जमिनीचे धूप-नियंत्रण आणि माती-संवर्धन, व्यवस्थापन

गेल्या काही वर्षांत दीड पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना अनुदानाचा दिलासा देऊनही त्यात काही फरक पडल्याचे जाणवत नाही. दुसरीकडे शेतीचे एकरी उत्पादन घटतच आहे. इतर काही पर्याय मिळाल्यास जवळपास ४०% शेतकरी शेती व्यवसाय सोडून देण्यास तयार आहेत. याचा अर्थ असा की कुठेतरी मूलभूत काहीतरी बिनसले आहे. ते शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
कोठच्याही उत्पादक उपक्रमाची (productive activity) सहा प्रमुख अंगे आहेत
१. भांडवली गुंतवणूक – इमारती, यंत्रे इ. २. कच्चा माल ३. कुशल, अकुशल कामगार ४. ऊर्जेचा बंदोबस्त ५. प्रत्यक्ष उत्पादन-क्रिया ६. व्यवस्थापन
लहान मोठे, कुठचेही शेत हा पण उत्पादक उपक्रमच आहे. त्याची अंगे अशी – १. भांडवली गुंतवणूक – जमीन, माती, बियाणे २. कच्चामाल – पाणी, कार्बनडाय ऑक्साईड, नत्र ३. कुशल, अकुशल कामगार-सूक्ष्मजीव ते गांडुळे ४. ऊर्जा-सूर्यप्रकाश आणि जमिनीतील व हवेतील उष्णता ५. प्रत्यक्ष उत्पादनक्रिया-भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रिया ६. व्यवस्थापन – शेतकरी स्वतः (वरील तुलना अगदी काटेकोरपणे न घेता विचाराला चालना म्हणून घ्यावी)
यांपैकी जमीन आणि माती यांची वर्षानुवर्षे हानी होत आलेली आहे आणि त्याकडे कोणाचेही म्हणावे तसे लक्ष नाही. इतर अनेक निविष्टा, उदा. बी-बियाणे, पाणी या सहजपणे दृग्गोचर असतात. जमिनीची धूप आणि मातीची पोषकता या अशा सहजपणे दिसत नाहीत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. शिवाय संपूर्ण जमीन जरी एकसलग असली तरी आपण कृत्रिम सरहद्दी निर्माण केल्यामुळे तिचे नियोजन (land management & land use planning) दुर्लक्षित राहते. जे सर्वांचे असते त्याची जबाबदारी कोणाचीच नसते. ३. शेकडो मीटर उंचीवरून बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांच्या माऱ्यामुळे जमिनीवरची माती खिळखिळी होते, ढेकळे फुटतात आणि मातीची बांधणी व पोत (structure and texture) उद्ध्वस्त होतात. त्यात पुन्हा पाणी हे व्यापक द्रावक (universal solvent) त्यामुळे वरच्या मातीच्या थरांतील अनेक खनिजे, सूक्ष्मद्रव्ये, सूक्ष्मकण त्यात विरघळतात आणि वाहत्या पाण्याबरोबर निघून जातात. वाहत जाताना पाण्यात तरंगणारे हे सूक्ष्मकण खाली बसताना जमिनीला गिलावा दिल्याचे स्वरूप देतात. त्यामुळे जमीन मोठ्या प्रमाणात अपार्य (impervious) होते. परिणामतः जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण ७०% वरून १५-२०% खाली येते, भूजलाचे तुष्टीकरण होत नाही. शेवटी ही सगळी माती ओढ्यानाल्यातून नदीला मिळून समुद्रात जाते. पुराचे पाणी म्हणूनच तांबडे गढूळ दिसते. जमिनीच्या कमीअधिक उतारावरही धूप होण्याचे प्रमाण अवलंबून असते. तसेच ते पाऊस मुसळधार की झिमझिम, यावरही अवलंबून असते.
