भाग चारः सर्वेक्षण श्रद्धांचे सर्वेक्षण

सध्या खूप मोठ्या प्रमाणात लोक श्रद्धाळू झाले आहेत असे म्हणणारे विवेकी, तर लोकांना कसची चाड राहिली नाही असे म्हणणारे धार्मिक आपल्याला भेटत असतात. ही त्यांची मते दिखाऊ श्रद्धा वा अश्रद्धा जाणवल्यावर प्रगट होत असतात. म्हणजे अमक्या मेळ्याला काही लाख माणसे जमली, मोठा अपघात झाला त्यात सर्व यात्रेकरू होते, असे काहीसे ऐकू आले की विवेकी माणसांना समाजातील वाढत्या श्रद्धेची ओळख पटते. तर सणासुदीला सुट्टी घेऊन भ्रमण करणारे पाहिले; लग्न-श्राद्ध-मुंजीतील धार्मिक व्यवहारातील ढिलेपणा पाहिला की धार्मिकांना नेमकी त्याविरुद्ध जाण येते. नेमके काय घडते हे पाहण्यासाठी आजकाल सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो. आता सर्वेक्षण या प्रकाराबाबतच भरपूर अश्रद्धा सापडते ते वेगळे. भारतात झालेले श्रद्धांचे सर्वेक्षण हे आम्हाला माहीत नाही. पण प्रगत देशांत असे सर्वेक्षण बरेचदा केले जाते. ते खूप व्यापक असते. उदा. ‘प्यु फोरम’ने केलेले अमेरिकेतील सर्वेक्षण ३५००० जणांमध्ये केले होते (जून २००८). हे सर्वेक्षण धार्मिकतेचे होते. आपण साईबाबा, गजानन महाराज, लालबागचा राजा, संतोषी माता इत्यादि नवीन देवतांकडे झालेल्या रांगा वा गर्दी, तर राम, विष्णू, शंकर, महादेव, ब्रह्मदेव अशा देवतांचे कमी होणारे पूजन बघून धार्मिकतेच्या बदलत्या स्वरूपाचा अंदाज बांधू शकतो. पण ‘प्यु फोरम’सारख्या सर्वेक्षणामुळे यांची नेमकी आकडेवारी कळते. युरोपातील देशांमधील नास्तिकतेचे सर्वेक्षण विकिपेडियात सापडते. सर्वांत जास्त नास्तिक फ्रान्स, झेकोस्लोवाकिया, स्वीडन येथे (२५ टक्यावर), तर सर्वांत कमी तुर्कस्तान, रोमानिया, पोर्तुगाल (१-६ टक्के) येथे दिसते. अमेरिकेत हेच प्रमाण ५ ते ९ टक्के आढळते. ब्रिटनमध्ये अंधश्रद्धांचे सर्वेक्षण करण्यात आले (रिचर्ड वाईजमन) त्यात १३ आकडा अशुभ मानणारे २६ टक्के लोक आढळले.
निवडणुकींच्या निकाल व मतसंख्या यांवर होणारे सर्वेक्षण भारतात गेल्या २५ वर्षांपासून आहे. बरेचदा मतसंख्या व निवडणूक निकाल यात कमीजास्त होत असते. म्हणून निकालाचे फसलेले भाकीत लोकांना दिसते. मात्र अशा सर्वेक्षणाचे खूप फायदे होत असावेत. म्हणूनच आघाडीचे पक्ष त्यांचा आधार घेत व्यूहरचना करत असतात. बाजार पारखायला केलेली सर्वेक्षणे वा पक्षांनी केलेली सर्वेक्षणे यांचे निकाल बाकीच्यांसाठी नसतात म्हणून ती कुठे छापली जात नाहीत. पण या सर्वांचा चांगलाच उपयोग होत असावा. म्हणूनच चांगले पैसे देऊन ती करवली जातात.
