पुन्हा ‘सुप्रजनन’!

[हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ ? हे एडवर्ड ॲल्बीचे बहुचर्चित नाटक (थहे ळी अषीरळवष तळीसळपळर थेश्रष?, Edward Albee, Pocket Books, १९६२) व नंतर अनेक आवृत्त्या). त्यावर १९६५ च्या सुमाराला एक चित्रपटही निघाला (रिचर्ड बर्टन, एलिझाबेथ टेलर).
एक विनापत्य, पराभूत वयस्क जोडपे : जॉर्ज हा इतिहासाचा प्राध्यापक, वय ४६ वर्षे आणि मार्था, विद्यापीठाच्या अध्यक्षाची मुलगी, वय ५२ वर्षे. एका रात्री या जोडप्याकडे दोन पाहुणे येतात : निक् हा जीवशास्त्राचा प्राध्यापक, वय २८ वर्षे; आणि त्याची पत्नी हनी, वय २७ वर्षे. मार्था निक्कडे आकर्षित झालेली असते. तिचे आणि जॉर्जचे प्रेम एकमेकांना ओरबाडण्यातूनच व्यक्त होणारे.
या नाटकाच्या सुरुवातीच्या (सौम्य!) भागातला हा संवाद — ] मार्था : (निक्ला) हा जॉर्ज म्हणतो की तू भीतिदायक आहेस. का भीतिदायक आहेस, तू? निक् : (अस्फुट स्मित) मला माहीत नव्हतं, मी तसा आहे हे. हनी : (जड आवाजात) तुझ्या क्रोमोसोम्समुळे, रे. निक् : अच्छा, ती क्रोमोसोम्सची भानगड…. मार्था : (निक्ला) क्रोमोसोम्सची काय भानगड ? निक् : अच्छा, ती क्रोमोसोम्सची म्हणजे….. मार्था : मला माहीत आहेत, रे ते. माझं प्रेम आहे, त्यांच्यावर. निक् : मग… जॉर्ज : मार्था खाते, क्रोमोसोम्स… न्याहारीला… कॉर्नफ्लेक्सवर शिंपडते. (मार्थाकडे वळून) सोपं आहे, मार्था. हा जवान क्रोमोसोम्समध्ये बदल करायची पद्धत शोधतो आहे… म्हणजे, एकटा हा नाही. एकदोन साथीदारही असतील, बहुधा. वीर्यपेशींमध्ये जेनेटिक बदल करताहेत…. एका ठराविक नमुन्याप्रमाणे. केस आणि डोळ्यांचे रंग, उंची, मर्दानगी, केसाळपणा, चेहेरेपट्टी, तंदुरुस्ती… आणि मन…. फार महत्त्वाचं, ते, मन. सऽऽगळे असमतोल काढून टाकायचे, रोग होणे थांबवायचे, दीर्घायुष्य द्यायचे. नवी मानवजात घडेल, यातनं, टेस्ट ट्यूबमध्ये जन्मलेली, इन्क्युबेटर्समध्ये पाळलेली…. उच्च दाची आणि तरल. मार्था : ओ! हनी : मस्त, नं!
जॉर्ज : पण! सगळे जण खूपसे एकसारखे होतील. सगळे…. आणि बहुधा याच्यासारखे दिसणारे. मार्था : चांगली कल्पना आहे.
निक् : (जरा त्रस्त) हे पाहा…..
जॉर्ज : वरवर पाहता सारं छान छान असेल. पण अर्थातच एक काळी बाजूही असेल, यात. काही नियंत्रण लागेल, प्रयोग यशस्वी व्हायला. काही वीर्यवाहक नळ्या कापाव्या लागतील.
मार्था : हं.
जॉर्ज : लाखो. लाखो लहान लहान नळ्या कापायची ऑपरेशन्स, अंडकोषांच्या पिशवीखाली बारीकसा व्रण मागे ठेवणारी (मार्था हसते). पण परिपूर्ण नसलेल्यांच्या नपुंसकत्वाची खात्री कोण देणार… मूर्ख लोक… अन्फिट् लोक.
निक : (कठोरपणे) हे पाहा…..!
जॉर्ज : …. काही काळानं सुंदर, तेजोमय मानवजात घडेल.
मार्था : हं!
जॉर्ज : मला वाटतं फार संगीत उरणार नाही. चित्रकलाही नाही. गुळगुळीत, सोनेरी केसांची, मध्यम वजनाच्या माणसांची सभ्यता असेल ती. …. तिच्यात वैज्ञानिक असतील, गणिती असतील, सऽऽगळे सभ्यतेच्या उत्थानासाठी झटणारे.
मार्था : मस्त!
