तोडला तर त्याला फूट येत नाही. मनुष्य मृत्यूने तोडला असता, कोणत्या मुळापासून उत्पन्न होणार? त्याला पुन्हा जन्म कोण देणार ?’ तत्त्ववेत्ते निरुत्तर होतात. विज्ञान हेच आनंदरूपब्रह्म होय’. असे ते ठासून सांगतात. ‘माणूस मेल्यावर प्राण दुसरीकडे जात नाहीत. तिथल्या तिथे नष्ट होतात. असे म्हणता तर मग मृत्यूपश्चात उरते ते काय ?’ ह्या प्रतिप्रश्नाला, त्याचे नाव तेवढे शिल्लक राहते. नाव राहणे हेच अमरत्व असे सांगून याज्ञवल्क्य सभा जिंकतात आणि त्यांना चार सहस्र गोधन आणि आठ सहस्र सुवर्णांचे बक्षीस मिळते. भौतिकवादाच्या अध्यात्मवादावरील विजयावर शिक्कामोर्तब होते.
रामायणात जाबाली नावाचा चार्वाक पंडित प्रत्यक्ष रामाला, रामायणाच्या महानायकाला उपदेश करतो. आपल्या पित्याला दिलेल्या वचनाचे पालन करायचे म्हणून राम वनवासात निघाला असतो. जाबाली म्हणतो, ‘तुझ्या अनुभवांवरच तू अवंलबून रहा. मानवी आकलनाच्या जे बाहेरचे आहे त्याची खंत तू करू नकोस. अयोध्या नगरीला तुझी गरज आहे तेव्हा सारासार विचार करून तू वनवासाचा विचार सोडून दे.’ ‘देवपूजा, यज्ञ, आहुति, दक्षिणा आणि जपतप हे धर्मातील आदेश म्हणजे धूर्त ब्राह्मणांनी जनतेवर सत्ता गाजविण्यासाठी केलेल्या क्लृप्त्या आहेत. श्राद्धादी प्रकार ही अन्नाची नासाडी होय.’ अशी परखड टीकाही तो करतो. रामायणावर बंदी किंवा त्याची होळी, वाल्मिकी ऋषींवर बहिष्कार असे प्रकार तेव्हा आढळत नाहीत. वैचारिक सहिष्णुता हे विवेकवादाचे महत्त्वाचे अंग आहे. तात्पर्य हे की पाणिनी, कौटिल्य, महाभारतरचना ह्यांच्या काळात नास्तिक लोकायत शास्त्र ही महत्त्वाची विद्या म्हणून वैदिक आर्यांच्यामध्ये प्रतिष्ठा पावली
होती. चार्वाकवादाचा संघटित प्रचार झाला नाही.
आज विज्ञानात प्रचलित असलेली चिकित्सक, विश्लेषणात्मक विचारपद्धती चार्वाकवाद्यांनी प्रथम मांडली. ह्यूमपासून रसेलपर्यंतचे आधुनिक पाश्चिमात्त्य विचार चार्वाकांच्या पुढे गेलेले नाहीत. आजचे प्रगत तर्कशास्त्रही चार्वाक विचारपद्धतीशी सुसंगत आहे. चार्वाकवादाला एक तत्त्वज्ञान म्हणून मान्यता मिळाली तरी राजाश्रय अथवा लोकाश्रय मिळाला नाही. त्यांचे सर्व ग्रंथ नष्ट झाले (की केले ?). तत्त्वज्ञानाचे विकृतीकरण केले गेले आणि जास्तकरून हेटाळणीच वाट्यास आली. आपल्या विचारांचा पद्धतशीर, संघटित प्रचार करण्याची तसदी चार्वाकवाद्यांनी घेतली नाही. त्यांच्या तत्त्वज्ञानातील ‘सुखाने जगा’ हा मंत्र तेवढा उच्चवर्गाने घेतला. परंतु एकंदरीत समाज कर्मकांड, आत्मा, मोक्ष, कर्मविपाक ह्या भोंगळ कल्पनांत रमला.
