‘माझा पैसा’ आणि डावा आदर्शवाद

न्याय्य समाज म्हणजे काय ?
[६ फेब्रुवारी २०१० ला मिलिंद मुरुगकरांनी लोकसत्तात ‘माझा पैसा आणि डावा आदर्शवाद’ नावाने काही मांडणी केली. १६ फेब्रुवारीला लोकसत्तातच राजीव सान्यांनी करदात्यांचा पैसा आणि भाग्याचे फेरवाटप या नावाने मुरुगकरांच्या मांडणीवर आक्षेप घेतले. त्यासोबत या आक्षेपांना उत्तर देताना मुरुगकरांचा न्याय्य समाजाची अढळ संकल्पना हा लेखही प्रकाशित झाला. या तिन्ही लेखांचा संपादित अंश खाली देत आहो.]
निवडणुकांच्या काळात राजकीय पक्ष देत असलेल्या सवंग आश्वासनांसंदर्भात बोलताना, माझा मित्र चिडून म्हणाला, ‘माझा पैसा (करांच्या स्वरूपातील) लोकांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी वापरला जात असेल तर माझी हरकत नाही. पण माझा पैसा असा सवंग राजकारणासाठी वापरला जाणे मला मान्य नाही.’ हा मित्र एक उद्योजक आहे, समाजातील अगदी वरच्या आर्थिक स्तरातील व रूढार्थाने ‘यशस्वी’ या कॅटेगरीत बसणारा आहे. दुसरा एक मित्र, तितकाच ‘यशस्वी’, इंजिनिअरिंग व व्यवस्थापन शास्त्रातील पदवी घेतलेला व आता एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असणारा, लोकसंख्या नियंत्रणाबद्दल सरकार दाखवत असलेल्या बेपर्वाईबद्दल तो चिडून म्हणाला, ‘माझ्या पैशातून मी लोकांची बाळंतपणे का करू ?’ त्याचा रोख सवलतीच्या दरांत शासकीय रुग्णालयातून बाळंतपणासाठी दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांकडे होता. वरवर पाहता या दोघांच्या भूमिकांत चुकीचे काही नाही. या दोघांनीही वैध मार्गाने पैसा मिळवला आहे व प्रामाणिकपणे कर भरलेला आहे. मग त्यांनी दिलेल्या पैशाची नासाडी होऊ नये असे त्यांना वाटण्यात गैर ते काय ? सार्वजनिक पैसा मस्तवालपणे उधळणे, विकासकामांऐवजी सवंग राजकारणात घालणे, याबद्दल त्यांना वाटणारा संताप साहजिकच आहे. पण योग्य मुद्दादेखील कोणत्या मनोभूमिकेतून मांडला जात आहे हे पाहणे आवश्यक आहे. ‘सार्वजनिक पैशाची उधळपट्टी’ याऐवजी ते ‘माझ्या पैशाची उधळपट्टी’ असे म्हणत आहेत. या भूमिका ‘नव्या’ आहेत. म्हणजे साधारणतः १९९० च्या आधी अशा भूमिकांना प्रतिष्ठा नव्हती. त्यापूर्वी सार्वजनिक पैशाच्या सवंग उधळपट्टीबद्दल नाराजी अर्थातच व्यक्त व्हायची. पण तो पैसा अजूनही ‘माझा’ झालेला नव्हता. ‘करदात्यांचा पैसा’ झालेला नव्हता. तो फक्त ‘सार्वजनिक’ पैसा होता. अक्षम्य बेपर्वाई याबद्दल आपली नाराजी, समाजातील इतर, कर न भरू शकणारे लोक व्यक्त