निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-२)

[End of Ideology (तत्त्वादर्शाचा अंत!) ही कळीची संकल्पना गेल्या लेखांशात आली. Criminalization of Politics (राजकारणाचे गुन्हेगारीकरण), मध्यमवर्गाचा संभ्रम, या काही कळीच्या राजकीय संकल्पना प्रत्यक्षदर्शी व सोप्या पद्धतीने स्पष्ट करणारा हा लेखांश आहे, मूलभूत महत्त्वाचा.]
या लोकशाहीच्या नमुन्याची रचना करताना, देशी विदेशी घटनेच्या रचनाकारांचा विचार करताना त्यांच्याकडून कदाचित काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असावे. घटना बनविताना मानवी स्वभाव, मानवी समूहांचे समूह म्हणून वागण्यामागचे विचार किंवा वागणूक याचा पूर्ण विचार केला आहे किंवा कसे, याचा अंदाज येत नाही. कारण जेव्हा आपण लोकशाहीतल्या नेत्याचे मूळ विचार व नंतर वागणूक पाहतो तेव्हा आपल्याला खटकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. उदा. – लोकशाही सरकारने बहुमताने निर्णय घेतला की संस्थानिक, जहागिरदार, वतनदार यांचे तनखे वगैरे विशेषाधिकार (जे त्यांना पूर्वीच्या लोकशाही सरकारनेच बहाल केले होते, ते) रद्द करावे. प्रजेला वाटले आता सरकारची समतेकडे वाटचाल चालू झाली. आणि जनतेच्या पदरात काही अधिक पडण्याची शक्यता निर्माण झाली. पण अनुभव असा आला की या सरकारचे जे नेते, ते नवीन राजे-रजवाडेच झाले. तशाच सवयी, आपण व आपले वंशज काहीतरी विशेष जन्मजात आहोत असा समज. तशाच सवयी, प्रजेच्या संपत्तीने आपले शौक पुरविण्याची वृत्ती. मोठमोठ्या अनेक मोटारगाड्या, मोठ्या डामडौलाने मुलाबाळांचे लग्नसमारंभ, अन्यायाने वागणे, दहशत, प्राणी पाळण्याचे शौक, ठिकठिकाणी राहण्यासाठी बंगले, हिलस्टेशनवरील प्रासाद; त्यांच्या देखभालीसाठी गडीमाणसे, आचारी, रखवालदार यांची फौज, परदेशी वाय, उंची आयात कपडे, पादत्राणे, सुगंधी अत्तरे इत्यादि. शिवाय इतर श्रीमंती शौक, पत्ते खेळणे, उंची दारू पिणे, रेसला जाणे, शिवाय परदेशात जाऊन उंची, नवीन जुगार खेळणे, ज्यात थोड्या वेळात खूप पैशांची उलाढाल होऊ शकते. हे पाहिल्यावर सामान्य माणसाला प्रश्न पडतो की राजे-रजवाडे यापेक्षा निराळे काय करत होते? म्हणजे आपल्याला असे म्हणता येईल का, की समाजाची वागणूक कोणतीही राजवट आली तरी थोड्याफार फरकाने तीच राहते? फक्त व्यक्ती किंवा घराणी किंवा लोकसमूह बदलतात. अ च्या ठिकाणी ब सत्ता गाजवतो.. जो अ समाजाला बनवत असतो त्याचे ऐवजी ब समाजाला बनवितो. व सत्ता उपभोगतो. म्हणजे समाजाच्या माथी ‘बनले जाणे’ असतेच. फक्त संघर्ष असतो तो कोणी बनवायचे यासाठी!