नीतिमत्तेची कठोर बंधने
पाळण्याऐवजी दिवसभर हवे ते करावे व नंतर घटकाभराच्या पूजेने त्याचे परिमार्जन करावे हा सोपा मार्ग स्वीकारला गेला. आपले इहवादी विचार समाजजीवनात उतरविण्याचे कष्ट चार्वाकवाद्यांनी घेतले नाहीत. ते अधिकतर वाचिवीर राहिले. ह्याला एक अपवाद इ.स.पू.५५० मधल्या अजित केशकाम्बली यांचा! ह्या भटक्या पंडिताने पायपीट करून प्रचारासाठी संघटित पंथ निर्माण केला. ब्राहाणशाहीविरोधात जोरदार बंड केले. त्याच्यामागे कांबळ पांघरलेल्या शिष्यांचा घोळका असे. त्यावरून त्याचे केशकाम्बली नाव पडले.
विवेकवाद आणि भौतिक प्रगती
लोकायतवादाचा प्रभाव दीर्घकाल टिकून होता. सातव्या शतकात भारतात आलेल्या ह्युजेन त्संग ह्या चिनी प्रवाशाने ह्याबाबत लिहिले आहे. बनारसमध्ये बरेच निरीश्वरवादी व्यापारी त्याला आढळून आले. दुतर्फा झाडे लावलेले व जागोजागी खुणांच्या पाट्या असलेले राज्यमहामार्ग तेव्हा होते. वाटेवर खानावळी आणि आरोग्यकेन्द्रांची सोय असे. त्यामुळे प्रवास सुलभ होत असे. विभिन्न सामाजिक घटकांमध्ये अभिसरण होते. युद्ध करण्याचे पण सुबुद्ध नियम होते. नागरी जीवन व संपत्तीला हानी पोचणार नाही तसेच युद्धात शेतीचे नुकसान होणार नाही ह्याची काळजी घेतली जात असे. युद्धात भाग न घेणाऱ्यांना तसेच स्त्रिया, वृद्ध व मुले ह्यांना युद्ध क्षेत्रातून सुरक्षितपणे बाहेर पडण्याची संधी दिली जाई. त्याकाळच्या वैज्ञानिक प्रगतीचा प्रभाव शिल्पकला, साहित्य, चित्रकला इत्यादी क्षेत्रांतही दिसून येतो. ११ व्या शतकात इराणी खगोलअभ्यासक अल् बेरुनीने संस्कृतमधील शास्त्रविषयक ग्रंथांचे अरेबिकमध्ये भाषांतर केले. अरबी आणि इराणी संशोधकांनी प्राचीन भारताच्या गणित आणि खगोलशास्त्रातील योगदानाची महती मान्य केली. जेव्हा विवेकवादाला समाजात मान्यता होती, विरोधाची धार बोथट होती तेव्हा भौतिकशास्त्रे विकसित पावली. शवविच्छेदन, आहारशास्त्र, रुग्णसेवा अंतर्भूत असलेले आयुर्वेदशास्त्र प्रगत झाले. प्राचीन भारताने गणित व इतर वैज्ञानिक क्षेत्रात जी प्रगती केली त्याचे मूळ त्या काळच्या ‘संशयवादी’ परंपरेत आहे. रूढ विचारांना धक्का देणाऱ्या, सतत प्रश्न विचारणाऱ्या पूर्वग्रहमुक्त बुद्धीलाच नव्या शोधांचे वेध लागतात. तर सनातनी विचारसरणी त्याला विरोध करते असे दिसते. एकीकडे खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट, जग सूर्यकेन्द्रित आहे हे सांगणारा वराहमिहिर, पृथ्वीचा व्यास मोजणारा ब्रह्मगुप्त आणि वनस्पतींचे वर्गीकरण करणारा अमरसिंह उदयास आले तर दुसरीकडे चर्चचे आधिपत्य असलेल्या रोमन राज्यात ब्रुनो, कोपर्निकस आणि गॅलिलिओ ह्यांचा सनातन्यांनी छळ केला.
विवेकवादाचा पडसाद प्राचीन तांत्रिक पंथांतूनही दिसून येतो. देव, देवता, पुनर्जन्म ह्यांवर विश्वास न ठेवणाऱ्या तांत्रिकांचा एक ‘देहसत्य’ पंथ बंगाल, बिहार, आसाम या प्रदेशांमधील बहुजनसमाजात प्रचलित होता. मानवी प्रजोत्पादनावरून धडा घेऊन त्यांनी शेतीपद्धती व शेतीअवजारांत सुधारणा केली. एका अर्थी ते तंत्रज्ञ होते. योग, आयुर्वेद मानणारा हा पंथ बंगाली फकीर, लालन फकीर ह्यांच्या लोकसंगीताच्या मौखिक परंपरेने आजतागायत जागृत आहे.