करू शकतील का? ‘माझा पैसा’ या शब्दांतून व्यक्त होणाऱ्या भूमिकेनुसार त्यांना तशी नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही. कारण ते करच भरत नाहीत. याच तर्काने या मित्रांपेक्षा कमी कर भरणाऱ्या लोकांनाही अशी नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार या मित्रांच्या तुलनेने कमीच राहील. हा सर्व शब्दच्छल वाटण्याची शक्यता आहे. पण तसे नाही. ‘माझा पैसा’ या शब्दांत व्यक्त होणारी आजच्या नवश्रीमंत वर्गाची नव्याने प्रतिष्ठा पावू लागलेली ही एक राजकीय भूमिका आहे. आणि या भूमिकेची समीक्षा आवश्यकच आहे. कुटुंबाचे उदाहरण घेऊ. कुटुंबातील मुलांच्या शिक्षण, कला, क्रीडा आणि गोष्टींसाठी होणारा खर्च मुलांची क्षमता, बेपर्वाई, नशीब अशा अनेक गोष्टींमुळे वाया जाऊ शकतो. अशा वेळेस अर्थार्जन करणाऱ्या कुटुंबप्रमुखाने (स्त्री किंवा पुरुष) माझा पैसा वाया गेला’, अशा शब्दात खंत व्यक्त केली तर कुटुंब या संस्थेच्या गाभ्यालाच तडा जाईल. पैसा वाया गेला याबद्दल खंत करणे वेगळे आणि ‘माझा पैसा’ वाया गेला, या शब्दांत खंत व्यक्त करणे वेगळे. फरक गुणात्मक आहे. अर्थात कुटुंब आणि समाज यात फरक आहे. कुटुंबातील व्यक्तीचे नातेसंबंध हे थेट मूर्त स्वरूपात असतात. या उलट समाजातील करदाते, शासनसंस्था, कर न भरू शकणारा गरीब वर्ग यांचे संबंध, अप्रत्यक्ष, अमूर्त असतात. पण तरीही ते नाते असतेच किंवा असावे. पण ‘माझा पैसा’ या भूमिकेमुळे या नात्यालाच तडा जातो.
‘माझा पैसा’ हा खरेच माझ्या कर्तृत्वामुळेच, कष्टामुळेच (बौद्धिक, शारीरिक इ.) मिळालेला असतो का? त्यात भाग्याचा वाटा किती? भारतासारख्या कमालीच्या विषम समाजात तर भाग्याचा वाटा हा खूप जास्त असतो. मी श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्मलो तर मी श्रीमंतीत आयुष्य घालवण्याची शक्यता खूपच जास्त असते. कोणत्या जातीत जन्मतो यावरही ते अवलंबून असते. भाग्यवान अथवा अभागी ठरणाऱ्या कारणांची यादी खूप मोठी असेल. त्यामध्ये जन्मजात मिळालेली बुद्धी, प्रतिभा, आरोग्य इ. जनुकीय वारशाचा देखील समावेश होतो. थोडक्यात आपल्या आर्थिक यशात भाग्याचा वाटा मोठा असतो. हे आपले यश म्हणजे भाग्य व आपले प्रयत्न यांच्या बेरजेची फलनिष्पत्ती असते. पण ‘माझा पैसा’ या भूमिकेतून विचार करणारे अनेकजण यशामधील भाग्याच्या योगदानाला पुरेसे अधोरेखित करत नाहीत. माझा पैसा हा पूर्णतः माझ्या कर्तृत्वाने मी मिळविलेला आहे, असा दर्प त्यांच्या बोलण्यात असतो.