कुठलेही सर्वेक्षण म्हटले की ते काय विचारून केले गेले (प्रश्न व विचारण्याची पद्धत) व कुठल्या लोकसमूहावर केले गेले, हे दोन महत्त्वाचे भाग असतात. या दोन्हींवर येणारे निकाल अवलंबून असतात. या दोन्हींत वैज्ञानिकता आणायची असेल तर प्रश्न निवडणे, विचारणे व लोकसमूहाची निवड करणे यासाठी निकष केलेले असतात. उत्तर देणारे आपले उत्तर कुठल्याही दबावाखाली देत नाहीत ना असे बघायचे असते आणि ज्या समाजात हे सर्वेक्षण असते त्या समाजातील लोकसंख्येचे प्रतिनिधित्व उत्तरकर्त्यांत दिसायला लागतो. एवढे सगळे निकष आले की तयारी भरपूर हवी. श्रद्धा हा भारतात नाजूक मामला गणला जातो. म्हणजे श्रद्धांना लागलेला धक्का पटकन सहन केला जात नाही. अशा वेळी सर्वेक्षण करण्यावर एक बंधन येते. प्रश्र विचारताना या बाबींचा नीट विचार करून ते निवडावे लागतात. कदाचित या बंधनाने थोडीफार वैज्ञानिकता हरपू शकते.
सर्वेक्षणाची माहिती:
आम्ही केलेले सर्वेक्षण हे तयारी आणि व्यापकता याबाबतीत थोडे कमजोर वाटेल. काही चुका झाल्या असतील. हे पहिले सर्वेक्षण मानले तर याबाबत क्षमा होईल असे वाटते. तयारी व बळ कमी असल्याने व्यापकता कमी होणार हे साहजिक झाले. प्रश्नसंख्या कमी असणे, उत्तरकाला कंटाळा न येता निवड करता येणे, हे त्यामुळे अध्याहृत झाले. स्वयंसेवक मुंबईचे असल्याने सर्वेक्षणाची व्यापकता ठरून गेली. एकंदर आठ प्रश्न व त्यांना उत्तराचे सहा पर्याय. शिवाय वय, शिक्षण व उत्पन्नगट यांची माहिती असे सर्वेक्षणाचे स्वरूप होते. कुठलाही गट निवडताना त्याची गट म्हणून बांधिलकी पूर्वीच ठरता कामा नये हा निकष देऊन स्वयंसेवकांनी या अकरा प्रश्नांची उत्तरे गोळा केली. जसजशी माहिती गोळा होत गेली तसतसा उत्साह वाढताना दिसला. यामुळे अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त उत्तरे मिळाली. उत्तरकर्ते प्रश्नावलीबाबत उत्साही होते असे वाटले. स्वयंसेवकांचे वैयक्तिक मत व उत्तरकर्त्यांचे मत यांत गणितीय संबंध लागला नाही (म्हणजे प्रामाणिकपणा असावा.). उत्तरकर्त्याचे नाव प्रश्नांसोबत कुठेच नोंदवले गेले नाही. हे मुद्दाम मनमोकळेपणे लिहिण्यासाठी केले गेले. विचारलेले प्रश्न व उत्तरे
खालील विधानावर पुढील पर्याय सांगा.
अ- पूर्ण विश्वास, ब विश्वास, क- मत नाही, ड- अविश्वास, इ पूर्ण अविश्वास, फ- चुकीचा प्रश्न प्र १ हे जग देवाने निर्माण केले. प्र.२ आपली प्रार्थना देव ऐकतो व त्याचे फळ देतो. प्र३ देव प्रत्येक घटनेवर नियंत्रण ठेवून असतो. प्र.४ पुराणकाळी मानव आजच्यापेक्षा जास्त प्रगत होता. प्र ५ मंत्रामध्ये भलेबुरे करायची शक्ती असते. प्र.६ काहीजणांकडे चमत्कार करण्याची शक्ती असते.
प्र.७ जन्मवेळेनुसार केलेल्या कुंडलीकडे वा हाताच्या रेषांकडे बघून जाणकार मंडळी तंतोतंत भविष्य सांगतात.
