बाबासाहेब आंबेडकर व अंधश्रद्धा निर्मूलन

डॉ. आंबेडकरांच्या अंधश्रद्धानिर्मूलन कार्याचा वेध घेताना त्यांच्या धर्मचिकित्सेचा आणि धर्मांतर चळवळीचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरते. महाराष्ट्रात अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीची व्याप्ती प्रामुख्याने बुवाबाजी, चमत्काराचा दावा करणारे स्वामी, साक्षात्कारी असल्याचा प्रचार करणारे महाराज, झपाटणे, भानामती, वशीकरण विद्या, पुनर्जन्म, भावातीत ध्यान इ.च्या संदर्भातील प्रबोधनाची आहे. या सर्व अंधश्रद्धांची मुळे धर्माच्या तात्त्विक वा व्यावहारिक स्वरूपात आहेत. अंधश्रद्धानिर्मूलनाचा कार्यकर्ता मर्यादित उद्दिष्टाने व्यवहारातील उघड व बोचक अंधश्रद्धेच्या विरोधात कृती करीत असतो तर धर्मसुधारक आणि धर्मपरिवर्तक अंधश्रद्धांचे शक्तिसामर्थ्य असलेल्या ईश्वरवाद, आत्मवाद, अवतारवाद, पुनर्जन्मवाद, कर्मवाद या अध्यात्मवादी प्रवृत्तींची मूलगामी चिकित्सा करीत असतो. त्याही पलीकडे जाऊन अंधश्रद्धा जाणीवपूर्वक पोसणाऱ्या, प्रसारित करणाऱ्या जातिव्यवस्था, वर्गव्यवस्था यासारख्या भौतिक व्यवस्थांविरोधी लढेही उभे करीत असतो. भारतीय प्रबोधन चळवळीच्या इतिहासात डॉ. आंबेडकरांच्या अंधश्रद्धानिर्मूलन कार्याची अनन्यता ही आहे की अंधश्रद्धांचा पाया असलेल्या वैचारिक आणि भौतिक या दोन्ही आधारांवर कृतिशील जनलढे उभारणारे ते एकमेवाद्वितीय समाजसुधारक आहेत.
अंधश्रद्धाविरोधी वैचारिक व व्यावहारिक संघर्षः
या क्षेत्रात बाबासाहेब समाजवादी-साम्यवादी चळवळींनाही मार्गदर्शक ठरेल असे योगदान देतात. कोणत्याही आर्थिक वा राजकीय क्रांतीची पूर्वतयारी सामाजिक व वैचारिक क्रांतीने करणे आवश्यक असते ही त्यांची धारणा असल्याने भारताच्या प्रबोधन चळवळीत धर्मसुधारणेचे आग्रही प्रतिपादन करीत बाबासाहेब अग्रभागी राहतात.
‘बुद्ध आणि त्याचा धम्म’, ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ ‘जातिनिर्मूलन’ ‘रिडलस् ऑफ हिंदुइझम’ अशा ग्रंथसंपदेतून त्यांनी सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेवर वैचारिक हल्ले केले. ‘बहिष्कृत भारत’, ‘प्रबुद्ध भारत’, ‘जनता’ यासारख्या नियतकालिकांतून हिंदुधर्म व समाजव्यवस्था, बुद्ध धम्म आणि त्याची शिकवण, अस्पृश्यता-जातिभेद आणि त्यांचे निर्मूलन यांची अखंडपणे चर्चा केली. सभा संमेलनातूनही त्यांच्या महानिर्वाणापर्यंत ते या जनसागराच्या आघाडीवर अथकपणे कार्यरत राहिले. परंतु धर्मविषयक प्रबोधनाबाबत त्यांची भूमिका केवळ विचारवंतांपुरती सीमित राहिली नाही. अस्पृश्यता, जातिभेद व स्त्रीदास्य यांना पावित्र्य प्रदान करणारा तत्त्वविचार व व्यवहार याविरोधात संघर्षाची भूमिका घेऊन त्यांनी जनलढेही उभारले. महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह (१९२७), काळाराम मंदिर सत्याग्रह (१९३०-३५), मुखेडचा पांडवप्रताप-सत्याग्रह (१९३२) पर्वती-सत्याग्रह अशा लढ्यांतून त्यांनी धर्मश्रद्धा व अंधश्रद्धा यासंबंधीच्या चिकित्सेच्या लाटा भारतभर उसळवीत ठेवल्या. बौद्ध धर्माचा स्वीकार करून व दलित जनतेचे सामुदायिक धर्मांतर घडवून हिंदू धर्माला वैचारिक व व्यावहारिक धक्का दिला. बौद्ध-धम्मपरिवर्तनाची घटना हिंदुधर्मीयांना आपल्या अंधधर्मश्रद्धांबाबत आत्मटीकेची भूमिका घेण्यास भाग पाडणारी, जातिव्यवस्था आणि त्यावर उभ्या असलेल्या धर्माबाबत अपराधभावना व्यक्त करावयास लावणारी आहे. अंधश्रद्धेचे शक्तिस्रोत कोणते?