इथे न्याय्य समाज कशाला म्हणायचे हा प्रश्न उपस्थित होतो. ज्या समाजात व्यक्तीला मिळणारा मोबदला हा जास्त प्रमाणात तिच्या प्रयत्नावर अवलंबून तेवढा तो समाज जास्त न्याय्य असे म्हणावे लागेल. माझ्या एका अर्थतज्ज्ञ मित्राने त्याच्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचा, कळीचा प्रश्न विचारला होता. हा अमूर्त व तात्त्विक प्रश्न आहे. ‘समजा समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या ‘भाग्याची’ बेरीज करून ते भाग्य सर्वांना समप्रमाणात वाटले व नंतर त्यांना मिळणारा आर्थिक मोबदला हा पूर्णतः त्यांच्या प्रयत्नांशी जोडण्यात आला तर हा समाज सर्वांत न्याय्य समाज ठरणार नाही काय ? अशा समाजात जे अतिशय बुद्धिवान, प्रतिभावान, पण आळशी लोक, ते गरीब असतील व अतिशय कमी बुद्धी असलेले, पण प्रयत्नशील लोक हे श्रीमंत असतील. हा समाज म्हणजे न्याय्य समाजाचा उत्कर्षबिंदू असेल.’ पण ‘माझा पैसा’ हा या भूमिकेतून विचार करणारे बरेच लोक म्हणतील की, माझे भाग्य हेही माझेच नाही का? माझे भाग्य हे इतरांबरोबर का वाटण्यात यावे? पण असा प्रश्न विचारणे म्हणजे ‘न्याय्य समाज’ ही संकल्पनाच निकालात काढणे ठरेल. न्याय्य समाजनिर्मिती हे आपले ध्येय असेल तर वाटपाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतोच. जास्त श्रीमंत लोकांवर जास्त कर (प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन) या धोरणाला हे वाटपाचेच तात्त्विक अधिष्ठान आहे. भाग्याचे वाटप करणे म्हणजे धावण्याच्या शर्यतीत सर्व स्पर्धकांना आधी एकाच रेषेवर आणून मगच शर्यतीला सुरुवात करणे. अशा आदर्श समाजाचे व्यवच्छेदक लक्षण असे असेल की या समाजातील खालच्या आर्थिक स्तरातील लोक प्रयत्नाने सहज वरच्या स्तरात पोहचू शकतील. अर्थात ही झाली आदर्श कल्पना. प्रत्यक्षात भाग्याची अशी पूर्णतः समान वाटणी ही अशक्य गोष्ट आहे. पण तरीही न्याय्य समाजाबद्दलची ही तात्त्विक भूमिका महत्त्वाची ठरते. ही आपली गाभ्याची राजकीय भूमिका ठरते व त्यावरच दारिद्र्यनिर्मूलन, विषमतानिर्मूलन या विषयाच्या आपल्या भूमिका ठरतात.
आपण न्याय्य समाजनिर्मितीची ही तात्त्विक भूमिका स्वीकारलेली असेल तर आपली विषमतेकडे पाहण्याची भूमिका कशी असेल ? विविधप्रकारच्या भाग्यांचे अतिशय विषम वाटप असलेल्या आपल्या समाजात श्रीमंत लोक हे केवळ त्यांच्या कर्तृत्वामुळे यशस्वी झाले आहेत हे आपण स्वीकारणार नाही, व गरीब लोक हे आळशी असल्यामुळे गरीब आहेत ही भूमिका आपण स्वीकारणार नाही. ह्या भूमिकेचा आपण धिक्कार करू. न्याय्य समाजाची कल्पना स्वीकारलेली असेल तर आपल्यासाठी संपत्तीच्या वाटपाचा मुद्दा महत्त्वाचा असेल. ही भूमिका खऱ्या अर्थाने ‘डावी’ भूमिका म्हणता येईल. ‘माझा पैसा’वाल्यांची उजवी भूमिका आज प्रस्थापित होऊ पाहात आहे. त्याचे कारण डाव्यांनी डावेपणाची व्याख्या संकुचित केली व त्यामुळे डाव्या विचाराची पिछेहाट झाली. दुर्दैवाने ‘डावे’ असणे म्हणजे बाजारपेठेला विरोध असणे असा समज रूढ झाला आहे. तुम्ही डावे असाल तर तुमचा मार्केटच्या विस्ताराला (जागतिकीकरण) विरोध असणारच, असा समज आज रूढ आहे. त्याने डावेपणा संकुचित व्याख्येत बंद होतो व या व्याख्येमुळे डावी चळवळ आज अप्रस्तुत होत चालली आहे. आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत ‘माझा पैसा’ ही नवश्रीमंत वर्गाची उजवी भूमिका राजकीय चर्चाक्षेत्रात मूळ धरत आहे. वास्तविक बाजारपेठेच्या अंगी संसाधनांचा कार्यक्षम वापर करून संपत्ती निर्मितीचा वेग वाढविण्याची अफाट क्षमता आहे. बाजारपेठेच्या विस्तारात दारिद्र्यनिर्मूलनाची मोठी क्षमता आहे. अर्थात अनियंत्रित मोकाट बाजारपेठ केवढा हाहाकार माजवू शकते, तेही आपण जागतिक मंदीच्या स्वरूपात अनुभवतो आहोत. मुद्दा हा आहे की, आपण बाजारपेठेकडे कसे बघणार. बाजारपेठ संपत्तिनिर्मितीचे व काही प्रसंगी व काही प्रमाणात वाटपाचेही एक साधन आहे हे आपण बघणार आहोत की नाही? डाव्या चळवळीचा मार्केटकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन हा दारिद्र्यनिर्मूलन व विषमतानिर्मूलन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात न घेतल्यामुळे आहे. बाजारपेठेचा विस्तार बऱ्याचदा दारिद्रयनिर्मूलन झपाट्याने साधतो पण विषमताही तितक्याच झपाट्याने वाढवतो. अशा वेळेस विषमतेच्या वाढीच्या मुद्द्यावर भर देऊन डावी चळवळ बाजारपेठेच्या विस्ताराला व म्हणून दारिद्र्यनिर्मूलनालाच विरोध करते. हे अतिशय अनैतिक आहे. पण डाव्या चळवळीकडून हे घडते, कारण विषमता वाढवणाऱ्या मार्केटला उखडून टाकल्यावरच विषमता निर्मूलन व दारिद्र्यनिर्मूलन एकत्र साधेल अशी त्यांची अंधश्रद्धा असते. बाजारपेठेचा स्वीकार करणे म्हणजे विषमतानिर्मूलनाचा आपला अजेंडा सोडून देणे नाही.