यावरून आपल्याला असे म्हणता येईल का, की मानवी स्वभाव तोच राहणार व मानवी समूहाचे वर्तन असेच राहणार ? नेमक्या ज्या गोष्टींसाठी एखादा समूह अधिकारावर असलेल्या समूहाशी झगडा करतो; अमुक एक गोष्ट करणे गैर आहे असे इतर समाजाला पटवून सांगतो व अधिकारावर येतो; त्याच गोष्टी दुर्दैवाने त्या नाहीतर त्याच्या पुढील पिढीत त्याचे वारसदार आचरणात आणतात. आपण इतिहासात रशियाचा झार, व त्याचे सरदार यांच्या कहाण्या वाचतो. नंतर प्रचंड रक्तपात करून क्रांती झाली. पूर्वीची सर्व समाजव्यवस्था बदलण्याचा मोठा प्रयत्न झाला. पण नंतर आलेले राज्य स्थिर झाल्यावर त्याच्या काही प्रमुख नेत्यांनी जी वर्तणूक केली ती जवळ-जवळ जुन्या झारशाहीच्या सरदारांसारखीच होती. किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाने जे प्रदेश (राष्ट्र) ताब्यात घेतले व तेथे नवीन राजवटी वसविल्या. त्यांच्या नेत्यांच्या भव्य प्रासादांच्या व अमाप संपत्तीच्या कहाण्या आपण रशियाचे प्राबल्य कमी झाल्यावर वाचल्या. त्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की राज्यसत्ता कशाही प्रकारची असो त्यातले राज्यकर्ते जे असतात (त्यांना आपण फार तर संवेदनाहीन राज्यकर्ते म्हणू) ते त्यांच्या पद्धतीने मौज-मजा-चैन करून राज्य करणार व बाकीचे प्रजा राहणार !
यावरून आठवला तो आपण वाचलेला स्वातंत्र्यप्राप्तीचा इतिहास! महात्मा गांधींशी त्यांचे अनुयायी किती प्रेमाने व आदराने वागत. नेहरू त्यांचे जवळजवळ ठरलेले वारस असूनसुद्धा त्यांचे महात्माजींशी असलेले वागणे आदर्श होते! महात्माजींनी आपल्या मृत्युपत्रात अथवा इतर कोठेही असे नमूद करावे लागले नाही की, माझ्यानंतर पंडितजी हे त्यांचे राजकीय वारस असतील. सर्व जनतेनेच महात्माजींची इच्छा काय असेल ते जाणले व पंडितजींना नेता म्हणून स्वीकारले. नाहीतर महात्माजी एवढे मोठे नेते होते आणि शेवटपर्यंत त्यांची जनमानसावर एवढी पकड होती की त्यांचे प्रत्येक म्हणणे उचलून धरले जायचे व महात्माजींनाही मुले होतीच की! वाईट एवढेच वाटते की अशा संस्कारांत वाढलेल्या पक्षाचे नेते व कार्यकर्ते सध्याची वर्तणूक करतात !
सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धापासून या प्रकारची राजनीती जास्त दिसून यायला लागली. म्हणजे एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यात झोपडपट्टीतील कार्यकर्त्यांपासून, पंचतारांकित हॉटेलामध्ये मेजवान्या झोडणाऱ्या कार्यकर्त्यापर्यंत सर्वांचा समावेश! जेव्हा अशा पक्षांत एखादा धनाढ्य नेता सभेच्या व्यासपीठावरून तळागाळातल्या समाजाबद्दल मोठ्या कळकळीने बोलत असतो तेव्हा आपल्याला आपलीच कीव करावीशी वाटते. हे तंत्र ही धनाढ्य मंडळी कसे काय जमवतात हे एक कोडेच आहे. यावरून एकदा शेषन साहेबांनी टीव्हीवर दिलेली मुलाखत आठवली. त्यात त्यांनी सांगितले होते की, “कायदा जे सांगेल ते ते करण्यास मी बांधील आहे. जर कायद्यामध्ये असे सांगितले असेल की मुख्य निवडणूक आयुक्ताने आठवड्यात एकदा भरतनाट्यम् नृत्य करायला पाहिजे, तर तेसुद्धा मी करायला तयार आहे.” या प्रकारच्या श्रद्धेने धनाढ्य लोक इलेक्शनमध्ये भाग घेत असतात. त्यांचा मुख्य इंटरेस्ट त्यांचा व्यवसाय असतो. तो सुरळीत चालण्यासाठी, त्याची भरभराट होण्यासाठी ते काहीही करू शकतात! त्यांना जर सांगितले, “या सभेत आपण स्टेजवर भजने म्हणा.” तर ते तेसुद्धा करतील! या पक्षाच्या व्यासपीठावरून बोलणे आणि निवडून आल्यानंतरची कृती यांचा काहीच संबंध असणे आवश्यक नसते.
