‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’: एका दृष्टिकोनातून

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट निर्माण केला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट या पहिल्यावहिल्या चित्रपटनिर्मितीची गोष्ट हसतखेळत सांगतो. त्यात फाळक्यांचे झपाटलेपण, आपल्या ध्यासाकरता त्यांनी सोसलेले हाल, निर्मितीत त्यांना आलेल्या अडचणी आणि तरीही या सर्व प्रक्रियेत निर्मिकाला मिळणारा आनंद यांचे प्रभावी चित्रण आहे. याशिवाय एक धागा मोकाशी यांनी आपल्या चित्रपटात सातत्याने मांडला आहे. त्याची दखल घेण्यासाठी आणि इतरांनाही त्याची ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.
मोकाशींना पहिल्या भारतीय चित्रपटाच्या गोष्टीला जोडून आणखी काहीतरी सांगायचे आहे, याची जाणीव अगदी सुरुवातीपासून होते. फाळके जादूचे प्रयोग सादर करायला एका शाळेत जातात, असा प्रसंग आहे. काही प्रसिद्ध भारतीय व्यक्तींची चित्रे दाखवून मुलांना ती ओळखायला लावायची, असा खेळ तिथे आधी चालू असतो. मुलांना सर्व व्यक्ती ओळखता येतात, पण शास्त्रज्ञ ओळखता येत नाहीत. स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी या प्रसंगामागचा विचार अधोरेखित करते. विज्ञान-तंत्रानाची कास धरण्यात भारतीय मागे पडले, म्हणून त्यांना पाश्चिमात्त्यांची गुलामगिरी पत्करावी लागली. देश पुन्हा (आणि खऱ्या अर्थाने) स्वतंत्र करायचा असेल, तर आधुनिक, तंत्राधिष्ठित उद्योगधंदे भारतीयांनी आत्मसात करायला हवेत, असा तो विचार आहे.
शिल्प, चित्र, नाट्य, नृत्य अशा जुन्या कलांच्या मानाने छायाचित्र आणि चित्रपट या दोन नव्या कला प्रचंड प्रमाणात तंत्राधिष्ठित आहेत. त्यामुळेच त्या खऱ्या अर्थाने विसाव्या शतकातल्या, आधुनिक कला आहेत. अशा एका कलेवर प्रभुत्व मिळवायचे असेल, तर भारतीयांना आधुनिकतेवर स्वार व्हावेच लागेल, असे मोकाशी सांगतात. बुरसटलेल्या रूढी-परंपरांमध्ये अडकलेल्या भारतीय समाजाला त्यातून बाहेर काढता आले, तरच स्वातंत्र्याला अर्थ आहे, या सुधारकांच्या विचाराशी फाळक्यांची नाळ जुळते, हे मोकाशींनी ओळखलेले आहे.
याच विचाराचा प्रत्यय मोकाशी चित्रपटीय भाषेतूनही देतात. सहज एखादी झुळूक यावी, तशी चित्रपटात अधूनमधून केशवसुतांची ‘एक तुतारी द्या मज आणुनि -‘ ही कविता येत राहते. केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचा जनक मानले जाते. ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा, निजनामे त्यावरती नोंदा’ अशी गर्जना करत आधुनिकतेची कास धरायला मराठी समाजाला उद्युक्त करणारी त्यांची ही कविता फाळक्यांच्या या कर्तृत्वलेखाला हृद्य करून जाते.
‘आपण बरे, आपले कुटुंब बरे, आपली जात बरी’ असे मानणाऱ्या समाजाला फाळक्यांचे कर्तृत्व म्हणजे एक धडाच आहे. एखाद्या ध्यासाने झपाटलेल्या माणसाची निंदा करणे, त्याला वेडा समजणे अशीच या समाजाची द्रष्ट्या माणसांशी वागणूक होती. अशा परिस्थितीत देश घडवणे हे अशक्यच होते. आपल्याला ज्याच्याविषयी आवड वाटते असे कार्यक्षेत्र निवडून त्यात झोकून देणारी माणसे जर या देशात उपजली नाहीत, तर आपण इतरांची कारकुनी आणि हमालीच करत राहू, ही भीती आजही आहेच. वेगळी वाट चोखाळणाऱ्या फाळक्यांचा हा प्रवास हा खरा तर आधुनिकतेकडचा प्रवास आहे. आपले आयुष्य आपल्याला हवे तसे वळवताना अयशस्वी होण्याचा धोका असतोच; प्रसंगी आप्तेष्टांची निंदा, दुरावा हेही सहन करावे लागतात. पण या सर्वांचा सामना करून स्वतःला घडवणं, हे प्रत्येक व्यक्तीला आपल्या भल्यासाठी करावे लागेत. हाच आधुनिकतेचा पाया आहे.
आधुनिकतेची कास धरणे म्हणजे निव्वळ व्यक्तिगत स्वार्थासाठी परिस्थितीशी झगडणे, असा आजच्या सुशिक्षित मध्यमवर्गीय समाजाच्या सोईचा, पण संकुचित विचार मात्र मोकाशी मांडत नाहीत. फाळक्यांच्या पत्नीने फाळक्यांना दिलेली साथ हा मोकाशींच्या चित्रपटातला भाग ही गोष्ट अधोरेखित करतो. पतीला मानसिक आधार देणे, त्याच्या ध्यासापायी गरिबी, हालअपेष्टा सोसणे अशी पारंपरिक, सोशिक पत्नीची कर्तव्ये तर ती चोख पार पाडतेच; पण त्याहून पुष्कळ अधिक आणि सक्रिय असा सहभाग ती प्रत्यक्ष चित्रपटाच्या निर्मितीमध्ये घेते. चित्रफीत प्रोजेक्टरमधून सरकण्यासाठी तिला भोकं पाडण्यापासून ते फिल्म स्टॉकवर रासायनिक प्रक्रिया करण्यापर्यंतची अनेक तांत्रिक कामे ती आत्मसात करते. फाळके भारतीय चित्रपटाचे जनक होते, हे सामान्य ज्ञान आहे. पण भारतीय चित्रपटाच्या या जननीला न्याय देऊन मोकाशींनी फार महत्त्वाचे काम केलेले आहे.
आधुनिक समाजाच्या संकल्पनेत स्वातंत्र्याखेरीज समता हाही एक महत्त्वाचा पैलू आहे. चित्रपटात असलेल्या आधुनिकतेच्या धाग्यात फाळक्यांच्या पत्नीची कहाणी त्यामुळे चपखल बसते आणि कथानकाला परिपूर्ण करण्यात आपला वाटा उचलते. मनुष्य स्वतंत्र झाला आणि सर्वजण समान झाले, तर समाज खरा स्वतंत्र होतो आणि प्रगती करू शकतो. असा समाज (आणि देश) मग आपोआप अभिमानास्पद ठरतो. फाळक्यांच्या चरित्राच्या सामग्रीतून योग्य तो भाग उचलून त्यातून फाळक्यांच्या गोष्टीतच अंतर्भूत असणारा हा विचार एकसंध स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडणे, हे दिग्दर्शक परेश मोकाशींचे खरे कर्तृत्व आहे. मराठी समाज त्यासाठी त्यांचा ऋणी राहील.
द्वारा पर्सिस्टंट सिस्टिम्स प्रा. लि. , ‘भगीरथ’, सेनापती बापट मार्ग, पुणे ४११ ००४.