नाशिकच्या बैठकीचा वृत्तान्त

आजचा सुधारक तीन मंडळे आणि एक व्यक्ती मिळून चालवले जाणारे मासिक आहे. मासिकाची मालकी विश्वस्त-मंडळा कडे असते, पण दैनंदिन व्यवहारांत तो अधिकार प्रकाशका चा असतो. इतर सर्वांचे काम मासिकाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत ठेवणे व यात चुका होत असल्यास योग्य त्या सूचना देणे ही विश्वस्त-मंडळाची जबाबदारी असते. प्रकाशक यासोबत मासिकाचे उत्पादन आणि वितरण यावरही देखरेख करत असतो.
मासिकातील मजकूर जमवणे, संपादित करणे, अक्षरजुळणी, मुद्रितशोधन, छपाई व वितरण करवून घेणे, ही संपादक-मंडळाची जबाबदारी असते. यातही कार्यकारी संपादक जास्त जबाबदेह, रपीशीरलश्रश आहे.
सल्लागार-मंडळ मासिकातील लेख, त्यांत यायला हवेत असे विषय, इत्यादींबद्दल संपादक-मंडळाला सल्ला देते.
विश्वस्तमंडळ वर्षांतून एक औपचारिक बैठक व इतरवेळी सुटे (बहुधा टेलेफोनवरूनचे) संपर्क यांतून काम करते. संपादक-मंडळाच्या भेटीगाठी व चर्चा तर सततच्याच असतात. सल्लागार त्यांच्या व संपादकांच्या इच्छेनुसार व गरजेनुसार आपले काम करतात.
३० मे २०१० रोजी नाशिकला या सर्वांची व काही निमंत्रितांची संयुक्त बैठक घेतली गेली. लोकेश शेवडे, अश्विनी कुळकर्णी व मिलिंद मुरुगकर हे यजमान होते. हजर असलेले एकूण लोक असे —
विश्वस्तांपैकी जयंत फाळके, नंदा खरे व भरत मोहनी ळळ) संपादकांपैकी नंदा खरे ळळळ) सल्लागारांपैकी लोकेश शेवडे, अश्विनी कुळकर्णी, मिलिंद मुरुगकर, प्रभाकर नानावटी, टी.बी.खिलारे, सुलक्षणा महाजन, रवींद्र रु.पं. व प्रमोद सहस्रबुद्धे. ळी) विशेष आमंत्रित संजीवनी कुळकर्णी, विद्यागौरी खरे, अरुंधती मुंडले व अनुराधा मोहनी.
पाच तास चाललेल्या या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले — १) सर्व विश्वस्तांनी तोंडी किंवा लेखी राजीनामे दिले. उपस्थित विश्वस्तांनी चर्चेअंती ठरवलेले नवे विश्वस्तमंडळ असे — ताहेरभाई पूनावाला, जयंत फाळके, दिवाकर मोहनी, सुनीती देव, लोकेश शेवडे, संजीवनी कुळकर्णी व तारक काटे.
सध्या संपादक-मंडळ दिवाकर मोहनी, नंदा खरे व सुनीती देव असे आहे. त्याचा विस्तार करून संजीवनी कुळकर्णी, सुलक्षणा महाजन, अश्विनी कुळकर्णी व अनुराधा मोहनी यांना संपादकमंडळात घेतले आहे. भरत मोहनी नुकतेच प्रकाशक झाले आहेतच.
वरील बदलानंतरचे सल्लागार-मंडळ असे — मिलिंद मुरुगकर, प्रभाकर नानावटी, टी.बी.खिलारे, रवींद्र रु.पं., प्रमोद सहस्रबुद्धे व उत्तरा सहस्रबुद्धे, अरुंधती मुंडले याही आता सल्लागारांत सामील झाल्या आहेत. इतरही काही नावे सुचवली गेली आहेत व त्यांच्या सहभागाचा विचार केला जात आहे. येत्या वर्षाभरात संपादकांपैकी कोणीतरी कार्यकारी संपादक होण्यास तयार होईल, व नंतर पदभार सांभाळेल यासाठी प्रयत्न केला जात आहे. नंदा खरे शक्य तितक्या लवकर कार्यकारी संपादकत्वातून मोकळे होऊ इच्छितात.
या संरचनात्मक निर्णयांसोबत बरेच नवे तंत्रज्ञान वापरण्याबाबतचे निर्णयही घेतले गेले. त्यांत विश्वस्त, संपादक व सल्लागारांचा गूगल-ग्रूप घडवणे, संपादक व सल्लागारांनी दरमहा एकदा टेले-कॉन्फरन्सिंग तंत्राने भेटणे, युनिकोड प्रणाली वापरून जुलै २०१० व नंतरचे अंक घडवणे वगैरे बाबी आहेत.
आजचा सुधारक चालवणाऱ्यांचे सरासरी वय घटवणारे हे सारे निर्णय आहेत; परंतु आजही मासिक मनाने पोक्तच मानावे लागेल!
सुभाष आठले काही काळ विश्वस्तपद सांभाळून आता निवृत्त झाले आहेत. अर्थातच याने त्यांच्या मासिकाशी संबंधांवर परिणाम होत नाही. विश्वस्तकाळात केलेल्या कामाबद्दल सध्याचे विश्वस्त मंडळ आठल्यांचे आभारी आहे.
सभेची व्यवस्था (व भोजनव्यवस्था!) उत्तम रीतीने केल्याबद्दल लोकेश शेवटे, अश्विनी कुळकर्णी व मिलिंद मुरुगकर ह्यांचेही आभार. — नंदा खरे