चिडीचूप

वाद हा प्रगल्भ समाजाचा अविभाज्य भाग. विचारपूर्वक केलेल्या संवादाचाच एक हिस्सा. पण वादाकडे भांडण म्हणून पाहणारा स्तर वेगळा असतो. वाद म्हणजे भांडण हे समीकरण पुरोगामी, प्रगल्भ आणि सशक्त समाजरचनेत स्वीकारार्ह ठरू शकत नाही. बुद्धिजीवी वर्गाची गळचेपी सुरू झाली की ही अशी अस्वीकारार्ह समीकरणे सहजपणे स्वीकारली जाऊ लागतात.
अनेक समाजधुरीणांचे तात्त्विक वाद महाराष्ट्राने अनुभवले आहेत. ‘आधी स्वराज्य की आधी सुराज्य’ यासारख्या टिळक-आगरकर वादातून सामाजिक-राजकीय सुधारणांची जाहीर चर्चा मराठी समाजमनाने ऐकली. तिचा वैचारिक पोत संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. साहित्याच्या प्रांतातील ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ यापासून श्लील-अश्लीलतेच्या मापदंडांपर्यंतचे अनेक वाद महाराष्टात सारस्वताच्या इतिहासात नोंदले गेले. पण गेल्या चार दशकांत हे चित्र बदलत गेले. सारे काही संख्येच्या बळावर, आवाजी हुकूमतीच्या तालावर तोलले जाऊ लागले आणि अल्पसंख्य बुद्धिजीवींची घुसमट सुरू झाली. आजच्या घडीला साहित्य संमेलनावरून वादाची पिंक कुठल्याही गावाच्या पारावर टाकली जाते. पण खुद्द साहित्य संमेलनात वादांना, वैचारिक मतभिन्नतेला, तात्त्विक मतभेदांना व्यासपीठ कुठे आहे ?
एकदा का वादाला भांडणाच्या चौकटीत बंदिस्त केले की त्याची निरर्थकता सिद्ध करायला वेळ लागत नाही. हा बदल आपल्या समाजाच्या हिताचा आहे का? वाद अस्तंगत होणे हा संवादाच्या हक्कावरचा घाला नाही का? त्यातून अनिष्ट मूल्यांचे उदात्तीकरण होणार नाही का, असे कितीतरी प्रश्न गेल्या चार दशकांतील स्थित्यंतरातून निर्माण झाले आहेत. त्यावर बोलायचे कुणी? ज्यांनी बोलायला हवे तो बुद्धिजीवी वर्ग कसनुसा होऊन एका कोपऱ्यात बसला आहे. अडगळीत पडला आहे. चर्चा होतात, त्याही गावगप्पा स्वरूपाच्या. भाषेचा स्तरही वैचारिक नव्हे, तर लोकव्यवहाराच्या म्हणजे स्थिर भाषेच्या पातळीवरचा. काही बोलायचे आहे, असे म्हणणारी, म्हणू शकण्याची कुवत असणारी वाणी मौन झाली आहे. विनोबांसारखा १६ भाषांमध्ये मौन पाळू शकणारा माणूस मौनातूनही संवाद साधायचा. आता संवादातूनही मुखर होते ते आत्मभान हरपलेले केविलवाणे मौन । सारे कसे चिडीचूप आहे. बुद्धिजीवींचा पराभव हा फक्त साहित्याच्या प्रांताचा प्रश्न नाही. हा आपल्या समाजाच्या वैचारिक बैठकीचा प्रश्न आहे. इतर क्षेत्रांमध्ये तरी वेगळे चित्र कुठे आहे ? म्हणूनच हा प्रश्न अधिक गंभीर आहे. बुद्धिजीवी माणूस हा टिंगलीचा विषय झाला आणि अधोगतीच्या दिशेने जाणारे सामाजिक स्थित्यंतर सुरू झाले. मूळ प्रश्न असा आहे, की बुद्धिजीवी माणूस हा टिंगलीचा विषय का बनला?