बौद्ध आणि जैन धर्म
देव, धर्म नाकारूनही सदाचरण, नैतिकता शक्य आहे हे इ.स.पू. ७ व्या शतकात निर्माण झालेल्या बौद्ध धर्माने सांगितले. बौद्ध आणि जैन धर्माने यज्ञसंस्थेला विरोध केला. जन्मजात विषमता मानणारी समाजरचना नाकारली. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला हादरा बसला. परंतु निर्वाण, पुनर्जन्म, स्वर्गनरक ह्यातून लोकांना बाहेर काढले नाही. वेदप्रामाण्य नाकारले पण शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य इतक्या वाईट रीतीने आणले की फक्त तीर्थंकरांची वचने तेवढी खरी; बाकी रामायण, महाभारत, गणित, व्याकरण सर्व मिथ्या ठरविले. सामान्य माणसाला ऐहिक जीवनाबद्दल खजील केले. त्यामुळे ब्राह्मण गेले पण त्या जागी मुनी आणि भिक्षु आले. संन्यासधर्म लोकांना पेलवला नाही. भिक्षुकसंघात अनाचार वाढला, ढोंगीपणा वाढला. ऐहिक जीवनात सुखाने राहण्याची शिकवण देणाऱ्या लोकायतवादाला तुच्छ लेखले गेले. ‘कावळा पांढरा असतो’ अशासारखे विधानही हे लोकायतवादी उद्या सिद्ध करून दाखवतील अशी टीका केली. बौद्धभिक्षूना लोकायतशास्त्र शिकण्याची बंदी होती कालांतराने मूर्तिपूजा, जातिभेद इत्यादी ब्राह्मणधर्माचे सर्व दोष जैनधर्मात आले. बौद्धधर्म भारतात नावालाच उरला.
चार्वाक विचारांचे विकृतीकरण
प्राचीन भारताची अध्यात्मिक परंपरा बरीच नावाजली गेली आहे. परंतु अत्यंत प्रगतावस्थेतील पाखंडी विचारांची चार्वाकीय परंपरा इ.स. पूर्वीच्या भारतात होती ह्याची योग्य दखल घेतली जात नाही. विवेकवादाच्या ह्या स्फूर्तिदायक पर्वाचा विवेकवादी चळवळीने सखोल अभ्यास केला पाहिजे. कालपरत्वे चार्वाक विचारांचे विकृतीकरण झाले. आचार आणि विचारांत दरी निर्माण झाली. एकीकडे परमेश्वर निर्गुण निराकार आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे षोडषोपचारे मूर्तिपूजा करायची, मृत्युपश्चात् देह पंचतत्त्वात विलीन होतो असे म्हणायचे आणि श्राद्ध, पिंडदान चालूच ठेवायचे. सर्व व्यवहार सृष्टीच्या नियमानुसार होतात हे मान्य करायचे आणि संकट आले असता देव पाण्यात बुडवायचे आणि ज्योतिष्याचे पाय धरायचे असा ढोंगीपणा आला. विविध धर्मांच्या रूपाने पारंपरिक आध्यात्मिक विचारसरणीने विवेकवादावर मात केली. धर्मांचाच पगडा कायम राहिला. निरीश्वरवादी आणि ईश्वरवादी ह्यांच्यातील वाद-संवाद संपुष्टात आले. देव-देवतांच्या मांदियाळीने एक प्रकारची बेहोषी आली. विचार करण्याची प्रवृत्ती मागे पडली. बेटीबंदी, रोटीबंदी, समुद्रबंदीसारख्या खुळचट कल्पना बोकाळल्या आणि कर्मकांडांचे अंधारयुग आले. पोर्तुगीजांच्या गोव्यात वापरले जाणारे छपाईयंत्र मुंबईत येण्यास दोनशे वर्षे लागली.
