मृद संधारण पंधरवडा -गुढीपाडवा विशेष! माती अडवा ! – पाणी जिरवा !!

[चिं.मो.पंडितांच्या लेखासोबत विदर्भात काय चालले आहे तेही पाहा ; प्रा. अविनाश शिर्के (यवतमाळ, भ्रमणध्वनी ९८५०३-४३५२०) यांनी पाठवलेले एक पत्रक —] कास्तकार बंधूंनो…..
सगया शेतकऱ्यायचे गेल्या दहाएक सालात लयच हाल होवून रायलेत. भोगात भोग म्हनून कोरडवाहू वाल्यायचे त लयच म्हंजी लय बेहाल हायेत. कवा बी पुसा, कसा रायला यंदाचा हंगाम ? त एक जबाब हमखास येते… ‘भाऊ एक पानी पायजेल व्हता.. शेवटच्या पान्यानं का चाट देल्ली नसती ना तं… राजेहो!’
असे कित्येक पावसाळे झाल्ले…. हंगाम काय मनाजोगता येत नाय. राजेहो कोरडवाहू कास्तकारी करता करता आपून सोताच कोड्डे होत चाल्लो!
निसर्गान त पाठ फिरवलीच पन ते मायबाप सरकार पॅकेज मंदी लिकेज ठेवते आंन ……. तुमाले आमाले निरं कागदं जमा करन्यातच गुतून ठेवते. गेल्या ५-५० वर्षात शेताकडं कुनी सरकारी पावना फिरकला नाय… कोरडवाहू कडं फिरकनच कसा म्हना! तशाही कोरडवाहूसाठी कोणत्या योजना हाये ? (असो म्हना. वलती वाल्याचं तं भलं होवो…) पन मंग आपल्या कोरडवाहू वाल्यायचा वाली कोन ? हाय कोनी मायचा लाल ? तं राजेहो, आपूनच आपल्या मायचे लाल ;, नाय तर कोन पुसते आपले हाल!
पन राजेहो, आपूनभी आपल्या काळ्या मायचे कसे हाल करून रायलो हे जरा सोतालेच इचारून पहा ना! तिच्या कडून घेनच जानतो. तिची वज कुनी राखाची? त्यासाठी कराच तरी काय ? हे सारं समजून घ्येन्याआंदी आपल वावर डोयासमोर आना अन् इचारा सोतालेच…
जवापासून कासरे हातात घेतले तवापासून या काळ्या मायची तबीयत कसी हाय ते जरा आपल्या वावराची शपथ घेऊनच इचारून पहा ना!
१) पडणाऱ्या पान्यानं जमिनीत वघयी वाढल्यात का नाही? होय/नाही
2. जमीन गोटाड नाय तं चुनखडीची झाली का नाही? होय/नाही
3. बांधायची, धुयायची फुटफाट झाली का नाही? होय/नाही
4. मोठ्या पान्यात वावरातली माती वावराबाहेर जाते का नाही? होय/नाही
5. रायल्या सुयल्या मातीचा रंग भुरकटला का नाही? होय/नाही वरच्या आंगाले लगीच कोरड पडते का नाही? होय/नाही
6. खालच्या आंगाले जमिनीची चिबाड वाढून रायली का नाही? होय/नाही
८) जमिनीले बलराम धड लागते का नाही ? होय/नाही
९) वावरातले धुयावरले वारूळ वावराबाहेर रस्त्यावर गेले का नाही? होय/नाही
१०) ढोरं वासर बांधायले, शिदोरी सोडाले एखांद झाड तरी शिल्लक रायल का नाही? होय/नाही
११) महागामोलाचं बियानं मोट्यापान्यानं जमिनीमंदी दबून जाते का नाही? होय/नाही
१२) शेतात चुकूनमाकून खात टाकलं तं एका ठिकाणी जमा होते का नाही? होय/नाही
१३) सालागनीक पिकपानी घटतीवर हाये का नाही? (बी.टी.वान सोडून) होय/नाही
१४) ढोरं वासरं खपाटीले लागले का नाही? होय/नाही
१५) वावर साफसूफ राखन्याच्या नादात काळ्या मायचं अन्न म्हंजी सारा काडीकचरा फुकून टाकता का नाही? होय/नाही
१६) सारं खत इकून टाकाची नौबत येते का नाही? होय/नाही
17. पिकायची फेरपालट कधी केली का नाही? होय/नाही
१८) इरवा पेरने सोडले का नाही? होय/नाही
१९) मशागतीच्या साऱ्या कामात उताराचा इचार करता का नाही? होय/नाही
२०) पडनारा पानी वावरात मुरवन्यासाठी छोटासा खड्डा तरी वावरात हाये का नाही? होय/नाही
२१) म्हनून मंग सांगा, आपले पोट्टे भी पटापट बिमार पडतेत का नाही? होय/नाही
२२) घर धनीनले चक्कर येते अनं कमर दुखते म्हनून ते कन्हून रायली का नाही? होय/नाही
23. लगतच्या रकान्यामंदी होय/नाही
च्या ठिकाणी जिथं आडवी रेषा मारेल हाय ते हाये त्या प्रश्नाचं सुधं उत्तर. ते तसं काहून हाय याच्यासाठी सायनं आपलं डोस्क खाजवावं! या साऱ्या प्रश्नायले प्रत्येकी दोन गुन द्याचे ठरोले तं ४४ गुनापैकी किती गुन भेटते पाहूच बर ?