या प्रक्रियेची सुरुवात १९७० च्या दशकात झाली. लोकसंख्येच्या मापदंडावर एक सरळसोट ढोबळ विभाजन झाले. सर्वसाधारण माणूस हा सामान्य अभिरुचीचा. त्याच्या भाषेचा आणि विचारांचा आवाकाही मर्यादित. उलटपक्षी बुद्धिजीवी माणसाची भाषा दैनंदिन लोकव्यवहाराच्या पलिकडची. नवा विचार प्रसवण्याची क्षमता असणारी. पण सामान्य अभिरुचीचा आदर केला पाहिजे, त्यांच्या सुमार विचारांना मुख्य धारेत, प्रवाहात स्थान मिळाले पाहिजे, हा तर्क तत्त्वाच्या रूपात बाळसे धरू लागला. वास्तवात या तर्कामागची मूल्ये निराळी आहेत. पैसा हे मुख्य मूल्य झाले. सामाजिक मूल्यव्यवस्थेत निष्कांचन, निर्धन बुद्धिजीवींचे पारडे कमजोर बनले. ज्यातून पैसा मिळत नाही ते कमी महत्त्वाचे, फजूल बनायला लागले. बुद्धिजीवींच्या प्रामाणिक मार्गक्रमणातून फार पैसा मिळू शकत नाही. मिळते, ती वैचारिक समृद्धी. तिला आम्ही पैशापुढे किंमत देत नाही. मग सामान्यजनांच्या दृष्टीने प्रवाही आणि बाजाराच्या नियमानुसार बक्कळ पैसा मिळवणारे महत्त्वाचे ठरू लागले. बुद्धिजीवींनी कोणे एके काळी स्वबळावर मिळवलेला चबुतरा समाजाने काढून घेतला. कावळे आणि गरुड यांच्यातील गुणात्मक अंतराची बूज राखणे इतिहासजमा झाले. त्याची फळे आता प्रकर्षाने जाणवताहेत. आपण तोंड उघडावे एव्हढे बळ आपल्यापाशी नाही, असे वाटू लागल्यावर बुद्धिजीवी स्वतःची गळचेपी करू लागले. यात दोष कुणा एका घटकाचा नाही.
बाकीच्या घटकांचे सोडा, साहित्यिकांची स्थिती काय आहे? किती साहित्यिक व्यासंगी आहेत? कितींच्या लिखाणातून नवा विचार येतो? कितींची लेखणी नव्या विचारांना चालना आणि बळ देते ? चित्र चांगले नाही. य.दि.फडके आणि विजय तेंडूलकर गेल्यावर लौकिक परिणामांची पर्वा न करता बोलणारे किती साहित्यिक आहेत ? विचारपूर्वक व्यासंगी भूमिका मांडत नेहमीच वैचारिक खाद्य पुरवणाऱ्या गो.पु.देशपांडे – राम बापट यांच्या जोडगोळीचा वारसा मराठीत पुढे कोण चालवते आहे ? बोलणे याचा अर्थ उचलली जीभ लावली टाळ्याला असा होत नाही. त्यात विचारपूर्वक व्यासंगी मांडणी अभिप्रेत आहे. भाषणे आजही खूप होतात. पण त्यांत नवा विचार कुठे आहे ? भूमिका प्रसंगी विरोधातली असली तरी समोरच्या बुद्धिजीवी माणसाकडून विचाराला चालना देणारे खाद्य मिळते. नवी दृष्टी मिळते. हा गाभा सामान्यांच्या गर्दीत हरवला आहे.
‘न बोलण्याची’ किंमत
कुटुंब, शिक्षण, व्यवसाय आणि सार्वजनिक जीवन या सगळ्या क्षेत्रांत हेच चित्र दिसते. बुद्धिजीवींच्या अभावाचे परिणाम सडकेपासून संसदेपर्यंत बघायला मिळतात. का, कसे, कधी, कशासाठी, कशावरून ही गुरु-शिष्य परंपरेतली वादाची जातकुळी प्रचलित शिक्षणव्यवस्थेत दिसत नाही. चूक किंवा बरोबर ही दोन टोके पकडून वैकल्पिक पद्धतीत शिक्षणाचा गाडा हाकला जातो आहे. म्हणून तर तो पांगुळगाडा ठरतो. चूक आणि बरोबर यांच्या मधल्या मोकळ्या जागेतच तर चर्चात्मक विचार होत असतो. ही पोकळी आपण मानायला तयारच नाही. त्यातून ‘मी म्हणतो म्हणून’.. अशी ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ संस्कृती दृढ होते. मुलांनी घरी पालकांना आणि शाळेत शिक्षकांना