खरे म्हणजे या पक्षांनी एकदमच पुढील चार-पाच निवडणुकांसाठीचे प्रचारसाहित्य छापून घ्यायला हरकत नाही. प्रिंटिंग जास्त केले तर स्वस्त पडते म्हणतात! कारण त्यांचा जो जाहीरनामा, वचननामा, मॅनिफेस्टो जे काही असते, त्यात तीच तीच आश्वासने पुनः पुनः दिलेली असतात. अन्न, वस्त्र, निवारा या संबंधींची आश्वासने; अन्नधान्याचे भाव कमी करू वा काबूत ठेवू, गरिबांना घरे बांधून देऊ; प्रत्येक ठिकाणच्या झोपडपट्टीचे निर्मूलन करून त्यांना पर्यायी घरे देऊ; सार्वजनिक आरोग्यसेवा कार्यक्षम करू ; प्रत्येक खेड्याला पोहोचविणारा चांगला रस्ता, वीज, नळ, पाणी पुरवठा देऊ, शेतकऱ्याचे कर्ज माफ करू, नवीन कर्ज कमी व्याजाने देऊ, वगैरे.
म्हणूनच आपण म्हणतो, की सत्तरच्या दशकातल्या नेत्यांची कार्यपद्धती व त्यांच्यातले गुण हे विशेष होते, ज्यामुळे त्यांच्या झेंड्याखाली झोपडपट्टी ते पंचतारांकित हॉटेले यांतील कार्यकर्त्यांचा समावेश होता. अशा प्रकारच्या पक्षांच्या बांधणीमुळे सामान्य मतदार गोंधळून जातो, भांबावून जातो.
या प्रकारच्या पक्षबांधणीमुळे पूर्वी जसे पक्षबांधणी अमुक एका तत्त्वावर व्हायची, तसे होत नाही. पण व्यक्तिगत पातळीवरच पक्षबांधणीचा प्रयत्न होतो. त्यामुळे त्या त्या पातळीवरचा नेता हुकूमशाही प्रवृत्तीचा होण्यास पोषक वातावरण तयार होते. आतासुद्धा या निवडणुकांत जे अपक्ष निवडून आले आहेत त्यांचे प्रमाण मोठे आहे. आणि हे पक्षीय राजकारणाच्या दृष्टीने योग्य नाही. या अपक्षांना एकत्र ठेवण्यासाठी अथवा कोणत्या तरी मोठ्या गटाशी जोडून घेण्यासाठी काहीतरी देवाणघेवाण व्हावी लागते, व ती सत्त्वहीन असते. अशा आमदारांच्या गटाची, जर तो झाला तर, काठावरच्या बहुमताच्या काळात खूप ताकद असू शकते. व त्यामुळे त्या मूळ पक्षातल्या निष्ठावंतावर अन्याय होतो. पण जर एखाद्या पक्षाचे बहुमत भक्कम असेल तर मग अपक्षांची किंमत आपोआप कमी होते. तरीपण सध्याच्या पक्ष बांधण्यातल्या त्रुटींमुळे प्रत्येक पक्ष हा पुन्हा त्यातल्या अनेक गटांचा बनलेला असतो. त्यांचा प्रांतीय नेता जर भक्कम नसला तर सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही पक्षातला कोणताही गट कोणत्याही पक्षांतील कोणत्याही गटाशी संलग्न होऊन सत्तेचा प्रयत्न करू शकतो.
असे होऊ नये म्हणून पूर्वीच सत्ताधारी पक्षांनी पक्षबदल विरोधी कायदा वगैरे करून या वृत्तीला पायबंद घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे आपल्या जनतेचा जो कायद्यातून पळवाटा शोधण्याचा गुण आहे, त्याचा पुन्हापुन्हा प्रत्यय येऊन हा कायदा प्रत्यक्षात नाहीसा झालेला आहे. उलट या कायद्याने मोठा गट तयार करण्याकडे प्रवृत्ती होते. कदाचित त्यामुळेच मंत्रिमंडळाचे आकार अवाढव्य होतात. यामुळेच एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने, जो स्वतः राजघराण्यातला आहे व फारशी पक्षशिस्त वगैरे मानत नाही, त्याने निवडणुका झाल्याबरोबर आपल्या नेत्यांना बजावले की अपक्षांना कोणतीही पदे देऊ नका, कारण ते तुमच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाडून निवडून आलेले आहेत. आणि खरोखरच सत्ताधारी पक्षाने असा निर्णय केला तर, एवढा खर्च करून निवडून आलेल्या अपक्षांपुढे मोठाच प्रश्न पडेल! पूर्वी असे होत नसे. पक्षाच्या विरुद्ध जाण्याचे धाडस सहसा कोणी करत नसे. त्यामुळे जी काही मुत्सद्देगिरी पक्षांतर्गत विरोधांबाबतची, ती विरोधकाचे तिकीट मिळण्याच्या वेळीच कापायचा प्रयत्न करणे यापुरतीच असायची. पक्षातून निलंबन म्हणजे मोठाच धक्का असायचा. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर अथवा प्रांतीय पातळीवर पक्षबांधणीसाठी अगदी आवश्यक म्हणजे सर्वमान्य, कणखर नेतृत्व, अथवा एखादे सर्वांना मोहवणारे तत्त्व!