हिंदुधर्माची इतिहासातील विविध रूपे स्पष्ट करताना प्रा.गं.बा.सरदार ‘धर्म व समाजपरिवर्तन’ यात यातुविधी, वैदिक यज्ञ, देवताराधन, एकेश्वरवाद, ब्रह्मवाद इ.ची चर्चा करतात. डॉ. आंबेडकरांनी हिंदुधर्मातील या अंगाच्या विरोधात आयुष्यभर जनप्रबोधनाची वैचारिक चळवळ उभारली होती. अंधश्रद्धानिर्मूलनाची चळवळ ही गूढवादी, अगम्य अशा श्रद्धांच्या विरोधातील चळवळ आहे. डॉ.आंबेडकर जेव्हा आत्मा, अवतारवाद, चमत्कारवाद, वेदप्रामाण्य इ.वर हल्ला चढवितात तेव्हा तो अंधश्रद्धांविरोधी प्रबोधनाचा भाग असतो. हिंदुधर्मातील या वैशिष्ट्यांची रूपे म्हणून या संदर्भात समजून घेतली पाहिजेत. सृष्टीतील प्रत्येक पदार्थ, वृक्ष, प्राणी या सर्वांमध्ये यातुतत्त्व वसत आहे. विशिष्ट क्रिया आणि मंत्रपठण यामुळे ते जागृत होते, इष्ट फलप्राप्तीची क्षमता त्याच्या ठिकाणी निर्माण होते. या यातुविधीची अभिव्यक्ती आपणास आजही मांत्रिकाच्या व्यवहारातून दिसून येते. विधिपूर्वक केलेल्या अचूक मंत्रोच्चारातून फलप्राप्ती होते, मंत्रशक्ती ही किमया आहे व पाऊस, अन्न, पशुधन, संतती, रोगनिवारण, शत्रुनाश इत्यादि गोष्टी त्यापासून उद्भवतात, ही वैदिक यज्ञामागील श्रद्धा आहे. आजच्या साक्षात्कारी बुवा-स्वामींच्या ‘सामर्थ्या’मागे वैदिक यज्ञाची ही श्रद्धाच काम करीत असते. देवताराधन पद्धती ही वैदिक यज्ञानंतरची विकासावस्था. पदार्थपूजेतून इच्छापूर्ती करण्याचे धर्माचरण त्यातून उद्भवले. यज्ञीय देवतांच्या पूजा-उपासनातून इच्छित साध्य केल्याचा दावा जो करण्यात येतो, त्याला धार्मिक आधार या परंपरेत आहे. ब्रह्मवाद बुद्धिप्रामाण्य वा अनुभवप्रामाण्यावर उभा नाही तर तो आत्म्याच्या श्रद्धेवर उभा आहे. ‘आत्मा’ या अद्भुत शक्तीचे प्रकटीकरण करणे, आत्मे जागे करणे, यांसारख्या अंधश्रद्धांचा पाया आत्मवादात आहे.
डॉ. आंबेडकर हिंदुधर्माची चिकित्सा करतात तेव्हा हिंदुधर्माच्या या विविध रूपांतील अध्यात्मवादी, गूढवादी शक्तिस्थानांनाच धक्का देत असतात. बुद्धिवाद, विवेकशीलता, मानवतावाद या आधारे ते प्रश्न उभे करतात त्याचवेळी बौद्धधर्म स्वीकारण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट करत जातात.