प्रश्न विचारायचे नाहीत, हे शिष्टसंमत झाले आहे. समोरासमोर खुली चर्चा होत नसेल तर त्यातून लबाडीचा जन्म होतो. घरी, शाळेत, संस्थात्मक आणि सार्वजनिक पातळीवर व्यक्तित्वाची गळचेपी होत असताना विकास कसा होणार ? त्यासाठीचे बळ पंखात कुठून येणार ? साचेबंद शिक्षणाच्या वर्गातून एकदम आयआयटी किंवा एमबीएच्या विश्वात गेल्यावर पडणाऱ्या आणि विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची महती कळते. पण कच्च्या पायावर पक्का इमला उभा राहात नाही. मग उच्च, व्यावसायिक शिक्षणातही तिथल्या काही पोथ्या आणि त्यातून उद्भवणारी पोथीनिष्ठता यांचा कप्पा तयार होतो. विचारांच्या बंदिस्त सरंजामी पद्धतीचे हेच तर मूळ आहे. कायमच मालकाचा, कंपनीचा विचार प्रधान मानणारा माणूस समाजाचा विचार करत नाही. मोकळेपणाने विचारपूर्वक बोलण्याला किंमत उरली नाही, याची आपण मोजत असलेली ही किंमत आहे. विचारपूर्वक संवादाचा संस्कार झाला नसेल तर फक्त एकमेकांवर कुरघोडी करणारे भांडणच होते. परस्परांच्या मतांचा आदर करण्याचा, दुसऱ्याचे ऐकून घेण्याचा हा संस्कार कुटुंब, शिक्षण, व्यवसाय आणि सांस्कृतिक जीवन यांपैकी कुठल्याच क्षेत्रात होताना दिसत नाही. त्याचेच प्रतिबिंब आपल्याला संसदेतील गोंधळवजा चर्चेत बघायला मिळते.
छोट्या पडद्यावरच्या चर्चांची जातकुळीही वेगळी नाही. “मला हवं ते, मला रुचेल तेच तुम्ही बोललं पाहिजे.” असा तिथल्या सूत्रसंचालकांचा हट्ट असतो. गुंतागुंतीच्या प्रक्रियेवर चूक बरोबरसारखे वैकल्पिक उत्तर या चर्चांमध्ये अपेक्षित असते. विचारांच्या दालनात शिरूच न देण्याची ही ‘हम करे सो कायदा’ वृत्ती संस्थात्मक पातळीवरच्या गळचेपीला जबाबदार आहे.
बंदिस्त प्रतिभा आणि खुजी माणसे
दुर्दैवाने रोमँटिसिझमचा पगडा अजूनही जबरदस्त आहे. तो साहित्यात आणि कलेच्या प्रांतात प्रकर्षाने जाणवतो. कल्पनेचे स्मरणीय विश्व तुम्हाला वास्तवापासून दूर ठेवते. अनुभवसंपन्न सकस नवोन्मेष कल्पनेच्या विश्वापुढे झाकोळला जातो आहे. रंजनात्मक सुमार सिनेमा ‘बॉक्स ऑफिस’वर हिट जातो आणि सत्यजित रायच्या प्रतिभेच्या वाटेने जाऊ पाहणारा सिनेमा डब्यात ! साहित्य असो की कला असो, स्वतःचा विचार करणारा धोपट मार्गाने जात नाही. तो स्वतःची नवी वाट मळवतो. नवे शब्द, नवी दृष्टी, वेगळी सृष्टी निर्माण करतो. पण त्यांना लोकाश्रय कुठे मिळतो? नव्या विचारांसाठी नवे शब्द निर्माण व्हावे लागतात. गवताच्या काड्यांनी घरटे बांधता येते पण भव्य घुमट उभारता येत नाही, याची जाणीव हरवत चालली आहे. केशराचे शेत मानल्या गेलेल्या मराठी रंगभूमीवरील ‘राजहंसा’लाही ते भान उरले नव्हते. रसिकांना ‘मायबाप’ म्हणणाऱ्यांनी त्या मायबापासाठी रंगभूमीची उंची कमी केली. हे पचणार नाही. ते आवडणार नाही, हे रुचणार नाही अशा विचाराने अभिव्यक्तीची उंची प्रतिभावंतांनी स्वतःहून कमी केली. या अशा लोकानुनयातून प्रतिभेपेक्षा प्रतिमा मोठी झाली. त्याचा परिणाम म्हणून उंच माणूस सापडेनासा झाला. मराठीने प्रतिभेची दशद्वारे बंद केली अन् आता साहित्य संमलेनाचा सोपान अमिताभने चढावा असे आम्हाला वाटू लागले आहे.