या विषयात आपण जितके खोलात जाऊ तितके या लोकशाहीचे अनाकलनीय स्वरूप लक्षात यायला लागते व याची उत्तरे न सापडल्याने आपली उद्विग्नता (निराशा) वाढते व शेवटी हतबल होऊन ‘हे चालायचेच’ अशावर माणूस येतो!
८० च्या दशकात राजकारणाने आणखी एक गडद रंग स्वीकारायला सुरुवात केली. राजकारणात गुन्हेगार प्रत्यक्षपणे जास्त प्रमाणात भाग घेऊ लागले. त्यांनी त्यांच्या व्यवसायाचे व्हर्टिकल इंटिग्रेशन करायला सुरुवात केली. व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणजे व्यवसायाच्या सोयी वाढाव्या, किंवा जास्त फायदा मिळावा म्हणून मोठे व्यावसायिक त्या व्यवसायातील प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ रिलायन्सने चिल्लरविक्री क्षेत्रात प्रवेश केला. शहरात किराणा, भाजीपाला यांची अगदी झगमगीत, वातानुकूलित दुकाने काढली. त्याला लागणारा माल प्रथम ते मुंबईतल्या ठोक पुरवठादारांकडून घेत असतील नंतर ती एक पायरी कमी करण्यासाठी त्यांनी तो माल ठोक पुरवठादाराकडे ज्याच्याकडून येतो त्या व्यापाऱ्यांकडून घेतला असेल. नंतर व्यापारी छोट्या व्यापाऱ्याकडून अथवा शेतकऱ्यांकडून घेतात; म्हणून त्यांनी आडत दुकाने छोट्या बाजारपेठेत थाटली असतील. नंतर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माल खरेदी केला असेल, नंतर शेतकऱ्यापाशी करार करून कॉन्ट्रॅक्ट शेतीद्वारे माल खरेदी केला असेल व शेवटी स्वतः शेती खरेदी करून, सर्व पायाभूत सोईसुविधा स्वतः कंपनीने उभ्या करून त्याच शेतकऱ्यांना चांगले रोजगार देऊन कामावर ठेवून स्वतःचीच शेती केली असेल. अशा त-हेने मधल्या पायऱ्या कमी करून मालाचा खर्च कमी करून त्यांच्या ग्राहकाला स्वस्तात (?) माल देण्याचा हा प्रयत्न आहे. अर्थात त्यामुळे जे पिढीजात मधल्या पायऱ्यांमधले व्यवसाय करत होते त्यांना एकतर रिलायन्सकडे काम करणे, किंवा दुसरे व्यवसाय शोधणे, याशिवाय पर्याय नाही. हा पण स्वतंत्र चर्चेचा मोठा गहन विषय आहे; तरी आपण त्यात शिरूया नको. पुन्हा कधीतरी!
आपला मूळ विषय आहे तो राजकारणाचे गुन्हेगारीकरण. या राजकारणातील काही ‘बुद्धिमान’ (खरे म्हणजे हे म्हणायचे कारण नाही) गुन्हेगारांनी आपल्या व्यवसायाचे व्हर्टिकल इंटिग्रेशन करायचे ठरविले व त्यांनी आमदारांना बाहुबळ पुरविण्याऐवजी स्वतःच आमदार होण्याचे ठरविले. त्यांची समांतर यंत्रणा होतीच. त्यांच्या कामात थोडे जास्त काम. त्यांच्याकडे पैशाचीही कमतरता नसणार. शिवाय बाहुबळामुळे त्यांना आमदारापेक्षा पैसे कमी लागणार. या परिस्थितीला सध्याचे राज्यकर्तेच बऱ्याच अंशी जबाबदार आहेत. त्यांनी २०-२५ वर्षांत निवडून येणे हा एकच निकष लावून राजकारण करायला सुरुवात केली. पूर्वीचे राजकारणी आमदार राजकारणातल्या दोन मुख्य गोष्टी, बाहुबळ व पैसे यासाठी दुसऱ्यावर अवलंबून असायचे, पैशासाठी व्यापारी कारखानदार, व बाहुबळासाठी स्थानिक गुंड. पण आता व्हर्टिकल इंटिग्रेशनच्या तत्त्वानुसार त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून खूप पैसे कमविले व स्वतःच गुंड पदरी बाळगायला सुरुवात केली. आपण मराठीत याला मनगटमेंट म्हणू. त्यामुळे त्यांचा जो कच्चा माल आहे तो त्यांना कमी खर्चात व विनासायास मिळतो. जो सत्ताधारी आमदार असतो त्याच्यासाठी आणखी एक सोय असते, ती म्हणजे जनतेचे रक्षक पोलीस खाते. तो त्याचाच एक भाग असतो.