अकराव्या शतकात ज्ञानमार्गी, भक्तिमार्गी धर्म मागे पडून विचारमंथनाची, तत्त्वचिंतनाची परंपरा जाऊन (यज्ञयाग, होमहवन, मंत्रतंत्र वगैरे) कर्मकांडांचे प्राबल्य वाढले होते. जातिभेद, अस्पृश्यता ह्यांसारख्या समाजविघातक रूढींना धर्माचे शिक्कामोर्तब मिळू लागले. वरिष्ठ जातींनी कनिष्ठ जातींना शास्त्राध्ययन आणि मोक्षाचा हक्क नाकारला. त्यांना देवालयात प्रवेश नाकारला. बहुजन समाजात वाटेल त्या दगड धोंड्याला शेंदूर फासून, झाडा-झुडपांना देव मानून त्याची पूजा करण्याची प्रथा पडली. भूतपिशाच्च, जादूटोणा, मंत्रतंत्र धर्माच्या नावावर रूढ झाले. अशावेळी ११३२ ते ११६२ दरम्यान विजापूर जिल्ह्यात वीरशैव धर्मात एक महान संत होऊन गेले. ते म्हणजे संत बसवेश्वर. उच्चनीचतेच्या व विषमतेच्या पायावर उभे असलेले चातुर्वण्य नाकारून, धर्माचरणातील वेडगळ व अनिष्ट रूढी आणि कर्मकांडांना फाटा देऊन समता, विश्वबंधुत्व, अहिंसा, सत्य आणि प्रेम अशा उदात्त तत्त्वांवर आधारित धर्माची पुनर्रचना त्यांनी केली. सर्वांच्या अंतर्यामी एकच परमेश्वर वसत असल्याने उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य, स्त्री-पुरुष असा भेदभाव करणे पाप आहे असे त्यांनी सांगितले. स्त्रियांना आणि कनिष्ठ वर्गाच्या लोकांना शास्त्राध्ययनाचा आणि पारलौकिक कल्याणाचा मार्ग मोकळा केला. त्यांची शिकवण सांगे, ‘वाट्याला येईल ते काम आनंदाने पण अंग मोडून करा. पण त्यापूर्वी आपल्या व्यवसायाची योग्य निवड आपल्या आवडीप्रमाणे करा. परिश्रमपूर्वक अर्थार्जन करा. गरजेपुरते मिळवा. अधिकाची हाव धरू नका. निढळाच्या घामाशिवाय केलेले अर्थार्जन ही चोरी आहे. सदाचरण हाच स्वर्ग होय. दुराचरण म्हणजे नरक. एखाद्या व्यवसायाला श्रेष्ठ मानणे आणि एखाद्या जातीला अधिक महत्त्व देणे, हा वेडेपणा आहे. ‘सर्व माणसे सारखी, सर्व व्यवसाय समान योग्यतेचे, सगळ्या जाती समान’ हेच जीवनाचे नियामक सूत्र राहू द्या. विश्वाच्या उभारणीमागे एकच परतत्व आहे. तेच आपल्या अंतर्यामीदेखील आहे’ त्यांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. बालविवाहांना विरोध केला. विधवा पुनर्विवाहाचा मार्ग खुला केला. आंतरजातीय रोटी-बेटी व्यवहार धर्मसंमत केला. धार्मिक, सामाजिक क्षेत्रांप्रमाणेच आर्थिक क्षेत्रामध्येसुद्धा त्यांनी धर्म, नीती, उद्योगशीलता व श्रमगौरव ह्या तत्त्वांवर आधारित कार्यक्रम अंमलात आणले. संन्यास धर्म आणि दैववाद यांच्यामुळे समाजात आळस, निरुद्योगीपणा बोकाळून समाज भिकेस लागतो. उदरनिर्वाहाकरिता वडिलोपार्जित संपत्तीवर अवलंबून न राहता समाजपोषक धंदा करून स्वकष्टार्जित धनाने आपला प्रपंच चालवावा व कुणीही भिक्षा मागू नये असा नियम त्यांनी आपल्या अनुयायांसाठी केला होता. समाजधारणेला सर्व तहेच्या समाजपोषक उद्योगधंद्याची आवश्यकता असल्याने कोणताही धंदा हीन समजू नये असे ते सांगत. ‘कायकवे कैलास’ हा त्यांचा महामंत्र प्रसिद्ध आहे. आपआपला मनपसंत धंदा सचोटीने, प्रामाणिकपणे शिवार्पणबुद्धीने करावा; त्यात गैरवाजवी फायदा न घेता निर्वाहापुरते धन संपादावे हाच खऱ्या मोक्षाचा मार्ग होय असा ह्या मंत्राचा अर्थ आहे. ‘साधी राहणी व उच्च विचारसरणी’ चा संदेश देणारा मंत्र ‘कायकवे कैलास’ आजही समयोचित वाटतो. आपल्याकडील संपत्तीचा विश्वस्त ह्या नात्याने विनियोग करावा असे सांगणाऱ्या महात्मा गांधीनी पण ‘१२ व्या शतकात बसवेश्वरांनी केलेले कार्यच आपण आज करीत आहोत’ असे उद्गार काढले होते.