हे आमचे हक्काचे व्यासपीठ आहे. इथे आम्हीच बोलणार. आम्ही महत्त्वाचे आहोत, हा आत्मविश्वासही आता मराठी बुद्धिजीवींमध्ये राहिलेला नाही. बंगालमधले चित्र आजही वेगळे आहे. असे का यावर विचार करण्याची आपली तयारी नाही. ही आपली प्रादेशिक समस्या आहे. कोलकात्यातील पुस्तक-जत्रेत जायंट व्हीलसारखे मनोरंजनाचे पाळणे लावावे लागत नाहीत. तिथे तत्त्वांवरून होणारे वाद शिल्लक आहेत. दिल्लीसुद्धा गेल्या १५ वर्षांत बदलली आहे. वाद-चर्चांना व्यासपीठ देणारी इंडिया इंटरनॅशनल सेंटरसारखी संस्था महाराष्ट्रात का नाही? बुद्धिजीवींची आपण केलेली टिंगल हे त्याचे कारण आहे.
उद्याची आशा!
कला-विज्ञान हाही समाजाचा भाग आहे. पण मग या क्षेत्रांचा ठसा आपण सामाजिक-सांस्कृतिक जीवनावर का उमटवला नाही? शिक्षणात त्याचे प्रतिबिंब नाही. मग गणपती दूध प्यायल्यावर वैज्ञानिक चिडीचूप बसले म्हणून आपल्याला राग येत नाही. आश्चर्य तर त्याहून वाटत नाही. एकीकडे टाटा मूलभूत संशोधन संस्थेसारख्या माध्यमातून विज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचविण्याची धडपड चालू आहे आणि दुसरीकडे अशा प्रज्ञावंतांची टिंगल करण्यात आम्ही धन्यता मानत आहोत.
मराठी साहित्यात श्लील-अश्लीलसारखे वाद झाले. पण त्याच्या पुढचे पाऊल टाकून नग्नतेकडे पाहण्याची कलात्मक दृष्टी आपण समाजाला दिली नाही. एखादी नग्न कलाकृती निसर्गाविषयी, समाजाविषयी, तुमच्या आमच्या विषयीही खूप काही बोलत असते. ते ऐकायला आपण आपले मन खुलेच केलेले नाही. वाद घातल्याशिवाय, पुढचे पाऊल टाकल्याशिवाय नवतेचा साक्षात्कार होत नाही. शेक्सपिअर संपूर्ण इंग्लंडमध्ये एकाच प्रकारे, एकाच लहेजात बोलला जावा, हा दुराग्रह उत्तर इंग्लंडने मोडून काढला. जॉन ऑसबॉर्नच्या ‘लुक बँक इन अँगर’ या नाटकाने बोलीभाषेला विंगेतून बाहेर आणले. मग अनेकांनी शेक्सपिअर आपल्या बोलीत हक्काने आणला. आशयाला आधार देणाऱ्या भाषेला मरण नाही. वादांचा आदर करणाऱ्या समाजाच्या प्रगल्भतेला बाधा नाही. विचार मोकळेपणाने मांडता येतात तेव्हाच त्यात स्पष्टता येते. स्वतःबरोबर समाजातल्या भूमिकाही त्या निमित्ताने स्पष्ट होतात. विचारी माणूस वेगळ्या चबुतऱ्यावरून बोलत नाही. तो समाजात मिसळून संवाद साधतो. सोपी भाषा, स्पष्ट विचार आणि संवादाची आसक्ती यातून समाज प्रगल्भ होतो. बुद्धिवाद प्रस्थापित होतो.
आजचा काळ संक्रमणाचा आहे. हा बुद्धिवाद आज ना उद्या दिसणार आहे. रात्रीच्या काळोखाच्या गर्भात उद्याची आशा पाया दुमडून वाट पाहत असते. कदाचित हा उषःकाल केवळ आपल्या आयुष्यात होणार नाही, म्हणून निराश का व्हायचे ? विद्याशाखांमध्ये साहित्यात, कलेत पुन्हा उत्तुंग व्यक्तिमत्त्वे निर्माण होतील तेव्हा संवादाचे नवे युग अवतरेल. वादाला प्रतिष्ठा मिळेल. पैसा व बेगडी स्पिरिच्युअॅलिझम यांच्या मधल्या पोकळीत बुद्धिवादाला पुन्हा स्थान मिळेल. अठरा अक्षौहिणी सैन्यापेक्षाही एक निःशस्त्र देवकीनंदन जास्त प्रभावी ठरतो, या इतिहासाचे भान येईल तेव्हा चित्र बदलेलच की!
(लोकमत-मंथन पुरवणी, रविवार, दि.२८ मार्च २०१० च्या सौजन्याने)