प्र.८ आयुर्वेद हे संपूर्ण विज्ञान आहे.
प्र.९ वय अ-०-१८, ब- १८-३५, क ३५-६०, ड ६० च्या पुढे प्र.१० शिक्षण अ- बिगर शालांत, ब-शालांत, क-पदवीधर, ड-पदव्युत्तर प्र.११ मासिक उत्पन्न अ- ५ हजारांखाली, ब- ५-१० हजार, क- १०-२० हजार, ड २०-५० हजार, इ ५० हजारांवर.
सर्वेक्षणाची उत्तरे: तक्ता पहिला. सर्व मिळून आकडेवारी एकंदर संख्या २५०
एकूण उत्तरकर्त्यांत ३ टक्के जण १८ च्या आतले होते, ५७ टक्के १८ ते ३५ म्हणजे तरुण वयोगटातले होते, ३७ टक्के ३५ ते ६० वयोगटातले होते तर त्यावरील लोकांचे प्रमाण २ टक्के होते. (काही जणांनी नीटशी माहिती न दिल्याने बेरीज १०० टक्के होणार नाही.) शालान्त परीक्षा उत्तीर्ण न झालेल्यांचे प्रमाण १३ टक्के होते, शालान्त ते पदवी या दरम्यानचे प्रमाण ४० टक्के होते, पदवी मिळवलेले ३८ टक्के होते, व त्यावरील शिक्षण १० टक्क्यांनी घेतले होते. शिक्षणात शालांत परीक्षा पास झाले व पदवीचे शिक्षण चालू आहे अशा काही जणांचा समावेश आहे. त्यामुळे हे सुशिक्षितांचे प्रमाण कदाचित जास्त धरता येईल. पूर्ण कुटुंबाचे उत्पन्न मासिक ५००० पर्यंत उत्पन्न १० टक्के लोकांचे होते, ५००० ते १०००० उत्पन्न घेणरे १३ टक्के होते, १०००० ते २०००० उत्पन्न ३२ टक्के लोकांचे होते, २०००० ते ५०००० उत्पन्न मिळवणारे ३३ टक्के लोक होते तर त्यावरील उत्पन्न मिळवणारे १६ टक्के लोक होते. एकंदरीत प्रमाण मध्यमवर्गीयांचे जास्त दिसते. शैक्षणिक पातळी ही शालान्त व पदवीधारकांची जास्त दिसते. वयोगट तरुणांबरोबर दिसतो.
प्रश्नावलीत पहिले तीन प्रश्न देवासंबंधी होते. उरलेले पाच प्रश्न इतर श्रद्धांबाबत होते. देवाबद्दलचे प्रश्न हे नाजुकतेकडे वळतात. त्यामुळे प्रश्न असे निवडले होते की उत्तरे देताना कुठला अधिक्षेप होऊ नये. आठ प्रश्न म्हणजे आठ विधाने होती. त्यांवर असणारा विश्वास वा अविश्वासाच्या छटा उत्तरकर्त्याला द्यायच्या होत्या. ही आठ विधाने सर्वेक्षणाचा कल दाखवणारी नव्हती (असा दावा आहे.) कुठल्या दैवताचे वा व्यक्तीचे नाव त्यात नव्हते. देवासंबंधीचे प्रश्न वैयक्तिक देव मानणाऱ्यांना परिचयाचे होते. मात्र देवाऐवजी काहीतरी शक्ती असते असे मानणाऱ्यांसाठी सुकर नव्हते. त्यामुळे प्रश्न चुकीचा आहे असा पर्याय दिला होता. असे असल्याने काही उत्तरकर्त्यांची अशी प्रतिक्रिया आली की हे काही आस्तिकतेचे सर्वेक्षण नाही. आम्ही प्रश्नांची उत्तरे नकारात्मक दिली तरी आम्ही आस्तिक आहोत.