जॉर्ज : स्वातंत्र्याचा संकोच होईल, जरासा, या प्रयोगामुळे, पण तेव्हा विविधता हे उद्दिष्ट नसेल. संस्कृत्या आणि वंश अखेर नाहीसे होतील….. आणि या पृथ्वीवर मुंग्यांचं राज्य येईल.
निक् : झालं तुमचं?
जॉर्ज : आणि माझा, अर्थातच, याला थोडा विरोध आहे. माझ्या क्षेत्रात… इतिहास, ज्या क्षेत्रातला मी एक प्रसिद्ध मुखंड आहे.
मार्था : हा! हा!
जॉर्ज : इतिहास……. अत्यंत मोहक वैविध्य गमावेल. पुढे काय होईल याची भाकितं वर्तवता येणं गमावेल. मी, आणि माझ्यासोबत इतिहासाची…… आश्चर्यकारकता, बहुविधता, बदलत जाणारी लयकारी… संपून जाईल. मग उरेल…… सातत्य आणि सुव्यवस्थितता… आणि याला माझा अचल, अपरिवर्तनीय विरोध आहे.
जीनबाह्यता -सं.
लामार्क -यंत्रणा : जिराफांच्या पूर्वजांपैकी काही जण माना उंचावून झाडांच्या वरच्या भागातली पाने खाऊ लागले. आयुष्यभर माना उंचावण्याने त्यांच्या माना मुळातल्यापेक्षा जरा लांब झाल्या. ही वाढलेली लांबी त्यांच्या प्रजेतही संक्रमित झाली. हे पुढील पिढीतले जिराफ-पूर्वजही माना उंचावून जास्त अन्न मिळवत. यामुळे त्यांच्या माना आणिकच लांब होत. असे अनेक पिढ्या होण्यामुळे आजचे जिराफ लांब मानांचे झाले आहेत. डार्विन-यंत्रणा : जिराफांच्या पूर्वजांपैकी काही जणांमध्ये माना लांब असण्याचा गुण उपजला. हे त्यांच्या जीनसंचातील बदलामुळे घडले. लांब माना असल्याने ते झाडांच्या उंच भागातली पानेही खाऊ शकत. गाना लांब नसलेल्या जिराफ पूर्वजांपेक्षा त्यांचा अन्नाचा स्तर उंचावला. चांगल्या आरोग्यामुळे त्यांना पिल्लेही जारत होत. याउलट गाना लांब नसलेले जिराफ पूर्वज कगी पिल्ले जनत. एकूण पुढील पिढ्यांमध्ये लांब माना असणारे जिराफ प्रमाणात वाढत गेले. असे अनेक पिढ्या झाल्यामुळे आजचे जिराफ लांब मानांचे झाले आहेत.
लामार्कने आपल्या मांडणीत एखाद्या व्यक्तीची तिच्या आयुष्यातली कमाई (इथे : लांब मान) संततीत उतरते का, यावर फार भर दिला नव्हता, असे सांगतात. डार्विनने आपल्या लिखाणात लामार्कच्या मांडणीचा, किंवा तिच्यातल्या inferitance of acquired characteristics च्या अंगाचा प्रतिसाद केलेला नाही. पण डार्विनची उत्क्रांतीची मांडणी बहुमान्य होत असताना मात्र जणू काही त्याचे तत्त्व लामावादाला हटवून प्रस्थापित होत आहे, असे मानले जाऊ लागले. याला कारणही होते. डार्विनने सुचवलेली उत्क्रांतीची यंत्रणा पूर्णपणे इहवादी (जडवादी, materialist) आहे, तर लामार्कच्या मांडणीत प्रयत्न, आणि ते करणारी व्यक्ती, अशा रूपात चैतन्यवाद (vitalism) आहे.
डार्विनच्या मांडणीभोवतीच्या वादांना डार्विन युद्धे (The Darwin Wars) म्हटले गेले आहे. ही युद्धे बहुशः इहवाद विरुद्ध चैतन्यवाद अशी होती. जसजशी डार्विनची मांडणी बहुमान्य होत गेली, तसतशी ती मांडणी इहवादी आहे हे ठसवणे वाढत गेले. याचा परिणाम म्हणून जीवशास्त्रात दोन तत्त्वे रुजली. एक म्हणजे व्यक्तींच्या व्यवहारांमधून आलेले काहीही तिच्या संततीकडे जात नाही. गायकांच्या मुलांमध्ये चांगला आवाज असेल किंवा नसेल, पण गायकाच्या रियाजाचा त्याच्या मुलांना लाभ मिळत नाही. व्यक्तीची व्यसनाधीनता, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, यांवरून तिच्या मुलांमध्ये व्यसनीपणा वगैरेंकडे कल असेल किंवा नसेल, पण त्या सवयींचे दुष्परिणाम मुलांमध्ये संक्रमित होत नाहीत.