अर्थात नेहमीप्रमाणे ज्याला त्याला स्वतःची बाजू असते. ज्यांना स्वतः राजकारण करायचे असते त्यांना हे सर्व करावेच लागते, धंद्याचा भागच, तो!
यात आणखी एक मेख आहे. बऱ्याच पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षातील अमुक माणूस गुंडप्रवृत्तीचा आहे हे मान्य नसते. त्याला अन्याय खपत नाही’, ‘पोलीस कार्यकर्त्यांशी अरेरावीने वागतात’, अशी त्यांची मते असतात. तसाच विरोधी पक्षातला माणूस हा समाजकंटक व गुंड असतोच या डबल स्टैंडर्ड विचारसरणीमुळे कोणताही कायदा करणे वा राबविणे फारच कठीण जात असते.
आणि असे सर्व पक्षांत असते. पूर्वी काँग्रेसला अनेक बाबतीत नावे ठेवणारे पक्षसुद्धा काँग्रेसच्याच वाटेने चाललेले दिसतात! सत्तेत आल्यावर कदाचित त्या पक्षाला सत्तेचे स्वरूप कळाले असेल. त्यामुळे आता हे गुंड हे नुसते गुंड नसतात तर काँग्रेसचे गुंड, भाजपचे गुंड, कम्युनिस्ट गुंड, आणि अपक्ष गुंड असतात.
मोठ्या विधानसभेत आमदारांपैकी सुमारे २०% आमदार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते असे म्हणतात. ही टक्केवारी कमी जास्त असू शकेल. अजून तरी सर्व पक्षांतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी एक होऊन अमुक कायदा करा अथवा बदला असे प्रतिपादन केल्याचे ऐकिवात नाही, हे एक मतदारांचे नशीबच म्हणायचे!
सध्या आपण काँग्रेस आघाडीचे सरकार, किंवा भाजप आघाडीचे सरकार किंवा डाव्या आघाडीचे सरकार असे शब्दप्रयोग वर्तमानपत्रात वाचतो. पण आपल्या दुर्दैवाने काही वर्षांनी डी कंपनीचे सरकार किंवा दगडी चाळ आघाडीचे सरकार असे शब्दप्रयोग वृत्तपत्रांना वापरावे लागतील असे दिसते.
सध्या खेड्यात अथवा लहान शहरात सर्व सामाजिक गोष्टींवर राजकारणाची छाप पडलेली दिसते. लग्न, साखरपुडा, अगदी हळदीकुंकू समारंभ सध्या राजकारणी पद्धतीने पार पाडले जातात. याचाच एक भाग म्हणून लग्नात प्रमुख नेत्यांना अथवा गावांतील प्रमुख लोकांना फेटे बांधून त्यांचा सत्कार केला जातो. साधारणतः कोणा कोणाला फेटे बांधायचे याचा पूर्वविचार झालेला असतो व त्याप्रमाणे २०-२५ फेटे एकाच दाचे आणलेले असतात (पुन्हा त्याच्यावरून वाद नको!) ‘आपातकालीन’ म्हणून ५-१० शिल्लक असतात. जे नेते शहरी अथवा निमशहरी भागातील असतात त्यांना साहजिकच फेटा बांधण्याची सवय नसते. तेव्हा गावातले त्या विषयांतले तज्ज्ञ तेथे अशांना मदत करायला सज्ज असतात. ते कार्यकर्ते त्या व्यक्तीला फेटा बांधायला मदत करतात. कधी कधी मदत करणाऱ्याची व मदत घेणाराची उंची जुळत नसते. त्यावेळेस गावातला कार्यकर्ता आपल्या डोक्यावर प्रथम फेटा बांधतो व नंतर तो उचलून नेत्याच्या डोक्यावर बसवितो. ऐन वेळी काही जास्तच्या लोकांनाही फेटे बांधावे लागतात. ‘याला बांधला, मग त्याला का नाही?” या युक्तिवादावर !