बोला राजेहो कोनत्या सवालाचा सूदा जबाब आपल्या जवय हाय ? अन् हे बी सांगा, का याले जबाबदार कोनाले धराचं?…… कोनी सावराचं हे सारं ? येते का त्यो सरकारी पावना आपल्या दारात ? मायबापहो हे सारं पुरान येथेच थांबन तं ते पुरानच कायच ?
राजेहो घराघरात जावून चुली जवय जावून पाहा….. भरल्या ताटात शोधा….. पापड, धापोडे, सांडगे, रायतं, मिसळीची भाकर, भाजीच्या खुला, सारं सारं कसं पानातून उडूनच गेलं. आता पावना सवना आल्ला अन् त्याच्यात जवाई, इवाई आल्ला का लाज राखाले ‘लिज्जत’चा पापडच बलवा लागते….. दुकानातून ! दुधदुभत्याची त गोष्टच सोडा…! थे सारी मज्जाच गेल्ली राजेहो….. आता निरं रानी छाप बेसन अन् रेशनच्या गव्हाच्या पोया… कसी रायीन तंगड्यात तडफ ? मनगटात जोर ? अन् सूदी कमर ?
तब्येतीच ठ्या नाय रायल्या त कसे जाईन पोट्टे नेमानं शायेत. मग पोट्टे मारते दांड्या अन् मंग गुटखाच त्याचा पोशिंदा!
मायबापहो……. गावागावात हेच तन्हा, जिकडं पाहवं तिकडं गावागावातले पार आता आकड्यापाई ‘बुक’ झाल्ले….. हाताले काम नाय….. शिक्षन घेन्यासाठी दाम नाय…… कारन काय तं…… माती मंदीच आता जान नाय! पन आपल्यायले ते दिसन तवा ना…. आपून तं भुलून रायलो बी.टी.कापसाच्या करिष्याले ……. ह्ये बी.टी.चं वान सद्या मातीचं रगत पिऊन रायलं. एकदा का ते रगत सोकलं का मंग मातीतली उरली सुरली जान पन निंगून जाईन. तवा मंग खत, फवारे मारून मारून तोंडाले फेस इन पन…! (मनापासून सांगतो राजेहो असे दिस पहाची येळ येवू नये.) इथून तिथून साऱ्या जगातले जानते शास्त्रज्ञ बोंबलून रायले……
मातीचा -हास तं साऱ्या दुनियेचा हास…. आंगावरची चामडी सोल्यावानी मातीची धूप होऊन रायली… येनाऱ्या ६० वर्षात शेतातली मातीच संपून जानार हाय, मोठ्या पान्यायनं, लोटायनं, पुरायनं माती वाहून जाणार हाय…. मंग रायलेले गोटे एकमेकायच्या उरावर टाकनंच बाकी रायनार हाय…..
आसं म्हनत्येत का जमिनीच्या वरच्या धरातील बोटाच्या एका कांडा एवढी मातीचा थर तयार व्हाले ५०० ते १००० वरीस लागते. अन् तेवढीच माती वाहून जाले एक जोराचा पानी पुरते! मंग हे माती आखरीले वाहून जाते बंबईच्या समुद्रात/अन आपला गाववाला गडी जाते बंबईच्या जनसागरात डुबून…. वावरातली कीडी मुंगी हाकलून लावली. म्हनून ह्योच किडी मुंगी होवून रायला तिथल्या झोपडपट्ट्यायमंदी! तुमाले आमाले गेल्ला भुलून. म्हनूनच म्हंतेत… ‘माती गेल्ली नाती गेल्ली’ ते काय खोटं नाय!
तवा एकदाच ठरूनच टाका…… घरवालीची कमर गेल्ली, तुमच्या कमरेची गोठोडी ढिल्ली झाली तवा आपल्याले सावरनार कोनी नाय ? आपलीच कमर आपल्याले कसा लागन…….
त्याचेसाठी हे सारं काहून कराचं, कम पैश्यात अन् थोड्या श्रमात कसं कराचं, कोनाची मदत घ्या लागन… हे सारं सबूरीनं समजून घ्या….