दुसरे तत्त्व म्हणजे व्यक्तीकडून संततीत जाणाऱ्या जीनसंचाच्या परिणामांमध्ये काहीही झपाट्याने होत नाही. बदल सावकाश होतात. निसर्ग उड्या मारण्याला धार्जिणा नाही अशा अर्थाचे Natura nonfacit saltum, हे डार्विनचे वाक्य ही संथ प्रक्रिया ठसवते.
डार्विनच्या काळी आनुवंशिकतेची, व्यक्तींचे गुण संततीत जाण्याची यंत्रणा माहीत नव्हती. गेल्या सव्वाशे-दीडशे वर्षांमध्ये ही यंत्रणा बऱ्याच प्रमाणात समजली आहे. गुणांचे कण असतात, ते डीएनए या रसायनात असतात, अशा डीएनएचे कण व्यक्तींकडून संततीकडे जातात, हे सारे आज शाळांमध्ये शिकवले जाण्याइतके सर्वमान्य झाले आहे. याचा एक परिणाम म्हणजे गुणांचे कण, जीन्स, डीएनएचे तुकडे, असे जे काही पितरांकडून संततीला मिळते, त्यानुसारच त्या व्यक्तीचे शरीर, मत वगैरे घडत असते, असा एक मतप्रवाह उपजला. हा नेचर (nature किंवा ठरीव, नियत) अशा घटकांमधूनच व्यक्ती घडतात, असे मानणारा पंथ. हा संपूर्णपणे इहवादी आहे. सोबतच एक वेगळा मुद्दाही असतो, की गुणांचे कण व्यक्तीच्या रूपात अभिव्यक्त होतात, शीशीी केले जातात. आणि या अभिव्यक्तीत जीन्सचा आजूबाजूच्या घटकांचीही महत्त्वाची भूमिका असते. हा झाला नर्चर (nurture किंवा पालन-पोषण) पंथ. जीवशास्त्रात आणि त्यापेक्षाही जास्त प्रमाणात मानसशास्त्रात नेचर महत्त्वाचे की नर्चर, यावर मोठाले (आणि शब्दबंबाळ !) वाद झडले आणि झडतात.
लामार्क-डार्विन प्रकरणाप्रमाणे इथेही नेचरवादी, सारे काही जीनदत्त मानणारे कठोर इहवादी असतात; तर नर्चरवादी, पालनपोषणही महत्त्वाचे मानणाऱ्यांचा इहवाद जरा सौम्य मानला जातो. खरे तर यात ओढाताण असते, नियतिवाद (determinism) विरुद्ध मुक्त ईहा (free will) मानणे असते, इ.इ. पण काही बाबी जीन्सच सारे काही ठरवतात या भूमिकेतून समजावून देता येत नाहीत. उदाहरणार्थ, माणसांच्या शरीरांमध्ये सुमारे २५,००० जीन्स असतात. एखाद्या माणसाच्या शरीरातील प्रत्येक पेशीत याच जीन्सच्या उछअ रूपातल्या प्रती (copies) असतात. जर असे असते, तर स्नायू, मज्जा, यकृत इत्यादी सुमारे २१० प्रकारच्या पेशी या एकसारख्या आराखड्यातून कशा बनतात ? याचे उत्तर असे दिले जाते, की काही जीन्सच्या बाहेरची संकेत-रसायने (epigenetic marks) एकूण जीनसंचातले काही टप्पे बंद पाडतात, तर काहींना सक्रिय करतात. याप्रमाणे एकूण प्रक्रियेतील निवडक भागच प्रत्येक पेशी बनताना कार्यरत असतो, आणि ही निवड वेगवेगळ्या पेशी घडवते.
आता ही जीनबाह्य संकेतांची यंत्रणाही मुळात जीन्सच घडवतात. पण ती नंतर मात्र जीन्सच्या बाहेर राहून जीन्सच्या कार्याचे नियंत्रण करते. म्हणजे जीन्स अभिव्यक्त होणे, express होणे, हे थेट जीन्समुळे होत नाही, तर जीन्सच्या भोवतालातून, परिसरातून होते. म्हणजे अभिव्यक्तीत परिसरही महत्त्वाचा आहे, ह्याला आणखी एक आधार मिळतो.
आता या जीनबाह्य आनुवंशिकतेचे महत्त्व किती? एपिजेनेटिक परिणाम किती पिढ्यांपर्यंत दिसतात? गेले काही दिवस याबाबत अनपेक्षित उत्तरे देणारे पुरावे सापडत आहेत, आणि त्यांपैकी काही थेट माणसांशी निगडित आहेत. यातले काही पुरावे पाहू.