लोकप्रतिनिधींच्या सामान्य जनतेला खूष करण्याच्या, काही युक्त्या असतात. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलणे शक्य असल्यास त्याच्या पहिल्या नावाचा उच्चार करणे, इत्यादी. त्यापैकीच असते ती म्हणजे त्यांना फेटा बांधायला गावातला कार्यकर्ता सरसावला की ते त्याला बाजूला सारून स्वतःच उत्तमपैकी फेटा बांधतात व मग मंडपातले लोक टाळ्या वाजवितात. लग्नसमारंभात जर निवेदक असला तर तो नेत्यांच्या या कलेबद्दल त्यांचे कौतुक करतो व नेत्यांची ग्रामीण भागातील चालीरीतीशी कशी जवळीक आहे हे आवर्जून सांगतो.
बऱ्याच वेळा हा फेटे बांधण्याचा कार्यक्रम बराच लांबतो व मुहूर्ताची वेळ टळून जाते व मांडवातले लोक चुळबुळ सुरू करतात. त्यातल्या त्यात शिकलेले लोक मुहूर्ताची वेळ जी पत्रिकेत दिलेली असते त्या वेळेवर लग्न सुरू करायचे का संपवायचे, याच्यावर चर्चा उरकून घेतात. तोपर्यंत स्टेजवरच्या लोकांना (ज्यांना माईकवरून साधारण अर्ध्या तासापूर्वीच अनेक वेळा पुकारलेले असते) वाटत असते की आपण स्टेजवर गेलो की कार्यक्रम लगेच सुरू होणार. ते सर्व ताटकळत उभे असतात. नवरा-नवरी, अंतरपाट धरलेले, मंगलाष्टके म्हणणारे, नवरा-नवरीच्या मागे उभे राहणारे मामा लोक, करवल्या इत्यादि. ते जोरदार तक्रार करतात. मग एकदाचा हा सत्कार समारंभ संपतो. पूर्वी काही वेळा यानंतर त्या भागातल्या प्रमुख नेत्याचे या सर्वांना आणखी ताटकळत ठेवून आशीर्वादपर भाषण असायचे. त्याचाही नमुना ठरलेला असायचा. “आमच्या गावची सुकन्या (मग नेत्याच्या कार्यकर्त्याने त्यांच्या कानात मुलीचे नाव सांगायचे, सुमन अथवा लक्ष्मी इ.) ही’ नंतर व्याह्यांची स्तुती करून “अमुकांच्या घरात प्रवेश करणार आहे. माप ओलांडून ती आपल्या घराण्याच्या लौकिकात भर घालेल व या दोन घराण्याच्या मीलनाने सर्वजण आनंदित होतील” वगैरे. हल्ली भाषणाची प्रथा कमी झालेली दिसते.
असेच एकदा आम्ही गावकरी बंधू एका मोठ्या लग्नाला गेलो होतो. अशा लग्नाला कार्यालय जागा अपुरी पडते तेव्हा शेतातच १ ।।-२ एकरावर मंडप घातला होता. बाहेर वाहनतळासाठी मोठी जागा होती. लग्न मोठे होते, म्हणजे मुलगा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाचा व मुलगी सध्या त्या भागात आमदार असलेल्या सद्गृहस्थाची. त्यामुळे झाडून सर्व नेते उपस्थित होते. स्टेज भले मोठे, सजविलेले होते. सर्व आधीचे कार्यक्रम संपल्यावर लग्न वेळेवर सुरू झाले. पण एक दोन मंगलाष्टके झाल्यावर जिल्ह्याचे सर्वांत श्रेष्ठ नेते त्यांच्या कबिल्यासह आले. अर्थातच त्यांना स्टेजवर नेण्यात आले. मंगलाष्टके थांबविण्यात आली. वरपित्याने व वधूपित्याने त्यांचे स्वागत केले. हारतुरे, अर्थातच भारी फेटे, शाली नंतर त्यांनी आशीर्वादपर छोटे भाषण (नशीब नवरा-नवरीचे) केले. नंतर पुढे लग्न सुरू झाले व नेते त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्टेजवरून खाली उतरले व पुढच्या दुसऱ्या लग्नाकडे रवाना झाले. यात कोणालाही काहीही वावगे वाटले नाही! अशा प्रसंगी जिल्ह्यातील अनेक नेते, सर्व पक्षांचे एकत्र आलेले असतात व जेवणाच्या निमित्ताने त्यांना काही काळ तरी एकत्रच राहायचे असते. त्यामुळे काही सल्लामसलत, व्यूहरचना वगैरे होण्याची शक्यता असते.