जमिनी धूप होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण वारा वादळे. खासकरून जेव्हा जमिनीचा पृष्ठभाग शुष्क होतो तेव्हा धुळीचे लोटच्या लोट हवेत उठतात आणि काही किलोमीटर दूर फेकले जातात. वाळवंटी प्रदेशात हे फार छान बघायला मिळते. मध्यअमेरिकेत तर याकडे दुर्लक्ष केल्यामुळे धूळ निर्माण करणारे एक प्रचंड तसराळेच (सीशरी ती लुश्र) तयार झाले. शेवटी एक मोठा राष्ट्रीय प्रकल्प हाती घेऊन जनतेच्या सहभागाने दीडदोनशे कोटी वृक्षांचे रोपण केल्यावर ही समस्या सुटली.
जमिनीच्या पृष्ठभागाचे, वरील मातीचे जतन करण्यासाठी ती नेहमी वृक्षाच्छादित, तृणाच्छादित राहिली पाहिजे; तिच्यावर भरपूर आच्छादन हवे. ४. जगातील अनेक संस्कृती या जमीन आणि मातीची हेळसांड करण्यामुळे लयाला गेल्या आहेत. संस्कृतीच्या उत्कर्षकाळात समाज एका गुर्मीत असतो. भरभराट होत असते. लोकसंख्याही वाढत जाते. पण जमिनीची उत्पादकक्षमता घसरत जाते. मातीच्या संवर्धनाकडे (गीळश्र हीलरपवरी) दुर्लक्ष झालेले असते. मग काही काळ कृषिक्षेत्राचा विस्तार सुरू होतो उतारावरची झाडे तोडून शेती सुरू होते. धूप वाढते. मातीला उसंत न मिळाल्यामुळे तिची पोषकताही कमी होते. त्यानंतर काही काळ वसाहतींमधून, बाहेरून अन्नधान्याची आयात करून वेळ भागवली जाते. पण स्वतःची जमीन स्वतःचे भरणपोषण करायला पुरत नाही हे कटु सत्य स्वीकारावेच लागते. पण त्यावेळी फार उशीर झालेला असतो. ग्रीक रोमन संस्कृती अशाच लयाला गेल्या. मुळात अन्नोत्पादन – primary production – हा कुठल्याही समाजाचा आधार असतो. आणि हे उत्पादन बऱ्यापैकी अतिरिक्त (surplus) असावे लागते, तरच कारागीर, शिक्षक, वैद्य, अभियंते, साहित्यिक, संगीतकार इत्यादींचे भरणपोषण होणार. त्यासाठी व्यापारीही लागतात. शासनप्रशासन लागते. तेव्हा कुठे संस्कृती उदयाला येते, मानवी समाज हा प्राणिसृष्टीपासून वेगळा उठून दिसतो. दुर्दैवाने या मूलाधाराची विस्मृती होते – “उत्तम शेती, मध्यम धंदा, कनिष्ठ नोकरी’च्या जागी “उत्तम धंदा, अतिउत्तम आय.टी.+सरकारी नोकरी आणि कनिष्ठ शेती+मजुरी’ असे होते. पण हे शाश्वत असूच शकणार नाही.
काही काळ सामाजिक आर्थिक कायदेकानू करून (कसेल त्याची जमीन, अनुदान, स्वस्त व्याजदराचे कर्ज) वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होतो. पण भौतिक दोष सामाजिक नियंत्रण कायद्यांनी हटत नाहीत, हे वास्तव उरतेच. ५. जमिनीची धूप ही प्रत्यक्ष शेतीवर परिणाम करते. त्याचे अप्रत्यक्ष परिणामही तितकेच गंभीर असतात. नद्या गाळांनी भरायला लागतात. त्यांची पात्रे उथळ बनतात. मग पुराचे पाणी दोन्ही तीर ओसंडून आजूबाजूचा प्रदेश जलमय करते. पात्राची पाणी सामावून घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी तिच्या काठांवर बांध घातले जातात. पण बांध वारंवार फुटतात आणि आजूबाजूचा प्रदेश जलमय होतोच, शिवाय आता मध्ये बांध आल्यामुळे पूर ओसरला तरी पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे प्रदेश दलदलीचा होण्याचे नवे अरिष्ट ओढवते. या पात्र उथळ होण्याचा, वरवर उचलले जाण्याचा परिणाम किती होतो? सिंधू नदीचे पात्र आज आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा ७ मीटर उंच आहे. युफ्रेटिस आणि टिग्रिस यांच्या दुआबातील प्रदेश एकेकाळी अत्यंत भरभराटीचा होता (आजचा सिरिया आणि इराक). या नद्या इराणच्या आखातात समुद्राला मिळत. पण मुखाशी गाळ साचत साचत त्या आता २०० कि.मी. आत गेल्या आहेत. दरवर्षी ही पीछेहाट साधारण ३५० मीटर होत राहिली! आणि तरीही कोणी तिकडे लक्ष दिले नाही.