स्वीडनच्या सर्वांत उत्तरेचा नॉर्बोटेन (Norbotten) प्रांत हा उत्तर ध्रुवाजवळचा, अत्यंत विरळ वस्तीचा प्रांत आहे (दर चौरस किलोमीटरमागे दोन माणसे, भारतात सुमारे साडेतीनशे माणसे असतात!) या प्रांतात एकोणिसाव्या शतकात काही वर्षे तीव्र दुष्काळाची होती, तर काही महामूर पिके येण्याची. आणि या सगळ्या काळातल्या अन्नोत्पादनाच्या आणि माणसांच्या जन्ममृत्यूंच्या तपशीलवार नोंदी आहेत. १९८०-९० च्या दशकात लार्स ओलोव्ह बायग्रेन (Lars Olov Bygren) याने स्टॉकहोमच्या कॅरोलिन्स्का संस्थेत या उपास-मेजवानी प्रकाराचा काही व्यक्तींवर आणि त्यांच्या मुलानातवंडांवर काय परिणाम झाला, हे तपासले. १९०५ साली जन्मलेल्या ९९ व्यक्तींच्या आईवडलांच्या आणि आजीआजोबांच्या पोषणाचा इतिहास तपासला गेला. उत्तरे अनपेक्षित होती. उपासानंतर मेजवानी भोगलेल्या पुरुषांची मुले लक्षणीयरीत्या अल्पायुषी ठरली. निव्वळ उपास भोगलेल्यांच्या मुलांपेक्षा ही मुले सरासरीने सहा वर्षे कमी जगली. घराण्यांमधील आयुर्माने, सामाजिक-आर्थिक भेद, यांचा विचार करता तर उपास-मेजवानी भोगलेल्यांची मुले इतरांपेक्षा बत्तीस वर्षे कमी जगली!
हाच प्रकार स्त्रियांमध्येही दिसला, पण सौम्य प्रमाणात, निष्कर्ष असा, की एखादे वर्ष जास्त खाणाऱ्यांची मुलेच नव्हे, तर नातवंडेही लवकर मरतात.
मुळात बायग्रेनला हा अभ्यास करायचे सुचले, कारण गर्भारपणात कुपोषित असलेल्या स्त्रियांची मुले जास्त प्रमाणात हृद्रोगाला बळी पडतात, असा एक अभ्यास १९८६ च्या लॅन्सेट या वैद्यकीय नियकालिकात आला होता. पण आई कुपोषित, म्हणजे बाळही कुपोषित, इतकाच अर्थ यातून काढता येतो. बायग्रेनच्या अभ्यासात पुरुषांच्या वंशजांमध्ये परिणाम दिसणे, ते नातवंडांमध्येही दिसणे, हे मात्र दाखवते की जीन्सवर परिणाम झाला असावा, भलेही तो जीनबाह्य संकेतांमुळे असेल.
एक लक्षात घ्यावे की आज सुचत असलेली यंत्रणाही काटेकोर इहवादीच आहे. जीन्स सोडून इतर परिणामकारकही जैवरासायनिकच आहेत; त्यांच्यात चैतन्य सूचितही होत नाही.
पण एपिजेनेटिक घटकांचे महत्त्व कैक पिढ्यांनंतरही दिसू शकते. उंदरांना बी-जीवनसत्त्व देणे-न देणे, याने काही जीन्सची अभिव्यक्ती घडवता-थांबवता येते, हे दाखवता आले आहे. काही केंबरांमध्ये (fruit flies) एका औषधाच्या वापराने डोळ्यांजवळ काही वेगळी वाढ होते, आणि हे परिणाम (कमीत कमी) तेरा पिढ्यांपर्यंत दिसतात. उंदरांची पिल्ले वाढत असताना त्यांना वेगवेगळी खेळणी दाखवणे, त्यांच्याकडे जास्त लक्ष पुरवणे, याने त्यांची दीर्घकालीन स्मरणक्षमता वाढते. नंतरच्या पिढीत खेळणी-लक्ष देणे थांबवले तरी मज्जाव्यवस्थेवरील परिणाम कायम राहतात.
एकूणच नेचरपंथी विचारांना उत्तर देणारे पुरावे नर्चरपंथीयांना मिळत आहेत : तेच डीएनए, तेच जीनसंच असणाऱ्या व्यक्तींची आयुष्ये इतर घटकांनी बदलवता येतात, आणि यातील काही बदल, काही काळ तरी आनुवंशिक असतात, असे दाखवता येत आहे.
[ व्हाय जीन्स आरन्ट डेस्टिनी या टाईम साप्ताहिकाच्या १८ जाने.२०१० मधील जॉन क्लाऊडच्या लेखावर आधारित टिपण. – सं. ]