आता या मानवी स्वभावावरून एक गोष्ट आठवली, ती येथे नमूद करणे फारसे अप्रस्तुत ठरणार नाही. ७० च्या दशकात एक इंग्रजीतून लिहिलेली, गुन्हेगारी जगतांवर लिहिलेली कादंबरी अतिशय प्रसिद्ध झाली. नाव होते गॉडफादर. त्यांची अनेक भाषांत भाषांतरे झाली व अनेक भाषांत त्याच्यावर चित्रपट निघाले. हिंदीत तर त्यातल्या अनेक कल्पनांची भ्रष्ट नक्कल करून अनेक चित्रपट निघाले. पण अनेकांच्या मते इंग्रजीतीलच गॉडफादर, सर्वांत जास्त मनोरंजक आहे. त्यातले प्रमुख पात्र डॉन कॉर्लिऑन याचे जवळजवळ ते चरित्रच आहे. त्यावरून लोकांना प्रथमच माफिया डॉन, फॅमिली, ऑमेर्टा इत्यादी शब्दांचे अर्थ कळले. त्यात त्या डॉनची एक विचारसरणी विस्ताराने पात्रांद्वारे घटनांद्वारे सांगितली आहे. ती एक स्वतंत्र पण व्यवहारी विचारसरणी आहे, तत्त्वज्ञान आहे. तो उगीचच कोणाला ठार करत सुटलेला माथेफिरू नाही. तो एका कर्तबगार डॉन आहे. तो आपल्या विरोधकांना निष्ठुरपणे संपवितो पण त्याचवेळी त्याच्याशी निष्ठा असणाऱ्या कुटुंबाला व त्यातील सर्वांना पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळतो व त्यांना कायदा व भोंदू समाज यांच्यापासून संरक्षण देतो. त्याची एक समांतर व्यवस्था आहे जी लोकांना न्याय देते. असा डॉन व्हावे किंवा डॉनच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करावा असा मोह अनेकांना (नेत्यांना) होत असेल. पण त्यात यशस्वी होण्यासाठी, डॉनचे धाडस, बुद्धिमत्ता, संयम, चाणाक्षपणा, दूरदृष्टी, व्यसने नसणे अशा अनेक गुणांनी संपन्न जर तो असेल तर आजच्या आपल्या व्यवस्थेमध्ये डॉन बनणे फारसे अवघड नाही असे वाटते. यात लेखकाचे वैशिष्ट्य असे की सुशिक्षित समाज जो सहसा कायद्याचे पालन करीत असतो, अशा समाजाला लेखकाने आपल्या कौशल्याने अशा एका पात्राबद्दल आकर्षण, थोड्याफार प्रमाणात आदर वाटायला लावला, की जे पात्र स्वतः अशिक्षित गुन्हेगार, गुन्हेगारांचा म्होरक्या, ज्याला ज्याला गुन्हा म्हणतात त्या सर्व गोष्टी करवून घेणारे, अडचणीतल्या गुन्हेगारांना पोलिसांपासून वाचवणारे, आश्रय देणारे असे आहे. चतुर आहे. आपल्या नेत्यांना डॉनएवढा सुसंगत विचार, तपशीलवार व काटेकोर नियोजन जरी करता आले, तरी खूप झाले. या निमित्ताने लेखकाने त्या काळच्या अमेरिकन समाजजीवनाचे, राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी जगताचे मोठे मनोरंजक तरीही भयानक चित्रच आपल्यापुढे उभे केले आहे. असो. द्वारा प्रा.बी.टी.जाधव, प्लॉट नं.३८, कर्मवीर हा.सोसा., अलीपूर रोड, बार्शी (महाराष्ट्र)