प्रश्नात नेमकेपणा नाही, अशी कुठून तक्रार आली नाही. कोणाच्या श्रद्धेला धक्का लावणारे प्रश्न आहेत, असेही एकानेही म्हटले नाही. तुमच्याकडून हीच अपेक्षा, असेही प्रश्नावलीचा कल निदर्शक उद्गार निघाले नाहीत. या प्रश्नांवर लोक सहिष्णु दिसले. एवढेच नाही तर आपले सहकारी वा मित्र आपल्यापेक्षा भिन्न विचार करतात हे बघून कुणाला फारसे वाईट वाटले नाही तर गंमत वाटत होती. या निमित्ताने या प्रश्नाचा काय छडा लागतो ते पाहू अशी उत्सुकताही लोकांनी दाखवली. पहिल्या तीन उत्तरांतील घसरता विश्वास ही एक उल्लेखनीय बाब आहे. पहिली दोन उत्तरे (म्हणजे पूर्ण विश्वास व साधारण या श्रेणींची बेरीज केली तर जवळपास ६० ते ७० टक्के लोकांचा कल व्यक्तिरूपी देवाबाबत आस्तिकतेकडे झुकणारा आहे. यामध्ये ‘चुकीचा प्रश्न’ म्हणणारे ३ टक्के व शिवाय काही प्रतिक्रियांच्या आधारे हे प्रमाण अजून वाढवले तर ते साधारण ७०-७५ टक्क्यांकडे झुकेल, एकंदर नास्तिकतेचे प्रमाण हे १५-२० च्या घरात जाईल; तर अज्ञेयाकडे १०-१२ टक्के असतील
पुढचे पाच प्रश्न हे देवासंबंधी नव्हते. देव मानणे वा न मानणे या उत्तरातून यांचा संबंध प्रस्थापित होईलच असे नव्हते. एक अपेक्षा मात्र होती की काहीतरी कल यातून प्रगट होईल. एकंदर उत्तरे बघता हा कल हळूहळू स्पष्ट होईल. बहुतेक प्रश्नांना समजून व प्रामाणिक मते दिली गेली असे सर्व सर्वेक्षणकर्त्यांचे मत होते. बहुसंख्य लोकांनी मात्र पुराणकाळचा प्रगत मानव, मंत्र, चमत्कार व फलजोतिष्य या चारही बाबतीत नापसंती दर्शवली आहे. यात रस असणाऱ्यांची संख्या केवळ ३३ टक्के आहे. तर सुमारे ५० टक्क्याच्या वर लोकांनी यास नकार दिला आहे. या संख्या समाजाचे एक वेगळे चित्र डोळ्यांसमोर आणतात. बहुसंख्य लोकांच्या मते आयुर्वेद हे संपूर्ण विज्ञान आहे (६८ टक्के), त्यास नकार देणाऱ्यांची संख्या फक्त १३ टक्के आहे. कल दर्शवणारी मधली उत्तरे (साधारण विश्वास वा साधारण अविश्वास) देणारे लोक एकंदरीत मोठ्या संख्येने आहेत सर्व प्रश्नांमध्ये त्यांचे प्रमाण साधारण ३० ते ४० टक्क्यांच्या घरात सतत आहे. हे सर्व जण समाजात असलेल्या सावधपणाचे प्रतीक मानता येतील. मत नसणारे साधारणपणे १०-२० टक्के आहेत. प्रचारकांचे (दोन्ही बाजूच्या) लक्ष या लोकांच्या संख्येकडे असल्यास नवल वाटू नये.