‘वेद हे ईश्वरनिर्मित आहेत, अपौरुषेय आहेत, त्यांची आज्ञा मानावी, असे सांगण्यात येते. परंतु त्याला इतिहासात कोठे पुरावा नाही. ब्राह्मणांखेरीज कोणीच वेदाला प्राधान्य दिलेले नाही.’ ‘… उपनिषदांच्या या कारखान्यातील ब्रह्म व आत्मा या दोन गोष्टींकडे पाहिले तर बुद्धाने त्यांपैकी एकही गोष्ट मान्य केली नाही. बुद्धाने सांगितले मला ईश्वर नको…, …. ‘बुद्धाला वेद मुळीच मान्य नव्हते…. वर्णव्यवस्थाही बुद्धाला मान्य नव्हती. बौद्ध वाययात बुद्धाने चातुर्वर्ण्यावर पदोपदी प्रहार केलेले आहेत…’
‘बौद्ध धर्मात मोक्ष-स्वर्ग या खुळ्या कल्पनांना स्थान नाही. उलट मानवी जीवित सुखसमाधानाने घालवायचे असेल तर मानवाने शुद्धाचरण, अहिंसा, समता, बंधुत्व या गोष्टींचा अवलंब करावा’…. (डॉ.आंबेडकरांची भाषणे – मा.फ.गांजरे, खंड ७ मधून)
डॉ. आंबेडकरांचे धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील सर्वांत मौलिक योगदान म्हणजे बौद्ध धर्मांतराची त्यांनी उभी केलेली चळवळ. १) अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीने भारतीय संदर्भात प्रेरणादायी वारसा कोणत्या ऐतिहासिक घटना, महापुरुषांपासून घ्यावा? २) अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीचे तात्त्विक अधिष्ठान कोणते हवे ? ब्राह्मणी वेदान्तवाद की अब्राह्मणी बौद्धवाद ? ३) भारतीय इतिहास व संस्कृतीत वेदान्तवादाचा प्रतिकार करून विकसित झालेल्या अब्राह्मणी परंपरांतील अध्यात्मवादास नकार देऊन, या परंपरेची सामाजिक-धार्मिक पुनर्रचनेसाठी, पुनर्घटना कशी करावी? ४) अंधश्रद्धांचा प्रश्न धार्मिक श्रद्धा-व्यवहार या स्वरूपात धर्माच्या विचारव्यवहारात असतो. परंतु तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात तो ब्रह्मवाद वा मायावाद म्हणून असतो. समाजशास्त्रात तो अध्यात्मवादी प्रभावाच्या रूपाने तर साहित्यात आत्मा, ब्रह्म, चातुर्वर्ण्य, परतत्त्व या ब्राह्मणी तत्त्वांच्या उदात्तीकरणाच्या रूपाने दडलेला असतो. या आणि इतर सर्वच क्षेत्रातील अध्यात्मवादी प्रवृत्तींशी संघर्ष देण्यासाठी कोणती अन्वेषणपद्धती स्वीकारावी?
आंबेडकरांच्या धर्मान्तर चळवळीने अशा प्रश्नांच्या संदर्भात उत्तरांचा शोध घेण्यासाठी समाजसुधारकांना-क्रांतिकारकांना मजबूर केले. डॉ. रावसाहेब कसबे त्यांच्या ‘आंबेडकर व मार्क्स’ या ग्रंथात बौद्ध धर्माची प्रगमनशीलता पुढील शब्दांत मांडतात –
‘उपनिषदांनी जे तत्त्वज्ञान निर्माण केले होते, बुद्ध त्याच्या विरोधी होता. उपनिषदकारांनी आत्म्यावर सर्वाधिक भर दिला. आत्मा हा अभौतिक, शाश्वत व न बदलणारा आहे असे त्यांनी मानले. बुद्धाने उपनिषदांच्या विरोधात भूमिका घेऊन ‘सर्व काही प्रवाही आहे’ असे सांगितले. त्यामुळे जगाविषयी संपूर्ण वेगळ्या दृष्टिकोनास चालना मिळाली… कार्यकारणभावाचा वेगळा सिद्धान्त मांडणे बुद्धास भाग पडले. ‘प्रतित्य समुत्पाद’ या आपल्या तत्त्वाचे विवेचन बुद्ध करतो….’ (पृ.१४९).
चिंतनाच्या दोन परंपरांचा भेद विशद करताना भदंत आनंद कौसल्यायन बौद्ध परंपरेतील ‘प्रत्यक्ष अनुमानवादा’ची, अनुभववादाची प्रशंसा करतात. ‘बौद्ध परंपरा व मार्क्सवादी परंपरा अनीश्वरवादी, अनात्मवादी आणि अनित्यतावादी आहेत तर इस्लामी, इसाई आणि हिंदुपरंपरा शब्दप्रामाण्याचा स्वीकार करणाऱ्या आहेत, असे वर्गीकरण ते मांडतात. बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण वारशामुळे त्यांची भारतीय धर्मसुधारणा व प्रबोधनातील कामगिरी समकालीन समाजसुधारकांच्यापेक्षा वेगळी ठरते.
[ तिमिरभेद, संपादक अंजली सोमण, या पुस्तकातून. ]