गावागावातल्या कास्तकार बंधूंनो….. समजून घ्या. आपल्या शेतातली माती ही आपल्याला भेटलेली हजारो वर्षाची भेट हाये. तिचा वापर तं आपून करूच पन येनाऱ्या हजारो पिढ्यायसाठी माती सोडून जानं हे आपली जबाबदारी हाये. राजेहो गेल्या ५०-६० वर्षात झालं तेवडं नुक्सान लई झालं. आता सारी माती नदी नाल्यायनं वाहू जात बंधारे, धरनं गायानं भरून गेले. सोबतच साऱ्या गाव शिवारतलं पानी आटलं. पानी आटलं तसं सायायचं मन भी आटलं. आमच्या माघारन्याचं एक कारन हेबी हाये. आता रायली सुयली माती वावरातच राखा लागन, बांध बंदिस्ती कराच लागन.
आपल्या अमरावतीत एक भला मानूस रायते, मधुकरजी खडसे त्यायचं नाव. इंजीनीयर हाय पन गेली २५ वर्ष हा मानूस आमाले घेऊन गावागावात फिरते….. सरकारलेही समजावते पटवून देते…… ते म्हनतेत आता नुस्तं पानी अडवा पानी जिरवा नाय तं शेतातली माती शेतातच अडवा, आनी शिवारातलं पानी शिवारातच जिरवन्याची शपथ घ्या; आमी सारे कार्यकर्ते, विद्यार्थी आनि गावागावातले युवक आपल्या सोबत कमर कसून, खांद्याले खांदा लावाले तयार हावो.
आपल्याले योजनेच्या रूपाने मदत देईन याची वाट बघाची नाही. आपल्या शेतमातीचं रक्षन आपूनच करू. आपल्या मनगटात तेवढा जोर अजून शिल्लक हाये. गावागावातील तरणी ताठी पोरं, विद्यार्थीवर्ग यायच्या सहकार्यानं हे पुण्याचं काम येत्या गुढीपाडव्याले हाती घ्या. गुढीपाडव्यालेच कास्तकार वावरात नांगरट सुरू करते मंग नांगरून थांबू नका बांध बंदिस्ती करून टाका….. आम्ही सारे कार्यकर्ते हे कसं कराचं ते सांगाले हावोच.
या कामात जे कास्तकार सामील होईन त्यायचेसाठीभी काही स्पर्धा/उपक्रम घेन्यात येत हाये.
सोताच्या शेताची बांध बंदिस्ती करनाऱ्या शेतकऱ्यायले बांधबंदिस्तीचे प्रमानपत्र!
काडीकचरा मातीतच जिरवून मातितल्या सेंद्रिय घटकांइचं परमान वाढवून दाखवनाऱ्या शेतकऱ्यांयले सेंद्रिय कर्ब पुरस्कार. अमृतपान्याचा वापर करून अमृतखत तयार करनाऱ्या शाळा, बचतगटायले गांडूळ मित्र पुरस्कार माती अडवन्यासाठी बांध बंदिस्तीचे प्रशिक्षन घेवून कंटूर सर्वे कराले मदत करनाऱ्या आनि सर्वाधिक बांध बंदिस्ती करनाऱ्या युवा चमूले शेतकरी मित्र पुरस्कार. टिप : हे तिन्ही पुरस्कार प्रत्येकी एक हजार रुपये रकमेचे असून विदर्भ पातळीवरील पुरस्कारासाठी शेतकऱ्यांनी सहभागी संस्था कार्यकर्त्यांशी संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तेव्हा…. केल्याने होत आहे रे! आधी केलेची पाहिजे!! सहभागी संस्थाः- धरामित्र – वर्धा; दिलासा – घाटंजी; विकास गंगा समाजसेवी संस्था – पांढुर्णा (खुर्द); ग्रामीण विकास प्रकल्प, मेडीकल कॉलेज सेवाग्राम परिसर निसर्ग श्री – पांढरकवडा; चेतना समाजसेवा मंडळ – यवतमाळ ; विकल्प, कारंजा लाड; साईबाबा ग्रामीण विकास संस्था – चांदुर रेल्वे ; वहाड विकास सेवा प्रतिष्ठान अकोला ; सातपुडा अॅग्रीकल्चर सोसायटी आकोट; श्री. सुभाषजी शर्मा, डोर्ली; बियाण्यांचे बादशहा श्री रमेश साखरकर, भिल्ली धामणगाव रेल्वे. सहयोगः सर रतन टाटा ट्रस्ट, मुंबई मित्र मंडळ – मुंबई, प्रयास – चांदुर बाजार, संवाद, रवाळा (अमरावती) समन्वयक संस्था – प्रगती बंधू गट – सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ
या समाजसेवी संस्था संवर्मा (खुर्द यानीय विकास प्रकल्प, फेब्रीकल कालेज सेवाग्राम परिसर निसर्ग वीस-पांडवकता