गंगा नदीतूनही खूप गाळ वाहून जातो. हावरा बंदर गाळाने भरून जाण्याचा धोका निर्माण झाला. राष्ट्रीय महामार्ग ३४ ही पुराच्या धोक्यात होता. म्हणून मग फराक्का बंधारा बांधला. पण गंगेने पात्र फिरवले आणि इतर नद्यांबरोबर धुमाकूळ घातला. त्यात आजच्या बांगला देशला पण खूप त्रास झाला.
या सर्वांवरून धडा घ्यायचा तर रोगाच्या मुळावरच हल्ला करायला हवा. जंगलतोड थांबविणे, जमिनीचे आच्छादन सुरक्षित ठेवणे व मातीची धूप होण्यात अडथळे निर्माण करणे हा एकमेव उपाय आहे.
अमेरिकेत आज लाखो हेक्टर जमीन उद्ध्वस्त झाली आहे. अशी उद्ध्वस्त झालेली जमीन आणि वरच्या थरातील मातीचे पुनर्वसन करणे सोपे काम नसते. १९७० मध्ये अमेरिकन मृदा संरक्षण सेवेकडे ७७०० वेगवेगळे तज्ज्ञ नोकरीला होते. शिवाय ४५० महा-सल्लागारांचा ताफाही होता-तरीही त्यांच्या ५० वर्षांच्या अथक कामाचे फलित फारसे उत्साहजनक नव्हते. पाणी दरवर्षी पावसाच्या रूपात परत येत असते. पंप लावून ते उपसता येते, नळांद्वारा वाहून नेता येते. मातीचे तसे नसते. वाहून गेलेली माती परतून येत नाही. धरणात, बंदरांत साचलेला गाळ उपसून परत शेतांवर पसरता येत नाही. आपला निसर्गाशी संबंध एवढा तुटला आहे की डोळ्यांदेखत नद्यानाल्यांतून माती वाहून जाताना दिसत असूनही ही आपल्या शेताची नासाडी आहे, हे माझे मुख्य भांडवलच उद्ध्वस्त होते आहे याची जाणीवही शेतकऱ्यांस होत नाही. म्हणूनच म्हणतात, ‘जे शेतकरी जमिनीची धूप आणि मातीचे संवर्धन याविषयी उदास असतात ते आपल्या गरिबीच्या अवस्थेवर आणि शेतीच्या मृत्युपत्रावर शिक्कामोर्तब करत असतात.’
जेसिका मार्शल म्हणतात, “आपण जिवंत जमिनीची कातडी सोलतो आहोत. दरवर्षी निसर्ग जितकी माती निर्माण करतो त्याच्या वीसपट माती धूप होऊन वाहून जाते आहे. काहीतरी तातडीने करायला हवे. नाहीतर पुढच्या ३०-४० वर्षांत आपण माती संपवून टाकून कफल्लक होऊ.”
(आधारग्रंथ – Top Soil and Civilization by Vernon Gill Carter & Tom Dale – गंगा – ज्युलियन डॉल हॉळिक, अनुवाद – प्रकाश अकोलकर) ६, सुरुचि, संत जनाबाई पथ, पूर्व विलेपार्ले, मुंबई – ४०० ०५७.