डाव्या चळवळीला असलेल्या बाजारपेठेच्या अॅलर्जीची मुळे त्यांच्या मानसिकतेत आहेत. काही मूठभर मार्क्सवादी विचारवंत सोडता इतर डाव्या मंडळींचा नवसमाजनिर्मितीचा आदर्शवाद हा माणूस बदलण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयावर आधारित आहे. माणसाने स्वार्थत्याग करून उन्नत होण्यावर हा आदर्शवाद आधारलेला आहे. उलट माणसाच्याच स्वहितदक्षतेवर बाजारपेठेच्या तत्त्वज्ञानाची उभारणी आहे. त्यामुळे बाजारपेठेच्या विस्ताराचा स्वीकार करणे हे डाव्या कार्यकर्त्यांना खोलवर अस्वस्थ करणारे असते. त्यामुळे त्यांच्या आदर्शवादालाच तडा जातो. आपला आदर्शवाद हा माणूस बदलण्याच्या अतिशय अव्यवहार्य महत्त्वाकांक्षेवर आधारित आहे हे डाव्या चळवळीने समजून घेणे गरजेचे आहे. माणूस बदलण्याची अपेक्षा चुकीची नाही पण त्याच्या बदलाबद्दल अव्यवहार्य अपेक्षा बाळगणे हे चुकीचे व डाव्या चळवळीला अप्रस्तुततेकडे नेणारे ठरले आहे. या अव्यवहार्य गृहीतकामुळे न्याय्य समाजनिर्मितीचा डाव्या चळवळीचा आदर्शवाद हादेखील वर्तमानातील परिस्थितीला प्रतिसाद देण्यात असमर्थ ठरलेले भाबडे स्वप्नरंजन ठरले आहे. ‘आदर्श’ हे नेहमीच स्वप्न असते. ते नेहमीच भविष्यात राहणारे असते. पण ते आवश्यक असते. ते आपल्या वर्तमानातील कृतींना दिशा दाखविणारे असते.
बाजारपेठ आपल्याला मूल्यप्रणाली पुरवत नाही. बाजारपेठ हे फक्त साधन आहे. पण खूप महत्त्वाचे साधन आहे. आजवर उपेक्षित राहिलेल्या गरिबीत पिचणाऱ्या कोट्यवधी जनतेच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणण्याची प्रचंड मोठी क्षमता बाजारपेठेत आहे. न्याय्य समाजनिर्मितीचा डावा आदर्शवाद काल मोलाचा होता, आजही आहे व उद्याही असणार आहे. डाव्यांच्या पोथीनिष्ठेमुळे, भाबड्या गृहीतकांमुळे डावा आदर्शवाद आपली परिणामकारकता गमावून बसला त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत जर ‘माझा पैसा’ वाल्यांची उजवी भूमिका प्रस्थापित झाली तर ती अतिशय दुर्दैवी गोष्ट ठरेल. डाव्या आदर्शवादाचा -हास झाला तर आपल्याकडील मौल्यवान असे काही आपण गमावलेले असेल.