वय, शिक्षण व उत्पन्नाचा संबंध
कुमारवयीन व ज्येष्ठ मतकर्ते एकंदररीत्या फार कमी होते. त्यामुळे त्यांच्या उत्तराबाबत ठाम निष्कर्ष काढता येणार नाही. बाकी ठिकाणी प्रत्येक गटातील संख्या ठीक होती. या सर्वांचा संबंध आटोपशीर तक्त्यात मांडण्यासाठी निर्देशांकाची योजना केली. अ = २ , ब = १, क =0, ड=-१ आणि इ=-२ असे धरून हा निर्देशांक काढला. जास्तीतजास्त २ तर कमीत कमी -२ असा हा निर्देशांक होऊ शकतो. या निर्देशांकाने सर्वसाधारणपणे गटाला काय वाटते हे चित्र उभे राहते. त्याचा तक्ता खालीलप्रमाणे. साधारणपणे यावरून असे म्हणता येईल की १.५ ते २ मधील निर्देशांक पूर्ण विश्वास दर्शवतो, ०.५ ते १.५ म्हणजे विश्वास, ०.५ ते ०.५ (वजा ०.५) म्हणजे मत नसणे, -०.५ ते -१.५ म्हणजे अविश्वास तर -१.५ ते २ म्हणजे पूर्ण अविश्वास.
तरुण (१८-३५ गट) हा मध्यमवयीन (३५ ते ६०) गटापेक्षा कमी विश्वास ठेवणारा आहे. १८ च्या खालच्या व ६० च्या वरच्या वयोगटाची आकडेवारी अशा पद्धतीचे उत्तर काढण्यास पुरेशी नाही. शिक्षण व विश्वास यांत उतरती भाजणी मात्र स्पष्ट दिसते आहे. जसे जसे शिक्षण वाढत जाते तसतसा विश्वास कमी होताना दिसतो आहे. अगदी कमी उत्पन्न असलेला गट हा मध्यम उत्पन्नगटापेक्षा जास्त अश्रद्ध दिसतो. मध्यम उत्पन्नगटानंतर उतरती भाजणी दिसते. उच्च उत्पन्नाचा गट हा एकत्रितपणे अविश्वासाकडे झुकलेला दिसतो. एकंदरीत:
‘तुमचा देवावर विश्वास आहे का?’ असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारला गेला नव्हता. देवासंबंधीचे तीन प्रश्नांचा एकत्रित विचार केला तर या बाबतीत काही तर्क करता येईल. सर्वसाधारण या तीन प्रश्नांच्या निर्देशांकाची सरासरी ०.३१ म्हणजे ‘माहीत नाही’ कडून विश्वासाकडे झुकणारी आहे. उरलेल्या पाचपैकी पहिल्या चार (आयुर्वेदावरील प्रश्न सोडून) निर्देशांकाची सरासरी ही -०.१८ म्हणजे माहीत नाही कडून अविश्वासाकडे झुकणारी आहे. आयुर्वेदाचा निर्देशांक मात्र ०.७६ म्हणजे विश्वासाकडे झुकणारा आहे. याच अंकात आयुर्वेद ही कशा प्रकारची अंधश्रद्धा आहे याचे विवरण करणारा लेख आहे. तो बऱ्याच जणांना वाद घालण्यासारखा वा उद्बोधित वाटू शकेल असे दिसते.
एकंदरीत सर्वेक्षणामुळे काही बाबी स्पष्ट झाल्या आहेत. साधारणपणे ३० टक्क्यांच्या आसपासचा तरुण व सुशिक्षित मराठी माणूस विवेकवादाच्या वाटेवर आहे असे दिसते. शिक्षणामुळे अंधश्रद्धेचे प्रमाण कमी होते असेही येथे दिसते.
या प्रश्नात आधुनिक अंधश्रद्धा तपासल्या गेल्या नव्हत्या. कदाचित यामुळे हे प्रमाण थोडे कमी होऊ शकते. तरीदेखील विवेकी चळवळीस हे चित्र नक्कीच आशादायक असावे. इतरांनी साथ दिल्यास असेच अधिक व्यापक सर्वेक्षण करता येईल व उत्तरे देखील जास्त निश्चितपणे देता येतील.
“If any remedy is tested under controlled scientific conditions and proved to be effective, it will cease to be alternative and will simply become medicine. So called alternative medicine either hasn’t been tested or it has failed its tests.” – रिचर्ड डॉकिन्स