थोड्याच काळात बिदर जिल्ह्यातील कल्याण शहरी सुरू झालेल्या ह्या नवधर्माची कीर्ती भारतात सर्वदूर पोचली. तेथे होणाऱ्या धर्मचर्चेत भाग घेण्यासाठी बनवासीहून प्रभुदेव, उडुतडीहून अक्का-महादेवी, सोलापूरहून शिवयोगी सिद्धराम, काश्मीरहून आलेले राजे महादेव भूपाल (पोटगी पारध्या), राणी महादेवी, राणी बोतादेवी, दक्षिण राज्यातून आलेले राजे सकलेश मादरस वगैरे होते. संत बसवेश्वर केवळ अध्यात्मवादी धर्मप्रचारक नव्हते तर व्यवहारकुशल संघटक होते. त्यांच्या अनुयायांमध्ये ब्राह्मणांपासून अंत्यजापर्यंत आणि राजांपासून रंकापर्यंत सर्व जातीचे व दर्जाचे लोक होते. त्यांच्यातील जातिभेद, अस्पृश्यता ह्या रूढी नाहीश्या झाल्या व सर्रास रोटीबेटी व्यवहार चालू झाला.
बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या ह्या संस्कारपीठाला ‘शिवानुभव मंडप’ अथवा ‘अनुभव मंडप’ नाव होते. ह्यात सर्व जातीच्या स्त्री-पुरुषांना प्रवेश होता. ज्या काळात स्त्रीशिक्षण कल्पनेच्या बाहेर होते त्या काळात तीनेकशे पुरुषांच्या बरोबरीने तीस-चाळीस स्त्रियाही ‘अनुभव मंडपात’ प्रबोधनाचे काम करीत. हे तत्कालीन समाजाचे एक विद्यापीठच होते. अवघ्या भारतभरातून काही हजारांच्या घरात ह्या विद्यापीठाचे सभासद होते. श्री प्रभुदेव, श्री बसवेश्वर ह्यांच्या बरोबरीने चर्चा करणाऱ्यांमध्ये ढोर जातीचे कक्कया, ब्राह्मण मधुवय्या, चांभार हरळय्या, जैनगुरु मनुमुनी तसेच सोनार, गुराखी, शेतकरी, नावाडी, पारधी, दारूगुत्तेदार असे हीन समजल्या जाणाऱ्या पेशांचे पण लोक होते. बसवेश्वरांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व असूनही विद्यापीठात मायभाषेचा, कन्नड भाषेचा, वापर असे.
रवींद्रनाथ टागोरांचे शांतिनिकेतन, स्वामी विवेकानंदांचे रामकृष्ण मिशन, विश्वभारती ह्या नावाजलेल्या संस्था येण्यापूर्वी १२ व्या शतकात बसवेश्वरांनी ‘अनुभव मंडप’ स्थापन केला. त्यांची कीर्ती भारतभर पसरली. त्यांची वाढती सदस्यसंख्या पाहून कर्मठांचा अहंकार दुखावला होता. त्यातून ‘अनुभव मंडपा’तील ब्राह्मण मधुवय्या याने आपल्या मुलीचे चांभार हरळय्या याच्या मुलाशी लग्न लावले आणि समाजसुधारणेचा कडेलोट झाला. जी गोष्ट आजच्या समाजातही धारिष्ट्याची वाटते ती त्या काळच्या सनातनी वातावरणात घडवून आणल्याने सनातनी वर्णाश्रमधर्मी लोकांच्यात हलकल्लोळ माजला. ‘तू रूढींचे संरक्षण करण्यास असमर्थ आहेस’ असे म्हणून त्यांनी तेथील कल्याणच्या राजा बिज्जळला दोषी ठरविले. त्यांनी राजाकरवी त्या आंतरजातीय जोडप्यांचे हाल हाल केले. मधुवय्या आणि हरळय्याचा वध करविला. त्यांचा आश्रम जाळला. बसवेश्वर व अन्य आश्रमार्थी पांगले आणि ही नवसमाजरचनेची विवेकी चळवळ बंद पडली.